फसलेल्या 'कास्टिंग'ची पिचकवणी 'दुनियादारी' (Duniyadari - Marathi Movie Review)

Submitted by रसप on 20 July, 2013 - 02:53

कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.

तर होतं काय की, पुण्यात एक कॉलेज असतं. जिथे मुंबईहून एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा श्रेयस तळवलकर (स्वप्नील जोशी) शिकायला येतो. कॉलेजात आल्याबरोबर त्याला एक 'फॅक्ट चेक' मिळतो. कॉलेजचा प्रस्थापित दादा दिगंबर पाटील उर्फ दिग्या उर्फ डीएसपी (अंकुश चौधरी) व कॉलेजचा (की बाहेरचा हे नीट नाही) दुसरा एक स्ट्रगलिंग दादा साई देढगावकर (जितेंद्र जोशी) ह्यांच्या दुश्मनीत तो सापडतो. जो 'उसूल'वाला दादा असतो, त्याच्या म्हणजे अर्थातच दिग्याच्या बाजूने श्रेयस जातो आणि त्यांच्यात यारी होते.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. ही प्रेमप्रकरणं व भाईगिरी, ह्या सर्वांना बरीच दुनियादारी करायला लावते. ती काय काय आणि कशी कशी हे पुस्तकात किंवा चित्रपटात समजेल.

duniyadari.jpg

चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी कुणीही कॉलेजवयीन वाटत नाही. दिग्या आणि साई नापास होऊनही पडून असतात, असं जरी मानलं तरी बाकीच्यांचं काय ? स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो. काही कॅमेरा कोनांतून त्याने विग घातला असावा असाही संशय आला. सई ताम्हनकर जितके कमी व घट्ट कपडे घालते तितकी ती मराठीतली भक्कम सोनाक्शी सिन्हा वाटते. चित्रपट म्हाताऱ्या सईच्या फ्लॅशबॅकमध्ये घडतो. त्या वयस्कर शिरीनच्या भूमिकेत ती अधिक शोभते. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिकेत असल्याने त्याला किळसवाणा दाखवला असावा. तो तसा दिसतो. विचित्र वाढलेलं पोट, पिंजारलेले केस आणि ती ओठांवरून जीभ फिरवायची स्टाईल ह्या सगळ्यामुळे तिरस्करणीय साई व्यवस्थित उभा होतो. अंकुश चौधरी 'स्टाइलिश भाई'च्या भूमिकेत आणि उर्मिला कानिटकर कॉलेजवयीन तरुणीच्या भूमिकेत 'त्यातल्या त्यात' फिट्ट वाटतात. स्व. आनंद अभ्यंकर, उदय सबनीस, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी आणि नागेश भोसले छोट्या छोट्या भूमिकांत आहेत. फक्त दोन किरकोळ सीनमध्ये असलेला नागेश भोसले अक्षरश: पडदा खाऊन टाकतो. सुशांत शेलारला काहीच काम नाही.

शिरीन मेडिकलची विद्यार्थिनी दाखवलेली असताना ती ह्या दुसऱ्याच कॉलेजात का येत असते ? तिच्या आगमनाला ती फाडफाड इंग्रजी का झाडते ? ती काही परदेशातून वगैरे आलेली नसते !
तिला मेडिकलवाली दाखवण्याचं कारणच काय ? - हे चाणाक्ष प्रेक्षकाला कळायला वेळ लागत नाही. किंबहुना, ती डॉक्टर होणार असल्यामुळे तिचं कहाणीत अपरिहार्य असलेलं कर्तव्य ती जेव्हा करते, तेव्हा काहीच आश्चर्य वाटत नाही. खरं तर एक अंगावर येऊ शकणारा शेवट केवळ पिचकवणी सादरीकरण व पोकळ पटकथेमुळे फुसका बार निघतो.

श्रेयस मीनूला समजावतानाचा संवाद वगळता बाकी संवाद फक्त परिस्थितीजन्य निर्मिती असावीत असे वाटतात. द व्हेरी फेमस 'तुझी माझी यारी, तर #@त गेली दुनियादारी' हे मला तरी काही विशेष वाटलं नाही.

एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.
गाणी त्रास होणार नाही, इतपत श्रवणीय नक्कीच आहेत. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' चांगलं जमलं आहे. 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' हे फेसबुकमित्र मंदार चोळकरचं गाणंसुद्धा चांगलंच जमून आलं आहे.

मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. सुरुवातीच्या एका दृश्यात अंकुश चौधरीला धावताना पाहिल्यावर जाणवतं स्लिम-ट्रिम असला तरी ते पुरेसं नाही, इतकं ते कृत्रिम वाटतं. दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते. ओबडधोबड थकेल चेहरे आणि बेढब शरीरं ह्यांमुळे ही 'दुनियादारी' अस्सल वाटत नाही.

एकंदरीत, पिचकवणी सादरीकरण आणि पूर्णपणे वाया घालवलेला शेवट इतकंच अडीच तासानंतर लक्षात राहातं आणि वाटतं, नसता पाहिला तरी चाललं असतं.

रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/duniyadari-marathi-movie-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या वीकांताला दुनियादारी बघितला Happy
दुनियादारी येणार येणार अश्या बातम्या आल्यावर एकदा वाटले की पुस्तक काढून परत वाचावे... कारण आता फक्त शिरीन, दिग्या अश्या काही काही व्यक्तिरेखाच पुसटश्या आठवत होत्या!
पण एकंदरीत शाळाच्या अनुभवामुळे पुस्तक काढून वाचायचे टाळले आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून एकंदरीत बरेच केले असे वाटायला लागलेय.... कारण बहुतांशी कादंबरी वाचलेल्या/आठवणार्‍या प्रेक्षकांना चित्रपट फारसा भावला नाही असे दिसतेय!
कुठलीही कादंबरी वाचत असताना कळत न कळत आपल्या मनात त्याचा चित्रपट उभा राहीलेलाच असतो.... त्यातल्या व्यक्तिरेखा, त्यातले प्रसंग आपल्या मनाच्या कॅमेर्‍याने आपण आधीच बघितलेले असतात आणि त्याच्याशी विसंगत असे काहीच आपल्याला काहीही पटणारे/रुचणारे नसते.
शाळा जरी संकलन आणि पुस्तकातली खुमारी पोचवण्यात अपयशी ठरला असला तरी वातावरण निर्मिती आणि पात्रयोजना त्यात जमून आली होती. (मांजरेकर सर सोडून).. अरे हीच ती सुर्‍याची बिल्डींग, हाच तो जोश्या, सुर्‍या, फावड्या.. हीच हीच ती शिरोडकर असे झाले होते पण दुनियादारी यात मात्र खरच फसल्याचे जाणवतेय
बाकी स्टोरी, शेवट, वेग यादृष्टीने मला सिनेमा आवडला (कदाचित कादंबरी आठवत नसल्याने असेल्) पण तो काळ उभा करताना फारशी मेहनत न घेतल्याचे जाणवले.... ते पु ल देशपांडे उद्यानात चित्रीत झाले गाणे, सईचे कपडे आणि इतरही अनेक फ्रेम्स तर अगदी आजच्या कुठल्याही चित्रपटाइतक्या फ्रेश आहेत.
बाकी स्वप्नीलबद्दल वरती बरीच चर्चा झालीच आहे... त्याने काम बरे केले असले तरी तो त्या रोलला सुट अजिबात वाटत नाही.... तो त्या सुरेखाला छेडणार्‍या मुलाला समजावतो त्या प्रसंगात तर तो तडक मुंपुमुं किंवा एलदुगो तुन उठुन आल्यासारखा वाटतो... तीच स्टाईल्, तोच आवाज.... त्याला जरा जिमींग वगैरे करुन पटणेबल दिसता आल असत.... उलट चित्रपटाच्या प्रमोशन कँपेनमध्ये तो जास्त यंग आणि फ्रेश दिसतो... स्वेटर आणि वीगचा गेटअप त्याला अजुन वयस्कर बनवतो!
सईने काम चांगले केले असले तरी ती मोठी दिसते आणि त्याहुनही ती आजची दिसते.... ८०च्या दशकातली नक्कीच नाही!
जितु कितीही स्टाइल मारत असला तरी ती फुसकी वाटत राहते.... शेवटच्या लग्नाच्या प्रसंगात तर अजुनच!
अंकुशने काम बरे केले असले तरी दिग्याच्या व्यक्तिरेखेने जसे पडदा व्यापुन टाकायला हवा होत तसे होत नाही
काही काही संवाद मजा आणतात... चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही पण तो त्या काळाचा, खर्‍या दुनियादारीचा फील देत नाही... नक्कीच!

