दाभोळकरांची हत्या आणि आपण

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 20 August, 2013 - 16:26

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले. आपला सगळा समाज या स्प्लिट सोशल पर्सेनॅलिटीने ग्रासलाय. म्हणजे आपण बाहेर वेगळे असतो आणि घरात वेगळे. बाहेर आपण उच्चविद्याविभुषित पत्रकार, लेखक, डॉक्टर वगैरे असतो आणि घरात आपण केवळ एक डेली दोनदा पुजा करणारी, नवस उपास पाळणारी, पत्रिकावगरे बघणारी, सत्यनारायण, होम वगरे करणारी 'सर्वसामान्य श्रद्धाळू'माणसं असतो. आपल्या या दोन्ही भुमिका आपण इतक्या सहजतेने पार पाडतो की आपल्या स्वतःच्या या दोन परस्परविरोधी भुमिकांबाबत आपल्या मनात यतकिंचितही प्रश्न उभे रहात नाहीत. बाहेर वावरताना विचार करावा लागतो आणि काम करावे लागते, केवळ पुजा केल्याने आणि चार रंगबेरंगी अंगठ्या घातल्याने पैसे मिळत नाहीत इतकी अक्कल आपल्याला आहे. बाहेर मी फिजिक्सचा प्राध्यापक असतो पण घरात मला लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी चालत नाही. बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. बाहेर मी डॉक्टर असतो पण नुसत्या विभुतीने रोग्याला खाडकन बरे करणार्‍या तत्सम बाबाच्या चरणी माझा माथा सदैव टेकलेला असतो. मी घरात शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही. कारण तसे प्रश्न उपस्थित करणार्‍या लोकांना इथे जागा नाही, त्यांना मुर्खांच्या आणि माथेफिरुंच्या झुंडीला सामोरे जावे लागते.
मानवी मन हे जिथे जाईल, जे म्हणेल आणि जे करेल त्या सगळ्यामागे त्याचा कम्फर्ट असतोच. ही दुहेरी भुमिका अतिशय कम्फर्टेबल आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करण्यापेक्षा ती टाळणे सोप्पे होऊन जाते. नाहीतरी ही देवळं, धर्म आणि त्या अनुषंगाने घडत जाणारी संस्कृती ही एकतर काही अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग आहेत नाहीतर अतिमुर्ख जनतेच्या भीतीचे डंपिंग ग्राऊंड्स. हा 'धर्म' एक कल्पनेतला मोठ्ठा दरवाजा आहे, तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन कन्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या. मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन बाहेर पडाल. मुळात हा असा दरवाजाच अस्तित्वात नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. अनेकांना ती असतेही परंतु माणसाच्या क्रुरपणाला,दडपशाहीला आणि भीतीला शरण गेलेली 'माणसाळलेली माणसं' निमुटपणे या दरवाज्यासमोर रांगा लावतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह.जा.क.,

>> तुम्ही काहीही करा कसेही वागा, केवळ शेवटी या दरवाज्याजवळ येऊन कन्फेशन्स द्या, शुद्धी करुन घ्या.
>> मग इकडचे द्वारपाल ठरलेली रक्कम घेऊन तुम्हाला पलिकडे सोडतील आणि तुम्ही पुन्हा पवित्र होऊन
>> बाहेर पडाल.

हे हिंदू धर्माचं नक्कीच वर्णन नाही. हिंदू धर्म कर्मसिद्धांताच्या पायावर आधारलेला आहे. त्यानुसार कुठल्याश्या दरवाज्यावर कबुली देऊन पापातून मुक्त होता येत नाही. हां मात्र काही विशिष्ट पंथ तुम्ही म्हणता तसा दावा करतात.

आ.न.,
-गा.पै.

हजाक

फक्त हिंदू धर्मातच असे प्रोब्लेम आहेत काय ...बकीच्या धर्मात असतील तर त्याच्यावरही आपली मते येवूद्यात मला धर्म ह्या संकल्पनेचा अभ्यास करायला आवडते मानव्य हाच जगातला एकमेव धर्म असायला हवा असे मला वाटते बाकी मला तसे पुस्तकी "धर्म" ह्या संकल्पनेबद्दल बाबतीत काही कळत नाही मला माहीतही नाही म्हणून विचारले बरका गैरसमज नसावा

धन्यवाद !!!

जाता जाता : विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला.<<<<
तद्दन पुस्तकी विधान आपण चार लोकांकडून कुठूनतरी ऐकून अंधपणे जसेच्या तसे मान्य केलेले
मुळात हे वैज्ञानिक मार्गाने जावून व धर्म वगैरे बाबीना मागे टाकून नक्की जायचे कुठे असते ??? तुम्हाला माहीत आहे काय

