बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'वा! किती स्पेशस रक्तचंदनी किचन आहे!' किंवा 'वा, काय लिडबिडीत आंबेहळदी लिव्हिंग रूम!'>>>
'आमच्या मम्मीपप्पांच्या लग्नाला यायचं बरं का - समस्त मानवजात' >>>

रयतेस तखल्लुस देणार्‍या गनीमास योजावे ऐसी दो तजवीज. येक ज्ये टण्याशास्त्री बोलितात तैसे, मदिरेच्या नादाने भुलवावे. गनीमास मद्य हे तौबा, पण 'पिता मद्य, होते पद्य' ऐसे पुराणे होष्यमाण. ऐसे काव्याने मारावे.>>> Lol

येताजाता हिर्वा शालू, हिरवी पैठणी, हिरवी काचोळी आणि तिला इंद्रधनुषी काठ! (ही असली काचोळी आहे का हो? असा प्रश्न घेऊन लक्ष्मी रस्त्यावर हिंडू नये! आणि विशेषकरून, अलका टॉकीज साइडने सुरूवात करून बाजीराव रस्त्याच्या दिशेने तर मुळीच जाऊ नये, कारण त्या दिशेने विचारणा करत गेलात तर एक वेळ अशी येते की 'आहे की! रात्री या' असे उत्तर येऊ शकते.)>>>>
त्याच्या थोडे आधी "नाही काचोळी नाही. येथे फक्त आंबे, परकर व जादूची पेन्सिल मिळते ही पाटी वाचली नाहीत का?" असेही उत्तर येउ शकते Happy

ही कविता रानससा आणि पत्ताकोबीच्या मळ्यालासुद्धा सूट होईल.>>> हे तर बालकवींनी ती फुलराणी व प्रकाश किरण *** यांच्या प्रेमाची कविता लिहीली होती त्याची नवीन व्हर्जन होईल.
**** यातील कोणी माबो आयडी असतील तर तो निव्वळ योगायोग*** समजावा
(recursive note)

भरपूर संस्कृतोद्भव शब्द वापरा (शक्यतो नेहमीच्या वापरातले नको .. म्हणजे खांदा नको, स्कंध चालेल )>>> हो. जमली नाही तर कवितेला खांदा लोक देतील Happy

उगीच उंटाच्या सोनचाफी बुडख्याचा गुलबक्षी मुका घ्यायला जाऊ नये.

>>
गुर्जी , ह्ये जरा प्राकृतात सांगाल का?
गेला बाजार आहिराणीत तरी..... Proud

फटॅक्स! Biggrin
सॉलीड दंगा होणार याची लक्षणे काल दिसत होतीच, तेंव्हा अत्यंत णाविलाजास्तव जावे लागले याचे आटीव दु:ख होते आहे Biggrin
'तुझ्या किरिमिजी डोळ्यांना जांभळ्या वडाची गूढता, तुझ्या हिरव्या अंगुलीला माघी मेघाची घनता' या मान्नीय सुरेश बोचकेंच्या कवितेनंतर रॉजरसायबांचाच नंबर आहे हे नक्की. फक्त त्यांनी त्यांची छुपी (का उघडी?) काव्यवस्तू कोण आहे ते उघड करावे!!!

एक महान बीबी आज सापडला त्यावरची फारेण्डाची ही पोस्ट कायमस्वरूपी तिथे असली तरी इथे परत एकदा पोस्ट करायचा मोह आवरला नाही.

फारएण्ड | 18 April, 2012 - 14:28
पुढील चर्चेआधी सर्कारी दारिद्र्यरेषेसारखी माबोवरची कल्पनादारिद्र्यरेषा स्पष्ट करावी. म्हणजे किती ओळींपुढची पोस्ट ही लांबलचक समजली जाईल याचे निकष कळाले तर बरे होईल

१. पोस्ट वाचताना स्क्रोल करावे लागणे.
२. अर्धी पोस्ट वाचल्यावर पुन्हा वर जाऊन कोणी लिहीले आहे या शंकेचे निरसन करावे लागणे.
३. मधे झोप लागणे. जाग आल्यावर हे आपण काय वाचत होतो ते जाम न आठवणे.
४. नवीन पोस्ट आहे असे समजून शंभरएक ओळी वाचल्यानंतर ">>>>" हे सापडणे, म्हणजे आत्तापर्यंत महत्प्रयासाने वाचलेली पोस्ट ही आधीच्या दुसर्‍याच कोणाच्यातरी पोस्टीचा संदर्भ होता हे लक्षात येणे.
५. आख्खी पोस्ट वाचून झाल्यावर मग थोड्या वेळाने पुन्हा "१ नवीन" पाहून बघायला गेल्यावर तीच पोस्ट पुन्हा दिसणे. व या शंभर वाक्यांतून बदललेला शब्द किंवा अक्षर कोणते असावे असा प्रश्न पडणे.

