फसलेल्या 'कास्टिंग'ची पिचकवणी 'दुनियादारी' (Duniyadari - Marathi Movie Review)

Submitted by रसप on 20 July, 2013 - 02:53

कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.

तर होतं काय की, पुण्यात एक कॉलेज असतं. जिथे मुंबईहून एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा श्रेयस तळवलकर (स्वप्नील जोशी) शिकायला येतो. कॉलेजात आल्याबरोबर त्याला एक 'फॅक्ट चेक' मिळतो. कॉलेजचा प्रस्थापित दादा दिगंबर पाटील उर्फ दिग्या उर्फ डीएसपी (अंकुश चौधरी) व कॉलेजचा (की बाहेरचा हे नीट नाही) दुसरा एक स्ट्रगलिंग दादा साई देढगावकर (जितेंद्र जोशी) ह्यांच्या दुश्मनीत तो सापडतो. जो 'उसूल'वाला दादा असतो, त्याच्या म्हणजे अर्थातच दिग्याच्या बाजूने श्रेयस जातो आणि त्यांच्यात यारी होते.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. ही प्रेमप्रकरणं व भाईगिरी, ह्या सर्वांना बरीच दुनियादारी करायला लावते. ती काय काय आणि कशी कशी हे पुस्तकात किंवा चित्रपटात समजेल.

duniyadari.jpg

चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी कुणीही कॉलेजवयीन वाटत नाही. दिग्या आणि साई नापास होऊनही पडून असतात, असं जरी मानलं तरी बाकीच्यांचं काय ? स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो. काही कॅमेरा कोनांतून त्याने विग घातला असावा असाही संशय आला. सई ताम्हनकर जितके कमी व घट्ट कपडे घालते तितकी ती मराठीतली भक्कम सोनाक्शी सिन्हा वाटते. चित्रपट म्हाताऱ्या सईच्या फ्लॅशबॅकमध्ये घडतो. त्या वयस्कर शिरीनच्या भूमिकेत ती अधिक शोभते. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिकेत असल्याने त्याला किळसवाणा दाखवला असावा. तो तसा दिसतो. विचित्र वाढलेलं पोट, पिंजारलेले केस आणि ती ओठांवरून जीभ फिरवायची स्टाईल ह्या सगळ्यामुळे तिरस्करणीय साई व्यवस्थित उभा होतो. अंकुश चौधरी 'स्टाइलिश भाई'च्या भूमिकेत आणि उर्मिला कानिटकर कॉलेजवयीन तरुणीच्या भूमिकेत 'त्यातल्या त्यात' फिट्ट वाटतात. स्व. आनंद अभ्यंकर, उदय सबनीस, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी आणि नागेश भोसले छोट्या छोट्या भूमिकांत आहेत. फक्त दोन किरकोळ सीनमध्ये असलेला नागेश भोसले अक्षरश: पडदा खाऊन टाकतो. सुशांत शेलारला काहीच काम नाही.

शिरीन मेडिकलची विद्यार्थिनी दाखवलेली असताना ती ह्या दुसऱ्याच कॉलेजात का येत असते ? तिच्या आगमनाला ती फाडफाड इंग्रजी का झाडते ? ती काही परदेशातून वगैरे आलेली नसते !
तिला मेडिकलवाली दाखवण्याचं कारणच काय ? - हे चाणाक्ष प्रेक्षकाला कळायला वेळ लागत नाही. किंबहुना, ती डॉक्टर होणार असल्यामुळे तिचं कहाणीत अपरिहार्य असलेलं कर्तव्य ती जेव्हा करते, तेव्हा काहीच आश्चर्य वाटत नाही. खरं तर एक अंगावर येऊ शकणारा शेवट केवळ पिचकवणी सादरीकरण व पोकळ पटकथेमुळे फुसका बार निघतो.

श्रेयस मीनूला समजावतानाचा संवाद वगळता बाकी संवाद फक्त परिस्थितीजन्य निर्मिती असावीत असे वाटतात. द व्हेरी फेमस 'तुझी माझी यारी, तर #@त गेली दुनियादारी' हे मला तरी काही विशेष वाटलं नाही.

एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.
गाणी त्रास होणार नाही, इतपत श्रवणीय नक्कीच आहेत. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' चांगलं जमलं आहे. 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' हे फेसबुकमित्र मंदार चोळकरचं गाणंसुद्धा चांगलंच जमून आलं आहे.

मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. सुरुवातीच्या एका दृश्यात अंकुश चौधरीला धावताना पाहिल्यावर जाणवतं स्लिम-ट्रिम असला तरी ते पुरेसं नाही, इतकं ते कृत्रिम वाटतं. दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते. ओबडधोबड थकेल चेहरे आणि बेढब शरीरं ह्यांमुळे ही 'दुनियादारी' अस्सल वाटत नाही.

एकंदरीत, पिचकवणी सादरीकरण आणि पूर्णपणे वाया घालवलेला शेवट इतकंच अडीच तासानंतर लक्षात राहातं आणि वाटतं, नसता पाहिला तरी चाललं असतं.

रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/duniyadari-marathi-movie-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे.....पण मी तर आज तिकीट बुक करून आलेय. शेवटची दोन मिळाली. वेगवेगळ्या टोकांना....बाकी हाउस फुल. तीन तास आधी जाऊन सुद्धा शेवटची तिकीट....प्रमोशन भारी होत त्याचं.

आमिर खान ने ३ ईडीअट्स साठी फक्त कॉलेजकुमार दिसण्याकरीता ......गझनीच्या जबरदस्त बॉडीला तिलांजली दिलेली होती......... असे अ‍ॅक्टर क्वचितच असतात.....

मराठीत अतुल कुलकर्णी आणि एखादा कलाकार सोडला तर कॅरेक्टर मधे येण्याकरीता फक्त विग लावा.. केसाची स्टाईल बदला ........आलो कॅरेक्टर मधे Biggrin

कास्टिंग फिसकटलेलच आहे, पण तरी बघायचा आहे असं ठरवलं आहे. बघीतलाच तर आणि वेळ मिळाला तर झब्बु नक्की Wink

गाणी आवडली आहेत. टिकटिक कॅची आहे, जिंदगीला पण वेगळा फ्लो आहे. देवाच गाणं शब्दांमुळे आवडल.

श्यामली +१

बापरे.....पण मी तर आज तिकीट बुक करून आलेय. शेवटची दोन मिळाली.वेगवेगळ्या टोकांना
>>> अरे देवा... मला टेन्शन आलं आता Sad

बहुदा मला पुन्हा सोमवार पकडावा लागणार अस दिसतय Sad

अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो. >>>>>>
रसप, तु आता प्रथम ते पुस्तक वाचच आणी पुन्हा एकदा नव्याने चित्रपटाचा रिव्हू लिही. कारण सुहास शिरवळकरांचे हे एक माईल-स्टोन पुस्तक आहे. पुस्तक वाचल्यावर अनेक संदर्भ तुला समजतील. कारण ८० च्या दशकात जी मंडळ्री कॉलेजला होती (त्यात मीही होतो हे ओघाने आलेच) त्यांनी हे पुस्तक अक्षरशः डोक्यावर घेतले होते. अनेक जणांची या पुस्तकाची अनेक पारायणे झाली असतील.

कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. >>>>> प्रत्यक्ष पुस्तकात साईची बहिण श्रेयसवर मरताना रेखाटली आहे.

८० च्या दशकात जी मंडळ्री कॉलेजला होती (त्यात मीही होतो हे ओघाने आलेच) त्यांनी हे पुस्तक अक्षरशः डोक्यावर घेतले होते. अनेक जणांची या पुस्तकाची अनेक पारायणे झाली असतील.
>>>

८० च्या दशकातल्या कशाला?
आम्ही २००८-२०१३ वाले पण इतकंच डोक्यावर घेतोय त्या पुस्तकाला Happy

वरिल परिक्षणाशी सहमत!
अगदिच रद्दड सिनेमा आहे. स्वप्निल जोशी त्या सोनी टिव्हीच्या 'कॉमेडी सर्कस' मध्येच बरा वाटतो.

