स्त्री-भ्रूण हत्याच बरी!

Submitted by भानुप्रिया on 29 December, 2012 - 05:59

चला, दिल्ली सामुहिक बलात्काराची बळी ठरलेली ती मुलगी अखेर गेली.

सुटलीच, नाही का?

ती ही सुटली अन आता तिचा मृत्यूच झालेला असल्यामुळे कदाचित हा विषय मागे पडून तिचे दोषी असलेले ते काहीजण सुद्धा सुटतील. किंवा होईल त्यांना शिक्षा, ३-७ वर्षांच्या सक्त-मजुरीची. मग ते पुन्हा बाहेर येतील आणि कदाचित एखाद्या अशाच संध्याकाळी आपल्या लिंग-पिसाट वृत्तीसमोर शरणागती पत्करून आणखीन एका "अमानत" वर/मध्ये 'मोकळे' होतील.

मग आपण परत निषेध व्यक्त करू, निदर्शनं करू, सरकारला शिव्या घालू, सरकार हिजडं आहे अशी आपली मौलिक प्रतिक्रिया सुद्धा देऊ. मग काय, बहुधा, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

हा बलात्कार इतका रानटी, निर्दयी, पाशवी होता म्हणून ह्याची निदान दखल तरी घेतली गेली, नाहीतर दर दिवशी शेकडो मुलींवर बलात्कार होतातचेत, पण आपला "आतला आवाज" काही जागा होत नव्हता.

खरंच, आज ना मला कुठले statistics मांडावेसे वाटतायत न कुठले दाखले द्यावेसे वाटतायत. माझा आजचा सूर खूप निराशावादी वाटेल तुम्हाला कदाचित, पण खरंच सांगते, विश्वास ठेवावा असं कारणंच उरलं नाहीये!

कारण हे सगळं घडत असताना, हे निषेध वगैरे व्यक्त होत असताना सुद्धा रोजच्या पेपरमध्ये किमान ५-६ बातम्या ह्याच प्रकाराताल्या होत्या. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विवाहितेवर अत्याचार, वृद्धेची विवस्त्र धिंड, लग्नाच्या आमिषाने बलात्कार, नवरा, दीर, भाऊ, बाप, सासरा, मित्र, सहकारी, अनोळखी, प्रतिष्ठित आणि इत्यादी ह्यांच्यापैकी नक्की कोण विश्वासार्ह आहे? खात्रीशीर रित्या नाही न सांगता येत? जर ही सुद्धा अधोगती नसेल, आणि अजूनही आपला आणि आपल्या civilization चा शेवट जवळ आलेला नसेल, तर आपण ह्या पुढे आणखी किती काय काय भोगणार आहोत ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही.

स्त्री ची अब्रू तिच्या लैंगिक अवयवांवर मोजली जाते, ते तिने किती नीट प्रकारे लपवून/सांभाळून ठेवलेत ह्यावर जोखली जाते. पुरुषाला मग बहुधा अब्रू वगैरे संकल्पना लागू होत नसाव्यात. किंवा होत असल्यात तरी फार लक्ष देण्याइतक्या महत्वाच्या नसाव्यात त्या. पुरुषाला हवी त्या क्षणी, हवी त्या पद्धतीने आणि हवी तिथे त्याची लैंगिक भूक शमवण्याची परवानगी कोणी दिली? कोणीच नाही, पण ती नाकारली ही नाही ना कोणी! म्हणजेच, एका अर्थी, समाज पुरुषाला हवं तसं वागण्याची मोकळिक देतोचे ना? म्हणजेच, समाजाचा एका अर्थी पुरुषांच्या ह्या स्वैर वागणुकीला पाठींबा आहे, अप्रत्यक्षरीत्या असेल कदाचित!अर्थात, हे सगळे माझे interpretations आहेत, तुम्हाला अमान्य असतील हि कदाचित, पण असो.

आज हि घटना समोर आली म्हणून, नाहीतर आपणही "रोज मरे त्याला कोण रडे" करून गप्प बसलो होतोच की!

बलात्कार झाला कि त्याचा दोष स्त्रीच्या माथी मारून लोकं मोकळी होतात. पण एका so called सुसंस्कृत समाजात स्त्रीला तिला हवं तसं वागण्या-बोलण्याचे, हिंडण्या-फिरण्याची, पेहराव करण्याची मोकळिक नाहीये का? आणि हा तोच समाज आहे जो पुरुषाला ही सगळी मोकळिक देतो. भर रस्त्यावर पुरुषाने लिंग-प्रदर्शन मांडलं तरी लोकं हसून निघून जातात, उद्या स्त्रिया topless हिंडल्या तर अशीच प्रतिक्रिया देऊ शकेल का हा समाज? नाही ना? रस्त्यावरची प्रत्येक स्त्री हि आपली मालकी हक्क असलेली "स्थावर-जंगम मालमत्ता" आहे असा समज का करून घेतलाय पुरुषांनी?

