मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या दोन एपिसोडमध्ये शकुनीने आपली चलाखी आणि वाक्पटुत्व यांच्या जोरावर काय बहार आणली आहे.द्यूताचे नियम बनवण्यासाठी भीष्मालाच पुढे करून अडकवले आहे.युधिष्ठिराला तर तो सहजच गुंडाळतोय.द्यूत हा गर्वासाठी (अभिमान) खेळला जातो असे म्हणून त्याने भीष्म, पांडवासहित समस्त राजसभेलाच जणू शब्दात अडकवले आहे.संपत्तीच्या तुलनेत युधिष्ठीर सर्वश्रेष्ठ असेल मात्र एकदा का द्यूत/जुगाराची लढाई गर्व/ अभिमान, ईर्ष्या या जोरावर खेळायला सुरुवात झाली तर युधिष्ठीर कुठल्याही पातळीपर्यंत वाहवत जाइल हे त्याने ताडले होते. द्युतक्रीडेमध्ये सेवेसाठी फक्त दासींना प्रवेश असेल, राजस्त्रियाना नाही हां नियम संमत करून त्याने कळस साधला आहे.पुढे द्यूतात द्रौपदीला जिंकल्यावर तिला दुर्योधनाची दासी या नात्यानेच सभेत बोलावले जाइल यासाठीची ही पूर्वतयारी. खरोखर शकुनीचा पाताळयंत्रीपणा आणि बुद्धिमत्ता थक्क करावयास लावणारी आहे. केवळ श्रीकृष्ण होता म्हणून पांडव वाचले नाहीतर शकुनी पाचही पांडवांना केवळ कपटनीतीच्या बळावर कायमचे निष्प्रभ करू शकला असता.

धन्यवाद, अन्जू.
शकुनी कितीही खल प्रवृत्तीचा आहे हे जरी मानले तरी त्याच्या बुद्धिमत्तेची दाद दिल्याशिवाय राहवत नाही. नकुलाला तो जेव्हा सांगतो कि द्युतातले फासे/ सोंगट्या म्हणजे भाग्य/नशीब असते आणि भाग्य जर माझ्या तालावर नाचले असते तर गांधार राज्यावर भूतकाळात जे अन्याय झाले ते मी होवू दिले नसते. हे सांगताना भीष्माला तो इशारा देतो.हा सगळा खरेतर स्लेजिंगचाच एक प्रकार वाटतो.प्रतिस्पर्ध्याच मनोधैर्य खच्ची करायचं जेणेकरून ऐनवेळी प्रतिस्पर्धी विरोध करायला त्याला तोंडच उरू नये ही त्याची भूमिका असावी. पांडव आणि द्रौपदीला दास बनवून सभेत आणल्यावर भीष्म कितीही क्रुद्ध झाला तरी कुठे तरी मनाच्या कोपर्यात आपण पण गांधार आणि काशिराजाच्या कन्या दडपशाहीने आपल्या कुळात आणल्या तेव्हा त्यांना काय वाटले असेल या विचाराने तो महारथी पण विचलित झाला असेल. आपण एकेकाळी तुलनेने निर्बल राजांना असे झुकवले, आज हा शकुनी बुद्धी आणि वाक्पटुत्व यांच्या जोरावर आपले पौत्र आणि कुलवधुची अशी जाहीर निर्भत्सना करतोय आणि आपण हतबल होवून काहीच करू शकत नाही हा काळाने उगवलेला सूडच असावा असे कदाचित भीष्मादी महारथीना वाटले असेल.
बाकी अगदी गुफी पेंटल प्रमाणेच या महाभारतामध्ये पण शकुनीची भूमिका नवीन कलाकाराने ( प्रणीत भट्ट) सुरेख वठवली आहे.

नवीन भिष्म, दुर्योधन, कर्ण, युधिष्ठीर, अर्जुन, कृष्ण यांच्या भूमिका आवडल्या मला पण शकुनी थोडा किळसवाणा वाटतो मला. नायिका एवढ्या खास नाही वाटत, कुंती आणि रुक्मिणी आवडली.

पण एकंदरीत व्हिलन चांगला वठवला आहे नवीन शकुनीने.

कपटनीतीच्या बळावर
पण पुष्कळदा त्याने भीष्माशी वाद घालून स्वतःचे म्हणणे खरे सिद्ध केले आहे. आता तो हुषार नि बाकीचे धर्म, वचन इ. बद्दल स्वतःच्याच कल्पनांमधे मग्न यात शकुनीची कपटनिती नाही, बुद्धिमत्ता आहे, राजकारण आहे.

