बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळू.. Lol शेकडो वर्षे नापास होत होत मागे पडलास आणि शेवटी अनेक वर्षे पेंगुंच्याच वर्गात राहिलास हे एका परीने बरंच झालं म्हणायचं. Proud भिंतीवरचे पेंगु फोटोतल्या मिशांतून खुश होऊन हसत असतील बघ.

बाजो, Lol लय भारी.. फार हसलो.

साजिर्‍या, कंटाळ्याचं मस्त आहे पोस्ट. विषय मस्त आहे. एखादं ललित लिही की. वाचायला आवडेल.

>>>>>घटपटांची चांगली चर्चा रंगणार म्हणून येरवाळीच वडापाव खाऊन घ्यावा म्हणून भाईर आलो आन वडापाव खाऊन पुन्यांन्दा गेलू त कशात काय आन फाटक्यात पाय तसं ह्ये मानसं मर्तिकावरून परत यावीत तशी बीबी बन्द झाला म्हणून घरी निघालेली....
आधी नुस्तं वाचूनच Rofl
संदर्भ लक्षात येऊन मग आणखी Rofl , Rofl

अरभाटसरांचे अजून एक मौक्तिक

सातमानकर - जि. नाशिक | 27 May, 2011 - 10:50
गेल्या दोन आठवड्यांत बाफांमध्ये 'दोन मोतिये गळाली' असे कळाली. कोणी हिरे हारपले नसावेत अशी आशा कर्तो. बाफांचे आयुष्य आजूनही त्याच ठरलेल्या टप्प्यांमधून जात आहे हे जाणोन धोधो आनंद झाला. बाफांचा अनुभव घेतलेल्यांचा एक पंथ तयार होतो, त्यास बाफानुभाव पंथ म्हणतात. बाफानुभाव पंथाचे आद्यस्वामी ट्रिपलट्रीसाजिरेश्वरस्वामी. बाफानुभाव पंथाच्या 'शिळाचरित्त' या अर्धपाली भाषेतील ग्रंथात स्वामींचे पुढील टप्पा-दृष्टांत दिले आहेत -
जन्मलेला प्रत्येक आयडी पुढील टप्प्यांमधून जातो :
१. प्रचलित व्यवस्थेशी ओळख करून घेणे (आयडी न घेता केवळ वाचणे)
२. प्रचलित व्यवस्थेचा भाग होण्याची इच्छा होणे (आयडी घेणे व कुठेतरी पोस्ट टाकणे)
३. प्रचलित व्यवस्थेचा भाग होण्याची सकाळच्याचहाची अनावर इच्छा होणे (पोस्ट दुर्लक्षिले गेल्यामुळे पोस्टांची संख्या वाढवणे)
४. प्रचलित व्यवस्थेचा भाग होण्याची सकाळच्याचहानंतरचीघाई होणे (दिसेल त्या बाफावर पेटून/चिडून/संतापून/भान हरपून पोस्ट टाकणे)
५. प्रचलित व्यवस्थेचा भाग होणे (इतर नवोदितांबरोबर मिळून प्रचलित व्यवस्थेला शिव्या घालणे)
उपकलम ५ अ. अ‍ॅडमिनांच्या विपूमध्ये तक्रार करणे / कुठल्यातरी बाफावर झक्कींशी आणि/किंवा चिनूक्साशी वाद होणे / स्त्रीजमातीविषयी काहीतरी बोलून मुक्त स्त्रियांशी खडाजंगी होणे)
६. प्रचलित व्यवस्थेचा उबग येऊन प्रस्थापितांविरुद्ध दंड थोपटणे (फुटाफूट होऊन स्वत:चा बाफ तयार करणे)
७. प्रचलित व्यवस्थेविरुद्ध केलेल्या बंडातून समांतर अथवा नवप्रचलित व्यवस्था निर्माण करणे.
|| इति बाफानुभावी शिळाचरित्त ||