सगळ्या पुरुषांना घालून-पाडून बोलायचा हेतू नाहीये माझा, पण स्त्रीला कमी लेखणार्या, तिच्यावर शारीरिक, मानसिक, भावनिक इत्यादी प्रकारची जबरदस्ती करणाऱ्या प्रत्येकाला उद्देशून हे नक्की लिहिलंय मी.

जन्माला आलेली मुलगी एक दिवसही सुरक्षित राहु शकेल ह्याची शाश्वती आहे कुठे? बलात्कार करायला ६ महिन्यांच्या मुली सुद्धा चालतात ह्या पशुंना. मग ह्या पेक्षा खरंच स्त्री-भ्रूण हत्या बरी नाही का? मी एक स्त्री आहे, त्यामुळे ह्या असल्या पाशवी प्रकाराचे पुरस्कर्ती नाहीये मी. पण जिथे जन्माला आल्यानंतर त्या जन्माची शिक्षा भोगावी लागणार असेल, तिथे जन्म न घेतलेला काय वाईट आहे?

अनामिके, तू सुटलीस, पण खरं सांगू? मुक्त होऊ नकोस, त्या प्रत्येकाला झपाट ज्याचा मेंदू कमरेखाली आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनाली मुखर्जी केस मधे अ‍ॅसिड फेकलेल्यां पैकी एका राक्षसाच वय १८ खाली होतं म्हणून किरकोळ शिक्षा भोगून तो सुटला आणि मजेत जगतोय , इतर तिघेही सुटलेच आहेत सो कॉल्ड शिक्षा भोगून !
सोनालीची अवस्था अजुनही भयंकर आहे !
बाकी या दुर्घटने विरुध्द आंदोलन करणे , निषेध नोंदवणे प्रकारातले सुध्दा अनेक लोक हे 'स्त्रियांनी धड वागायला शिका , लो वेस्ट जीन्स घालणार्या मुलीं मुळे किंवा तोकडे कपडे घालण्याने वातावरण प्रदुषित होते - लोणी विस्तव इ. उपमा देणारे किंवा अशा विचारांशी सहमत आहेत त्यामुळे त्यांनी स्त्रियांचा आदर वगैरे ची भाषा करणे कशालाच काही अर्थ नाही !

आगाऊ, नीधप आणि अजय जवादे,

>> इट्स अ‍ॅज सिकनिंग अ‍ॅज द इन्सिडन्स >>>>>>

प्रेत नेले का उपचाराकरता नेले हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे कारण ती मुलगी वाचावी हि सगळ्यांची प्रामाणिक इच्छा होती कारण ती मुलगी भारतमातेचे प्रतिक बनली होती ! (कांग्रेस सोडुन - कारण त्यांना हे प्रकरण संपते कधी बासनात जाते आणी जनता परत कधी आंधळी होते यातच जास्त रस आहे)

जे लोक या चर्चेला सिकनिंग म्हणताहेत त्यांच्या माणुसकिबद्दलच मला शंका वाटते!

उदय तसेच इथे सहभागी झालेले सर्व सदस्य....

'कायद्या'चा मुद्दा असातसा छेडला गेला आहेच, तर त्या अनुषंगाने लिहित आहे. खटला चालू झाला की एक संतापजनक बाब अनुभवायास मिळते म्हणजे अशा प्रकरणातील सरकारी वकिलाकडून [तसेच पिडित स्त्रीची मेडिकल तपासणी करणार्‍या सरकारी इस्पितळातील तज्ज्ञ म्हणविल्या जाणार्‍या डॉक्टर्सकडून] पोलिसांनी पकडलेल्या गुन्हेगारांवरील आरोप सिद्ध करण्यामध्ये होणारा हलगर्जीपणा.

अशाच पद्धतीच्या नव्हे तर अन्य कलमाखाली चालत असलेल्या विविध सिव्हिल तसेच क्रिमिनल केसीसचा मी या ना त्या कारणास्तव पाठपुरावा करीत असतो [मी व्यावसायिक वकील नाही, पण अभ्यास आहे...सरकारी नोकरीतील कामकाजास्तव शिकावे लागले].....तेव्हा मला हे प्रकर्षाने जाणवत राहिले आहे की, सरकारी वकील खूप वेळा पाट्या टाकणेच काम करताना दिसतात. अपवाद असतीलदेखील...श्री.उज्ज्वल निकम यांच्यासारखे....पण बहुतांशी निराशाच दिसत्ये सर्वत्र....नेमका हाच फायदा आरोपीनी भरभक्कम फीज् देऊन नियुक्त केलेले वकील घेतात.

"उलटतपासणी" हा भयंकर चीड आणणारा प्रकार असतो आणि त्यावेळी साक्षीदार कोलमडूनच पडतो.....काही उदाहरणे दिली असती इथे, पण इथल्या महिला वर्गाला ते वाचून भोवळ येण्याची साधार भीती वाटते म्हणून ते टाळणे इष्ट.