अरेरे...इतका फसलाय का?
कोथरुड सिटीप्राइडला आजचे सगळे शो हाउसफुल्ल आहेत... उद्या दुपारचा पण... कशीबशी उद्या संध्याकाळची तिकीटे मिळालीत!
मराठी सिनेमाला इतके चांगले ओपनिंग म्हणजे कमाल आहे... अर्थात यात कादंबरीच्या लोकप्रियतेचा खुप मोठ्ठा वाटा आहे आणि तितकाच झी च्या प्रसिद्धीतंत्राचाही... असो.... माझा अभिप्राय आता उद्या बघून आल्यानंतरच इथे लिहीन Happy

दुनियादारी त्यांची आणि आमची
आमची म्हणजे कोणाची तर८०-९०च्या दशकात संपुर्ण कॉलेज तरुणाईचं जिवन व्यापुन टाकलं आणि आम्ही त्या कादंबरीची पारायण केली ...!! पाठ केली.... !!!!
त्यांची म्हणजे ज्यांनी कादंबरी वाचलेली नाही आणि एका तिराहीताच्या नजरेतुन केवळ चित्रपट पहाणार आहेत.
आजच फस्ट डे फ़र्स्ट शो पाहीला.....
एकंदरीत चित्रपट बराच चांगला झाला आहे कथेतले बदल आणि डीटेलींग सोडता, गाणीही छान आहेत.
केवळ तुलना म्हणुन काही मुद्दे( न आवडलेल्या गोष्टी या आमच्या आणि आवडलेल्या त्यांच्या)पण तरीही वर नावात लिहील्याप्रमाणे आमची दुनियादारी खरचं अगदी अर्धवट शेवटासकट परीपुर्ण आहे...या चित्रपट रुपांतर करता मात्र फक्त पट कथेतच नाही तर मुळ कथेतही खुप सारे बदल केले गेलेत."सु.शि." जर आज असते तर... कदाचित हा शेवट ही त्यांना आवडला असता आणि बदललेली कथाही.
इतकं डीटेलींग प्रत्यक्ष कथेत असुनही अनेक पात्रांचे चित्र नीट उभे राहात नाही... ( उद. नित्या... अस्सल आकडे लावणारा, कोडी घालणारा चिंतु जोशी, प्रितम,रानी मा, मिस्टर तळवळ्कर),आणि मह्त्वाचे एम के ची संपुर्ण पात्र.....( अगदी वाया घालवल्यं)
डीसपी आणि साई च्या वादाची कारणं,कट्ट्यावर असणारा इरसालपणा, हे अधिक दाखवता आंले असते.
गाणी:खरतरं अनावश्यक.त्याऎवजी प्रसंग आणि संवाद वाढ्वता आले असते. कट्टा आणि कट्टेकरी नुसते करायला हवे म्हणणार्यातले नाही तर करुन टाकायचं या प्रवृत्तीतले हे ठ्सणं आवश्यक होते. काही ठिकाणांचे संदर्भ येणं अत्यावश्यक होतं जसं अलकाचा चौक, रिगल, खंडाळ्याच्या सहलीचे प्रसंग आणि तिथेच येणारी सुर्योदय आणि सुर्यास्ताचे संदर्भ.कारन हे हे सर्व त्यातले कलाकारच ठरतात.
पात्र निवड .... श्रेयस ने या पिक्चर साठी शुन्य मेहनत घेत्ल्याचं सतत जाणवतं. अंकुशने प्रयत्न नक्की केलाय. एम के ला पुर्ण वाया घालावल्यं .त्यातल्यात्याभाव खाउन जातो तो साई. प्रत्यक्ष कथेत साईचे डीटेल खुप कमी आहेत. पण जितुने त्यात खुनशी आणि मग्रुरपणाचे चांगले रंग भरलेत.
बाकी मीनु,इतर कट्ट्य़ाचे मेंबर फुटेजप्रमाणेच कामं
वेशभुषा: आणखी डीटेल भरता आले असते उदा: दिग्याची एन्ट्री आणी संपुर्ण चित्रपटात टिपिकल पुणेरी दाखवता आला असता पायजमा, कुर्ता
कादंबरी ही खरतर अनेक नात्यांचे परत परत गुंतत जाणारे आणि उलगडणारे धागे अगदी हळुवारं पणे दाखवते , त्यामानाने चित्रपट फारच जलद गतीने पुढे सरकतो.प्रेम त्रिकोणाचे वारंवार येणारे संदर्भ, फक्त प्रसंग आणि पात्र वेगळी
आवडलेल्या गोष्टी त्यांच्या
बरोबरच्या ३ जणांनी कादंबरी वाचलेली नव्हती.त्यां ना हा विषयच नवीन होता. त्यामुळे त्यांच्यासाठी चांगली कथा,चांगली गाणी.....
कॉलेजच्या आजच्या संदर्भातले काही संवाद एकदम आजच्या काळालाही लिंक करुन जातात. दिग्या हा ही त्यांना त्यांच्यातला वाटतो. मुळ कथा माहीत नसल्या ,प्रत्यक्ष सहज घडणारी फक्त किंचीत लाउड वाटणारी अशी ....

