आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बागुलबुवा आम्ही मित्र मित्र
बागुलबुवा आम्ही मित्र मित्र अशा तीन चार ठिकाणी गेलोय...जिकडे कायम भूत दिसण्याची वंदता होती...अर्थात स्मशानात जाऊन रात्र काढण्याचे अजून डेरिंग नाही झाले...पण एवढ्या रात्री, अमावस्येला सगळीकडे भटकून एकदाही मोकळे केस सोडलेली बाई, बुवा कोणीच नाही दिसले....
भास एकदाच झाला तो माझ्या लखलख चंदेरी लेखात दिला आहे...
पण गटगची आयडीया भारी आहे...माबोकरांनी अशा ठिकाणी गटग केले तर लोकंच काय भूतेपण त्या आजूबाजूला फिरकणार नाहीत
बाबु, आमच्या अशा
बाबु, आमच्या अशा "अॅडव्हेंचरमधे" अंधारामधे आपल्यासोबत आलेल्या लोकांना भुतं समजून काहीजणांनी बोंबा मारल्या होत्या. त्यांनी बोम्ब मारली म्हणून बाकीचे ओरडले. बाकीचे ओरडले म्हणून सर्वच ओरडले. एकंदरीत इतका आरडाओरडा झाला की यदाकदाचित एखादं भूत तिथे असतं तरी घाबरून पळालं असतं.
आम्ही सर्वपित्रीला रात्री साडेदहा वाजता पावसामधे स्मशानात गेलो होतो. बारा वाजेपर्यंत थांबायचं ठरवलं होतं. वर लिहिलेली बोंबाबोंब झाल्याने थांबलो नाही. (सर्वपित्रीला सर्व पितर आपापल्या घरी जेवायला गेलेले असल्याने स्मशानात कुणीच नसेल; म्हणून आम्हाला भूत दिसले नाही. असे लॉजिक आमच्या ग्रूपमधल्या एकाच्या डोक्यात अद्याप आहे.)
बुधवारी सकाळी मुंबई-पुण्याहून
बुधवारी सकाळी मुंबई-पुण्याहून निघा आणि ट्रेक करून संध्याकाळ पर्यंत तोरणा गाठा.
रात्री मुक्काम देवळाबाहेरच करा. दुसर्या दिवशी परत येउन (आलाच तर ;)) इथे प्रतिसाद टाका.. 
पण माझ्या ओळखीच्या एका
पण माझ्या ओळखीच्या एका ट्रेकमेटने सोलो ट्रेक केला होता तेव्हा तोरणाच्या त्या मंदीरातच राहिला होता... पण तसल्या अनुभवाचा उल्लेख नव्हता केला.. पण तिकडे गटग करायला हरकत नाही..
सेन्या लेका त्या देवळात काय
सेन्या लेका त्या देवळात काय बी नाय बग...... उगा घाबरवून र्हायलाय
हो माझा भाऊ आणि त्याचा एक
हो माझा भाऊ आणि त्याचा एक मित्र हे दोघे राहीले होते त्या मंदिरात...रात्री छान पाऊस पडला त्यामुळे कदाचित दिवेकरराव बाहेर पडले नसतील....
आम्ही पण रात्री तोरण्याचा
आम्ही पण रात्री तोरण्याचा ट्रेक केला होता, पण रात्रभर एकही भुत न दिसल्याने खुपच भयाण वाटत होत
तेच ना...इतक्यात तरी कुणालाही
तेच ना...इतक्यात तरी कुणालाही ते भूत दिसले नाहीये...बहुदा म्हातारे होऊन वारले असावे...रच्याकने भुतांमध्ये पण वयोमर्यादा असते का...या बाबत कोणी जाणकारांनी माहीती द्यावी.....
मी तिथे जाउन आल्यावर तिथून
मी तिथे जाउन आल्यावर तिथून भुत गायब झाले असे दिसतयं एकंदरीत.
वाराणसी येथील प्रसिद्ध साधक
वाराणसी येथील प्रसिद्ध साधक स्व. अरुणकुमार शर्मा यांची पुस्तके या विषयावर अधिक प्रकाश टाकणारी आहेत. वाचून पाहा.
सेना, ती दिवेकरची स्टोरी काय
सेना, ती दिवेकरची स्टोरी काय आहे? वर कोणी लिहिली आहे का? मी या दिवेकरचा उल्लेख माबोवर आणि इतरत्रही ऐकला आहे, पण दिवेकर आहे एवढंच. तो कोण, कुठे, काय करतो?