नंदिनी | 12 June, 2013 - 11:42

बरं एक पटकन फालततू प्रश्नः एकॉनॉमिक्समधल्या या संज्ञांना इंग्रजीत काय म्हणतात? मी शब्दार्थाने अर्थ लावू शकते पण या बहुतेक स्टँडर्ड संज्ञा आहेत म्हणून नक्की शब्द हवे आहेत.

मागणीनियम
मागणीची लवचिकता
तटस्थता वक्र
समउत्पती वक्राची संकल्पना
बदलत्या प्रमाणाचा नियम
उत्पादन व्यय
अंतर्गत व बहिर्गत बचती व अपव्यय.

आगाऊ | 12 June, 2013 - 11:56

नंदिनी, हे जे काय लिहीले आहे ते देखील कविता म्हणून खपेल!

' न्यूटनच्या कधीच लक्षात नाही आला मागणीनियम
पण मागणीची लवचिकता नेहमीच खुणावत राहिली संज्ञाप्रवाहाला
आणि तटस्थता वक्र होत राहिली जाणिव-नेणिवेच्या कड्यावरुन
समउत्पती वक्राची संकल्पना कळली होती का डर्विनला?
की बदलत्या प्रमाणाचा नियम समजला फक्त माकडांना
उत्पादन व्ययाचा अभिशाप घेत कितिही अंतर्गत व बहिर्गत बचती केल्या
तरी माणसाच्या प्राक्तनात केवळ अपव्यय अपव्यय अपव्यय.....'

वरदा | 12 June, 2013 - 12:01

हाहा
गुर्जी, तुमच्या साहित्यप्रतिभेला साष्टांग दंडवत __/\__

नंदिनी | 12 June, 2013 - 12:06

पण मी इकॉनॉमिक्स मराठी माध्यमातून शिकलेले नाही<< मी तर इकॉनॉमिक्सच शिकले नाही, त्यामुळे आता वाट लागतेय.तुला जेवढ्या संज्ञा माहित आहेत तेवढ्या तरी दे. मी मग रीसर्च करत बसते. मागणीचा नियम म्हणजे रूल ऑफ डीमाण्ड की लॉ ऑफ डीमाण्ड असे मूलभूत प्रश्न आहेत सध्या मला.

आगावा, तुझ्या साहित्यप्रतिभेला माझा प्रणाम. हे बहरावर ने.

अनुस्वार सायलेंट | 18 July, 2013 - 11:39
काल आम्ही जंगलीमहाराज रस्त्यावर उभे असताना आम्हाला एकाने ’जेएम मंदिर कुठे आहे?’ असे विचारले. हे तो मंदिरासमोरच उभे राहून विचारत होता, त्याबद्दल त्याला लगेचच क्षमा केली. पण जेएम मंदीर हे ऐकून मात्र काळजाला मंदिरे पडली. या क्रांतीकारी शब्दप्रयोगाबद्दल त्याची तत्क्षणीच मुलाखत घेण्याचे ठरवले व त्यासाठी पुपुवरील काही जुन्याजाणत्यांना त्याच्यावर सोडले.

पुपुकर १ - जेएम मंदीर हा व्याकरणदृष्ट्या योग्य पण भाषिकदृष्ट्या चूक शब्दप्रयोग आहे.
जेएम मंदिर म्हणणारा माणूस - बरं मग? हे तुम्ही फक्त विधान करताय. प्रश्न कुठे आहे?
[माणूस ’तयार’ दिसला. पुपुकरांना हे अनपेक्षितच होते. हे म्हणजे कंटाळा आल्याने मन रिझवायला गझलेखालील वाचायला जावे आणि तिथे खरंच गझलेवरच चर्चा दिसावी तसे झाले. असो. पण एवढ्यातेवढ्याने मागे हटतील ते पुपुकर कसले!]

पुपुकर १ - बरे, मग असा चूक शब्दप्रयोग करताना लाज का वाटली नाही? (पुपुकर १ हे भाषेवरून भांडताना कुणाच्याही भाषेला भीत नाहीत!)
माणूस - हे चूक असले तरी मी तसेच वापरणार.
[पुपुकर १ यांना यापुढे काय बोलावे न कळल्याने ते गप्पच झाले. माणूस भ ल ता च तयारीचा होता!!!]

पुपुकर २ - तुम्ही मातृभाषेबद्दल एवढे उदासीन आहात त्याचे कारण स्पष्ट आहे. ती आईची भाषा आहे, म्हणजे स्त्रीची भाषा आहे. हीच जर पितृभाषा असती तर तुमची हिंमत झाली असती का? ही तुमची वृत्ती पुरुषीवर्चस्ववादाचे द्योतक आहे.
माणूस - ओ बाई, हे काय मी पुरूष आहे म्हणून नाही बोलत. असे भाषिक प्रयोग तर तुमच्या स्त्रीवादी साहित्यिकांनीसुद्धा केलेच आहेत. बघा, गौरी देशपांडेंसारख्या लेखिकेने ’डस्टर हा घाट’ लिहिलेच की.