@गामा_पैलवान
मी धर्मावर बोलत नसून, आजच्या वास्तवातल्या तथाकथित धर्मावर बोलत आहे. चूक करुन ती सुधारण्यापेक्षा मग देवळातल्याल्या दानपेटीत पैसे टाकून त्यातून मुक्त झाल्याची भावना जोपासणं, गंगेत डुबक्या मारुन पापशुद्धीकरण करणं, नारायण बळी, नाग बळी, लोकांची लूटमार करुन त्या पैशातुन लालबागचा राजा नाहीतर शिर्डीच्या साईबाबांना भरघोस देणग्या, गाड्या, सोनं दान करणं, काळ्या मार्गाने करोंडो रुपये कमावून एखादी शाळा, इस्पितळ बांधणं अशा हजारों गोष्टी आजुबाजुला घडताना दिसतील. इथे हजारों पळवाटा आहेत, फक्त खर्च करायला पैसा पाहीजे. पैसा असेल तर रेडिमेड पुण्य पण विकत मिळेल.
@वैभव
मी काही ठरवून हिंदुधर्माबद्दल लिहीत नाहीये आणि सगळ्याच धर्मांतलं कर्मकांड काढायचं ठरवलं तर मोठी लिस्ट बनेल, कर्मकांड आनि फसवेगिरी सगळ्याच धर्मांत रुजली आहे. त्यामूळे हिंदू धर्माबद्दल लइहिल्यावर त्याला बॅलेंस करण्यासाठी इतर धर्माबद्दल लिहा हा मुद्दा महत्वाचा नाहीये, हिंदुधर्माबद्दल लिहिल्याने दुसर्‍या धर्मातला अविवेकीपणा कमी होनार नाहीये आणि दुसर्‍या कोणत्याही धर्मातल्या त्रूटी दाखवल्याने हिंदु धर्मातल्या वाईट चालीरितीही बदलणार नाहीयेत. मूळ मुद्दा हा आपल्या समाजाच्या अविवेकवादाच्या दिशेने होणार्‍या प्रवासाला उद्देशून आहे. आपल्या कोणतीही चिकित्सा नाकारणार्‍या वा दुर्लक्षिणार्‍या मानसिकतेबद्दल आहे.
आपल्याला जायचे असते अशा विश्वात जेथे प्रत्येक माणसाच्या सर्व आंतरिक आणि बाह्य प्रेरणांचा विकास घडवुन आणण्यासाठी वाव मिळेल, एका माणसासाठी दूसरा माणूस हा केवळ आणि केवळ माणूसच असेल्,तो दुसर्‍या धर्माचा, जातीचा, खालचा किंवा वरचा नसेल, कसल्याही कोणत्याही कारणापायी माणसाचा एक वस्तू म्ह्णून वापर होणार नाही. मला माहीतीये की हे सगळ खूप अतिआदर्शवादी आणि युटोपिअन आहे पण या दिशेने चालण्यास काय हरकत आहे?

>>>> नाहीतरी ही देवळं, धर्म आणि त्या अनुषंगाने घडत जाणारी संस्कृती ही एकतर काही अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग आहेत नाहीतर अतिमुर्ख जनतेच्या भीतीचे डंपिंग ग्राऊंड्स. <<<<
केवळ धाडसीच विधान नव्हे तर वापरलेल्या शब्दयोजनेनुसार अंतिमतः रोख कुठे का कशासाठी आहे हे झाकले जात नाही.
भ्याड लोकांनी केलेल्या एका नृशंस खूनाचे निमित्त वापरुन या लेखाद्वारे त्यातिल शब्दयोजनेद्वारे व हिन्दुधर्माचा काडीचाही अभ्यास न करता लेखात मान्डत असलेल्या हिन्दुधर्मविरोधी तत्वज्ञानाचा तसेच देवास भजणार्‍या (खुदासे डरनेवाले(?)) तमाम जनतेस अतिमूर्ख म्हणण्याचा मी निषेध करतो. हेच तत्वज्ञान वापरायचे, तर मागल्याच आषाढ महिन्यात पंढरीच्या पांडूरंगाची पूजा सपत्निक उपस्थित राहून करणारे माननीय मुख्यमंत्री देखील महामूर्ख आहेत असे लेखकास म्हणावयाचे आहे काय?

ह.जा.क.,

>> फक्त खर्च करायला पैसा पाहीजे. पैसा असेल तर रेडिमेड पुण्य पण विकत मिळेल.

आपल्याला या प्रवृत्तीवर कोरडे ओढायचे असतील तर 'अतिहुषार भडव्यांच्या सत्ताकारणाचे राजमार्ग' हा उल्लेखाकडे जरा वेगळ्या संदर्भात पहावे लागेल.

उदाहरण देऊन सांगतो. शिरडी, पंढरपूर व सिद्धिविनायक (मुंबई) येथली सुप्रसिद्ध देवस्थाने सरकारी समितीच्या ताब्यात आहेत. त्यावरील सरकारी प्रतिनिधी 'अतिहुशार भडवे' या वर्गवारीत मोडतात. असे निधर्मी, अभक्त, भ्रष्ट पण 'अतिहुशार भडवे' स्वत:च्या फायद्यासाठी देवळांचं सत्ताकारण करतात. त्यांच्यासाठी देवळे म्हणजे पैसाछपाई यंत्रे आहेत. अशा परिस्थितीत पैसे देऊन आयते (रेडीमेड) पुण्य पदरी पडायच्या सुविधा फोफावल्या नसतील तरच नवल!

