फसलेल्या 'कास्टिंग'ची पिचकवणी 'दुनियादारी' (Duniyadari - Marathi Movie Review)

Submitted by रसप on 20 July, 2013 - 02:53

कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.

तर होतं काय की, पुण्यात एक कॉलेज असतं. जिथे मुंबईहून एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा श्रेयस तळवलकर (स्वप्नील जोशी) शिकायला येतो. कॉलेजात आल्याबरोबर त्याला एक 'फॅक्ट चेक' मिळतो. कॉलेजचा प्रस्थापित दादा दिगंबर पाटील उर्फ दिग्या उर्फ डीएसपी (अंकुश चौधरी) व कॉलेजचा (की बाहेरचा हे नीट नाही) दुसरा एक स्ट्रगलिंग दादा साई देढगावकर (जितेंद्र जोशी) ह्यांच्या दुश्मनीत तो सापडतो. जो 'उसूल'वाला दादा असतो, त्याच्या म्हणजे अर्थातच दिग्याच्या बाजूने श्रेयस जातो आणि त्यांच्यात यारी होते.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. ही प्रेमप्रकरणं व भाईगिरी, ह्या सर्वांना बरीच दुनियादारी करायला लावते. ती काय काय आणि कशी कशी हे पुस्तकात किंवा चित्रपटात समजेल.

duniyadari.jpg

चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी कुणीही कॉलेजवयीन वाटत नाही. दिग्या आणि साई नापास होऊनही पडून असतात, असं जरी मानलं तरी बाकीच्यांचं काय ? स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो. काही कॅमेरा कोनांतून त्याने विग घातला असावा असाही संशय आला. सई ताम्हनकर जितके कमी व घट्ट कपडे घालते तितकी ती मराठीतली भक्कम सोनाक्शी सिन्हा वाटते. चित्रपट म्हाताऱ्या सईच्या फ्लॅशबॅकमध्ये घडतो. त्या वयस्कर शिरीनच्या भूमिकेत ती अधिक शोभते. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिकेत असल्याने त्याला किळसवाणा दाखवला असावा. तो तसा दिसतो. विचित्र वाढलेलं पोट, पिंजारलेले केस आणि ती ओठांवरून जीभ फिरवायची स्टाईल ह्या सगळ्यामुळे तिरस्करणीय साई व्यवस्थित उभा होतो. अंकुश चौधरी 'स्टाइलिश भाई'च्या भूमिकेत आणि उर्मिला कानिटकर कॉलेजवयीन तरुणीच्या भूमिकेत 'त्यातल्या त्यात' फिट्ट वाटतात. स्व. आनंद अभ्यंकर, उदय सबनीस, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी आणि नागेश भोसले छोट्या छोट्या भूमिकांत आहेत. फक्त दोन किरकोळ सीनमध्ये असलेला नागेश भोसले अक्षरश: पडदा खाऊन टाकतो. सुशांत शेलारला काहीच काम नाही.

शिरीन मेडिकलची विद्यार्थिनी दाखवलेली असताना ती ह्या दुसऱ्याच कॉलेजात का येत असते ? तिच्या आगमनाला ती फाडफाड इंग्रजी का झाडते ? ती काही परदेशातून वगैरे आलेली नसते !
तिला मेडिकलवाली दाखवण्याचं कारणच काय ? - हे चाणाक्ष प्रेक्षकाला कळायला वेळ लागत नाही. किंबहुना, ती डॉक्टर होणार असल्यामुळे तिचं कहाणीत अपरिहार्य असलेलं कर्तव्य ती जेव्हा करते, तेव्हा काहीच आश्चर्य वाटत नाही. खरं तर एक अंगावर येऊ शकणारा शेवट केवळ पिचकवणी सादरीकरण व पोकळ पटकथेमुळे फुसका बार निघतो.

श्रेयस मीनूला समजावतानाचा संवाद वगळता बाकी संवाद फक्त परिस्थितीजन्य निर्मिती असावीत असे वाटतात. द व्हेरी फेमस 'तुझी माझी यारी, तर #@त गेली दुनियादारी' हे मला तरी काही विशेष वाटलं नाही.

एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.
गाणी त्रास होणार नाही, इतपत श्रवणीय नक्कीच आहेत. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' चांगलं जमलं आहे. 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' हे फेसबुकमित्र मंदार चोळकरचं गाणंसुद्धा चांगलंच जमून आलं आहे.

मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. सुरुवातीच्या एका दृश्यात अंकुश चौधरीला धावताना पाहिल्यावर जाणवतं स्लिम-ट्रिम असला तरी ते पुरेसं नाही, इतकं ते कृत्रिम वाटतं. दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते. ओबडधोबड थकेल चेहरे आणि बेढब शरीरं ह्यांमुळे ही 'दुनियादारी' अस्सल वाटत नाही.

एकंदरीत, पिचकवणी सादरीकरण आणि पूर्णपणे वाया घालवलेला शेवट इतकंच अडीच तासानंतर लक्षात राहातं आणि वाटतं, नसता पाहिला तरी चाललं असतं.

रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/duniyadari-marathi-movie-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळेच कलाकार ८०च्या दशकात कॉलेजमध्ये होते, फक्त ते शूट करायला उशीर झाला. Lol

असो. सुशिंच्या लेखानाची आणि चित्रपटाची तुलना न करता बघा. बरं वाटेल.

शेवटी काय तुलना कराल तर कुठे इंद्राचा ऐरावत अन् कुठे शामभट्टाची तट्टाणी होणारच Happy

काल पाहिला.... कलाकारांच्या उपस्थितीत पाहिला... संजय होताच आर्थातच.... हा सिनेमा मैत्रीवर असल्याने संजयने आमच्या बॅच साठी खास शो मधे १०० तिकिटे ठेवली होती. आम्ही साधारण १०-१२५ जण जमलो होतो.

सिनेमा बद्दल

मला पहिला हाफ खुप आवडला.... काही प्रसंग खुपच मस्त खुलवले आहेत.( आम्ही १०० मित्र मैत्रिणी कालच्या शो ला हजर होतो... त्या मुळे आधीच आम्ही रेट्रो काळात पोहोचल्यामुळे..तो भाग नक्कीच आम्हाला जास्त भिडला) त्या काळातलं वातावरण असण्याची काहीच गरज नव्हती... विषय सध्याच्या कळालाही अनुरुप आहे. शेवट सॉलिड गंडला आहे. साधारण शिरीन च्या लग्ना पासुन सिनेमा प्रेडिक्टेबल होत जातो... कादंबरी फारच वेगळी आहे म्हणतात....

बाकी कलाकारात स्वप्निल जोशी काम मस्त करतो पण त्याच्या लुक्स वर त्याने काम करायला पाहिजे. अ‍ॅक्टर चं शरीर व चेहेरा हा त्याचा अ‍ॅसेट असतो. मग त्या अ‍ॅसेट्चा मेंटेनन्स व्हायला हवा ना!!!! अंकुश त्याच्या भुमिकेला योग्य न्याय देतो. तो दिसतो ही मुर्तीमंत दिग्या.... त्या काळातला अमिताभ श्टाइल दिग्या तो मस्त उभा करतो. उर्मिला सोडली तर कोणीच कॉलेज मधलं वाटत नाही. जितू जोशीचा "साई" उगाचच स्टायलीश केला आहे. मला सई ताम्हणकर अजिबात आवडत नाही. पण ह्या सिनेमात तिने जबरदस्त काम केले आहे. तिच्या अत्ताच्या कामांपैकी तिची ही उत्कृष्ट भुमिका म्हणावी लागेल. ती दिसते खुपच बल्जी... तिच्या ड्रेस डिझायनर ने मात्र जरा मेहेनत घ्यायला हवी होती. कारण त्या काळात पुण्या सारख्या शहरात एक गावच्या आमदाराची मॉड मुलगी जी मेडिकल ला आहे ती आजच्या काळातले कपडे घालताना दाखवली आहे. तेंव्हा स्लिव्ह्लेस होतं.. पण अगदी डीप किंवा एकदम सिंगल बंद वाले कपडे कोणी घालत नसत. तेही पुण्यात...बाकी सगळ्यांचे कपडे जमले आहेत... पण शिरीन चे मात्र!!!!! त्यात ती सिगरेट पिताना दाखवली आहे... जरा जास्त वाटतं......उर्मिला खुप सुंदर दिसते. वर्षा उसगावकरने "राणीमा" चा थंडपणा, निरुत्साह, आब चांगला दाखवला आहे. छोट्या भुमिकांमध्ये मोठ्या कलाकारांना पाहुन बरे वाटते.....नित्याचं काम करणारा कलाकार मस्त आहे....