पुपुकर ३ - भल्या माणसा, ते दुस्तर आहे, दुस्तर.
माणूस - नाहीच मुळी! इंग्लीश्मध्ये लिहा बरे दुस्तर - duster.
[हे ऐकून पुपुकर २ विचारात पडतात... "नाही म्हणजे देशपांडेबाई काळाच्या पुढे पाहणार्‍या असल्यानेच त्यांनी ओळखले असेलसुद्धा की भविष्यात घाट चढायला डस्टरच पाहिजे" असं काहीतरी त्या बोलू लागताच....]
पुपुकर ३ (चवताळून) - कानाखाली जाहिरात काढू का रे तुझ्या? रेनॉल्टची कॉम्पॅक्ट एस्युव्ही डस्टर? ते पुचाट मॉडेल घाट चढायला काय कामाचे? काही बी बरळू नका! गौरीताईंना दुसरे एखादे मॉडेल अपेक्षित असणार.
माणूस - नाही, ’डस्टर हा घाट’ असेच आहे ते. आणि रेनॉल्ट असा उच्चार नाही, ते नुसतेच रेनॉ आहे. त्यात एलटी सायलेंट आहे.
इथे अचानकच आतापर्यंत झोपलेले तमाम पुपुकर खडबडून जागे झाले. "काय सांगता? रेनॉल्टमध्ये एलटी सायलेंट असतो? आधी कळले असते तर....", "हा पुपुकर ३ उगीच ही गाडी घ्या, ती गाडी घ्या सांगत फिरतो. पण असे कामाचे सल्ले कधी देत नाही...." असला काहीतरी जोरदार गदारोळ सुरू झाला. "या जबरदस्त शोधाबद्दल रेनॉल्ट कंपनीच्या अध्यक्षांना भारतात बोलावून सत्कार करू..." अशी एक सूचनासुद्धा पुढे आली. पण त्यातच "मि तयार हे त्या अध्यक्षांचे स्वगतपर भाषण करायला" अशी एक उपसूचना ऐकू आल्यावर मात्र सर्व काही थंडावले. पण तोपर्यंत माणूस जेएम मंदिरात दर्शन करून गेलासुद्धा. असोच.

टंकलेखन सहाय्य - टंकलेखक १, टंकलेखक २
मुद्रितशोधन - द मुद्रितशोधक
शब्दांकन सहाय्य - शब्दांकनसहाय्यक १ , शब्दांकनसहाय्यक २

त्यात एलटी सायलेंट आहे. >> एवढा फुल्टॉस सोडून दिला तर ते नक्की तोतये पुणेकर असतील Happy

खर्‍या पुणेकरांनी एल्टी कधीही, कुठल्याही विषयावर सायलेंट नसतो असं काहीतरी घुसडलं असतं

छे सगळे खरे पुणेकर एल्टी सायलेंट या स्वप्नात इतके रंगले की भानच राह्यले नाही.
कधीही सत्यात न येणारं स्वप्नं म्हणल्यावर..... Happy

तरूण्चाक | 15 August, 2013 - 09:41
गौतमास वृक्षाखाली अंतिम सत्याचे ज्ञान झाले. आता त्यास बोधीवृक्ष म्हणतात. परवा आमचे एका मित्राकडे गेलो असता त्याने आफर केलेली बडवायजर मी ठामपणे नाकारली. अश्या प्रकारे मी मोहावर विजय मिळवला (डब्बल विजय हां! मनातील व बडवायजरमधील). आता तो मला सांगतो की मी जिथे बसलो होतो तिथे आता अचानक वडाची एक पारंबी लोंबू लागली आहे. तर त्याला बोडीवृक्ष म्हणता येईल काय? कळावे. शिवाय. तरीच. धन्यवाद. कृपया. (मी स्वतःस सिड म्हणवून घ्यायला सुरूवात केली आहेच.)
इंडिपेंडंस व फ्रीडम यांतील फरक काय? इंडिपेंडंस म्हणजे परावलंबी नसणे, फ्रीडम म्हणजे स्वतंत्र असणे. एकात नसणे आहे, तर एकात असणे आहे. एकात इतरांच्या सापेक्ष भाव आहे, एकात स्वयंभू विचार आहे... इतरांच्या सापेक्ष अश्या अस्तित्वापासून ते 'स्वयम्'ची जाणीव होण्यापर्यंतचा प्रवास आज सुरू झाला, सुरू होतो, म्हणून आजच्या दिनाचे महत्त्व. म्हणून आजच्या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. जयोस्तुते!

