कुछ याद इन्हे भी कर लो - गायक-गायिका

Submitted by prashant_the_one on 20 July, 2011 - 22:48

जुन्या हिंदी सिनेमातील गाणी म्हटले की कोणत्याही सर्वसाधारण रसिकाच्या डोळ्यासमोर पटकन ही नावे येतात - लता, आशा, किशोर, रफी, मुकेश. नंतर थोडा ताण दिला की मग मन्ना डे, तलत, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर अशी नावे आठवतात आणि अजून मागे जाण्यासाठी तुम्ही चांगलेच रसिक लागता उदा. सुरैय्या, नूरजहान, सुरेंद्र, सी.एच. आत्मा, सायगल वगैरे. पण तरीसुद्धा त्या त्या काळातील - म्हणजे ४०-५०-६० अश्या दशकातील - ही सगळी प्रसिद्ध नावे आहेत.

हिंदी सिनेमात या प्रत्येक दशकांमध्ये इतर अनेक गायक-गायिका गाउन गेले की ज्यांची दाखल त्या काही गाण्यांपूर्ती घेतली गेली पण त्यांना पुढे फारसे यश मिळाले नाही किंवा त्यांनी पुढे हिंदी मध्ये गायले नाही. त्याची कारणमीमांसा करणे हा या लेखाचा हेतू नाही. किंबहुना त्यांची आठवण काढणे एवढाच आहे कारण जेव्हा ही गाणी अधून मधून रेडिओ वर लागतात तेव्हा आपल्याला ती नक्कीच आवडतात पण काही गाणी कुणी गायली हे आठवेल याची खात्री नसते. आणि नंतर सवडीने शोधण्याचे राहून पण जाते कित्येकवेळा. अश्या काही माहिती असलेल्या नसलेल्या कलाकारांची ही काही गाणी - आजकालच्या कलाकारांची अशी यादी करायची असेल तर ती फारच मोठी होईल कारण आजकाल गायक-गायिका खंडीभर आहेत पण टिकाऊ पण २-३ लोकांनाच लाभतो. म्हणून लता आशा किशोर रफी यांच्या काळापासून ते मार्केट खुले होण्याच्या कालापर्यन्तच (८९-९०) याचा आढावा घेणे योग्य होईल.

