उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी..

नक्कीच म्हणता येईल...! म्हणूनच श्रीसद्गुरु हे 'श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ' असतात.. म्हणजेच शास्त्र जाणणारे आणि शास्त्राने प्रतिपाद्य केलेला विषय.. 'ब्रह्मवस्तू' याचा स्वतः अनुभव घेतलेला असतात... असे शास्त्रात सांगितले आहे.

म्हणूनच ज्ञानाची मुर्ति असणारी श्रीसद्गुरु ज्ञानदेव माऊली ज्ञान शब्दात मांडताना.. सुरुवातीलाच म्हणते...

'ॐ' नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरुपा ||श्रीज्ञा.||

हे 'शब्दब्रह्मा'.. सृष्टी-आद्या तुला नमस्कार असो... तूझा विस्तार म्हणजेच 'श्रीवेद' आहेत.. त्यांनी समजावून सांगितलेला विषय म्हणजे 'तूच' आहेस. तूझे मूळस्वरुप हे 'स्वसंवेद्य' आहे.. तेच 'आत्मरुप'( माझे स्वरुप) आहे. म्हणूनच तुझा जयजयकार असो.

धन्यवाद!

विचारा की Happy मला उत्तरं देता येतीलच असं नाही कारण अभ्यास नाही. माझंच चाचपडणं चालू आहे. प्रयास मात्र करेन. कधी कधी तुमचे प्रश्नच वेगवेगळ्या अँगल्सने विचार करायला भाग पाडतात Happy

**
कृपया इथे सद्गुरु म्हणवल्या जाणाऱ्या कुणाही व्यक्तीचे नाव घेऊ नये. चर्चेचा उद्देश कुणाची टवाळकी/निंदा करावयाचा नसावा. आपण एखाद्या व्यक्तीस पूज्य समजत नसू तर ते मनात ठेवावे. निदान त्यांची निंदा करु नये. एखाद्या घटनेवरुन चर्चा अगदीच out of bounds नाही पण तो वाद होऊ नये. आपल्या सगळ्यांचाच उद्देश या मार्गावर पुढे जाण्याचा आहे असे समजून चाललो तर "अनिंदकु" होणे हे त्यासाठीचे पहिले पाऊल आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
**
शैलजा,
अगदी बरोबर आहे तुमचं.. परमार्थमार्गावर चालताना सद्गुरु म्हणवणारे बरेच जण भेटतात. त्या भाऊगर्दीतून कोणाला शरण जायचं हे ठरवण्यासाठीच अगदी प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक संत आपल्याला त्यांची लक्षणं सांगत असतात. ही लक्षणे बघितल्यावरच अनुग्रह घ्यावा. दुसऱ्या कुणी सांगितलं की "अरे हे अमुक अमुक खूप सामर्थ्यवान आहेत" म्हणून, किंवा त्यांचे "ते मनातलं ओळखतात, ते भूत भविष्य जाणतात" वगैरे चमत्कार ऐकून किंवा काही स्वत:च सांगतात की मी सद्गुरु आहे, मी अमुक अमुक अवतार आहे, मी कुंडलिनी जागृत करुन देईन .. अशा वेळी पटकन सावध होण्याची गरज आहे. इथे बुद्धीचा नक्की उपयोग करावा Happy आणि ही काही आजची अडचण नाही. उपनिषदांमध्ये सुद्धा दांभिकांचा उल्लेख आहे. वेद स्वतः विप्रलिप्सेपासून ("धनाची इच्छा करणारा ब्राह्मण जेव्हा स्वतःला अनुकूल असे साधन सांगतो त्याला विप्रलिप्सा म्हणतात") मुक्त असणार्‍या मार्गाकडे जाणे सुचवतात.

दासबोधात समर्थांनी अगदी काहीही भीड न ठेवता याबाबत सूचना केल्या आहेत. त्यावर चर्चा करायची असेल तर सुचवा. (परत, चर्चा "या श्लोकांचे अर्थ" इतपतच मर्यादीत ठेवावी, कोण यावर सद्गुरु ठरतात कोण नाही ही चर्चा अपेक्षित नाही )

फोडूनि शब्दांचे अंतर । वस्तू दाखवि निजसार ।
तोचि गुरू माहेर । अनाथांचे ॥

जें जें मन आंगिकारी । तें तें स्वयें मुक्त करी ।
तो गुरु नव्हे भिकारी । झडे आला ॥

शिष्यास न लाविती साधन । न करविती इंद्रियेंदमन ।
ऐसे गुरु आडक्याचे तीन । मिळाले तरी त्यजावे ॥

जो कोणी ज्ञान बोधी । समूळ अविद्या छेदी ।
इंद्रियेदमन प्रतिपादी । तो सद्गुरु जाणावा ॥

येक द्रव्याचे विकिले । येक शिष्याचे आखिले ।
अति दुराशेने केले । दीनरुप ॥

अद्वैत निरुपणे अगाध वक्ता । परी विषई लोलंगता ।
ऐसिया गुरुचेनि सार्थकता । होणार नाही ॥