बाकी या पानावरचे सगळेच प्रतिसाद hilarious !
असे लॉजिक आमच्या ग्रूपमधल्या
असे लॉजिक आमच्या ग्रूपमधल्या एकाच्या डोक्यात अद्याप आहे.>>>
बात मे दम है. जेवण करुन भुतं पान चघळत तशपावली करत असतील तेव्हा.
<वाराणसी येथील प्रसिद्ध साधक
<वाराणसी येथील प्रसिद्ध साधक स्व. अरुणकुमार शर्मा यांची पुस्तके या विषयावर अधिक प्रकाश टाकणारी आहेत. वाचून पाहा.>
हे घ्या.......
http://www.scribd.com/collections/3349829/Arun-Kumar-Sharma
http://www.scribd.com/doc/73261573/Vakreshwar-Ki-Bhairavi-Arun-Kumar-Sharma
तोरण्यावर असा काही अनुभव आला
तोरण्यावर असा काही अनुभव आला नाही. सेना, देवळात काही नाहीये. उंदीर आहेत मात्र. एक जण जोरजोरात घोरत होता, त्यामुळे अजाबात झोप लागली नाही
जगात एवढे प्राणी मारून खाल्ले
जगात एवढे प्राणी मारून खाल्ले जातात, त्या प्राण्यांची भुते होऊन खाणार्याला छळत नाहीत का ?
हा धागा फक्त मानवाच्या
हा धागा फक्त मानवाच्या भुतांसाठी आहे. प्राण्यांच्या भुतांसाठी वेगळा धागा काढा हौशी लोक / प्राणी येतिलच तेथे.:-)
उंदीर आहेत मात्र. एक जण
उंदीर आहेत मात्र. एक जण जोरजोरात घोरत होता, त्यामुळे अजाबात झोप लागली नाही >>> कोण ?? उंदिर ??
दिवे घ्या
स्वस्ति
स्वस्ति
आजम, भैरवीच्या पुस्तकाच्या
आजम,
भैरवीच्या पुस्तकाच्या दुव्याबद्दल धन्यवाद! अनुक्रमणिका चाळली, तर त्यात 'मिस्र की तांत्रिक भैरवी' असं ५वं प्रकरण सापडलं. पूर्ण वाचलं नाहीये, पण नावावरून अंदाज बांधला तर ही देवी म्हणजे Isis तर नव्हे?
आ.न.,
-गा.पै.
भूत कधीही 'दिसत' नाही ते फक्त
भूत कधीही 'दिसत' नाही ते फक्त जाणवते. त्याचे अस्तित्व जाणवण्यासाठी माणुसही तसा संवेदनशील व अध्यात्मिक असावा लागतो. कुणालाही बघतो म्हणून भूत दिसत नाही .लहान मुले, मांजरे, स्त्रीया यांना भूताच्या अस्तित्वाची जाणिव लगेच होते .बर्याचदा मांजर हवेत काहितरी बघितल्याप्रमाणे पंजा मारत असते, तेव्हा त्याला फिरणारा आत्मा दिसतो असे म्हणतात.
@गापैजी, माहित नाही ती देवी
@गापैजी,
माहित नाही ती देवी Isis च आहे कि नाही. कारण कथेत अस्सार ह्या देवीचा उल्लेख आहे. पण ईजिप्शियन पुरानात ह्या नावाचा देव आहे ना की देवी. http://en.wikipedia.org/wiki/Osiris
Isis ह्या देवीचे दुसरे नाव Aset हे पण आहे आणि कथेतील काही उल्लेख ह्या देवीशी काही प्रमाणात जुळतात.
वस्तुतः ह्या पुस्तकाच्या लेखकाचा कथांच्या खरेपणाबद्द्ल जरी दावा असला तरी किमान मलातरी ह्याविषयी शंका आहे.
तोरण्यावरचं मेंगाईचं देउळ आता
तोरण्यावरचं मेंगाईचं देउळ आता एकदम झ्याकप्याक बनवलंय.. आधी त्याचे पत्रेच इतके भारी वाजायचे की....
आणि सेना, रात्रीचं कांय घेऊन बसलायस तोरण्यावर.. विजय देशमुखांच्या महाराजांच्या मुलखात या पुस्तकातला प्रसंग दिवसाचा आहे!
मी पहिल्यांदा तोरण्यावर गेलेलो तेव्हा आख्ख्या गडावर एकटा होतो. राक्षसगण असल्याने, काही असलं तरी जाणवलं नाही..