याउलट शेगावचं देवस्थान भक्त चालवीत आहेत. तिथे 'अतिहुशार भडवे' औषधालाही सापडत नाहीत.

त्यामुळे देवळे, धर्म नको असं म्हणण्यापेक्षा देवळे भक्तांच्या हाती सोपवणे इष्ट. असा तुमच्या लेखनावरून मला बोध होतो.

आ.न.,
-गा.पै.

उत्तम लेख.
अनेक मुद्द्यांशी सहमत आहे.

बाहेर वावरताना विचार करावा लागतो आणि काम करावे लागते, केवळ पुजा केल्याने आणि चार रंगबेरंगी अंगठ्या घातल्याने पैसे मिळत नाहीत इतकी अक्कल आपल्याला आहे. बाहेर मी फिजिक्सचा प्राध्यापक असतो पण घरात मला लग्नासाठी मंगळ असलेली मुलगी चालत नाही. बाहेर मी इंजिनिअर असतो पण घरात वास्तुशांत आणि सत्यनारायण घातल्याशिवाय मी तिथे रहात नाही. बाहेर मी डॉक्टर असतो पण नुसत्या विभुतीने रोग्याला खाडकन बरे करणार्‍या तत्सम बाबाच्या चरणी माझा माथा सदैव टेकलेला असतो. मी घरात शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही.

हे अगदी पटले.

आपण विज्ञान शिकतो, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासणी करायला शिकत नाही. आपले वैज्ञानिकही बाबाबुवांच्या दरबारी माथे टेकतात. डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनीअर, नेते, अभिनेते, खेळाडू.. सगळे याच समाजाचे प्रॉडक्ट्स आहेत. 'मुळात' काहीतरी चुकत गेलेले आहे, हे नक्की. जी काही मुठभर बुद्धीप्रामाण्यवादी, देव-धर्म, कर्मकांड नाकारणारी अथवा तर्काधिष्ठित विचाराची कास धरणारी माणसे आहेत, त्यांना स्वतःला खूप प्रयत्नपूर्वक तसे घडवावे लागले आहे. आपल्याला समाजव्यवस्थेला अशी माणसे मान्य नाहीत. आणि व्यवस्थेशी सततच्या संघर्षाने त्यातली बहुसंख्य माणसे तर्ककर्कश- आणि पर्यायाने अप्रिय होत जातांना दिसतात. या पार्श्वभूमीवर दाभोळकरांसारख्या संयत आणि समन्वयवादी माणसांची खूप कमतरता जाणवणार आहे आपल्याला.

हिंदू धर्म ही व्ययक्तीक गोष्ट नाही का? कोणावर काही जबरदस्ती आहे का?

कोणी घरात सत्यनारायण घातला तर तुमचे काय जातय? तुम्ही नका घालु सत्यनारायण. सक्ती नाहीये.
कोणाला अंगठ्या घालायच्या तर घालू द्या, तुमच्या पैशानी तर नाही ना घालत? सक्ती नाहीये.

सत्यनारायण घालणारा हिंदू माणुस ak-47 घेउन लोकांना धर्माच्या नावाखाली मारत सुटला तर बोला.

आपण विज्ञान शिकतो, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासणी करायला शिकत नाही.>> अनुमोदन...

एकदा खरगपूर आय आय टी मधे एका लॅबमधे काही कामानिमित्त गेले असताना एका महागड्या, प्रगत, आयात केलेल्या इक्विपमेन्टवर कुंकवाने स्वस्तिक काढून, फुलं वाहून पूजा केलेली पाहिली होती. मी आणि बरोबर आलेले माझे एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ मित्र अवाक, थक्क, हताश वगैरे सगळं काही एकदम झालो होतो..

ती पूजा ही ते मशीन नीट चालावं, विजेने सारखं येऊन-जाऊन-फ्लक्चुएट होऊन आपले प्रताप दाखवू नयेत यासाठी करण्यात येत असावी अशी मी आपली मुकाट्याने समजूत करून घेतली Proud

आता त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शास्त्रज्ञांची ही कथा तर बाकी काय बोलणार?
मुळात आपण जे वाचतो, शिकतो ते मनाच्या/बुद्धीच्या एका बंदिस्त कप्प्यात बहुसंख्य लोक ठेवून देतात. रोज ९ ते ६ काम करायच्या वेळेस फक्त तिथे उपयोगाला आणतात. एरवीच्या त्यांच्या मानसिकतेशी त्याचा काहीही संबंध ते येऊ देत नाहीत, आपण शिकलेल्या, वाचलेल्या गोष्टींनी त्यांच्या मानसिकतेत, दृष्टीकोनाबद्दल कधीही कसलेही प्रश्न उद्भवत नाहीत, त्यातला विरोधाभास लक्षात येऊन द्विधा मन:स्थिती वगैरे होत नाही... आपली पारंपरिक मानसिकता, संस्कार, शिकवण, वगैरे काळ्या दगडावरच्या खोदलेल्या आणि कधीही न बदलणार्‍या रेषा आहेत हे मुळी गृहितच धरलेलं अस्तं. आत्ता आपल्यापर्यंत पोचलेल्या परंपरा, धर्म हेही सतत बदलत आलेले आहेत हेच माहित नसतं, माहित करून घ्यायची इच्छा नसते. ते सगळं अनादि, अनंत कालापासून चालत आलं आहे, जुन्या धार्मिक साहित्यात सग्गळं आहे - तेच आम्ही पाळतो वगैरे म्हणलं की सगळ्यात सोयीचं!!