सिद्धी आणि सामर्थ्य जालें । सामर्थ्ये देहास महत्व आलें ।
तेणें बेचांड बळकावले । देहबुद्धीचे ॥

नाही उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार ।
कर्मेविण अनाचार । भ्रष्ट होती ॥

म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्मकर्म आणि साधन ।
कथा निरुपण श्रवण मनन । नीति न्याये मर्यादा ॥
यामध्ये येक उणे असे । तेणें ते विलक्षण दिसे ।
म्हणौन सर्वही विलसे । सद्गुरुपासी ॥

या समासात यातीभेदाचे उल्लेख आहेत ते त्या काळातील पद्धतीला, समाजरितींना अनुसरून आहेत. ते आता विचारात घेतले नाहीत तरी चालतील.
चर्चा अपेक्षित, योग्य नसेल तर वगळून पुढे जायला तरी हरकत नाही.

आपल्या सगळ्यांचाच उद्देश या मार्गावर पुढे जाण्याचा आहे असे समजून चाललो तर "अनिंदकु" होणे हे त्यासाठीचे पहिले पाऊल आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
>>>> आधिच्या पोस्ट्समध्ये उल्लेख केलेल्या निसरड्या स्पॉट्सपैकी हाही एक आहे. पण "अनिंदकु" होणे हे तो टाळण्यासाठीचे पथ्य आहे. 'क्ष', मस्त पोस्ट. दासबोधातील तो भाग इथे दिल्याबद्दल धन्यवाद Happy

क्ष, फलाणी व्यक्ती सद्गुरु आहे वा नाही ह्याची चर्चा करण्यात मला काहीच स्वारस्य नाही, तरीही सद्गुरु ह्या पदापर्यंत पोहोचणारी व्यक्ती काय सद्लक्षण बाळगून असते ह्याची चर्चा म्हणा, किंवा मनन करण्यास काहीच प्रत्यवाय नसावा. उलट मी तर म्हणेन की आजच्या काळात, ज्याला अद्ध्यात्माविषयी आवड आहे, वा ज्याला ह्या मार्गावरुन जायचे आहे त्या व्यक्तीला ही लक्षणे माहित असणे बरेच.

अनिंदकु होणे म्हणजे सत्याला सत्य म्हणायला कचरणे आणि सोयीचे ठरतील अशा मुद्द्यांवर एकमेकांना साधु साधु म्हणणे हा अर्थ तर अभिप्रेत नाही ना? असो.

वा ज्याला ह्या मार्गावरुन जायचे आहे त्या व्यक्तीला ही लक्षणे माहित असणे बरेच.
>>>> शैलू, ही लक्षणे आणि उत्तम/मध्यम/अधम शिष्य लक्षणे, नवविधा भक्ती (विस्ताराने) हे सगळं ह्या मार्गावरुन जाऊ पहाणार्‍या व्यक्तीला माहित असणे खरंच आवश्यक आहे.

ही लक्षणे बघितल्यावरच अनुग्रह घ्यावा. >> खरं सांगू? अनुग्रह घेण्यापेक्षा तो लाभावा. पूर्णपणे वैयक्तिक मत आहे. Happy जे अनुग्रह घेतात, त्याचाही आदरच आहे, त्याबाबत काहीच अनादर नाही. Happy पण गुरुकृपा ही केवळ साधन-साध्य नाही असं मला वाटतं. त्यापलिकडची ती गोष्ट आहे, कृपा साध्य. ती लाभायला हवी, ती लाभावी म्हणून त्या दिशेने अनुकूल प्रयत्न जरुर करता येतील, पण म्हणजे ती लाभेलच असे नाही. लाभणारे भाग्यवान. Happy थोडक्यात, ह्या हृदयीचे या हृदयी हे प्रत्येकाच्याच बाबतीत होत नाही एवढेच म्हणायचे आहे.

परमार्थ मार्गावर चालताना पासून ते बुद्धीचा वापर करावा ह्या सगळ्याच परिच्छेदाला अनुमोदन.

अश्विनी, हे माहिती असणं आवश्यक आहेच, पण जरी शास्त्रं काय म्हणतात हे ठाऊक नसलं तरी क्ष म्हणतात तसं आपल्याला बुद्धीचा वापर करता येतोच की. आपण संत महंतांच्या कथा/ चरित्रे वाचतो. उदा. रामदास स्वामी, स्वामी समर्थ, साईबाबा, गोंदवलेकर महाराज, अगदी अलिकडचे गाडगेबाबा, परमहंस, विवेकानंद ह्यांसारख्या संत महंतांबद्दल वाचलं की जाणवतं की ह्यांनी शिष्यांकडून कधीही पैसा, वस्तू वगैरे मागण्या केल्या नाहीत, स्वतःसाठी इमले उठवले नाहीत, शिष्यांच्या नावाखाली गुंडांची फौज बाळगली नाही, गोतावळा जमा केला नाही. स्वतःच्या भौतिक सुखदु:खाबद्दल ह्या विभूती विरक्त होत्या. त्यांना कधी रेशमी, भरजरी वस्त्र प्रावरणांची गरज पडली नाही, किंवा त्यांना जे मानत नाहीत त्यांनाही कधी अशा विभूतींनी कस्पटासमान वागवलेले माझ्या तरी कुठे वाचनात आलेले नाही. मग हे जे आपण वाचतो, ते असंच फुकट का? अश्या विभूतींच्या आचरणाविरुद्ध नेमकं आजच्या गुरु म्हणवल्या जाणार्‍या कित्येकांची वागणूक असते. अशांना गुरु मानायला, माझी तरी तयारी नाही.

