आधुनिक स्त्रियांचा स्त्रीवाद

Submitted by सुमुक्ता on 20 February, 2015 - 03:29

जागतिक महिला दिन जवळ आला आहे त्यानिमित्ताने काहीतरी लिहू असे वाटत होते!! म्हणून स्त्रीवाद म्हणजे फ़ेमिनिझम वर काहीतरी लिहावे असे ठरवले. विषयाला अनुसरून निरीक्षण करायला मी चालू केले आणि प्रश्न पडला की स्त्रीवादाचा झेंडा मिरविणाऱ्या आम्ही शहरी आधुनिक स्त्रिया खरोखरच स्त्रीवादी आहोत का? आम्ही खूप खूप शिकलो, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला लागलो, पुरुषांना मिळणारे स्वातंत्र्य थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हालाही मिळायला लागले (हॉटेलात जेवणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, रात्रीच्या पार्ट्यांना जाणे, डिस्कोमध्ये नाचणे, इत्यादी), पारंपारिक साडी किंवा पंजाबी ड्रेस बासनात गुंडाळून आम्ही जीन्स-टीशर्ट, स्कर्ट वैगेरे घालायला लागलो. पुष्कळ घरातील पुरुषसुद्धा घरगुती कामामध्ये मदत करायला लागले. झालो की आम्ही स्त्रीवादी!!! काय राहिले अजून?………………… खरेच?

"घरीच बसलेली असते ती. तिला काय उद्योग आहे!!"
"किती जाड आहे ना ती!!"
"दिसायला यथातथाच आहे"
"लग्न होऊन एवढी वर्षे झाली तरी अजून मूल नाही"
"लग्न जमतच नाहीये तिचे एवढे वर्ष"
"शिक्षण कमीच आहे तसे"
"अगदी काकूबाई आहे ती!!"
"कसे कपडे घालते ती!!"

अशी आणि अजून कितीतरी उपहासात्मक वाक्ये अगदी आपल्यासारख्याच शहरी आधुनिक स्त्रियांच्या तोंडी मी सर्रास ऐकली आहेत. पुष्कळ वेळा स्त्रिया बोलत नाहीत पण त्यांच्या वागण्यातून आणि देहबोलीमधून भेदभाव सतत जाणवत राहतो. ह्यातील काही वाक्ये मीसुद्धा बोललेली आहेतच. कितीतरी वेळा मीसुद्धा जजमेंटल झालेच आहे. मग मी खरेच स्त्रीवादी आहे का? मला स्त्रीवादाचा खरा अर्थ कळला आहे का? मी खूप शिकलेली आहे, मी काम करून पैसे कमावते, मी उत्तम स्वयंपाक करते, मी आधुनिक आहे, मी स्वतंत्र आहे, हे म्हणताना इतर स्त्रिया कमी आहेत असे का म्हणावेसे वाटते? स्वत:च्या कर्तुत्वाचा अभिमान बाळगताना इतर स्त्रिया कशा कर्तुत्ववान नाहीत हे सिद्ध का करावेसे वाटते? ह्याचा अर्थ आत्मविश्वासाची कमी असा घ्यावा की अहंकारी वृत्ती असा घ्यावा?

प्रत्येक स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला तिचे आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. काय शिकावे, नोकरी करावी की नाही, लग्न करावे की नाही आणि केले तर कोणाशी करावे, मूल होऊ द्यावे की नाही आणि कधी होऊ द्यावे, काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावे, हे सगळे प्रश्न तिचे वैयक्तिक प्रश्न नाहीत का? मग त्यावर टीकाटिप्पणी करण्याचा कोणालाच काय अधिकार आहे? तिच्याकडे असलेल्या किंवा नसलेल्या गोष्टींवरून तिच्याशी भेदभावाने वागण्याचा काय अधिकार आहे? ज्याप्रमाणे वैयक्तिक निर्णय घायचा प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे त्याप्रमाणे तिचे अनेक प्रश्नसुद्धा आहेत. त्या प्रश्नांशी कदाचित ती एकटीच लढा देत असेल. तिचे प्रश्न माहित नसतानाच जजमेंटल होण्याचा तरी कोणाला काय अधिकार आहे?

