उपासना

Submitted by हसरी on 3 February, 2010 - 23:00

उपासना कशी करावी?
कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याची सविस्तर माहिती द्या?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद माधवा... उत्तराबद्द्ल! Happy

>>>कर्माचे स्थूल स्वरुप या दोन वरच्या उदाहरणात वेगवेगळे का आहे.? >> साध्य एकच आहे. तेथप्रर्यंत पोहचायचे मार्ग भिन्न असतात. आणि दोन साधक जरी एकच मार्ग अवलंबत असतील तरी त्यांच्या पातळीमध्ये फरक असतो. त्यामुळे प्रत्येक पातळीला कर्माचे स्थूल स्वरुप वेगळे भासते.

याच्यात दोन भाग आहेत... प्रथम म्हणजे 'साध्य' एकच आहे.. हे जाणणे. आणि दुसरे म्हणजे पोहचायचे 'मार्ग' भिन्न आहेत हे.

पण आपण विचार करत असलेल्या उदाहरणामधे... प.प.श्रीटेंब्येस्वामीमहाराज आणि श्री अर्जुन यांचा मार्ग.. 'कर्ममार्ग' सारखाच आहे. आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे... या दोघांनाही 'आत्मज्ञान' झालेले आहे.... मग पातळीत फरक तो काय असणार? म्हणजे पातळी सारखीच आहे..म्हणूनच या 'स्पेशल' केस मधे.. जेथे साध्य,मार्ग..पातळी सर्व सारखेच आहे आणि तरीही कर्माचे स्थूल स्वरुप वेगळे आहे. मग असे असण्याचे अजून काहीतरी वेगळेच-स्पेशल कारण ही निश्चितच असले पाहीजे.. नाही काय? Happy तर ते 'कारण' काय असावे?.. हाच तो मुख्य प्रश्न.:)

धन्यवाद!

माधव,

>>>पातंजल योगदेखील यम, नियम, आसने या पायर्‍यात शरीर शुध्द आणि सुदृढ करायला सांगतो कारण त्याचा वपर करूनच पुढे जायचे आहे. रोगी शरीराला प्राणायामच नीट जमत नाही तर पुढच्या पायर्‍यांची काय कथा? पण शरीर हे साध्य नाही हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. निरोगी शरीर असल्यावर मुक्ती मिळते असे मुळीच नाही.

याच्यातील ठळक मुद्द्यावर शिक्कामोर्तब करूयात....

'हठयोग' म्हणजेच श्रीपंतजली महामुनींनी जो 'योग' सांगितला आहे, तो आठ अंगाचा... चढत्या पायर्‍यांचा(उतरत्या नाही.) आहे. म्हणजेच एक पायरी चढल्यावर.. दुसरी येते...मग तीसरी असा क्रम आहे.

त्या पायर्‍या... यम,नियम,आसन,प्राणायाम...प्रत्याहार,धारणा,ध्यान,समाधी अशा आहेत. या पायर्‍या चढल्यानंतर 'संयम' साधता येतो.

'समाधी'-संयम हे 'साध्य' आहे... 'साधनाच' नाव आहे 'हठयोग'... याची शास्त्रशुद्ध उपासना करण्यारास 'हठयोगी'. म्हणतात.

या साधन प्रकारात....
१)'प्राण'(प्राणायाम) हे प्रधान अंग आहे.
२)अंतःकरणातील... मन,चित्त्,बुद्धी आणि अहंकार.. या वृत्तींचा निरोध करणे... होणे.. हेच साध्य आहे.
२)या योगाचे महत्त्वपुर्ण... शिक्कामोर्तब करण्यासारखे वैशिष्ठ म्हणजे .. हे साधन आचरताना शरीराव्यतीरिक्त अन्य कोणत्याही स्थूल गोष्टींची गरज लागत नाही. फक्त शरीराचा वापर करून... साध्यापर्यंत पोहचता येते...
३)हा मार्गही श्रीसद्गुरुकृपेनेच साध्य होतो...
४) 'स्थूलशरीर' चा साधना समान उपयोग होत असल्यामूळे.. एखादे शरीर 'हठयोगाला' पात्र आहे का नाही? हे कळण्यासाठी... काही शरिरीक आणि अन्य लक्षणे.. शास्त्रांनी सांगितली आहेत. ती लक्षणे साधारणपणे ६४ आहेत. सुरुवातीला या योगाचा उत्तम साधक म्हणून पात्रता पुर्ण करणारा साधक असतो.. तो जास्तीत जास्त ८च लक्षणांनी युक्त असतो. यावरून हा मार्ग कसा असेल याची कल्पना येते.
५)'प्राण'.. प्रधान अंग असल्यामुळे.. वातावरणातील्..प्राणाची.. हवेची शुद्धता असणे जरूरी असते.
६)तसेच शरीर हे साधन असल्यामूळे... त्याकरीता वेगळा 'वेळ' काढणे जरूरी आहे...

हे सर्व सांगायचे कारण म्हणजे ...आपण सर्व जाणताच.. आपले आजचे जीवन हे धकाधकीचे आहे. शुद्ध हवा(वातावरण).. पात्रता पुर्ण होणारे शरीर...लागणारी सबुरी.. लागणारा वेळ... आपली रोजची तारेवरची कसरत सांभाळून.. या सर्व गोष्टींची पुर्तता करणे होणे महाकठीण आहे... आणि अशा धकाधकीच्या.. घड्याळाच्या काट्यावर बांधलेल्या आपल्या आयुष्यात आपल्याला परमेश्वर म्हणजे काय?..मी म्हणजे कोण आहे? याचे उत्तरही पाहीजे आहे. मग.. हे सगळे कसे जमणार?

हा योग म्हणजे.. नुसते 'पोट' खाली वर करणे नाही... याला महान परंपरा आहे. पण दुर्दैवाने नुसते शरीर हेच 'साध्य' ठरवून फक्त शरीरबुद्धी वाढवणारे.. मुळ 'आत्मबुद्धी'ला फाटा देणारे.. अनेक क्लासेस आज गल्लीबोळात दिसत आहेत. असो.. हा आपला विषय नाही आहे...!

आपल्या या चर्चेच्या अनुषंगाने लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे... हा मुळ योग हा शास्त्रमान्यच आहे... पण सध्याचे आपले रहाणीमान ल़क्षात घेतले तर सर्वांनाच हा महान 'योग' आचरता येईलच असे म्हणता येत नाही.

..मग आता पुढे काय? आपले कसे होणार? आपल्याला परमेश्वर भेटणारच नाही काय? या मुळ प्रश्नांच्या मुळात जाणे महत्त्वाचे ठरते.

धन्यवाद.