नाही... नाही.. अजिबात हा सिनेमा पहाणार नाही.
सु.शिं. चे 'दुनियादारी' हे शिवधनुष्य जगात कोणालाही पेलवणार नाही हे माझी प्रामाणिक मत आहे. अगदी योग्य त्या वयाचे, शरीरयष्टीचे चांगले कलाकार घेतले तरीसुद्धा पेलवणार नाही..
अगदी मागील वर्षीच पुस्तक पुन्हा वाचले आणि तेव्हापण ते तितकेच ताजेताजे वाटले. भावनांची ती रसायनं सिनेमात दाखवता येणे अशक्य आहे.

काल रात्री मी चित्रपट पाहिला. दिग्दर्शक-पटकथा लेखकांचा सिनेमा बनवताना असलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा जरी १०० टक्के मान्य केला तरीही मला स्वतःला न पटलेल्या / खटकलेल्या चित्रपटातील गोष्टी -

१. मुळ पुस्तकामधील शिरीन व प्रितम (पटेल) ही तसेच मिनु (मकवाना) यांना विनाकारण ओढून-ताणून मराठी बनवले आहे. त्यातल्या त्यात मिनु इनामदार एकवेळ ठीक आहे, पण उगाचच पोलिस इन्स्पेक्टरची मुलगी म्हणजे जास्तीच जुळवा-जुळव वाटते.

२. त्यातील अजिबात न पटणारी गोष्ट म्हणजे शिरीन व साईचे जमवलेले लग्न म्हणजे तर खूपच कहर झाला आहे. त्यामुळे शेवटी ते लग्न मोडून शिरीन व श्रेयसचे लग्न होणे हा तद्दन बाजारुपणा वाटतो. कारण कट्टा गँग व साईची गँग यातून विस्तवसुध्धा जात नसतो तर शिरीन त्याच्याशी ठरलेले लग्न कट्टा गँगपासुन कसे काय लपऊन ठेऊ शकते? त्यामुळे या पेक्षा मुळ कादंबरीप्रमाणे शिरीनचे लहानपणीच लग्न ठरलेले दाखवले असते तर ते जास्ती वास्तववादी झाले असते व तीच्या होणार्‍या नवर्‍याला जास्ती उदात्त / प्रगल्भ दाखऊन तो आपण होऊन शिरीन - श्रेयसच्या मार्गातुन बाजुला होतो किंवा त्याला अ‍ॅक्सिडेंटमध्ये गेलेला दाखऊन शिरीनच्या जीवनात आलेली पोकळी पाहून श्रेयस मिनुकडे न जाता शिरीनकडे जातो असे दाखवता आले असते.

३. कारण मुळात दिग्या व साई हे दोघेही लहानपणापासुनचे मित्र असतात. साईच्या बहिणीमुळे (शशिकला देडगावकर, जी दिग्यावर एकतर्फी प्रेम करीत असते पण दिग्या तीला मित्राची बहिण या नजरेने कायम पहात असतो, त्यातुन शशिकला दिग्यावर अतिप्रसंगाचा आळ गेते व दिग्या व साईमध्ये दुष्मनी पैदा होते, हा महत्वाचा संदर्भ दाखवलाच नाही आहे.

४. तसेच वर रियाने लिहिल्याप्रमाणे कट्टा गँगच्या जोड्या जमणे / गँग घट्टपणे जवळ येणे तसेच अश्क्याचे गॅगपासुन दुरावणे जास्ती मनाला पटले असते. लोणावळा ट्रीपचा संदर्भ यायला हवा होता.

५. पिक्चरचा शेवट कादंबरीप्रमाणे शोकांतिका दाखवून सुहास शिरवळकरांना अभिप्रेत असलेली "दुनियादारी" अधिक इफेक्टीव्हली दाखवता आली असती.

६. बाकी सिनेमाच्या टेक्निकल बाबींबद्द्ल - सिनेमॅटोग्राफी उच्च दर्जाची (नेहमीप्रमाणे), सिनेमाचा वेग योग्य राखला आहे, पण आवाजाची क्वालिटी खराब वाटली त्यामूळे संवाद नीट कळत नव्हते. (कदाचित त्या थियेटरचा लोकल प्रॉब्लेम असेल).

ती पई जाम्हणकर तर एखाद्या पोर्न स्टार सारखीच दिसते. म्हात्रे ब्रिजवरील पीताम्बरी अपार्टमेन्ट प्रकरणामुळे तर अधिकच...