स्त्रियांनीच स्त्रियांना जर असे कमी लेखले तर मग खरा स्त्रीवाद कधीच रुजणार नाही. मग पुरुषांकडून तरी स्त्रियांनी का म्हणून अपेक्षा ठेवायची? सर्व स्त्रिया समान आहेत मग त्यांचे गुण-अवगुण तितकेसे महत्वाचे नाहीत ही भावना जेव्हा प्रत्येक स्त्रीच्या मनात रुजेल तेव्हाच स्त्रीवादाचे खरे सौंदर्य कळायला मदत होईल. स्त्रीवादाची व्याख्या केवळ स्त्री-पुरुष भेदभाव न बाळगता मिळालेल्या/दिलेल्या संधीच नव्हे तर स्त्रियांनी(आणि पुरुषांनीसुद्धा) स्त्रीत्वाचा आणि इतर स्त्रियांचा केलेला सन्मानसुद्धा ह्या व्याख्येमध्ये अध्यारुत असायला हवा.

करण्यासारखे खूप काही आहे.ज्या स्त्रियांपर्यंत स्त्रीमुक्ती चळवळ पोहोचालेलीच नाही अशा स्त्रियांना मदत करणे हे तर आहेच. पण ते खूप मोठे काम आहे. आपल्या आजूबाजूच्या इतर स्त्रियांचा (नातेवाईक, शेजारपाजारच्या आणि इतरही ओळखी-अनोळखीच्या) अनादर होणार नाही असे वागणेबोलणे जमले तरीही आपण खूप काही साध्य करू शकतो. पुरुषांशी स्पर्धा करण्यापेक्षा आपापसातली ही स्पर्धा आणि तेढ मिटविणे अधिक गरजेचे आहे. स्त्री हिच स्त्रीची शत्रू असते हे वाक्य खोटे करून दाखवायला हवे.

जागतिक महिला दिन खऱ्या अर्थानी साजरा करायचा असेल तर महिलांनी महिलांनाच कमी लेखून भेदभाव करणे सोडून द्यायला हवे. स्वत:ला आधुनिक स्त्रीवादी म्हणविणाऱ्या माझ्यासारख्या सर्वच स्त्रियांनी आत्मपरीक्षण करायला हवे. आपल्या बोलाण्यातून आणि वागण्यातूनसुद्धा चुकून किंवा मुद्दामून आपण इतर स्त्रियांचा उपहास तर करत नाही ना, आपल्यासारख्या नसणाऱ्या (मग ते कोणत्याही बाबतीत असो) स्त्रियांना जज करून भेदभावाची वागणूक तर देत नाही न हे वारंवार तपासायला हवे. मी ठरविले आहे…मी प्रयत्न करणार आहे.

======

तळटीपः जजमेंटल साठी मराठी शब्द माहित नाहीत म्हणून इंग्रजी शब्दच वापरला आहे. कोणाला माहित असेल तर कृपया सांगवा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>स्त्रियांनीच स्त्रियांना जर असे कमी लेखले तर मग खरा स्त्रीवाद कधीच रुजणार नाही. मग पुरुषांकडून तरी स्त्रियांनी का म्हणून अपेक्षा ठेवायच>>><<<

आख्ख्या लेखात हे वाक्य मला सर्वाधिक भावले, पटले.
माझ्या अनुभव व माहितीनुसार तरी जास्तीतजास्त वेळा स्त्रियाच स्त्रीयांचा घात करताना दिसतात. खास करुन सासू-सून, नणंद-भावजय वगैरे नात्यात तर नक्कीच.

दुसरे असे की, वरील नाति निर्माणच होऊ द्यायची नाहीत वा कुटुंबव्यवस्थाच नाकारायची वा स्त्रीची अपत्यनिष्पत्ती व अपत्य संगोपनादी निसर्गदत्त कर्तव्येच नाकारायची व "पुरुषासारखे पुरुषी" वागायचे असे काही स्त्रीमुक्तिमधे अपेक्षित आहे का?

जर नसेल तर नेमके काय करणे व काय न करणे अपेक्षित आहे?

अन जर पुरुषासारखे पुरुषी वा "नरा" प्रमाणेच वागायचे असेल तर ते शारिरीक/भावनीक/मानसिक पातळीवर कसे शक्य होणार आहे?

जुनाच विषय आहे हा, जो तो आपापल्या वकुबाप्रमाणे मकदुराप्रमाणे अर्थ लावून जगत/वागत असतोच. पण जरा जास्त वैचारिक विश्लेषण अपेक्षित आहे.

मला पटला नाही हा लेख. स्त्रियांनी इतर स्त्रियांचा अनादर करायचा नाही.. इतर व्यक्तिंचा असे का नाही म्हणत ?