बाकी टेक्निकली सिनेमा एकदम फ्रेश वाटतो... संजय स्वतः मूळात कॅमेरामन असल्याने, त्याने प्रत्येक फ्रेम जिवंत ठेवली आहे. त्याच्या आधीच्या सगळ्या सिनेमांपेक्षा हा सिनेमा दस पटीने उजवा आहे.... टिकटिक वाजते गाणं आणि मै जिंदगीका साथ निभाता... एकदम मस्त झाली आहेत.... एक मित्र म्हणुन संजय बद्दल अभिमान वाटतो. खरच येवढ्या कलाकारांची एकत्र मोट बांधणे कठीण आहे..... आपल्यातलाच एक मुलगा आज चांगला नावारुपाला आलेला पाहुन बरं वाटत...

बाकी सिनेमा हे असं प्रकरण आहे.. की त्या त्या काळाची ती गरज असते. माझ्या मुलीला हा सिनेमा आवडला, कारण रोमँटिक आहे ना.....माझ्या वेळेस शाळेत असताना शान, नसीब, धरम वीर, नगीना, बेताब, कयामत से कयामत तक.... हे सिनेमे अगदी आतुरतेने पाहिले... कॉलेजच्या वेळी दर शुक्रवारी मुलुंड्च्या जय गणेश थेटरात दर तीन दिवसांनी मॅटिनीला सिनेमा बदलत.... आम्ही कॉलेज बंक करुन त्या काळात अगणीत सिनेमे पाहिले.... आता परत जेंव्हा ते सिनेमा पहाते तेंव्हा त्या काळातल्या काही काही चॉइस बद्दल हसायला येतं.... शान आणि धरम वीर पाहुन "आई काय तुझा चॉइस ग..." असं म्हणुन मुलगी हसायला लागली.... पण तेंव्हा ते सिनेमे थोर वाटलेले.... त्या मुळे सिनेमाच्या आवडी निवडी बद्दल अपनी अपनी पसंद होती है......

माझी पोस्ट अगदी कोणीच वाचली नाही तरी चालेल... फक्त आणि फकत राग आणि निराशा व्यक्त करण्यासाठी ही पोस्ट मी लिहितेय... कोणाचं मन/ भावना वगैरे दुखावल्या गेल्यास आधीच क्षमस्व!
--------------------------
सुशिंची दुनियादारी पहायच्या अपेक्षेने जाताय??????
मग विचार करा... कारण पुर्ण सिनेमाभर "सुशिंची दुनियादारी केविलवाणी" झालेली पाहिला मिळालिये मला....
ज्याला कोणाला सिनेमा पाहिचाय त्याने एक प्रेमाचा त्रिकोण म्हणून पाहिला जा...
कारण या सिनेमात 'दुनियादारी' कुठेच दिसत नाही...
श्रेयस,प्रितम, शिरिन, राणीमाँ, नित्या, साई ( हा तर अक्षरशः किळसवाणा वाटावा असा आहे Sad ) आणि मुख्य म्हणजे एमके यातलं एकही पात्र समजून न घेता हा सिनेमा बनवला गेलाय..
सुशिंची एकही व्यक्तीरेखा यातल्या कुठल्याच पात्रात सापडत नाही. संपुर्ण सिनेमाभर मी त्यांना अतुरतेने शोधत होते
सुशिंच्या दुनियादारीला समजुन न घेता हा सिनेमा बनवला गेलाय.
इतक्या सुंदर कादंबरीची वाट लावली Angry
माझा मित्र ज्याने "दुनियादारी" वाचली नाहीये पण माझ्या तोंडून अनेकदा ऐकलीये त्यानेही "सिनेमा बेक्कारच म्हणावा की ग हा" असा अभिप्राय दिला. Sad
मी पुन्हा पुन्हा म्हणेन की असला सिनेमा बनवण्यापेक्षा बनवलाच नसता तर बर झालं असतं...
कादंबरी न वाचणार्‍यांनी एमके नावाच्या कोणाला लक्षातही ठेवू नये इतकं दुर्लक्षित आहे हे पात्र...