माधव,

>>>इतर दिवस कांदा का खात नाही? >> खाऊ शकतो. पण ते मनाविरुध्द होईल कारण आज माझ्या मनावर रुढी, माझे वडिलधारी यांचा पडदा आहे आणि त्याच्यामधूनच मी जगाला पहातो. त्यामुळे गणपतीत कांदा खाणे मनाला पटत नाही. पण ह्याच पडद्याला ऋषीपंचमीच्या दिवशी छीद्र पडते आणि मनाला कांदा मी नि:शंक होऊन खातो. हाच निशःकपणा कायम झाला की तिच मुक्ती. 'अहम् ब्रह्मास्मि' असे म्हणून मुक्ती मिळेल काय? पण ते ज्या दिवशी उमजेल त्या दिवशी साधक मुक्त होणार नाही काय?

तुम्हांला कांदा आवडतो का नाही आवडत? हे मुख्य.. कारण काही असो!
म्हणजे तुम्हाला असे तर म्हणायचे नाही ना की तुम्हाला आवडतो.. पण वडिलधार्‍यांच्या(रूढी) भीतीने तुम्ही खात नाही. असे असेल तर तुम्ही ऋषीपंचमीला तुमच्या आवडीनुसार वागता असे म्हणावे लागेल.... आणि जर असे नसेल.. म्हणजेच तुम्हाला आवडत नसेल तर ..तर तुम्ही तुमच्या आवडीच्या विरुद्ध... ऋषीपंचमीला कांदा खाता असे म्हणावे लागेल. दोन्ही प्रकारात.. अहंब्रह्मास्मि चा नि:शंकपणा कसा काय मिळू शकतो? Happy

धन्यवाद!

सावट, ना कांद्याला महत्व आहे ना तो खाण्याला, ना माझ्या आवडीला! अज्ञानात / अर्धवट ज्ञानात एखादी गोष्ट करणे आणि सत्य जाणल्यावर तीच गोष्ट करणे ह्यात खूप फरक असतो एवढेच मला म्हणायचे होते.

क्ष, तुम्ही येथील पोस्टी नियमित वाचत असाल तर, माझी एक विनंती आहे. एक वेगळा धागा काढून ज्ञानेश्वरी तुम्हाला जशी उमजली आहे, तशी, तिच्याबद्दलचे चिंतन असे पहिल्यापासून लिहिणार का? समजावून घ्यायला अतिशय आवडेल.

शैलजा,

>>>कर्म..शरीर..जीव..आत्मा आणि परमात्मा ... अंतःकरण,मन, बुद्धी... हळू...हळू लिस्ट योग्य आकार धारण करत आहे...!

हे आपले अगोदर बोलणे झाले होते... आणि नंतर..

सात्विक अहंकारा विषयी काही प्रश्न आणि उत्तरे झाली.. त्यात स्थूल आणि सूक्ष्म अहंकाराविषयीही बोलणे झाले.

म्हणजेच आपल्या वरच्या लिस्टमधे 'अहंकार' हा अधिक झाला.

म्हणजे आपली नवीन लिस्ट अशी होईल...

१)कर्म..शरीर्..जीव..आत्मा आणि परमात्मा
२)अंतःकरण(चित्त),मन, बुद्धी.. यात अधिक झालेला अहंकार.

म्हणजे आपली लिस्ट बरोबर होती तर..!:) आता फक्त शास्त्राच्या दृष्टीने पाहूया...

शास्त्रानुसार... अंतःकरण(चित्त),मन, बुद्धी.. यात अधिक झालेला अहंकार... या सर्वांचा एकत्रित अर्थ काय होतो हे आपण वर पाहीलेच (त्यातल्या शब्दात अडकू नका.. फक्त संकल्पना समजून घ्या.)

आता कर्म..शरीर्..जीव..आत्मा आणि परमात्मा याविषयी थोडे पाहूयात.

स्थूल कर्म(शरीराकडून होणारे) आणि त्या शरीरात असणारा... नांदणारा जीव हे दोन वेगवेगळे भाग असतात.( म्हणूनच मागे 'वीज' आणि त्यावर चालणारी उपकरणे(शरीर आणि कर्म) यातील भेद पाहीला.) यातील जीव हा परमात्म्याचा अंश असतो.( हे फक्त समजून घेण्यासाठी.. तत्वतः जीव, आत्मा आणि परमात्मा हे एकच तत्त्व आहे.) आणि तरीही मी वेगळा आहे.. अशी त्या जिवाची वृत्ती असते... म्हणूनच समजण्याच्या दृष्टीने..त्या स्वतःला वेगळा समजणार्‍या जीवालाच 'जिवात्मा' असे वेगळे शास्त्र- नामकरण आहे. हा झाला एक भाग...! उदाहरण घ्यायचे झाल्यास... समुद्र आणि त्यावर येणारी लाट .. यांचे घेता येईल. लाट हा समुद्राचाच भाग आहे पण.. ती लाट स्वतःला.. 'मी' समुद्रापासून वेगळी अशी स्वतःची समजूत करून घेते... पण हे झाले 'लाटेच्या' मनात काय चालले आहे त्याबद्द्ल... पण जर हेच समुद्राच्या बा़जूने पाहील्यास.... त्याला माहीत असते की.. मी आणि लाट वेगळे नाही आहोत पण.. लाटेच्या गैरसमजूती पुढे त्याचा विलाज नसतो.

आता एकच असणारा परमात्मा.. लाटेला वेगळा भासण्याचे काहीतरी 'कारण' हे असलेच पाहीजे.. हो ना! मग त्या न दिसणार्‍या आणि तरीही कार्यरुपाने(वेगळेपणा-भेद) प्रकट असणार्‍या.. सूक्ष्म कार्यकारण-स्वरुप( दिसत नाही म्हणून सूक्ष्म..पण अनुभवता येते) भागालाच 'अंतःकरण' म्हणतात. याचे कार्यपरत्वे वेगळे असणारे चार भाग आपण वर पाहीलेच.

तसेच हा न दिसणारा जो समुह आहे त्याचा 'अंतःकरण' हा एक भाग आहे..पण अजूनही त्याचे काही भाग असतात... असो... या संपुर्ण समुहाला सूक्ष्म शरीर असे म्हणतात.

म्हणजेच.. आता या नवीन माहिती नुसार जर पहायचे झाल्यास...

आपली लिस्ट अशी होईल...

कर्म..शरीर... जीव..आत्मा आणि परमात्मा .... ही झाली आपली जुनी लिस्ट... आणि नवीन..

कर्म.. स्थूलशरीर..अंतःकरणासहीत असणारे सूक्ष्म शरीर... त्यामुळे मी म्हणजे शरीर असे समजणारा 'जीवात्मा'.. आत्मा(ईश्वर).. आणि परमात्मा(परमेश्वर).

तत्वदृष्टीने... जीवात्मा,आत्मा आणि परमात्मा याच्यात काहीच भेद नाही..! उदाहरण पहायचे झाल्यास.. 'परमात्मा' हा जर सोन्याचा डोंगर आहे असे समजले.. तर आत्मा हा लहान सोन्याच्या टेकडीसारखा आहे... तर जीवात्मा हा लहान सोन्याच्याच खड्यासारखा आहे. यात आकारात फरक असला तरीही.. सोन्याचा 'कस' पहायला गेल्यास सर्व सारखेच... काहीच फरक नाही.