जास्त वैचारिक विश्लेषण अपेक्षित आहे. >>> खरे आहे....पण मला स्त्रियांनी केलेल्या सोशल डीस्क्रीमीनेशन बद्दल लिहायचे होते. स्त्रीवाद हा विषय खूप मोठा आहे....

दिनेशदा इतर व्यक्तिंचा आदर करायलाच हवा. पण आधुनिक स्त्रीवादी स्त्रियासुद्धा इतर स्त्रियांचा अनादर करताना दिसतात म्हणून तसे लिहिले आहे. पुरुषांचा अनादर करावा असा संदेश देण्याचा हेतू नव्हता.

>>>पुरुषांना मिळणारे स्वातंत्र्य थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हालाही मिळायला लागले (हॉटेलात जेवणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, रात्रीच्या पार्ट्यांना जाणे, डिस्कोमध्ये नाचणे, इत्यादी<<<

ह्या वाक्यापुरते बोलायचे झाले तर स्त्रीस्वातंत्र्याचा नको तो अर्थ घेतल्यासारखे वाटले. किंवा, मर्यादीत अर्थ घेतल्यासारखे वाटले. मात्र 'स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे इतकेच' असे तुम्हाला म्हणायचे नसेल हे नक्की माहीत आहे.

>>>पुष्कळ वेळा स्त्रिया बोलत नाहीत पण त्यांच्या वागण्यातून आणि देहबोलीमधून भेदभाव सतत जाणवत राहतो.<<<

हे पुरुषांच्याही बाबतीत खरे असावे. लेख स्त्रीवादाबाबत आहे म्हणून असे म्हणावेसे वाटते की स्त्री-पुरुष समानता, स्त्रीवाद ह्या संकल्पनांच्या अर्थाबाबत मोठ्या प्रमाणावर गोंधळाची स्थिती जाणवते. ह्या संकल्पनांना ठोस स्वरूप मिळावे ह्यासाठी आयुष्य झोकून देणार्‍या स्त्रियांपासून ते अगदी जुन्या विचारसरणीच्या अनेक स्त्रियांना भेटल्यावर असे वाटते की 'संपूर्ण स्त्रीवाद' किंवा 'संपूर्ण स्त्री-पुरुष समानता' नेमकी कोणालाच नको आहे किंवा ती हवी आहे की नाही ह्याबाबत वैचारीक गोंधळ आहे.

>>>प्रत्येक स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला तिचे आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. काय शिकावे, नोकरी करावी की नाही, लग्न करावे की नाही आणि केले तर कोणाशी करावे, मूल होऊ द्यावे की नाही आणि कधी होऊ द्यावे, काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावे, हे सगळे प्रश्न तिचे वैयक्तिक प्रश्न नाहीत का?<<<

सहमत आहे. पण ह्यातील अनेक गोष्टी आडनिड्या वयात होत असल्यामुळे मुलामुलींना पुरेशी समज नसते व त्यामुळे पालक हस्तक्षेप करतात. (ह्यात मुलांचेही स्वातंत्र्य हिरावले जाणे आलेच). उदाहरणार्थ, अगदी पंचविशीतील मुलीलाही आपला जीवनसाथी नेमका कसा असावा ह्याबाबत काही नीट विचार मांडता येतीलच असे नाही. ही शूड टेक केअर ऑफ मी, ही शूड बी लव्हिंग, ही शूड बी रिलायेबल, ही शूड बी ट्रस्टवर्दी अशी काही संदिग्ध विधाने एका सौंदर्यस्पर्धेत स्पर्धकांकडून ऐकायला मिळाली, हे एक वेगळेच! तसेच, बारावी झाल्यावर मुलीचा कल जिकडे आहे तिकडे जाण्याइतके गुण तिला आहेत का, एखादे हटकेच करिअर करण्याचे धाडस करण्याची मुलीची व पालकांची मानसिकता आहे ह्यावरही शिक्षण अवलंबून असते. त्यामुळे सगळे चॉईसेस प्रत्येकजण (मुलगा / मुलगी) दरवेळी स्वतंत्रपणे करू शकत नाही.

