भोकराचे लोणचे (फोटोसह)

Submitted by सारीका on 1 May, 2013 - 03:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

७०० ग्रॅम घट्ट आंबट कैरीचा किस (मोजून घेतला आहे)
सव्वा किलो बी काढलेली भोकरं
१२५ ग्रॅम मीठ
१०० ग्रॅम लोणच्याचे तिखट (बेडगी किंवा चपाटा मिरचीचे)
५०० मिली ग्रॅम शेंगदाणा तेल (रिफाईंड तेल हवे, मी फॉर्चून कंपनीचे वापरते)

फोडणीचे साहीत्यः

५०० ग्रॅम तेलातीलच एक वाटी तेल

२ चमचे मोहरी

१ चमचे जिरं

२ चमचे तिळ

१ चमचा मिरचीचे बी

१ चमचा मेथी हळकुंडची भुकटी (खमंगपणासाठी)

खमंगपणासाठी:
एका मध्यम आकाराच्या हळकुंडाचे बारीक तुकडे करुन घ्यावेत सोबत २ चमचे मेथीदाणे घेऊन थोड्या तेलात हे दोन्ही जिन्नस तळावेत, थंड झाल्यावर बारीक पूड करावी. ( हळकुंडाच्या आकारानुसार मेथीदाणे किती घ्यायचे ते ठरते.)
हे मिश्रण कोणत्याही लोणच्यात वापरता येते त्याने खमंगपणा वाढतो.

क्रमवार पाककृती: 

१) कैरी धुवून पुसून चांगल्या कोरड्या करुन घेणे, नंतर कैरीची साले काढून किसून घेणे.
मी मोजून ७०० ग्रॅम किस घेतला आहे.

२) भोकरं पाण्यात बुडवून कोरडी करुन घेणे. पाण्यात बुडवताना भोकराच्या मागचा देठ निघणार नाही याची काळजी घ्यावी, भोकरात पाणी गेले तर ती वाया जातात.

पाण्यातून काढुन कोरडी होण्यासाठी ठेवलेली भोकरं
mail.jpegmail-1.jpeg

३)गॅसवर कढई तापत ठेऊन त्यात वरील ५०० ग्रॅम तेलातील एक वाटी तेल टाकावे, तेल चांगले तापल्यावर आच कमी करुन मोहरी टाकावी, मोहरी तडतडल्यावर जिरे, मिरची बी आणि तिळ टाकून गॅस बंद करावा.
फोडणी पुर्ण थंड करुन घ्यावी.

४) एका पातेल्यात कैरीचा किस घेऊन त्यात मीठ, तिखट, आणि एक चमचा मेथीदाणे हळकुंडाची पावडर टाकून चांगले कालवून घ्यावे.
या मिश्रणात वरील थंड झालेली फोडणी टाकून पुन्हा चांगले कालवावे.

मिश्रण असे दिसेल.
mail-8.jpeg

५) भोकरातील बिया मिठाचे बोट लाऊन काढुन घ्याव्यात.
mail-2.jpegmail-3.jpeg

बी काढलेले भोकर
mail-4.jpeg

६) बी काढलेल्या भोकरात थोडा वर बनविलेला कैरीच्या किसाचा मसाला भरणे.

भोकरात मसाला भरताना

mail-5.jpeg

मसाला भरलेलं भोकर
mail-6.jpegmail-7.jpeg

७) भोकरामधे मसाला भरुन झाल्यावर उरलेला मसाला वरुन टाकून लोणचे कालवून घ्यावे.
आता ५०० मिली मधले उरलेले कच्चे तेल टाकून लोणचे हलक्या हाताने मिक्स करणे.

मसाला आणि कच्चे तेल टाकून कालवलेले लोणचे
mail-9.jpeg

८) दोन दिवसांनी काचेच्या बरणीत भरून ठेवावे.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

१) कैरीमधे किती गर आहे त्यावरून प्रमाण कमी जास्त होते, त्यामुळे शक्य झाल्यास ७००ग्रॅम किस मोजून घ्यावा.

२) भोकरं मिठाच्या बोटाने काढल्याने मसाल्यात मीठ चव बघुन घालावे.

३) मी भोकर खलबत्त्यात ठेऊन त्याला एक ठेच दिली, साबांनी मिठाच्या बोटाने बिया काढल्या, त्यामुळे भोकर अखंड राहीले.