मग हा 'आकार' वेगळा का भासतो... याचे 'कारण' काय हे पहाणे महत्त्वाचे ठरते. एकदाका हे कारण कळाले.. आणि ते दुर केले म्हणजे 'आकार' ही सारखे(सम) निश्चित दिसेल. अज्ञान हेच 'कारण' आहे हे बरोबर आहे पण.. जो पर्यंत ते अज्ञान.. कार्य कसे करते, हे माहीत होत नाही.. तो पर्यंत.. त्या न दिसणार्‍या अज्ञानाच्या प्रभावापासून स्वतःला वाचवता येत नाही. म्हणजेच सर्व एक आहे आपल्याला वाचुन(अप्रत्यक्ष) कळालेले असते..पण व्यवहारात(प्रत्यक्षात) भेद दिसत असताना...सगळे एकच आहे हा अनुभव येत नाही.. म्हणजेच आपण मायेच्या(अज्ञानाच्या)प्रभावापासून स्वतःला वाचवू शकत नाही.

म्हणूनच सूक्ष्म कार्य(अंतःकरण वृत्ती ) आणि कारण(अज्ञान) वेगळे करून जर पाहीले... तर वरील लिस्ट मधे अजून थोडा बदल करावा लागेल... तो असा..

स्थूलकर्म.. स्थूलशरीर..अंतःकरणासहीत असणारे सूक्ष्म शरीर(यालाच लिंग शरीर किंवा वासना शरीर असेही म्हणतात.. हे सूक्ष्म कर्म) ... कारण शरीर( म्हणजेच अज्ञान)...त्यामुळे मी म्हणजे शरीर असे समजणारा 'जीवात्मा'.. आत्मा(ईश्वर).. आणि परमात्मा(परमेश्वर).

आता ही लिस्ट शास्त्रानुसार 'योग्य' झाली.(जिवात्म्याच्या दृष्टीने)

धन्यवाद!

माधव,

>>>, ना कांद्याला महत्व आहे ना तो खाण्याला, ना माझ्या आवडीला! अज्ञानात / अर्धवट ज्ञानात एखादी गोष्ट करणे आणि सत्य जाणल्यावर तीच गोष्ट करणे ह्यात खूप फरक असतो एवढेच मला म्हणायचे होते.

धन्यवाद! Happy अज्ञानात आपण जे करतो ते बरोबरच असेल हे सांगता येत नाही... म्हणूनच अज्ञानात... ज्ञानी पुरुषांनी लिहलेले 'शास्त्र' उपयोगी पडते. म्हणजेच अज्ञानी माणसाकडून होणारे कर्म हे जरी त्याने अज्ञानात केले असेल तरीही.. ते 'ज्ञानी' माणसाच्या सांगण्यानुसार(शास्त्रानुसार) केल्यामुळे.. त्या कर्माचा उपयोग .. अज्ञानीमाणसाचे 'अज्ञान' दूर करण्यासाठी निश्चित होतो... असे शास्त्र सांगते.

धन्यवाद!

सावट, धन्यवाद.

आपल्याला शास्त्र खूप महत्वाचं वाटतं का? तुमच्या आतापर्यंतच्या पोस्टी पाहून तरी मला असं वाटतं.

पण माझ्या अल्पबुद्धीनुसार मला असं वाटतं की मूळ संकल्पना/ विचार समजणे, उमजणे महत्वाचे. केवळ शास्त्रावर भर देणे हे तर काही अंतिम ध्येय नाही, नसावे. आपल्या अंतिम ध्येयाकडे पोहोचण्यासाठी त्याकडे मार्गदर्शन म्हणून पहायचे आहे, त्यातच अडकायचे नाही. असो.

आपल्या अंतिम ध्येयाकडे पोहोचण्यासाठी त्याकडे मार्गदर्शन म्हणून पहायचे आहे, त्यातच अडकायचे नाही. असो.>>>१०००% अनुमोदन, जसे "मुर्ति" (दगड) पुजा एक माध्यम आहे. सनातन सत्याकडे पोहचण्याचा. (मोक्ष, परमात्म्याकडे).

शैलजा,
आपल्याला जे म्हणायचंय ते कळतंय पण शास्त्राचं महत्व अतिशय मोठं आहे हे मान्य करावंच लागतं. शास्त्र नसतं तर मुळात आत्मा आहे हेच कळलं नसतं. ज्या ज्ञानेश्वरीचा अर्थ जाणून घ्यायची तुम्हाला उत्सुकता आहे त्याच्या पहिल्या ओवीतच माऊली शास्त्राचे महत्व स्पष्ट करतात.
ॐ नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरुपा ||

वेदांनी, शास्त्राने, सांगितले म्हणून आत्मरुप आपल्याला कळले. नाहीतर माया इतकी सामर्थ्यवान आहे की आत्मस्वरुपाकडे कुणाचेही लक्ष गेले नसते.
बृहदारण्यक उपनिषद म्हणतं "आरामस्तस्य पश्यन्ति न तं पश्यन्ति कश्चन|" त्या आत्मस्वरुपावर भासणारा विस्तार सर्व पाहतात. सर्वांना त्यातच रस असतो. पण त्या स्वरुपाकडे कोणीच बघत नाही.
त्यामुळे शास्त्र महत्वाचे आहे. भगवान् शंकराचार्यांचा विचार याबाबतीत अतिशय मननीय आहे.
अविज्ञाते परे तत्त्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला |
विज्ञातेऽपि परे तत्त्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला ||
अविद्येहून पर अशा आत्मतत्त्वाचा साक्षात्कार झाला नाही तर नुसता शास्त्राचा अभ्यास निष्फळ आहे. त्याचप्रमाणे परमात्मस्वरुपाचा दृढ अनुभव आल्यानंतरही शास्त्र निष्फळ आहे.
संपूर्ण शास्त्राचा हेतूच आत्मस्वरुपाचा साक्षात्कार करुन देणे हा आहे. जर शास्त्र वाचले आणि तो साध्य करुन घेतला नाही तर स्वतः आचार्य, जे साक्षात शब्दप्रभू आहेत, ते म्हणतात "शब्दजालं महारण्यं चित्तभ्रमणकारणम्" - विचारावाचून फक्त शास्त्रातले बारकावे समजावून घेण्याची इच्छा चित्ताला भ्रम निर्माण करणारी आहे. त्यामुळे संकल्पना समजावून घेणं महत्वाचं आहेच.
परमात्मस्वरुपाचा एकदा दृढ अनुभव आला की त्यानंतर शास्त्राचं महत्व तितकं नाही पण ते केव्हा, आत्मानुभव दृढ झाल्यानंतर. समर्थ म्हणतात "साध्य होता साधनाचा ठाव नाही|" पण साध्य झाल्यावर आणि त्याची ग्वाही आपली आपण देऊ शकतो Happy
तोपर्यंत शास्त्राची महती मार्गदर्शक म्हणून आहेच. शास्त्रच आपल्याला सांगेल खरा मार्ग कुठला, सद्गुरुंची लक्षणे काय, सत्शिष्याने कुठली लक्षणे अंगी बाळगावी.
आपलं म्हणणं त्यात गुंतून पडू नये हे आहे हे कळतंय.. शास्त्र अंतिम ध्येय नाही ही तर दगडावरची रेघ आहे. पण त्यासाठी शास्त्राच्या एका शाखेचा (भक्ती, ज्ञान, योग वगैरे) मार्ग अवलंबून त्याचा सांगोपांग विचार व्हावा, त्याचे नियम माहिती करुन घ्यावेत आणि मग पुढे शास्त्रग्रंथ बाजूला ठेवावेत आणि अभ्यास करावा. नुसत्या श्रद्धेच्या बळावर हा मार्ग चालता येत नाही... आणि हे मी, क्ष व्यक्ती, म्हणत नाही Happy
नुसधियाची श्रद्धा | झोंबों पाहसी परमपदा | तरी तैसें हें प्रबुद्धा | सोहोपें नोहे || ज्ञाने. १७.५०||