वरदा,

आमची प्रयोगशाळा खंडेनवमीला काम करत नाही. मी नव्यानं तिथे काम करायला लागलो, तेव्हा अचानक त्या दिवशी सर्वत्र रांगोळ्या, तोरणं पाहून थक्क झालो. मग आम्हांला वाटलं आपणही आपल्या खोल्यांमध्ये तसंच करावं. सगळे गेलो सरांकडे. सरांनी विचारलं, काय करायचं आहे तुम्हांला? आम्ही म्हटलं, लॅब स्वच्छ करायची, तोरणं लावायची, आणि मग काहीतरी खायला आणू.
'लॅब आपण दर शनिवारी स्वच्छ करतो'.
'पण आज सगळे करतायेत. आपणही करू'.
'परवाच लॅब स्वच्छ केलेली असताना आज पुन्हा का? आणि तोरणं लावल्यामुळे आपला बिघडलेला एलिप्सोमीटर काम करायला लागणार आहे का? एलबी ट्रफचं सेन्सर बिघडलं आहे, ते दुरुस्त होणार आहे का?'
आमच्याकडे उत्तर नव्हतं.
मग परिहार स्वीटमधून समोसे, मिठासमधून रसमलई आणि जोश्यांकडून करंज्या आणल्या फक्त. Proud
नंतर मोठमोठ्या शास्त्रज्ञांच्या हातातल्या अंगठ्या दिसल्या, त्यांचं गोशाळाप्रेम दिसलं. चांद्रयान प्रकल्पावेळी फोडलेले नारळही दिसले.

काहीतरी गोंधळ होतो आहे माझा! Happy

माझ्या समजुतीप्रमाणे खंडेनवमीला यंत्रांची पूजा करतात ते अंधश्रद्धा असते म्हणून करत नसावेत. या यंत्रांमुळे (निर्जीव यंत्रांमुळे) आपल्याला रोजीरोटी मिळते म्हणून ते एक आभार प्रदर्शन असते. या अश्या पूजेमुळे माणसातील अहं कमी होण्यास सहाय्य होऊ शकते. एखादा कामगार रोज सकाळी यंत्राला लाथा मारत असेल, त्यावर थुंकत असेल, मोठ्या यंत्राखाली झोपा काढत असेल त्याने ती पूजा केलेली पाहिल्यावर त्याच्या मनात कृतज्ञतेचे भाव निर्माण होऊ शकतील की या यंत्रामुळे आपले कुटुंब चालते. हे बैलपोळ्यापेक्षा भिन्न नसावे. Happy

यंत्र अव्याहतपणे चालत राहावे म्हणून (खंडेनवमीला) पूजा केली जाते हे माझ्यासाठी नवीन आहे. Happy

नवीन यंत्र, वाहन आणल्यावर स्वस्तिक, फुले, कुंकू वगैरे सोपस्कार हे वैज्ञानिकदृष्ट्या अनावश्यक असले तरी माणसातील अहं कमी करण्यास सहाय्यभूत असतात. पदरचे भरपूर पैसे खर्च करून मी जे काही खरेदी केलेले आहे ते मला लाभावे यासाठी कोणत्यातरी अज्ञात शक्तीच्याप्रती आदरभाव व्यक्त करणे याला विज्ञानाचा विरोध कश्यासाठी असावा?

विज्ञान हे पूर्णतः मानवनिर्मीत आहे हा अहं या भूमिकेमागे आहे असे मला वाटते. खरे तर विज्ञान मानवाच्याही आधीपासून अस्तित्वात आहे, त्याचा अधिकाधिक शोध घेण्यात मानवाच्या हजारो पिढ्या संपत आहेत. केवळ विज्ञान थोडे अधिक ज्ञात झाले म्हणून श्रद्धा नेमक्या तितक्याच प्रमाणात कमी होत जावी ही अपेक्षा पटत नाही. कशामुळे तरी सर्व काही अस्तित्वात आहे इतकेही का पटू नये?

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा क्रौर्य, अमानवी वर्तन यांनी स्पष्ट केलेली असते हे मान्य व्हावे / करायला हवे.

माझे भले व्हावे म्हणून एक बोकड कापणे ही अंधश्रद्धा आणि माझे भले व्हावे म्हणून देवासमोर वाकणे ही श्रद्धा!

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी! हे श्री गणेशाला उद्देशून असलेले वचन! यात सर्व विज्ञान हे तुझ्यातच सामावलेले आहे ही श्रद्धा आहे. यात विज्ञानाचा, विज्ञान जाणणार्‍यांचा, संशोधकांचा कोठेही अपमान नाही. पण संशोधक, विज्ञान जाणणारे हे लोक मात्र अनेकदा अश्या श्रद्धेची टर उडवतात असे दिसते.