मागच्या दोन एपिसोडमध्ये ........... राजसभेलाच जणू शब्दात अडकवले आहे.
+१
शकुनी कितीही खल प्रवृत्तीचा आहे हे जरी मानले तरी त्याच्या बुद्धिमत्तेची दाद दिल्याशिवाय राहवत नाही

+१

खरोखर शकुनीचा पाताळयंत्रीपणा आणि बुद्धिमत्ता थक्क करावयास लावणारी आहे. केवळ श्रीकृष्ण होता म्हणून पांडव वाचले नाहीतर शकुनी पाचही पांडवांना केवळ कपटनीतीच्या बळावर कायमचे निष्प्रभ करू शकला असता.

साकल्य यांचे म्हणणे १०० % बरोबर!!

हा गुढी पाडवा तुमचे - भाग्य वृद्धी, संकल्प सिद्धी, मन शुद्धी, धन वृद्धी, कर्म शुद्धी, कर्म वृद्धी, कर्म सिद्धी - करणारा ठरो हीच सदिच्छा !!

शकुनी कितीही खल प्रवृत्तीचा आहे हे जरी मानले तरी त्याच्या बुद्धिमत्तेची दाद दिल्याशिवाय राहवत नाही

+१

खूप मस्त काम केलंय शकुनी ने .

भीष्म, विदुर, युधिष्ठिर या अतिरथी महारथी धर्म तज्ञ लोकांना एकट्या शकुनीने निरुत्तर केले.
आता कुणाला धर्म समजतो नि कुणाला नाही?
एव्हढे सगळे वादविवाद करून जे चालू आहे त्याला अधर्म कसे म्हणता येईल?

जर शकुनि, दुर्योधन हे अधर्मी असतील, तर त्यांच्याशी द्यूत खेळायचेच कशाला? काय जे ध्रुतराष्ट्राबद्दल प्रेम असेल ते दाखवून परत जायचे! सम्राट ना तुम्ही, मग एव्हढी हिंमत नाही की सांगायचे मला यात अधर्म दिसतो, मी खेळणार नाही!!
उगाच शकुनीशी काय वाद घालता? कळत नाही तो असल्या वादात भीष्म, विदुर सर्वांना गुंडाळून ठेवू शकतो!

अगदी ! मलाही तेचं कळत नाही. सरळ म्हणायचं , काय करायचं ते करा, हे चुक आहे , मि खेळणार नाहि. कोण काय करु शकलं असतं पांडवांचं?

पांडव तसेच मधून निघून गेले असते तर दुर्योधनाने त्यांना बदनाम केले असते.
नाहीतरी आपले राज्य आणि संपत्ती युधिष्ठीर गमावूनच बसला आहे.

पांडव तसेच मधून निघून गेले असते तर समजा येनेकेन प्रकारेण दुर्योधनाने युद्धा चे आमंत्रण दिले असते तर शंभर कौरव , भीष्म , द्रोणाचार्य वगैरे मंडळी पुढे पाच जणांचा निभाव लागला नसता.
ते हरले असते.

सध्या कृष्ण सुद्धा द्वारकेत युद्धात बिझी आहे.

शब्दात अडकून शेवटी युधिष्ठीर फ़सलाच.

पुढे मी एका पुस्तकात वाचले आहे की पांडवांची आणि द्रौपदीची दास्यत्वातून सुटका दृतराष्ट्र च करतो. त्याना परत पाठवतो पण पुन्हा एकदा द्यूत खेळण्याचे आमंत्रण येते आणि इतके झाल्यावरही युधिष्ठीर ते स्वीकारतो ते कसे काय?
दुसऱ्या वेळेस वनवास आणि अज्ञातवासा चा डाव ठरतो.….

एका पुस्तकात भीम संतापून युधिष्ठीराला म्हणतो की मला कोणी अग्नी आणून द्या , मी या जुगारी माणसाचे (युधिष्ठीराचे) हातच जाळून टाकतो.