४) भोकराच्या लोणच्यात भोकरं पुर्णपणे बुडतील असे तेल असावे, त्यामुळे लोणचे टिकते.
एक जरी भोकर वर असेल तर लोणच्याला लवकरच बुरशी लागते.
त्यामुळे गरज वाटल्यास अजुन तेल वापरावे.
तेल कच्चेच हवे.

५) जर तेल जास्त वापरायचे नसेल तर लोणचे फ्रीज मधे ठेवावे.
फ्रिजमधे लोणचे वर्षभर किंवा त्याहुनही जास्त टिकतं. भोकराचा करकरीतपणा पण तसाच राहतो.

बरणीत भरल्यावर असे वरुन तेल दिसले पाहीजे. Happy
mail-10.jpeg

लोणचे तयार Happy

mail-11.jpeg

माहितीचा स्रोत: 
अर्थातच सासुबाई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारीका, आमच्या कॉलनी मधे भोकराचे झाड आहे, लहानपणी पिकलेली भोकरे खूप खाल्ली आहेत. चिकट असतात पण आम्ही मुले आवडीने खायचो.

मस्तच!

गेल्यावर्षी इथे इंग्रो. त भोकरं मिळाली होती. त्यामुळे कैरी, भोकरे असे लोणचे घातले. यावर्ष्री भोकरे मिळाली नाहीत म्हणून फक्त कैरीचेच लोणचे.

या पध्दतीने लोणचे करण्यात आलेले आहे. जबरी झालंय. पध्दत थोडी बदलली.

तेल तापवुन त्यामधे मोहरी व हिंग घातला. ते थोडा वेळ थंड झाल्यावर त्यात प्रविणचा लोणचे मसाला, तिखट, मीठ व किसलेली कैरी घातली. भोकरातील बिया सुरीने काढल्या. त्यामधे ते मिश्रण भरले व लोणचे तयार. Happy नंतर परत एकदा त्यात पध्दतीने फोडणीचे फक्त तेल घातले.

मस्तच लागतं हे लोणचं !

आई कराते बहुतेक दर उन्हाळ्यात पण वर्षभराचं नाही. महिनाभर टिकेल एवढं करते अन एका भोकराचे २ भाग करून मग लोणचे घालते. मसाला भरायची कट२ नाही!

आमच्या गावी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातुन लागतील तितकी भोकरे मिळत असत, आई नेहेमी घालत असे ह्याचे लोणचे, माझे अतिशय जास्त प्रिय लोणचे ..... आमच्या कडे एकदा एक अमेरिकन आला होता, बाबां सोबत रोटरी क्लब मधल्या एक्स्चेंज प्रोग्राम मधुन ३ महिने, त्याला हे लोणचे " देसी वाईल्ड ऑलिव्ह पिकल" लैच आवडले होते, जाताना आईकडुन बनवुन घेऊन अर्धा किलो नेले होते मेल्याने!!! Biggrin

मी दोनदा केले हे लोणचे. गेल्या वर्षी बाजारात भोकरे दिसलेली ती पाव किलो आणून थोडे लोणचे करून पाहिले. भोकरांच्या चिकटपणामुळे लोणचे फसेल की काय ही भीती वाटत होती पण तसे काहीही न होता लोणचे चांगले झाले पण लगेच संपले.

यावर्षी निरुनी त्यांच्या शेतातली भोकरे दिली. साधारण किलोभर भोकरांचे लोणचे घातले. एकेक भोकरातली बी काढणे हे जाम कटकटीचे काम आहे, मिठाच्या बोटाने जरी बी काढली तरी बोट खूप चिकट होते.. तेल अजिबात गरम न करता कच्चेच वापरले. लोणचे अजूनही चांगले आहे, भोकरे तशीच मस्त करकरीत लागतात, कैरी मात्र नरम पडलीय. मी लोणच्यावर तरंगेल इतके तेल घातले नाहीय म्हणून बरणी फ्रीजमध्ये ठेवलीय. तार वगैरे सुटलेली नाही.

एकेक भोकर फोडून बी काढा व त्यात कैरी मसाला भरा हे काम खूप लेबर इंटेनसिव्ह असल्यामुळे हे लोणचे बहुधा बाजारात मिळत नाही. पण हा इतका खटाटोप सत्कारणी लागतो.

Pages