अशोक पाटील

>>>जे लोक या चर्चेला सिकनिंग म्हणताहेत त्यांच्या माणुसकिबद्दलच मला शंका वाटते!<<<

मोठे अनुमोदन. आजूबाजूच्या दहा पाच मायबोलीकरांना तीक्ष्ण आणि तीव्र भाषेत नावे ठेवून किंवा त्यांच्याबद्दल तिरकस, हिणकस लिहून यांची जबाबदारी संपते की काय असे वाटत आहे भारतीय. कोणतेतरी संदर्भ कुठेतरी चिकटवून माबोवरच आपापसात मारामार्‍या व्हाव्यात अशी इच्छा बाळगणारे हे गॉसिपकिंग्ज आणि क्वीन्स काही फार वेगळे नाहीत.

पण हा प्रश्न काँग्रेस आणि भाजप इकडेही वळू नयेच.

ही जी घटना झालेली तीबाबत प्रत्येकाने अत्तिशय वैयक्तीक पातळीवर काही निर्णय घ्यायला हवे आहेत. माझ्या आजूबाजूला असे काही घडताना दिसले तर त्याला मी जमेल तसा विरोध करणार हे व्यक्तीशः प्रत्येकाने ठरवायला हवे आहे. खरोखरच, सहा आठ महिन्यात हे आंदोलन विस्मृतीत जाईलही, इतका मोठा देश आहे, इतकी मोठी नवनवीन कांडे रोज होत आहेत आणि इतकी मुर्दाड जनता आहे. पण झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत प्रत्येकाने स्वतःच्या मनाच्या पातळीवर काही ठाम निर्णय घेऊन त्यासाठी पाय रोवून उभे राहण्याची गरज आहे.

Malala Yousafzai, the young Pakistani women’s-rights activist currently recuperating from a gunshot wound in a British hospital, has expressed her condolences to the family of the 23-year-old Indian woman who was gang-raped in Delhi two weeks ago and died Saturday

“The rapists dumped her on [the] road,” Malala tweeted. “The government dumped her in Singapore. What's the difference?”

Malala’s concern about the decision to shift the victim to a foreign hospital 2,600 miles away is shared by many medical professionals and academics in India.

http://www.ibtimes.com/delhi-gang-rape-victim-dies-malala-yousafzai-blas...

आगाऊ, नीधप, अजय जवादे,
तुम्हि माझ्या आणी गापै बरोबर मलाला युसिफझाइलाहि सिकनिंग म्हणत आहात याबद्दल मला तुमच्या माणुसकिबद्दल शरम तर आहेच पण तुमची किव जास्त वाटते!

काही उदाहरणे दिली असती इथे, पण इथल्या महिला वर्गाला ते वाचून भोवळ येण्याची साधार भीती वाटते म्हणून ते टाळणे इष्ट.>> फ्रँकली स्पीकींग आता काही वाचून भोवळ वगैरे यायचे दिवस संपलेत अशोक काका. काय म्हणून वाचणार आणि किती म्हणून घाबरणार? तुम्ही इथे उदाहरणे अवश्य द्या. यातून आमच्यासारख्या कधीच कोर्टाची पायरी न चढलेल्या लोकांनातर समजू द्या की कायदा किती गाढव असू शकतो!! आणि या कायद्याचं राज्य आहे याचा आम्हाला इतके दिवस अभिमान होता!!!!!!

मला अजून एक पडलेला प्रश्न: इतके दिवस बोंबलून बोंबलून राहिलेली ती खाप पंचायत आता कुठे तोंड घेऊन गेली? आता या असल्या घृणास्पद कृत्यासाठी त्या आरोपींना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना काहीच शिक्षा फर्मावणार नाहीत का हे लोक????

>>>मला अजून एक पडलेला प्रश्न: इतके दिवस बोंबलून बोंबलून राहिलेली ती खाप पंचायत आता कुठे तोंड घेऊन गेली? आता या असल्या घृणास्पद कृत्यासाठी त्या आरोपींना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना काहीच शिक्षा फर्मावणार नाहीत का हे लोक????<<<

अगदी हेच म्हणायचे आहे. त्या लोकांची आता पाचावर धारण बसलेली असणार. या तापलेल्या व दुर्दैवी वातावरणाच्या निमित्ताने त्यांनाही ओढून बाहेर काढणे आणि अद्दल घडवणे शक्य आहे. पण सरकारला पटापटा सगळ्यातून सुटायचे असणार हे (कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरीही) निर्विवाद! त्यामुळे माणसांनी खणून काढली तरच ही असली प्रकरणे पुन्हा लोकांसमोर येणार हे खरे वाटते.

मला अजून एक पडलेला प्रश्न: इतके दिवस बोंबलून बोंबलून राहिलेली ती खाप पंचायत आता कुठे तोंड घेऊन गेली? >>>> त्यांनी तोंड उचकटलेले आहेच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ९०% बलात्कार हे खोटे असतात

नंदिनी....

या क्षणी फक्त 'खाप' बद्दल थोडासा खुलासा करतो.