मुक्ताई म्हणते, ब्रह्म दिसे उघडे! आणि तरीही ते दिसत नाही! Happy ते दाखवून देऊ जो शकतो, तो गुरु Happy असं माझं वेडंबागडं मत. चुकीचंही असेल, नाकारत नाही.

>>ही लक्षणे आणि उत्तम/मध्यम/अधम शिष्य लक्षणे, नवविधा भक्ती (विस्ताराने) हे सगळं ह्या मार्गावरुन जाऊ पहाणार्‍या व्यक्तीला माहित असणे >> हे माहित असलं तर उत्तमच पण ज्याने त्याने आपल्याला झेपतं आणि मनापासून जमतं ते केलं तरी ते परमात्म्यापाशी रुजू होत असावं, होतच असेल. देवाचिये द्वारी | उभा क्षणभरी | त्याने चारी मुक्ती | साधियेल्या || हे सांगितलेलं आहे. अर्थात, देवापाशीच ध्यान असेल तर. Happy मग नवविधा भक्ती कशी करायची हे माहित नसेल तर चालणार नाही का? नाही तर, सगळं पुस्तकी ज्ञान आहे पण भाव नाही.. चालेल का? Happy

देवापाशीच ध्यान असेल तर.>>> ही तर बेसिक रिक्वायरमेंट आहे आणि आपली चर्चा त्याहून केव्हाच पुढे गेली आहे. ही गोष्ट गृहीत न धरता पुढे जाताच येणार नाही. Happy नवविधा भक्तींपैकी एकजरी प्रकार भक्ताला व्यवस्थित जमला तरी तो प्रकार त्याचा हेतू साध्य करुन देतो. काहीही पुस्तकी ज्ञान नसलेला भक्त "आत्मनिवेदन" या भक्तीप्रकारानेही भगवंताच्या खूप जवळ जाऊ शकतो. या मार्गावर पुढे जाता जाता बाकीच्या आवश्यक गोष्टी पदरात पडत जातात. या मार्गात ट्रान्झिशन फेजेस असतातच.

ह्या हृदयीचे या हृदयी हे प्रत्येकाच्याच बाबतीत होत नाही एवढेच म्हणायचे आहे.
>>> खरं आहे. पण जेव्हा हे घडतं तेव्हा ते गुरुस्थान आपल्यासाठी आहे हे मानावं आणि पुढे जावं. बाकी इतर कुणाला मानणं न मानणं, त्यांच्याबद्दल आदर असणं नसणं हे पुर्णपणे वैयक्तिक आहे.

>बेसिक रिक्वायरमेंट आहे आणि आपली चर्चा त्याहून केव्हाच पुढे गेली >> ओके, अश्विनी, चालूदेत. Happy
खरं तर बेसिक रिक्वायरमेंटची इतकी पूर्तता झाली असेल, तर चर्चाही करायची गरज पडणार नाही, असा एक विचार मनात डोकावला, पण असो. Happy

शैलजा,
गुरुकृपा आणि आत्मकृपा यांत फरक नाहीच खरंतर.. पण असे भाग्य लाभण्याचा विचार करत राहण्यापेक्षा मोक्षेच्छा असेल त्याने सद्गुरु भेटताच अनुग्रह घ्यावा.
अनुग्रह होणे/घेणे आणि खरी गुरुकृपा होणे या गोष्टी मात्र वेगवेगळ्या असू शकतात. ग्रह हा शब्द आहे तिथे, ग्रहण करणे, हाताशी धरणे असा त्याचा अर्थ आहे. सद्गुरु अक्षरशः आपल्याला हाताशी धरतात. कुणी एखादी व्यक्ती अशी भाग्यवंत असते जी पूर्ण अधिकारी असताना सद्गुरु भेटतात आणि "कानावचनाचिए भेटी-| सरिसाचि पै किरीटी । वस्तु होऊनि उठी । " अशी ती मुक्त होतो. ती मी नाही असाच विचार करुन पुढे गेले पाहिजे Happy
तुकोबांचे उदाहरण याबाबत खूप बोलके आहे. त्यांना स्वप्नात अनुग्रह मिळाला. अनुग्रह मिळाल्यानंतर पंधरा दिवस त्यांनी रात्रंदिवस नाम घेतले आणि त्यांना "पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला | विठ्ठल भेटला निराकार|" त्यानंतर त्यांनी साधना केली आणि अतिशय खडतर साधनेनंतर त्यांना "जसा भेटायला हवा तसा" विठ्ठल भेटला.
असो.