क्ष, धन्यवाद Happy मला जे म्हणायचे आहे, ते तुम्ही अधिक उत्तम रीत्या उलगडलेले आहे.

मी शास्त्रे महत्व्वाची नाहीत, वा त्यांचा significance नाही हे म्हटलेलं नाही, कृपया गैरसमज नसावा. त्यांचे मार्गदर्शन जरुर घ्यायचे आहेच, पण त्याहीपलिकडे जायचे आहे एवढेच माझे म्हणणे.
उदाहरणार्थ : एक मोठा जलाशय पार करायचा आहे, आणि त्यासाठी तुम्हाला जहाजाची आवश्यकता आहे. कबूल. तरीही जलाशय पार झाल्यावर त्य जहाजामधून पायऊतार होणंही तितकच महत्त्वाचं आणि सुसंगत ठरेल. समजा काही जणांना जहाज परवडत नसेल, त्यांना दुसरे मार्ग उपलब्ध नसतील का? कदाचित छोट्या होड्या वापरुन ते पैलतीराला पोहोचतील. एखाद्याला तेही परवडणार नाही, त्याने काय करावं? शक्ती आहे तिथवर तो पोहून तर जाऊ शकतो? त्याची तशी गरज असेल तर तो जायचे धाडस करेलही. केवळ जहाज नाही, म्हणून अडू नये, हा मतितार्थ. तुम्ही म्हणाल, तो थकून गटांगळ्या खाऊन बुडण्याची शक्यता आहे. आहेच ना, मान्य. जहाज बुडायचीही शक्यता आहेच ना? Happy

समजा एखाद्याला शास्त्रं ठाऊक नाहीत, वा त्याला ती समजतील असा काहीच मार्ग उपलब्ध नाही, पण त्याला भगवंत ठाऊक आहे. तर मग त्याला भगवंतप्राप्ती होणार नाही का? कथा पुराणांत जी लहान बालकांच्या भगवद्प्राप्तीची उदाहरणे असतात, ती उगाच का असतील? जनाबाई, चोखा मेळा ह्यांसारख्या व्यावहारिक दृष्ट्या अडाणी असलेल्या संतांना भगवंत प्राप्ती शास्त्र न जाणताही झालीच ना?

असो. Happy भगवंत शास्त्रे, वेद, पुराणे सार्‍या सार्‍या पलिकडे आहे, असं वाटतं शास्त्रांच्या मदतीने त्याचे असीम रुप, त्याची भव्यता तुम्ही जरुर जाणून घेऊ शकाल, पण शास्त्रं तुम्हाला त्याची अनुभूती देऊ शकतीलच, असे आहे का? विज्ञान तुम्हांला पाण्याचा उत्कलन बिंदू अमुक एवढा आहे हे सांगेल, पण उकळत्या पाण्याचा चटका त्यात हात बुडवल्याशिवाय कळणार नाही. तसेच काहीसे हे आहे, असे वाटते.

असो. Happy

'क्ष' ने वर लिहिलंय "पण त्यासाठी शास्त्राच्या एका शाखेचा (भक्ती, ज्ञान, योग वगैरे) मार्ग अवलंबून त्याचा सांगोपांग विचार व्हावा, त्याचे नियम माहिती करुन घ्यावेत आणि मग पुढे शास्त्रग्रंथ बाजूला ठेवावेत आणि अभ्यास करावा."

या मधे भक्ती हा सोपा मार्ग आलाच. ज्या सामान्य माणसाला भगवंत ठाऊक आहे त्याला तो भक्तीच्या मार्गामुळेच ठाऊक झालेला असतो (ज्ञान आणि योग मार्ग कठीण आहेत). तीच भक्ती देवयान पंथावरुन पुढे पुढे नेत जाते आणि या मार्गाच्या पलिकडल्या टोकालाच तो नारदाचा गाव असतो जिथे 'तो' उभा असतो. एकदा का भक्तीमार्ग आणि त्याचे नियम माहित झाले, ते पाळता येऊ लागले की सामान्य माणूसही पुढे पुढे जात रहातो. फक्त निसरडे स्पॉट्स चुकवता/ओलांडता आले पाहिजेत. हे स्पॉट्स चुकवणंदेखिल त्या नियमांप्रमाणे वागलं तर साधता येतं.

नवविधा भक्ती, उत्तम शिष्य लक्षणे, सद्गुरु म्हणजे कोण? ते नक्की काय करतात हे आपल्याला विविध मार्गाने कळू शकतं. ज्याला हेच शास्त्र आहे हे माहित नसतं किंवा ज्याला लिहिता वाचता येत नाही ती व्यक्ती दुसर्‍या अधिकारी भक्तांनी केलेल्या संकिर्तनातून याबद्दल जाणू शकते. उदा. चोखोबांना लिहिता वाचता तर येतच नव्हतं. त्यांना विठोबाच्या मंदिरात प्रवेशही नव्हता त्या काळातील रुढींप्रमाणे. तरीही त्यांनी भगवंत मिळवला, तो त्यांनी मंदिरा बाहेर थांबून ऐकलेल्या श्रेष्ठ संतांच्या नाम/गुण/रुप संकिर्तनामुळे आत्मसात केलेल्या, वाढवलेल्या भक्ती व ज्ञानामुळेच. एवढंच नाही तर त्यांचं संपुर्ण कुटुंब संतपदाला पोहोचलं होतं. त्यांच्या अभंगांमधून जाणवतं की त्यांनी जरी शास्त्रं वाचली नव्हती तरी अवगत नक्की केली होती.

