आधुनिक स्त्रियांचा स्त्रीवाद

Submitted by सुमुक्ता on 20 February, 2015 - 03:29

जागतिक महिला दिन जवळ आला आहे त्यानिमित्ताने काहीतरी लिहू असे वाटत होते!! म्हणून स्त्रीवाद म्हणजे फ़ेमिनिझम वर काहीतरी लिहावे असे ठरवले. विषयाला अनुसरून निरीक्षण करायला मी चालू केले आणि प्रश्न पडला की स्त्रीवादाचा झेंडा मिरविणाऱ्या आम्ही शहरी आधुनिक स्त्रिया खरोखरच स्त्रीवादी आहोत का? आम्ही खूप खूप शिकलो, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला लागलो, पुरुषांना मिळणारे स्वातंत्र्य थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हालाही मिळायला लागले (हॉटेलात जेवणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, रात्रीच्या पार्ट्यांना जाणे, डिस्कोमध्ये नाचणे, इत्यादी), पारंपारिक साडी किंवा पंजाबी ड्रेस बासनात गुंडाळून आम्ही जीन्स-टीशर्ट, स्कर्ट वैगेरे घालायला लागलो. पुष्कळ घरातील पुरुषसुद्धा घरगुती कामामध्ये मदत करायला लागले. झालो की आम्ही स्त्रीवादी!!! काय राहिले अजून?………………… खरेच?

"घरीच बसलेली असते ती. तिला काय उद्योग आहे!!"
"किती जाड आहे ना ती!!"
"दिसायला यथातथाच आहे"
"लग्न होऊन एवढी वर्षे झाली तरी अजून मूल नाही"
"लग्न जमतच नाहीये तिचे एवढे वर्ष"
"शिक्षण कमीच आहे तसे"
"अगदी काकूबाई आहे ती!!"
"कसे कपडे घालते ती!!"

अशी आणि अजून कितीतरी उपहासात्मक वाक्ये अगदी आपल्यासारख्याच शहरी आधुनिक स्त्रियांच्या तोंडी मी सर्रास ऐकली आहेत. पुष्कळ वेळा स्त्रिया बोलत नाहीत पण त्यांच्या वागण्यातून आणि देहबोलीमधून भेदभाव सतत जाणवत राहतो. ह्यातील काही वाक्ये मीसुद्धा बोललेली आहेतच. कितीतरी वेळा मीसुद्धा जजमेंटल झालेच आहे. मग मी खरेच स्त्रीवादी आहे का? मला स्त्रीवादाचा खरा अर्थ कळला आहे का? मी खूप शिकलेली आहे, मी काम करून पैसे कमावते, मी उत्तम स्वयंपाक करते, मी आधुनिक आहे, मी स्वतंत्र आहे, हे म्हणताना इतर स्त्रिया कमी आहेत असे का म्हणावेसे वाटते? स्वत:च्या कर्तुत्वाचा अभिमान बाळगताना इतर स्त्रिया कशा कर्तुत्ववान नाहीत हे सिद्ध का करावेसे वाटते? ह्याचा अर्थ आत्मविश्वासाची कमी असा घ्यावा की अहंकारी वृत्ती असा घ्यावा?

प्रत्येक स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला तिचे आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. काय शिकावे, नोकरी करावी की नाही, लग्न करावे की नाही आणि केले तर कोणाशी करावे, मूल होऊ द्यावे की नाही आणि कधी होऊ द्यावे, काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावे, हे सगळे प्रश्न तिचे वैयक्तिक प्रश्न नाहीत का? मग त्यावर टीकाटिप्पणी करण्याचा कोणालाच काय अधिकार आहे? तिच्याकडे असलेल्या किंवा नसलेल्या गोष्टींवरून तिच्याशी भेदभावाने वागण्याचा काय अधिकार आहे? ज्याप्रमाणे वैयक्तिक निर्णय घायचा प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे त्याप्रमाणे तिचे अनेक प्रश्नसुद्धा आहेत. त्या प्रश्नांशी कदाचित ती एकटीच लढा देत असेल. तिचे प्रश्न माहित नसतानाच जजमेंटल होण्याचा तरी कोणाला काय अधिकार आहे?

स्त्रियांनीच स्त्रियांना जर असे कमी लेखले तर मग खरा स्त्रीवाद कधीच रुजणार नाही. मग पुरुषांकडून तरी स्त्रियांनी का म्हणून अपेक्षा ठेवायची? सर्व स्त्रिया समान आहेत मग त्यांचे गुण-अवगुण तितकेसे महत्वाचे नाहीत ही भावना जेव्हा प्रत्येक स्त्रीच्या मनात रुजेल तेव्हाच स्त्रीवादाचे खरे सौंदर्य कळायला मदत होईल. स्त्रीवादाची व्याख्या केवळ स्त्री-पुरुष भेदभाव न बाळगता मिळालेल्या/दिलेल्या संधीच नव्हे तर स्त्रियांनी(आणि पुरुषांनीसुद्धा) स्त्रीत्वाचा आणि इतर स्त्रियांचा केलेला सन्मानसुद्धा ह्या व्याख्येमध्ये अध्यारुत असायला हवा.