शिळाचरितात रंगीबेरंगीबाबत काही उल्लेख नाही का? तिथे राहून बुरख्यात राहिल्याचा आनंद घेता येतो, म्हनजे आपल्याला इतराना बोलता येतआ, इतरांची नको असलेली कॉमेम्ट मात्र टाळता येते

आत्मस्तुतीचा आधार | असे बालवाडीस ||
अस्तित्वाची लढाई | चालतसे ||

ताई माई अक्का | दळण दळत ||
उणी दुणी जनांची | काढतसे ||

दळणात गहू | दिसती थोडेसे ||
खडेच बोचरे | किती असे ||

मनी नाही भाव | देवा मला पाव ||
सोज्वळपणा किती | खोटा असे ||

जमून सगळ्या | खलबतं करती ||
असलेच कार्य त्यांच्या | मनी वसे ||

दिवस रात्रीला | वेगळेच ध्यास ||
टवाळपणाचीच त्यांना | स्वप्ने दिसे ||

भाव विद्वानाचा | आव माणुसकीचा ||
पेहराव स्त्रीचा | आत गडी असे ||

स्त्रीयाही घेती | पुरुषांचे डुआय ||
बुरखा परखडांचा आता | फाटत असे ||

गझलकाराचे उदंड फॅन | बघुन आर्मी वन-मॅन ||
एक ठार वेडी | जळतसे ||

त्रास देण्या लोकां | नवनवीन क्लृप्त्या ||
काम धंदा बाकी | मुळी नसे ||

उगा खोडी काढी | शब्दबुडबुडे पाडी ||
दाढी कविराजांची | ओढतसे ||

वैतागुन शायर | झटकावे झुरळास ||
वेडीस तैसेचि | उडवतसे ||

वेडी म्हणे फड | मीच जिंकला ||
शायर दिसेनासा | होतसे ||

अशांना वाटते | शिकवावा धडा ||
काट्यानेच काटा | निघत असे ||

साधू शायर तो वदला | कदापि न क्रोधला ||
शांतीत मग क्रांती | करितसे ||

शहाणा तो जाणा | उगारी न वहाणा ||
डोळा तो काणा | करत असे ||

अनुल्लेख हे शस्त्र | दुर्लक्ष उत्तम अस्त्र ||
शांततेचे वस्त्र | पांघरत असे ||

<<भाव विद्वानाचा | आव माणुसकीचा ||
पेहराव स्त्रीचा | आत गडी असे ||

वैतागुन शायर | झटकावे झुरळास ||
वेडीस तैसेचि | उडवतसे ||
<<

Rofl Rofl Rofl

छान

उमामि | 9 June, 2011 - 12:30
इमामी हे क्रीम एकेकाळी लहान मुलांसाठी चांगले होते कारण ते दूरदर्शनवर दादादादी की कहानियाँ, विक्रम-वेताळ, इ. मालिकांचे प्रायोजक होते.
वैनी, तुम्ही सुलभ सोपी रोम्यांटिक्कादंब्रीच्या सोदात आहात? माबोवर सध्या एक सुरू आहे ना.
माझी सुलभ सोपी रोम्यांटिक्कादंब्री -
चांदणी रात्र होती. ती आणि मी शांत तळ्याकाठी बसलो होतो. मी हळूच तिचा हात माझ्या हातात घेतला.
ती म्हणाली - मी पृथ्वी, तू चंद्र / मी रायफल, तू अभिनव बिंद्र