>>>आपल्या बोलाण्यातून आणि वागण्यातूनसुद्धा चुकून किंवा मुद्दामून आपण इतर स्त्रियांचा उपहास तर करत नाही ना, आपल्यासारख्या नसणाऱ्या (मग ते कोणत्याही बाबतीत असो) स्त्रियांना जज करून भेदभावाची वागणूक तर देत नाही न हे वारंवार तपासायला हवे.<<<

हा विचार स्तुत्य वाटला, पण ह्याचा फक्त स्त्रीवादाशीच संबंध आहे असे वाटत नाही व फक्त ह्याचाच स्त्रीवादाशी संबंध आहे असेही वाटत नाही. सर्व स्त्रियांनी भेदभाव करणे, अपेक्षा / टीका / निंदा / मत्सर / थट्टा करणे सोडले तर अचानक स्त्रीवाद सत्यात उतरेल असे काही नाही, असे वाटते.

एकंदर लेखाचा उद्देश चांगला वाटला पण मुद्दे फार वरवरचे घेतले गेले असे वाटले.

चु भु द्या घ्या

स्त्रीस्वातंत्र्याचा नको तो अर्थ घेतल्यासारखे वाटले. किंवा, मर्यादीत अर्थ घेतल्यासारखे वाटले. >> वाक्य उपहासाने लिहिले आहे. स्त्रीस्वातंत्र्याचा अर्थ जनरली मर्यादीतच घेतला जातो असे माझे निरिक्षण आहे.

'संपूर्ण स्त्रीवाद' किंवा 'संपूर्ण स्त्री-पुरुष समानता' नेमकी कोणालाच नको आहे किंवा ती हवी आहे की नाही ह्याबाबत वैचारीक गोंधळ आहे. >> १००% पटले.

सहमत आहे. पण ह्यातील अनेक गोष्टी आडनिड्या वयात होत असल्यामुळे मुलामुलींना पुरेशी समज नसते व त्यामुळे पालक हस्तक्षेप करतात. >> पालकांनी हस्तक्षेप करू नये असे म्हणणे नाही. पण मी माझ्या ओळखीतल्या किंवा नात्यातल्या कोणत्याही स्त्रीवर जजमेंटल होणे निश्चितच अयोग्य आहे.

एकंदर लेखाचा उद्देश चांगला वाटला पण मुद्दे फार वरवरचे घेतले गेले असे वाटले. >> धन्यवाद. लेखावर अधिक काम करून पुन्हा प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन Happy

'स्त्री' आहे म्हणून ती नेहमी स्त्री-प्रश्नांबाबत संवेदनशील असणार; आणि 'पुरुष' नेहमी तो पुरुष आहे या एकमेव कारणास्तव स्त्री-प्रश्नांविषयी उदासीन अथवा असंवेदनशील असणार - या विचारसरणीतला घोळ एकदा लक्षात आला की मग सरसकटीकरणाच्या पल्याड काही गोष्टी दिसायला सुरुवात होते. 'स्त्री हीच स्त्रीची शत्रू' हे विधानही त्याचे विश्लेषण केल्यावर नवी दृष्टी देऊन जाते.

या विषयावर खरं तर पुष्कळ लिहिलं गेलं आहे. जमेल तेव्हा इथं काही दुवे देईन.

स्त्रीमुक्ती म्हणजे "सगळ्या स्त्रिया समान" असं अपेक्षित आहे का तुम्हाला? तसं काही नसतं. प्रत्येक "व्यक्ती" दुसर्‍या "व्यक्ती" पेक्षा अनेक प्रकाराने वेगळी, काही बाबतीत कमी/अधिक गुणी असते.
प्रत्येकच "व्यक्ती" दुसर्‍या "व्यक्ती"विषयी चुकीची/बरोबर मतं बाळगते. "जज" करतेच. एखाद्या कंपनीचा वरिष्ठ अधिकारी (पुरुष) त्याच कंपनीच्या पुरुष वॉचमनला किंवा शेजारच्या बेकार युवकाला किंवा नोकरी न करणार्‍या पुरुष चित्रकाराला "जज" करत नाही का? अगदी समान वागवतो का? उत्तर "नाही" हेच आहे.
मग एका "स्त्री" ने दुसरीला जज करायला नको "कारण त्या सग्ळ्या स्त्रिया आहेत" असं म्हणणं हेच स्त्रीसाठी अन्यायकारक आहे. प्रत्येक स्त्रीला तिच्या असल्या/नसल्या कर्तुत्वाचा/गुणाचा अभिमान/अहंकार असणं हे माणुस म्हणून काही एक्सेप्शनल नाही. इट्स अ "ह्युमन" इमोशन.