सुधा मल्होत्रा - लता-अशा च्या प्रचंड प्रभावाच्या काळात सुद्धा स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. मला तिची काही गाणी फारच आवडतात - तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), शुक्रतारा मंद वारा आणि विसरशील खास मला ही गाणी सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
मुबारक बेगम - एक दोन गाण्यासाठीच लक्षात राहते - मुख्य म्हणजे - कभी तनहाईयो मे यू हमारी याद आयेगी
द्विजेन मुखर्जी - कुणाला ऐ दिल कहां तेरी मंझील हे माया सिनेमातले गाणे आठवते का? कित्येक लोकं ठाम पणे सांगतील की ते हेमंत कुमार चे गाणे आहे म्हणून. पण तो द्विजेन आहे! मला वाटते त्याचे एवढे एकाच गाणे हिंदी मधले.
सुबीर सेन- अजून एक हेमंतदा सारखा आवाज. यांनी मात्र काही गाणी गायली हिंदी मध्ये आणि गाजली पण - मै रंगीला प्यार का राही , दिल मेरा एक आस का पंछी , आणि मंझील वो ही है प्यार की राही बदल गये. पण मला वाटते की क्लोन लोकांच्या नशिबी फारसे यश नसते कधी. नियमाला अपवाद सुमार सानू.
येसुदास- काही लोकांच्या मते येसुदास या यादीत येणे योग्य होणार नाही कारण त्याची गाणी खूप गाजली पण इथे करिअर किती झाले हिंदी मध्ये हा मुद्दा आहे. येसुदास १९७० च्या दशकात गायला आणि काही छान गाणी आपल्याला देऊन गेला. मला वाटते की त्याचे ठीक-ठाक किंवा कंटाळवाणे असे गाणे नसावेच. सगळीच सुंदर गाणी. जब दीप जले आना, आज से पहेले, सुनयना, मना हो तुम बेहद हसीं, तुम इतनी सुंदर हो,काली घोडी द्वार खडी, कहां से आये बदरा, चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा, मधुबन खुशबू देता है अशी छान आणि अवीट गाणी देणारा हा कलाकार.
जसपाल सिंग - रफी किशोर च्या जमान्यात स्वतंत्र आवाजाचा हा एक गायक १-२ सिनेमा पुरता येऊन गेला. गीत गाता चल आणि सावन को अने दो हे त्याचे लक्षात राहणारे (आणि बहुतेक तेवढेच) सिनेमे. पण मला स्वत:ला त्याचा खडा आवाज खूपच आवडतो. मोकळा आणि खडा आवाज असूनही भावपूर्ण होता.
मंगल सिंग - मला फक्त याचे एकच गाणे आठवते - काली तेरी चोटी है परांदा तेरा लाल नी. एकदम रफी सारखा सणसणीत आवाज. काही किरकोळ गाणी नंतर त्याला मिळाली. शब्बीर, मुन्ना सारख्या बिभीषण (बी ग्रेड आणि भीषण दोन्ही एकदम) लोकांपेक्षा कितीतरी चांगला होता.
हेमंती शुक्ला - कहां से आये बदरा गाणारी ही गायिका! छान होता आवाज. काही बंगाली आणि दोन चार हिंदी सिनेमात गायली.
छाया गांगुली आप की याद आती राही रात भर - गमन मधले हे गाणे खतरनाक गाउन राष्ट्रीय पारितोषिक घेऊन गेली.. नंतर एक एका सिनेमात ऐकलं - थोडासा रूमानी हो जाये. पुढे काहीच कळले नाही. बहूतेक ती गजल मध्ये गेली नंतर.
आरती मुखर्जी - दो नैना और एक कहानी (मासूम) साठी राष्ट्रीय पारितोषिक घेणारी गुणी गायिका. तसे ब-या पैकी सिनेमात गायली. अगदी १९५८ पासून हिंदी सिनेमात थोडेफार गायली आहे !! पण हिंदी पेक्षा बंगाली मध्ये जास्त काम केले.
हेमलता - ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातलाच हा एक. एक मला वाटते की उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता ती फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावी. अगदीच साधारण गायिका असूनही तिची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली (जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी). तू इस तरह वरून आठवले - मला वाटते की एक गाणे दोघांनी गायल्याची बरीच उदा. आहेत पण हे एकमेव गाणे असावे जे ३ वेग-वेगळ्या लोकांनी एकाच सिनेमात गायले - हेमलता, रफी आणि मनहर उधास आणि प्रत्येकाचे गाणे वेग-वेगळ्या मूड मध्ये नेते एकच चाल असून !!
मनहर उधास - मुकेश नंतर त्याच्या सारखा आवाज म्हणून काही गाणी यांनी गायली. मुकेश असताना सुद्धा अभिमान सारखा त्याला चित्रपट एस.डी. कडे मिळाला होता. पण मुकेश च्या आवाजाची जादू नव्हती. श्रीखंड संपल्यावर उरलेले भांडे विसळून पियुष करतात तसे काहीतर मला वाटते याचे गाणे ऐकल्यावर ..ना धड श्रीखंड ना पेय !! असाच अजून एक क्लोन १-२ गाणी मुकेश नंतर गाउन गेला - कमलेश अवस्थी. मुकेश नंतर त्याच्या मुलांनी नितीन-मुकेशनी प्रयत्न करून बघितला पण एकतर जमाना बदलत होता आणि त्याचे गाणे वडिलांचा वारसा चालवू शकत नव्हते त्यामुळे काही फारसे झाले नाही पुढे.
दिलराज कौर - अशा भोसले क्लोन. अशा भोसले नंतर ओ पी कडे कुणाला घ्यायचे हा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी दिलराज ला घेऊन काही गाणी केली. आवाज काही वाईट नव्हता. आशा ची आठवण यायची. हिरा मोती नावाचा एक पडेल सिनेमा होता पण त्यातले - होठ है तेरे दो लाल हिरे हे पंजाबी ठसक्याचे गाणे रफी बरोर तिने झकासच गायले आहे.
प्रीती सागर - ज्युली मधले इंग्रजी गाणे माय हार्ट ईज बीटिंग, प्रीतीला प्रसिद्धी देऊन गेले.मस्त गायले आहे. मंथन मधले एकदम वेगळे गुजराती लोकसंगीतावरील म्हारो गाम काठा पाडे पण भन्नाटच होते... पण का कुणास ठाऊक काही फारसे घडले नाही मात्र.
शैलेंद्र सिंग - ऋषी कपूर मुळे शैलेंद्र ला ब-यापैकी संधी मिळाली होती पण तसा साधारणच गायक असल्यामुळे ( आणि बहुतेक नंतर ऋषी बरोबर न जमल्यामुळे) स्वतंत्र गाणी दुस-यांसाठी फारशी मिळाली नाहीत. थोड्या प्रमाणात अभिनय पण केला (अग्रीमेंट नावाचा एक सिनेमा चक्क रेखा बरोबर केला आणि बरे केले काम). सध्या TV सिरिअल्स मध्ये असतो.
चंद्राणी मुखर्जी - चंद्राणीनी ब-यापैकी गाणी हिंदी मध्ये गायली पण नाव कधी झाले नाही. मला आवडणारी काही गाणी म्हणजे सोनिक-ओमीने केलेले "इस इश्क मुहब्बत की कुछ है अजीब रस्मे", आणि अनु मलिक चा पहिला हिट सिनेमा पूनम - मुहब्बत रंग लायेगी जनाब आहिस्ता आहिस्ता. मोहम्मद रफी बरोबरचे हे गाणी.. अक्षरश: खरे वाटत नाही की हे अन्नू मलिक चे गाणे आहे.