अधिक उणे करता एकदा सर्वांनी पाहायला हरकत नाही पण केवळ कादंबरीचे संदर्भ घेउन पाहु नका भ्रम निरास होइल.
मोकळ्या डोक्यानी आणि मनाने पाहीला तर चित्रपट म्हणुन चांगला....

लेखातील अनेक वाक्ये आवडली.

(टिच्चून चित्रपटाचे परिचयात्मक लेख लिहिण्यामागील सातत्य, बिनधास्तपणा, हेही भावले).

(टिच्चून चित्रपटाचे परिचयात्मक लेख लिहिण्यामागील सातत्य, बिनधास्तपणा, हेही भावले) >>

Lol Happy

बेफीजी,
विपुत काही दिवसांपूर्वी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्या की....

प्रत्यक्ष पुस्तकात साईची बहिण श्रेयसवर मरताना रेखाटली आहे.>>>>>>>> श्रेयस वर नाही, दिग्यावर. तेच तर कारण असतं ना दिग्या आणि साईतल्या दुश्मनीचं !

बेफि + १
रिव्ह्यू आवडला.

शिणुमा कधी बघायला मिळेल माहीत नाही..

बरे झाले मी नाही पाहिला नाहीतर अनेक दिवस झालेत एखादा मराठी सिनेमा पाहावाच असे ठरवले होते कालच

काय हो रसप... चित्रपट पहायचा उत्साहच गेला की हो सगळा.. पुस्तक भन्नाट आवडलं होतं त्यामुळे मोठ्या उत्साहाने जाणार होते. पण आता जर कठीणच वाटतयं की ... Sad
तरीपण एका छानशा रीव्ह्यूसाठी धन्यवाद...

उद्या पहाणार आहे.... ह्या सिनेमाचा दिग्दर्शक संजय जाधव माझा शाळु सोबती. त्याने खास शाळेतल्या आमच्या बॅच साठी उद्या शो अ‍ॅरेंज केला आहे. काही कलाकार पण येणार आहेत.... उद्या पाहुन येते.... जमलं तर फोटो टाकीन उद्याचे....

कादंबरी वाचलेली नाही त्या मुळे पाटी कोरी आहे.... बघायचा तर आहेच... आमच्या मित्राचा ड्रिम प्रॉजेक्ट आहे.... बघुया.....

इकडे कोणाला फारसा आवडलेला दिसत नाहिये....

मी पहिला.....इतका पण वाईट नाही. रसप, तुम्ही जरा जास्तच लिहिलत. एकदा का होईना पण बघाच सगळ्यांनी. मला आवडला.

पात्रनिवड कॉलेजवयीन नाही हे तर नावावरुन कळतेच आहे. ८० चा काळ कसा उभारलाय ते बघावे लागेल मला. मी पण त्याच काळातला ना Happy

एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.

- हे लिहायचं राहून गेलं होतं.