मी म्हणालो - पृथ्वी व चंद्राची राणी म्हणून तुला करतो anoint / मी आहे पृथ्वीचंद्राच्या मधला Lagrangian point
साजिरा | 9 June, 2011 - 12:44
एकचदम बाबा कदमीय कादंब्रीय वातावरण. म्हणजे आजूबाजूला सना, ज्वाला, चंदा अशी पात्रे. आणि त्यांची सळसळती झुळझुळीत वस्त्रे. आरस्पानी ग्लासात किरमिजी सुवर्णरंगी द्रव्य आणि फेसाळता सोडा. संस्थानी सरबराई करण्यासाठी एक ऑर्डर्ली. अमुक तमुक बोअरवाल्या रायफलीने नुकतीच शिकार करून आणलेल्या ससा, होला, तित्तूर इ.च्या रश्श्याचा सार्‍या आसमंतात घमघमता वास. आणि शेवटी त्या सना, ज्वालासदृश पात्रांना चढताना किंवा उतरताना दाखवण्यासाठी गोल वगैरे जिने. अहाहाच. नासीफडक्यांना हे कधीच जमले नाही. सारसबागीय कादंब्र्यांत कसले आलेय मादक शौर्य बिर्य. (पण तरी ते सानेगुरूजींना रडूबाई, हळूबाई म्हणत होते- हे निराळेच. मराठी मनाने ते किंवा त्यांच्या कादंबर्‍या एक लक्षात न ठेवता मातृप्रेमाचे महन्मंगल स्त्रोत्रच लक्षात ठेवले ही एका परीने बरीच शिक्षा केली त्यांना).
तर सांगायची गोष्ट अशी महाराजा, की आजचा पाऊस बाबा कदमांना अर्पण. (पाऊस काय तुझ्या बाचा का रे- ही शंका व्यर्थ आहे. बाबा कदमांना यापेक्षा चांगली अर्पणपत्रिका कोणती- या प्रश्नात अर्थ आहे.) नमस्कार वाडेश्वर.

ता.क.- बघा. निघाला की नाही रायफलचा विषय. एकाच वेळी. वातावरणच तसे. पावसालाच क्रेडिट.
उमामि | 9 June, 2011 - 12:52
पण जास्त इंटरेस्टिंग कादंब्री मात्र टण्याचीच असेल हां.
वाचक/समीक्षकांची एकमुखी प्रतिक्रिया - 'लग्नात काय दम आहे? लग्न म्हणजे बेडीच' असे आयुष्यभर म्हणणारा, मिरज ते पंढरपूर अशी आयुष्यभराची वारी करणारा टण्या..... इथपासून ते 'लग्नात काय कम आहे? लग्न करावे तर बेडेकराशीच' असे ठासून सांगणारा नवथर टण्या असा हा नितांतरोचक प्रवास. तो खुद्द टण्या यांच्या लेखणीतून अजरामर-जिवंत उतरतो. जे शिकून गेले आहेत त्यांना आणि जे शिकणारे आहेत त्यांनाही ही वारी अनेक बोध देऊन जाते. दासबोध करूणाष्टकांनी संपत असेल, तर हा बोध मंगलाष्टकांनी संपतो. दासबोधात समर्थांचा 'अस्थिर ते शिवथर' हा प्रवास दिसत असेल तर टण्या यांच्या वारीत 'शिवथर ते नवथर' असा प्रवास दिसतो. थोडक्यात, 'वारी (२.०) - शिवथर ते नवथर' ही आत्मकादंबरी मराठी साहित्यात प्रतिदासबोधाचे स्थान मिळवेल यात शंका नाही.