करण्यासारखे खूप काही आहे.ज्या स्त्रियांपर्यंत स्त्रीमुक्ती चळवळ पोहोचालेलीच नाही अशा स्त्रियांना मदत करणे हे तर आहेच. पण ते खूप मोठे काम आहे. आपल्या आजूबाजूच्या इतर स्त्रियांचा (नातेवाईक, शेजारपाजारच्या आणि इतरही ओळखी-अनोळखीच्या) अनादर होणार नाही असे वागणेबोलणे जमले तरीही आपण खूप काही साध्य करू शकतो. पुरुषांशी स्पर्धा करण्यापेक्षा आपापसातली ही स्पर्धा आणि तेढ मिटविणे अधिक गरजेचे आहे. स्त्री हिच स्त्रीची शत्रू असते हे वाक्य खोटे करून दाखवायला हवे.

जागतिक महिला दिन खऱ्या अर्थानी साजरा करायचा असेल तर महिलांनी महिलांनाच कमी लेखून भेदभाव करणे सोडून द्यायला हवे. स्वत:ला आधुनिक स्त्रीवादी म्हणविणाऱ्या माझ्यासारख्या सर्वच स्त्रियांनी आत्मपरीक्षण करायला हवे. आपल्या बोलाण्यातून आणि वागण्यातूनसुद्धा चुकून किंवा मुद्दामून आपण इतर स्त्रियांचा उपहास तर करत नाही ना, आपल्यासारख्या नसणाऱ्या (मग ते कोणत्याही बाबतीत असो) स्त्रियांना जज करून भेदभावाची वागणूक तर देत नाही न हे वारंवार तपासायला हवे. मी ठरविले आहे…मी प्रयत्न करणार आहे.

======

तळटीपः जजमेंटल साठी मराठी शब्द माहित नाहीत म्हणून इंग्रजी शब्दच वापरला आहे. कोणाला माहित असेल तर कृपया सांगवा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण स्वतःला स्त्रीवादी समजणारर्‍या स्त्रियांना इतर स्त्रियांचे प्रश्नच पुष्कळ वेळा समजत नाहीत. ते त्यांनी समजून घ्यावेत>> प्रत्येक स्त्रीवादी स्त्री ला इतर प्रत्येक स्त्रीचे प्रश्न समजावेत अशी अपेक्षा चुकीची आहे. प्रत्येकाचे वेगळे पर्स्पेक्टिव्ह असते प्रश्नाकडे बघण्याचे अन उत्तर शोधण्याचे.

परिस्थितीला दोष देणार्‍या, योग्य वातावरण मिळाले नाही म्हणणार्‍या, दुसर्‍यांनी मला कमी लेखु नये अशी अपेक्षा करणार्‍या पण स्वतः काही करुन दाखवायला नको असणार्‍या सर्वांनीच हा व्हिडिओ बघा"च" >>>> अहो परिस्थितीला दोष देणार्‍या दैववादी स्त्रीयांसाठी नाही लिहिले मी. पण ज्या स्त्रिया संघर्ष करित आहेत त्यांना पोषक वातावरण नको का द्यायला? त्यांनी अपेक्षा केली नाही तरीही!!

प्रत्येक स्त्रीवादी स्त्री ला इतर प्रत्येक स्त्रीचे प्रश्न समजावेत अशी अपेक्षा चुकीची आहे. प्रत्येकाचे वेगळे पर्स्पेक्टिव्ह असते प्रश्नाकडे बघण्याचे अन उत्तर शोधण्याचे. >>> मग कोणालाच कोणाचे प्रश्न समजावेत अशी अपेक्षा चुकीची आहे का?

तुम्ही पोषक वातावरण "देण्याची" अपेक्षा ठेवताय, "घडवण्याची" नाही. ते खटकतेय. माझ्यामते स्वतःचा सर्वात मोठा शत्रु तुम्ही स्वतः असता. दुसरे तुम्हाला कमी लेखुच शकत नाही, जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही. आणि तुम्ही स्वत:ला कमी लेखणारच नाही, जेव्हा तुम्ही स्वतःची परिस्थिती सुधारण्यासाठी ऑलरेडी काहीतरी प्रयत्न करताय. भले तुम्ही लौकिकार्थाने यशस्वी नसाल (अजून) पण पुढे यशस्वी व्हाल तुमच्या बॅटल मध्ये ही जिद्द ठेवावी. आणि झाला नाहीत यशस्वी तरी प्रयत्न केल्याचे, संघर्ष केल्याचे समाधान तुमचे स्वतःचे आहे. तेच तुमचे यश आहे. दुसर्‍याने ते समजून घेतले नाही, रेकग्नाइझ केले नाही तरी.

