उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

>>आपल्या किंवा माझ्या मते नाही.. तर शास्त्राच्या मते >> ह्या वाक्याचा अर्थ असा घेते, की शास्त्राच्या मते प्रश्न विचारणे चुकीचे. बरोबर आहे का? असेल, तर,

आपण लिहिलेले, "त्यातला जिज्ञासू म्हणजे .. परमेश्वराविषयी प्रश्न विचारणारा.. म्हणूनच सर्व शास्त्रे ही जिज्ञासूच्या जिज्ञासेतूनच निर्माण झाली. म्हणूनच जिज्ञासू माणसासाठीच शास्त्र आहे." हे वाक्य विरोधाभासी आहे, असे म्हणावेसे वाटते. जर जिज्ञासू लोकांची जिज्ञासा शांत करण्यासाठी शास्त्राची निर्मिती झाली असेल, तर शास्त्राच्या मते प्रश्न विचारणे, चूक कसे काय?

बाकीचे थोड्या वेळाने लिहायचा प्रयत्न करते, आत्ता एवढा वेळ नाही. धन्यवाद Happy

हसरी,

>>>अजुन एक प्रश्न मनुष्य त्याच्या कर्मामुळे प्राणी किंवा पशुच्या योनीत जातो. तसं झाडाच्या नाही का जात?तसं पाहिलं तर झाड सजीव आहेत म्हणजे त्यांना ही हवा,पाणी आणि अन्नाचे गरज असते. दुसर्‍या बाजुने पाहिले ही निर्जिव कारण ते एकाच ठिकाणी असतात.

याच्या उत्तरासाठी.. 'श्रीसमर्थ' वचनाचा आश्रय घेऊयात...

जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणः |
कृमयो रुद्रलक्षाश्च विंशल्लक्षा गवादयः ||
स्थावरा स्त्रिंशल्लक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवाः |
पापपुण्यं समं कृत्वा नरयोनिषु जायते ||

मनुष्यें च्यारी लक्ष| पशु वीस लक्ष |
क्रिम आक्रा लक्ष| बोलिलें शास्त्रीं ||श्रीदासबोध२०.६.४||
दाहा लक्ष ते खेचर| नव लक्ष जळचर |
तीस लक्ष स्थावर| बोलिलें शास्त्रीं ||५||
ऐसी चौऱ्यासी लक्ष योनी| जितुका तितुका जाणता प्राणी |
अनंत देह्याची मांडणी| मर्यादा कैंची ||६||
अनंत प्राणी होत जाती| त्यांचें अधिष्ठान जगती |
जगतीवेगळी स्थिती| त्यास कैंची ||७||

जन्म-मरण चक्रात एकून चौर्‍यांशी लक्ष योनी आहेत. त्याची विभागणी.. शास्त्रानुसार वरील प्रमाणे आहे. पशु वीस लाख्..कृमी-कीटक अकरा लाख...दहा लाख खेचर.. म्हणजे पक्षी.. नऊ लाख जलचर्..तीस लाख स्थावर म्हणजे झाडे-झूडपे.. आणि महत्त्वाचे म्हणजे.. चार लाख मनुष्यप्राणी. म्हणजेच मनुष्यात सुद्धा झाडाप्रमाणे.. चार लाख प्रकार आहेत... आहेना विचार करायला लावणारी गोष्ट. Happy

>>>मग फक्त मनुष्य्,प्राणी, पशु, पक्षी ह्यांनाच कर्मानुसार जन्म प्राप्त होतो का? कि झाडांना सुध्दा?

वर अश्विनींनी सांगितल्यानुसार... नवीन फळ देणारे कर्म हे फक्त मनुष्य जन्मातच होते.. आणि बाकीचे .. वरील प्रमाणे होणारे.. जन्म, हे फक्त भोगासाठी असतात.. हे भोग चांगले--वाईट दोन्हीही असतात. यात नवीन कर्म-फळ तयार होत नाही.... फक्त जुनेच येणे प्रकृती वसूल करते.

>>>जर आंब्याची कोय लावली तर आंब्याच झाड येणार. मग मनुष्याचा आत्मा मनुष्यातच का नाही जाणार ?कर्मामुळे त्याला तसं जीवन ही प्राप्त होउ शकेल ना? ?

अतिशय उत्तम विचारल आहे...! धन्यवाद. Happy

याचे उत्तर पहाताना... एक पहाणे जरूरी आहे ते म्हणजे.. जन्म.. देह कोणताही असो.. झाडे..पशू.. पक्षी..मनुष्य..इ त्यात आत्मा असतोच. . पण आत्म्याला देहाचे गुण लागू होत नाहीत. मुळ आत्मा हा निर्गुण आहे म्हणजेच सत्व-रज-तम.. या त्रिगुणातीत आहे.

उदाहरण पहायचे झाल्यास विजेचे पहाता येईल... .! विज(आत्मा) एकच आहे..पण तीच वीज बल्ब मधून गेली तर.. बल्बच्या(शरीर) गुणधर्मामुळे(त्रिगुण) प्रकाश(व्यवहार) पडतो... मिक्सर मधून गेल्यास.. प्रकाश पडणार नाही.. तर वेगळेच कार्य.. या नवीन शरीरानुसार होईल.. संगणकातून गेल्यास वेगळेच कार्य होईल...वैगरे.

यात अजून एक लक्षात घ्यायची बाब म्हणजे.. शरीर जरी 'बल्ब' सारखे एकच दिसत असले तरिही.. त्यामूळे पडणारा प्रकाश हा बल्बच्या वॅटेज नुसारच ठरतो... आत्म्यानुसार नाही! २५वॅट चा बल्ब कमी प्रकाश देणारा तर १००वॅट चा जास्त प्रकाश देणारा.

म्हणजेच आत्मा एकच असला तरीही.. कार्य हे शरीरानुसारच होते... आणि शरीर त्रिगुणाच्या भेळमिसळीने मिळते..ते आपल्याला निवडता येत नाही... आणि हे गुण ठरतात ते अंतःकरणातील वासनेनुसार.

याचाच अर्थ आंब्याचे झाड हे शरीर आहे .. आत्मा नव्हे..! तसेच माणसाचे शरीर हा बल्ब आहे .. आत्मा नाही. आंब्याच्या झाडाला.. आंबेच लागतात याला कारण आंब्याचे झाड ..शरीर हे आहे, त्यातील 'वीज' म्हणजे 'आत्मा' नव्हे.

आता अजून एक उदाहरण घेऊयात...

समजा तुम्हाला बाहेर जायचे आहे.. आणि समोर वेगवेगळे ड्रेस.. नऊवारी साडी पासून.. जीन्स सारखे आधुनिक प्रकार आहेत. .. आणि तुम्हाला सांगितले की तुमच्या आवडीनुसार ड्रेस निवडा...! आवड तर बर्‍याच ड्रेसची असू शकते..पण तुम्ही काय पहाल.. बाहेर जायचे कारण काय आहे. म्हणजेच 'आवड आणि बाहेर जायचे कारण' याचा 'मेळ' आपण घालतो. समजा तुम्ही शाळेत असाल.. तर शाळेचाच ड्रेसकोड पाळला पाहीजे.. तिथे आवड दुय्यम ठरते. पण जर आपल्याच आवडीने ठरवायचे असेल तर मैत्रिणीबरोबर बाहेर जाताना वेगळा ड्रेस.. लग्नाला जायचे असेल तर वेगळा ड्रेस..मंदिरात जायचे असेल तर वेगळा ड्रेस आपण निवडतो... रात्री झोपताना वेगळा ड्रेस.. वैगरे.हे सगळे ड्रेस आपण आपल्या आवडीने निवडतो. इथे आपण आपल्या शरीराला आवडेल असा ड्रेस .. बाहेर जायच्या कारणानुसार ठरवितो.

आता समजा आपण 'आत्मा(जिवात्मा)' आहोत(स्थूल शरीर नसलेला) आणि आपल्यालाही आवड(सूक्ष्म शरीर असलेला) आहे.. आणि आपल्याला बाहेर जायचे आहे.. काही चांगले-वाईट भोगायचे आहे. आणि समोर.. पुरुष, स्त्री.. पशु.. पक्षी..किटक.. जलचर्..झाडे इ. चौर्‍यांशी लक्ष प्रकारचे ड्रेस(शरीर) घालण्याकरीता आहेत. तर मग आपण 'आत्मा' या वेगळ्यादृष्टीने जर निवड करू तर्.. आताही 'कारण आणि आवड' याचा 'मेळ' घातला जाईल. जशी आवड्..म्हणजेच 'वासना' आपल्या अंतःकरणात असेल त्यानुसारच आपण ड्रेस निवडू.. जेणेकरून ती 'वासना' भोगली जाईल.