तरूण्चाक | 15 August, 2013 - 10:44
गौतम बुद्ध लोकोत्तर ज्ञानी होता. निर्वाणपदी पोहोचण्याचे प्रत्येकाचे मार्ग भिन्न असतात हे बुद्धाने ओळखले होते. त्याचा 'अत्त दीप भव' संदेश लोकांनी किती वेगवेगळ्या प्रकारे घेतला हे पाहिले तर गौतमाचे बुद्धपद समजण्यास मदत होते.
काही लोकांनी अत्त डीप भव असे ऐकले, त्यांनी समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीचा डीपमध्ये अभ्यास केला.
काही लोकांनी अत्त ट्रिप भव असे ऐकले, ते अवघड अवघड ठिकाणच्या ट्रिपा करून आले.
काही लोकांनी अत्त जीप भव असे ऐकले त्यांनी जीप विकत घेतली.
काही हुशार लोकांनी 'उगीच का चान्स घ्या?' असा विचार करून अवघड ठिकाणी जीपसदृश वाहनाने ट्रिप केली.
काही लोकांनी अत्त हीप भव असे ऐकले, त्यांनी नंतर 'वजन कसे घटवावे?'वर चर्चा सुरू केल्या.
काही लोकांनी अत्त क्रीप भव ऐकले, त्यांना निर्वाणपदी इतरांनीच बळजबरी पाठवले.
काही लोकांनी अत्त शीप भव ऐकले, ते प्रेमळ मेंढपाळाच्या शोधात गेले.
एकंदरीत पाहता अत्त दीप भव ऐकणारे थोडेच निघाले. मागील शतकात एक असा महामानव झाला, ज्याने संदेश बरोबर ऐकला. त्याच्या अनुयायांनी मात्र अत्त चीप भव ऐकले, ते घोडे बाजारी गेले. (घोडेबाजारी असे वाचले तरी चालेल.)
असे सर्व पाहून या भारतवर्षातील सामान्य जनतेने मात्र शेवटी अत्त स्लीप भव हाच मार्ग चोखाळला. ते असोच.

फारएण्ड | 15 August, 2013 - 11:06
पण खाली सीड असताना पारंबी वरतून लोंबू लागली हे कसे?
ती मोहाची दारू असती तर ट्रिपल विजय म्ह्णता आले असते ना?

तरूण्चाक | 15 August, 2013 - 11:47
हा प्रश्न साहजिक आहे. वरतून पारंबी, खाली सीड हे आमच्या मनातील तौबा गोंधळाचे निदर्शक आहे. (विजय मोहावर आहे, गोंधळावर नाही याची नोंद घ्यावी. कृपया. धन्यवाद. कृपया.) शिप ऑफ थेसिअस पाहून आल्यावर बौद्ध-जैन यांच्याबद्दल मनात गोंधळ उडालेला आहे. तो सुरू असतानाच भगवद्गीतेतल्या 'शेरां'बद्दल ऐकले. तेव्हापासून तर गोंधळाला पार उरलेला नाही. त्यावर उपाय म्हणून आम्ही सध्या 'श्लोर' रचत आहोत -
अर्ज किया है -
श्रावण मास | उफ्फ मांस आता बास |
खवा, पनीर हाच घास | सान-ए-डेअरी ||
(वरील श्लोरात 'सान-ए-डेअरी' हे 'नामा म्हणे, तुका म्हणे' चालीवर म्हटले तर लुत्फ वाढतो.)

आगाऊ | 15 August, 2013 - 12:17
सर, सर काही लोकांनी 'अत्त ब्लीप भव' ऐकले ते सगळे एकतर सेन्सॉर बोर्डात गेले किंवा नवकवी झाले हे खरे आहे का हो सर?

केवळ हॉर्र्र्र्रिबल आहे हे सर्व.... एरव्ही कुठे असता हो तुम्ही रोच्च्या रोज का नाय लिवत असं ? की हेफक्त 'बुधवारीच 'सुचते? Uhoh

आशुडी:

२५ वर्षानंतर :
त्याकाळी प्रताधिकार कायद्याने जन असामान्यांमध्ये मोठीच खळबळ माजवली होती. सामान्यांना हे प्रकरण जड वाटत असल्याने त्यांनी नियमांची एक प्रत स्वत:च्या अधिकारात कपाटात ठेवून दिली. काही लोकांना मात्र सविनय कायदेभंग चळवळ करणारे नेहरुंनंतर आपणच असे वाटत होते. त्यांना योग्य ते धडे व कविता शिकवण्यासाठी आमचे परम मित्र मास्त(ट)र फ़ास्टर शहाणे(सौजन्य: परममित्र राडा) धडाडीने पुढे सरसावले. दिवस रात्र न बघता ते याबाबतीत लोकांना शहाणे करून सो(झो)डत राहिले. आकाशवाणीच्या स्टुडिओतून विविध आवाज ऐकत, समोर काहीही दिसत नसताना ते लढत होते. नादवेधाने लक्ष्यभेद करणारा अर्जुनच. (रामपालांचा नव्हे!) कारण मुद्दा तत्वाचा, हक्काचा आणि अस्मितेचा होता. त्यांनी शिकवलेले धडे व कविता अशाच आकडेमिक पर्पजसाठी वापरायच्या असल्यास आजही प्रताधिकारमुक्त आहेत. आज या ठिकाणी आम्ही - त्यांच्या मित्र परिवाराने त्यांची साठीशांत करायचे ठरवले आहे. त्यांच्या वयाचा अदमास जसा अंदाजपंचे लावला आहे तसेच यानंतर तरी ते शांत होतील का ? हा प्रश्न हवामान खात्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यावरूनच ही छोटीशी घटना आठवली. प्रताधिकार कायद्यासाठी त्यांची असलेली कळकळ आणि त्यांनी चालवलेली चळवळ त्यातून निर्माण झालेली खळबळ हे मुळातूनच तळमळीने अभ्यासण्यासारखे आहे.
टीप : ही 'वेध भविष्याचा' ची झलक नाही. प्रताधिकार सुरक्षित.