तुमच्या "सत्याला सत्य" म्हणण्यामागची विचारधारा लक्षात आली नाही. इथेच इतरत्र एका मोठ्या माणसाने सांगितल्याप्रमाणे परमार्थ हा अतिशय स्वार्थ बघणारा.. खर्‍या अर्थाने "स्व अर्थ" बघणारा .. व्यक्तिसापेक्ष आहे. ही साधना आपली आपण करायची आहे. चर्चेपर्यंत ठीक पण इथे क्ष ने दुसर्‍याला "तुम्ही हे करताय ते चुकीचे आहे, हे करा" असे अधिकाराशिवाय सांगणेच चुकीचे आहे. तो अधिकार फक्त सद्गुरु आणि संतांचा. अनिंदकु म्हणण्यामागचा उद्देश तुकोबांचे "कोण्याही जीवाचा न घडो मत्सर | वर्म सर्वेश्वर पूजनाचे|| " हे मानण्यापलिकडे काही नाही. कुणाची हांजी करुन क्ष व्यक्तीला काय फायदा होईल.. व्यावहारिक फायदा असेल तर इथे जागा चुकली आहे.. पारमार्थिक फायदा शून्य Happy
त्या पलिकडे जाऊन बघायला गेलं तर हे लक्षात घेणं आवश्यक आहे की सद्गुरु आणि साधू/संत/ज्ञानी यांतही फरक आहे. सद्गुरु संत/ज्ञानी असतातच.. पण प्रत्येक संत/ज्ञानी सद्गुरुपदावर असेलच असे नाही. पण त्यामुळे ते ज्ञानी नाहीत, पूजनीय नाहीत असे नाही. आणि अशा व्यक्तींचा अनादर होऊ नये.

असो. भा.पो. पण Happy

>>अनुग्रह होणे/घेणे आणि खरी गुरुकृपा होणे या गोष्टी मात्र वेगवेगळ्या असू शकता>>>> होय, मी गुरुकृपेबद्दल बोलत आहे, आणि म्हणूनच एखाद्या भाग्यवंतालाच ती लाभते, असे म्हटले आहे. ह्या हृदयीचे या हृदयी हे प्रत्येकाच्याच बाबतीत होत नाही एवढेच म्हणायचे आहे - हे म्हटले होते. त्या अनुषंगाने मी बोलत होते.

>>त्याने सद्गुरु भेटताच अनुग्रह घ्यावा. >> सद्गुरु भेटताच हे महत्त्वाचे Happy
साधना आपली आपण करावी, हे अगदी मान्य, चर्चेचा विषय नव्हेच तो. Happy

दुसरे, कोणलाही कोणीही तुम्ही हे चुकीचे करताय, असे सांगायचा अधिकार वगैरेबद्द्दल मी बोलत नाहीये, आणि चर्चेपलिकडे, काही वैयक्तिक बोलण्याकडे मी गेले आहे असे मला वाटत नाही. भा पो तर उत्तमच आहे. असो. Happy

अहो तुम्ही वैयक्तिक बोलण्याकडे गेला आहात असे कुठेही म्हणत नाहीये मी.. पण कुणीच जाऊ नये म्हणून पहिल्यांदाच डिस्क्लेमर दिलेला बरा असतो. आपण सार्वजनिक जागेवर चर्चा करतोय तेव्हा कुणी पटकन नवीन व्यक्ती आली तर त्यांना एक पार्श्वभूमी हवीच.

>>ब्रह्म दिसे उघडे! आणि तरीही ते दिसत नाही! ते दाखवून देऊ जो शकतो, तो गुरु असं माझं वेडंबागडं मत
तुमची यावरची मतं वाचल्यावर तुम्ही यात स्वतःचे परिश्रम, साधनासुद्धा धरली आहे हे समजून चालतो. नाहीतर "मी घरी बसेन आणि सद्गुरु मला मोक्ष हातात आणून देतील" असा समज झाला कुणाचा तर गडबड होईल. Happy
असो. चर्चा कशावर करायची यावर तर एकमत झालं.. जाऊद्या पुढे..