याचाच अर्थ आंब्याच्या झाडाला आंबा येणार हे बरोबर आहे.. पण त्यात असणारा आत्मा हा आवडीनुसार पुढच्या जन्मात.. वेगळ्या वासनेमूळे वेगळे शरीर धारण करेल.. नाही काय? आणि महत्त्वाचे म्हणजे आपण यावरून असेही ठरवू शकतो की.. आंब्याची झाडे वेगवेगळी आहेत..त्यांची कालसापेक्ष स्थिती वेगवेगळी आहे.. तरीही त्यातील जिवात्म्याच्या असणार्‍या वासना सारख्याच असणार.. जसे लग्नाला जायचे आहे असे ठरल्यावर... तरूण मुली साधारणपणे.. साडीच नेसतात तसे.

म्हणजेच शास्त्र असे म्हणते की.. जे शरीर मिळाले आहे.. त्याची परीक्षा जाणत्याने केल्यास.. त्या शरीराची आवड..वासना ठरविता येते... जसे 'झाड'(स्थूल शरीर) पाहीले की बीज(सूक्ष्म शरीर) कसे असणार.. हे ठरविता येते तसे.

>>>म्हणजे ह्या जन्मी खुप वाईट कर्म केलेत मग त्याच्या कर्मानुसार त्याला पुढचा जन्म रोग्याचा किंवा दारिद्र्याचा असं नाही का

आता तुमच्या लक्षात आले असेल की.. जन्म(शरीर) आणि त्याचे चांगले आणि वाईट भोग हे आपल्याच वासनेनुसार ठरतात. 'आत्मा' हे भोग शरीराच्या आधारेच भोगू शकतो. जसे वीज(अंतरात्मा) नसेल तर ..संगणकाचा (Hardware-स्थूल शरीर, software- सूक्ष्म शरीर दोन्हीचा) काहीच उपयोग नाही...!

आत्म्याने शरीर सोडल्यास.. स्थूल शरीराचा मुडदा होतो.. त्याचा नाश होतो.. केला जातो(जाळणे..पुरणे वैगरे). पण सूक्ष्मशरीराचा नाश अजून झालेला नसतो..म्हणजेच software..संचित. अजून असतेच. मग परत नविन शरीराचा जन्म..परत मरण.. हे चक्र जो पर्यंत सूक्ष्मशरीर असते.. तो पर्यंत चालुच रहाते. Happy

धन्यवाद!

शैलजा,

>>आपल्या किंवा माझ्या मते नाही.. तर शास्त्राच्या मते >> ह्या वाक्याचा अर्थ असा घेते, की शास्त्राच्या मते प्रश्न विचारणे चुकीचे. बरोबर आहे का? असेल, तर,

शास्त्राच्या मते 'प्रश्न' पडणे जरुरी आहे असे सांगायचे होते. Happy

धन्यवाद!

.

.

हसरी,

>>>आता माझ्या अजुन एका प्रश्नाचं उत्तर राहिलं आहे ते ही द्या.
>>>आता आपल्याला अशी 'साधना' पाहीजे आहे की जी आपलेच अंतःकरण साफ करेल! म्हणजे 'बोध' झाला.. आता 'योग' पाहीजे... 'काय करायचे' आहे कळाले... 'कसे करायचे' हा प्रश्न शिल्लक आहे.>>>

Happy खर सांगायचे तर त्याकरीताच 'योग' म्हणजेच... काय करायचे, हे पहाणे चालू आहे. शास्त्रात..या करिता बरेच मार्ग(योग) सांगितले आहेत.. जसे कर्मयोग..ज्ञानयोग..भक्तियोग..हठयोग..राजयोग वैगरे. आपल्याला हे मार्ग वेगवेगळे का वाटतात हे पहाणे जरुरी आहे.. मुख्य गोष्ट म्हणजे.. एकदा आपल्या बुद्धीला योग्य काय ते पटायला पाहीजे.. मग बुद्धीच पुढचा योग्य मार्ग दाखवते. मन..चित्त.. बुद्धी.. अहंकार यामधील एकमेव बुद्धीच परमेश्वराला जाणू शकते.

आतापर्यंत आपल्या सर्वांच्या या संवादात कोणतीही.. समजूत-मार्ग-योग... आपण अधोरेखित केला नाही आहे.. अजूनही मुख्य 'साधन' आपंण सविस्तर पाहीलेलच नाही. पाहुयात चर्चा कशी वळण घेते ते.. त्या प्रवाहात रहाणे जरूरी आहे.

आपल्याला प्रश्न पडतात.. आणि आपण ते विचारतो..जर खरीच तळमळ असेल.. तर या ईश्वराच्या राज्यात त्या प्रश्नाला 'उत्तर' अवश्य मिळतेच मिळते.. ते मग इथे.. चर्चेत मिळेल किंवा अन्य कोणत्याही रुपाने मिळेल याची खात्री बाळगा. परमेश्वर करुणेचा सागर आहे... आणि जशी मागणी.. तसा पुरवठा या 'तत्वाने' तो सदैव कार्यरत आहे..! काय मागायचे? हे आपल्या हातात आहे..तसा पुरवठा करण्यास ईश्वर बांधिल आहे. Happy

धन्यवाद!

>आपल्याला प्रश्न पडतात.. आणि आपण ते विचारतो..जर खरीच तळमळ असेल.. तर या ईश्वराच्या राज्यात त्या प्रश्नाला 'उत्तर' अवश्य मिळतेच मिळते.. >> अगदी अगदी Happy

धन्यवाद शैलजा,

नितीनजी,

>>>मी फक्त स्वामी विवेकानंदांचा " राजयोग " हा ग्रंथ वाचला आहे. तो योगसुत्रावर आधारीत असल्याने योगसुत्र याचे विवेचन आणखी दोन लेखकांचे वाचले.

कृपया राजयोगाविषयी आपण वाचलेले सांगाल काय... 'राजयोग' म्हणजे काय? थोडक्यात सांगितले तरी चालेल. काही सुत्रे सांगितली तर अजूनच छान! Happy

सुनिता.. आपणही कृपया 'राजयोगाविषयी' आपल्याला जे माहीत आहे ते मोकळ्या मनाने सांगावे ही विनंती. Happy

जर खरीच तळमळ असेल.. तर या ईश्वराच्या राज्यात त्या प्रश्नाला 'उत्तर' अवश्य मिळतेच मिळते >> अगदी खरे आहे.

सावट एक शंका, ८४ लक्ष योनींच्या प्रवासानंतर माणसाचा जन्म मिळतो असे ऐकले होते. पण समर्थांनी तर त्या ८४ लक्षांमधले ४ लाख तर माणसाचेच प्रकार सांगितले आहेत. असे कसे?

आतापर्यंत आपल्या सर्वांच्या या संवादात कोणतीही.. समजूत-मार्ग-योग... आपण अधोरेखित केला नाही आहे.. अजूनही मुख्य 'साधन' आपंण सविस्तर पाहीलेलच नाही. >> कधी सुरु करताय? Happy

>>मन..चित्त.. बुद्धी.. अहंकार यामधील एकमेव बुद्धीच परमेश्वराला जाणू शकते.
वाचा यदुच्यते किंचिन् मनसा मनुते क्वचित् |
बुद्ध्या निश्चिनुते नास्ति चित्तेन ज्ञायते नहि || ॠभुगीता

यतो वाचो निवर्तन्ते | अप्राप्य मनसा सह | तैत्तिरिय

साधनादमलं ज्ञानं स्वयं स्फुरति तद्ध्रुवम् | शिवसंहिता

मन, चित्त, बुद्धी, अहंकार (अंतःकरण चतुष्टय) परमेश्वराला जाणू शकत नाहीत.
हो, ज्ञान होण्यासाठी बुद्धीचा उपयोग जरुर होतो. पण बुद्धी परमेश्वराला जाणू शकत नाही.
बाकी उत्तम चालू आहे.

समजून घ्यायला द्वैताची गरज असते. उपभोगायला अद्वैताची. आणि जो हे हुकुमि करू शकतो तो मुक्त. उपासना करायची ती ह्याची. कशी तर जेंव्हा समजावून घेत असाल तेंव्हा न गुंतण्याचा सराव जेंव्हा भोगत असाल तेंव्हा अलिप्त न राहाण्याचा सराव (?) चु.भु.द्या.घ्या.

नमस्कार क्ष! कसे आहात? आपल्याला इथे पाहून खूप बरे वाटले... धन्यवाद! Happy

आपले म्हणणे 'सत्य' आहे.

