माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<जागू च्या घरी महिना भर फडका मारावा झालं>>> ही ही Happy
खरचं फनी आहेस. माझी मावशी, पुण्यात जे आलू मॅश मिळतं त्याचेच आलू पराठा करते.
त्यात मीठ, जिरे लसूण मिर्ची ची पेस्ट, बारीक कोथिंबिर आणी लिंबाचा रस, वरुन थोडं गरम पाणी घालून ते चांगल सारण बनवून घ्यायचं आणी तेच फिलिंग परोठ्या करता वापरायचं. काही फरक कळतं नाही.

त्यात पाणी राहिलं असेल अश्विनी. तुझा गेस बरोबर होता. ते फ्रीझ मधे ठेऊन दे आणी उद्या लाट परोठे. तरीही चिकट लागलं तर त्यात थोडं आलू मॅश मिक्स करून बघ. कारण दुसरं कुठलं पीठ घातलं तर चवं बिघडेलं

व्हय अमा, अचूक निदान.

बटाटा चिकट असेल तर पुरण जेवढं सैल तेवढीच पारीची कणीक सैल भिजवायची.
असं चिकट पुरण मावेत अर्धा-अर्धा मिनीट आणि लागल्यास अजून अर्धा मिनीट फिरवून घ्यायचे आणि पूर्ण थंड झाल्यावर पराठे लाटायचे, बऱ्‍यापैकी लाटणेबल होतात.

अश्विनी, बटाटा कुस्करताना तो चिकट लागला, तर त्यातच कोरडी कणीक भिजवायची. आपली नेहमीची पराठ्याची कन्सिसटंसी येईपर्यंत कणीक भिजवायची. असे पराठे लाटताना जरा जास्त पिठ वरुन लावावे लागते.
समजा तर पिठ आधीच भिजवले असेल तर मामी (द सेकंड) च्या रेसिपीने आलू चलाके करायचे आणि साधे पराठे करायचे.

जाम चिडचिड होते असं झालं की. कधी कधी बटाट्याचा अंगचाच चिकटपणा जास्त असतो. जास्त वेळ कूकरमधे उकडले गेले की पण गाळ होतात. अशी फजिती झाली कधी तर सरळ दोन पाव स्लाईसच्या मधे भरून टोस्ट सँडविच करते मी. एकदा पाहुणे जेवायला येणार होते तेव्हा असा फजितवाडा झाला माझा. मग पराठे कॅन्सल करून सरळ दाबेली केली.

पनीराच्या भाजीत एकजीनसीपणा आणण्यासाठी काय करतात?

हे आधी कुठे सांगितले गेले असेल तर कृपया दुवा द्या. धन्यवाद.

पनीरची भाजी म्हणजे काय प्रकार केलाय नक्की ? हेवी क्रीम, काजूची पेस्ट, कळेल न कळेल एवढा उकडलेला बटाटा किसुन ह्यातलं काही घालता येइल.

नवा बटाटा असेल तर जास्त चिकट होतो उकडल्यावर. शिवाय, तो थोडा गोडूस असतो चवीला. जुना बटाटा असेल तर पराठे छान होतात. ( ही ऐकीव माहिती आहे. मला नवा-जुना बटाटा ओळखता येत नाही. चुभुदेघे. :))

पनीराच्या भाजीत एकजीनसीपणा आणण्यासाठी काय करतात?>>>> सिंडरेलाने सांगितलेले उपाय आहेतच, शिवाय कांद्याची पेस्ट + टोमॅटो पेस्ट वापरूनही ग्रेव्ही थोडी thick करता येते.

पनीराच्या काही भाज्यांमध्ये दही / टोमॅटो-कांदा पेस्ट किंवा कांद्याची पेस्ट असे देखील घालतात एकजिनसीपणा येण्यासाठी. किंवा कॉर्नफ्लोअर दुधात मिसळून तेही घालतात कधी कधी. कोणता प्रकार आहे भाजीचा त्यावर अवलंबून आहे.

सिंडरेला, प्राची, अकु, धन्यवाद.
पनीराची भाजी म्हणजे - तेलात तिखट गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, आले, लसूण, खोबरे, जिरे, कोथिंबीर यांची पेस्ट टाकून त्यात पनीर शिजवतो, नंतर थोडी साय घालून मिसळतो. पण म्हणावी अशी चव आणि एकजीनसीपणा येत नाही. काजूच्या पेस्टने यात अपेक्षित परिणाम मिळेल असे वाटतेय. धन्यवाद. तुम्ही पनीर कसे करता?

मी बेसनाचे लाडू करायला घेतले तुप आणि बेसन घालुन भाजाय्ला घेतले. १दम फस्फसुन आले आणि रंग बदलला आहे पण म्हणावे तसे घट्ट नाही झाले. तर अजुन भाजत रहावे लागेल का काय चुकले माझे? कसे कळते बेसन चांगले भाजले गेले आहे ते? खुप वेळ भाजत बसावे लागते का?

रंग बदलतू म्हणजे कीतपत ब्राउन होतो. मझा काळपट ब्राउन झाला आहे. आणि थोडा खरपुस वास येतो आहे. कळत नाही बरोबर आहे का? अजुन भाजावे लगेल का?

तुप खूप तापले होते का ? अगदी मंद आचेवर भाजायला हवे अन तूप बेताचेच हवे. बेसनापेक्षा तूप जास्त झाल्यास बेसन तळले जाईल. बेसन भाजल्याचा वास आला पाहिजे पण करपट नसावा.
रंग सुद्धा सुरेख सोनेरी येतो - इथे लाडुच्या रेसिपीवर बहुतेक फोटो असतील ते पाहिलं तर कळेल

????