जे महाभारत दाखवतात त्यावरून धर्म, अधर्म, बरोबर, चूक हे काही ठरवू नये.
स्वतः विचार करून ठरवावे आपण कसे वागावे. आजकाल कायदे केले आहेत ते पाळावे .>>+11111

शकुनि, दुर्योधन हे अधर्मी असतील, तर त्यांच्याशी द्यूत खेळायचेच कशाला? काय जे ध्रुतराष्ट्राबद्दल प्रेम असेल ते दाखवून परत जायचे! सम्राट ना तुम्ही, मग एव्हढी हिंमत नाही की सांगायचे मला यात अधर्म दिसतो, मी खेळणार नाही!!
++११११

खरोखर शकुनीचा पाताळयंत्रीपणा आणि बुद्धिमत्ता थक्क करावयास लावणारी आहे. केवळ श्रीकृष्ण होता म्हणून पांडव वाचले नाहीतर शकुनी पाचही पांडवांना केवळ कपटनीतीच्या बळावर कायमचे निष्प्रभ करू शकला असता.

++११११११

हल्लीच्या एपिसोडसमधील मला आवडलेले भाग म्हणजे दुर्योधनाचा अपमान झाल्यावर तो स्वतःच्या महालात येउन आग लाउन घेतो.त्याच्या मनात खदखदणारे अपमानाचे शल्य त्या आगीच्या रुपातुन मस्त दाखवले आहे.
पहिल्यांदाच दुर्योधनाचा चेहरा एवढा निराश व दु:खी बघितला नाहीतर त्याचा ताठा काय वर्णावा,
दुर्योधनाचे काम करणारया नटाने खुपच छान काम केले आहे.

द्रोपदीच्या समोर तिच्या दोन्ही सासवा अगदी मुळमुळीत वाटतात. कुंती बोलते इथे कृष्ण असला असता तर बरे झाले असते. गांधारीला तर आपले कोणी ऐकेल याचीच शाश्वती नाही. त्यामानाने द्रोपदीत आत्मविश्वास जबरदस्त आहे.आपल्या नवरयाला चुक करण्यापासुन परावृत्त करणे.त्याला समजावुन सांगणे.
त्यामध्ये उगाच लुडबुड करणारया धृतराष्ट्र, दुर्योधन, शकुनी यांना स्वतःचे स्थान काय आहे ते दाखवुन देणे. मस्तच. द्रोपदी खरोखर मानी व बुद्धीमान स्त्री म्हणुन शोभते.

शकुनी साकारलेल्या नटाने तर जबरदस्त काम केले आहे.शकुनीची बुद्धीची धार पदोपदी जाणवते. शांत डोक्याने, गोड बोलत, हसरा चेहरा ठेवत तो प्रतिपक्षाला हाहा म्हणता नामोहरण करतो.

दोन दिवस नाही बघितलं, तसं पण मी यु ट्यूबवर बघते. युधिष्ठिर स्वतः हरतोना मग तो द्रौपदीला लावतोना, खरं म्हणजे तो हरल्यानंतर गेम संपायला पाहिजे होता.

सध्या कुठ्पर्यंत आलंय द्यूताचे.

@अन्जू, काल युधिष्ठीर द्युतामध्ये नकुल आणि सहदेव हरला आहे. या महाभारतामध्ये दुर्योधन आणि युधिश्ठीर माणसांच्या बदली बदली एक माणूस असे पणाला लावताना दाखवले आहे.म्हणजे हे दोघे विकर्णाच्या बदल्यात नकुल, अश्वत्थाम्याच्या बदल्यात सहदेव पणाला लावतात. पुढे कर्णाच्या बदल्यात अर्जुन असा डाव असणार आहे. बी आर चोप्राच्या महाभारतामध्ये असे दाखवले नव्हते. तिथे युधिष्टिर आपली सर्व संपत्ती हरतो मग एक एक भाऊ, नंतर स्वतः आणि नंतर द्रौपदीला पणाला लावतो असे दाखवले आहे.
बाकी काल एके ठिकाणी द्रौपदी 'परिहार' असे म्हणून 'साम्राज्ञीला' एकांत हवा आहे तुम्ही दोघी (कुंती आणि गांधारी) बाहेर जा असे सांगते तेव्हा थोडे हसू आले. द्रौपदी साम्राज्ञी असली तरी आपल्या खाजगी कशात तेही कौरवांकडे अतिथी म्हणून आली असताना स्वताच्या सासूला ती अशी आज्ञेच्या भाषेत बोलते आणि कुंती व गांधारी पण निघून जातात हे पटले नाही.सम्राटाला अनिर्बंध अधिकार होते तो ते भान ठेवून वापरायचा मात्र त्या काळात साम्राज्ञीला इतके अधिकार असतील आणि ती ते स्वताच्या सासूवर वापरत असेल असे वाटत नाही.युधिष्ठिराने तिचे न ऐकता जुगाराचा खेळ चालू ठेवल्याने ती अपमानित / संतप्त झाली म्हणून तसे वागली असे दाखवायचे असेल मात्र तिचा तेवढा भाग जर आजच्या सांस-बहु सिरीयल टाईपचा वाटला.