मला खूप दिवसांपासून एक
मला खूप दिवसांपासून एक जेन्युईन शंका आहे. आपण बघतो, ऐकतो, बोलतो, ते ज्ञानेंद्रियांच्या मदतीने. जागं असतानाही आपण डोळे बंद केले तर दिसत नाही, कान बंद केले तर ऐकू येत नाही. मग ज्या आत्म्याकडे ही साधनं नाहीत त्याला दिसू कसे शकेल किंवा ऐकू कसे येऊ शकेल ?
व्हायब्रेशन्स..... पण तुझ्या
व्हायब्रेशन्स.....
पण तुझ्या शंकेमुळे मला एक शंका आलीये. आधंळं / बहिरं / मुकं भूत असेल कॉय ?
मला खूप दिवसांपासून एक
मला खूप दिवसांपासून एक जेन्युईन शंका आहे. आपण बघतो, ऐकतो, बोलतो, ते ज्ञानेंद्रियांच्या मदतीने. जागं असतानाही आपण डोळे बंद केले तर दिसत नाही, कान बंद केले तर ऐकू येत नाही. मग ज्या आत्म्याकडे ही साधनं नाहीत त्याला दिसू कसे शकेल किंवा ऐकू कसे येऊ शकेल ?
>> अगो, डोळे बंद करुनही दिसू शकतं. जर फक्त डोळे खराब असतील, पण मेंदूतला बघणारा भाग कार्यरत असेल, तर डोळे नसतानाही दिसू शकतं. वेळ मिळाल्यावर रेफरन्स दे ते.
थोड्या वेळानं रिप्लाय टाकते..
हो, ह्याचा तू रेफरन्स देच
हो, ह्याचा तू रेफरन्स देच कारण मला अजूनही हे कसं होईल ते कळलेलं नाही.
पण तोपर्यंत >>> पण मेंदूतला बघणारा भाग कार्यरत असेल, तर डोळे नसतानाही दिसू शकतं.<<< म्हणजेच कुठली ना कुठली बाह्य साधनं लागतात ना. एखाद्याला डोळे बंद करुन, ध्यान लावून दृष्टांत होत असेल तर तो मेंदूचा वापर तरी करतोच ना त्यासाठी ? पण मनुष्य मेला की आत्म्याला देहाची, मेंदूची मदत मिळू शकत नाही. उदा. एखादी बॅटरी आपणहून हालचाल करु शकत नाही त्यासाठी ती एखाद्या खेळण्यात घालायला हवी
अरे कुणीतरी त्या दिवेकरची
अरे कुणीतरी त्या दिवेकरची स्टोरी पोस्टा की. फार फार उत्सुकता वाटतेय.
माझ्या मित्राला दिवेकर दिसला
माझ्या मित्राला दिवेकर दिसला होता. त्याचे म्हणणे कि एका झाडाजवळ असताना एक बटबटीत डोळ्यांचा माणुस त्याला दिसला होता ,तोच दिवेकर म्हणे.
पण त्याची ओरिजिनल कथा काय
पण त्याची ओरिजिनल कथा काय आहे? कोण होता तो? कसा मेला? का त्याचं भूत दिसतं लोकांना??
दिवेकर ब्राम्हणाची स्टोरी
दिवेकर ब्राम्हणाची स्टोरी नक्की काय आहे ते माहीती नाही...पण बरेच लोकांनी त्याचे भूत पाहिल्याचे अनुभव सांगितले आहे...
कित्येक लोकांनी मेंगाई मंदिराच्या बाहेर रात्रीचा कंदिल इकडून तिकडे जाताना पाहिला आहे पण एका दुर्गमोहिमेदरम्यान एकाने पाहिले की सगळेजण तोरणा उतरायला लागले असताना बावडेकर (का बावकर) वरच्या बाजूनला एका दगडावर बसून आपल्या कॅमेराशी काहीतरी खटपट करत आहेत. ते एकटेच मागे राहू नयेत म्हणून त्यांना हाळी दिली...पण बावडेकरांनी काय लक्ष दिले नाही...बहुदा जोरदार वार्यामुळे ऐकू गेले नसावे म्हणून खच्चून आवाज दिला...तो खालच्या बाजूला २० एक फुटांवर असलेल्या महादरवाजाच्या बाहेरून बावडेकरांनी ओ दिली...
हे पाहिल्यावर त्या व्यक्तीचे धाबे दणाणले आणि त्यांनी मागे वळून न पाहता बाकी लोकांना गाठले
Pages