श्रद्धा नसावीच की काय? Happy

यंत्रांबद्दलची कृतज्ञता त्यांची उत्तम निगा ठेवून, त्यांच्या सदुपयोग करून व्यक्त करता येते. हळदकुंकूफुलं वाहून कृतज्ञता व्यक्त होते, असं मला वाटत नाही. Happy

उत्तम निगा व सदुपयोग हे मेंटेनन्स शेड्यूलमध्ये समाविष्ट असतात व कर्तव्याचाच एक भाग ठरतात. ते वेळच्यावेळी केलेही जातात, केले जात आहेत की नाहीत हे तपासलेही जाते. हळूहळू त्यातील कृतज्ञतेचा घटक कमी होऊन ते एक कर्तव्य मानले जाते.

यंत्राची पूजा ही एक प्रकारे यंत्रनिर्मीतीस कारणीभूत असलेल्या (अर्ग्यूमेन्टसाठी काल्पनिक म्हणू) अंतिम शक्तीची पूजा असते अशी मनातील श्रद्धा असते. ती श्रद्धाही यंत्राचा सदुपयोग व उत्तम निगा राखून व्यक्त करणे अपेक्षित असल्यास मेंटेनन्स शेड्यूल्स हा सामुहिक व व्यवस्थापकीय श्रद्धेचा भाग ठरू लागेल. Happy

ही श्रद्धा कामाच्या दिवशी, पगार घेऊन, काम बंद ठेवून व्यक्त केली जात असेल, तर माझ्या लेखी चूक आहे.

चिनुक्स, प्रत्येकाच्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पद्धती निराळ्या असु शकत नाहीत का? जर त्यात कुणाला जीव-वित्त हानी होत नसेल अन चुकीचे समज पसरवले जात नसतील तर त्या मनुष्याच्या हात जोडण्यावर ऑब्जेक्शन आपण का घ्यावे?

नताशा,
आमचा पगार सरकार देतं. लोकांच्या पैशातून मी माझ्या वैयक्तिक श्रद्धा पूर्ण करणं मला चूक वाटतं. हे प्रकार शनिवारीरविवारी कोणी केले असते, तर एकवेळ मी मान्य केलं असतं. पण एक अख्खा दिवस एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळेत काम होत नाही, हा मला पैशाचा, वेळेचा अपव्यय वाटतो.

मी देव या संज्ञेला मानत नाही....

अंधश्रध्दा आणि श्रध्दा यात तफावत आहे...

मी देवळात जातो...देवापुढे नमस्कार करतो....माझे मागणे मागतो... आणि ती मिळण्याची अपेक्षा करतो... ही झाली श्रध्दा.....जगात काहीतरी शक्ती आहे ...जी मला अडीनडीला मदत करेल...

अंधश्रध्दा .... माझे मागणे मिळवण्यासाठी मी देवासाठी काहीही करेन..मग ते अनैतिक असेल तरी मी करेन आणि त्यामुळे माझे मागणे हे देव मला देईलच... हे जे भ्रमक कल्पना आहे... ती झाली अंधश्रध्दा...

तुम्ही तुमच्यावर नियंत्रणासाठी कोणत्याही शक्तीची पुजा करतात...तिला मानतात... तिच्या धाकात असतात.. चांगली गोष्ट आहे... त्यासाठी विरोध नाहीच कुणाचा.. नसणारच...

परंतु ... त्यासाठी काहीही करणे हे मात्र चुकीचे आहे....

हा विषय व्यवस्थापनाचा आहे. पगार देऊ नये, कामगार युनियन्सशी यावर हवा तितका वाद घालावा. कर्तव्यच्युती म्हणजे खोटी श्रद्धा (किंवा चुकीची श्रद्धा) हे समीकरण गैर ठरेल. एखादा माणूस कर्तव्यात मागे पडत असेल पण मनात श्रद्धा बाळगत असेल, हे सहज शक्य आहे.

माझा मुद्दा इतकाच - अगदी यंत्रावर फुले, कुंकू, स्वस्तिक पाहिले की लगेच 'विज्ञानवादी असूनही असे कसे काय हे लोक' असे मनात येऊ नये. किंबहुना, असे मनात येत असेल तर कित्येक सण (जसे राखी वगैरे) या लोकांनी पाळूच नयेत, देवळात जाऊ नये, इत्यादी इत्यादी!

.

जे यंत्र काय काम करतं माहित आहे, त्याचा कार्यकारणभाव माहित आहे, त्याचा अ‍ॅनॅलिसिस आपण का करत आहोत, त्यातून काय उद्दिष्ट गाठायचं आहे हे माहित आहे. त्यामधे वैज्ञानिक आणि तांत्रिक सोडून इतर कुठल्याही 'शक्ती' नाहीत माहित आहे. मग त्याच्याबद्दल कसली कृतज्ञता व्यक्त करायची आहे?
एक विशिष्ट, योग्य ते शिक्षण घेऊन त्या पदावर ती व्यक्ती आहे, समोरचं यंत्र, उपकरण विशिष्ट कामासाठी म्हणूनच तयार केलं गेलं आहे. त्यात रोजीरोटी देण्याबद्दल कशाची कृतज्ञता?