साजिरा | 9 June, 2011 - 13:14
एकचदम बाबा कदमीय कादंब्रीय वातावरण. म्हणजे आजूबाजूला सना, ज्वाला, चंदा अशी पात्रे. आणि त्यांची सळसळती झुळझुळीत वस्त्रे. आरस्पानी ग्लासात किरमिजी सुवर्णरंगी द्रव्य आणि फेसाळता सोडा. संस्थानी सरबराई करण्यासाठी एक ऑर्डर्ली. अमुक तमुक बोअरवाल्या रायफलीने नुकतीच शिकार करून आणलेल्या ससा, होला, तित्तूर इ.च्या रश्श्याचा सार्‍या आसमंतात घमघमता वास. आणि शेवटी त्या सना, ज्वालासदृश पात्रांना चढताना किंवा उतरताना दाखवण्यासाठी गोल वगैरे जिने. अहाहाच. नासीफडक्यांना हे कधीच जमले नाही. सारसबागीय कादंब्र्यांत कसले आलेय मादक शौर्य बिर्य. (पण तरी ते सानेगुरूजींना रडूबाई, हळूबाई म्हणत होते- हे निराळेच. मराठी मनाने ते किंवा त्यांच्या कादंबर्‍या एक लक्षात न ठेवता मातृप्रेमाचे महन्मंगल स्त्रोत्रच लक्षात ठेवले ही एका परीने बरीच शिक्षा केली त्यांना).
तर सांगायची गोष्ट अशी महाराजा, की आजचा पाऊस बाबा कदमांना अर्पण. (पाऊस काय तुझ्या बाचा का रे- ही शंका व्यर्थ आहे. बाबा कदमांना यापेक्षा चांगली अर्पणपत्रिका कोणती- या प्रश्नात अर्थ आहे.) नमस्कार वाडेश्वर.

ता.क.- बघा. निघाला की नाही रायफलचा विषय. एकाच वेळी. वातावरणच तसे. पावसालाच क्रेडिट.

आशूडी | 9 June, 2011 - 13:38

बिंद्र,सारसबागीय इत्यादी रोम्यांटिक शब्द निर्माण करुन नवसाहित्यकारांनी मराठी भाषेला एक नवीन मुलामा चढवलेला दिसतो. पण टीकेच्या माध्यमातून याकडे निर्लेप दृष्टिकोनातून पाहावयाचे झाल्यास त्याने वाड़मयाचे काही मूल्यवर्धन झाले असे दिसून येत नाही कां की प्रस्तुत लेखकमजकूर रोम्यांटिक वातावरणाचा जो काही पंचनामा करत आहेत तो शतकानुशतके असाच प्रामाणिक नियमितपणे अनुभवास येत होता याचे पुरावे दाखले हवामा नंदाज यांच्या 'भारतीय वेधशाळा आणि आकडापद्धती : एक समग्र अभ्यास' या विवेचन ग्रंथात सापडेल. रोमँटिकवादाला सौंदर्यवाद, हुर्हुर्काहूर्नीती, ओढकळाजीवता, शहारस्मृती आणि अंतिमतः विवाहस्मारक असे हजारो प्रतिशब्द दिले तरी शेवटी पावसाच्या पहिल्या टपोर्‍या थेंबाच्या स्पर्शवशात मातीच्या श्वासातून झंकारणार्‍या मृदगंधाची आणि वार्‍याच्या फुंकरीने फुटून जाणार्‍या बुडबुड्यांची तुलना करणे हे टीकाकाराचे कार्य नव्हे.

श्रद्धा | 10 June, 2011 - 10:15
आला आला पाऊस.
पाउसात भिजायची,
मला भारी हाऊस!
- तरुणाईतले हायकू

आला आला पाऊस.
रेनकोट घेतल्याविना,
पाउसात नको जाऊस!
- काळजीवाहू हायकू

आला आला पाऊस.
कॉम्प्युटरावर आले थेंब,
अन भिजला माझा माऊस!
- यंत्रयुगीन टेक्नो हायकू

आला आला पाऊस.
तेवढ्यासाठी कळकट ठिकाणी,
कांदाभजी नको खाऊस.
- आरोग्यपूर्ण हायकू

आला आला पाऊस.
बागेला पाणी घालायला,
आज पाईप नको लाऊस.
- निसर्ग, पाणीबचत आणि काम वाचल्याचा आनंद एकत्रित असणारा हायकू

आला आला पाऊस.
आता कर पुरे,
मेघमल्हार नको गाऊस.
- तानसेनाच्या बायकोचा मुघलकालीन हायकू.