"मी घरी बसेन आणि सद्गुरु मला मोक्ष हातात आणून देतील" >>>> यावर श्रीसाईसच्चरिताचे अख्खे अध्याय १६ व १७ आहेत Happy

इथे चर्चा सदगुरु कसा असावा , त्याची ओळख कशी करावी इ. वर झाली आहे, ती योग्य आहे.
पण शिष्य कसा असावा. आत्मज्ञान मिळवण्यासाठी आपल्यावर शिष्य म्हणुन काय जबाबदारी आहे, खरा शिष्य कसे बनावे , कसे वागायला हवे यावरही विचार करणे आवश्यक आहे. सद्गुरु मिळणे जितके अवघड तितकेच खरा शिष्य बनणेही अवघड.
यावरील एक उदाहरण:
कै. पं. भीमसेन जोशी यांचे गुरु सवाई गंधर्व यानी त्याना शिष्य म्हणुन स्वीकार केल्यावर एक वर्ष घरी रियाज वगैरे काही नाही दोन वेळा पाणी भरायचे काम दिले होते. फक्त पाणी भरायचे. या ठिकाणी कोणी साधा माणुस असता तर त्याने "हा कसला गुरु, गडीमाणसासारखे राबवुन घेतोइ.इ" म्हणुन यथेच्छ निंदा केली असती आणि सोडुन गेला असता. पण पंडीतजींची त्यांच्या कलेवर आणि गुरुवर अपार श्रद्धा होती त्यामुळे त्यानी एकनिष्ठेने गुरुनी सांगितले ते फॉलो केले आणि त्याचे पुढे काय झाले हे आपल्याला माहित आहेच.

डोळसपणे गुरु करावा हे खरच पण आपल्याला शिष्य म्हणुन लायक बनवावे हेही तितकेच खरे. आपले ध्येय हे सद्गुरुंचे टेस्टींग करणे नसुन ज्ञान प्राप्ती आहे हे लक्षात ठेवायलाच हवे.

>आपल्याला शिष्य म्हणुन लायक बनवावे हेही तितकेच खरे. >> १०० टक्के बरोबर आहे मनस्मी. ह्यात कोणाचे दुमत होणार नाही. Happy

भो रे मत कर गुमान
गुरुसंगं राखो इमान

गुणसागर गुरु महान
संग गुरु के गुणनिधान
गुणघट मे गुरु ही प्राण
देखोनी गुरु को पहचान..
Happy

क्ष, अरे सुरुवातीपासूनच्या पोस्ट पाहिल्यास तर तुला आढळेल की मधे मधे हा बाफ शांतच असतो. मग एक दिवस कुणीतरी पोस्ट टाकतं आणि परत चालू होतो Happy

अश्विनी,

... आपले बोलणे झाल्यानुसार,खाली काही 'प्रश्न' आहेत... कृपया ते पहावेत.

>>>श्रीब्रह्मर्षी नारदांचा गाव म्हणजे भर्गलोक.
'भर्गलोक' म्हणजे काय?

>>>बाकीचे मार्गही तिथे नेतात पण त्या मार्गांमध्ये पतनभयच जास्त असतं. आणि हे मार्ग मोक्ष मागतात, तर भक्तीमार्ग सामिप्य मुक्ती मागते.

"याचा अर्थ सगळे मार्ग एकाच ठिकाणी जातात".... असे असताना... 'मार्गावरचे पतन भय' जास्त-कमी हे कसे ठरवायचे? सगळे मार्ग भर्गलोकातच जातात हे एकदा पक्के झाल्यानंतर... म्हणजेच हेच 'साध्य' आहे हे ठरल्यानंतर.... इतर मार्ग 'मोक्ष' मागतात आणि भक्तिमार्ग 'सामिप्य-मुक्ति' असे म्हणणे म्हणजे 'साध्य' वेगळे आहे.. असे म्हणायचे आहे काय?

>>>मोक्ष म्हणजे काहीच न उरणे, तो दिसला तरी त्याचा आनंद उपभोगायलाही न उरणे.
'मोक्ष' म्हणजे काहीच न उरणे... हे 'साध्य' आहे का नाही? काहीच न उरणे म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे? 'आंनंद' उपभोगायचा म्हणजे काय करायचे?

>>>बाकिच्या मार्गांनी जाणारे त्याच तोडीचे असावे लागतात. देवयान पंथ म्हणजे भक्तीचा मार्ग. प्रत्येक माणसासाठी हा मार्ग एक्स्क्लुझीव असतो. त्या मार्गाने एकावेळी एकच जण जातो.
म्हणजे काय म्हणायचे आहे?

>>>अशावेळी जो "मी" च्या ऐवजी भगवंताला महत्व देतो त्याचा मार्ग सुकर होतो. त्याच्या वाटेवरुन तो भगवंतच त्याला कडेवर घेऊन जातो.

हे प्रत्येक मार्गाला लागू होणार नाही काय? जर 'हो' असेल तर प्रत्येक मार्ग 'सुकर' होणार नाही काय? किंवा जर श्रीभगवंताना महत्त्व नसेल तर कोणताच मार्ग 'सुकर' होणार नाही... असे म्हणता येईल काय?

श्रीभगवंत 'त्याला' कडेवर घेऊन कुठे जातात? किंवा श्रीभगवंत भेटल्यानंतर अजून कोठेतरी जावे लागते काय?
श्रीभगवंताना महत्त्व द्यायचे म्हणजे... काय करायचे?
धन्यवाद! Happy

mansmi18,
धन्यवाद!