बापरे द्रौपदी एवढी अधिकारांच्या बाबतीत जागरूक दाखवली की सासूबाईच्या विरुद्धपण वापरायची. मग राज्यसभेत जाऊन का सुनावत नाही की माझ्या एकाही नवऱ्याला पणाला लावायचे नाही.

तिचा तेवढा भाग जर आजच्या सांस-बहु सिरीयल टाईपचा वाटला.
<<<<<<<<
Lol

अन्जू द्रोपदी द्युतसभेत येउन स्वतःच्या नवरयाला ऐकवते कि तुला अर्जुन व भीमासारखे भाउ असताना तु कोणाला घाबरतोस. फक्त संपत्ती पणाला लावणार म्हणुन सांगितले होतेस तर तु माझ्या नवरयाला नकुलास का पणाला लावुन हरलास.

पण शेवटी युधिष्ठीर "ऐकावे बायकोचे पण करावे मनाचे" या न्यायाने तिलाच जा बाई ! तु इथुन निघुन जा, मला माझ्या धर्माचे (???) वहन करु दे सांगतो. मग हि रागारागात येते. नवरयाने भर सभेत तिचे न ऐकता तिलाच परत जायला सांगितले म्हणुन वैतागुन स्वतःच्या सासवांनाच सांगते कि तुम्ही आता इथुन जा, मला एकांत हवा. तिच्या गरीब सासवा तिचे ऐकुन लगेच तिथुन निघुन जातात.

आता युधिष्ठीर तिला द्युतात हरेल व ती दासी बनेल त्यावेळी दु:शासन तिला घेउन जायला येइल त्यावेळी ती एकटीच असते ना... तिच्या सासवा तिच्याबरोबर असल्या असत्या तर तिला असे केस धरुन ओढत घेउन जायला कदाचित दिले नसते.

दुर्योधन आणि शकुनीचे काम करणारे दोघे ही खूप छान काम करताहेत. कथा भाग तपशील वेगळे वाटतात जे माहित आहे त्या पेक्षा पण बर्याच दिवसांनी पुढचा भाग बघायचा अशी वाट बघायला लावणारी सिरियल आहे ही.

सगळ्या सासवा किती तरुण आणि ग्लामरस आहेत - याबद्दल त्यांना नक्कीच वरदान मिळाले होते -- P & G चे लोक पेटंट मागतील म्हणून शेअर करत नाहीत - हे नक्की Happy

मला तर भलतीच शंका आहे...द्रौपदीची सध्या व्यवस्थित वेणी किंवा काय ती केशभूषा आहे, दागिने आहेत. ते वस्त्रहरण सीनमधले मोकळे, दागिने रहित केस कसे म्यानेज करणार आता ? Happy

इतकी वर्षे मनात जो प्रश्न होता की भर राजसभेत द्रौपदी नि पांडव यांच्यावरील अन्याय भीष्म, विदुर, द्रोण यांनी कसा सहन केला, त्याचे उत्तर या मालिका काराने दिले. शकुनि - अतिशय बुद्धिमान. धर्म, धर्म म्हणून बोंबाबोंब करत मनमानी करण्यार्‍या लोकांचे त्याने एकदम तोंड बंद केले! केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर. भीष्मासारखे सैन्याची धमकी दाखवून नाही, किंवा परशुराम शंकर इ. ची मदत घेऊन नाही.

सत्यवती, शकुनि या महाभारतातल्या फार महत्वाच्या व्यक्ति आहेत. सत्यवतीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर व शकुनिने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एका महान राजसत्तेची दुर्दशा केली!

हो निमिष, आधीच्या महाभारतात ती रजस्वला होती आणि म्हणून तिचे केस पण मोकळे सोडले होते असं दाखवलं होतं.

झक्की एका वाक्यात सत्यवती आणि शकुनीचं परफेक्ट वर्णन आणि पूर्ण महाभारताचे सार.

कालच्या एपिसोडमध्ये तुटलेले फासे जोडले जातात, शकुनीच्या प्रार्थनेमुळे वगैरे अजिबात पटलं नाही जरी ते त्याच्या पिताश्रीच्या अस्थींचे होते तरीही, काहीही दाखवलंय.