अर्थात आपापले सद्गुरु जी आज्ञा देतील ती पाळणे हे देखिल शास्त्रंच असल्याने, सद्गुरुंच्या वेगवेगळ्या रुपांनी एखाद्या बाबतीत वेगवेगळं सांगितलं असेल तरी ज्याला सांगितलं त्याने ते तंतोतंत पाळणं अत्यावश्यक आहे. कारण त्याच्यासाठी तोच धर्म असतो. उदा. समजा माझ्या सद्गुरुंनी एका गोष्टीबद्दल एक आज्ञा केली असेल आणि माधवच्या सद्गुरुंनी त्याच गोष्टीबद्दल वेगळी आज्ञा केली असेल तर ती आज्ञा रिस्पेक्टीव्हली माझ्या आणि माधवसाठी शास्त्राप्रमाणेच आहे. (माधव, केवळ उदाहरण म्हणून तुमचा उल्लेख केला आहे Happy )

शैलजा,

>>>समजा एखाद्याला शास्त्रं ठाऊक नाहीत, वा त्याला ती समजतील असा काहीच मार्ग उपलब्ध नाही, पण त्याला भगवंत ठाऊक आहे. तर मग त्याला भगवंतप्राप्ती होणार नाही का?

फारच उत्तम प्रश्न आहे. खरे सागायचे तर.. हे जाणणे हेच आपल्या आत्तापर्यतच्या (प्रथम पासून) चर्चेचे उद्दीष्ट आहे... उपासना कोणती करायची? असा 'हसरी' यांनी सुरुवातीला विचारलेला प्रश्न होता आणि आपला जो आत्ता 'भाव' आहे... तोच त्यावेळी त्यांचाही होता. म्हणजेच त्यानी 'देव' आहे हे गूहीत धरलेलच होत.. पण उपासना का करायची हे कळल्याशिवाय.. पुढे जाता येत नव्हते. म्हणूनच आपण उपासना कोणती करायची... हे पहायच्या अगोदर.. 'उपासना' का करायची हे.. अगोदर पाहू लागलो... आणि या सर्व चर्चेला प्रारंभ झाला... आणि अजूनही आपण त्याचीच चर्चा करत आहोत.

यातील 'हठयोग' यावर आपण शिक्कामोर्तब केलेच आहे. 'कर्मयोगावर' ही बरीच चर्चा झालेली आहे..आताही चालू आहे.आता 'ज्ञानयोग' पहाणे सुरू आहे. ज्ञान ग्रहण करणारी.. बुद्धी असल्यामुळे.. आपण या योगावर 'अप्रत्यक्ष' बोलताना प्रत्येकवेळा 'बुद्धी' आणि 'शास्त्र' यांचा उल्लेख आवर्जून केला आहे. त्यामध्ये 'बुद्धी' या विषयावर लिहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यात कोणालाही दुखवायचा हेतु नव्हता.. तर 'अप्रत्यक्ष' पणे या ज्ञानयोगाचे.. सर्व पैलू पहाणे हाच उद्देश होता.

'ज्ञानयोग' असा.. असा आहे हे सरळ पणे सांगता आले असते.. पण आपल्या संवादातून आलेल्या अनुभवामुळे जे प्रश्न-शंका उद्भवल्या त्या अनुभवता आल्या नसत्या... आणि अनुभव हाच श्रेष्ठ आहे... म्हणजेच.. कर्मयोग,हठयोग.. आणि आताचा आपला ज्ञानयोग .. याच्याव्यतिरिक्त अजून 'योग' असायला हवेत असे... आपल्याला आता आपल्या अनुभवाने पटले आहे.. तशी गरज(मागणी) आपल्यालाच वाटत आहे.. आणि 'जशी मागणी तसा पुरवठा' हे श्रीभगवंताचे ब्रीद आहे.त्यामूळे आपल्या संवादाचे मुख्य उद्दीष्ट साध्य झाले आहे. Happy

ज्ञानयोगावर चर्चा करताना बरेच प्रश्न आले..

१)जसे शास्त्र अगोदर की माणूस?
२) ज्याला शास्त्रच माहीत नाही त्यांना श्रीभगवंत भेटणारच नाही का?
३)शास्त्र माध्यम आहे का साध्य आहे?
४) जे अडाणी आहेत.. शास्त्र वाचता येत नाही.. त्यांचे काय होणार?
५)ज्याचा या शास्त्रावर विश्वासच नाही मग त्याचे काय होणार?
६)आपलाच मार्ग श्रेष्ठ असे म्हणने म्हणजे ज्ञानाचा अहंकार आला तर चालते का.. ही मुभा असते का ?
७)दगडात देव हे माध्यम आहे.. तसेच 'शास्त्र' ही माध्यम का नाही? वैगरे..

हे सर्व प्रश्न पडणे हे अपेक्षितच आहे.. त्यात वावगे काहीच नाही... किंबहूना हे प्रश्न आले नसते तर आपली चर्चा अपुर्ण राहिली असती... म्हणूनच असे प्रश्न यावेत म्हणून प्रश्न-उत्तराचे स्वरुप वादासम झाल्यासारखे वाटले.. परंतु.. ती 'गरज' होती.कृपया क्षमा असावी. प्रश्न पडणे जरूरी आहे ते यामुळेच!

'माणूस' आहे म्हणून श्रीभगवंताना 'देवपण' आहे... देव म्हणणारे कोणीतरी आहे.. पण म्हणून प्रत्येकाला स्वतःमधला देव दिसतोच असा अनुभवही येत नाही.. म्हणूनच याचे कारण काय असावे?... हे जाणण्याचे 'महत्त्व' ही आपोआपच वाढते.

या चर्चेतूनच पुढच्या 'योगाचा' जन्म होणार आहे. Happy

फक्त अडाणी लोकांना वाचता येत नाही.. म्हणून पुढचा योग पहाणे जरूरी आहे.. असा अर्थ मात्र याच्यातून निघत नाही... कारण 'तळमळ' असेल तर 'कानडी' शिकता येईल.. यातच याचे उत्तर आले आहे. शिकलेले सर्वच 'ज्ञानयोगी' असतात असेही दिसत नाही... जसे 'मराठी' येते म्हणजे सर्वानी 'श्रीज्ञानेश्वरी' वाचलेली आहे असे म्हणता येत नाही.. ज्यांनी वाचलेली आहे त्यांना समजलेली आहे असे म्हणता येत नाही..ज्यांना समजलेली आहे त्यांनी आचरणात आणली आहे असेही दिसत नाही किंवा 'संस्कृत' येते म्हणजे..सगळ्यानी उपनिषद वाचलेली..अभ्यासलेली आहेत असे ही म्हणता येत नाही.

या सगळ्याचे 'कारण' काहीतरी वेगळे असले पाहीजे. Happy

धन्यवाद!