जा 'मोहन' प्या... नमस्कार.. कसे आहात?
पू.श्री म्हादबा पाटलांच्या माहेरची.. कृष्णाकाठच्या औदुंबरतळाची काय खबर? Happy

नमस्कार,

बरेच दिवस हे प्रश्न आहेत त्याची उत्तरे याच बाफ वर मिळतील असा विश्वास आहे म्हणुन विचारतोय,

१. आमच्या गुरुंच्या चरित्रात दासबोधातील एका ओवीचा संदर्भ आहे..
त्यांच्या लहानपणी त्यांच्या माजघरातील कपाटात झुरळे सापडली तेव्हा त्यांच्या मातोश्रीनी त्यांच्या वडीलाना विचारले इतक्या बंदोबस्त असलेल्या कपाटात झुरळे कशी? तेव्हा आमच्या गुरुनी पुढील ओवीचा संदर्भ दिला.
ढेकुण म्हणतो माझे घर, डास म्हणतो माझे घर
पिसवा म्हणती माझे घर, झुरळ म्हणती माझे घर..
अर्थ थोडाफार कळल्यासारखा वाटतो पण सावट, क्ष यानी सांगितल्यास आनंद होइल.

२. "पंढरीच्या देवा तुला दृष्ट लागली..ओवाळीती तुला रे देवा संतमंडळी" असा एक अभंग आहे तो पुर्ण कोणाला माहित असल्यास सांगाल का? माझ्या विपुत लिहिल्यासही चालेल. (बर्‍याच जणाना विचारले पण अजुन उत्तर मिळाले नाही आहे).

अनेक धन्यवाद.

पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली
ओवाळिती तुला रे देवा संत मंडळी
देवा भक्त मंडळी
पुंडलिकासाठी देवा इथे आलासी
वीटेवरी नीट उभा कर कटेसी
सभा मंडपात उभा गरुड शेजारी
एकनाथा घरी पाणी वाहसी
नामदेवासंगे एका ताटी जेविसी
जनाबाई सुळी देता तूच रक्षिसी
दामाजी पंतासाठी महार झालासी
कान्होपात्रा कुलवंती (हा शब्द नक्की ठाऊक नाही) चरणा नेलीसी
मीराबाई विष प्याला तूच भक्षीसी
सावत्याची भाजी खुडूनी भारा बांधसी
कबीराचा शेला विणूनी घडी घालिसी
कर्माबाईची खिचडी खाता तृप्त जाहलासी
इतके भक्त मिळूनी तुझी दृष्ट काढती
रुक्मिणी विनविते हरीच्या चरणाशी

शेवटची ओळ मला नक्की ठाऊक नाही.

रात्र काळी घागर काळी । यमुनाजळें ही काळी वो माय ॥ १ ॥
बुंथ काळी बिलवर काळी । गळां मोतीं एकावळी काळी वो माय ॥ २ ॥
मी काळी कांचोळी काळी । कांस कांसिली ते काळी वो माय ॥ ३ ॥
एकली पाणीया नचजाय साजणी । सवे पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥ ४ ॥
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी । कृष्णमूर्ति बहू काळी वो माय ॥ ५ ॥

आपल्या सर्वांना परिचित असणारा.. सर्वांगसुंदर असा अभंग आहे. प.पू.सद्गुरु श्रीनामदेव महाराजांच्या गाथे मध्ये २५५ क्रमांकावर हा अभंग आलेला आहे. श्रीसंत नामदेव महाराज आणि श्रीविष्णुदास नामा ..या दोन भिन्न व्यक्ती आहेत असे काही संशोधकांचे म्हणने आहे.. त्यातले ग्राह्य-अग्राह्य या वादात आपल्याला जायचे कारण नाही.. आपण या अभंगाचा सरलार्थ श्रीसद्गुरुकृपेने पाहूयात ...

रात्र काळी घागर काळी । यमुनाजळें ही काळी वो माय ॥ १ ॥

काळी कभिन्न रात्र आहे आणि अशा वातावरणाच्या प्रभावाखाली एक स्त्री पाणी आणण्यासाठी घागर घेऊन.. यमुना नदीकडे पाणी आणायचा.. बेत करत आहे. अशा वेळी त्यांना कायकाय दिसत.. तीच्या मनात काय काय विचार येत आहेत याचे वर्णन हा अभंग करतो.

एक स्त्री.. दुसरीला,आपल्या सखीला म्हणते आहे..अग रात्र किती काळी आहे ना.. त्यामुळे माझी घागर ही काळी दिसत आहे.. आणि लांबून यमुनेचे पाणी ही काळेच दिसत आहे...

बुंथ काळी बिलवर काळी । गळां मोतीं एकावळी काळी वो माय ॥ २ ॥

बुंथ म्हणजे घुंगट.. ती स्त्री आपल्या सखी ला म्हणते आहे.. अग माझा घुंगट ही काळाच दिसत आहे.. माझे बिलवर.. बांगड्या काळ्याच दिसत आहेत... एवढेच नाहीतर माझ्या गळ्यातील... पांढर्‍या मोत्यांची माळ ही काळीच दिसत आहे...