ती पई जाम्हणकर तर एखाद्या पोर्न स्टार सारखीच दिसते>>>>>>>>. तिचे काही फोटोही आहेत नेट वर तसे....चेहरा नाही बरा तर बाकीचे प्रदर्शन करा.........

ती पई जाम्हणकर तर एखाद्या पोर्न स्टार सारखीच दिसते >>
शिव शिव!!
आता गुगल केलं तर काय भयानक फोटू आले. वाटलं नवत ही पोरगी अशी निघेल. Sad

रिया@: मला तुझा राग आलाय....का वाचायला लावलीस मला ती 'दुनियादारी'??
खालील मजकूर सु.शी.प्रेमींनी वाचू नका....

_______________________________________________________

इतर सगळ्यांशी असहमत आहे मी. 'दुनियादारी' पुस्तक विकत घेऊन वाचण्यासारख
अजिबात नाही. त्यापेक्षा चित्रपट खूपच छान आहे, असं माझ ठाम मत बनल आहे.

पुस्तकातलं एकही पात्र मला पटलेलं नाही...आणि आवडण तर लांबची गोष्ट आहे.
हे पुस्तकं वाचल्यावर काहीही चांगलं, दर्जेदार साहित्य वाचल्याचा अनुभव येत नाही.

_______________________________________________________

एक प्रामाणिक सल्ला :

'दुनियादारी' अजून वाचल नसेल तर वाचण्याचा विचारही करू नका....
चित्रपट मात्र नक्की पहा...आणि कुठलाही इतर संदर्भ न ठेवता आणि इतरांचे 'रिव्हू' आणि मते न वाचता.

इतर सगळ्यांशी असहमत आहे मी. 'दुनियादारी' पुस्तक विकत घेऊन वाचण्यासारख
अजिबात नाही. त्यापेक्षा चित्रपट खूपच छान आहे, असं माझ ठाम मत बनल आहे.

Happy

पुस्तकातलं एकही पात्र मला पटलेलं नाही...आणि आवडण तर लांबची गोष्ट आहे.
हे पुस्तकं वाचल्यावर काहीही चांगलं, दर्जेदार साहित्य वाचल्याचा अनुभव येत नाही.

>> Happy
_______________________________________________________

एक प्रामाणिक सल्ला :

'दुनियादारी' अजून वाचल नसेल तर वाचण्याचा विचारही करू नका....
चित्रपट मात्र नक्की पहा...आणि कुठलाही इतर संदर्भ न ठेवता आणि इतरांचे 'रिव्हू' आणि मते न वाचता.

>> Happy

पसंद अपनी अपनी Happy
तुम्हाला सांस बहू मालिका आणी बडजात्यापट जाम आवडत असणार अस मात्र वाटतय .

तुम्हाला सांस बहू मालिका आणी बडजात्यापट जाम आवडत असणार अस मात्र वाटतय .>>>>>>अजिबात नाही. मस्करी करू नका...मी चिडलेली आहे.

तुम्हाला सांस बहू मालिका आणी बडजात्यापट जाम आवडत असणार अस मात्र वाटतय.
>>

वाटतय?? अहो अगदी प्रिय आहेत त्या.

शेवटी हा सिनेमा "झी" ची निर्मिती आहे म्हटलं, आवडणारच की वो

हो त्यांना आवडतातच!
तु तिथं मी वगैरे टाईप्स Proud

मधुरा! कायेना.......
काही असतात ना....
रोज रोज पेपरमिंटच्या (पोलोच्या) गोळ्या खातात... मग त्यांच्या जीभेची चव जाते
मग त्यांना डेअरीमिल्क द्या किंवा पुरणपोळी द्या.... चव लागतच नाही...
मग ते म्हणतात पुरणपोळी चांगली नाही लागत.....

काय करणार अशांपुढे...!

शेवटी तेच आवड (???) आपली आपली!

मला आता अजून चर्चा करायची नाही यावर.....माझ्यासाठी हा विषय इथेच संपला...आता मी या विषयावर काही बोलू इच्छित नाही.

काय मूर्ख लोकं आहेत ते झीवाले. एवढ्या फालतू पुस्तकावरून सिनेमा बनवलाय त्यांनी. अजिबात अक्कल नाही त्यांना. Light 1

मधुरातै, आपल्यामते "चांगलं, दर्जेदार" साहित्य कुठलं असावं बरे???

