गझल रचना.... तरही गझल.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 December, 2010 - 04:49

गालिब्,मीर आदि शायर मैफिल संपल्यावर एक ओळ देत्,की ज्या ओळीचा उपयोग मतल्यात सानी मिसरा म्हणून करुन पुढच्या वेळेस त्यावर आधारीत एक गझल तयार करून आणायची असे.

असाच प्रयोग्,गझल सागर प्रतिष्ठान च्या वतीने मुंबई इथे काही काळ चालला. .... माझ्याशी नियमित संपर्क असलेल्या काही शायरांनी त्यात उत्तमोत्तम गझल रचून गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय व्हावा,सर्वमान्य व्हावा म्हणून बराच हातभार लावला आहे.

गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर्,प्रसादपंत्,भुंगा यांचेशी गप्पा मारताना गेली काही दिवस एक मैफिल्,एक गझल अश्या तून काही सामूहिक गझलांची निर्मिती झाली. हीच कल्पना पुढे नेवून नियमित पणे तरही गझल रचाव्यात ह्या कल्पनेतून हा धागा सुरु करतोय.

ह्यात दर आठवड्याला एक ओळ देण्यात येईल व ती ओळ मतल्यातील सानी मिसर्‍यात चपखल बसवून गझल रचावयाची आहे. आपणा सगळ्यांचे यात स्वागत आहे.

आजची ओळ आहे.

ओळ क्र.१ = जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

वृत्त : आनंदकंद
काफिया : जगण्यात किंवा अर्थ
रदीफ : अर्थ नाही किंवा नाही
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२= सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
वृत्त : चामर
काफिया : उन्हात
रदीफ : मी
लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.३= कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
वृत्त : वियदगंगा
काफिया : वाटले
रदीफ : होते
लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ४ = तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : नकार
रदीफ : आहे
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

ओळ क्र.५ = दु:ख आता फार झाले
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रदीफ : झाले
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र.६ = थांबणे सोसेल तोवर लागते चालायला ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - चालायला, वाकायला, जायला, यायला, व्हायला वगैरे स्वरुपी ('आ'यला समान)

ओळ क्र.७ = वादात या कुणीही सहसा पडू नये
वृत्त - विद्युल्लता
रदीफ - नये
काफिया - पडू
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा

ओळ क्र.८ = ठरेन या जगात मी,महान एकदा तरी ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : एकदा तरी
काफिया : महान
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र.९ = थेट माझ्या सारखा तो कोण होता ? डॉ.अनंत ढवळे यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : कोण होता
काफिया :सारखा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. १० = अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
वृत्त : आनंदकंद
रदीफ = माणसे ही
काफिया = छळतात
लगावली= गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ११ = कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मंदाकिनी
काफिया - आराम, दाम, ठाम, उद्दाम वगैरे
अलामत - आ
रदीफ - पहिल्यासारखा
गागालगा गागालगा गागालगा गागालगा

ओळ क्र.१२ = षंढ म्हणती लोक सारे,ऊठ तू आता तरी
वृत्त - कालगंगा
काफिया = सारे,तारे,वारे,न्यारे,उतारे,दारे,यारे, वगैरे
अलामत -आ
रदीफ - ऊठ तू आता तरी
लगावली - गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र.१३ = माणसे व्यर्थ मी जतन केली ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त = लज्जिता
काफिया = जतन, गहन, सहन इ.इ.
अलामत - अ
रदीफ - केली
लगावली - गालगा गालगा लगागागा

ओळ क्र.१४ = विसरणेही तुझ्या लक्षात नाही ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मृगाक्षी
मात्रा - १९
लगावली - लगागागा लगागागा लगागा
काफिया - लक्षात, गावात, रस्त्यात, कोणात, जात, आत इत्यादी
अलामत - आ
रदीफ - 'नाही'
किमान शेर - मतला धरून पाच

ओळ क्र.१५=अजूनही मी तुझ्याचसाठी जिवंत आहे ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - सती जलौघवेगा
लगावली - लगालगागा लगालगागा लगालगागा
मात्रा - २४
काफिया - जिवंत, महंत, संत, वसंत, आसमंत इत्यादी
अलामत - अं
रदीफ - 'आहे'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र.१६=आला पाउस गेला पाउस ( श्री .प्रसाद गोडबोले,''पंत'' यांची ओळ )
वृत्त - पादाकुलक
लगावली - गागागागा गागागागा