खम्मा घणी लोकहो. कस्काय? शुक्रवारच्या शुभेच्छा.

अश्विनी के | 10 June, 2011 - 10:18
आला आला पाऊस
अजून हायकू टाकायला
वेळ नको लाऊस
- श्रद्धाला अजून हायकू पाडायला उस्कवणारा हायकू

कांदापोहे | 10 June, 2011 - 10:30
श्र, केश्वे

आला आला पाऊस
केश्वे सकाळी सकाळी
श्रको उस्कवतीय कायकु?

बाळू जोशी. | 10 June, 2011 - 10:28
आम्हांस बाळपणी रतन खत्री यांची 'अंकलिपी' होती. तसेच त्यांचे च 'सुलभ अंकगणित'ही होते . प्रकाशक बहुधा 'सुलभ इन्टरन्याशनल' वाले असावेत. पुढे प्रॉबबिलिटीचा एक मोठा ग्रंथराज आर खत्री या नावाने होता. तसेच 'खत्री स्कूल ऑफ न्यूमरॉलॉजी ' नावाचे विद्यापीठच निघाले. 'शून्य' या संकल्पनेचे जनक 'रतनानन्द सरस्वती'च . जगाला दिलेली ती एक मोठी देणगी मानली जाते. अर्थात तेव्हा अंकाची नावे वेगळी असत जसे की १= एकनाथ , साधू वासवानी' ७= लंगडा, ०=मेंढी. अर्थशास्त्राचा इतिहास लिहिताना रतनभाऊ यांचे नाव वगळून तुम्हाला पुढे जाताच येनार नाही. रतनभाऊंचे यश पाहून मत्सराने सरकारने लॉटर्‍या नावाचा छचोर प्रकार सुरू केला. त्यामुळे गोरगरीब देशोधडीला लागले...

प्रतिसाद बाळू जोशी. | 10 June, 2011 - 10:35
वस्तुमान (पक्षी:मास ) हे अपरिहार्य भागधेय असते तर वेट हा गुरुत्वाकर्षणाचा दुष्परिणाम असतो. विषुववृत्तापासून जसजसे ' वर 'जावे तसतसे ते कमी होत जाते. भरपूर खाऊन व व्यायाम न करता , कुठल्याही गोळ्या न घेता वेट कमी करण्याचा उपाय म्हनजे पृथ्वीच्या केन्द्रापासून अधिकाधिक दूर दूर जावे. जेवढे दूर जाल तेवढा अधिक परिणाम .. गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाऊ शकलात तर सर्व किलो चुटकीसरशी नष्टच... हाय काय अन नाय काय .

केदार | 10 June, 2011 - 11:14

विषय बदलू नका. पॅकची माहिती द्या पाहू >>

हा पॅक देशपांडे नावाच्या बाईंनी निर्मिला आहे कारण तो निर्माण करण्याची उर्मी त्यांना आली. हा पॅक लावल्यावर दांभीकपणा म्हणजे काय रे भाऊ? किंवा टू फेसड मॅन म्हणजे काय रे भाऊ? असे प्रश्न अजिबात पडत नाहीत कारण त्या बाह्याआवरणाखाली खरे आवरण दडून बसते. वयात आलेल्या मुली फेस पॅक लावतात, त्यांच्यात अनेक प्रकार आहेत. हा पॅक लावल्यावर एका वेगळया प्रकारच्या पॅकची जाणीव होते, ती जाणीव "स्व" मध्ये परिवर्तीत केली तर बोचरी देखील असू शकते कारण पॅक लावल्यावर काही वेळ त्वचा एकदम थिन क्रेस्ट पिझ्यासारखी होते. तुमचे मन देखील तसेच होऊ शकते कारण पॅक लावल्यानंतरची भावावस्था व पॅककर्तीचा अनुभव! तसेच व्यक्तीपरत्वे अनुभव वेगळा असू शकतो कारण ह्याची सर्वांवर टेस्टींग झालेली नाही. प्रॉडक्ट अद्यापी अनफिनिश्ड आहे. पण आज ना उद्या उत्पादनास योग्य होऊ शकेल का? ह्या बद्दल गहन की सखोल चर्चा मायबोली सा खात्याने केली आहे, त्या मद्ये त्याने हा पॅक तयार करण्याअची उर्मी जिला झाली तिला भरपुर नावे ठेवली, पण हा क्वालिटी कंट्रोल पॅककर्तीला मान्य नाही. पण पा सा खात्याप्रमाणे ह्या प्रॉडक्टास काही भाव नाही. तरी पण ते पॅक लावून घेतातच. ह्याला खाज म्हणता येईल कारण पॅक खराब आहे हे माहिती असूनही पॅक द्या पॅक द्या असा ओरडा चाललेला असतो आणि परत न देण्याच्या बोलीवर हा पॅक असा वाढवला जातो.
तस्मात प्रज्ञा तुला मन आणि त्वचा काही वेळ थिन क्रेस्ट सारखी करायची असेल तर पॅकच्या पाठीमागे लाग.