तळटीपः एखाद्याला/दीला लग्न, मुलं, व्यंग, रुप यावरुन हिणवू नये यात दुमत नाहीच.

नताशा म्हणते ते बरोबर आहे की स्त्री असो वा पुरुष नकळत माणूस दुसर्‍या माणसाला जोखत असतो (जोखत = जज करणे). पण पुरुष ही हेच करतात म्हणून स्त्रियांनी जोखणे चालू ठेवावे, ते चार-चौघात व्यक्त करावे हे पटत नाही.

ह्याला मी ड्रिंकींग-ड्रायव्हिंग ची उपमा देईन. प्रत्येक सज्ञान व्यक्तीचा दारू पिण्याचा हक्क मला मान्य आहे पण त्याच बरोबर अंडर-इन्फ्लुअंस असाल तर डेसिग्नेटेड ड्रायव्हर शोधावा हे सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी.

तसच प्रत्येक व्यक्तीचा जोखण्याचा हक्क मला मान्य आहे पण त्यामागच्या आर्थिक-सामाजिक-लैंगिक-शारिरिक -शैक्षणिक निकषांनी प्रभावित होवून एकूण वातावरण होस्टाईल होईल असे वर्तन म्हणजे सामाजिक भान सोडणे.

उदा: एखादी व्यक्ती काकूबाई आहे हे मनात ठरवणे ठीक पण त्या मुलीच्या फेसबुक वर तशा आशयाचे मेसेज सोडणे, ग्रूप जमला असता त्यावरुन स त त टींगल टवाळी करणे, बर्‍या ठिकाणी जिथे ड्रेस कोड असतो तिथे तिला न बोलावणे, किंवा पेट्रनायझिंग बिहेवीयर - हे असे कपडे घालून ये - हे सगळं सोशल-इमोशनल इंटेलिजंस ची दिवाळखोरी दाखवत.

"सगळ्या स्त्रिया समान" ही स्त्रीमुक्तीविरोधकांची आवडती थिअरी आहे.

सीमंतिनी, "पुरुष ही हेच करतात म्हणून" नव्हे, ती ह्युमन टेन्डन्सी आहे म्हणून. सामाजिक भान सोडावे अशा आशयाचं मी कुठे लिहिलेलं नाही. तेव्हा ते मला उद्देशून नसावे असे समजते. तुम्ही दिलेलं उदा. "स्त्रीमुक्ती" यासंदर्भात गैरलागू आहे असं वाटतं, त्यानी विषय फक्त भरकटेल.

उदाहरण मी सुमुक्ताच्या लेखातूनच घेतले आहे तेव्हा विषय भरकटला तर ते बिल सुमुक्ता वरच फाडू Wink Happy

तळटीप टाकलीस ते बर झाल. Happy

तुला उद्देशून सामाजिक भानाबद्द्ल नाही. पण पुरूष करतात म्हणून स्त्रियांना ते क्षम्य आहे, किंवा ती ह्युमन टेन्डंसी आहे म्हणून ते क्षम्य आहे/ योग्य आहे इ इ ह्याबद्द्ल आपले एकमत नाही . दॅटस ओ.के Happy माणूस प्रत्येक भावना, जसे अग्रेशन, ह्युमन टेन्डंसी म्हणून व्यक्त करायला लागला तर समाज म्हणून जगणे अवघड होते.,म्ह्णून 'जोखणे' ही भावना नियंत्रित (रेग्युलेटेड) असणे गरजेचे आहे हे माझे मत आहे.

ह्युमन टेन्डंसी आहे म्हणून ते क्षम्य आहे/ योग्य आहे >> असं म्हणत नाहिये. पण पुरुषांना अशा आशयाचे उपदेश दिले जातात का? त्याला एक मनुष्य स्वभाव म्हणून सोडून दिले जाते. तसंच स्त्रियांनाही "एकेकीचा स्वभाव" म्हणून सोडून देण्या ऐवजी " सगळ्या समानच अहेत" असा उपदेश कशाला? गुणावगुणांची चिकित्सा होणारच.
"एकमेकांना जज करु नये. दुसर्‍याला कमी लेखू नये" ही सगळी तत्वं सगळ्यांनाच (स्त्री-पुरुष) लागू आहेत. मग मला जिथेतिथे "स्त्रियांनी एकमेकींना जज करु नये" अशाच आशयाचे लेख "स्त्रीमुक्ती" संदर्भात का दिसतात? स्त्रीने स्त्रीला कमी लेखु नये म्हणजे काय?
श्रेया घोषालनी माझ्यासारख्या गाण्यात औरंगजेब स्त्रीला माझ्या गाण्याच्या सेन्स वरुन कमी लेखु नये? का?
अरुंधती रॉयनी माझ्यासारख्या न-लेखिकेला माझ्या लिखाणाच्या सामान्यपणावरुन जज करु नये? का?
चंदा कोचरनी तिच्या यशाचा अभिमान बाळगू नये आणि इतर सामान्य स्त्री एम्प्लॉयीपेक्षा स्वतःला सुपिरिअर मानू नये? का?
तसे त्यांनी न केल्यास तो त्यांचा देवपणा समजावा. पण केल्यास काहीही चुकीचे मला वाटत नाही. मनुष्यस्वभाव आहे.