कृपया वरील संदर्भ पाहताना...त्यामागचा उद्देश-हेतु श्रीमाऊलींचे खालील सांगणे हेच आहे.. हे अतिनम्रपणे सांगू इच्छीतो.. ( या उपर काही वेगळा अर्थ होत असेल तर तो पुर्णपणे माझा लेखन दोष आहे..कृपया क्षमा असावी ही नम्र विनंती... असाच लोभ असावा.)

प.पू.श्री ज्ञानमाउली 'अंतःकरण' चतुष्टयातील 'बुध्दि' चे वर्णन फार सुरेख करतात.. असे वाटते की श्री माउलींनी सांगत रहावे.. आणि त्याचे सदैव श्रवण व्हावे.

तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ती| घेऊनि आपुल्या हातीं| बुद्धि आत्मया मिळे येकांतीं| प्रिया जैसी ||श्री ज्ञानेश्वरी १८.३३||

श्रीमाउली म्हणतात.. 'बुद्धि' ही अंतःकरण वृत्ती... अंतःकरणाच्या इतर 'वृत्ती' आपल्या हाती घेऊन.. एखाद्या मिलनोत्सुक प्रियसी प्रमाणे.. आपल्या प्रियकराला.. आत्म्याला.. एकांतात भेटते.

अशी आत्म्याला भेटायला निघालेली 'बुद्धि' कशी असते.. तर एखाद्या महासती पतिव्रते प्रमाणे असते.. तिचा आपला प्रियकर कोण आहे.. याचा पक्का निश्चय झालेला असतो. तिचे वर्णन श्रीमाउली करतात..

तरी सत्वशुद्धीचिये वेळे| शास्त्रें कां ध्यानबळें| ईश्वरतत्त्वींचि मिळे| निष्टंकबुद्धी ||८४७||

म्हणून त्याच जुन्या पण नवीन निश्चयाने युक्त असणार्‍या...बुद्धीचे वर्णन श्री माउली.. 'निष्टंक' या नव्या विशेषणाने करतात. अशी निष्टंकबुद्धी .. विनासायास..ईश्वरतत्त्वीच मिळते. (इथे श्री माउलींनी नुसते 'ईश्वर' न म्हणता 'ईश्वरतत्त्व' म्हंटले आहे.. हे ल़क्षात घेण्यासारखे आहे.)

ही जुनीच.. 'मी देह आहे' अशी जाणणारी.. जडरुपातली 'बुद्धी' पालटली कशी? याचे कारण सांगताना श्री माउली म्हणतात...

तरी गुरु दाविलिया वाटा| येऊन विवेकतीर्थतटा| धुऊनियां मळकटा| बुद्धीचा तेणें ||१०११||
मग राहूनें उगळिली| प्रभा चंद्रें आलिंगिली| तैसी शुद्धत्वें जडली| आपणयां बुद्धि ||१०१२||

श्रीसद्गुरुंनी जी 'वाट-मार्ग' दाखविला.. त्यामार्गाने गेल्यामुळे ... विवेकतीर्थाच्या..तटावर.. काठावर्..जाणे घडले..आणि त्यामुळे बुद्धीचा मळकटा-दोष धूतला गेला आणि बुद्धी... शुद्ध झाली.

अशी शुद्ध झालेली.. सत्वबुद्धी.. आत्म्..याला द्रष्ट्याला कशी मिळते..तर

तैसेंचि बुद्धी का दिठी| जें तो देखों जाय किरीटी| तें देखणें दृश्य लोटी| देखतेंचि दावी ||११५५||
आरिसया आधीं जैसें| देखतेंचि मुख दिसे| तयाचें देखणें तैसें| मेळवी द्रष्टें ||११५६||
दृश्य जाउनियां द्रष्टें| द्रष्टयासीचि जैं भेटे| तैं एकलेपणें न घटे| द्रष्टेपणही ||११५७||

तर.. अशी जाणणारी ..शुद्ध बुद्धी जेव्हा द्रष्ट्यास जाणवयास जाते..त्यावेळी.. तिचे ते पहाणे(देखणे).. आणि त्यामुळे दिसलेले दृश्य.. हे दोन्हींही लोटून.. स्वतः च द्रष्टारुप होते... त्यावेळी बुद्धीचे स्वरुप परत एकदा बदलते... या बदलेल्या स्थितीचे वर्णन श्रीमाउली करतात..

तेथ सगळिये चित्तवृत्ती| त्यागु करणें या रीती| निष्कामें पूर्णाहुती| हुताशीं जैसी ||
कां सुकुळीनें आपुली| आत्मजा सत्कुळींचि दिधली| हें असो लक्ष्मी स्थिरावली| मुकुंदीं जैसी ||

अशा प्रकारे सगळ्या 'चित्तवृत्ती' चा त्याग घडल्यामुळे.. एका सत्कुळाने(शुद्ध स्वरुपातल्या वृत्ती) आपली आत्मजा..दुसर्‍या सत्कुळातच(आत्मा) दिल्यासारखी स्थिती होते.. जसे श्रीभगवंताच्या..स्वस्वरुपात श्रीलक्ष्मी स्थिरावते तसे. Happy

धन्यवाद!

पेशवा, नमस्कार.. बर्‍याच दिवसांनी? कसे आहात?:)

>>समजून घ्यायला द्वैताची गरज असते. उपभोगायला अद्वैताची. आणि जो हे हुकुमि करू शकतो तो मुक्त. उपासना करायची ती ह्याची. कशी तर जेंव्हा समजावून घेत असाल तेंव्हा न गुंतण्याचा सराव जेंव्हा भोगत असाल तेंव्हा अलिप्त न राहाण्याचा सराव (?)

खूप छान सांगितले आहे.. धन्यवाद!

माधव,

>>>प.पू श्री गजानन महाराजांनी 'कशापासून जग झाले' याचे मनन करायला सांगितले आहे.

आणि ..प्.पू. श्रीआचार्य म्हणतात...ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या .... !

म्हणजेच जीव,जगत आणि ईश्वर.. यातील 'जगत-जग' हे मिथ्या आहे.. असे सांगितले आहे.

मग हे 'मिथ्या' असलेले 'जग' कशापासून झाले... हे जाणल्याने..मनन केल्याने.. काय फायदा होईल? Happy

तसेच या 'जगता' मध्ये कशा-कशाचा अंतर्भाव होतो? Happy

धन्यवाद!

माधव,

>>>प्रश्न असा होता की कर्माचे स्थूल स्वरुप या दोन वरच्या उदाहरणात वेगवेगळे का आहे.?

याच्यावर काही विचार केलात काय? दोन्हीही 'कर्मयोगच' मग बाह्यस्वरुप कशामूळे भिन्न भासते...असते? Happy

>>>अध्यात्माच्या प्रत्येक मार्गाचे अंतिम फल हे ज्ञान असते. कॉणत्याही मार्गाने गेले तरी देहाला कर्म चुकत नाही. सोवळे-ओवळे..संध्यास्नान..व्रत-उपोषणे आणि अनुष्ठान हे सगळे देह सुदृढ आणि मन शांत करण्याकरता आहेत. (प्रत्येक मार्ग देहाला महत्व देतोच कारण तो वापरूनच मुक्ती मिळवायची आहे. तो सुदृढ नसेल तर मुक्तीची वाट अधिकच बिकट बनते.)

मग ज्यांचे देह सुदृढ असतात त्यांना मुक्तीची वाट सुलभ असते काय? देहाला महत्त्व देताना.. देहबुद्धीच वाढली तर मग कसे होणार? जसे आपण पाहीले की 'योग' हा चित्तशुद्धी करता महत्त्वाचा आहे.. मग 'हठयोग' हा देह सुदृढ करण्यासाठी वापरला कसा जातो. अशा उपयोगाने जर देहाकडेच लक्ष दिले गेले तर... योगाच्या 'मूळ' उद्देशालाच फाटा बसणार नाही काय?याने चित्त कसे काय शुद्ध होणार? Happy

>>>उष्टे.. खरकटे ही.. अन्न म्हणूनही चालत होते >> ते मला(?) ही जमावे म्हणूनच तर धडपड चालू आहे. आणि तसेही कांदा मी फक्त ऋषीपंचमीलाच खाऊ धजावतो. गणपतीचे इतर दिवस नाही.

>>> विटाळ शरीराला होऊ शकतो ('होतो' हे मला पटत नाही तरी) मनाला नाही.

इतर दिवस कांदा का खात नाही? सर्व परमेश्वरानेच बनविले आहे.. मग असे कशासाठी? याने काय साध्य होणार?मग हा कांद्याचा विटाळ का बरे? याला जर धडपड म्हणायची.. तर मग याने खरकटे खायचे कसे काय जमणार?