पण ज्या स्त्रिया संघर्ष करित आहेत त्यांना पोषक वातावरण नको का द्यायला? >> मी स्वतः झगडणार्‍या लोकांना सपोर्ट करते असे लिहिलेय ना. पण प्रत्येकाला असा सपोर्ट मिळेलच असं नाही. मग काय परिस्थितीला दोष देणार का?

स्रीवाद म्हणजे मी एखादीला "काकुबाई" म्हणू नये किंवा "नुसती घरात बसते" असं म्हणू नये असा नाही. स्त्रीवाद म्हणजे मी ज्यांना असं काही म्हणतेय्/जज करतेय त्यांना ते अपमानास्पद न वाटणं, तेवढा सेल्फ एस्टीम असणं. आहे मी काकुबाई. मग? माझा चॉइस! असं का नाही म्हणता येत? कारण तो बरेचदा स्त्रीचा स्वतःचा "चॉइस" नसतो. आणि हे जास्त डेंजरस आहे मी काकुबाई म्हणून जज करण्यापेक्षाही. मी जज न करण्याने परिस्थिती बदलणारे का?
A person's circumstances are byproducts of fate as well as choices that are made. While we can't judge a person by his/her fate, a person will still be evaluated/judged for the choices he/she makes. Women can't be exceptions.

जिज्ञासा,

>> हे सगळे वर्षानुवर्षाच्या मानसिकतेतून निर्माण झालेले stereotypes आहेत जे खूप घातक आहेत!

हे साचेबंध (स्टीरियोटाईप्स) कोणते आहेत यावर जरा अधिक प्रकाश टाकणार का? उदाहरण वगैरे देऊन. तसंच हे घातक कसे ठरतात तेही सविस्तर सांगावे. Happy

आ.न.,
-गा.पै.

इथे अनेक मुद्यांचं एकत्रीकरण होतंय असं मला वाट्तंय.
माझ्या पोस्टच्या संदर्भात सांगायचं तर
१) मी कुठेही सोशलिस्ट समानता असावी असं म्हणलं नाहीये.
समाजातल्या सगळ्या स्तरातल्या स्रीया, त्यांच्या आजूबाजूची परिस्थीती, मानसिकता, शिक्षण, प्रश्ण समान असतील असं विधान करणं चुकीचं आहे, आणि मी ते केलेलं नाही.
उदा. एका अडाणी स्त्रीचे प्रश्न वेगळे असतील एका शिकलेल्या स्त्री पेक्षा. नोकरीसाठी एकटे राहणारीचे वेगळे असतील घरी राहून संसार सांभाळणार्या स्त्रीपेक्शा. पण तरीही ते प्र्श्ण आहेत आणि ते त्या त्या स्तरावर जावून समजून घेतले पाहिजेत.
२) दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी माझ्या पहिल्याच पोस्टमधे "एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीला 'स्त्री म्हणून सन्मान द्यायला, किंबहुना व्यक्ती म्हणून सन्मान द्यायला कमी पडते' ह्या अर्थाचे विधान केले आहे. मी जर स्वतंत्र, सबल झाले असेल तर माझ्या बलाचा उपयोग कसा करायचा हा विचार करण्याची जबाबदारी माझ्यावर येते.
३) इथे जज करणे ह्या संज्ञेभोवती चर्चा गोल गोल फिरत आहे असं मला वाटतं. एका स्त्रीने दुसरीला समजून न घेणे यामधे मी खालीले गोष्टींचाही विचार करत आहे -
प्रगतीसाठी संधी न देणे, संधी मिळाल्यावर विरोध करणे, विरोधाला बळी न पडता एखादीने प्रगती केलीच तर तिला आऊअट्कास्ट करणे, तरीही एखादीने जुमानले नाही तर तिला गिल्ट येईल अशी उदाहारणे/गोष्टी/किस्से तिच्या समोर डिस्कस करणे, आणि तरीही जुमानले नाही तर 'पुरुषांच्या बळाचा वापर करून त्यांच्या मदतीने तिला संपवणे.
ह्या विरोधाच्या विविध पायर्‍या आहेत, आणि त्या समाजाच्या विविध स्तरात विविध प्रमाणात दिसतात ही वस्तूस्थिती आहे

ह्या सगळ्या घटकांचा विचार होणं , त्याबद्दल चर्चा होणं आणि जागृती होणं आवश्यक आहे.

इथे कोणीच कष्टाशिवाय स्वातंत्र हवंय अशी मागणी केली नाहीये.
कष्टाला पर्याय नाहीये. फक्त प्रगतीसाठी मला 'कष्ट' करावे लागत आहेत की 'संघर्ष' की 'संघर्ष + कष्ट' हे मिळणार्‍या संधी, मिळणारा सन्मान आणि होणारा विरोध ह्यावर अवलंबून आहे.
शिवाय माझ्यासाठी १०० गोष्टी असताना १ मिळून १०१ गोष्टी होणं आणि
कोणाकडे ० गोष्ट असताना १ मिळण, ह्या दोन्ही केसेस मधे वरवर पाहता १ हा आकडा जरी सारखा असला तरी त्याने पडणारा फरक वेगळा असू शकतो.
हा फरक १०० असलेल्यांनी आणि ० असलेल्यांनी देखील समजून घ्यायला हवा.