निरमयी, भाजत असताना बेसन घट्ट नसतच. तूपामुळे ते जरा पातळसरच असतं. नीट भाजलं गेलं असेल तर बेसन निवू दे. मग चांगलं मळ. त्यात पिठीसाखर, वेलची, केशत घाल आणि मग मळून त्याचे लाडू वळ.

निर्मयी बेसन भाजल्याचा खमंग वास येतो आणी रंग पण थोडा बदलतो.
तुझ्या बेसनाचा रंग बदलला आहे. छान वास येत असेल तर ते भाजून झाल असेल. वरती आर्च म्हणते तस बेसन भाजताना घट्ट नसत. ते ३-४ तास थंड होऊ दे मग साखर आणी हव ते घाल मग लाडू कर.

मी काल गुलाबजाम केले होते....गुलाबजाम चवीला चांगले झालेत..पण उचलताना पटकन तुटतात...:( काय चुकल असेल?????? मी gits packet वापरुन केले होते....कुणी सांगू शकेल का काय चूकले असेल....??? आणखी एक प्रश्न म्हणजे ह्या तूटणार्या गुलाब़जामचे खाणेबल असे काय करता येईल?? म्हणजे त्यात पीठ घालून गोड पोळ्या किवा पूर्या वगैरे...???????

मी ते लाडू चे पीठ तसेच ठेउन दिले होते आणि मग सकाळी साखर घातली. आणि आता ते लाडू बांधताना खुप माउ लागत आहे. नीट वळता येत नाही लाडू. फ्रीज मधे ठेउ का ते? कीती वेळ ठेउ? म्हणजे लाडू ल आकार येइल का?
काय चुकले असेल कळतच नाहीये........

मी काल गुलाबजाम केले होते....गुलाबजाम चवीला चांगले झालेत..पण उचलताना पटकन तुटतात...अरेरे काय चुकल असेल?????? मी gits packet वापरुन केले होते....कुणी सांगू शकेल का काय चूकले असेल....??? आणखी एक प्रश्न म्हणजे ह्या तूटणार्या गुलाब़जामचे खाणेबल असे काय करता येईल?? म्हणजे त्यात पीठ घालून गोड पोळ्या किवा पूर्या वगैरे...??????? मला कूणी प्लीज सांगू शकेल का????? जास्त शिळे व्हायच्या आत काहितरी करेन म्हणतेय...:(

प्रीती, उचलताना चमच्याने उचल आणि खा. Happy गुलाब्जाम फार मोठे झाले असतील तरी तुटत असतील

गजानन, पनीर अथवा तत्सम हॉटेल टाईप ग्रेव्ही बनवताना काजू-मगजबी याची पेस्ट वापरावी. अथवा खवा घालावा. त्याने ग्रेव्हीला घट्टपणा येतो. बाजारची टोमॅटोप्युरी वापरली तर कित्येक्दा काळपट रंग येतो. त्यापेक्षा टोमॅटो चिरायचे. बिया व आतला गर काढून फेकायचा आणि मिक्सरला फिरवायचे. (साल काढण्याची गरज नाही. फक्त सालीचे तुकडे राहिलेत की नाही ते नीट बघावेत.

एव्हरेस्टचा किचन किंग मसाला घातल्यास रंग आणि चव खूप मस्त येते. (गरम मसाला वापरायचा नाही)

बाजारची टोमॅटोप्युरी वापरली तर कित्येक्दा काळपट रंग येतो.>> अगदी बरोबर. टोमाटो शिजवून घेतले व मिक्क्षर मधून फिरवून घेतले की साध्या चाळणीतून काढायचे. ( ज्याचाळणीत आपण पोहे वगैरे भिजिवतो त्या - फार बारक्या नव्हे ) जी प्युरी खाली राहील ती वापरल्यास बिया, साली इत्यादी तोंडात येत नाही.

सुप्रसिद्ध शेफ जिग्ज कालरा यांच्या पाककृती अभ्यासा ते नेहमी सर्व ग्रेव्ह्या गाळून घेतात. आपले फाइन डाइनिंग प्रेझेंटेशन मस्त हवे असल्यास त्यांच्या ग्रेव्ह्या जरूर करून बघाव्या.

निर्मयी, सगळ्यांनी सल्ले दिलेच आहेत पण मला वाटते बेसन भाजताना आंच फार जास्त होती.
करपल्याचा वास येतोय म्हणून सगळ्या बेसनात साखर न घालता थोड्याच बेसनात घालावी. साखरेने हा कमी झाला तरच बाकिच्या बेसनात घालावी. थंड होताना जसे तूप आळेल तसे बेसन घट्ट होत जाईल.

आपल्याकडे पुर्वी गोदरेजची टोमॅटो प्यूरी मिळायची ना ? तिची चव चांगली होती. गल्फमधे आणि आफ्रिकेत बहुदा टिनमधली वापरतात. तिची चव आणि रंग चांगला असतो. या टिनमधेही पील्ड टोमॅटो, चॉप्ड टोमॅटो असे प्रकार मिळतात. ताजे टोमॅटो महाग आणि कमी दर्ज्याचे असल्याने, हि प्यूरीच वापरणे सोयीचे होते. (त्याल इथे पेस्ट म्हणतात.)

Pages