बाजो, Rofl

बाळू जोशी. | 17 June, 2011 - 12:38
अक्षयतृतीयेच्या दुसर्‍या दिवशी नगर जिल्ह्यात एका नदीच्या तीरावर असलेल्या दोन गावात गोफणींनी दगड मारून लढाई होते. त्याला गोफणगुंड्यांची लढाई म्हणतात . तसेच नागपूरजवळ मध्यप्रदेश बॉर्डरला दोन गावात अशीच लढाई होते. त्याला गोटमार म्हणतात. आमच्या एका शिष्याने तेथे जाऊन खोलात चौकशी केली असता तेथील ग्रामस्थानी फार्फार पूर्वी सेन्ट्रीपेटल फोर्स आणि सेन्ट्रीफ्युगल फोर्स , अक्स्सेलरेशन, वेक्टर्स याचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी ही प्रथा सुरू केली होती असे कळले. खुद्द माझ्याच गावात जसा विविध मंत्रानी मानवावर सुपरिणाम होतो हे आता सिद्ध झाले असले तरी ते विज्ञान आमचा भिक्षुकाचे वंशज बगंभट याना पूर्वीच ठाऊक होते.म्हणून त्यानी मंत्रानी गावातल्या सगळ्या धायगुडवंशीय लोकांची आयुष्ये व्यापली.. याउलट गावातील मावळतीकडं र्‍हाणार्‍या पिर्‍या नाइकाच्या बापजाद्याना शिमग्यात देण्यात येणार्‍या शिव्या व बोम्बा यांच्या फ्रिक्वेन्सीमुळे त्येच्या म्हषींचे दूध वाढते याचे फिजिऑलॉजिकल शास्त्रीय सत्याचे आकलन झाले होते . म्हणून दर ग्रहणात शास्त्रज्ञ टेलिस्कोपी घेऊन विविध सत्यांची प्रचिती घेतात तसे पिर्‍या नाइक आणि त्याची भावकी दर शिमग्याला शिव्या व बोम्बाजन्य विविध प्रिक्वेन्सींचा दुग्धोत्पादनावर व मानवी जीवनावर परिणाम याचा अभ्यास करून विविध शास्त्रीय हायपॉथेसीसे पडताळून पहातात.
इतर मंदबुद्धी येरू त्याची काहीतरी धार्मिक गोष्टींची सांगड घालतात हे चुकीचेच...

चमन | 23 June, 2011 - 15:35
झक्की नावाचा सिनेमा निघाला काय? >> यदाकदाचित निघाला तर...

