स्त्री-भ्रूण हत्याच बरी!

Submitted by भानुप्रिया on 29 December, 2012 - 05:59

चला, दिल्ली सामुहिक बलात्काराची बळी ठरलेली ती मुलगी अखेर गेली.

सुटलीच, नाही का?

ती ही सुटली अन आता तिचा मृत्यूच झालेला असल्यामुळे कदाचित हा विषय मागे पडून तिचे दोषी असलेले ते काहीजण सुद्धा सुटतील. किंवा होईल त्यांना शिक्षा, ३-७ वर्षांच्या सक्त-मजुरीची. मग ते पुन्हा बाहेर येतील आणि कदाचित एखाद्या अशाच संध्याकाळी आपल्या लिंग-पिसाट वृत्तीसमोर शरणागती पत्करून आणखीन एका "अमानत" वर/मध्ये 'मोकळे' होतील.

मग आपण परत निषेध व्यक्त करू, निदर्शनं करू, सरकारला शिव्या घालू, सरकार हिजडं आहे अशी आपली मौलिक प्रतिक्रिया सुद्धा देऊ. मग काय, बहुधा, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

हा बलात्कार इतका रानटी, निर्दयी, पाशवी होता म्हणून ह्याची निदान दखल तरी घेतली गेली, नाहीतर दर दिवशी शेकडो मुलींवर बलात्कार होतातचेत, पण आपला "आतला आवाज" काही जागा होत नव्हता.

खरंच, आज ना मला कुठले statistics मांडावेसे वाटतायत न कुठले दाखले द्यावेसे वाटतायत. माझा आजचा सूर खूप निराशावादी वाटेल तुम्हाला कदाचित, पण खरंच सांगते, विश्वास ठेवावा असं कारणंच उरलं नाहीये!

कारण हे सगळं घडत असताना, हे निषेध वगैरे व्यक्त होत असताना सुद्धा रोजच्या पेपरमध्ये किमान ५-६ बातम्या ह्याच प्रकाराताल्या होत्या. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विवाहितेवर अत्याचार, वृद्धेची विवस्त्र धिंड, लग्नाच्या आमिषाने बलात्कार, नवरा, दीर, भाऊ, बाप, सासरा, मित्र, सहकारी, अनोळखी, प्रतिष्ठित आणि इत्यादी ह्यांच्यापैकी नक्की कोण विश्वासार्ह आहे? खात्रीशीर रित्या नाही न सांगता येत? जर ही सुद्धा अधोगती नसेल, आणि अजूनही आपला आणि आपल्या civilization चा शेवट जवळ आलेला नसेल, तर आपण ह्या पुढे आणखी किती काय काय भोगणार आहोत ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही.

स्त्री ची अब्रू तिच्या लैंगिक अवयवांवर मोजली जाते, ते तिने किती नीट प्रकारे लपवून/सांभाळून ठेवलेत ह्यावर जोखली जाते. पुरुषाला मग बहुधा अब्रू वगैरे संकल्पना लागू होत नसाव्यात. किंवा होत असल्यात तरी फार लक्ष देण्याइतक्या महत्वाच्या नसाव्यात त्या. पुरुषाला हवी त्या क्षणी, हवी त्या पद्धतीने आणि हवी तिथे त्याची लैंगिक भूक शमवण्याची परवानगी कोणी दिली? कोणीच नाही, पण ती नाकारली ही नाही ना कोणी! म्हणजेच, एका अर्थी, समाज पुरुषाला हवं तसं वागण्याची मोकळिक देतोचे ना? म्हणजेच, समाजाचा एका अर्थी पुरुषांच्या ह्या स्वैर वागणुकीला पाठींबा आहे, अप्रत्यक्षरीत्या असेल कदाचित!अर्थात, हे सगळे माझे interpretations आहेत, तुम्हाला अमान्य असतील हि कदाचित, पण असो.

आज हि घटना समोर आली म्हणून, नाहीतर आपणही "रोज मरे त्याला कोण रडे" करून गप्प बसलो होतोच की!