यात नसलेले इतर कुणी गायक-गायिका असतील तर जरुर लिहा ..

गुलमोहर: 

होय. तिच मधुमती. आज ते अ‍ॅक्टिंग स्कूल अस्तित्वात नाही. दूरदर्शनच्या जमान्यात तिच्या स्कूलमधील काही विद्यार्थ्याना छोट्या पडद्यावर अभिनयाची संधी मिळाल्यावर [विशेषतः रामायण-महाभारत] तिचा बर्‍यापैकी बोलबाला झाला होता. पुढे मुंबईतील 'बडे खानदान' वाल्या वेडिंग पार्टीजमध्ये पाहुण्यांना रिझविण्यासाठी ज्या संगीत-नृत्याच्या मैफली असत त्याची मॅनेजमेन्टही त्यांच्यातर्फे काही काळ होत असे. अर्थात हे ९० च्या दशकात. पुढे काय झाले याचा विदा नाही. असो.

'सावली प्रेमाची' ही खुद्द मधुमतीचीच निर्मिती होती. नायिका तीच, पण विक्रम गोखलेसाठी. डॉ.लागू, अरूण सरनाईक, रविन्द्र महाजनी आदी कसलेल्या बॅट्समनसमोर विक्रमवीर सुनिल गावसकर याना पडद्यावर काहीच करता आले नाही. तो त्यांचा पहिलाच आणि ( आमच्या सुदैवाने) शेवटचाच चित्रपट ठरला.

मस्त धागा आहे!

रेश्मा चा उल्लेख केला गेला आहे की नाही माहित नाही, पण "लंबी जुदाई" हे गाणं तिने काय गायलंय! अजून तिची काही उल्लेखनिय गाणी म्हणजे - "हायो रब्बा नई लगदा दिल मेरा", "अखियां नू रहन दे", "ओ लाल मेरी पत रखियों भला झूलेलालन" इ.

याउपर काही गाणी गायलेली आठवत नाहीत..

आज "आस्था" चित्रपटातील एक सुंदर गाणं ऐकल "लबोंसे चूम लो, आंखो से थाम लो मुझको, तुम्ही से जन्मु तो शायद मुझे पनाह मिले".
नेटवर सर्च केले असता गायिका श्रीराधा बॅनर्जी समजलं. हे नाव पहिल्यांदाच (मी) ऐकलं. Sad

गाणं मात्र अतिशय सुंदर आहे. Happy

अजून एक गायक आठवला. गायक तसा मधल्या काळातला......पण स्टाइल एकदम वेगळी
...गोंयकर....रेमो फर्नांडिस !

त्याची ती टिपीकल यॉडलिंग रॅप स्टाईल एकदम हटके होती. (होतीच म्हणावं लागतंय.....कारण हल्ली त्याचं एकही नवीन गाणं ऐकलं नाही).