मी काळी कांचोळी काळी । कांस कांसिली ते काळी वो माय ॥ ३ ॥

सखे ! अजून काय सांगू.. मी स्वत: काळीच दिसत आहे... माझी कांचोळी.. माझा कसलेला कासोटा इ. वस्त्रेही काळीच दिसत आहेत..! त्यांचा रंग ही ओळखता येत नाही.

अशी ही तीची अवस्था लक्षात आल्यावर तीची सखी तीला म्हणते.. धीर देते..

एकली पाणीया नचजाय साजणी । सवे पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥ ४ ॥

ती सखी गोपी मोठ्या काळजीने.. प्रेमाने सांगते आहे.. अग बाई माझे.. अशी एकटी-दुकटी पाणी आणायला अंधारात जाऊ नकोस..तर बरोबर जाताना सावळ्या कृष्णाच्या मुर्तिला-त्याच्या शुभ्रनीलप्रभेला सोबत म्हणून घेऊन जा.. म्हणजे तूला व्यवस्थित जाता येईल!

विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी । कृष्णमूर्ति बहू काळी वो माय ॥ ५ ॥

श्रीमहाराज शेवटी म्हणतात माझी स्वामिनी ही काळीच आहे.. कारण माझा कृष्णही काळाच आहे.

आपल्याला माहीतच आहे की श्रीसंत आपला परमार्थातचा अनुभव गूढतेने सांगतात. याचा ’योगपर’ अर्थ ही पहाण्यासारखा आहे.

धन्यवाद!

अवांतर आहे पण, अर्थासाठी म्हणून -
बुंथ म्हणजे घुंगट?

बुंथ = http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%AC%E0%A5%81%E0...

डोक्यावरुन घ्यायचे एक वस्त्र असा अर्थ मोल्सवर्थमधे दिलाय.
त्यानुसार चुंबळ हे योग्य वाटते.

mansmi18,
नमस्कार!

ढेकुण म्हणतो माझे घर, डास म्हणतो माझे घर
पिसवा म्हणती माझे घर, झुरळ म्हणती माझे घर..

हा संदर्भ श्रीदासबोधातील... 'स्तवननाम' या प्रथम दशकातील.. 'नरदेहस्तवननिरूपण' या दहाव्या समासातील आहे.

श्रीदासबोध... म्हणजे श्रीरामचंद्रांच्या दासाला... श्रीरामकृपेने झालेला 'बोध'... म्हणजेच ज्ञान. आपण मागे 'योग आणि बोध' याविषयी थोडे पाहीले होते.परत थोडे पाहूयात.. परमार्थाकरीता लागणारे 'साधन'.. हा झाला 'योग' आणि ते साधन कसे वापरायचे... वापरताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची.. तयारी करायची.. त्याच्या वापराने होणारे असे, कोणते बदल अपेक्षित आहेत... आपली प्रगती योग्य मार्गाने होते आहे का नाही....याचे 'ज्ञान' म्हणजेच बोध...किंवा शास्त्र. हे लाभलेले 'साधन'... 'योग' होत असताना जे बदल जाणवतात... त्यालाच 'अनुभव' असे म्हणतात.

मग आपल्या मनाला आवडेल..रुचेल त्याला परमार्थ अनुभव असे म्हणता येईल का?.. तर नाही. हा आपल्याला आलेला अनुभव..म्हणजेच स्वानुभव... श्रीसद्गुरुंनी केलेल्या उपदेशासी.. त्यांच्या अनुभवाशी मिळता-जुळताच पाहीजे... आणि तो अनुभव शास्त्रामधे लिहलेल्या अनुभवाशीही जुळणारा पाहिजे. म्हणजेच आत्मप्रचिती,श्रीगुरुप्रचिती आंणि शास्त्रप्रचिती ही एकच असेल... तरच त्याला 'अनुभव' म्हणता येईल... अन्यथा त्याला 'मनाचा भ्रम-कल्पना' म्हणावे लागेल.

परमार्थ अनुभव हा कल्पनेच्या प्रांतातला नसतो... किंबहूना जेथे मनाचे मनपण संपते... त्याचा संकल्प-विकल्प करण्याचा स्वभाव संपतो... ते एकाच जागी विनासायास थांबते... त्यावेळी जागृतीअवस्थेतील येणारा अनुभव.. हाच ग्राह्य मानला जातो... बाकी सगळे भ्रम... कल्पनाविलास! म्हणूनच 'श्रीदासबोध' अतिमहत्त्वाचा ठरतो... त्याची 'जागा' आपल्या मस्तकावर धारण करण्याची आहे.

श्रीसमर्थ आपल्या बोधामृताला शब्दरुप देताना.. श्रीदासबोधाची सुरुवात कशी करतात हे पहाणे मोठ्या औत्सुक्याचे आहे. या 'स्तवन' असेच नामकरण केलेल्या प्रथम दशकाची सुरुवात आपण थोडक्यात पाहूयात... __/\__!