असो... आपण जे करतोय.. ते विचारपुर्वक करतोय का नाही.. हे आपले आपल्यालाच कळावे हाच उद्देश आहे.. ! काय होते आपण बोलतो आत्म्याबद्द्ल..पण चष्मा चढविलेला असतो.. देहबुद्धीचा. मग जसे लाल रंगाच्या चष्म्याने सगळे जग लालच दिसते.. तसे.. सर्व आजूबाजूचे आत्मे आणि आपण स्वतः देहस्वरुपच दिसायला लागतो.

प.प. श्रीसद्गुरुटेंब्येस्वामींमहाराजांनी...श्रीदत्तमहाराजांच्या करुणात्रिपदीत सांगितले आहे ना...

जय करुणाघन निजजनजीवन। अनसूयानंदन पाहि जनार्दन।।ध्रु०।।

हे करुणाकरा तुमचा जयजयकार असो.. हे जनार्दना कृपया माझ्याकडे जरा पहा... कारण..

निजअपराधें उफराटी दृष्टी। होउनि पोटीं भय धरूं पावन।।१।।

स्वतःच्याच अपराधामूळे दोषामूळे... जाणणारी दृष्टी 'उफराटी' जाणत असते.. आणि मायेचा तडाखा येवढा जबरदस्त असतो की त्या जीवाला तुझे चुकते आहे असे सांगायची सोय नसते. पण हा करुणात्रिपदीतला उपासक स्वतःचा अपराध..दोष जाणणारा आहे.. त्याला याची जाण आहे.. आणि त्याला हेही कळले आहे की मला सर्व उलट दिसत आहे. जे 'एक' आहे म्हणून शास्त्र सांगते... ते 'एक' आहे असा 'अनुभव' येत नाही आहे.. आणि शास्त्र ज्यात 'भिन्नत्त्व' आहे असे सांगते.. त्यात ही उफराटी दृष्टी 'एकता' शोधत फिरते आहे.. हे त्याला कळालेले आहे. पण अजूनही 'सुलट' दिसत नाही आहे..मग आता काय करायचे?

तूं करुणाकर कधीं आम्हांवर। रुसशी न किंकर-वरदकृपाघन।।२।।

असा उपासक श्रीकरुणामय भगवंताना आळवतो आहे... हे करुणाकरा.. मी असा 'उफराटा' वागतो आहे.. त्यामूळे तू माझ्यावर रुसू नकोस.. माझी ही 'उलटी' स्थिती तुझ्याशिवाय कोण समाजावून घेईल?

वारी अपराध तूं मायबाप। तव मनीं कोपलेश न वामन।।३।।

माझ्या या उफराट्या दृष्टीला जबाबदार असणारे माझ्या अपराध्-दोषाचे निवारण कर.. तूच असा कोपलास तर माझे कसे होणार?

बालकापराधा गणे जरी माता। तरी कोण त्राता देईल जीवन।।४।।

जर आईनेच स्वतःच्या बालकाचा अपराध गृहीत धरला..तर या माझ्या अल्पशा जीवनात दुसरा त्राता तो कोण असणार?

प्रार्थी वासुदेव पदिं ठेवी भाव। पदीं देवो ठाव देव अत्रिनंदन।।५।।

म्हणूनच हे देवाधिदेवा..बा अत्रिनंदना.. माझी तूला कळकळीची प्रार्थना आहे की.. असे काहीतरी कर की..माझा 'भाव' तूझ्या श्रीचरणी दृढ राहू दे..माझे सगळे दोष संपू देत...जेणेकरून मला तूझ्या चरणाशी 'ठाव' मिळू दे.

हे श्रीदत्तात्रेया.. श्रीअनसूयानंदना तुमचा जयजयकार असो!

धन्यवाद!:)

सावट, इथे येऊन मलाही बरं वाटतं Happy
तुम्ही लेखन दोषाबद्दल काळजी करु नका.. विचार दृढ होण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. मी ही काही विशेष वेगळा आहे असे समजू नका. साधना ही एक बसवून दिलेली घडी आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक असतं. तिच्यावर ममत्व असेल तर तिथेच गुरफटून राहू; साध्यापर्यंत कधीही जाता येणार नाही.
आपण इथे साधनापद्धतींवर चर्चा करतोय त्यामुळे साध्याच्या बाबतीत एकमत असेल तर साधनांच्या बाबतीत समजुतींत थोडा फरक असणं गैर नाही. वरचे वाचताना साध्याचे स्वरुप समजण्यात माझा गोंधळ उडाला म्हणून हा विस्तार.

माऊलींच्या ओव्यांबद्दलच म्हणायचं झालं तर ज्ञानेश्वरीमधले सर्वच दाखले सूत्रांमध्ये बांधले गेलेले आहेत. त्याला गीतेची चौकट आहे आणि म्हणून ओवी पाहताना ती कुठल्या संदर्भात दिली आहे याचा विचार आवश्यक आहे. तुम्ही म्हणतां ते अगदी खरंय.. माऊलींनी सांगावं आणि आपण सर्वांगाचे कान करुन ऐकावं.. त्याच्यावर सुसूत्र निदिध्यासन करावं आणि त्याचसाठी हा प्रपंच.
या ओव्यांच्या संदर्भाकडे जाण्यापूर्वी काही संकल्पना स्पष्ट असणे गरजेचे आहे. तुमच्या त्या असतीलच पण माझ्याच या पुढच्या विचारांना एक दिशा मिळावी आणि विषय कुठे भरकटू नये म्हणून त्या लिहितो.

अंत:करण हे एकच आहे. अंतः म्हणजे आतले, करण म्हणजे इंद्रिय. याला सहावे इंद्रिय असेही म्हणतात. तर हे अंतःकरण एकच असून त्याला कार्यानुसार वेगवेगळी नावे दिली जातात.

संकल्प आणि विकल्प करणारे ते मन-
उदाहरणार्थ अंतःकरण जेव्हा भूत, भविष्य, वर्तमान अशा तिन्ही काळांत घडलेल्या, घडू शकणार्‍या गोष्टींबद्दल नाना कल्पना करु लागते तेव्हा त्याला मन म्हणतात. उदा. आज ऑफिसात काय झाले. ती व्यक्ती माझ्याशी अशी बोललीच कशी, मी त्यावर असे बोलायला हवे होते. मी बोलण्यात किती वाकबगार आहे, पूर्वी अमुक ठिकाणी बोलताना मी अमुक अमुक म्हणालो आणि त्यावर तमुक प्रतिक्रिया आली. याप्रमाणे कल्पनांची साखळी संपत नाही आणि म्हणूनच मन ताब्यात ठेवणं अवघड आहे. पुढच्या सर्व प्रक्रिया कल्पनांच्या मुळाशी, मनापाशी येऊन थांबतात म्हणूनच त्यावर आवर घालण्यासाठी सर्व संतानी मनाशी संवाद साधला आहे.

एका विशिष्ट गोष्टीचे चिंतन करणारे, ती पकडून ठेवणारे, ते चित्त-
उदा. आज माझी नोकरीच्या संदर्भात एके ठिकाणी मुलाखत असेल तर अंतःकरण सतत त्या मुलाखतीच्या संदर्भात आवश्यक असलेल्या गोष्टींचा विचार करील. त्या एकाच विषयाला पकडून राहील. त्या वृत्तीलाच चित्त असे म्हणतात. आपल्या सर्वांनाच स्पष्ट अनुभवाचे दुसरे उदाहरण म्हणजे एखादे गाणे आपल्या मनात सतत रुंजी घालत राहते. काही केल्या ते शब्द, त्याच्या संगीताचा एखादा तुकडा डोक्यातून जात नाही. हे काम करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे चित्त.

मी मी म्हणणारा तो अहंकार -
अहंकार म्हणजे गर्व नाही. मी आज १०० रुपये दान केले; तसा मी मोठ्या मनाचा आहे, मी देशस्थ ब्राह्मण आहे, मी थोडा स्थूल आहे, मी वर्णाने अगदीच काळा आहे, माझी बुद्धी अगदीच तेजस्वी आहे, मी गातो छान पण मी नाचू शकत नाही, मी भिन्नलिंगी/समलिंगी व्यक्तींकडे आकर्षिला जातो, माझ्याकडे होंडाची मोठी गाडी आहे, मी बाहेरच्या देशात बरेच दिवस काढलेले आहेत, मी लोकलमधून आयुष्यभर प्रवास केला, मी झोपतो फार, मी सगळ्यांचं इतकं केलं; कधीही तोंडातून ब्र काढला नाही, मी इतकं केलं तर त्याने एव्हढं साधं करु नये? या सर्वांमध्ये बुद्धी, शरीर, मन किंवा चित्त यांचे धर्म आपल्यावर लादून घेणारा जो "मी" आहे, तो अहंकार.