'देखो देखो, ये है जलवा' (जलवा), 'हम्मा हम्मा' (बॉम्बे), 'हुय्या हो'(खामोशी-द म्युजिकल) आणि 'अफला...अफला...अफलातून (अफलातून)' ही त्याची सगळी एकदम मस्त गाणी होती. मुन्नी बदनाम व्हायच्या आधी त्याचं 'ओ मेरी मुन्नी' पण बर्‍यापैकी गाजलं होतं. एवढंच काय, तर पेप्सीच्या सुरुवातीच्या काळात, त्याचं लेहर पेप्सीचं 'यही है राइट चॉइस बॅबी' हे जिंगल पण खूप गाजलं होतं. Happy

@ जिप्सी ~~

मराठी सुगम संगीताला जशी 'रिच' परंपरा आहे तद्वतच बंगाली संगीतालाही. श्रीराधा बॅनर्जी, इन्द्रानी सेन आणि लोपामुद्रा मित्रा ही त्यातील काही ठळक नावे आहेत. बंगाली संगीतकारांचा जसा आणि जितका हिंदी चित्रपटसृष्टीवर पडला (अगदी आर.सी.बोराल, पहाडी सन्याल, हेमंतदा, सलीलदा पासून ते थेट आजच्या प्रीतम पर्यंत) तितका मराठी संगीतकारांचा पडला नाही हे सत्य आहे. मराठी सुगम संगीतसृष्टी गाजविणारे सुधीर फडके, हृदयनाथ असोत वा श्रीनिवास खळे, याना हिंदीची दारे सताड उघडी का झाली नाही हा खरे तर एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. (सी.रामचंद्र मराठी होते, पण त्यांची मराठी सुगम संगीतातील योगदान जवळपास काहीच नाही). त्याची कारणे कोणतीही असोत, मात्र या बंगाली संगीतकारांनी त्या संगीताच्या माध्यमातून आपल्या मातीतील नवनवीन कलाकारांना विविध व्यासपीठे उपलब्ध करून दिल्याचे दाखले सापडतील.

'आस्था' मधील श्रीराधा हे एक उदाहरण....फार लोकप्रिय आहेत त्या बंगाल संगीतात, त्याचप्रमाणे लोपामुद्राही. येत्या काही वर्षात ही दोन नावे श्रेया प्रमाणेच इकडेही कर्णसेनांच्या दप्तरी नोंदली जातील, यात संदेह नाही.

अशोक पाटील

जिप्सी माझ्याकडे आहे आस्था मधलं हे गाणं, हवं असेल तर देईन मी तुला Happy
त्यात गुलजारही आहेत, त्यांच्या संवादाच्या २-३ ओळी आहेत. Happy

करण दिवाण :

मान्य आहे की 'दुनिया हमारे प्यार की' हे लाहोर चित्रपटातील गाणे खूपच गाजलेले आहे, पण करण दिवाण हा गायक-नट होता, म्हणजे पडद्यावर त्याच्या वाटयाला आलेली गाणी खुद्द तोच म्हणे, त्याने पार्श्वगायक म्हणून कधी गायन केलेले नाही. या कारणास्तव त्याचे नाव वरील चर्चेत कधी आलेले नाही.

तरीही ठीक आहे. या निमित्ताने येथील नव्या सदस्यांना 'करण दिवाण' या नावाचा कुणी कलाकार होता हे तरी समजेल.

अशोक पाटील

दक्षिणा ~~

तुम्ही भारत भूषण, महिपाल, प्रदीपकुमार, मनोहर देसाई अशा कलाकारांना जर ओळखत असाल तर मग निश्चिंतपणे 'करण दिवाण' याला त्यांच्या ड्रॉवरमध्ये टाका. १९४५ ते १९५५ अशी छोटीशीच त्याची[नायक रुपाने] कारकिर्द होती. तरीही चक्क नूरजहाँन, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, निम्मी उषा किरण अशा नायिका त्याला मिळाल्या.

त्याची त्या काळात गाजलेली काही गाणी आठवतात....जी आजही तुम्हाला कर्णप्रिय वाटतील : उदा.

१. "तारे वोही है चाँद वोही" ~ अनमोल रतन
२. "कुसूर आपका, हुजूर आपका, मेरा नाम ना लिजिये ना मेरे बापका" ~ हे खेळकर गाणे वैजयंतीमाला बरोबर 'बहार' मध्ये.