बलात्कार झाला कि त्याचा दोष स्त्रीच्या माथी मारून लोकं मोकळी होतात. पण एका so called सुसंस्कृत समाजात स्त्रीला तिला हवं तसं वागण्या-बोलण्याचे, हिंडण्या-फिरण्याची, पेहराव करण्याची मोकळिक नाहीये का? आणि हा तोच समाज आहे जो पुरुषाला ही सगळी मोकळिक देतो. भर रस्त्यावर पुरुषाने लिंग-प्रदर्शन मांडलं तरी लोकं हसून निघून जातात, उद्या स्त्रिया topless हिंडल्या तर अशीच प्रतिक्रिया देऊ शकेल का हा समाज? नाही ना? रस्त्यावरची प्रत्येक स्त्री हि आपली मालकी हक्क असलेली "स्थावर-जंगम मालमत्ता" आहे असा समज का करून घेतलाय पुरुषांनी?

सगळ्या पुरुषांना घालून-पाडून बोलायचा हेतू नाहीये माझा, पण स्त्रीला कमी लेखणार्या, तिच्यावर शारीरिक, मानसिक, भावनिक इत्यादी प्रकारची जबरदस्ती करणाऱ्या प्रत्येकाला उद्देशून हे नक्की लिहिलंय मी.

जन्माला आलेली मुलगी एक दिवसही सुरक्षित राहु शकेल ह्याची शाश्वती आहे कुठे? बलात्कार करायला ६ महिन्यांच्या मुली सुद्धा चालतात ह्या पशुंना. मग ह्या पेक्षा खरंच स्त्री-भ्रूण हत्या बरी नाही का? मी एक स्त्री आहे, त्यामुळे ह्या असल्या पाशवी प्रकाराचे पुरस्कर्ती नाहीये मी. पण जिथे जन्माला आल्यानंतर त्या जन्माची शिक्षा भोगावी लागणार असेल, तिथे जन्म न घेतलेला काय वाईट आहे?

अनामिके, तू सुटलीस, पण खरं सांगू? मुक्त होऊ नकोस, त्या प्रत्येकाला झपाट ज्याचा मेंदू कमरेखाली आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक स्त्री चा तडफडाट मांडलास!

त्या प्रत्येकाला झपाट ज्याचा मेंदू कमरेखाली आहे!>>>> अगदी असंच....

भानूप्रिया, अगदी खरं लिहिलंय.

सरकारपेक्षा समाज याला जबाबदार आहे ही गोष्ट खरीच पण सरकारने तिला सिंगापूरला पाठवून तिच्या शरिराचे हाल केले ते मला खुप बोचतंय. धिंडं काढली बिचारीची तिच्या पालकांसकट. आदी नॉनसेन्स.

साती,

मी ऐकलं की सिंगापुरास नेलं ते तिचं प्रेत होतं. जनक्षोभ उसळू नये म्हणून!

बाकी, जो समाज स्त्रियांवर अत्याचार होऊ देतो तो सुसंस्कृत नसतोच.

आ.न.,
-गा.पै.

गा.पै.

~ तसे नसावे असे मला प्रामाणिकपणे वाटते. सफदरजंग हॉस्पिटल मी पाहिलेले आहे आणि तिथे असलेला स्टाफ संख्येने इतका आहे की त्यांच्या हालचाली जवळपास सर्वच सेक्शन्समध्ये जाणवत असतात. आज ए सेक्शनमध्ये पेशंटला सलाईन लावताना दिसलेला गब्रु उद्या तुम्हाला एच सेक्शनमध्ये ब्लड बॉटल्स घेऊन जाताना दिसेल. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'ती' दिल्लीतच गेली असेल तर ती महत्वाची घटना मुख्य डॉक्टर्सची टीमच नव्हे तर अन्य क्लास-४ च्या स्टाफ मेम्बर्सपासून लपून राहाणे केवळ अशक्य कोटीतील बाब म्हणावी लागेल...समजा तशी ती बातमी सत्य असती तर शंभर टक्के 'लीक' झाली असती...मिडियावाले अशा चतुर्थश्रेणी कामगारांच्या मागे वेड्यासारखे धावत असतात...स्कूपसाठी. पण तसे झाल्याचे दिसत नाही.

परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यानी याबाबतीत 'शीला दीक्षित याना जनक्षोभापासून वाचविण्यासाठी सरकारने सिंगापूरचा निर्णय घेतला असे समजणे चुकीचे आहे...' असे वक्तव्य केले आहे, ते योग्य म्हणावे लागेल. शिवाय पाकिस्तानच्या 'मलाला' या मुलीला जसे उपचारासाठी लंडनला नेण्याचा पाक सरकारने निर्णय घेतला, तद्वतच 'निर्भया'साठीही यु.के. वा यु.एस. हे दोन विकल्प होतेच [असे खुर्शिद यानीच सांगितले], पण तिच्या तब्येतीची वेगाने ढासळती अवस्था आणि त्या दोन देशाकडे जाण्यासाठी लागणारा वेळ पाहता सिंगापूरमधील एलिझाबेथ हे 'ऑर्गन ट्रान्स्प्लान्टेशन' शस्त्रक्रियांसाठी प्रसिद्ध असलेले हॉस्पिटल तातडीने निवडले गेले. 'निर्भया' च्या आतड्याची जी चिरफाड झाली होती त्या जनावरांच्या हल्ल्यामुळे, त्यावर उपचार तिथे होण्याची शक्यता होतीच.

या इस्पितळात जगभर नावाजले गेलेले अनेक सर्जन्स कार्यरत आहेत. ते कदापिही आपल्या हॉस्पिटलमध्ये 'प्रेत' अ‍ॅडमिट करून घेणार नाहीत....भले भारत सरकारकडून पोलिटिकल प्रेशर आले तरीही.

थोडक्यात, सिंगापूरला तिला हलविण्यात काही 'चालबाजी' असू शकेल असे कृपया आपण कुणीच मानू नये....शिवाय आता तो दुर्दैवी जीव राहिलेलाही नसल्याने तशी घटना पुन्हा होऊ नये या बाबीकडेच आपले विचार केन्द्रीत व्हावेत ही अपेक्षा.

अशोक पाटील

अशोक, असे इथे पहिल्यांदाच झालेय की तुमच्या पुर्ण प्रतिसादाशी असहमत आहे. या अगोदर एकदा दुसर्या एका संस्थळावर चाललेल्या एका चर्चेत आणि हल्ली मायबोलीवरच्या एका चर्चेत तुमच्या प्रतिसादाशी मी अंशतः असहमत होते. ते केव्हातरी विपूत लिहीन.
कदाचित मला वैद्यकीय ज्ञान असल्यामुळे त्या मुलीला सिंगापूरला नेण्यातला फोलपणा मला माहिती आहे.
याप्रकारच्या ऑर्गन फेल्युअरवर ओर्गन ट्रान्सप्लान्ट हा उपाय कधीच नसतो. त्यामुळे हा फक्त सरकारचा कातडी बचाव उपाय होता हे मी अगदी ठामपणे सांगू शकते.
या घटनेशी संबंधित विषयावर सध्या मायबोलीवर २-३ बाफ आहेत . त्यावर प्रतिबंधात्मक उपायांची चर्चा चालू आहेच.
माझ्यामते हा बाफ भानूप्रियाने त्या मुलीला भोगाव्या लागलेल्या यातनांमुळे झालेल्या उद्वेगाने काढलाय.

ह्या घटनेमुळे मला आयुष्यात आधि कधीही नाही एव्हढी पुरुष जमातीची भीती, घ्रुणा, वाटते आहे. Salute to that brave girl for the courage she fought !! सुटली बिचारि Sad .. I am shook to the core by this incइdent. This incident and also connecticut incident. भारतात अशी एकही मुलगी असेल का जिला ह्या ना त्या प्रकारे वाईट नजरा, स्पर्श comments सोसवे लागले नाहित. काय चालल आहे हे, काय ही अमानुषता , finding no words to explain grief.

भानुप्रिया,
आपला क्षोभ योग्य आहे. आज प्रथमच मला मी अमुक देशातला आहे असे सांगतांना लाज वाटली. मला भारताचा खूप अभिमान होता. अजूनही आहे, पण तो स्वातंत्र्यपूर्व भारताचा. कुठे गेले ते महान पुरुष?
आणि आपण स्वातंत्र्य मिळविले का घालविले?