रार, अगेन! इथे स्त्रीनी स्त्रीला कमी लेखण्याचा नव्हे, मनुष्याने मनुष्याला कमी न लेखण्याचा प्रश्न आहे. >>> फक्त मनुष्याने मनुष्याला कमी लेखण्याच्गा प्रश्न असता तर पुरुषगर्भाची देखील हत्या झाली असती किंवा जन्मतः पुरुष बालकांचीही हत्या करण्यात आली असती. पण रोअ‍ॅलीटी इज स्त्रीगर्भाची हत्या होते, स्त्रीबालकांची हत्या होते.
यातल्या अनेक केसेस मधे नवजात बालकाची माता, आजी, आत्या यांसारख्या घरातल्या स्त्रीयांचा समावेश असतो.
इथे एक स्त्रीच दुसर्‍या स्रीला कमी लेखते.
जिथे ह्या कृत्यात स्रीचा समावेश नसतो, तिथे ती विरोध करुन असं कृत्य थांबवण्यासाठी असमर्थ असते/किंवा समर्थ असूनही विरोध करत नाही. अश्यावेळी एक स्त्री दुसर्‍या स्रीचा होणारा अवमान थांववून तिला सन्मान देऊ शकत नाही.

रार,
स्त्रीभ्रुण हत्येमागे कॉम्प्लेक्स सोशिओ-एकॉनॉमिक फॅक्टर्स आहेत. स्त्री ने स्त्रीभ्रुण कमी लेखणे हे त्यातलं वरवर दिसणारं टिप ऑफ द आइसबर्ग. तुझं "स्त्रीने स्त्रीला कमी लेखू नये" हे म्हणणं यासंदर्भात असेल तर मान्य आहेच. पण ओवरॉल "एका स्त्रीने दुसरीला कशाच वरुन जज करु नये आणि सगळ्या समान आहेत" हे लेखात जे लिहिलंय त्याच्याशी वर लिहिलेल्या अनेक कारणांसाठी तीव्र असहमती आहे.

मला वाटतं नताशा जे म्हणतेय त्याचा अर्थ रार पर्यंत पोचतच नाहीये.
स्त्रीगर्भाची हत्या समाजाने स्त्रीला कमी लेखले म्हणून सुरू झाल्या.
नोकरी करण्या न करण्यावरून, शिक्षण, जाडी, वजन, रूप, दगड, धोंडे, माती याच्यावरून एका स्त्रीने (वा व्यक्तीने) दुसर्‍या स्त्रीला (वा व्यक्तीला) कमी लेखणे याचा आणि स्त्रीगर्भाच्या हत्यांच्या डायरेक्टली संबंध नाही.

मला नताशाचे म्हणणे पटले.

बाकी यशस्वी/ कर्तबगार स्त्रिया बिचार्‍या घरात असणार्‍या स्त्रियांना कमी लेखतात हा एक उत्तम सिंपथी टूरचा मुद्दा आहे. कारण दोन्ही गटांमधे दुसर्‍या गटाला कमी लेखण्याचे पोटेन्शियल आणि उदाहरणे अगदी सारख्या प्रमाणात आहेत.

कुणी तुम्हाला कमी लेखत असल्यास तिकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला पटते तेच करा हे मला जास्त स्त्रीवादी वाटते.

उदाहरणादाखल १० बायका एकत्र केल्यास कुणाला तरी तो ग्रुप खूप आवडेल, कुणाचे तरी बाकीच्या ग्रुपशी जमणार नाही. मग ती त्या ग्रुपातून बाहेर तरी पडेल किंवा टाळेल (कंटाळा ते वाद नको काहीही कारणे असू शकतात). त्या एखादीचे म्हणणे पटत नाही म्हणून बाकीचा ग्रुपही तिला टाळेल कदाचित. मग ग्रुप विरूद्ध एखादी असे आरोप प्रत्यारोप. दोघांचे म्हणणे ती/ त्या सगळ्या आम्हाला कमी लेखते/ लेखतात वगैरे वगैरे...

अरे पण एक मिनिट हे जगातले १० पुरूष, १० स्त्रीपुरूषांचा एकत्रित गट यातले काही एकत्र केले तरी होतेच.
आता याचा स्त्रीवादाशी काय संबंध आहे ते सांगा बरं.....