(याच 'बहार' मध्ये वैजयंतीमालावर चित्रित झालेले "सैंया दिल मे आना रे, आ के फिर ना जाना रे, छ्म छ्मा छम छम..." हे तर ऑल टाईम हिट गाणे असून नेहमी 'भूले बिसरे' गटात रेडिओवर असते. तुम्हीही ऐकले असेलच).

पुढे काही काळ त्याने अशोककुमार, रेहमान टाईप चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या. पण त्यातही तो फार चमकला असे नाही.

अशोक पाटील

ओह मला आधी नावावरून कोणी नविन अभिनेता, गायक, इ. आहे की काय असे वाटले होते. अशोक यांनी सांगितलेले "सैंया दिल मे आना रे" खुपवेळा ऐकले आहे, पण बाकीची गाणी माहिती नाहीत.

होय महेश, अगदी अशीच अवस्था कित्येकांची होते, म्हणजे रेडिओवरून ऐकताना अमुक एक गाणे यापूर्वी कधी ऐकल्याचे जाणवते पण नेमका हा गायक वा ही गायिका कोण याचा अंदाज बांधता येत नाही. या धाग्याच्या निमित्ताने निदान 'करण दिवाण' नावाचे कुणीतरी होऊन गेले याचा तरी उल्लेख झाला.

१९४९ साली 'बडी बहेन' नावाच्या हुस्नलाल भगतराम यानी संगीत दिलेल्या चित्रपटात लता मंगेशकर [त्यावेळी त्या १९ वर्षाच्या होत्या] यानी एक द्वंद्वगीत गाईले होते ~ "चुप चुप खडे हो जरूर कोई बात है, पहिली मुलाकात है आज पहिली मुलाकात है" ~ जबरदस्त हिट गाण्यांच्या यादीत हे गाणे नेहमी असते. लतादिदींच्यासमवेत दुसरी गायिका होती, जिचे नाव होते "प्रेमलता".

आतादेखील हे गाणे तुम्ही ऐकल्यास यातील लता कोण आणि प्रेमलता कोण हे समजणार नाही, इतका दोघींचा आवाज एकमेकीना पूरक आहे. कुठे गेली ही प्रेमलता ? काय झाले तिच्या गायन प्रवासाचे ? काहीही माहिती नसते. 'बडी बहेन' सारखी पुढील तीनचार वर्षात अगदी आठदहा चित्रपट मिळाले असतील प्रेमलताला.

"कुछ याद इन्हे भी कर लो' म्हणत अशा हवा होऊन गेलेल्या कलाकारांची आठवण काढणे इतकेच आपल्याला शक्य असते.

अशोक पाटील

भरत, ते पान परत वाचलं.

करण दिवाण, दहेज मधे संध्याचा हिरो होता ना ?
सावन के बादलों धीरे धीरे आना, पण त्याचेच ना.

सी एच आत्मा ची आठवण निघाली का ?

मुंडवे तले गरीब के, दो फूल खिल रहे है.

राकेश रोशन आणि जयाप्रदाच्या, कामचोर मधे पण त्याचा आवाज होता का ? कि जूनेच गाणे वापरले होते ?

त्या मधुमतिची लावणी अजून आठवतेय, रातचा पावना आला नि सकाळी गोंधळ झाला, सोबत विक्रम गोखले होता.

ओ पी नय्यरने `प्रीतम आन मिलो' प्रथम सी एच आत्माच्या आवाजात बहुतेक रेडियोसाठी रेकॉर्ड केलं होतं. पुढे चित्रपटात गीता दत्तच्या आवाजात आलं.

@ दिनेशदा ~

(किरकोळ दुरुस्ती ~ 'दहेज' मध्ये करण दिवाणची नायिका होती जयश्री. )

होय. 'सावन के बादलो' ~ 'रतन' मधील लोकप्रिय गाणे. जोहरबाईसमवेत.

आता 'कामचोर' बद्दल लिहितो ~~
मला कित्येक ठिकाणी असे आढळले आहे की, तो चित्रपट पाहिल्यावर आणि त्यातले गाजलेले "तुमसे बढकर दुनिया मे ना देखा कोई और जुबाँ पे आज दिल की बात आ गयी..." ऐकल्यावर बर्‍याच संगीतप्रेमींचा असा समज झालेला आहे की त्या गाण्याची सुरुवातीला जो आवाज आहे तो 'सी.एच.आत्मा' या सायगल पिढीतील गायकाचा आहे. [पडद्यावर दाखविताना ज्या जुन्या रेकॉर्डवर ग्रामोफोनची पिन अडकते ते गाणे थांबते, मग ते बंद करून राकेश रोशन किशोरकुमारच्या आवाजात ते पुढे म्हणण्यास सुरुवात करतो...इ.इ.]