मुळ कथेत जे काही बदल केलेत ते पाहून तर माझा फक्त आणि फक्त संताप झालाय :रागः
शेवट तर इतका टिपिकल केलाय ना की या सिनेमाला "हा माझ्या लाडक्या आणि ज्या कलाकृतीवर माझं निस्सिमप्रेम आहे त्या दुनियादारी पासून बनवलाय" अस म्हणताना मलाच लाज वाटतेय Angry

संपुर्ण सिनेमात फक्त आणि फक्त दिग्या आणि मिनूच सुसाह्य!
लोणावळा ट्रिप ( माझ्या मते अशोकचं दुर जाणं आणि मिनू-श्रेयस- शिरिनचं जवळ येणं यास कारणीभूत असलेली महत्वाची ट्रिप) बाद केलीये सिनेमातून....

आणि शिरिनच्या लग्नातला प्रसंग तर... हे राआआआआआआआआआअम!
दुसरं काहीच म्हणू शकत नाही मी Sad

गाणीच आवडली फक्त Sad

सिनेमा फेल जाणारेय त्याची खात्री होतीच पण इतका तापदायक होणारेय याची अजिबात कल्पना नव्हती Sad

पुस्तक आणि सिनेमा दोन्हीत बराच फरक असतो नेहमीच. त्यामुळे दोन्ही वेगवेगळं ठेवून (मनात) मग पहावं. त्यातल्या त्यात शाळा सिनेमा हा कादंबरीजवळ जाणारा होता असं म्हणता येईल.

रिया तू पण???

मला आवडला....खरच सांगते, मला खूप आवडला. कदाचित मी 'दुनियादारी' वाचलेली नाही म्हणून असेल पण खूप छान होता ग....अजूनही त्यातले इमोशनल सीन आठवले कि रडू येत...आणि ते त्यातलं ते गाण....'देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाई...." खूप छान...मन, डोळे भरून येतात.

खरतर त्यानी 'दुनियादारी' वर बेतलाय हे म्हणायचच नाही. हा मनस्ताप नसता झाला.

चुकल तुषार नाही आषुतोष, तो दिसला बरा पण तेव्हढच त्याचा अभिनय अत्यंत वाईट होता.

आणि शिरीन म्हणून ती ' दादा ते आले ना!!!' भाव असलेली शर्वरी जेमनीस

कोण म्हणत????? नार्वेकरचा दिग्या चांगला होता म्हणून नीट वाचा कादंबरी किंवा परत एकदा सिरीयल बघा.
नार्वेकर चे बरेच किस्से आहेत त्या सिरीयल बुडण्याचे. त्याच्या अतिरंजीत अभिनयाने बटबटीत डोळे फिरवण्याने.... जाऊ दे मी का आज माझ रक्त तापवून घेऊ.
बर दिग्या हा Author backed रोल आहे तो कोणीही सहज करू शकेल इतका.

खरतर कादंबरी वाचतानाच ते सगळ आपण पहातो. मग याना प्रत्यक्ष पडद्यावर आणायला इतका त्रास का व्हावा?