३) इथे जज करणे ह्या संज्ञेभोवती चर्चा गोल गोल फिरत आहे असं मला वाटतं. एका स्त्रीने दुसरीला समजून न घेणे यामधे मी खालीले गोष्टींचाही विचार करत आहे ->>>>>> सगळी चर्चा नाही पण आधी लेख आणि नंतर काही पोस्टी गोल गोल फिरल्या आहेत.
पुढे
प्रगतीसाठी संधी न देणे, संधी मिळाल्यावर विरोध करणे, विरोधाला बळी न पडता एखादीने प्रगती केलीच तर तिला आऊअट्कास्ट करणे, तरीही एखादीने जुमानले नाही तर तिला गिल्ट येईल अशी उदाहारणे/गोष्टी/किस्से तिच्या समोर डिस्कस करणे, आणि तरीही जुमानले नाही तर 'पुरुषांच्या बळाचा वापर करून त्यांच्या मदतीने तिला संपवणे.
ह्या विरोधाच्या विविध पायर्‍या आहेत, आणि त्या समाजाच्या विविध स्तरात विविध प्रमाणात दिसतात ही वस्तूस्थिती आहे>>>>>> हे सगळे स्वतंत्र मुद्दे म्ह्णून बरोबर आहेत पण त्यांचा कुठेच उल्लेख मूळ लेखात दिसत नाही आणि सुमुक्ता ह्यांच्या पोस्टीत पण नाही. हा जर लेखाचा उद्देश असता तर मग ही चर्चा झाली नस्ती. त्यांनी प्रामुख्यानी जजमेंटल असणे/नसणे फक्त हाच एक मुद्दा घेतला आणि त्या एका मुद्द्यामध्ये तू लिहिलेत ते इतके सगळे मुद्दे अभिप्रेत नाहीयेत.

नताशा, सॉलिड पोस्टी आहेत बरका! Happy
स्त्रीवाद म्हणजे नेमकं काय? स्त्रीया आता पुढारल्या आहेत ह्याची काही अचूक लक्षणं लिहिली आहेस.

बाकी, सुमुक्ता ह्यांनी लेखावर काम करायला पाहिजे असं लिहिलय त्यामुळे अजून पुढे त्यांच्या मुद्द्यांचे खंडन करण्याची गरज नाही असं वाटतं.

सुमुक्तांच्या मूळ लेखात नसलेल्या बाबीही चर्चेत येणं मला गैर वाटत नाही. पण हा भाग वेगळा!

नताशा जे म्हणत आहेत तेच आधी इतर काहींनी म्हंटलेले होते. पण रार आणि सीमंतिनी ह्यांचाच मुद्दा अ‍ॅप्रिशिएट होत नाही आहे असे मला तरी वाटत आहे.

तो मुद्दा असा:

कोणीच कोणाला कमी लेखू नये किंवा कोणी आपल्याला कमी लेखत असेल तर आपण ते लावून घेऊ नये हे सगळे ठीक आहे. पण एक स्त्री दुसर्‍या स्त्रीला कमी लेखते (मान्य, की ही फक्त एक ह्युमन इमोशन आहे) ह्यामुळे दुसरी स्त्री स्वतःसाठी स्वातंत्र्य मिळवण्याबाबतचा आत्मविश्वास घालवून बसू शकते व असे होऊ शकते.

हे अ‍ॅप्रिशिएट करायला डझनाने प्रतिसाद का यायला हवेत काही समजले नाही.

वर दिलेल्याच उदाहरणांपैकी एक उदाहरण द्यायचा प्रयत्नः

समजा दहाजणींच्या ग्रूपमध्ये नऊजणींनी दहावीला काकूबाई म्हणून सतावले व ती ग्रूपमधून बाहेर पडली. ह्या ह्युमन इमोशन्स आहेत हे मान्यच आहे. हे स्त्री-स्त्री, स्त्री-पुरुष, पुरुष-पुरुष असे सर्वत्र घडू शकते हे मान्यच आहे. त्या काकूबाई टाईपने 'हो आहे मी काकूबाई आणि बाय चॉईस आहे' हा आत्मविश्वास बाळगावा ही अपेक्षा योग्य आहे हे मान्यच आहे. इतर नऊजणी जजमेंटल झाल्या हे चूक आहे हे मान्यच आहे. पण एवढे सगळे करून ती दहावी काकूबाई जर प्रचंड प्रयत्न करून ह्या नऊजणींसारखी झाली तर तिच्या आधीच्या काकूबाईपणाचा उल्लेख पुन्हा कधीही होणार नाही ही दक्षता त्या नऊजणी घेतील का? तिला त्या मनमोकळेपणाने स्वीकारतील का? तिच्या 'काकूबाई-ते-स्वीकारार्ह' ह्या प्रवासाला सुमारे एक वर्ष लागले तर ते मधले एक वर्ष विस्मरणात घालवून द्रूप पुन्हा आधीसारखा एकसंघ होईल का? मला वाटते सुमुक्ता, रार आणि सीमंतिनींचा मुद्दा हा आहे. (असा माझा समज आहे, तसे नसल्यास क्षमस्व)! जर तिला त्या ग्रूपने पुन्हा कधीही त्याचा उल्लेख न करून पूर्णतः आपले मानले तर आणि तरच ती काकूबाई स्त्री आत्मविश्वासाने वागू शकेल. तरच एक स्त्री (तथाकथित काकूबाई ह्या लेबलपासून) स्वतंत्र होईल आणि ते स्वातंत्र्य तिला इतर स्त्रियांमुळे मिळालेले असेल. ह्यातच दुसरा भाग असा की तिला काकूबाई टाईपच राहावयाचे असेल तर तिने ग्रूपबाबत केलेल्या टिपण्ण्या एका मायनॉरिटीच्या टिपण्ण्या म्हणून विचारात तरी घेतल्या जातील का? की तिच्यावर अडाणीपणाचा शिक्का मारण्यात समाधान मिळवणे उरलेल्या नऊजणींसाठी सोप्पे असेल? जर तिचे विचार एखादीला पटलेच तर ती स्त्री त्य अकाकूबाई स्त्रीसारखी वागायला लागेल का? तसे वागायला लागताना ग्रूपमधून बाहेर पडण्याची भीती तिला कितपत जाणवेल? (येथे एक रुका हुवा फैसला हा चित्रपट प्रकर्षाने आठवतो. सर्व वकीलांविरुद्ध एकच वकील उभा ठाकतो आणि तासा-दिडतासाच्या घनघोर चर्चेनंतर सर्वांचे मतपरीवर्तन होते). हे त्या दहा स्त्रियांच्या ग्रूपमध्ये होऊ शकेल का?