ओळ क्र.१७ = श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गांव मनोहर (उमेश कोठीकर यांची ओळ.)
वृत्त - गागागागा * ४ - किंवा ३२ मात्रांचे मात्रावृत्त
काफिया - मनोहर, घर, उत्तर, जर, तर, अंबर इत्यादी स्वरुपाचे
रदीफ - रदीफ नाही
अलामत - 'अ'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र. १७ = खोल खोल आतवर तुझी नजर
वृत्त = श्येनिका
काफिया = नजर्,उदर्,अधर्,शहर इ.
अलामत = अ
रदीफ = नाही.गैरमुरद्दफ
लगावली =गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.१८ = काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
वृत्त = कालगंगा /देवप्रिया
काफिया = आनंदण्याची, ......... पेरण्याची,तारण्याची,वाकण्याची,अंधारण्याची इ.इ.
अलामत्=अ
रदीफ= कारणे
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.१९ = ही जगाची रीत नाही
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रददीफः नाही
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र. २० = चांदणे आहे खरे की भास नुसता ?.......नचिकेत जोशी,आनंदयात्री यांची ओळ
वृत्त : मंजुघोषा
रदीफ :नुसता
काफिया :भास्,खास्,आभास्,त्रास्,इ..इ..
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.२१ = जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
काफिया : मागतो,ठेवतो,पाहतो ,बोलतो
रददीफः मी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र.२२ =************************************************
वृत्त : सुमंदारमाला
काफिया : जावे,खावे,विसावे,जडावे इ.इ.
रददीफः कुठे
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

ओळ क्र.२३ *********************************************************************************************************
वृत्त :तोटक
काफिया :खरा,जरा,बरा,धरा,करा
रदीफ : गैरमुरद्दफ
लगावली :ललगा ललगा ललगा ललगा

ओळ क्र.२४ :शेवटी संपायला आलीच ही एकांकिका......भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ.
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - एकांकिका, मालिका, विका, शिका, टिका, राधिका, इत्यादी
अलामत - र्‍हस्व इ
शेर - मतला धरून पाच
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.२५ : या इथे कधी काळी देखणे शहर होते.......... बेफिकिर यांची ओळ
वृत्त : रंगराग
रदीफ : होते
काफिया : शहर्,गजर्,अधर्,पदर्,इ.इ.
अलामत : अ
लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा

ओळ क्र.२६ :कशास त्याची वाट पहावी,जे घडणे आहेच असंभव....... अमितदेसाई, बागुलबुवा यांची ओळ
वृत्त : वनहरिणी ( मात्रा वृत्त्, अष्ट मात्रिक ४ आवर्तने )
रदीफ : नाही..गैरमुरद्दफ
काफिया : असंभव्,अनुभव्,वैभव्,संभव्, उद्भव,

ओळ क्र.२७ : हा कोणत्या दिशेचा,आहे प्रवास अजुनी............नयना मोरे, मी_ आर्या यांची ओळ
वृत्त : आनंदकंद
रदीफ : अजुनी
काफिया : प्रवास्,भास्,तास्,निवास्,श्वास
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२८ : तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता
वृत्त : वियदगंगा
रदीफ : होता
काफिया : ओलावला, पाणावला,भंडावला,पावला,धावला,इ.इ...
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र.२९ : सोड चिंता मीच माझे पाहतो आता '' कणखर'' यांचि ओळ
वृत्त : राधा
रदीफ : आता
काफिया : पाहतो,वाहपाहतो,वाहतो,साहतो,राहतो,नाहतो
लगावलि : गालगागा गालगागा गालगागा गा

ओळ क्र. ३०: जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे.
वृत्त : वियदगंगा
रदीफ : आहे
काफिया : रेंगाळतो,जाळतो,टाळतो,हेटाळतो
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ३१: हृदय एवढे धडधडत का असावे?
वृत्त :भुजंगप्रयात
रदीफ : असावे
काफिया : सौतीकाफिया " आ'' कारान्त स्वरकाफिया
लगावली :लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र. ३२: कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले ? डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : राहिले,पाहिले,साहिले,वाहिले,दाहिले,
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र. ३३: जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : देवप्रिया
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : माझ्यासवे, चालवे,आसवे, कालवे, काजवे,आठवे, जाणवे,पारवे,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३४: पिंजर्‍याला मानती आकाश रावे गझलसम्राट सुरेश भट यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : रावे, व्हावे, असावे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३५ : येत जा देवून थोडी कल्पना
वृत्त : मेनका
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : कल्पना,प्रार्थना,वंचना,वासना,साधना,कामना,वेदना
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३६ : दाटते आहे निराशा फार हल्ली
वृत्त :मंजुघोषा
रदीफ : हल्ली
काफिया : फार्,चार्,आजार्,बाजार्,व्यापार.....
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३७ : आज आहे नेमका शुद्धीत मी
वृत्त : मेनका
रदीफ : मी
काफिया : शुद्धीत्,रीत्,प्रीत्,विपरीत्,गीत्,भीत्,आश्रीत,
लगावली : गालगागा गालगागा गालगा

khal.jpg

ओळ क्र. ३८ : चालला आहे कशाचा खल इथे
वृत्त : मेनका
रदीफ : इथे
काफिया :खल्,चल्,निश्चल्,बल्,कल्,दल्,कोलाहल
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३९ : सारे जुनेच आहे काही नवीन नाही....... शाम यांची ओळ.
वृत्त : आनंदकंद
रदीफ :नाही
काफिया : नवीन्,लीन्,दीन.विहीन्,हीन्,लगीन्,तीन्,अधीन्,मशीन,
लगावली :गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ४० :कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा.... रसप यांची ओळ.