षंढ वांझोटा राग, हताशपणा, विवशता, घुसमट, तगमग, ऊर फुटून बाहेर येऊ पाहणारे हुंदके, असं सगळं काही गेले काही दिवस अनुभवतेय. तुझा क्षोभ अगदी आतपर्यंत पोचला. Sad

आणि त्यातल्या एका आरोपीवर ज्युव्हेनाईल जस्टिसखाली खटला चालवणारेत. कायद्याची बंधनं आहेत. तेव्हा आणखी ३-४ वर्षांनी परत तो नराधम मोकळा.

यातल्या कुणालाही पशू, श्वापद वगैरे म्हणू नका. प्राण्यांच्या जगात असं काही घडत नाही. आपल्यापेक्षा सभ्य सुसंस्कृत असतात ते!

सरकारपेक्षा समाज याला जबाबदार आहे ही गोष्ट खरीच पण सरकारने तिला सिंगापूरला पाठवून तिच्या शरिराचे हाल केले ते मला खुप बोचतंय. धिंडं काढली बिचारीची तिच्या पालकांसकट. आदी नॉनसेन्स.
----- माझ्या मनातले लिहीले आहे.... १०० % अनुमोदन.

आधी ते नराधम खेळले तिच्या सोबत.... आणि नंतर सरकार. सिंगापुरला नेण्याचा निर्णय हा 'गोलमाल' आहे.

पण तिच्या तब्येतीची वेगाने ढासळती अवस्था आणि त्या दोन देशाकडे जाण्यासाठी लागणारा वेळ पाहता सिंगापूरमधील एलिझाबेथ हे 'ऑर्गन ट्रान्स्प्लान्टेशन' शस्त्रक्रियांसाठी प्रसिद्ध असलेले हॉस्पिटल तातडीने निवडले गेले. 'निर्भया' च्या आतड्याची जी चिरफाड झाली होती त्या जनावरांच्या हल्ल्यामुळे, त्यावर उपचार तिथे होण्याची शक्यता होतीच.
------ असहमत. 'ऑर्गन ट्रान्स्प्लान्टेशन' हा मुद्दा समजू शकतो.. पण त्यासाठी तिची तब्येत स्थिर होणे अत्यंत महत्वाचे होते. येथे अत्यंत नाजुक परिस्थिती मधे तुम्ही 'ऑर्गन ट्रान्स्प्लान्टेशन' चा विचारही करु शकत नाही. तिला दिल्लीमधेच AIIMS मधे का नाही हलवले.

हे माझे मत नाही तर दिल्ली मधे प्रतिथयश अशा डॉक्टरांचे मत आहे. अत्यंत अयोग्य अशी वेळ होती. थोडे गुगलले तर अजुन वाचायला मिळेल.

http://health.india.com/diseases-conditions/why-wasnt-the-delhi-rape-vic...

http://www.thehindu.com/news/national/rape-survivor-airlift-was-govt-not...

http://ibnlive.in.com/news/govt-defends-decision-to-shift-delhi-gangrape...

तिच्या शरिराशी अगोदर नराधम खेळले. त्यानंतर सरकारने सिंगापुरला उपचारार्थ पाठवण्याचे राजकारण करुन तिच्या शरिराची कमालीची हेळसांड केली.

डॉक्टर व लेखिका तस्लीमा नसरीन यांची प्रतिक्रिया खुप बोलकी आहे.
"Was she sent to Singapore to die in a distant place? But ppl don’t need to carry her dead body in procession, they have her story."

षंढ वांझोटा राग, हताशपणा, विवशता, घुसमट, तगमग, ऊर फुटून बाहेर येऊ पाहणारे हुंदके, असं सगळं काही गेले काही दिवस अनुभवतेय. तुझा क्षोभ अगदी आतपर्यंत पोचला.>> +१.

भानुप्रिया,

आपली प्रतिक्रिया रास्तच आहे. पण या घटनेतुन आपण शिकलो काय ? ही परिस्थीती आपणच बदलु शक्तो.

आपण सर्व भारतीयांनी विचार करायला हवा.