नंदिनी, काय तू ...
अस कस विचारतेस?
राधाही बावरी, एलदुगो,तुतिमी वगैरेंच्या कथा दर्जेदार असतात

पुस्तक कसे पण असो, पण कास्टिंग मध्ये सिनेमा गंडलाय हे मान्य करावे लागेल.

रच्याकने,
हाऊसफुल सिनेमा बरोबर पुस्तकाचापण खप वाढलाच असणार.

काल च सिनेमा बघितला, खूप केविलवाणा बनलाय. नवर्याला आणि साबा, साबूंना मोठ्या आशेने घेवून गेले होते...फूल टू पोपट झाला....
बेल बॉटम वगैरे दाखवले म्हणजे रेट्रो लूक झाला का? सई चे कपडे ८० च्या दशकातले अजिबात नाही वाट्ले. कोण एम ए करतय , कोण एम कॉम तर कोण मेडीकल ला. का करतात काहीच माहीत नाही.
आमदरांची मुलगी ३० वर्षांपुर्वी एवढी मॉड आणि फॉर्वर्ड? नाव पण शिरीन का? सिगरेट ओढणारी आणि स्वतंत्र व्यक्तीमत्व असणारी मुलगी शुल्लक कारणासाठी साई शी लग्न करायला तयार होते हे पटतच नाही. मुलगी तिच्या भावाचा डायलॉग "हम भी सस्ती चिजों का शोक(टायपो) नही रखते " एक्दमच हास्यास्पद वाटले.
सई साडीत भयानक दिसते. त्यातल्या त्यात अंकुश च बरा वाटतो.
माझ्या ज्या मित्र मैत्रिणिंना सिनेमा आवडला त्यांचे मनापासून कौतुक वाटतेय...

माझ्या ज्या मित्र मैत्रिणिंना सिनेमा आवडला त्यांचे मनापासून कौतुक वाटतेय...>>>>>>>. खरच...आणि मला तो नाही आवडला तर मला मुर्ख ही समजलं जातंय......मराठी मुव्ही आहे तर तो आवडलाच पाहिजे....पण जे खरच चांगले मराठी मुव्ही आहेत त्यांना इतकं कौतुक का मिळत नाही?????

माझ्या ज्या मित्र मैत्रिणिंना सिनेमा आवडला त्यांचे मनापासून कौतुक वाटतेय...>>>>>>>. खरच...आणि मला तो नाही आवडला तर मला मुर्ख ही समजलं जातंय......>>

अगदी अगदी !!
मी जितका ह्या सिनेमाला आठवतो, तितका तो मला अधिकाधिक भंकस, बंडल, टुकार, डब्बा, फडतूस, फुटकळ, बिनडोक.. वगैरे वगैरे वाटतोय ! Sad

साला.... आपल्याच डोक्यात काय तरी केमिकल लोच्या झालाय ! दुनिया तर पागल झालीय 'दुनियादारी' पाहून ! Uhoh

साला.... आपल्याच डोक्यात काय तरी केमिकल लोच्या झालाय ! दुनिया तर पागल झालीय 'दुनियादारी' पाहून !>>> राईट्ट !!! काल पण हाऊसफूल होता. लोक बरच एन्जॉय करत होते....

दुनिया पागल नाही झाली...... ज्यांनी ज्यांनी पुस्तक वाचले आहे ते गेलेत बघायला आणि ज्यांनी पुस्तकाची स्तुती ऐकली आहे ते सुध्दा गेले बघायला........ज्यांनी काहीच वाचले नाही ते जाउन आले

या ३ ही प्रकारच्या लोकांनी १ च वेळा बघितला.....आणि शिव्या घालुन बाहेर आलेत Biggrin
.
.
त्यातल्या त्यात ज्यांना स्वतःचे पैसे गेल्याचे दु:ख आहे ते आपला राग सगळ्यांना सांगुन काढत आहेत

आणि ज्यांना पैसे वाया गेल्याचे दु:ख आहे .. पण आधीच तोंडभरुन चित्रपटाची वारेमाप तोंडफाटोस्तर स्तुती केली अश्यांना ..राग जाहीर पणे व्यक्त करता येत नाही...:खोखो: ........मग ते खोटी खोटी स्तुती करत सर्वत्र फिरत आहेत ..:खोखो:

Pages