वास्तविक ते गायक आहेत ~ "चन्द्रू आत्मा". उत्तर भारतात आणि सिंधी समाजात यांची हनुमान चालिसा आणि वैष्णोदेवीची साधना आदी भजने फार लोकप्रिय आहेत. सी.एच.आत्मा यांचे हे धाकटे बंधू. आवाजातही थोरल्या बंधुंची छाप असल्याने बर्‍याच रसिकांना त्यांची आठवण त्या गाण्यातील तो तुकडा ऐकताना होणे साहजिकच आहे.

"प्रीतम आन मिलो" ची माहिती अगदी योग्य आहे. गीता दत्तच्या आवाजात पुढे ते 'मि. अ‍ॅण्ड मिसेस ५५" साठी वापरले गेले.

हेच गाणे गुलझार यांच्या "अंगूर" मध्ये देवेन वर्मावर चित्रीत झाले. मात्र त्यासाठी आवाज वापरला गेला तो 'सपन चक्रवर्ती' चा.

अशोक: चुप चुप खडे हो जरूर कोई बात है: प्रेमलता हिचा उल्ल्ख केल्या बदल धन्य्वाद. आपाला जुन्या हिन्दि चित्रपट्ट्च आभस चन्गला आहे

अरे हो जयश्री नाही का ती. मला त्यातले पृथ्वीराज कपूरच जास्त लक्षात आहेत.
आणि आत्मा बंधु दोन होते, याची कल्पनाच नव्हती.

@ जुई ~ धन्यवाद. गायिका राजकुमारीची फार दु:खद अशी कथा आहे, पण इथे ती देण्याचे प्रयोजन नाही. पुढे केव्हा तरी विचार करू. राजकुमारी म्हटले की मला आठवतो तो मधुबाला आणि लता मंगेशकर या दोघीनाही एकाचवेळी इंडस्ट्रीत नाव मिळवून देणारा "महल". या चित्रपटात 'घबराके हम" आणि "एक तीर चला" ही राजकुमारीची दोन गाणी आठवतात. श्यामसुंदर, नौशाद, बर्मनदा, ओ.पी.नय्यर आदी दिग्गजांकडे काम मिळूनही राजकुमारी फार गाजली नाही. त्यातल्या त्यात रोशन यानी "बावरे नैन", "अनहोनी" अशा गाजलेल्या चित्रपटात तिला संधी दिली होती.

सुलोचना कदम यांच्याविषयी याच धाग्यावर चर्चा/लिखाण झाले आहे; ते तुम्ही पाहालच.

@ दिनेशदा
~ मलाही चंद्रु आत्मा हे सी.एच.आत्मा यांचे धाकटे बंधू असल्याचा शोध फार वेळाने, म्हणजे अगदी खुद्द ओ.पी.नय्यर यांच्याशी कोल्हापुरातील त्यांच्या भेटीदरम्यान झालेल्या संवादातून समजला. दोन भावांच्या वयातही अगदी १३-१४ वर्षांचा फरक होता. चंद्रू यांचा खाजगी रेकॉर्ड क्षेत्रात उत्तर भारतात फार दबदबा होता, जो नरेन्द्र चंचलच्या आगमनानंतर काही प्रमाणात उतरला.

"आत्मा" हेही त्यांचे आडनाव नसून "दिनकर", "बच्चन" सम काव्यशीर्ष होते. "चैनानी" हे त्यांचे सिंधी आडनाव.

मीना कपूर देखील अशीच विस्मृतीत गेलेली गायिका.

भारत-रशिया सहकार्याने तयार झालेल्या 'परदेसी' या चित्रपटात नरगीस वर चित्रीत झालेले ' रसिया रे मनबसिया रे, तेरे बीना जिया मोरा लागे ना' या सुंदार गाण्याची गायिका मीना कपूर.

मीना कपूर ने पुढे संगीतकार अनिल विश्वासशी लग्न केलं पण अनिल विश्वास ने सुद्धा तिला तशी गाण्याची संधी कमीच दिली.