१) सर्व भारतीय मिळुन आपण ही परिस्थिती बदलु शकतो.
२) रोज जेव्हा आपण काही मिनीटे सातत्याने अनेक वर्षे या विषयासाठी देऊ तेव्हा नक्कीच ही परिस्थीती बदलेल.
३) आपली प्रार्थ्मीकता आता ज्या केसेस अनेक वर्षे लांबलेल्या आहेत त्यांचा न्यायालयात निकाल लावणे असायला हवी.
४) स्वसंरक्षणाचे धडे घेणे या करिता तयारी ही दुसरी प्रार्थ्मीकता वैयक्तीक स्तरावर असावी.

@ साती....

तुमचा मेडिकल क्षेत्रातील अनुभव पाहता तुमच्या विचारांना तसेच त्यातून निघू शकणार्‍या निष्कर्षाना कधीच विरोध करू शकत नाही....कारण मी तसा एक सिव्हिल सर्व्हंट असल्याने सरकारी पातळीवर जे काही निर्णय घेतले जातात ते कधीच एकट्यादुकट्याचे नसतात....तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच ते घ्यावे लागतात...घेतले जातात...इतपत मी सांगू शकतो.

श्री.गामा पैलवान यानी 'प्रेता'ची जी शक्यता त्यांच्या प्रतिसादात नोंदविली आहे, त्याबद्दल आणि तशी शक्यता फार धूसर असल्याचे मी मानले असाच आणि तितकाच माझ्या प्रतिसादाचा अर्थ. ऑर्गन ट्रान्सप्लॅन्टेशन संदर्भात एलिझाबेथ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जे मिडियाला सांगितले तोच संदर्भ मी वर कथीत केला आहे.

वि.पू.ची वाट पाहतो, डॉक्टर.

@ उदय....

काय बोलू मी आता त्या सिंगापूरला हलविण्यासंदर्भात उठत असलेल्या वादाबाबत ? बाकी ऑपरेशनबद्दल जे काही मत विचार असायचे ते असोत, पण का कोण जाणे मला अजूनही तिचे 'प्रेत' दिल्लीतील क्षोभ टाळण्यासाठीच तिकडे नेले असेल असे वाटत नाही.

अशोक पाटील

अशोक.

दुर्दैवी भगिनीचे प्राणोत्क्रमण दिल्लीतच झाल्याचा संशय माझा स्वत:चा नसून मनेका गांधींचा आहे.

तिच्या अंत्ययात्रेला लोकांचा जो महापूर लोटला असता त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिच्या पार्थिवास सिंगापुरातून आणण्यात सरकार वेळखाऊपणा करेल. मग गुपचूपरीत्या तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देऊन झपाट्याने अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडेल असे दिसते.

झटपट अंत्यसंस्काराचा आरोप नाही, तर केवळ अंदाज आहे.

आ.न.,
-गा.पै.

सिंगापुरला तिचे प्रेत नेले असेल असे मलाही वाटत नाही.... पण संपुर्ण हालचाली ह्या मोठा गोलमाल आहे.

आज गृहमंत्री कडक कायदे करु असे आश्वासन देत आहेत त्यामुळे अजुनच आश्चर्य वाटते. कायदे कडक नाहीत म्हणुन असे प्रकार घडत आहेत का ?

तिच्या अंत्ययात्रेला लोकांचा जो महापूर लोटला असता त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
------ तो गंभिर प्रश्न आहेच... कुणीच मार्गदर्शक नसणार्‍या हजारो लाखोंच्या जमावाच्या भावनांवर स्वार होण्यासाठी येथे 'नेते' मंडळी तयारीतच आहे.

तेही टाळता येणे शक्य होते... सिंगापुर मार्ग स्विकारण्याचे कुठलेही ठोस, पटणारे कारण दिसत नाही.

"सुटली, बर झाल" अस अजिबात वाटत नाहीये, बाकीचे लोक सुटले. तिला वाचवायला हवी होती अस वाटतय. तिचा मित्र होता बरोबर...त्याच्याबद्दल पुढे काही वाचले नाही.

@ भानुप्रिया

या मुलीच्या बळीने चटका लागला. एका बाफवर सगळेच पुरूष असे नसतात म्हणताना स्त्री ला आज जी भीती वाटते आहे तिचा विचार माझ्याकडून झालेला नव्हता याबद्दल समस्त स्त्रीजातीची मी क्षमा मागतो. ती मुलगी जगेल असा विश्वास वाटत होता. फोल ठरला. तिच्या कुटुंबियांवर काय आभाळ कोसळले असेल, गेल्या तेरा दिवसात कुठल्या मानसिक संघर्षाला तोंड द्यावे लागले असेल याची कल्पना करवत नाही.