खाप पंचायत आपली वाडी, ते खेडेगाव, त्या गावातील लोक, त्यांचे कुटुंबिय आणि त्यानी केलेली कृत्ये याबाबतच त्यांच्या रितिरिवाजानुसार न्यायनिवाडा करते. निर्भया दिल्लीतील आणि घटनाही तिथलीच त्यामुळे हरियाणा राजस्थान उत्तराखंड हि.प्र. तसेच पंजाबमधील काही भाग इथे मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असलेली खाप पंचायतीची कार्यप्रणाली पकडल्या गेलेल्या गुन्हेगारांबाबत काही करणार नाही.

समजा हरियाणातील हिस्सार गावातील एकाच गोत्रातील युवकयुवतीने प्रेमविवाह केला आणि त्यानी तिथून यशस्वी पलायन केले व दिल्ली अथवा मुंबई इथे वास्तव्य केले तरी खाप पंचायत त्याना तिथे जाऊन शिक्षेपोटी शारीरिक इजा करू शकत नाही....मात्र हिस्सारमधील दोन्ही घरावर सामाजिक बहिष्कार ते घालतात. तो प्रकारही फार क्लेशदायक असतो....रडतात त्या त्या घरातील ज्येष्ठ मंडळी होणार्‍या अडवणुकीमुळे.... आठवडा आठवडा छोट्या मुलांना बाटलीभर दूधही मिळू शकत नाही... हे मी पाहिले आहे.

अशोक पाटील

भारतीय,
मलालाच्या धैर्याबद्दल आदर आहे पण म्हणून तिचे प्रत्येक म्हणणे पटायला हवे असे नाही.
बाकी एखादी चर्चा सिकनिंग वाटणे आणि एखाद्या व्यक्तीला सिक म्हणणे यात फरक आहे हे माहित असेलच.

’खाप’रं थोड्या दिवसांनी मुलींनी कॉलेजात जाऊ नये, शिकू नये म्हणजे बलात्कार होणार नाहीत असले आदेश काढतीलच. थोडं थांबा.
चौतालासारखे नेते लगेच अनुमोदन देतील आणि दुसर्‍या दिवशी पलटतील.

खाप पंचायत आपली वाडी, ते खेडेगाव, त्या गावातील लोक, त्यांचे कुटुंबिय आणि त्यानी केलेली कृत्ये याबाबतच त्यांच्या रितिरिवाजानुसार न्यायनिवाडा करते.>> ते ठाऊक आहे. पण गेल्या काही दिवसांमधे त्यांनी त्यांच्या "कार्यक्षेत्रामधे" येणार्‍या मुलींवरती निर्बंध घातले होते ना? मग आता मुलांवरती निर्बंध घालतील्का? (उप्रोधिक प्रश्न आहे)

त्या मुलीला अशा अवस्थेत सिंगापूरला उपचाराला नेणे हे एक डॉक्टर म्हणून मला मेडिकल फॅकल्टीसाठीही लाम्च्छानास्पद वाटते.

सर्वांनाच विनंती - या धाग्यावर तरी आपले मतभेद व्यक्तीगत पातळीवर जायला नकोत अशी किमान अपेक्षा. प्रत्येकाने गंभिर व्हायला हवे अशी माणुसकिला लांच्छनास्पद घटना घडलेली आहे.

त्या मुलीला अशा अवस्थेत सिंगापूरला उपचाराला नेणे हे एक डॉक्टर म्हणून मला मेडिकल फॅकल्टीसाठीही लाम्च्छानास्पद वाटते. आय एम ए ने ही याचा निषेध केला आहेच.
----- येथे मत स्पष्ट शब्दात व्यक्त करुन तुम्ही दुर्मिळ असणारा सच्चेपणा (Professional integrity) दाखवला आहे.

यापुढे अशा घटना आजूबाजूला घडताना दिसल्या तर यथाशक्ती विरोध करणार असे म्हणणार्‍या लोकांना :

समजा त्या घटनेत मुलीने लो वेस्ट जीन्स घातली असेल तरीही तुम्ही गुंडांना विरोध करणार का?
किंवा रात्रीच्या वेळी क्लबमध्ये जाण्याकरता म्हणून तिने आखुड ड्रेस घातला असेल तरीही तुम्ही गुंडांना विरोध करणार का?

मामी | 31 December, 2012 - 12:00 नवीन
यापुढे अशा घटना आजूबाजूला घडताना दिसल्या तर यथाशक्ती विरोध करणार असे म्हणणार्‍या लोकांना :

समजा त्या घटनेत मुलीने लो वेस्ट जीन्स घातली असेल तरीही तुम्ही गुंडांना विरोध करणार का?
किंवा रात्रीच्या वेळी क्लबमध्ये जाण्याकरता म्हणून तिने आखुड ड्रेस घातला असेल तरीही तुम्ही गुंडांना विरोध करणार का?<<<

याचबाबतीत असे म्हणून पाहिले होते की दोन विषय एकमेकांत मिसळले जात आहेत.