निर्णय घेणारी ती बुद्धी -
मी आज बाहेर पडताना कुठले कपडे घालावेत, आज घरच्याघरी कारल्याची भाजी करावं की श्रीखंडाचा डबा विकत आणावा इथपासून ते माझ्या हातात धरलेल्या या व्यक्तीचा गळा आवळणे मला शक्य असले तरी ते हितकर, योग्य नाही, इथपर्यंत, असा साधकबाधक विचार स्पष्ट अथवा सूक्ष्मपणे (सबकॉन्शिअस्ली) करुन अनेक निर्णय घेणारी अशी एकच वृत्ती आहे ती म्हणजे बुद्धी. या बुद्धीची जागा मोठी स्ट्रॅटेजिक आहे आणि वासना इथेच घर करतात. पण त्याचबरोबर विवेक हा ही बुद्धीचाच धर्म आहे. आणि हाच विवेक अंतःकरण शुद्धीसाठी खूप उपयोगाचा असतो.

आता माऊलींच्या ओव्यांमधल्या पहिल्या काही अठराव्या अध्यायातल्या, ज्यांत संपूर्ण सार सांगितले आहे, आढावा घेतला आहे, त्यांतल्या आहेत. साधकावस्थेत जाण्याआधी मिळवायच्या पूर्वसंपत्तीबद्दल बोलताना हा विषय येतो. साधकाकडे विवेक, वैराग्य, शमादि सहा (शम, दम, उपरम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा) आणि मुमुक्षुत्व असणे आवश्यक सांगितले आहे. हे निरनिराळ्या मार्गांमध्ये, निरनिराळ्या अवस्थांमधून, साधनापद्धतींतर्फे मिळवता येते. यांतल्या "शम" याची व्याख्या करताना माऊलींनी हे सांगितले आहे.
तर पुढच्या काही ज्ञानप्राप्तीनंतर जी सिद्धावस्था असते त्या अवस्थेचे वर्णन करणार्‍या आहेत. याबद्दल सविस्ताराने थोड्या वेळाने लिहितो.

>>तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ती| घेऊनि आपुल्या हातीं| बुद्धि आत्मया मिळे येकांतीं| प्रिया जैसी ||१८.८३३||
वर उल्लेख केल्याप्रमाणे ही ओवी शमादिषटकांतील शम या साधनाशी संबंधित आहे. परमार्थासाठी अंतःकरण अनुकूल होणे अतिशय महत्वाचे आहे आणि त्याचसाठी ही साधने सांगितली गेली आहेत. शम म्हणजे परमार्थाला विरोध करणार्‍या विषयांपासून अंतःकरणाला आवरणे. माऊली म्हणतायत जेव्हा सर्वेंद्रियांच्या "वृत्ती" बुद्धी आपल्या हाती ठेवते आणि आत्म्याशी एकरुप होते.
सर्वेंद्रियांच्या वृत्ती म्हणजे काय? वृत्ती म्हणजे काय? वृत्ती म्हणजे कुठल्याही विषयाचे ज्ञान करुन देणारा अंतःकरणामधला बदल (अपवाद सुख आणि दु:ख हे अंतःकरणामधले बदल. त्यांच्याकडून कुठलेही ज्ञान होत नाही म्हणून त्या वृत्ती नाहीत)
प्रत्येक इंद्रिय (विशेषतः डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा ही ज्ञानेंद्रिय) वृत्तीशी निगडीत आहेत. म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा कुठल्याही विषयाचे ज्ञान होते ते आपण या ज्ञानेंद्रियांशी निगडीत आहे, संबंधित आहे असे समजतो. पण परमार्थशास्त्र असे सांगते कि मूलत: ज्ञान केवळ असून विषयज्ञान हे विषयमिश्रित आहे. साध्या शब्दात, ज्ञाता म्हणजे ज्ञान होते ती व्यक्ती आणि ज्ञेय म्हणजे ज्याचे ज्ञान होते ते यापेक्षा फक्त ज्ञान हे शुद्ध आणि निर्मळ आहे. तेच ब्रह्म. तेच सत्य. तोच आनंद. तोच आत्मा.
माऊलींची ओवी वेगळी सांगायला नकोच पण तरीही संदर्भ असावा म्हणून बघावी. पंधराव्या अध्यायात माऊली संसारवृक्षाचे मूळ, जे सत्य त्याचे वर्णन करताना म्हणतात
ज्ञातृज्ञेयाविहीन | नुसधेचि जे ज्ञान | सुखा भरले गगन | गाळीव जे ||
"जे ज्ञाता आणि ज्ञेय यापासून वेगळे असे ज्ञान आहे, तेच सुखाने परिपूर्ण असून इतके सूक्ष्म आहे की आकाशाच्या वस्त्रातूनही गाळले जावे"
हे जी बुद्धी जाणते ती विवेकी बुद्धी कुठल्याही इंद्रियातर्फे ज्ञान झाले तरी त्याला ते विषयज्ञान समजत नाही. यालाच शास्त्रीय परिभाषेत आत्मानात्मविवेक असे नाव आहे (आत्मा आणि अनात्म वस्तू यांच्याबद्दलचा निर्णय - अथतः बुद्धीचे कार्य)
माऊली म्हणतात अशी बुद्धी "आत्मया मिळे येकांती" - एकांत - जिथे अंती एक उरतो तो एकांत. प्रिया आपल्या प्रियकराशी समरस होते आणि त्यांच्यातला दुजाभाव जसा नष्ट होतो तशा प्रकारे जेव्हा जेव्हा इंद्रियातर्फे ज्ञान होते त्या ज्ञानाच्या मूल स्वरुपाबद्दल निर्णय झाला असल्यामुळे आत्मस्वरुपाचेच स्मरण होते, एक आत्मस्वरुपच शिल्लक राहते. असा जो बुद्धीचा विवेकबळाने आलेला अंतर्मुखपणा आहे त्याला शम म्हणावे.
*****
वेळेअभावी तुकड्यातुकड्यांमध्ये लिहित आहे त्याबद्दल क्षमस्व. तुमची चर्चा खंडीत करण्याचा हेतू नाही. माझे बरळणे चालू असले तरी तुम्हा सर्वांची चर्चा चालू ठेवावी.
*****

क्ष, सुरेख.

बरं, सावट आणि क्ष ह्यांना विनंती की नवीन पोस्ट नसताना पुन्हा पुन्हा लेखनदोष सुधारु नयेत. Happy
नवीन पोस्ट आलीये वाटून इथे येते आणि नवीन काहीच नसतं Sad
अर्थात, आहे तेच पुन्हा वाचायलाही आनंदच मिळतो, तरीही विनंती आहे.

>>तरी सत्वशुद्धीचिये वेळे| शास्त्रें कां ध्यानबळें| ईश्वरतत्त्वींचि मिळे| निष्टंकबुद्धी ||१८.८४७||
इथे माऊली "विज्ञान" या गुणाबद्दल बोलत आहेत. विज्ञान शब्दाचा इथे केलेला अर्थ म्हणजे आत्मज्ञानाला आलेली स्थिरता. चित्तशुद्धीच्या वेळेस गुरुवर श्रद्धा ठेवून केलेल्या महावाक्याच्या श्रवणामुळे किंवा शास्त्राच्या मनन, निदिध्यासनामुळे वा ध्यानामुळे अखंड आत्माकार झालेली बुद्धी ईश्वरतत्त्वाशी "मिळते". इथे जसा ईश्वर "तत्त्व" हा शब्द महत्वाचा आहे तसाच "मिळते" हा शब्दही महत्वाचा आहे.