संजय जाधवच्या cinematography आणि direction बद्दल कौतुक करावेसे आहेत त्याचे पुर्वीचे चित्रपट मग अस का व्हाव?
Overconfidednce

रिया ,
तुझा राग मी समजू शकतो . पण हे बर्याच चित्रपटाबाबत होत .
आमच्यासारख्या हॅरी पॉटर पंख्यानाही त्याचे मुव्हीज पाहताना तसच होत , महत्वाची पात्र नसतात , अनेक महत्वाचे प्रसंग वगळलेले असतात , अनेक गोष्टी . पण तरीही ते आवडणारेही लाखो लोक आहेतच की .
माझ स्वतःच वाक्य परत लिहितो , हॅपॉ बघून आल्यावरच .
"Watching HP movies is like watching T20 . It is entertaining , enjoyable ,,, but whatever it is , it is not cricket" Happy
So Chill madi Happy

"Watching HP movies is like watching T20 . It is entertaining , enjoyable ,,, but whatever it is , it is not cricket"

>> खरंय.. Happy

मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. >>>> अनुमोदन.

आता कादंबरी वाचायला हवी.

दुनियादारी पुस्तकाच्या नवीन आवृत्तीत सुशिंचं मनोगत आहे. त्यांनीही दुनियादारी सिरियला शिव्या घातल्यात. वरचं वाचून वाटतय की बरय ते सिनेमा पहायला नाही आहेत.

ते स्वजो ला स्वेटर घालून का फिरताना दाखवलंय? असाच मै हु ना मध्ये शारुकला गेटअप दिला होता. पण तो प्रौढशिक्षणासाठी(?) कॉलेजात अ‍ॅडमिशन घेतो म्हणून त्याचे वय जस्टीफाय होत होते.
आता मूळकथेत एवढे फेरफार केलेत तर थोडे अजून केले असते तरी चालले असते. Lol

रसप जी, स्वप्नीलने विग घातलेला आहे, हे तुम्ही अगदी बरोबर ओळखलंत.

स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो.>>>>>प्रचंड अनुमोदन....

पण तरीही, तुम्ही सई (शिरीन) बद्दल चुकीच लिहील आहेत.....तिचे पोषाख चांगले दाखवलेले आहेत.आणि तिचा अभिनयसुद्धा खूप भारी झालेला आहे.

"दिग्या म्हणून नार्वेकर माती खाऊन गेला>>> असहमत!

उंची आणि बांधा म्हणून जरी तो योग्य नसला तरी दिग्याचा माज, मस्तवालपणा आणि आवाज त्याला करेक्ट जमलं होतं.

आणि आशुतोष कुलकर्णी पण बरा होता. स्वजोपेक्षा नक्कीच!"

सहमत आहे. श्रेयस म्हणून कोवळा पण हुशार मुलगा दाखवायला हवा. आशुतोष चांगला वाटला.
दिग्या म्हणून नार्वेकर किंवा उपेंद्र लिमये.

वर हॅरी पॉटर चा उल्लेख झालाय म्हणून हरी पात्रेची जबरदस्त फॅन म्हणून सांगते. हे सर्व चित्रपट चांगल्या पद्धतीने बनवले आहेत. काही प्रसंग/पात्रे वगळली असली तरी जे दाखवलंय ते अतिउत्तम आहे. २०-२० मॅच असली तरी प्रचंड एक्साईटमेंट असलेली मॅच आहे. चित्रपटांचा आनंद कुठेही खंडीत होत नाही. सलग पाहिले की मूळ हॅपॉ पेक्षा वेगळी पण तिच्यातिच्यात परिपूर्ण अशी गोष्ट पाहायला मिळते. आणि पात्रे/कलाकार/सेट/कॉश्चुम सगळ्याचा आनंद मिळतो.

ते या चित्रपटात मिसलंय असं वरच्या पोष्टींवरून वाटलं. पुस्तक वाचालं आहे. चित्रपट आपली मराठी वर आला की बघू. पण पात्रांवरूनच बोअर वाटतोय. कास्टिंग जाम गंडलंय.