लेट मी सी इफ आय अंडरस्टँड धिस - पुरुषांना समाजाने फ्रि-पास दिला नाही, ते जजमेंटल झाले तर त्यांना ही ऐकवल गेल ( वर्क प्लेस मध्ये अ‍ॅक्सेप्टन्स अँड नॉन जजमेंट ट्रेनिंग घ्यायला लागल इ इ) तर स्त्री बद्द्ल काय भूमिका राहील तुझी??

सीमंतिनी, तू "स्त्रीमुक्ती" चा संदर्भ या उपदेशाला आहे हे विसरतेय. इथं युनिवर्सल व्हॅल्ह्युज ची चर्चा नाहिये ना... सगळे आयडियल गुण माणसात असतात का? देवच झाला ना मग. म्हणूनच ते सगळे आयडियल्स स्त्रियांकडून"च" अपेक्षित असण्याला माझा विरोध आहे.

उद्यापरवापर्यंत कदाचित धाग्याचे शीर्षक 'आधुनिक स्त्रियांचा स्त्रीवाद' ऐवजी 'आधुनिक स्त्रियांचा वाद' असे ठेवावे लागेल.

Light 1

हलके घेणे!

मतां-तत्वांवरुन वाद घालणे हा उत्तम गुण आहे. आधुनिक स्त्रिया आधुनिक टेक्नॉलॉजी वापरुन तो घालू शकतात, हे प्रगतीचं उत्तम लक्षण आहे.

एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीला 'स्त्री म्हणून सन्मान द्यायला, किंबहुना व्यक्ती म्हणून सन्मान द्यायला कमी पडते' हे असं सरळ्सोट विधान करणं धोक्याचं आहे/ योग्य नाही याची जाणीव असूनही खूपदा दुर्दैवानं आपल्या समाजात ही वस्तूस्थिती काही प्रमाणात आहे. एक सासू स्वतः स्त्री असून सुनेला कशी काय मारू शकते, एक आई स्वतः आई असताना नवजात बालिकेच्या म्रूत्यूला का प्रोत्साहन देते / किंवा का विरोध करत नाही ? हे आणि असे असंख्य रिअ‍ॅलीस्टीक प्रश्न आहेत ?
कारण स्त्री-पुरुष दोघांनाही 'सत्ता' / वर्चस्व हवं आसतं.... घरात पुरुषाचं वर्चस्व असेल तर घरातली ज्येष्ठ स्री ही घरातल्या ज्युनिअर स्त्रीवर्/सूनेवर/ मुलीवर आपलं वर्चस्व/ सत्ता प्रस्थापित करते. हेच लॉजीक समाजाला एक्ट्रापोलेट केलं तर समाजात शिकलेल्या स्त्रीया, कदाचित शहरातल्या स्त्रीया जिथे जिथे शक्य आहे तिथे दुसर्‍या स्त्रीवर आणि पुरुषांवरही वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतात, मग ते सामाजिक, आर्थिक, वैचारिक, सोशल, शैक्षणीक कोणत्याही मार्गाने असू शकतं.
आणि इथेच नकळत पुरुष - स्त्री संघर्षाबरोबरच स्त्री-स्त्री संघर्ष चालू होतो.
खूपदा स्त्रीवाद म्हणजे पुरुषांची बरोबरी करणे, किंवा त्यांना कमी लेखणे किंवा पुरुषद्वेष्टेपण इथपर्यंत पोचलेला दिसून येतो... पण 'माझ्यावर अन्याय झालाय, त्यातून मी सक्षम म्हणून बाहेर पडल्यावर मी लगेच माझ्यावरच्या अन्यायाचा बदला दुसर्‍यावर अन्याय करुन घ्यायचा का?' (लाइक एनी अदर क्लीसीक प्रस्थापित - विस्थापीत लढा) हा प्रशन सध्याच्या स्त्रीयांपुढे आहे, आणि यावर विचार करायची वेळ आलीये.
एकूणच ग्लोबल लेव्हलला स्रीयांच्या हातात शिक्षणाने, जागृतीने, चळवळीने जी काय पॉवर येउ घातली आहे ती द्वेषाच्या मार्गानं न जाता, व्यक्तीस्वातंत्र्याच्या मार्गाने कशी चॅनलाईझ करता येईल हा सध्याच्या स्वतंत्र किंवा स्वातंत्र्याच्या मार्गावर चालू इच्छिणार्‍या प्रत्येक स्रीसाठीचा प्रश्न आहे..... टीपींग पॉइंट ग्लोबल स्केलवर हळूहळू जवळ येत चाललाय, त्या जबाबदार्‍या समर्थपणे पेलण्यासाठी एका स्त्रीला दुसर्‍या स्रीनी समजून घेण्याच्या नितांत गरज आहे...