आपला जुन्या संस्कृतीतून जेमतेम नव्या संस्कृतीशी विचित्र तर्‍हेने परिचित होत असलेला समाज अश्याही एका घटकाला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो, जो घटक 'कपड्यांवरून चारित्र्य, वर्तन व उपलब्धता' हे स्वतःच ठरवून मोकळा होतो. अश्या घटकापासून निव्वळ स्वतःस जपणे या दृष्टीने 'पेहरावाबाबत अधिक काळजी' ही फक्त एक 'प्रिकॉशनरी मेजर' आहे. (जी त्या कॉलेजने घेतलेली असावी). हे बंधन समजले जाणे, असे बोलणार्‍यास तालिबानी समजले जाणे, असे सरसकट होण्याबाबत मतप्रदर्शन केलेले होते. आजार होऊ नये म्हणून आपण औषध घेतो तसेच हेही एक! याचा थेट संबंध 'बलात्कार करण्याची मनोवृत्ती' या घटकाशी जोडणे हे मायबोलीवर गेले काही दिवस दिसत आहे. निदान तसा प्रयत्न तरी दिसत आहेच. असे चार सहा प्रतिसाद कॉपी पेस्टही करून दाखवता येतील. पेहरावाबाबत मतप्रदर्शन करणारे हे स्वतःच मुळात अधम, बलात्कारी प्रवृत्तीचे, स्त्रीला वस्तू समजणारे आणि दोष स्त्रीवर ढकलणारे असतात हा विपर्यास वारंवार व्यक्त करून फक्त आपापसात भांडणे होत आहेत. कोणी 'माई का लाल' असेल असे खरंच तुम्हाला वाटते का की निर्भयाबाबत झालेल्या कृत्याचे समर्थन करेल, करू इच्छित असेल, तिच्यावर दोष ढकलू इच्छित असेल?

दुसरा मुद्दा, जो येथे मांडला तो असा की आपल्या सभोवती अगदी अर्धउत्तान अवस्थेत जरी एखादी मुलगी हिंडली तरी तिच्याबाबत निर्भयासारखे काही होऊ नये यासाठी माणसाने स्वतःच्या मनाची तयारी करणे, थोडी हिम्मत दाखवणे, थोडी सामाजिक जाणीव दाखवणे ही अपेक्षा! असे बोलणार्‍याने मुलींच्या पेहरावाबाबत मत व्यक्त केले होते म्हणजे तो दुटप्पी, भोंदू आहे य निष्कर्षापर्यंत पोहोचून नेमके काय साध्य केले जात आहे? फक्त माबोवरील एखाद्याला टीकेस पात्र करण्याची घाई व त्यातून एक प्रकारचे आत्मिक समाधान!

'गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल्स लावू नका' म्हणणार्‍याने दिवाळीत फटाके वाजवायचे नाहीत का? आपण आपल्या घरातील वयात आलेल्या मुलींना त्यांच्या पेहरावाबाबत खरेच काहीही सुचवत नसतो का? आई वडील म्हणून आपण जे सुचवतो ते तालिबानी विचारशैलीचे असते का?

तेच तेच तेच तेच!

दोन गोष्टी पूर्ण भिन्न आहेत हे स्वीकारायला इतके जड का जात आहे? छेडछाड होऊ नये म्हणून एक किरकोळ काळजी, तीही केवळ महाविद्यालयाच्या आवारात, घेतली जावी ही अपेक्षा तालिबानी आहे का? ही अपेक्षा व्यक्त करणारेच निर्भयासारखींवर अत्याचार करणारे असतात का?

एवढे सगळे तेच तेच लिहून नेमके काय मिळत आहे हे लिहिणार्‍यांना?

'गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल्स लावू नका' म्हणणार्‍याने दिवाळीत फटाके वाजवायचे नाहीत का? आपण आपल्या घरातील वयात आलेल्या मुलींना त्यांच्या पेहरावाबाबत खरेच काहीही सुचवत नसतो का? आई वडील म्हणून आपण जे सुचवतो ते तालिबानी विचारशैलीचे असते का?

बेफिकीर सहमत!

बेफिकीर मी आपल्याशी सहमत आहे. बाकी तुमचे मुद्दे बरोबर आहेत त्याबद्दल शंकाच नाही. त्यामागची तुमची भुमिका तुम्ही आधीच अनेकदा स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुन्हा तोच मुद्दा वेगळ्या शब्दात मांडून काय फायदा?

पण समजा एखादी स्त्री लोवेस्ट जीन्स घालून जात असताना तिच्याबाबतीत छेडाछेडीचे प्रकार होत असतील तर तिने असे कपडे घातले आहेत म्हणून हे होणारच असा विचार करून केवळ बघ्याची भुमिका घेतली जाईल की तरीही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल? अशा स्पेसिफिक घटनेत (तुम्हीच असं नाही पण तुमच्याप्रमाणे मतं असलेले अनेकजण यांच्याकडून) कोणता स्टँड घेतला जाईल अशी एक शंका मनात आली. त्याचे ठाम उत्तर काही मिळालं नाही.