सिनेमाचा विषय - कायमच आक्षेपार्ह.
सिनेमाची भाषा - कालबाह्य मराठी
सिनेमातले संवाद - अतिरंजित
मुख्य भूमिका - झक्की नागपूरी
इतर पात्रे - गरजच नाही.
अजरामर डायलॉग - जेव्हा तुमचे बाबा हाफ....
प्रदर्शनाचे ठिकाण - स्फोटक आणि संवेदनशील.
सिनेमाचा प्रकार - विनोदी आणि माहितीपर.
प्रदर्शनाची तारीख - कधीही, तयार रहा.

विसू -
कमजोर दिलवाले और दिल के मरीजों के कि लिये यह सिनेमा हानिकारक साबित हो सकता है.
z प्रमाणपत्र.
सिनेमा संपल्यावर पेक्षकांना सक्तीने दारू पाजणेत येईल.

वर्तमान पत्रातील सिनेमा परीक्षण -
अतिशय उथळ आणि पांचट सिनेमा. -- देशप्रेमी *१/२
अतिशय गंभीर आणि विचारप्रवर्तक सिनेमा -- देशद्रोही *****१/२

Box Office Review
Supper Dupper Hit. Housefull running in 12th year.

पारितोषिके
ऑस्कर
टीप - ईतर चित्रपट निर्मात्यांनी ह्या सिनेमाशी स्पर्धा न करण्याचा निर्णय घेतल्याने बिनविरोध ऑस्कर मिळवलेले एकमेव चित्र.

खास लोकाग्रहास्तव विशेष खेळ पुढील बारा गटगच्या दिवशी.

Lol

***
स्वप्ना_राज | 30 June, 2011 - 10:42 नवीन
काल भाग्यलक्ष्मीमध्ये काशी आपल्या नवर्‍याला विचारते 'सगळे लोक आपल्या प्रेमाच्या एव्हढं विरुध्द का आहेत?". ह्या बाईने बिरगावात लैला-मजनू, शिरि-फरहाद आदी लोकांची नावं ऐकली नसावीत बहुधा. ये जालिम जमाना हमेशा २ प्यार करनेवालोंके बीच आता है - बिरगावात हिंदी पिक्चर लागत नाहीत का कॉय....बरं संजयने शुध्दीवर आल्यावर काशीला तिची आई कुठे आहे म्हणून २-३ वेळा विचारलंन. सासूची एव्हढी काळजी करणारा निदान माझ्या माहितीतला तरी हा पहिलाच जावई

माप्रिप्रिकबाबत मला कधीचा एक प्रश्न आहे. रिया ही आशूदीपेक्षा लहान पण शमिकापेक्षा मोठी, बरोबर? शमिका युएसमध्ये नोकरी करत होती....समर जॉब नाही हं...फुलटाईम नोकरी. आणि तो चंदू अजून कॉलेजात शिकतोय. म्हणजे चंदू रियापेक्षा लहान असेल नाही? अर्थात 'ना उम्रकी सीमा हो' वगैरे आहेच. पण तरी आपलं विचारलंच........

काल माप्रिप्रिकमध्ये एक जाम विनोदी प्रसंग दाखवला. मी अधून्मधून पाहिला. त्यामुळे नीटसं कळलं नाही. पण मला वाटतं अभिची मोठी बहिण माध्रुरी बॉसबरोबर कामानिमित्त दुसर्‍या शहरात गेलेय. बॉस परत जायच्या दिवशी एयरपोर्टवर पोचला. आणि ही एयरपोर्टवर जायच्या आधी मार्केटमध्ये गेली. तिथे तिची पर्स हरवली. पर्समध्ये मोबाईल - त्यात बॉसचा नंबर, पैसे वगैरे. हॉटेलमध्ये परत जायला पैसे नाहित आणि बॉसचा नंबर आठव्त नाहि. एका दुकानदाराला विनंती करून तिने पे फोन वरुन घरी फोन केला, तो शमिकाने उचलला आणि मग माधुरीने 'इथे एक प्रॉब्लेम झालाय" वगैरे सुरुवात केली. मला एक कळत नाही. ही बयो टॅक्सी करून एयरपोर्टवर का जात नाही? तिथे गेल्यावर एयरपोर्ट्वर अनाऊन्समेन्ट करायची विनंती करायची. मग बॉसने बाहेर येऊन टॅक्सीचे पैसे नसते का दिले? हे झालं तिचं सामान बॉसबरोबर असेल तर. तसं नसेल तर टॅक्सी करून हॉटेलात जावं. तिथे रूम्स घेतल्या होत्या म्हणजे रेसेप्शनवर बॉस्चा नंबर असेल ना? तिथून फोन करावा. असे कितीसे पैसे होणार टॅक्सीचे? कुक्कूल्या बाळासारखा घरी फोन तो काय करायचा?