साजिरा:

त्याकाळी लोक कविता नावाचा एक पदार्थ करत असत. हा पदार्थ करणारा सोडून इतर फारसा कुणाला आवडत नसे. ज्यांना आवडे, ते रसग्रहण नामक पाक करत असत, आणि कवितेपेक्षा रसग्राहक किती श्रेष्ठ ते कॉलमचे कॉलम लिहून सिद्ध करत असत. आजकाल शेकडो मीटर लांबीउंचीच्या कॉलमवर इमारती उभ्या राहतात, तशाच प्रकारे या कॉलमांवर वृत्तपत्रे नावाचे प्रकर्ण उभे राहत असे. आता ही वृत्तपत्रे नेमकं काय करत असत, हे आपण नंतर पाहू. सध्या विषय कवितेचा. तर, हा पदार्थ न आवडणारे लोक 'समीक्षा' नावाचा उपद्व्यापही कवींवर सूड घेण्यासाठी करत असत. समीक्षक हे स्वतःला कवी आणी रसग्राहक यांच्यापेक्षाही जास्त उंचीचे समजत. या सार्‍या गोंधळातून शेवटी सर्कार नावाच्या व्यक्तीने प्रताधिकार नावाचा कायदा करून टाकला. पण हा केल्याकेल्या सर्व थरांमध्ये गोंधळ उडाला. या गोंधळात प्रलय झाला असावा, आणि त्यातच ही दहा हजार वर्षांपुर्वीची संस्कृती आपसांत लढून लयास गेली असावी, असे महामहोपाध्याय...

टण्या:

महामहोपाध्याय प्रचंड्राडांनी उत्खनन केलेल्या संशोधनानुसार एक आंतर्जाल नामक वस्तु अस्तित्वात होती असे दिसते. पण ह्या वस्तुचे कुठलेही भौतिक पुरावे आजवर सापडलेले नाहीत. त्यामुळे म.म.प्रचंड्राड ह्यांचे वय वाढल्यामुळे झालेल्या मानसिक जालातून आंतर्जालाची निर्मिती झाली असावी असा त्यांचे प्रसिद्ध शिष्य प्रकांडपंडित विचूक्ष ह्यांचे म्हणणे आहे. म.म.प्रं.नुसार आंतर्जालावर लोक लिहीत असत. कसे लिहित असत ह्याचे संशोधन सुरु आहे आणि ते आंतर्जाल मिळाल्याशिवाय पूर्ण होणार नाही. पण आंतर्जालावर लिहिलेल्या चार-सहा शब्दांच्या एकापाठोपाठ एक ओळींवरून भांडणे होवून लेखकांनी एकमेकास शिव्या दिल्याचे संदर्भ सापडले आहेत. हे लेखक स्वतःला लेखक न म्हणवता कवी म्हणवत. दोन कवींच्या शिवीगाळीत कधी इतर कवी सामील होत तर बहुतेक वेळेस इतर लोक तीस करमणुकीचे साधन म्हणुन बघत. ही भांडणे व करमणुक लोक कुठे बसून करत ह्यावर संशोधन सुरू आहे. पण ममप्रंच्या म्हणण्यानुसार रोज कुठेतरी बाहेर जावून लोक हे करत, घरी असताना ते आंतर्जालावर येत नसत. ह्यावरून ममप्रंनी असा निष्कर्ष काढला आहे की आंतर्जाल ही बहुदा फार महागडी व मोलाची गोष्ट असावी जी तत्कालीन जनता दुसर्‍या कुणाच्यातरी खर्चाने करत असे. ममप्रंना उत्खननात एक पिवळसर रंगाचा आयताकृती तुकडा सापडला असून ते आंतर्जालाचे भौतिक रूप असावे असे त्यांचे म्हणणे आहे.

अबक८९
गडड गडड
बदड बदड
पोटात झाली
खूप खळबळ
फलाटावर गर्दी
रोजचीच ट्रेन
ग्यानबा तुकाराम
मध्यमवर्गीयांची चैन

पूर्वा२५
अबकदादा, फारच सुरेख

अबक८९
धन्यवाद पूर्वा

हुश्मी.कडकडे
काय भंकस आहे ही? आजकाल कुणीही उठतो आणि कविता करतो. ऑफिसातून फुकट नेट मिळते ना

अबक८९
धन्यवाद हुश्मी

चारफकीर
मात्रा चुकल्या आहेत पण आशय चांगला आहे

करवंदा
ओ चारफकीर आधी आशय लिहायला शिका आषय

चारफकीर
आम्हाला शिकवू नका

अबक८९
धन्यवार चारफकीर, करवंदा

टोण्या
असली कविता पुर्वीच दुर्ढेकरांनी लिहिली आहे. कसले आषय घेउन बसलाय दुर्ढेकर वाचा

चारफकीर
दुर्ढेकर वाचले म्हणजेच कविता कळते का? तुम्ही काय दिवे लावले दुर्ढेकर वाचून?