विशेषतः शास्त्रज्ञ जेव्हा नवनवीन संशोधन करत आहेत, विविध सृष्टी, भौतिक व्यापारांमागचे अज्ञात कार्यकारण संबंध शोधून काढत आहेत तेव्हा त्यांनीच/इतर शास्त्रज्ञांनी या कारणांसाठी तयार केलेल्या उपकरणांना हात जोडायचा? Uhoh

असे मनात येत असेल तर कित्येक सण (जसे राखी वगैरे) या लोकांनी पाळूच नयेत, देवळात जाऊ नये, इत्यादी इत्यादी!>> हो, मी पाळत नाही, बेफिकीर. मी मंदिरात जाते ते अभ्यास म्हणून. वैयक्तिक आयुष्यात गेल्या २५ वर्षांत एकदाही देवासमोर नमस्कार केलेला नाही

बेफिकीर,
प्रयोगशाळा आणि त्यांचं व्यवस्थापन हा जरा वेगळा विषय आहे. कारखान्यांप्रमाणे त्या चालत नाहीत. त्यात बरेच घटक अंतर्भूत असतात. दुसरं म्हणजे, माझं स्वतःच्या मालकीचं शेत असेल, दुकान असेल, कारखाना असेल, तर मी काम न करणं मला मान्य आहे. माझ्या वैयक्तिक श्रद्धांसाठी माझ्या कामाच्या ठिकाणी, पगार घेऊन, काम न करणं, इतरांचं काम खोळंबून ठेवणं मला अमान्य आहे.

महत्त्वाचं म्हणजे, वरदानं लिहिल्याप्रमाणे हारफुलं वाहून माझी यंत्रं उत्तम काम करणार नाहीत, हे मला ठाऊक आहे. हा माझा अहंकार नसून माझं ज्ञान आणि माझा अनुभव आहे. Happy

<असे मनात येत असेल तर कित्येक सण (जसे राखी वगैरे) या लोकांनी पाळूच नयेत, देवळात जाऊ नये, इत्यादी इत्यादी!>

राखी बांधून घेणं, दिवाळी साजरी करणं, मंदिरात जाणं यांसाठी मी लोकांचा पैसा वापरत नाही. माझा पैसा, माझा वेळ खर्च करतो. त्यामुळे इतरांनी या गोष्टी कराव्यात किंवा अक्रू नयेत, हा त्यांचा प्रश्न झाला.

लोकांच्या पैशातून मी माझ्या वैयक्तिक श्रद्धा पूर्ण करणं मला चूक वाटतं. हे प्रकार शनिवारीरविवारी कोणी केले असते, तर एकवेळ मी मान्य केलं असतं. पण एक अख्खा दिवस एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळेत काम होत नाही, हा मला पैशाचा, वेळेचा अपव्यय वाटतो.>> सहमत.

माझा मुद्दा एवढाच आहे की श्रद्धा अन अंधश्रद्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. श्रद्धा माणसाला बळ देते तर अंधश्रद्धा कमकुवत बनवते. त्यातला फरक जर विद्वान, विज्ञानवादी लोकांना कळत नाही (वरती प्रतिसादात उदा आहेत) तर अशिक्षीत्/भोळ्याबाबड्या लोकांना कळत नाही याचं आश्चर्य मला तरी वाटत नाही.

उदा. न चुकता पुजा करणं, त्यातून समाधान मिळणं ही श्रद्धा झाली, पण अमुक वारी केस धुवायचे नाही, तमुक दिवशी बोकड कापावे वगैरे अंधश्रद्धा झाल्या. दोन्हीत फरक आहे ना?

नोट: मला कुठलेही रिच्युअल्स पटत नाहीत, मी करतही नाही.

<माझा मुद्दा एवढाच आहे की श्रद्धा अन अंधश्रद्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. श्रद्धा माणसाला बळ देते तर अंधश्रद्धा कमकुवत बनवते. त्यातला फरक जर विद्वान, विज्ञानवादी लोकांना कळत नाही (वरती प्रतिसादात उदा आहेत) तर अशिक्षीत्/भोळ्याबाबड्या लोकांना कळत नाही याचं आश्चर्य मला तरी वाटत नाही.>

चांद्रयान प्रकल्पाच्या प्रत्येक पायरीआधी नारळ फोडणं, ही श्रद्धा की अंधश्रद्धा?

बेफिकीर यांच्याशी काही प्रमाणात सहमत आहे.
यंत्र बंद पडू नये म्हणून कोणीही पूजा करत नाही. पूजा करणार्‍या सगळ्यांनाच ते माहित असते.

इंजिनीरींग कॉलेजला असताना वर्कशॉपमधे किंवा लॅबमधे दसर्‍याला तिथला स्टाफ लेथमशिनसह सर्व यंत्रांची पूजा करायचा. तेव्हा मलाही काहीसा प्रश्न पडायचा की पूजा कशाला?
पण नंतर असे वाटले की आपल्याकडे दसर्‍याला आयुधांची पूजा करण्याची परंपरा आहे आणि कंप्युटर किंवा लेथ मशिन ही आधुनिक आयुधचं नाहीत का? तर त्यामागे फक्त त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची भावना आहे. एखाद्या कृतीमागिल उद्देश किंवा कारणमिमांसा काय आहे हे समजावून घेणे वैज्ञानिक दृष्टीकोनात बसत नाही का?