अश्विनी,

>>>
या मधे भक्ती हा सोपा मार्ग आलाच. ज्या सामान्य माणसाला भगवंत ठाऊक आहे त्याला तो भक्तीच्या मार्गामुळेच ठाऊक झालेला असतो (ज्ञान आणि योग मार्ग कठीण आहेत). तीच भक्ती देवयान पंथावरुन पुढे पुढे नेत जाते आणि या मार्गाच्या पलिकडल्या टोकालाच तो नारदाचा गाव असतो जिथे 'तो' उभा असतो. एकदा का भक्तीमार्ग आणि त्याचे नियम माहित झाले, ते पाळता येऊ लागले की सामान्य माणूसही पुढे पुढे जात रहातो. फक्त निसरडे स्पॉट्स चुकवता/ओलांडता आले पाहिजेत. हे स्पॉट्स चुकवणंदेखिल त्या नियमांप्रमाणे वागलं तर साधता येतं.

छान सांगितले आहे.

याविषयी काही प्रश्न आहेत... ते असे..

१)या मधे भक्ती हा सोपा मार्ग आलाच. ज्या सामान्य माणसाला भगवंत ठाऊक आहे त्याला तो भक्तीच्या मार्गामुळेच ठाऊक झालेला असतो (ज्ञान आणि योग मार्ग कठीण आहेत).

नुसती श्रद्धा(भाव) असणे आणि जमेल तशी भक्तिकरणे हाच भक्तिमार्ग म्हणावा तर श्रीमाऊली म्हणतात..

नुसधियाची श्रद्धा | झोंबों पाहसी परमपदा | तरी तैसें हें प्रबुद्धा | सोहोपें नोहे || ज्ञाने. १७.५०||

हे अर्जुना...नुसतीच 'श्रद्धा' आहे.. म्हणजे मला 'परमपद'.. मोक्ष मिळेल असे जर तुला वाटत असेल तर.. तर हे प्रज्ञावंता.. तू समजतोस तेवढे हे प्रकरण काही साधे सोपे नाही.

श्रीमाऊली असे सरळपणे स्पष्ट करत आहेत... मग सोपा आहे म्हणून भक्तिमार्ग निवडावा असे कसे म्हणता येईल?

२)तीच भक्ती देवयान पंथावरुन पुढे पुढे नेत जाते आणि या मार्गाच्या पलिकडल्या टोकालाच तो नारदाचा गाव असतो जिथे 'तो' उभा असतो.

मग इतर 'मार्ग' श्रीब्रह्मर्षी नारदांच्या गावाला जात नाहीत काय? तसेच 'देवयान' पंथ म्हणजे काय?

३)एकदा का भक्तीमार्ग आणि त्याचे नियम माहित झाले, ते पाळता येऊ लागले की सामान्य माणूसही पुढे पुढे जात रहातो. फक्त निसरडे स्पॉट्स चुकवता/ओलांडता आले पाहिजेत. हे स्पॉट्स चुकवणंदेखिल त्या नियमांप्रमाणे वागलं तर साधता येतं.

हे नियम कसे माहीत होणार? याकरीता काही 'शास्त्र' आहे का? कारण नियम माहीत नसतील तर निसरडे स्पॉट्स कसे चुकवणार?:)

धन्यवाद!

शैलजा,

>>>एक मोठा जलाशय पार करायचा आहे, आणि त्यासाठी तुम्हाला जहाजाची आवश्यकता आहे. कबूल. तरीही जलाशय पार झाल्यावर त्य जहाजामधून पायऊतार होणंही तितकच महत्त्वाचं आणि सुसंगत ठरेल.

अगदी खर आहे. मार्गाची गरज गावात पोहचण्यासाठी.एकदा पोहचले की मग मार्ग आपोआपच संपतो.. त्याकरीता वेगळे प्रयत्न करायची गरज पडत नाही. किंबहूना 'गाव' आला असे म्हणणे.. म्हणजेच मार्ग संपला असे म्हणणेच होय.

>>>समजा काही जणांना जहाज परवडत नसेल, त्यांना दुसरे मार्ग उपलब्ध नसतील का? कदाचित छोट्या होड्या वापरुन ते पैलतीराला पोहोचतील. एखाद्याला तेही परवडणार नाही, त्याने काय करावं? शक्ती आहे तिथवर तो पोहून तर जाऊ शकतो? त्याची तशी गरज असेल तर तो जायचे धाडस करेलही. केवळ जहाज नाही, म्हणून अडू नये, हा मतितार्थ. तुम्ही म्हणाल, तो थकून गटांगळ्या खाऊन बुडण्याची शक्यता आहे. आहेच ना, मान्य. जहाज बुडायचीही शक्यता आहेच ना?

फक्त बुडायच्या शक्यतेचाच विचार करायचे ठरविले तर असेच 'साधन' निवडावे..मिळावे लागेल..जे बुडणारच नाही...आणि मग आपल्याला त्या साधनाच्या सहाय्यानेच.. न बुडता पैलतीरावर जावे लागेल.

धन्यवाद!

प्रश्न १ व ३ साठी शास्त्र म्हणजे भक्तीचे नियम. नियम म्हणजे इथे कर्मकांडात असतात तसे नियम नाहीत, तर शिष्यलक्षणांचे नियम, तसेच भक्तीमार्गावरुन ढळू नये यासाठी असणारी पथ्ये. उदा. एखादा या मार्गावरुन चालू पहाणारा माणूस जेव्हा एखादी इच्छेविरुद्ध गोष्ट झाल्यावर भगवंतालाच/सद्गुरुंनाच दोष देवून मोकळा होतो आणि तू नही तो और सही या मार्गाने जाऊ लागतो, तेव्हा अत्यंत महत्वाचा नियम म्हणजे अनन्य भक्ती हा ओलांडला जातो. त्यामुळे भगवंतांनी श्री अर्जुनांना जे सांगितले (हे अर्जुना...नुसतीच 'श्रद्धा' आहे.. म्हणजे मला 'परमपद'.. मोक्ष मिळेल असे जर तुला वाटत असेल तर.. तर हे प्रज्ञावंता.. तू समजतोस तेवढे हे प्रकरण काही साधे सोपे नाही. ) ते खरेच आहे. भगवंताचा शब्द असत्य कसा असेल? तसेच निसरडे स्पॉट्स म्हणजे उदा. भक्तीतल्या श्रेष्ठत्वाचाही अहंकार नकळत येणं. सद्गुरुंचं सानिद्ध्य मिळालं असेल तर त्यामुळे स्वतःला बाकिच्यांपेक्षा वेगळं समजणं.