अबक८९
मी समग्र दुर्ढेकर वाचला आहे. असेल हिंमत तर समोर येवून बोल. ही घे दुर्ढेकरांची कविता
खडड खडड
टिग्डाग टिग्डाग
रिकामे पोट
गर्दी फार
डब्यात येतो
रुळांचा आवाज
भजन करी रोज
तेच लोक तेच टाळ
नामदेव तुकाराम

उंटावरचे वेडे
दुर्ढेकरांची कविता इथे छापून तुम्ही गुन्हा केला आहे. मी कोर्टात खेचेन तुम्हास

चक्रधर
दुर्ढेकरांची कविता उडवली आहे. मुद्द्यास धरून बोला. टोण्या/अबक८९ वैयक्तिक पातळीवर टिका करू नका. ही शेवटची सुचना आहे तुम्हास

उंटावरचे वेडे
आम्ही स्क्रीनशॉट आणि प्रिंट आउट काढून घेतलेला आहे. तो आम्ही मेलो तरी पुरावा म्हणुन उरेल.

aaravi123
mala marathi lihayala jamat nahi. please madt kara

पुपुवर शार्कनेडो. भाग -१ . अपडेट केला आहे.

फारएण्ड | 11 November, 2013 - 12:49

ओके मग येथे अंक येत आहेत तेव्हा पाहतो.

मधे येथे 'शार्कनेडो' हा एक चित्रपट चर्चेत होता. येथील एका ("साय-फाय") चॅनेल ने दाखवला तेव्हा ट्विटर पासून इतर ऑनलाईन फोरम भरून गेले होते त्याने. तो पाहायला सुरूवात केली आहे. लिहीण्यासारखा निघाला तर लिहीन. So bad it's good कॅटेगरीत अव्वल आहे असे म्ह्णतात.
उदाहरणादाखल ही क्लिप बघा. श्रद्धा तुला बॉलीवूड कडून हॉलीवूड कडे मोर्चा वळवावासा वाटला तर मी जबाबदार नाही.
http://www.youtube.com/watch?v=vb60e-VNAto

संपादन

श्रद्धा | 11 November, 2013 - 13:12

या सीनवरून आपल्याला काय कळतं?

१. शार्क्स कॅन फ्लाय.
२. शार्क रवंथ करणारा प्राणी आहे. तो आधी अख्खे भक्ष्य अजगराप्रमाणे गिळतो. खेरीज भक्ष्याला काही इजाही करत नाही. त्यामुळे भक्ष्य जिवंतच राहते. नंतर निवांत समुद्रात जाऊन रवंथ करत असावा. ('लक'मधला भक्ष्याचे लचके तोडणारा शार्क हा भारतीय गबाळ बटबटीत ढोबळ प्रजाती असेल. आधी भक्ष्य अख्खे गिळून मग संथ रवंथ करण्यातली नाजूक नजाकत त्याला काय कळणार?)
३. शार्काच्या एकदा तोंडातून शिरले की आतमध्ये एखादा बोगदा आणि त्याआसपास व्यवस्थित रचना करून सगळे अवयव असावेत. कारण एका आरीने सगळे कापत तुम्हांला बाहेर येता येते.
४. एका सर्वसामान्य शार्काच्या पोटात पूर्ण वाढीची किमान दोन माणसे मावू शकतात. (काही दिवसांनी लिफ्टमध्ये असते तशी कपॅसिटीची पाटी शार्काच्या पोटावर बाहेरून लावतील.)

आगाऊ | 11 November, 2013 - 13:15

काय महान सिनेमा आहे हा!

फारएण्ड | 11 November, 2013 - 13:18

काही दिवसांनी लिफ्टमध्ये असते तशी कपॅसिटीची पाटी शार्काच्या पोटावर बाहेरून लावतील >>> हे खतरनाक आहे हाहा. शार्कच्या पोटाची रचनाही जबरी. प्यार करे आरी चलवाये ऐसे आशिक से डरियो हे गाणे शार्क्स ने ऐकले नाही व प्रेमात पडलेल्या आरीवान माणसाला खाल्ले म्हणून ही अवस्था आली.

यात म्हणे टोर्नेडो मुळे पाण्यातील शार्क्स आकाशात उडतात व शहरात जाऊन पडतात. ते जमिनीवर पडतानाही माणसे कॅच करत पडतात असे दिसते.

संपादन

आगाऊ | 11 November, 2013 - 13:19

पण जर टॉर्नॅडोतून शार्क्स पडताहेत तर घरात लपायचे सोडून हे काय मजा बघायला बाहेर आलेत?!

गजानन | 11 November, 2013 - 13:45

स्मित

वरदा | 11 November, 2013 - 13:46

सगळेच हसून हसून गडबडा लोळण

श्रद्धा | 11 November, 2013 - 13:46

पण जर टॉर्नॅडोतून शार्क्स पडताहेत तर घरात लपायचे सोडून हे काय मजा बघायला बाहेर आलेत?!<<<<<
इम्याजिन धीस.