लगावली - लगालगागा लगालगा - यती - लगालगागा लगालगा

वृत्ताचे नांव - ज्ञात नाही, कोणाला ठाऊक असल्यास कृपया नोंदवावेत.

काफिया - विरघळून / जळून / पळून / वळून इत्यादी

अलामत - 'ऊ' (दीर्घ ऊकार)

रदीफ - जा

ओळ क्र. ४१: आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
वृत्त : व्योमगंन्गा
रदीफ : तितकीच आहे
काफिया : वेदना , साधना, वन्चना,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.42 : सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची ( वैभव वसंत कुलकर्णी यांची ओळ )
वृत्त : वियद्गंगा
लगावली: लगागागा लगागागा लगागागा लगागागा
काफिये: ताज्या, माझ्या, साध्या , गेल्या
अलामत : तंत्रानुसार आ ह्या स्वरांतयमकाची अलामत..बाकी त्याच्या आधीच्या अक्षरावर आलेली जोडाक्षरातील उछारात येणारे वजन हेही अलामतीसारखे वारंवार येणारे ठरावे अश्या काफियांची अपेक्षा !!
रदीफ : विचारांची

ओळ क्र.४३ : आतला माणूस माझ्या जळत आहे.
वृत्त : मंजुघोषा
काफिया : जळत्,कळत्, वळत्,पळत्,हळहळत
रदीफ : आहे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

गुलमोहर: 

छान उपक्रम कैलासराव! (जीवाला चे 'जि'वाला करायला हवे आहे.)

आपण करत असलेल्या गोष्टी नक्कीच मराठी गझलेस हातभार लावतील असे वाटते. मीही यात सहभागी होत राहीनच जमेल तसे!

जमीन सांगणार आहात की ते स्वातंत्र्य आहे?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

जमीन सांगणार आहात की ते स्वातंत्र्य आहे?

>>>

जमीन म्हणजे शेराचे पहिले वाक्य ना ?( की ज्यात अलामत ठरते )

त्यात स्वातंत्र ठेवले तर माझ्या नवोदितांना जरा सोप्पे जाईल ...

धन्यवाद भूषणजी..... जिवाला बदल केलाय.

जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

हा मिसरा घेवून करायची गझल.... हीच जमीन.

रदीफ= नाही,किंवा अर्थ नाही ..... दोहोंपैकी हवी ती रदीफ घ्यावी. Happy

त्यात स्वातंत्र्य आहे...

वळवेन मी तुझे मन इतका समर्थ नाही
जाळुन उगी जिवाला जगण्यात अर्थ नाही

दिसतेच माणसांचे झुंजून काय होते
मीही प्रयत्न करतो, पण फार शर्थ नाही

चिक्कार अर्थ होते त्या बोलण्यात माझ्या
मौनात मात्र माझ्या काही द्वयर्थ नाही

मी थोपटून घेण्या कोणासमोर जाऊ?
हाही समर्थ नाही, तोही समर्थ नाही

आहेस यात तूही, याच्यामुळेच म्हणतो
ही 'बेफिकीर' दुनिया अगदीच व्यर्थ नाही

माझा सहभाग!

-'बेफिकीर'!

काहि चुकले असेल तर क्रुपया लक्षात आणुन द्यावे.

अन्याय्,अंध होवून्,बघण्यात अर्थ नाही
जाळुन उगी जिवाला जगण्यात अर्थ नाही

अश्रू पुशी जगाचे,दु:खास दूर सारी
त्या बेफि़किर मनाने,रडण्यात अर्थ नाही

जमले तुझे नी माझे,या नेत्रपल्लवीने
बोलू पुन्हा मुक्याने,वदण्यात अर्थ नाही

घेवूनि खत नि पाणी,बदले न अवगुणांना
जालीम वीषवल्ली,रुजण्यात अर्थ नाही

शत्रू हजार येथे,लढण्यास सज्ज आहे
अपुल्याच माणसांशी,लढण्यात अर्थ नाही.

-वैदेहि जोशी-

खूपच चांगला उपक्रम. सर्वांना सदिच्छा!!!