>>>त्यामुळे पुन्हा तोच मुद्दा वेगळ्या शब्दात मांडून काय फायदा?<<<

याचे कारण, तोच मुद्दा, तोच प्रश्न 'महिलांनी स्वतःला....' या धाग्यावरही तीनचार वेळा विचारण्यात आला. तेच तेच विचारल्यावर वेगळे काय लिहिणार!

>>>अशा स्पेसिफिक घटनेत (तुम्हीच असं नाही पण तुमच्याप्रमाणे मतं असलेले अनेकजण यांच्याकडून) कोणता स्टँड घेतला जाईल अशी एक शंका मनात आली. त्याचे ठाम उत्तर काही मिळालं नाही.<<<

तुम्हाला ठाम उत्तर मिळाले नाही हाच तर प्रॉब्लेम आहे. आता पाचव्या प्रकारे तुम्ही स्वतःच तोच प्रश्न पुन्हा विचारला आहेत.

'तुम्हीच असं नाही पण तुमच्याप्रमाणे मतं असलेले अनेकजण यांच्याकडून' = ??????

हे तुम्ही नक्की काय विचारू इच्छित आहात? माझ्याप्रमाणे मते म्हणजे कोणती मते? की मुलींनी असे असे कपडे घालू नयेत अशी मते? त्या मतांचा या कवितेखालील प्रतिसादांमध्ये केलेल्या मतप्रदर्शनाशी, प्रतिज्ञेशी काय संबंध? हा प्रश्न तुम्ही 'स्त्रियांसाठी ड्रेसकोड' या धाग्याखाली विचारायला हवात ना? की बुवा 'ही अशी तुमच्यासारखी मते असलेले लोक निर्भयासारखा प्रकार घडला तर मधे पडतील का'? असे! तुम्ही तोच प्रश्न या धाग्याखाली विचारून एक प्रकारे ही अशी मते मांडणारे दुटप्पी आणि सोंगाडे असतात असे म्हणत नाही आहात का? तुमचे फंडाजच क्लीअर नाही आहेत. एका कॉलेजने काढलेला नियम, हा एक धागा होता. तो धागा येथे ऐन ऐरणीवर असताना निर्भयाबाबतचा 'महिलांची सुरक्षितता' हा दुसरा, स्वतंत्र विषयावरचा व पूर्णपणे वेगळा धागा निर्माण झाला. कॉलेज नियम करू शकते. पण म्हणून निर्भयावर रेप होऊ शकतो / झाला तरी काय / तीच तशी वागली असेल / तिचेच कपडे आखुड असतील, असे कोणीही म्हणालेले नाही, म्हणू इच्छितही नसणार. इतके मूर्ख, विकृत आणि ज्यांना याहीपेक्षा अधिक नांवे ठेवून तुमच्यासारख्या मतांच्या काही सदस्यांना गॉसिपिंगचे विकृत समाधान मिळणार आहे तशी माणसे येथे नाही आहेत. तेव्हा कृपया 'तुम्हीच असे नाही, पण तुमच्यासारख्या मतांचे लोक' वगैरेसारखी संबोधने टाळावीत ही विनंती, कारण संयमीत प्रतिसाद देण्याची क्षमता आता हळूहळू नष्ट होत आहे.

तेव्हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर हेच, की असे काही प्रसंग डोळ्यादेखत घडतील तेव्हा ही प्रतिज्ञा करणारे फार तर घाबरून हिम्मत दाखवू शकणार नाहीत किंवा पोलिसांना बोलावण्यापलीकडे काही करू शकणार नाहीत. मात्र ते इतके हलकट नसतील की त्याही परिस्थितीत घडलेल्या प्रकारास त्या मुलीच्या पेहरावाला जबाबदार धरतील.

आशा आहे की यापुढे ही असली बेजबाबदार विधाने आपणहून टाळली जातील. धन्यवाद!

-'बेफिकीर'!

अनामिके, तू सुटलीस, पण खरं सांगू? मुक्त होऊ नकोस, त्या प्रत्येकाला झपाट ज्याचा मेंदू कमरेखाली आहे! >>> अनुमोदन

"उलटतपासणी" हा भयंकर चीड आणणारा प्रकार असतो आणि त्यावेळी साक्षीदार कोलमडूनच पडतो.....

दामिनी सिनेमातले असे "उलटतपासणीचे" द्रुष्य आंगावर काटा आणणारे होते. त्यावरून तो किती भयंकर प्रकार असेल त्याचे कल्पना येऊ शकते.

सुदैवाने ती अशा दुसर्‍या अत्याचारापासून वाचली. पण तिच्यावर उपचार केलेल्या डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरेल. आरोपींपैकी काही जणांनी गुन्हा कबूल केलाय त्यांच्या जबानीवरुन बाकिच्या आरोपींवरचे
आरोप सिद्ध करता येतील. पण ते आरोपी कोर्टात उलटणारच नाहीत, याची खात्री नाही.

शेवटी पोलिसांनी नोंदवलेल्या जबानीला काहीच अर्थ नसतो. ते स्वतः कोर्टात जे कबूल करतील तेवढेच.
तिच्या मित्राची साक्ष पण महत्वाची ठरेल, पण जर त्याला आधीच मारहाण करुन फेकले असेल, तर तो फार काही सांगू शकणार नाही.