मनुष्य १: अगं ऐकलंस का? आकाशातून शार्क्स पडताहेत.
बाई १: पळ ए*.. काहीही काय सांगतोस?
म १: खरंच. टॉर्नेडोमुळे समुद्रमंथन होऊन शार्क्स निघाले. ते उडतायत.
बा १: भैताडासारखा काहीही बोलशील का बे? (अमेरिकेतल्या संभाषणात असा वैदर्भीय** फ्लेवर कुठून आला वगैरे विचारायचं नाय. शार्क उडू शकतात तर अमेरिकन बाई अशीच बोलेल.)
म १: विश्वास नाही बसत तर जाय मंग. तूच पाह्यजो तुह्या डोळ्यांनी.

बाई बाहेर आली आणि 'उत्सुकतेने मांजराला मारले'*** तद्वत वरून नेम धरून शार्क आला आणि त्याने बाईस गिळले. शार्कचे पोट आतून पाहिल्यावर बाईच्या सार्‍या शंका फिटल्या.

शार्काचे पोट | आतून देखिले नीट |
मनात आता किंचित | शंकाच उरली नाही||

* 'एक डाव धोबीपछाड'मध्ये मुक्ता बर्वे भारी म्हणते. ते आमाला आवडले, आमी वापरले. (आली लहर, केला कहर. होऊ दे खर्च.)
** वैदर्भीय म्हटल्यावर चिनूकंस आले असते. पण आज त्यांना पळवून लावायला भाई राजेश देशपांडे हे तीन शब्द आहेत.
*** हे ज्युमांकडून साभार. पुपुच्या सुवर्णकाळात त्यांनी हे पुपुवर लिहिले होते.

यांच्याकडे समुद्रमंथनातून शार्क निघतात, आपल्याकडे लक्ष्मी निघाली होती, खेरीज अमृत, वैजयंतीमाला (बाई नोहे, तुळशीची माळ) वगैरे मौल्यवान व निरुपद्रवी गोष्टी. भारत हा सगळ्यांत सर्वश्रेष्ठ देश आहे, हे प्रूव्हच होते याने. (हलाहलाबद्दल बोलल्यास फाउल धरला जाईल.)

फारएण्ड | 11 November, 2013 - 13:47

हाहा

संपादन

अल्पना | 11 November, 2013 - 13:55

हाहा

आगाऊ | 11 November, 2013 - 13:56

पण आज त्यांना पळवून लावायला भाई राजेश देशपांडे हे तीन शब्द आहेत.>>> आजच कशाला, त्यांना केंव्हाही शांत करण्याचा तो अक्सीर इलाज आहे

नंदिनी | 11 November, 2013 - 13:57

श्रद्धा हाहा

हिम्सकूल | 11 November, 2013 - 14:10

हाहा

आशूडी | 11 November, 2013 - 14:13

हाहा
काही अंदाज :
1.बाई बाहेर आली आणि शार्कांना आडवी गेली. म्हणून उत्सुकतेने मांजराला मारले असणार.
2. या चित्रकर्त्यांनी रामानंद सागरांचा श्रीकृष्ण अभ्यासला असणार. त्यात बगळा, अजगर सगळ्यांची पोटं बोगदे कम गुहा (पु लं!) आहेत. नशीब रस्ता चुकून बगळ्याच्या पोटातला कृष्ण अजगराच्या तोंडातून बाहेर येत नाही.
3. जनरली बाईंना पोट बाहेरून पाहिल्यावरच जास्त शंका येतात किंवा फिटतात. शार्कांना दुजाभाव का?
4. समुद्रमंथनातून सात सोंडांचा हत्ती निघून उडू शकतो तर शार्क काय चीज आहे?

फारएण्ड | 11 November, 2013 - 14:25

शार्क उडू शकतात तर अमेरिकन बाई अशीच बोलेल >>> परफेक्ट! शार्क उडणार्‍या दुनियेबद्दल बोलत आहोत आपण. त्यांना उडवणार्‍या वार्‍यामागे जे बापुडे शब्द होते ते नागपूर ई. हून आले असावेत. किंवा अमेरिकेतील लोक पूर्वी नागपुराहून आले असतील.

तसेही आपल्या धर्मग्रंथात सग्ळे लिहीलेले आहेच. बॉबी नामक धर्मग्रंथातील एका वचनाचे वर्णन वर केले आहेच. (याच ग्रंथात यशाची गुरूकिल्ली हरवल्यामुळे वैचारिक खोलीत अडकून पडणार्‍या जोडप्याचे वर्णन आहे. पण तो एक स्वतंत्र लेख आहे). आता हेच पाहा. ही स्त्री हॉलीवूड मधली असल्याने भारतीय ड्रेस नेसत नसावी. ती जर आँचल ई. असलेले ड्रेस घालत असती तर स्वतःचा शार्कचे पोट कापून बाहेर आली असती. कारण "आँचल का तेरे है तार बहुत, कोई शार्क जिगर सीने के लिये".