इतर मार्ग आणि भक्तीमार्ग यात सोपेपणात फरक काय आहे तो मी एकदा (देव म्हणजे काय अशा कुठल्याश्या जुन्या माबोवरील बाफवर) रामफळ व सीताफळ यांचे उदाहरण (जे श्रीसाईसच्चरितातून घेतले होते) देऊन सांगितला होता. तसेच तो विठ्ठल (किंवा भगवंताचे कुठलेही रुप) लहान बालकासारखा असतो. त्याच्यावर नजर नाही ठेवली (सततचे अनुसंधान) तर पटकन पळून जातो (माणसाचं मन त्याच्या स्मरणापासून विचलीत होते) परंतु लहान मुलाला जसं परत शोधून जवळ घेतलं तर ते येऊन बिलगतं तसा भगवंतही "एक क्षणतरी मला का विसरलास?" असा जाब न विचारता, पुन्हा चित्त ठिकाणावर आणल्यावर आपल्या हृदयात येऊन बसतो. बाकीच्या मार्गांचं तसं नाही.

भक्तीमार्ग हा मातीचा कच्चा घडा. जो भंगताच पुन्हा मातीत मिसळतो व पुन्हा घडू शकतो. पण ज्ञानमार्ग हा भाजलेला पक्का घडा, जो भंगताच खापरं उरतात, पुन्हा घडू शकणं कठीण असतं.

मग इतर 'मार्ग' श्रीब्रह्मर्षी नारदांच्या गावाला जात नाहीत काय? तसेच 'देवयान' पंथ म्हणजे काय? >>>

श्रीब्रह्मर्षी नारदांचा गाव म्हणजे भर्गलोक. बाकीचे मार्गही तिथे नेतात पण त्या मार्गांमध्ये पतनभयच जास्त असतं. आणि हे मार्ग मोक्ष मागतात, तर भक्तीमार्ग सामिप्य मुक्ती मागते. मोक्ष म्हणजे काहीच न उरणे, तो दिसला तरी त्याचा आनंद उपभोगायलाही न उरणे. बाकिच्या मार्गांनी जाणारे त्याच तोडीचे असावे लागतात. देवयान पंथ म्हणजे भक्तीचा मार्ग. प्रत्येक माणसासाठी हा मार्ग एक्स्क्लुझीव असतो. त्या मार्गाने एकावेळी एकच जण जातो. अशावेळी जो "मी" च्या ऐवजी भगवंताला महत्व देतो त्याचा मार्ग सुकर होतो. त्याच्या वाटेवरुन तो भगवंतच त्याला कडेवर घेऊन जातो.

बाकी काही सुचलं तर नंतर लिहीन. आता ऑफिस सुटायची वेळ झालीय. बस निघून जाईल.

हरि ॐ.

हरि ॐ,
अवश्य लिहा... तुम्ही खुप छान सांगत आहात... जे तोंड श्रीभगवंताचे वर्णन करण्यास थकत नाही.. त्यास साष्टांग नमस्कार.

चातक, नमस्कार!

>>>जसे "मुर्ति" (दगड) पुजा एक माध्यम आहे. सनातन सत्याकडे पोहचण्याचा. (मोक्ष, परमात्म्याकडे).

.. मुर्तिपुजा हे 'माध्यम' कसे काय? हे कृपया सांगाल काय?

धन्यवाद!

अश्विनी,

>>>अर्थात आपापले सद्गुरु जी आज्ञा देतील ती पाळणे हे देखिल शास्त्रंच असल्याने, सद्गुरुंच्या वेगवेगळ्या रुपांनी एखाद्या बाबतीत वेगवेगळं सांगितलं असेल तरी ज्याला सांगितलं त्याने ते तंतोतंत पाळणं अत्यावश्यक आहे. कारण त्याच्यासाठी तोच धर्म असतो.

याचा अर्थ.. श्रीसद्गुरु हे शास्त्राप्रमाणेच उपदेश करतात... असा घेतला तर चालेल काय? Happy

धन्यवाद!

तुम्ही खुप छान सांगत आहात... जे तोंड श्रीभगवंताचे वर्णन करण्यास थकत नाही.. त्यास साष्टांग नमस्कार. >>>> श्रीराम. तुमचा साष्टांग नमस्कार श्रीरामांना अर्पण.

श्रीसद्गुरु हे शास्त्राप्रमाणेच उपदेश करतात... असा घेतला तर चालेल काय? >>> पण या तुमच्या म्हणण्याचा अर्थ "शास्त्र ही श्रीसद्गुरुंपेक्षा श्रेष्ठ आहेत" असा होतो ना? Uhoh सद्गुरुंना आपल्याला जे मार्गदर्शन करायचे असते, जे कवच द्यायचे असते ते स्विकारता यावं म्हणून आपल्याला ज्या तत्वांनुसार वागायला हवं ते म्हणजे शास्त्र (ही अगदीच बाळबोध व्याख्या झाली हे मला माहित आहे Happy ) त्यामुळे माझ्या समजुतीनुसार सद्गुरु जे उच्चारतील तेच शास्त्र. सद्गुरु ही टॉपमोस्ट ऑथोरिटी आहे, शास्त्राच्याही वरची. त्यांच्या वर फक्त आदिमाता आणि त्याही वर निर्गुण निराकार दत्तगुरु. आपल्या कर्मस्वातंत्र्यानुसार वागण्याला सद्गुरुंचे नियम लागू होतात (जसे क्रिकेटमध्ये आपण पाहिजे तसा बॉल टाकू शकतो, फटकावू शकतो. पण आऊट किंवा कुठलेही नियम हे क्रिकेटचेच असतात). तरिही तो कृपासिंधु सद्गुरु त्या नियमांचा वापर एका मर्यादेपर्यंत लवचिक करु शकतो. कितीही पापं केली तरी त्याच्याकडे माफी असते, जर आपण ती पापं कबूल केली, ती सुधारु पाहिली तर आणि तरच. पण जर कुणी त्याच्याशी खोटेपणा करु लागलं तर न्यायनिवाडा त्यांच्या मातेच्या (आदिमाता) आणि दत्तगुरुंच्या कक्षेत जातो आणि तेव्हा सद्गुरु मधे पडत नाहीत. ती व्यक्ती सद्गुरुंच्या इच्छेच्या प्रांतात न रहाता कायद्याच्या प्रांतात दाखल होते.

हे नियम आपण ढोबळपणे पाप व पुण्याच्या तागडीत तोलतो पण कोण कुठल्या पायरीवर उभं आहे हे फक्त सद्गुरुच जाणतात. म्हणूनच एखाद्या प्रारब्धाचे फटके खाल्लेल्या व्यक्तीला आपण कधीच हे बोलायचं नसतं की हे तुझ्याच वाईट कर्मांचं फळ आहे म्हणून. कारण आपली कर्मं आपण जाणलेली नसतात आणि त्यांची फळं कधी आणि कशी मिळणार तेही आपण जाणत नसतो, मग आपल्याला काहीच अधिकार नसतो दुसर्‍याच्या प्रारब्धावर बोट ठेवायचा.