बुद्धी ही निर्णय घेणारी अंतःकरणाची वृत्ती आहे असे वर व्याख्येत दिले आहे. जर बुद्धी परमात्म्याला जाणू शकते असे आपण म्हणू तर जाणणारी बुद्धी, जाणला जाणारा विषय तो आत्मा आणि जाणण्याची क्रिया अशी त्रिपुटी (तीन गोष्टी) निर्माण होतात. हा मोठा दोष आहे. आत्मा हा ज्ञानाचा विषय नाही कारण तो ज्ञानरुप आहे. त्यामुळे आत्मज्ञान हे त्यात समरस होऊनच होते. खरंतर आत्मज्ञान ही द्विरुक्ती आहे. पण आपणा सर्वांसारख्याना समजावं म्हणून संतांनी, आचार्यांनी शास्त्राची घडी बसवताना काही संज्ञा, काही संकल्पना स्विकारल्या आहेत त्यातलीच आत्मज्ञान होणे ही एक संज्ञा आहे. या प्रक्रियेचे उदाहरण घ्यायचे झाले तर जसे सूर्याच्या केंद्रस्थानी काय आहे हे कुठलेही संरक्षण न घेता (तसे संरक्षण अस्तित्वात आले आहे अशी कल्पना करुन) जर अनुभवायचे असेल तर आणि समजा जरी कुठल्याशा मार्गाने आपण सुरक्षितपणे सूर्याच्या केंद्रस्थानी पोहोचलो तरी ज्याक्षणी त्या केंद्रस्थानाशी आपला संयोग होईल त्याक्षणी आपण त्याला जाणले असेल पण त्याचक्षणी आपले अस्तित्वही सूर्यामध्ये लोपून गेले असेल. त्याचप्रकारे जेव्हा आत्मज्ञान होते त्याक्षणी अंतःकरणाचा लय झाल्यामुळे अंतःकरणाच्या सर्व वृत्तींचाही लय झालेला असतो. त्यामुळे "मी हे हे जाणले आहे" हा निर्णय करायला देखील बुद्धीचे अस्तित्व असत नाही. त्यामुळेच बुद्धी आत्मतत्त्वाला जाणू शकत नाही.

बाराव्या अध्यायात कूटस्थाचे वर्णन करण्याया भगवंताच्या
ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते | सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ||
या श्लोकावर टीका लिहिताना माऊली लिहितात
मनाची नखी न लागे । जेथ बुद्धीची दृष्टी न रिघे ।
ते इंद्रिया कीर जोगें । काय होईल ॥
जिथे मनाचे नखसुद्धा स्पर्थ करु शकत नाही. जिथे बुद्धीची दृष्टीसुद्धा पोहोचू शकत नाही त्याचे आकलन ज्ञानेंद्रियांना कसे होऊ शकेल?

शैलजा, जरुर ध्यानात ठेवीन Happy
पुढच्या ओवीबद्दल लिहिताना पहिल्यांदा तुटक लिहिण्याबद्दल क्षमा मागणं आवश्यक वाटलं म्हणून तो बदल (माबोवर संपूर्ण लेखाचा, पोस्टीचा रोख संपादून बदलला जातो तर याच्यात नावीन्य नसावं :))

Happy

बाकीच्या बाफांवर परत परत जावंसं वाटत नाही - संपादित पोस्टी वगैरे वाचायला. ह्या बाफावर लक्ष ठेवून असते, खूप शिकायला मिळते, ह्या कारणाने. म्हणून फक्त इथेच विनंती.

व्वा, क्ष ..सुरेख... रोखठोक.. स्पष्ट.. आज तुमचे मौन सुटले... शेवटचा दिस गोड झाल्यासम 'आनंद' झाला... ! Happy

खरे तर अंतःकरण पंचक किंवा चतुष्टय या विषयी लिहणे जरूरी आहे.. अशी स्थिती चर्चेदरम्यान आलेली आहे.. म्हणूनच महेश देशपांडे(ghn) यांची आठवण झाली होती.. कारण त्यांच्या बीबी वर हि माहिती आहे.. पण ते तुमच्या कडून होणे होते. असो.. ती हवी होती ती माहिती इथे पेस्ट करतो..

परमात्मा, आत्मा, अंत:करण आणि देह-

सर्व जीवात परमात्म्याचा अंश असलेला असा आत्मा निवास करत असतो.स्थूलदेह हे त्या आत्म्याचे रहाण्याचे घर आहे. ह्या आत्म्याचा, ह्या स्थूल देहाशी 'तादात्म्य' नावाचा एक विलक्षण संबंध असतो. 'तादात्म्य' म्हणजे 'तोच मी' असे वाटणे,दोघांची एकरुपता आहे असे वाटणे. अर्थात हे काल्पनिक असते.

असे वाटण्याकरता एक मद्यस्थ काम करत असतो, त्यालाच अंत:करण असे म्हणतात.प्रथम हा आत्मा अंत:करणाशी तादात्म्य होतो, नंतर हे अंत:करण स्थूलदेहाशी तादात्म्य पावते. आशा रितीने नित्य शुध्द-बुध्द आत्मा, अशुध्द; जड देह म्हणजे 'मी' असे मानायला लागतो. हे घडते कसे ह्या करिता अंत:करणाच स्वरुप जाणून घेण गरजेच आहे.

अंत:करण हे देहासारखे स्थूल-जड नाही, ना आत्म्याप्रमाणे स्वयंप्रकाशित आहे. ते ह्या दोहोपेक्षा विलक्षण असून; दोघांचा संबंध जुळवणारे आहे. परमात्म्याचा अंक्षच असणार्‍या आत्म्याला, संसारबंधन(जन्म-मरण चक्र) आणि मोक्ष ह्या अंत:करणामुळेच प्राप्त होतो.

ह्या अंत:करणाचे त्याच्या कार्यानुसार पाच प्रकार मानले गेले आहेत. हे 'अंत:करण पंचक' असे-
१] अंत:करण-
अ) अंत:करण ही जीवाची उपाधी आहे. हे मुळात द्रवरुप असते. शरिरात असणार्‍या ७२,७२,१०,२०१ नाड्यामध्ये ते भरलेले असते.
ब) पाण्यावर तरंग यावेत याप्रमाणे, ह्या द्रवरुप अंत:करणात अनेक तरंग उठत असतात, त्यालाच 'वृत्ती' असे म्हणतात.प्रमाण, विपर्यास, विकल्प, निद्रा, स्मृती अशा पाच प्रकारात वरील वृत्तींचा संग्रह केलेला असतो.
क) ह्या खेरीज सुख, दु:ख, इच्छा वैगरे, अंत:करणाच्या इतरही वृत्ती आहेत. निर्विकल्प समाधि अवस्थेत अंत:करणात कोणतीही वृत्ती नसते.

२] मन-
एखादी गोष्ट; करावी की करू नये, अशा प्रकारच्या संशयाने युक्त असणार्‍या वृत्तींनी युक्त असणार्‍या अंत:करणालाच 'मन' असे म्हणतात.

३] बुध्दी-
मनाने वरील संशय उत्पन्न केला असता, अमुक एक गोष्टच योग्य आहे असे निश्चयपूर्वक ठरविणार्‍या अंत:करणालाच 'बुध्दी' म्हणतात.

४] चित्त-
घेतलेल्या अनुभवाचे सतत स्मरण ठेवणार्‍या अंत:करणालाच 'चित्त' असे नाव आहे. हे योग्य वेळी; योग्य त्या गोष्टींचे स्मरण करुन देत असते.

५] अहंकार-
आपल्याला सतत जी 'मी' ही जाणीव-स्फुरण होत असते, त्या अंत:करण वृत्तीला 'अहंकार' असे म्हणतात.

अशारितीने एकच पदार्थ वेगवेगळ्या कार्यामुळे, विविध नावांनी ओळखला जातो. हे अंत:करण मूळात जड असूनही, चैतन्यरुपी आत्म्याच्या निजसानिध्याने, चेतनासारखे होऊन सर्व व्यवहार करत असते.

मानवी जीवनाचा मूळ हेतुच मूळी, ह्या अंत:करणातील सर्व वृत्ती-वासना संपवून, शरीरात असणार्‍या आत्म्याचे, मूळ परमात्म्याशी तादात्म्य पावणे, हा आणि हाच आहे.
माणूस मरताना ज्या वृत्ती,वासना,तरंग शिल्लक असतील त्या नुसार पुढचा जन्म मिळतो.

एकच अंतःकरण वेगवेगळे कार्य कसे करते हे एका उदाहरणाने पाहूयात.. जसा 'मी' हा एकच आहे, पण ऑफिसात तोच 'मी' बॉस म्हणून कार्य करतो..तर घरी आल्यावर बायकोशी, नवर्‍याप्रमाणे वागतो.. मुलांशी, बापासारखे वागतो.. आईवडीलांशी मुलासारखे ... भाऊबहिणीशी.. भावा सारखे वागतो वैगरे..अगदी तसेच हे एकच अंतःकरण कार्यानुसार वेगवेगळे मानले जाते.. अन्यथा ते एकच आहे. याच्यातील 'बुद्धी' आणि त्याच्यावर अवलंबून असणारा 'अंहकार' या वृत्तीवर आपण बोलत होतो.

धन्यवाद!