श्रेयस म्हणून श्रेयस तळपदे कदाचित बरा दिसला असता किंवा उमेश कामत.

हीच गोष्ट आजच्या कॉलेज लाईफमधे पण आणता आली असती.

पण हे ब-याच चित्रपटांबाबत होत .
आमच्यासारख्या हॅरी पॉटर पंख्यानाही त्याचे मुव्हीज पाहताना तसच होत , महत्वाची पात्र नसतात , अनेक महत्वाचे प्रसंग वगळलेले असतात , अनेक गोष्टी . पण तरीही ते आवडणारेही लाखो लोक आहेतच की .
माझ स्वतःच वाक्य परत लिहितो , हॅपॉ बघून आल्यावरच . "Watching HP movies is like watching T20 . It is entertaining , enjoyable ,,, but whatever it is , it is not cricket" >>>>>>> केदार जाधव पूर्ण अनुमोदन तुम्हाला...
मला तर वाटतं लोकांनी दुनियादारीवर पैसे व वेळ घालवण्यापेक्षा परत परत त्या पुस्तकाची पारायणे करावीत. आम्ही केला हो अपराध चित्रपट पहायचा, पण तुम्ही नका करू... लोकहो सल्ला ऐका आणि मनस्ताप टाळा. पुस्तकाची सर चित्रपटाला नाहीच. हॅपॉ असो किंवा दुनियादारी... चित्रपट सपशेल फसले. Sad

हरी पात्रेची जबरदस्त फॅन म्हणून सांगते. हे सर्व चित्रपट चांगल्या पद्धतीने बनवले आहेत. काही प्रसंग/पात्रे वगळली असली तरी जे दाखवलंय ते अतिउत्तम आहे. २०-२० मॅच असली तरी प्रचंड एक्साईटमेंट असलेली मॅच आहे. चित्रपटांचा आनंद कुठेही खंडीत होत नाही. सलग पाहिले की मूळ हॅपॉ पेक्षा वेगळी पण तिच्यातिच्यात परिपूर्ण अशी गोष्ट पाहायला मिळते. आणि पात्रे/कलाकार/सेट/कॉश्चुम सगळ्याचा आनंद मिळतो. >>

धनश्रीजी , प्रत्येकाच आपल आपल मत आहे , पण Harry Potter Movies Miss "The Soul" of the books .
Snape's story (which is the highest point of series according to me ) is wrapped up in couple of minutes . Those who haven't read books don't understand it at all . Dumbledore's character crisis are not at all shown , they are necessary to understand why he doesn't want Harry to go for Deathly hollows , this is just about the last movie (which actually was the best among them :))
There are so many things , even small ones e.g. Harry using Expalliarmus on Stanley rather than stunning him , have a lot larger meaning attached to them .
Now I am going away from point Happy
थोडक्यात , तुम्हाला त्या आवडल्या , चांगली गोष्ट आहे , पण पुस्तकांच्या मानाने त्या अगदीच सो सो आहेत अस मला वाटत . हेच दुनियादारी बद्द्ल ही होऊ शकत एवढच माझ मत .

प्रत्येकाच आपल आपल मत आहे , पण Harry Potter Movies Miss "The Soul" of the books .
Snape's story (which is the highest point of series according to me ) is wrapped up in couple of minutes . Those who haven't read books don't understand it at all . Dumbledore's character crisis are not at all shown , they are necessary to understand why he doesn't want Harry to go for Deathly hollows , this is just about the last movie (which actually was the best among them )
There are so many things , even small ones e.g. Harry using Expalliarmus on Stanley rather than stunning him , have a lot larger meaning attached to them .
Now I am going away from point
थोडक्यात , तुम्हाला त्या आवडल्या , चांगली गोष्ट आहे , पण पुस्तकांच्या मानाने त्या अगदीच सो सो आहेत अस मला वाटत . हेच दुनियादारी बद्द्ल ही होऊ शकत एवढच माझ मत .>>>>>>>

प्र चं ड अनुमोदन.

Pages