या केसमधे सरकारी वकील काय करताहेत यांच्याकडे सगळ्या देशाचेच लक्ष राहील. इतर केसेस मधे जसे ते मुद्दाम कालापव्यव करतात, तसे इथे करताच येणार नाही.
आरोपींचे वकील काय करताहेत ते पण बघावे लागतील. आरोपी ( खरेतर त्यांना कायद्याने असे म्हणावे लागेल, सगळा देश त्यांना गुन्हेगारच मानतोय.) कदाचित स्वखर्चाने निष्णात वकील नेमू शकणार नाहीत पण कोर्टाला तो द्यावाच लागेल.

हे तुम्ही नक्की काय विचारू इच्छित आहात? माझ्याप्रमाणे मते म्हणजे कोणती मते? की मुलींनी असे असे कपडे घालू नयेत अशी मते? त्या मतांचा या कवितेखालील प्रतिसादांमध्ये केलेल्या मतप्रदर्शनाशी, प्रतिज्ञेशी काय संबंध? हा प्रश्न तुम्ही 'स्त्रियांसाठी ड्रेसकोड' या धाग्याखाली विचारायला हवात ना? की बुवा 'ही अशी तुमच्यासारखी मते असलेले लोक निर्भयासारखा प्रकार घडला तर मधे पडतील का'? असे! तुम्ही तोच प्रश्न या धाग्याखाली विचारून एक प्रकारे ही अशी मते मांडणारे दुटप्पी आणि सोंगाडे असतात असे म्हणत नाही आहात का? तुमचे फंडाजच क्लीअर नाही आहेत. एका कॉलेजने काढलेला नियम, हा एक धागा होता. तो धागा येथे ऐन ऐरणीवर असताना निर्भयाबाबतचा 'महिलांची सुरक्षितता' हा दुसरा, स्वतंत्र विषयावरचा व पूर्णपणे वेगळा धागा निर्माण झाला. कॉलेज नियम करू शकते. पण म्हणून निर्भयावर रेप होऊ शकतो / झाला तरी काय / तीच तशी वागली असेल / तिचेच कपडे आखुड असतील, असे कोणीही म्हणालेले नाही, म्हणू इच्छितही नसणार. इतके मूर्ख, विकृत आणि ज्यांना याहीपेक्षा अधिक नांवे ठेवून तुमच्यासारख्या मतांच्या काही सदस्यांना गॉसिपिंगचे विकृत समाधान मिळणार आहे तशी माणसे येथे नाही आहेत. तेव्हा कृपया 'तुम्हीच असे नाही, पण तुमच्यासारख्या मतांचे लोक' वगैरेसारखी संबोधने टाळावीत ही विनंती, कारण संयमीत प्रतिसाद देण्याची क्षमता आता हळूहळू नष्ट होत आहे.

>>> का ही ही क ळ लं ना ही. दोन एकसारख्या धाग्यांवरचे प्रतिसाद वेगवेगळे असतात का? घटनेप्रमाणे मतं बदलतात का? हा धागा निर्भयाच्या निमित्ताने निघालेला आहे, तिच्याबद्दलचा नव्हे.

>>>> बलात्कार झाला कि त्याचा दोष स्त्रीच्या माथी मारून लोकं मोकळी होतात. पण एका so called सुसंस्कृत समाजात स्त्रीला तिला हवं तसं वागण्या-बोलण्याचे, हिंडण्या-फिरण्याची, पेहराव करण्याची मोकळिक नाहीये का? आणि हा तोच समाज आहे जो पुरुषाला ही सगळी मोकळिक देतो. भर रस्त्यावर पुरुषाने लिंग-प्रदर्शन मांडलं तरी लोकं हसून निघून जातात, उद्या स्त्रिया topless हिंडल्या तर अशीच प्रतिक्रिया देऊ शकेल का हा समाज? नाही ना? रस्त्यावरची प्रत्येक स्त्री हि आपली मालकी हक्क असलेली "स्थावर-जंगम मालमत्ता" आहे असा समज का करून घेतलाय पुरुषांनी?

>>>> हा मुद्दा वर भानुप्रियानेच मांडलेला असल्याने माझा मुद्दा अस्थानी ठरत नाही.

कारण संयमीत प्रतिसाद देण्याची क्षमता आता हळूहळू नष्ट होत आहे.
>>>> प्रचंड करमणूक झाली.

आणि या विषयावर अजून घागरी ओतण्याची इच्छा नाही. Happy

मला एक समजलं नाही. तीने कोणते कपडे घातले होते किंवा फॉर दॅट मॅटर घातले होते किंवा नाही यामुळे बलात्कार कसा समर्थनीय ठरु शकतो. एक जबाबदार नागरीक म्हणून, ते सोडा एक सुसंकृत माणूस म्हणून अशा ठिकाणी प्रतिकार करनं हे माझं प्रथम कर्तव्य ठरतं

बादवे संबंधांनंतर वेश्येला पैसे न देणे यालाही कायदेशीर भाषेत बलात्कार असेच म्हणतात.