माधवी.,

<पण नंतर असे वाटले की आपल्याकडे दसर्‍याला आयुधांची पूजा करण्याची परंपरा आहे आणि कंप्युटर किंवा लेथ मशिन ही आधुनिक आयुधचं नाहीत का? तर त्यामागे फक्त त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची भावना आहे. एखाद्या कृतीमागिल उद्देश किंवा कारणमिमांसा काय आहे हे समजावून घेणे वैज्ञानिक दृष्टीकोनात बसत नाही का?>
'खंडेनवमी' या शब्दात तुम्ही लिहिलेलं अंतर्भूत आहे. प्रश्न असा की दिवसाचा पगार घेऊन, तुमच्या श्रद्धांसाठी हा अपव्यय करावा की नाही?
तुमच्या श्रद्धेमुळे आर्थिक नुकसान होणार असेल, तर ते कितपत योग्य?
ही कृतज्ञता तुमची स्वतःची, वैयक्तिक आहे. त्यासाठी इतरांच्या करातून आलेला पैसा वापरावा का?
ही कृतज्ञता कामाच्याच दिवशी का व्यक्त करावी? एखाद्या सुट्टीच्यादिवशी येऊन, यंत्रांना तेलपाणी करून, फुलं वाहून व्यक्त करता येत नाही का? Happy

'खंडेनवमी' या शब्दात तुम्ही लिहिलेलं अंतर्भूत आहे >> ओह्ह.. हे मला माहित नव्हते.

तुमच्या श्रद्धेमुळे आर्थिक नुकसान होणार असेल, तर ते कितपत योग्य? >> अर्थातच अयोग्य आहे.
प्रयोगशाळेत पूर्ण दिवस ह्या कारणासाठी काम न होणे अर्थातच योग्य नाही आणि चांद्रयान प्रकल्पाच्या संदर्भात नारळ फोडणे ही नक्कीच अंधश्रद्धा आहे.

जे यंत्र काय काम करतं माहित आहे, त्याचा कार्यकारणभाव माहित आहे, त्याचा अ‍ॅनॅलिसिस आपण का करत आहोत, त्यातून काय उद्दिष्ट गाठायचं आहे हे माहित आहे. त्यामधे वैज्ञानिक आणि तांत्रिक सोडून इतर कुठल्याही 'शक्ती' नाहीत माहित आहे. मग त्याच्याबद्दल कसली कृतज्ञता व्यक्त करायची आहे?
एक विशिष्ट, योग्य ते शिक्षण घेऊन त्या पदावर ती व्यक्ती आहे, समोरचं यंत्र, उपकरण विशिष्ट कामासाठी म्हणूनच तयार केलं गेलं आहे. त्यात रोजीरोटी देण्याबद्दल कशाची कृतज्ञता?

विशेषतः शास्त्रज्ञ जेव्हा नवनवीन संशोधन करत आहेत, विविध सृष्टी, भौतिक व्यापारांमागचे अज्ञात कार्यकारण संबंध शोधून काढत आहेत तेव्हा त्यांनीच/इतर शास्त्रज्ञांनी या कारणांसाठी तयार केलेल्या उपकरणांना हात जोडायचा? अ ओ, आता काय करायचं
<<<

एक (पुन्हा - काल्पनिक म्हणू) अंतिम शक्ती, जिच्यामुळे सर्व शास्त्रज्ञांना हे शोध लावण्याची बुद्धी मिळाली, जिच्यामुळे समोरचा ऑब्जेक्ट प्रत्यक्षात अस्तित्वात येऊन कार्यान्वित झाला त्या शक्तीला उद्देशून श्रद्धा व्यक्त केली तर नेमके काय बिघडले? ती कृतज्ञता माणसातील 'मैं हूं सबकुछ' हा अहं कमी करण्यास कारणीभूत ठरू शकत असेल तर गैर काय? Happy

=============

माझ्या वैयक्तिक श्रद्धांसाठी माझ्या कामाच्या ठिकाणी, पगार घेऊन, काम न करणं, इतरांचं काम खोळंबून ठेवणं मला अमान्य आहे.<<<

ज्यांना अमान्य आहे त्यांनी ज्यांना मान्य आहे त्यांच्याशी या विषयावर वाद घालणे हा वाद श्रद्धा व विज्ञान यातील वाद ठरणार नाही. तो कर्तव्यतत्परता, कर्तव्यपराङ्मुखता यातील वाद ठरेल. श्रद्धा कुठे, कशी, केव्हा व्यक्त करावी यावर माझे काहीच म्हणणे नाही व तुमचे फक्त त्यावरच म्हणणे आहे असे दिसते. कर्तव्य न पाळूनही जे काही केले जाते (पूजा, कुंकू वाहणे) याला श्रद्धा म्हणूच नये का असा माझा सवाल आहे. ती श्रद्धा काम टाळून व्यक्त केली जात असेल हे मान्य आहे, पण म्हणून ती अंधश्रद्धा किंवा खोटी श्रद्धा ठरू नये / ठरत नाही, असे म्हणण्याचा माझा प्रयत्न आहे.