दुनियादारी पुस्तक वाचल्यापासून त्याची भुरळ कायम राहिलेली आहे. सुशिंची मी फार कमी पुस्तके वाचली आहेत, आणि त्यामधे दुनियादारी अतिआवडीचं आहे. चित्रपटाचे प्रोमो पाहूनच कास्टिंग जाम गंडलंय हे वाटत होतंच. वरील रीव्ह्यूने त्यावर शिक्कामोर्तब केले.

घारूअण्णा, तुमचा रीव्ह्यू इथे आहे होय. अख्खी मायबोली शोधून काढली मी. Happy छान लिहिलंय.

चित्रपट पाहण्याचा योग इतक्या लवकर काही येणार नाहीच, त्यामुळे परत एकदा पुस्तकच वाचायला हवंय.

दुनियादारी पुस्तक, अल्फा टीव्हीवरची सिरियल दुनियादारी, अन् चित्रपट दुनिययादारी ह्या तिन्ही वेगवेगळ्या कलाकृती म्हणून पाहिल्या पाहिजेत. कादंबरीत / एखाद्या व्यक्तीरेखेत गुंतून गेलो तर तसं होत नाही.

कादंबरीतली शिरिन आणि प्रत्यक्ष सिरियल मधली शिरीन (म्हणजे शर्वरी) वाचून / पाहून शिरीन म्हणून सईने भुमिका चांगली रंगवली आहे. बाकी स्वजो ऐवजी उका ही चालला असता.

एकंदर शरीरयष्टी पाहून स्वजो तळवळकरां (कड) चा वाटत नाही. (चार सहा महिने तळवळकरांकडे गेला असता तरी चाललं असतं.) cinematic liberty जरा अजून चालली असती. एमके चं पात्र अजून खुलवून दाखवलेलं...

चांगली वाटली सिनेमाची ओळख.
पुस्तक आणि सिनेमा, दोन्ही पाहिलेले नाहीत, त्यामुळे नो कमेन्ट्स. पण 'वेस्पा' बद्दल सहमत आहे. "भाग मिल्खा भाग" मधेही मिल्खासिंग पाकिस्तानात चालवतो ती 'डेझर्ट स्टॉर्म' बुलेट दोन वर्षांपुर्वी मार्केटमधे आलेली आहे. खरं तर जुनी बुलेट मिळवणे अजिबात कठीण नव्हते. अशा चुका व्हायला नकोत सहसा.

ट्रेलर पाहूनच कळत. वाचलो!!!! दया येते थिएटर हाऊस्फुल्ल करणा-यान्ची.

आधि दिग्या म्हणून नार्वेकर माती खाऊन गेला, आता अंकुश... तरी बर भरत जाधवला नाही घेतला.
सिरीयल मधे तुषार कुलकर्णीने बट्याबोळ केला इथे स्वप्निल जोशी.

@मोहन की मीरा
माझ्या तर्फे संजय जाधव
ती कादंबरी इतकी ताजी आहे की आजच्या काळातही घडू शकते, मग बेल बॉटम वगैरे करून रेट्रोत नेण्याची काहीच गरज नव्हती.
दुसर म्हणजे मैत्री खातर भुमिका देऊ नका.

इथे मला मनिषा कोईरालाचा जानी दुश्मन आठवला.मनिषा अक्षयकुमार, सुनील शेट्टी वगैरे सगळे कॉलेज कुमार दाखवलेत.

एकंदर शरीरयष्टी पाहून स्वजो तळवळकरां (कड) चा वाटत नाही. (चार सहा महिने तळवळकरांकडे गेला असता तरी चाललं असतं....>>>>>>अनुमोदन
मला ठीकठाक वाटला चित्रपट...

ती कादंबरी इतकी ताजी आहे की आजच्या काळातही घडू शकते, मग बेल बॉटम वगैरे करून रेट्रोत नेण्याची काहीच गरज नव्हती. +१

दिग्या म्हणून नार्वेकर माती खाऊन गेला>>> असहमत!

उंची आणि बांधा म्हणून जरी तो योग्य नसला तरी दिग्याचा माज, मस्तवालपणा आणि आवाज त्याला करेक्ट जमलं होतं.

आणि आशुतोष कुलकर्णी पण बरा होता. स्वजोपेक्षा नक्कीच!

रसप रिव्यु चांगला आहे Happy

Pages