स्त्री 'च' कडून आयडीयल्सची अपेक्षा नाही. दोघांकडून (ट्रान्सजेंडर इ मंडळींकडून पण आहे) आहे.

पण स्त्रीकडूनची अपेक्षा बोलून दाखवली जाते कारण आजही समाजात स्त्रीला मोजक्या संधी उपलब्ध आहेत. एकमेकींची पाठराखण केली, पॉझिटीव्ह वातावरण ठेवल तर स्त्रीला जास्त संधी मिळतील. चंदा कोचरने तिच्या यशाचा अभिमान जरूर ठेवावा पण एखादी स्त्री काकूबाई असेल तर ते तिने (चंदाने) न उगाळलेल बर.

What Sally speaks about Suzy speaks more about Sally than about Suzy Happy

धाग्याचे नाव काहीही ठेवा हो, हल्ली ती फॅशनच दिसते - नाव एक अस्ते, चर्चा एक... Happy Wink

पुरुषांना मिळणारे स्वातंत्र्य थोड्याफार
प्रमाणामध्ये आम्हालाही मिळायला लागले
(हॉटेलात जेवणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे,
रात्रीच्या पार्ट्यांना जाणे, डिस्कोमध्ये
नाचणे, इत्यादी>>

पुण्यात पिंपळे सौदागर भागात जानेवारीच्या सुरवातीला काही उत्तर भारतीय मुली संध्याकाळी मद्यपान करुन हिंदी -इंग्रजीमध्ये मोठमोठ्याने शिव्या देत होत्या. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली हे बिलकुल अपेक्षित नाही.

<<
पुरुषांशी स्पर्धा करण्यापेक्षा आपापसातली ही स्पर्धा आणि तेढ
मिटविणे अधिक गरजेचे आहे. स्त्री हिच
स्त्रीची शत्रू असते हे वाक्य खोटे करून
दाखवायला हवे.
>>
मनापासुन पटले. एका 1bhk मध्ये 6-7 मुलेपण आरामात कित्येक वर्षे रुम पार्टनर बनून राहू शकतात, पण मोठ्या एैसपैस 3bhk मध्ये एक वर्षपण धुसफूस केल्याशिवाय नाही काढू शकत.

सीमंतिनी, स्त्री"च" कडून आयडियल्स ची अपेक्षा नाही ना? धन्यवाद. माझं ओझं उतरलं बघ. Light 1 कारण माझ्यासारख्या इतरही अनेक स्त्रिया काही आयडियल नसतात.
पण मग प्रश्न उरतोच की हे सगळे उपदेशपर लेख स्त्रियांसाठी"च" का लिहिले जातात?

"स्त्री हीच स्त्रीची शत्रु" हे तर अतिशय भंकस वाक्य आहे. मग पुरुष काय पुरुषांचे शत्रु नसतात? भाऊ-भाऊ, वडिल-मुलगा एकमेकांचे खून करत नाहीत? पुरुष बॉस त्याच्या पुरुष सबऑर्डिनेटशी अतिशय प्रेमाने वागतो?
उलट मी म्हणेन पुरुष हेच खरे पुरुषांचे शत्रु. छोटा राजन विरुद्ध दाउद, मोदी वि केजरीवाल वि राहुल गांधी, ओवैसी वि तोगडिया, धोनी वि मिसबा-उल-हक Light 1

>>> हे आणि असे असंख्य रिअ‍ॅलीस्टीक प्रश्न आहेत ?<<< रार, तुमचा मुद्दा मस्त वाटला. शेवटचा पॅरा मात्र थोडासा (मला) एखाद्या भाषणासारखा वाटला. तरीही तोही आवडलाच.