एखाद्या स्त्रीचे मानसिक खच्चीकरण कुटुंब, पुरुष, संस्था, कायदे ह्या सर्व आघाड्यांवर होतेच हे मान्य करूनही, फक्त आणि फक्त 'स्त्रीने स्त्रीचे केलेले खच्चीकरण' इतका (आणि इतकाच) मर्यादीत विषय चर्चेला घेतला जाऊच शकत नाही का? स्त्रीने स्त्रीचे केलेले खच्चीकरण हा विषय घेतला की मग पुरुष नाही का करत, पुरुषांचे नाही का होत, हे मुद्दे टाळता येत नाहीत का?

मायबोलीवर माझा स्वतःचा अनुभव काय आहे हे नोंदवताना वाईट वाटत आहे. लेखाच्याच विषयापुरते बोलायचे झाले तर येथे आपल्या कंफर्ट झोनमध्ये बसून इतर स्त्रियांवर शिक्के, लेबले मारणे सोप्पे पडते ही विचारधारा सर्रास अंगी बाणवली जाते. तेही इतक्या अतीआक्रमकपणे, की चुकूनमाकून एखाद्या स्त्रीला वेगळे काही म्हणायचे असेल तरी ती भेदरलेल्या कोकरासारखी लपून बसते.

सुमुक्ता, तुम्हाला लेख तातडीने 'स्पेसिफिक मुद्दे असलेला' असा बदलायला हवा आहे असे वाटते.

वैयक्तीक शेरेबाजी कोणाला जाणवली असल्यास क्षमस्व!

-'बेफिकीर'!

.

एखाद्या स्त्रीचे मानसिक खच्चीकरण कुटुंब, पुरुष, संस्था, कायदे ह्या सर्व आघाड्यांवर होतेच हे मान्य करूनही, फक्त आणि फक्त 'स्त्रीने स्त्रीचे केलेले खच्चीकरण' इतका (आणि इतकाच) मर्यादीत विषय चर्चेला घेतला जाऊच शकत नाही का? स्त्रीने स्त्रीचे केलेले खच्चीकरण हा विषय घेतला की मग पुरुष नाही का करत, पुरुषांचे नाही का होत, हे मुद्दे टाळता येत नाहीत का?>>>>>> घेता येऊ शकतो पण तो घेताना स्त्रीवाद हा मुद्दा त्यात आणू नये.

पुन्हा तेच लिहावे लागत आहे.

'स्त्रीवाद' ह्या संकल्पनेला केंद्रस्थानी मानूनच 'फक्त स्त्रियांनी स्त्रियांना कमी लेखणे' हा विषय चर्चेला घेतला गेला आहे असे म्हणायचे आहे.

स्त्रीवाद ह्या संकल्पनेला केंद्रस्थानी मानून स्त्रियांनी पुरुषांना, पुरुषांनी पुरुषांना, पुरुषांनी स्त्रियांना कमी लेखणे हे विषय ह्या लेखिकेला (बहुतेक) अपेक्षित नाहीत.

तसेच, 'फक्त स्त्रीने स्त्रीला कमी लेखणे' ह्या बाबीचा संबंध सदर लेखात लेखिका फक्त स्त्रीवादाशीच जोडू पाहात आहे, तो इतर गोष्टींशीही जोडला जाऊ शकतो (जसे ह्या निव्वळ मानवी भावना आहेत, कोणीच कोणाला कमी लेखू नये वगैरे) हे लेखिकेला मान्य आहे पण येथे तिला बहुधा फक्त स्त्रीवादापुरतेच बोलायचे असावे.

Happy

त्यामुळे, 'ह्यात स्त्रीवाद आणू नये' हा मुद्दा मुळातच पटत नाही आहे (फक्त ह्या लेखापुरता).

पोस्ट काहीच कळली नाही बेफिकिर. तुमचं नेहमी सारखं काहीतरी वेगळच स्टेशन लागलय त्यामुळे जाऊद्या.