श्रीदासबोधाची सुरुवात ही प्रश्नाने झाली आहे...

श्रोते पुसती कोण ग्रंथ| काय बोलिलें जी येथ |
श्रवण केलियानें प्राप्त| काय आहे ||१||

जमलेले श्रोते विचारत आहेत... हा कोणता ग्रंथ आहे?... त्यात काय सांगितले आहे? सांगितलेले श्रवण केल्यानंतर आम्हास काय 'प्राप्त' होईल?

यावर श्रीसमर्थ सांगत आहेत...

ग्रंथा नाम दासबोध| गुरुशिष्यांचा संवाद |
येथ बोलिला विशद| भक्तिमार्ग ||२||

या ग्रंथाचे नाव 'दासबोध' असे आहे. हा प्रश्न आणि त्याचे उत्तर अशा संवादाने विस्तारला आहे. यात 'शुद्ध,विमल भक्तिमार्गाविषयी' विवेचन सांगितले आहे.

श्रीसमर्थ पुढे म्हणतात...

नवविधा भक्ति आणि ज्ञान| बोलिलें वैराग्याचें लक्षण |
बहुधा अध्यात्म निरोपण| निरोपिलें ||३||

यात नवविधा भक्ति.. त्याचे ज्ञान... त्याकरीता लागणारे वैराग्य इ. 'अध्यात्म' या विषयासंबंधीत निरुपण.. निरोपिले आहे. ( शब्द कसे असावेत.. हे श्रीसमर्थवाणीच जाणे.. जयजय रघुवीर समर्थ!)

भक्तिचेन योगें देव| निश्चयें पावती मानव |
ऐसा आहे अभिप्राव| ईये ग्रंथीं ||४||

श्रीसमर्थ, स्वानुभवाने... निश्चयपुर्वक असा 'अभिप्राय' या श्रीग्रंथरुपाने देत आहेत.. 'भक्ति आणि योग'... म्हणजेच 'श्रद्धा आणि साधन'... याची जर सांगड जुळली तर मानवास.. याच जन्मात देवाची भेट होतेच होते.

धन्यवाद!

श्रीदासबोधातील याच प्रथम दशकात... परमार्थस्तवनाच्या समासात श्रीसमर्थ म्हणतात...

आतां स्तऊं हा परमार्थ| जो साधकांचा निजस्वार्थ |
नांतरी समर्थामध्ये समर्थ| योग हा ||१||
आहे तरी परम सुगम| परी जनासी जाला दुर्गम |
कां जयाचें चुकलें वर्म| सत्समागमाकडे ||२||

श्री समर्थ म्हणतात... 'परमार्थ' हा प्रत्येक साधकाचा निजस्वार्थ.. स्वार्थाचाही स्वार्थ आहे. पहायला गेले तर, हा परम-सुगम आहे... सहज आहे... पण सत्संग न घडल्यामूळे.. हा दुर्गम झाला आहे... सुलभ नाही.

नाना साधनांचे उधार| हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार |
वेदशास्त्रीं जें सार| तें अनुभवास ये ||३||

परमार्थाकरीता सत्संगाव्यतिरीक्त जी इतर..नाना साधने केली जातात... त्यात उधारीचा व्यवहार असतो.पण सत्संगामूळे... श्रीवेदशास्त्राचे सार असणारा.. ब्रह्मसाक्षात्कार... रोकड्या स्वरुपात अनुभवास येतो.

अनंत जन्मींचें पुण्य जोडे| तरीच परमार्थ घडे |
मुख्य परमात्मा आतुडे| अनुभवासी ||२४||

मागच्या अनंत जन्मात जर 'शुद्धपुण्य' जोडले असेल..तरच परमार्थ होतो..घडतो आणि त्यामूळे सर्वात मुख्य असा परमात्मा अनुभवास येतो.

जेणें परमार्थ वोळखिला| तेणें जन्म सार्थक केला |
येर तो पापी जन्मला| कुलक्षयाकारणें ||२५||

श्रीसमर्थ म्हणतात.. ज्याने परमार्थ ओळखला.. त्यानेच जन्माचे सार्थक केले.

असो भगवत्प्राप्तीविण| करी संसाराचा सीण |
त्या मूर्खाचें मुखावलोकन| करूंच नये ||२६||

संसारात येऊन.. भगवत्प्राप्तीविण इतर खटपटी करण्याने व्यर्थ शीणच होईल.

भल्यानें परमार्थीं भरावें| शरीर सार्थक करावें |
पूर्वजांस उद्धरावें| हरिभक्ती करूनी ||२७||

म्हणूनच ज्यांना आपले भले व्हावे असे वाटत असेल.. त्यांनी श्रीहरिभक्ती करावी... आणि मनुष्य शरीराचे ..जन्माचे सार्थक करावे.

धन्यवाद!

Pages