>>>एकमेकींची पाठराखण केली, पॉझिटीव्ह वातावरण ठेवल तर स्त्रीला जास्त संधी मिळतील. <<<

मला वाटते सीमंतिनींनी सुमुक्तांचे म्हणणे अतिशय समर्पक व किमान शब्दात लिहिले आहे. Happy

(टीप - ह्याचा अर्थ तेवढे झाले की स्त्रीवाद निर्माण झाला असा नाही, हे अर्थातच मान्यच आहे व अगदी पहिल्या प्रतिसादातही तेच म्हणालो आहे).

रार, संघर्ष, वर्चस्व प्रस्थापित करणं हे जगभर, प्रत्येक काळात, प्रत्येक समाजात, देशात दिसतं. (ते चूक-बरोबर बाजुला ठेवू.) मग ते फक्त आधुनिक स्त्रियांनीच करु नये असं म्हणणं आहे का? का?
संघर्ष करुन आलेल्या समाजिक घटकाने (स्त्री असो, दलित असो, डिसेबल्ड असो) त्याचा अभिमान बाळगू नये असं का वाटतं लोकांना? इथं आपण २१ किमी धावलो, ५ किलो वजन कमी केलं तर सग्ळ्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर सांगत फिरतो.
स्त्रीला एक व्यक्ती म्हणून तिच्या राग-लोभ-अहंकार-स्वार्थ वगैरे मानवी अवगुणांसहीत "असु द्या" ना. सतत आदर्श, रोल मॉडेल असण्याची अपेक्षा कशाला?

मला नताशाचे पटले.
रार आणि सीमंतिनीचेही बरोबर आहे. आपले वर्चस्व प्रस्थापित करणे मनुष्यस्वभाव आहे.

मूळ लेख पूर्ण पटला नाही किंवा समजला नाही. सुमुक्ताने तिच्या मनातली स्त्रीवादाची व्याख्या लिहावी अशी विनंती.

स्त्रीला निसर्गाने शारीरीक क्षमता कमी दिली आहे हे स्त्रियांनी मान्य केले आणि स्त्रीला निसर्गाने बौद्धिक क्षमता पुरुषांएवढीच दिली आहे हे पुरुषांनी मान्य केले की निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.

उरलेले निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला शील आणि कौमार्य यात शिरावे लागेल. याच्याशी निगडीत काही बांबतीत व्हाई शूड बॉईज हॅव ऑल द फन असे स्त्रियांनी म्हणण्यात अर्थ नाही.

स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये निसर्गाने जो बेसिक फरक बनवला आहे तो नेहमी कायम राहिला पाहिजे, तो संपवायचा प्रयत्न केला की मजा गेली स्त्री-पुरुष या नात्यातील Happy

.

नताशा, प्रगती जरूर करावी, पण ती झाल्यानंतर दुसर्‍याला कमी लेखू नये.
आणि इतिहासाने वारंवार वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर' उट्टे काढणे ' पासून 'द्वेष करणे' असा वर्चस्वाचा वापर होत असताना /झालेला दाखवून दिले आहे, तर आपल्याला संधी मिळत असताना की विचारपूर्वक वापरणं आपल्या हातात आहे.
उलट ' ते चूक की बरोबर' हे बाजूला न ठेवता, विचारात घेणं आवश्यक आहे.
अभिमान जरुर बाळगावा, पण त्या अभिमानाचा उपयोग सुदर्‍याला अभिमान बाळगण्याची संधी देण्यासाठी करता येईल...
आपल्या धावण्याने 'मी लोकांच्या पुढे कसे गेलो' न दाखवता 'त्यातून अजून ४ लोक धावायला लागले' ही इच्छा करता येई शकतेच ना !

बेफीकीर, भाषण वाट्णं शक्य आहे. अश्या विषयात पब्लीक फोरमवर लिहिताना विचार करून तोलूनमापून शब्द वापरायची सवय झाल्याने असेल.
बेकरीवर मी अशी नसते Happy

Pages