___/\___

ह्म्म..
काही गोष्टी सर्वांसाठीच स्पष्ट करुयात.
परमार्थशास्त्र ही एक बसवून दिलेली घडी आहे. साधन आहे. अंतःकरण हे द्रवरुप आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा लगेच तो द्रव रक्तामध्ये कुठे आहे वगैरे प्रश्न येऊ नयेत. कारण पूर्ण शरीरात कुठल्याही चाचण्या केल्या तरी ज्याला सावट द्रवरुप अंतःकरण म्हणतायत ते सापडणार नाही.
पण एक मात्र नक्की आहे की ज्या कारणासाठी ही घडी बसवून दिलेली आहे, त्यातून जे साध्य अपेक्षित आहे, ते साध्य या साधनाच्या मार्गे गेल्यावर हमखास मिळते.

आता तुमच्या मुद्द्यांमधल्या काही गोष्टी,
>>सर्व जीवात परमात्म्याचा अंश असलेला असा आत्मा
आत्म्यात अंशाअंशी भाव नाही.
जे सर्वत्र सदा सम | तेथ विभाग अधमोत्तम । मतिवशें संभ्रम । विवंचिती || ४.७०||

जसे समजा सर्व सृष्टी पाण्याने भरली असावी आणि त्यात बर्फाच्या भांड्यांमध्ये पाणी असावे तसा आत्मा शरीरांमध्ये आहे. सादृश्य फरक अंतःकरणातील वासनांमुळे आहे.

>>ह्या आत्म्याचा, ह्या स्थूल देहाशी 'तादात्म्य' नावाचा एक विलक्षण संबंध असतो.
या वाक्यात गडबड आहे. विचार करा.

शैलजा, याचसाठी प्रत्येक शब्दावर विचार करावा लागतो आणि चुकीचे संदर्भ/शब्द बदलले जातात (इथेतरी). मागच्या काही पोस्टी फक्त "आत्मा बुद्धीने जाणला जातो का बुद्धीच्या सहाय्याने जाणला जातो" या सूक्ष्म फरकावर आहे यावरून समजून घ्या.

असो. पुढे लिहालच.

जरुर बदला क्ष, माझे म्हणणे इतकेच की नवीन काही लिहाल, तेह्वा बदला, म्हणजे दुरुस्त्याही होतील आणि नवीन काही वाचायला आणि शिकायलाही मिळेल. पोस्टींच्या माध्यमातूनही शिकत आहे, त्याबद्दल धन्यवाद. Happy

सावट,

कर्माचे स्थूल स्वरुप या दोन वरच्या उदाहरणात वेगवेगळे का आहे.? >> साध्य एकच आहे. तेथप्रर्यंत पोहचायचे मार्ग भिन्न असतात. आणि दोन साधक जरी एकच मार्ग अवलंबत असतील तरी त्यांच्या पातळीमध्ये फरक असतो. त्यामुळे प्रत्येक पातळीला कर्माचे स्थूल स्वरुप वेगळे भासते. उदा. पदवी मिळवणे हे साध्य आहे आणि दोन विद्यार्थी ते मिळवण्याकरता मराठी माध्यमाच्या शाळेच्या मार्गावर आहेत एक शिशुवर्गात तर दुसरा दहावीत. पहिला फक्त मूळाक्षरे गिरवत असेल तर दुसरा न्यूटनचे नियम शिकत असेल.

मग ज्यांचे देह सुदृढ असतात त्यांना मुक्तीची वाट सुलभ असते काय? देहाला महत्त्व देताना.. देहबुद्धीच वाढली तर मग कसे होणार? >> असे नाही. जेंव्हा मनुष्य योनीतच मुक्ती शक्य आहे असे जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा मनुष्य शरीर ही अनिवार्य गोष्ट होते. म्हणजे मनुष्याची बुध्दी मिळण्याकरता प्रथम मनुष्य शरीर असणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराचे महत्व नाकारून चालणार नाही. दासगणू महाराजांनी म्हटलेच आहे 'पहिली संपत्ती शरीर'. पातंजल योगदेखील यम, नियम, आसने या पायर्‍यात शरीर शुध्द आणि सुदृढ करायला सांगतो कारण त्याचा वपर करूनच पुढे जायचे आहे. रोगी शरीराला प्राणायामच नीट जमत नाही तर पुढच्या पायर्‍यांची काय कथा? पण शरीर हे साध्य नाही हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. निरोगी शरीर असल्यावर मुक्ती मिळते असे मुळीच नाही. पण साध्यापर्यंत पोहचायची तळमळ असेल तर निरोगी शरीराने साध्यापर्यंत जलद पोहचता येते.

सर्व परमेश्वरानेच बनविले आहे >> १००% सत्य!

इतर दिवस कांदा का खात नाही? >> खाऊ शकतो. पण ते मनाविरुध्द होईल कारण आज माझ्या मनावर रुढी, माझे वडिलधारी यांचा पडदा आहे आणि त्याच्यामधूनच मी जगाला पहातो. त्यामुळे गणपतीत कांदा खाणे मनाला पटत नाही. पण ह्याच पडद्याला ऋषीपंचमीच्या दिवशी छीद्र पडते आणि मनाला कांदा मी नि:शंक होऊन खातो. हाच निशःकपणा कायम झाला की तिच मुक्ती. 'अहम् ब्रह्मास्मि' असे म्हणून मुक्ती मिळेल काय? पण ते ज्या दिवशी उमजेल त्या दिवशी साधक मुक्त होणार नाही काय?

सध्या कामात खूप व्यस्त आहे त्यामुळे उत्तरे लिहायला वेळ लागतोय पण तुम्ही विचारत रहा. त्यानिमित्ताने माझेच विचार मलाच पारखता येताहेत.

म्हणूनच हे देवाधिदेवा..बा अत्रिनंदना.. माझी तूला कळकळीची प्रार्थना आहे की.. असे काहीतरी कर की..माझा 'भाव' तूझ्या श्रीचरणी दृढ राहू दे..माझे सगळे दोष संपू देत...जेणेकरून मला तूझ्या चरणाशी 'ठाव' मिळू दे. >> हेच मागतोय Happy

धन्यवाद क्ष... चर्चेचा सूर योग्य मार्गावर आणल्याबद्द्ल... Happy

माधव,...

अवधान आहेना... तुमच्या 'रात्र काळी' च उत्तर शिजलय... पान वाढायला घ्यायची काय?:)( अर्थात त्याकरीता तुम्हाला भुक लागली आहे हे सिद्ध व्हाव लागेल! अन्यथा वाढूनही.. जेवण झाल्याचा नुसता भास-भ्रम होईल.!) असो.. तुम्हाला भुक लागली आहे हे वेगळे सिद्ध करायची गरज नाही.. ते तर केव्हांच सिद्ध झालय.:)

शैलजा,

>>>बाकीच्या बाफांवर परत परत जावंसं वाटत नाही - संपादित पोस्टी वगैरे वाचायला. ह्या बाफावर लक्ष ठेवून असते, खूप शिकायला मिळते, ह्या कारणाने. म्हणून फक्त इथेच विनंती.

खरे सांगायचे तर आपण सर्वच शिकत आहोत.. आणि त्याला 'कारण' आहेत.. आपली शास्त्रे. आपल्या सगळ्यांचे नमस्कार.. धन्यवाद.. सगळे तिकडे रुजू होतात. Happy

;.............................................................................................................

आपल्याला जे प्रश्न पडतात.. तसेच प्रश्न आपल्या अगोदरही अनेक जणांना निश्चितच पडले असणार.. हे निश्चित आहे. ,.. आणि असे प्रश्न पडणार्‍या काही महाभागांना त्याची उत्तरेही मिळाली असणार.. हे आजच्या विज्ञानाने सिद्ध करायची अजिबात गरज नाही.. कारण हे तर साध्या तर्कानेही कळते. आता प्रश्न आहे जे तर्काने-अनुमानाने-कल्पनेची भरारी मारून ही कळत नाही.. तिथे .. 'शब्दप्रामाण्य' उपयोगी पडते.. यालाच 'शास्त्र' म्हणतात. अनुभवी लोकांनी..हे सतंमहात्म्यानी स्वतः अनुभव घेऊन नतरच सांगितले आहे. नुसत्या कल्पनेच्या भरार्‍या म्हणून त्याकडे पाहू जाऊ तर आपल्यासारखा दुर्दैवी दुसरा शोधून सापडणार नाही. आपल्या भरत खंडात असे अनेक संत-महात्मे-मुनी( मनन करणारे)- ऋषी..तपस्वी..सज्जन होऊन गेले.. त्यानी या अमुल्य ज्ञानाचा पाईक होण्यासाठी आपले आयुष्य वेचले.. आणि स्वतः कृथार्थ होऊन..करूणेने ते सर्व आपल्याकरीता 'शास्त्र' रुपाने शब्दबद्ध केले आहे... हेतु हाच की आपणही त्याचा अनुभव घेऊन.. त्यांच्या सम.. कृथार्थ व्हावे... अन्य कोणताही हेतु नाही.