पहिल्या केसमध्ये मनाविरुद्ध असा प्रकार होणं आणि दुसर्‍या केसमधली फसवणूक हे दोन्ही निंद्यच.

सरकारने केमिकल कॅस्ट्रेशनचा प्रस्ताव बलात्कार्याना शिक्षा म्हणून मांडला आहे.
अतिशय बाष्कळ आणि निरूपयोगी वाटतोय हा विचार.
बलात्कार हा काही केवळ लैंगिक अतिक्रमणाचा उद्रेक नाही. ही हिंसात्मक प्रव्रुत्ती आहे.
स्त्रैण हार्मोन देऊन पुरुषाला नपुंसक आणि वंध्य करवता येईल पण हिंसेला शिक्षा कशी मिळनार?
अनिल अवचटांच्या मिरची कामगारावरील अत्याचाराचे वर्णन करणार्या लेखात एका म्हातारड्या मालकाची तक्रार करताना एक कामगार सांगते ' त्याचं उठत नाही पण तो जबरदस्ती चोखायला लावतो. ते न ऐकल्यास ' गा@त' दांडू (बाम्बु) घालतो.
एक नॅचरली इंपोटंट म्हातारा आपल्या विकृतीचा निचरा असा करत असेल तर शिक्षा मिळून स्त्रैण झालेला हिंसात्मक वृत्तीचा मनुष्य काय करेल?
पुन्हा आपल्या महान देशात आरामात एखाद्या डॉक्टरकडुन इंजेक्शनचा ठप्पा मारून इंजेक्शन न घेता मोकळा फिरेल. जर जेलात ठेवला असेल तर तिथल्या व्यवस्थेला भ्रष्ट करून आरामात इंजेक्शनचि खोटी नोंद करेल आणि २-४ काय असेल तितक्या वर्षाम्ची सजा भोगुन मोकळा सुटेल.
जर खरच शिक्षा द्यायची असेल तर आजन्म कारावास + सर्जिकल ओर्किडोपेनेक्टोमी केली पाहिजे.
न रहेगा बास न होगी बकवास!
केमिकल फेमिनायजेशनचे इफेक्ट टेस्टेस्तेरॉन वापरून रिवर्स होतातच.

बागुलबुवा...

"...बादवे संबंधांनंतर वेश्येला पैसे न देणे यालाही कायदेशीर भाषेत बलात्कार असेच म्हणतात...."

याविषयी थोडे लिहितो. फार विचित्र वाटू शकणार्‍या व्याख्या आहेत या संदर्भातदेखील....

१. 'अ' इसम 'ब' वेश्येकडे शरीरसुखासाठी गेला आणि तिने आर्थिक व्यवहार ठरल्यावर त्याला आत घेतले {कायद्याच्या भाषेत 'Conditional Consent'} म्हणजे मग त्याने घेतलेल्या त्या शरीर भोगाला तांत्रिक भाषेत 'बलात्कार' म्हणता येत नाही.

२. कार्यभाग आटोपल्यावर त्याने ठरलेली रक्कम तिला दिली नाही म्हणजे त्या प्रकाराला परत कायद्याच्याच भाषेत Breach of Contract असे म्हटले जाईल.

३. त्याबद्दल ती वेश्या केवळ 'ब्रीच' कलमाखाली त्याच्यावर पोलिस केस दर्ज करू शकते.....पण शकेल का ?

४. तरीही समजा ती ठाण्यावर गेलीच तर कायद्यानुसार ती करत असलेला वेश्याव्यवसायच बेकायदेशीर असल्याने [काही युरोपिअन देशात प्रॉस्टिट्युशन लीगल मानले गेले आहे. त्यात असलेल्या तरतुदींचा इथे विचार करण्यात अर्थ नाही] ठाणे अंमलदार तिची केस नोंदवून घेऊ शकत नाही.

५. मात्र "गिर्‍हाईकाने पैसे तर दिले नाहीच, शिवाय मला मारहाण केली.." अशी नोंद तिने तक्रारअर्जात केली तर फक्त 'मारहाणी' अंतर्गत त्या इसमाला ठाण्यावर बोलावून घेतले जाईल....पण पुढे ती मारहाण सिव्हिल हॉस्पिटलद्वारा सिद्ध करावी लागेल आणि त्याची जबाबदारी परत त्या वेश्येचीच.

थोडक्यात इथेही कायदा त्या स्त्रीच्या बाबतीत कुचकामीच ठरल्याचे दिसून येईल.

अशोक पाटील

मुळ लेखासोबत १००% सहमत.
साती तुझी वरची पोस्ट वाचुन अंगावर काटा आला .. गेल्या काही दिवसांपासुन अशा सगळ्या धाग्यांवर प्रतिक्रिया देणं कटाक्षाने टाळतेय. प्र चं ड हताश, हतबल वाटतंय.

Pages