म्हणूनच खर्‍या सद्गुरुंची प्राप्ती होणं ही गोष्ट वरवरच्या अध्यात्माची ओळख न घडवता जास्त स्पष्टता आणते आणि आपोआपच अध्यात्मशास्त्राची खोली दाखवू लागते, ज्याचा उगमच सद्गुरुंपासून झालेला असतो. शास्त्रांचा परिपाक असलेले वेद म्हणूनच अपौरुषेय मानले जातात.

सद्गुरुंच्या वर कोणीच नाही केश्विनी Happy
तेच आदिमाता आणि तेच दत्तगुरु असायला हवेत शिष्यासाठी. गुरु हे साक्षात परब्रह्म ना?
त्याअलिकडे - पलिकडे कोणीच नाही. तसे नसेल तर तो शिष्य तरी कसा?

ब्रह्मानंदं परमसुखदं केवल्म ज्ञानमूर्तीम् |
द्वंदातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्षम् |
एकं नित्यंविमलमचलं सर्वधी: साक्षीभूतम् |
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ||

हे काय फक्त म्हणण्यासाठी आहे का? Happy

तेच आदिमाता आणि तेच दत्तगुरु असायला हवेत शिष्यासाठी. >>> Happy हे ही खरं आहे. पुत्राची अनन्य भक्ती हीच त्या आदिमातेच्या व दत्तगुरुंच्या प्राप्तीसाठी आवश्यक गोष्ट असते. त्यामुळे शिष्यासाठी सद्गुरु हेच आदिमाता आणि दत्तगुरु.
-----

ते मी यासाठी म्हटलं होतं की निर्गुण निराकार दत्तगुरु (परमेश्वर). त्यानंतर गायत्री (परमेश्वराची स्पंदशक्ती) / महिषासुरमर्दिनी (परमेश्वराची इच्छाशक्ती) / अनसुयामाता (परमेश्वराची आज्ञा) ही आदिमातेची रुपं. अस्पंद अवस्थेत तीच "अदिती". पहिला स्पंद/गायत्रीपुत्र म्हणजे ॐकार (परमात्मा/सद्गुरु) आणि पहिल्या स्पंदाच्याही आधी प्रगटलेला शुभ्र प्रकाश म्हणजे दिगंबर दत्तात्रेय (आदिगुरु दत्तात्रेय).

रामावतारात रणांगणावर रामाला (परमात्मा/सद्गुरु) आशिर्वाद द्यायला आदिमाता श्रीरामवरदायिनी रुपात प्रगटली होती. कृष्ण अवतारात परमात्म्याचं गर्भ स्वरुपात रक्षण करण्यासाठी तीच आदिमाता नंदिनी महालक्ष्मी (हिलाच विंध्यवासिनीही म्हणतात) रुपाने प्रगटली होती.

होय, आणि हे सगळे असले तरीही, आपल्या सद्गुरुंपुढे कोणीच अधिक नाही असे माझे मानणे आहे, कारण केवळ सद्गुरुच, "आपणासारखे करिती तत्काळ " Happy
संत तुलसीदास म्हणतात, "गुरुबिन भवनदी तैरे न कोय | जो विरंची ब्रह्मासम तपस्वी होय ||
ब्रह्मा अणि श्रीशंकरासरखा तपस्वीही गुरुकृपेशिवाय भवनदी तरु शकणार नाही, असं त्यांचं प्रतिपादन आहे.

अर्थात्,आजच्या काळात असे सद््गुरु लाभंणं ही अत्यंत जिकीरीची आणि म्हणूनच भाग्याचीच गोष्ट. आजकाल देव, अद्ध्यात्म आणि सद्गुरुपणाचा बाजारच अधिक. Sad

अश्विनी आणि शैलजा, धन्यवाद!

अश्विनी... तुमचे म्हणणे 'परमसत्य' आहे....! श्रीसद्गुरुकृपेशिवाय काही नाही.. हे जाणणेच आपले उद्दिष्ट आहे.:)

प्रश्नाचे स्वरुप थोडे बदलूया...

श्रीगुरुगीतेमधे..श्रीसद्गुरुतत्त्वाचे यथार्थ वर्णन आले आहे...

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभुतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥

यात श्रीसद्गुरुंचे 'केवलं ज्ञानमूर्ति' असे वर्णन का बरे केले आहे?

अश्विनी,

आता वरचा प्रश्न परत विचारला तर...

श्रीसद्गुरु हे शास्त्राप्रमाणेच उपदेश करतात... असा(अर्थ) घेतला तर चालेल काय? किंवा चालतीबोलती ज्ञानाची मुर्ती असणारे श्रीसद्गुरु हे अज्ञानी शिष्यास, त्यांच्या अंगिभूत ज्ञानस्वरुप..ज्ञानाला धरूनच उपदेश करतात.. असेच म्हणावे लागेल. नाही काय? Happy

फक्त स्वरुपात फरक आहे. 'ज्ञान' तेच आहे.. ते अनादी आहे.. फक्त त्याची अनुभूती(आत्मज्ञानानंतरची.. अगोदरची नाही) ज्यावेळी शब्दाच्या सहाय्याने मांडली जाते.. त्यावेळी त्यालाच 'शास्त्र' म्हणतात.

असो... श्रीसद्गुरु म्हणजेच शास्त्र..म्हणजेच ज्ञान! आणि म्हणूनच त्यांचा शिष्यास परममंगलकारी असणारा उपदेश हा अर्थात शास्त्रशुद्धच असतो.फक्त आपल्याला तेही त्यांच्याच कृपेने..त्यांनीच दिलेली साधना केल्यानंतर कळते.

श्रीसद्गुरु कोणास म्हणायचे? हे पहाणे आपले उद्दिष्ट नाही ... तो माझा अधिकारही नाही ,याची पुर्णजाणीव.. मला श्रीसद्गुरुकृपेनेच आहे.

असो..!

धन्यवाद!

>>श्रीसद्गुरु कोणास म्हणायचे? हे पहाणे आपले उद्दिष्ट नाही .>>>> का बरे? सद््गुरु कोणास म्हणावे ह्यासंबंधी शास्त्रे काही म्हणतच असतील ना? जरी आपण आपल्या बुद्धीने काही प्रतिपादू शकत नसलो तरी - शास्त्रामध्ये गुरु कोणास म्हणावे ह्या संबंधी काही मार्गदर्शन असेलच.

तेच ठाऊक नसल्याने तर आजचा समाज भोंदू बाबा आणि गुरुंच्या मागे जाऊन पस्तावत असावा का?

चालतीबोलती ज्ञानाची मुर्ती असणारे श्रीसद्गुरु हे अज्ञानी शिष्यास, त्यांच्या अंगिभूत ज्ञानस्वरुप..ज्ञानाला धरूनच उपदेश करतात.. असेच म्हणावे लागेल. >>> Happy त्यापेक्षा असं म्हटलं तर, ते ज्ञान शब्दरुप धारण करतं तेच शास्त्र.

Pages