संपादन

फारएण्ड | 11 November, 2013 - 14:30

हे वरचे बरेचसे बहरात हलवले आहे. नंतर काही आले तर कृपया कोणीतरी हलवा.

संपादन

नंदिनी | 11 November, 2013 - 14:33

कारण "आँचल का तेरे है तार बहुत, कोई शार्क जिगर सीने के लिये".<<< हे कहाराच्या वर कहर आहे.

चिनूक्स | 11 November, 2013 - 14:34

हाहा

अश्विनी के | 11 November, 2013 - 14:38

ज्युमा, सिमा आणि फा एकत्र आले तर वाट लावतात हसवून.

आशूडी | 11 November, 2013 - 14:39

त्री पण फारेंड, बॉलीवूडची उणीव जाणवते ती अशी वेळी. सिच्वेशन कशी पकडली असती पा. - 'भैताड' शब्दोच्चार करणाऱ्या सुंदरीला आपण गिळंकृत केल्याचा शार्कला पश्चात्ताप होऊन प्रेम हॉर्मोन्स वाहणार जे की सुंदरी पोटातच असल्याने तिलाही समजणार व ती गाऊ लागणार -
ये कहां आ गए हम यूंही साथ साथ चलते
तेरी बाहों में है जानम मेरे जिस्मो जान पिघलते..

आगाऊ | 11 November, 2013 - 14:57

अमेरिकेतील लोक पूर्वी नागपुराहून आले असतील.>>> कहर
पूर्वीचे माहिती नाही पण आत्ताचे अनेक अमेरिकी भारतीय नागपूरप्रेरीत आहेत!

श्रद्धा | 11 November, 2013 - 16:10

जरा उशिराने पण तरीही...

प्यार करे आरी चलवाये ऐसे आशिक से डरियो <<<< हे फारच भारी! खरंतर असला सिनेमा बनवताना ब्याग्राउंडला अशी समर्पक बॉलीवूड गाणी टाकलीच गेली पाहिजेत.

मिलिंदा | 11 November, 2013 - 16:43

हाहा

मनीष | 11 November, 2013 - 17:18

"आँचल का तेरे है तार बहुत, कोई शार्क जिगर सीने के लिये" >> हाहा आला कंटाळा केला घोटाळा हाहा

मोलकरीण या विषयावरील मातेच्या प्रतिभेतून निघालेले रत्न

श्रद्धा | 10 February, 2014 - 11:35
आपण 'ती!!! येईल कधी?' असा एक सस्पेंस, वेगवान, चित्तथरारक थ्रिलर काढूयात. माझ्या इजिप्तप्रेमाला अनुसरून असलेली मुख्य क्यारेक्टरे तूतनखामुन आणि अन्कसूनमून हे कामवालीची वाट पाहत असताना खूप वेळ होतो तेव्हा त्यांच्यात एक डेडली पैज लागते. तूतनखामुन म्हणतो, ती येईल. अन्कसूनमून ही संसारात मुरलेली बाई असल्याने एवढा वेळ झाला तरी नाही आली तर नाहीच येणार, गावाकडे देवाच्या जत्रेला गेली असेल, हे तिला उमगलेलं असतं. तर पैज हरल्यास आपली सर्व संपत्ती दुसर्‍याच्या नावे करून ममी बनून पिरामिडाची वाट धरायची. वेळमर्यादा सूर्य बुडेपर्यंत असते. मग सुरू होतो 'दास्ताने-राहदेखना-ए-मोलकरीण'चा थरारक खेळ. मध्ये गाणे-
'चंदामामा सो गये, सूरजचाचू जागे..
देखो पकडो यारों घडी के काटे भागे...'

अन्कसूनमून ही संसारात मुरलेली असून कुटील, कारस्थानीसुद्धा असल्याने (ममी आणि ममी रिटर्न्समध्ये अस्सेच दाखवले आहे) ती मोलकरणीला आपल्या विश्वासू सैनिकांकरवी उचलून वाळवंट-ए-समारामध्ये नेऊन सोडून देते, जिथे आजूबाजूला धूळच धूळ, वाळूच वाळू बघून डस्ट अ‍ॅलर्जी असलेली ती मोलकरीण उभ्याउभ्या कोसळते.

शेवटी एकीकडे बुडत असलेल्या सूर्य आणि फिकट दिसत असलेल्या चंद्राच्या ब्याग्राउंडला आपल्या पिरामिडाकडे आणि कुटील अन्कसूनमूनकडे विद्ध नजरेने पाहणार्‍या तूतनखामुनच्या चेहर्‍यावर क्यामेरा स्थिरावत असताना 'धी एंड'.. ब्याग्राउंडला गाणे-
'सूरज हुआ मध्धम चांद जलने लगा..
आसमां ये हाये क्यू पिघलने लगा..
मै ठहरा रहा, जमी चलने लगी
धडका ये दिल, सांस थमने लगी..
क्या येही (पक्षी: अन्कसूनमून) मेरा (वोही) पहला पहला प्यार है? (जिसे मै प्यार करता था, शादी करके लाया था.????)

Pages