नताशा, रार, सीमंतिनी उत्तम पोस्ट्स आणि चांगली उद्बोधक चर्चा.

सुमुक्ता, तुमच्या लेखामधल्या पहिल्या पॅरामधला उपहास खरंच कळत नाहीये, त्यामुळे लेख वाचतानाच आपोआप जजमेंटल होत जाणं होतच आहे. त्रयस्थ व्यक्ती म्हणून खरंच एकदा वाचून पहा.

नताशा, तुमच्या सर्व पोस्ट्स आवडल्या! रार, आणि सिमंतीनी यांना काय म्हणायचेय तेही समजले.

लेखापुरते बोलायचे तर माझे स्वतःचे मत- जज करणे दोन्ही बाजूंनी होते. होममेकर्स विरुद्ध घरसंसार + करीयर्/नोकरी, घरसंसार्+नोकरी वि. घरसंसार + करीयर , नोकरी/करीयर वाले सिंगल वि. कुटुंब + नोकरी/ करीयर अशा अनेक छोट्या/मोठ्या गटातून हे जज करणे सुरु असते. लोकं तुम्हाला त्यांच्या अनुभवाची फुटपट्टी लावणार, चौकटीत कोंबायला बघणार. यात बरीचशी लेबल्सही रिलेटिव असल्याने बदलतात. तुम्ही आयुष्याच्या कुठल्या फेजमधून जात आहात, कुठल्या ग्रुपमधे आहात त्यावरही लेबल्स बदलत असतात. यातून आपल्याला आवश्यक तो आधार शेवटी आपणच मिळवावा लागतो. त्यासाठी आपण आधी कुणाचे तरी आधार व्हावे लागते.
स्त्रीवादाचा मुद्दा बघता खरोखर स्वतंत्रतेच्या वाटेवर चालणारी व्यक्ती असेल तर ती व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करेल, समोरच्या व्यक्तीला आधार हवा असेल तर तो देवू करेल पण त्याच बरोबर जे घडत आहे ते मानवतेच्या दृष्टीने चूक असेल तर त्याच्या विरोधात आपले स्पष्ट मतही नोंदवेल.
बाकी पारंपारिक किंवा आधुनिक असल्याचा आव आणून कुणी मुद्दाम बुलिंग करत असेल तर त्या गोष्टीचा त्या त्या वेळी स्पष्ट शब्दात प्रतिकार करावा.

स्वाती२, उत्तम पोस्ट!
यातून आपल्याला आवश्यक तो आधार शेवटी आपणच मिळवावा लागतो. त्यासाठी आपण आधी कुणाचे तरी आधार व्हावे लागते.>>>>>>> क्या बात! Happy

>>>पोस्ट काहीच कळली नाही बेफिकिर. तुमचं नेहमी सारखं काहीतरी वेगळच स्टेशन लागलय त्यामुळे जाऊद्या.<<<

कसले प्रतिसाद आहेत हे! एका धाग्यावर ताजेतवाने मन ठेवूनही लिहिता येत नाही का? पूर्वग्रह (तोही गृहीत धरलेला) हवाच का? हे वैयक्तीक होत आहे.

==============

>>>नताशा, रार, सीमंतिनी उत्तम पोस्ट्स<<<

नताशा आणि रार व सीमंतिनी ह्यांच्या पोस्ट्स परस्परविरोधी आहेत.

===============

स्वाती२,

पहिल्यांदाच अत्यंत असंबद्ध पोस्ट वाचायला मिळाली तुमची!

स्वाती२, नताशा पोस्ट्स आवडल्या.

गा.पै. एक उदाहरण तर मी लगेच दिले आहे. ऋन्मेष याला असे वाटते की शारीरिक शक्ती आणि बुद्धी ह्या गोष्टी gender based आहेत! अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मुळीच gender based नाहीत फक्त अनेक वर्षांच्या सामाजिक व्यवस्थेत nurture झाल्यामुळे त्यांना stereotypes चे रूप प्राप्त झाले आहे. stereotypes ची काही उदाहरणे (ही फक्त प्रातिनिधिक आहेत वेगवेगळ्या परिस्थितीत अनेक विशिष्ट stereotypes असू शकतात)
स्त्रियांसाठी: विशिष्ट वयात लग्न, मुलं ई. ची अपेक्षा, स्वयंपाक आला पाहिजे, पोशाख कोणता घालावा/मंगळसूत्र, कुंकू वै.
पुरुषांसाठी: घराचा कर्ता पुरुष म्हणून पैसे कमावण्याची अपेक्षा, आई वडलांची जबाबदारी, भावनिकदृष्ट्या खंबीर असण्याची अपेक्षा, पोशाखाच्या अपेक्षा इ. मी मुलगी असल्याने मुलींसाठी काय stereotypes आहेत हे मला जास्ती माहिती आहे पण मुलांनी त्यात भर घालायला हरकत नाही. एका धाग्यात ऋन्मेषने मुलांना shorts/3/4ths, pink shirts घालता येत नाहीत ह्याबद्दल खंत व्यक्त केली होती.
माझ्या आजूबाजूला फार झपाट्याने ह्या stereotypes ना मोडताना मी बघते आहे पण अनेक ठिकाणी अजूनही फार conservative विचाराने वागतात. आणि त्यासाठी ह्या set stereotypes चा आधार घेतला जातो.
ह्याचा तोटा असा की ज्या व्यक्तीला stereotype च्यापेक्षा वेगळ्याप्रकारे वागायचे असते त्यांना समाजात वावरताना खूप टीका आणि अपमानाला सामोरे जावे लागते. People get judged if they break stereotypes सुदैवाने ह्याची जाणीव वाढते आहे आणि अनेक stereotypes ना सणसणीत अपवाद निर्माण होत आहेत. त्या सर्व पायवाटांचे हमरस्ते व्हावेत ह्यासाठी सतत प्रयत्नांची गरज आहे.

लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणी मध्ये ती मुक्त-विमुक्त ह्या नावाने एक सदर प्रसिद्ध होतं. दरवेळी ते सदर वाचलं की सुन्न आणि हतबल वाटतं Sad अजून किती प्रकारची विषमता आहे समाजात! अजून किती बदल घडायला हवे आहेत!
http://www.loksatta.com/chaturang-category/timuktvimukt/

यातून आपल्याला आवश्यक तो आधार शेवटी आपणच मिळवावा लागतो. त्यासाठी आपण आधी कुणाचे तरी आधार व्हावे लागते. >> मस्त!
मी जर स्वतंत्र, सबल झाले असेल तर माझ्या बलाचा उपयोग कसा करायचा हा विचार करण्याची जबाबदारी माझ्यावर येते. >> +1000

आपण सक्षम नसताना दुसर्‍याचा आधार होणे कठीण असते. पण सक्षमतेकडचा हा प्रवास जरी वैयक्तिक लढाई असली तरी ती एकाकी लढत असू नये.
'कमी लेखल तर काय ? त्या स्त्री कडे असू नये का आत्मसम्मान' - हा एक सीन बघा -
https://www.youtube.com/watch?v=J0qvpM1DtwM#t=1h42m15s

Words can create an environment that is too toxic, too hostile to endure. ह्याचा स्त्रीवादाशी संबंध (माझ्यापुरता तरी) असा - एकही स्त्री तिच्या कार्यक्षेत्रातून (घर असो वा व्यवसाय) एन्ड्युरंस कमी पडला म्हणून बाहेर जायला नको. ह्यात तिची ताकद वाढवणे आहेच पण परिसर ही पोषक बनवायचा आहे.

>>>यातून आपल्याला आवश्यक तो आधार शेवटी आपणच मिळवावा लागतो. त्यासाठी आपण आधी कुणाचे तरी आधार व्हावे लागते. >> मस्त!<<<

>>>आपण सक्षम नसताना दुसर्‍याचा आधार होणे कठीण असते.<<<

ही दोन असंबद्ध विधाने आहेत असे मला वाटत आहे.

असंबध्द नाही ती परस्पर विरोधी विधाने आहेत. स्वाती२ यांचे वाक्य आवडले - म्हणून मस्त. पण व्यवहारात ते जमेल का? माहीत नाही. माझे मत आधी स्वतः सक्षम व्हा.
'आधार' हा शब्द मी जरा व्यापक मानते म्हणून असेल. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तशी 'काडी' व्हा असे कदाचित स्वाती२ यांना म्हणायचे असेल. त्या लिहीतील कदाचित सविस्तर.

>>>बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तशी 'काडी' व्हा असे कदाचित स्वाती२ यांना म्हणायचे असेल. त्या लिहीतील कदाचित सविस्तर.<<<

मुळात बुडत्याला काडीचा आधार होणारी स्त्री स्त्रीवाद जोपासते हे गृहीतक कशावर बेस्ड आहे?

कदाचित त्यांना तसे म्हणायचे असेल हा वेगळाच भाग आहे.

त्या लिहीतील कदाचित हा आणखीन वेगळा भाग!

कसले प्रतिसाद आहेत हे! एका धाग्यावर ताजेतवाने मन ठेवूनही लिहिता येत नाही का? पूर्वग्रह (तोही गृहीत धरलेला) हवाच का? हे वैयक्तीक होत आहे.>>>>>>> अहो ऑनेस्टली मी समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि काही समजली नाही आजिबात पोस्ट. पूर्वग्रहाचे म्हणाल तर हे असं तुमची पोस्ट एकदम भलतेच काहीतरी मुद्दे असलेली असते हे ह्या आधीही बर्याच वेळा झालय म्हणून.

>>> यातून आपल्याला आवश्यक तो आधार शेवटी आपणच मिळवावा लागतो. त्यासाठी आपण आधी कुणाचे तरी आधार व्हावे लागते.<<<

हे तर अ‍ॅण्टीस्त्रीवादी आहे

Pages