हे ज्ञान-शास्त्र.. शब्दानी जाणणे म्हणजेच कृथार्थ होणे का.. तर असे म्हणणे.. शब्दांनी बद्ध असणार्‍या शास्त्रानुसारच.. चुकीचे आहे. अशा म्हणण्याचे पुर्णपणे खंडन होते. शास्त्रांनी..बुद्धीचा उपयोग करून्..जाणायचा जो 'विषय' आहे... त्याचे नाब 'ब्रह्म' आहे... आणि ते स्वयंसिद्ध आहे.. त्याला सिद्ध करावे लागत नाही.. किंवा तसे करता येत नाही. जो सिद्ध करावयास जातो तो स्वतः 'ब्रह्म' होऊन जातो... असे हे महान शास्त्र आहे.

आता स्वतः 'ब्रह्म' होतो म्हणजे काय होते.. हे समजायचे असेल तर आपल्याला जो पर्यंत 'अपरोक्ष'.. प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान होत तोपर्यंत नाही.. तोपर्यंत 'शब्द आणि शब्दाचा अर्थ ग्रहण करणारी बुद्धी' याची मदत लागते... किंवा याच्या सहाय्याने.. . प्रमाणित शब्दांच्या.. म्हणजेच.. शास्त्र..संत यांच्या वचनावर पुर्ण श्रद्धा ठेऊनच हे समजावून घेता येते. 'श्रद्धा' असणे हा प्रधान भाव आहे... अन्यथा कशाचाच उपयोग होणार नाही... असेही याच शास्त्राचे म्हणणे आहे.

हे सर्व समजावून घेताना.. एखाद्याला केला जाणारा उपदेश आणि त्याच्या अपरिपक्व बुद्धीने ग्रहण केलेला उपदेश यात कमालीच तफावत आढळून येते... किंवा शास्त्राने जे सांगितले आहे ते जसेच्या तसे आपल्या बुद्धीत ठसत नाही.. आणि मग तर्काच्या जगलात.. आपण हरवतो... मुख्य मार्ग रहातो बाजूला आणि त्याला नको असलेले फाटेच फुटत जातात. अशा संभ्रमित अवस्थेत.. जे जे 'उपाय' समजून करायला जावेत.. त्याचा 'अपाय' होण्याचीच शक्यता जास्त असते.

म्हणूनच या 'बुद्धीचे' असे अपरिपक्व असण्यामागचे मूळ 'कारण' शोधण्याशिवाय आणि ती बुद्धी शुद्ध केल्याशिवाय पुढच्या मार्गाचा अपरोक्ष अनुभव येत नाही....!

मग.. शुद्ध झालेल्या बुद्धीला .... ज्यावेळी एखाद्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचा 'तू ब्रह्म आहे'... 'तत्वमसि' या महावाक्याचा उपदेश होतो.. फक्त त्याचवेळी शुद्ध झालेल्य बुद्धीने तो उपदेश जशाच्या तसा 'ग्रहण' केला जातो आणि.. त्यावेळी.. त्या साधकाला ..'मी ब्रह्म आहे'.. 'अहं ब्रह्मास्मि' असा महाबोध होतो. ही साक्षिरुप अवस्था आहे .. असे शास्त्र सांगते.. म्हणजेच एका बाजूला 'मला शरीराचा संग आहे', असाही भाव असतो आणि दुसर्‍या बाजूला मी 'असंग' आहे, असा ही भाव असतो. या भावात अजूनही बुद्धीचे जाणणे अंशमात्राने असते. याच्या पुढचा 'बोध' होतो त्यावेळी.. 'मी बोधी आहे' असा शेष असणारा भाव ही नष्ट होतो..यालाच 'निर्गुणब्रह्म' असे शास्त्र म्हणते. या स्थितीत 'शब्द..अज्ञान आणि ज्ञान' ई. या सर्व कल्पनांचे पुर्णतः खंडन होते... बाकी रहाते ते... निर्विषय.. विषयांनी जाणता न येणारे,निर्विकल्प.. कल्पनेच्या पलीकडचे, निर्वाच्य.. वाचेचा विषय न होणारे.. अद्वितिय..दोन नसणारे.. सर्वत्र.. सदाकाली..सम असणारे, अखंड.. ज्याचे परत खंडन करता येत नाही असे.. अनिर्वचनीय.. वचनानी.. शब्दांनी न सांगता येणारे फक्त आणि फक्तच.. केवळ.. निर्मल्..सर्व मळ रहीत असणारे.. ब्रह्म.
म्हणूनच श्रीवेद..शास्त्र, या ब्रह्माचा अनुभव येताच... नेति..नेति म्हणत मौन पाळतात.. !

आता बुद्धी शुद्ध होणे गरजेचे आहे हे लक्षात येते आणि मग बुद्धी म्हणजे काय? ती कशावर अवलंबून असते? तसेच... या बुद्धीवर कोण-कोण अवलंबून असते? हे सर्व कसे शुद्ध करायचे" शुद्ध होताना मधल्या काही खुणा आहेत का? या सगळ्याचा शोध घेणे गरजेचे ठरते.

आपण जर शोध घेऊन.. मग स्वतः शुद्ध करायच्या वल्गना करू.. तर वैचारिक गोंधळाशिवाय हातात काहीच उरत नाही. मग

'आत्मा' खरच आहे का?
असेलच असे कशावरून? प्रत्यक्ष पुरावा काय?
अमुक-अमुक व्यक्ति..पंथ.. धर्म .. आत्मा मानत नाहीत?
मला हे काही पटत नाही? तुम्हाला पटत असेल तर तुम्ही तसे वागा..
देव आहेच कशावरून.. असेल तर तो मुर्तित आहे असे म्हणने म्हणजे मुर्खपणा आहे..
मग मी जे जिवंत आहेत त्यांच्यात देव आहे असे समजेन.. त्यांचीच सेवा करेन.
देवळात रांगा लावल्याने देव भेटेल का?
मला काही फरक पडत नाही वैगरे.. मुख्य प्रश्नाच्या संदर्भात असणारे.. अनेक उपप्रश्न बुद्धीत उसळी घेतात.. त्यावर वाद..विवाद.. संवाद होतात. शेवटी मुख्य प्रश्न आहे तसाच रहातो.

म्हणूनच.. हातात आवळाघेतल्यावर जेवढ्या स्पष्टतेने तो पहाता येतो.. त्याच स्पष्टतेने 'मी देवास पाहीले आहे', असे छाती ठोकपणे सांगणार्‍या श्रीसंत..साधू ची भेट होणे गरजेचे असते. पण येथे आपलेच 'प्रारब्ध'.. कर्मानुसारी चालणारी बुद्धी आडवी येते. मग आपल्याला याच जन्मात साधू भेट होइल का नाही? इथून सुरुवात होते. आणि भेटले तरी आपल्याला त्यांची ओळख काही पटत नाही. आणि प्रारब्ध्वशात जर भेट झालीच.. तर त्यांची कृपा होणे अजूनच अवघड असते... आणि समजा कृपा झाळीच तर ती कृपा कळणे यातही आपली बुद्धी परत आडवी येते.. अनेक संशय उत्पन्न करते... अरे बापरे ही लिस्ट कधी संपणार? कशी संपणार.. नाहीतर आहेच .. येरे माझ्या मागल्या! माना अथवा मानु नका.. कार्य हे होणारच.. परत जन्म हा मिळणारच..! Happy

आपल्याला कळू दे किंवा न कळू दे.. त्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊ दे अगर न येऊ दे.. पृथ्वी सुर्याभोवती आणि स्वतः भोवती फिरणारच. पृथ्वी वेगाने स्वतः भोवती फिरते आहे..पण आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो का?आपल्याला वेगाचा अनुभव येतोच कुठे?. किंवा आपला अनुभव हा अप्रत्यक्ष असतो.. दिवस रात्र होतात म्हणजे पृथ्वी नक्कीच फिरत असणार.. वैगरे. पृथ्वीचा आस काही अंशाने कललेला आहे.. याचा प्रत्यक्ष अनुभव असतो कोणाला? पण आपल्याला अनुभव नाही म्हणून ऋतू व्हायचे थोडेच थांबतात... ते तर आपण काल गणती करावयास शिकलो त्याच्याही अगोदर होतच होते.. अखंड होतच रहातील... !असा साधासुधा.. संशयाने ग्रस्त नसणारा.. आपल्याच विवेकबुद्धीचा उपयोग करून केलेला.. 'तर्कनिष्ठ-तर्क-अनुमान-कल्पना' तर आपण.. वि-ज्ञाननिष्ठ नक्कीच करू शकतो.. नाही काय? Happy

धन्यवाद!

Pages