आणि वर अभिची आई देवाला साकडं घालतेय 'माझ्या पोरीला सुखरूप ठेव'. मग अभिची आजी म्हणते 'तिला काही होणार नाही'. अरे काय जंगलात पडलेय काय?

आता शमिकाबाई धावपळ करून बॉस्चा नंबर शोधून काढतील. प्रोमोमध्ये एक गुंड दिसायची अ‍ॅक्टींग करणारा माणुस त्या माधुरीकडे पहातोय, आस्ते कदम तिच्याजवळ येतोय एव्हढ्यात तिच्या खांद्यावर एक हात येतो. बहुतेक बॉसचा असावा. त्याला जरी शमिकाने फोन केला तरी माधुरी नेमकी कुठे आहे हे त्याला कसं कळतं? शमिकाला आपल्या सासरच्या लोकांची कित्ती कित्ती काळजी आहे आणि बॉसला माधुरीची कित्ती कित्ती काळजी आहे हे दाखवायला हा सगळा खटाटोप!

हो, आणि शमिका अभिला भेटायला गेली तर आजीला काय काटे बोचतात देवालाच माहित. म्हणे 'कारणाशिवाय बाहेर जायचं नाही'. ह्यावर शमिकाबाई नुस्ता चेहेरा पाडतात. ठणकावून सांगत नाहीत की पाय माझे आहेत, तुमचे उसने मागतेय का? नाही ना? मग पाहिजे तिथे जाईन. ती सासू राहिली बाजूला, ही आजेसासूच सासुरवास करतेय. एक्दा ठणकावून सांगितलंन की गप्प बसेल. पण नाही. सगळे ह्या जन्मी मोक्ष मिळवायला आल्यासारखे वागतात.

अभि काल शमिकाला मेसेज पाठवतो 'तुझी वाट बघून बघून बारीक होत चाललोय. लवकर ये नाहीतर मी दिसेनासा होईन' असं काहीतरी. आता हा आधीच पाप्याचं पितर. सोमाली पायरेट्स ह्याच्यापेक्षा जास्त धष्टपुष्ट असतील. ह्यला आणखी बारीक व्हायचा स्कोप आहे का? कैच्या कै.

श्रद्धा | 1 July, 2011 - 16:21नवीन

त्याच कपातून मला कॉफी दे प्लिज, मी च्या पीत नै. >>> हा शाळेतला नियम असणार बहुधा. ते अआ पण चहा पीत नैत. आमच्या शाळेत आम्हांला काहीही प्यायला मुभा होती, म्हणून आम्ही बोर्नव्हिटा प्यायचो. त्यात ओला चमचा टाकून नंतर दगड झालेला बोर्नव्हिटा पहारीने फोडून खायचोही. अधूनमधून बूस्ट, कॉम्प्लान अशी पेये दिली जात. हळदीचे दूध नावाचा प्रकारही अधूनमधून दिला जाई. एकंदरीत, सगळी दूध-बेस्ड पेये दिली जात. पण शिवरात्रीचे दूध-बेस्ड पेय कधी मिळाले नाही.
- आमी बिघडलेलोच हुतो (आगामी आत्मचरित्र), प्रकरण: रम्य ते बालपण

Pages