मला एक प्रश्न पडलाय. कृष्णोबा देव होते,चमत्कार करू शकत होते आणि द्रौपदीची लाज त्यांनी राखली पण त्याऐवजी आधीच त्यांनी द्रौपदीला पणाला लावल्यावर शकुनीचे फासे युधिष्ठिराच्या बाजूने पडतील असं का केलं नाही, श्रीकृष्ण सहज करू शकला असता. मग द्रौपदीची विटंबनाच झाली नसतीना.

अन्जू , ते फासे जोडले जाणे वगैरे काहीही आहे. पण तुमची शंका बरोबर आहे.

कृष्णाने फासे पालटले नाही कारण युधिष्ठिराने तशी प्रार्थना केली नाही. जोपर्यंत द्रौपदी राज्यसभेतील इतर सर्वांना मदतीसाठी बोलावत होती तोपर्यंत कृष्ण आला नहि. द्रौपदीने देखील जोपर्यंत कृष्णाला लाज राखण्याचे आवाहन केले नाही तोपर्यंत त्याने हस्तक्षेप नाही केला.
दाद, यांनी यावर एक कथा देखील इथे लिहिली आहे त्यावर.

द्यूत प्रसंग घडला यात शकुनीची बुद्धिमत्ता आहे मात्र वस्त्रहरण हा निर्लज्जतेचा कळस आहे. कुठल्याच स्त्रीची मग ती दासी असो व नसो अशी निर्भत्सना होणे दुर्दैवी आहे.एरवी धृतराष्ट्राला शहाणपण शिकवणारे प्रसंगी दबाव टाकणारे भीष्म, विदुर यावेळेस गप्प का राहिले याचे कुठलेच समर्थन पटत नाही.धृतराष्ट्र तर खरोखर बुद्धीने पण अंध होता. शकुनी/दुर्योधन युधिष्टिराला द्यूताच्या जाळ्यात अडकवून दास बनवतात हे एकवेळ ठीक मात्र द्रौपदीला दासी करून तिचा अपमान करून दुर्योधनाला काय साधायचे होते? वस्त्रहरण हि तर अत्यंत निर्लज्ज आणि घृणा आणणारी कल्पना आहे.दासी झाली असे एकवेळ मानले तरी कुठल्याच स्त्रीचा असा अपमान करणे घोर अधर्मच आहे, द्रौपदी तर कुरुकुलाची कुलवधू होती. विनाश काले विपरीत बुद्धि म्हणजे काय ते दुर्योधनाकडे पाहून लक्षात येते. दुर्योधांच्या जागी एखादा खरोखर चतुर/कुटील माणूस असता तर त्याने पांडव दास झाल्यावर त्यांना व द्रौपदीला चांगले सुनावून नंतर जन्मभर माझे मांडलिक राजे राहाल, माझ्यावर आक्रमण करणार नाही उलट संकटकाळात माझ्या मदतीला धावून याल अशी आत घालून त्यांना बंधमुक्त केले असते. जन्मभर सम्राट बनून ऐश्वर्य भोगत जगला असता. द्रौपदीचा असा घृणास्पद अपमान केला तर पांडव ,द्रुपद, कृष्ण यादव वगैरे बदल घेतील अशी शंका सुद्धा दुर्योधानला वाटली नाही का? खरे तर द्यूत प्रसंगानंतर पांडवानी लगेच वेळ मिळताच दुर्योधानदी कौरवांचा वाढ अक्रुन बदल घ्यायला हवा होता.युधिष्टिर धर्म धर्म करत बसला आणि पांडव पण गप्प राहिले. खरे तर धर्म अधर्माचा विचार न करता पांडवानी सभेतच किंवा सभेतून बाहेर पडून लगेच कौरवांना युद्धासाठी ललकारायला हवे होते. द्यूत खेळून सर्वस्व हरून परत ते एक डाव द्यूताचा खेळले आणि वनवास/ अज्ञातवासला निघून गेले. १३ वर्षानंतर शिष्टाई करून पाहिल्यानंतर युद्ध पुकारले आणि त्यातही धर्म-अधर्म सोयीनुसार वापरून त्यांनी कौरवांना संपवले मग हेच त्यांनी द्यूत/ वस्त्रहरणाचा प्रयत्न यानंतर का केले नाही? वस्त्रहरण प्रकरण खरोखर महाभारतातील एक कलंक आहे.

Pages