राखी बांधून घेणं, दिवाळी साजरी करणं, मंदिरात जाणं यांसाठी मी लोकांचा पैसा वापरत नाही. माझा पैसा, माझा वेळ खर्च करतो. त्यामुळे इतरांनी या गोष्टी कराव्यात किंवा अक्रू नयेत, हा त्यांचा प्रश्न झाला.<<<

यावरही तेच म्हणायचे आहे. श्रद्धा असणे म्हणजे कर्तव्य पाळू नये असे सुचवणे असे मला म्हणायचेच नाही आहे. मला असे म्हणायचे आहे की श्रद्धा म्हणून विज्ञानवादी ज्यावर टीका करतात त्यांनी मुळात स्वतःच्याही पैशांनी व स्वतःचाही वेळ घालवून असे काही करू नये.

तुम्ही श्रद्धेमुळे कोणाच्यातरी होणार्‍या आर्थिक नुकसानाबद्दल बोलत आहात तर मी श्रद्धेकडे विज्ञानवाद्यांच्या बघण्याच्या शैलीबाबत बोलत आहे. Happy

वरदा,
प्रत्येक गोष्ट घडण्या/ न घडण्यामागे असंख्य व्हेरिएबल्स असतात. त्यातले जे आपल्याला ज्ञात आहेत, ते आपण कंट्रोल करतो. पण जे अज्ञात (म्हणजे गुढ वगैरे नाही, तर जे अगदी आपल्याला far-fetched, nearly impossible वाटतात ते) असतात, त्यांना एक कलेक्टिव्ह नाव देतो- भाग्य/ नशीब/ दैव/ लक.

तर ते सगळे व्हेरिएबल्स आपल्या फेवरमध्ये दरवेळी असतीलच असं नाही. पण ते असावे अशी आपली इच्छा असते. पण ते आप्ल्या कंट्रोलमध्ये तर नाहीत. म्हणून मग ते आपल्याला अनुकुल असावे असं आपल्याला मनाशी घोकावं लागतं. ते प्रत्येक मनुश्य वेगवेगळ्या प्रकारे करतो- कुणी पुजाअर्चा करुन तर कुणी ते व्हेरिएबल्स नाहीच्चेत असं स्वतःला समजवून. प्रत्येकाचा मार्ग वेगळा. चुक बरोबर चा प्रश्नच नाही.

उदा. माझा एक मित्र एमटेक ला अ‍ॅडमिशनसाठी लागणारी परिक्षा गेट द्यायला गेला. व्यवस्थित एक वर्ष अभ्यास करुन. सेंटरवर पोचायच्या वेळेआधी निघाला. ट्रॅफिक वगैरेची मार्जिन ठेवून. गाडीत पेट्रोल भरलेलं अन गाडी व्यवस्थित कंडिशन मध्ये. नीट खाऊन-पिऊन म्हणजे चक्कर येऊन पेपर लिहू शकणार नाही असंही नाही. पेन्-बिन घेतलेलं. अशी सगळी जय्यत तयारी असुनही तो परिक्षा देऊ शकला नाही कारण जाताना त्याला एका म्हशीनी ठोकलं अन दवाखान्यात न्यावं लागलं. गेट देऊ शकला नाही, म्हणून खचून न जाता मग कॅट (CAT) दिली अन त्याला IIM-B मध्ये प्रवेश मिळाला.
हे उदा. द्यायचं कारण म्हणजे त्याने सगळी नीट तयारी केली होती. पण आता ऐन दिवशी म्हैस ठोकेल या एका far fecthed शक्यतेसाठी तो तयार (prepared) नव्हता. पण त्यामुळे त्याच्या आयुष्याची दिशा बदलली. तर ही अशी फार्-फेच्ड शक्यता अन त्याचे होणारे परिणाम म्हणजे आपलं ते भाग्य्/दैव/नशीब.
ते माना अथवा मानू नका. बटरफ्लाय इफेक्ट असं नाव दिलं तर जास्त मान्य होण्यासारखं वाटतं का? मग तसं माना. पण नाहीच्चे अन लोक उगाच्च करतात असं म्हणण्यात काय पॉइंट?

तर हे व्हेरिएबल्स आपल्या फेवरमध्ये ऑलरेडी आहेतच असं मानून चालणं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकींग. पण प्रत्येक मनुष्य मानसिकरीत्या तितका पॉझिटीव्ह असेलच असं नाही. मग त्याला जर मन:शांतीसाठी असं वाटलं की बुवा अमुक देव माझं सगळं नीट करेल वगैरे तर त्यात काही चुकीचं नाही. ही झाली श्रद्धा.

आता अंधश्रद्धा कुठे चालू होते? जिथे फसवणुक, बाजार, भोंदुगिरी, जीव्-वित्त हानी सुरु होते तिथे. म्हणजे अमुक देवाला अमुक दिवशी इतके बोकड कापायचे किंवा अमुक किलो चांदीचा मुकुट वहायचा, लग्नात मंगळ वगैरे. तिथे विरोध करा. केलाच पाहिजे.

Pages