मीना कपूर ने अनिल बिस्वास वर संगीत सरिता मधे छान कार्यक्रम केला होता.
आशा खाडिलकरनेही केला होता. मागे आकाशवाणीचे खाजगी रेकॉर्डींग सिडीच्या रुपात बाजारात आले होते, ते आहे माझ्याकडे, हे खास कार्यक्रमही बाजारात आले पाहिजेत.

कुठे तरी स्नेहल भाटकरांनी संगीत दिलेल्या ' लेहरोंपे लेहेर ... उल्फत है जवां ... रातोंकी सेहेर ... चली आ वो यहां / सितारे टिमटिमाते हैं, तू आजा आजा ' या हेमंतकुमारनी गायलेल्या गाण्याचा उल्लेख आला होता आणि ते गाणं 'हमारी याद आयेगी' या चित्रपटात असल्याचं म्हटलं होतं. बाकी तपशील बरोबर पण चित्रपटाचं नाव 'छबिली' होतं आणि हेच गाणं त्यात नूतन [समर्थ] हिनं पण ड्युएट स्वरूपात हेमंतदांबरोबर गायलं होतं. नूतनला त्यानंतर पुन्हा चित्रपटात गाण्याची संधी बहुदा मिळाली नाही.

बापू करंदीकर.

आनंद बक्षी यांनी गायलेल्या गीताचा उल्लेख झाला. तसंच कवी प्रदीप यांच्याही आवाजात काही गाणी आहेत. : देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान; कितना बदल गया इन्सान. हे एक.
नवरंग मध्ये पंडित भरत व्यास यांच्या आवाजात 'कविरजा कविता के ना कान मरोडो ; धंदे की कुछ बात करो कुछ पैसे जोडो' ही रचना आहे.

कुठे तरी स्नेहल भाटकरांनी संगीत दिलेल्या ' लेहरोंपे लेहेर ... उल्फत है जवां ... रातोंकी सेहेर ... चली आ वो यहां / सितारे टिमटिमाते हैं, तू आजा आजा ' या हेमंतकुमारनी गायलेल्या गाण्याचा उल्लेख आला होता >>>

दुर्दैवानी हे गाणे उचललेले आहे Sad

http://www.youtube.com/watch?v=S4Bjv1g3jsA

आणि एकदाच नाही तर दोनदा !! दुस-या वेळी श्रीमान अन्नु मलिक - ये काली काली आंखे

मराठीत उत्तमोत्तम भावगीते गाणारे ह्रुदयनाथ, हिंदीत फ़क्त एकच गाणे
जा जा रे जा (लेकिन, लतासोबत) गायले ना ?

वर हिंदीमधे काम केलेल्या मोजक्या मराठी संगितकारांचा उल्लेख आहे त्यात दत्ताराम वाडकरांचं नावही घ्यायला हवं. अत्यंत गुणी संगितकार पण उभी हयात शंकर-जयकिशनचे चीफ म्युसिक असिस्टन्ट म्हणूनच गेली. ज्या वेळी (एकुण १२ सिनेमा) स्वतंत्र संगित द्यायची संधी त्यांना लाभली तेव्हा त्यांनी त्याचं सोनं केलं. त्यापैकी काही (राजकपूरचा) परवरीश, श्रीमान सत्यवादी, अब दिल्ली दूर नही, नीली आंखे, डार्क स्ट्रीट.

फार सुंदर चर्चा चालू आहे. वाचत असतेच.

इथे 'तुमसे बढकर दुनिया में न देखा कोई और' हे संपूर्ण गाणं चंद्रू आत्मा यांच्या आवाजात ऐकता येईल.
दोन तीन दिवसांपूर्वी विविधभारतीवर हे गाणं चंद्रेऊ आत्मांच्या आवाजात ऐकलं. पण चित्रपटाचे नाव, इ. तपशील गाणे वाजवण्यापूर्वीच सांगितला गेल्याने सुटला होता. हे गाणं मूळ अन्य कुठल्या चित्रपटासाठी गायलं होतं की काय याचा शोध घेताना ते कामचोरसाठीच आहे अशी माहिती जालावर मिळाली. गाण्याचा सुरुवातीचा तेवढाच तुकडाच नव्हे तर संपूर्ण गाणे चंद्रू आत्मा यांच्या आवाजात रेकॉर्ड केल्याबद्दल राजेश रोशनचे आभार मानायला हवेत.

Pages