या माझ्या बहिणीला साश्रू नयनांनी श्रद्धांजली.

>>षंढ वांझोटा राग, हताशपणा, विवशता, घुसमट, तगमग, ऊर फुटून बाहेर येऊ पाहणारे हुंदके, असं सगळं काही गेले काही दिवस अनुभवतेय. तुझा क्षोभ अगदी आतपर्यंत पोचला.>> +१

सिमन्तिनी, त्याच्याबद्दल एवढ्यात बाचायला मिळणार नाही. त्यालाहि कुठेररी गोपनीय ठिकाणी हलवण्यात आले असेल.

"सुटली, बर झाल" अस अजिबात वाटत नाहीये, बाकीचे लोक सुटले. तिला वाचवायला हवी होती अस वाटतय. तिचा मित्र होता बरोबर...त्याच्याबद्दल पुढे काही वाचले नाही. >>>>> सहमत, ति मुलगी जेव्हा शुध्दीवर आली होती तेव्हा तिने सर्वात आगोदर त्या मित्राबद्दल विचारपुस केली होती, नंतर जेव्हा ती मुलगी स्वःताच्या पायवर उभी राहिल्याचे न्युज आली होती तेव्हा नंतर तिची डेथ होईल असे वाटले नव्हते.

झटपट अंत्यसंस्काराचा आरोप नाही, तर केवळ अंदाज आहे.>>> जस्ट न्युज आलेय, सकाळी सात वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत

"निर्भया" च्या सोबतीने असलेल्या 'त्या' मित्रासंदर्भात हा खुलासा.

२८ वर्षाच्या मूळ गोरखपूर रहिवासी असलेल्या त्या तरुणालाही त्या सहा नराधमांनी रॉडने बेदम मारहाण करून चालत्या बसमधून रस्त्यावर फेकून दिले होते [त्याच्या बरगड्यांवर एम्समध्ये शस्त्रक्रिया झाली]. काहीसे बरे वाटल्यावर आपल्या आईवडीलांच्या मदतीने त्याने अर्थातच प्रथम महावीर मेडिकल कॉलेजकडे धाव घेतली [तिथे आयसीयूमध्ये 'निर्भया' होती]. नवी दिल्लीच्या डीसीपी छाया शर्मा यांच्या उपस्थितीत निर्भयाशी त्याने संवाद साधला. बोलता येत नव्हते तरीही नोटपॅडवर तिने 'Are you fine ?' ही ओळ कशीबशी लिहिली. त्याला मित्राने तोंडी "I am OK" असे उत्तर दिल्यावर डीसीपी छाया शर्मा यानी तेवढ्यावरच ती भेट थांबविली....कारण आयसीयूचे नियम.

[स्वतः मरणोन्मुख अवस्थेत असतानाही त्या गुणी मुलीने आपल्या मित्राच्या प्रकृतीची चौकशी करावी ही बाब डोळ्यात पाणी आणणारी आहे....]

दिल्ली पोलिसांच्याकडे मित्राने आपल्या वडिलांच्या आणि फॅमिली अ‍ॅडव्होकेट यांच्या उपस्थितीत एकूणच घटनेविषयी योग्य तो जबाब नोंदविल्यावर खुद्द वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या सल्ल्यावरूनच त्याच्या कुटुंबियांनी त्याला गोरखपूर येथील आपल्या घरी नेले असून तिथे त्याच्या मारहाणीवर औषधोपचार चालू आहेत.

[अर्थात वरील माहिती मुलीच्या मृत्यूच्या बातमीच्या अगोदरची आहे. आज झालेल्या 'निर्भया' च्या अंत्यसंस्कारसमयी तो हजर होता की नाही याबाबत अजून संदिग्धता आहे. तसे पाहिल्यास अंत्यसंस्कार ही पूर्णपणे खाजगी कौटुंबिक बाब असल्याने अशा गोष्टीची चर्चा न करणेच उत्तम.]

अशोक पाटील

Pages