दिलेली ओळ तितकीशी आवडली नाही. तरीही प्रयत्न करतो आहे.

सोडून शायरीला रमण्यात अर्थ नाही
जाळुन उगी जिवाला जगण्यात अर्थ नाही

येईल ती तिला जर ते वेड लागले तर
खरडून या चिटोर्‍या दमण्यात अर्थ नाही

देऊ नको दवंडी.. येण्यास वेळ आहे
ती पेटल्यावरी तू थकण्यात अर्थ नाही

केलेस काय ते ते, ते तेच सांग येथे
दुनियाच बोलते की 'शकण्यात' अर्थ नाही.

उचलून घे हबा तो प्याला तुझ्या सुखाचा
घोटात स्वर्ग आहे, चकण्यात अर्थ नाही.

-हबा

अत्यंत स्तुत्य उपक्रम!!! नक्कीच मराठी गझलेला पुढे नेण्याचे काम व्हावे यातून....शिवाय नवोदितांना(माझ्यासारख्या) भरपूर शिकायला मिळावे.

माझा सहभाग(चू.भु.द्या घ्या)

हतबल क्षणाक्षणाला ठरण्यात अर्थ नाही
जाळुन उगी जिवाला जगण्यात अर्थ नाही

नक्की घबाड यावे हातात या घडीला
किरकोळ तोडपाणी करण्यात अर्थ नाही

राहीन मीच अविरत उचलून भार घेण्या
स्वप्ने अशा तर्‍हेची बघण्यात अर्थ नाही

सांगून काल आलो सगळ्या सग्या जनांना
त्यांनी मला जमेतच धरण्यात अर्थ नाही

असणे तुझे जरूरी असते जिथे जिथेही
हटकून त्याठिकाणी नसण्यात अर्थ नाही

मुक्ती मिळेल ह्याची खात्री कशी करावी?
जन्मायचे पुन्हा जर...... मरण्यात अर्थ नाही

-विजय दि. पाटील

डॉक्टर सा॓।, खुपच छान उपक्रम्....अर्थात यात सहभाग घेण्याचे औधत्त्य मी करणार नाहिये, पण सर्वांच्या गज़लांचा रसास्वाद मात्र भरपूर घेणार...! असे नविन लेखन, काव्य ताजे ताजे वाचायला मिळणे ही पर्वणीच ! मायबोली मुळे हे शक्य होतय, नाही तर प्रिन्ट मेडियात प्रसिद्ध होणारं नविन लेखन आपल्या पर्यंत कधी पोहोचणार, याची वाट पहाण्यातच सगाळे आयुष्य खर्ची पडायचे !

गझलेतील काहीही कळत नसताना केलेय...

सुगरण तुला उगीचच्,म्हणण्यात अर्थ नाही
जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

तू लाटलीस पोळी,झाला तिचा नकाशा,
तो देश कोणता हे,वदण्यात अर्थ नाही

तू वाढलीस आमटि,पातळ कशी जहाली?
रुचकर म्हणून जल्,ओरपण्यात अर्थ नाही

तू पापलेट केले,मज आवडे म्हणूनी
इतुके महाग मासे खाण्यात अर्थ नाही

येता घरी अतीथी,व्यंजन हजार केले
ताटात सपक सारे,देण्यात अर्थ नाही

दिलि जाहिरात आता,ठेवीन खानसामा
बेहाल उदर आता,करण्यात अर्थ नाही

डॉक्टर छानच बदल सुचवलेत... आभारी आहे Happy

दिलि जाहिरात आता,ठेवीन खानसामा
बेहाल उदर आता,करण्यात अर्थ नाही>>> हा हा हा हा!

'आ'मटि चे 'अ'मटी मात्र करा आणि ओरपण्यात यतीभंग झालाय तेवढा कैलासरावांकडून दुरुस्त करवून घ्या!

एक चांगली हझल!

-'बेफिकीर'!

भूषणजी, फार सुंदर हजल केलीय वर्षा_म यांनी.... ..

तो ओरपण्याचा शेर मीच इस्लाह करुन दिलाय..... ओरपणे हा शब्द खूप आवडल्याने तसाच ठेवलाय... Happy

जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही.

असल्या जरी कितीही सबबी, चिंता उद्याची नाही
करीत रहावे प्रयत्य, आहेत खुल्या दिशा दाही

मला गझल लेखनास ज्यांनी प्रेरित केले,त्या ,''विनायक त्रिभुवन'' यांनी रचलेली ही गझल. ते माबो चे सदस्य नसल्याने,मी ही गझल प्रकाशित करत आहे.

फुगण्यात अर्थ नाही,रुसण्यात अर्थ नाही,
जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

निष्पन्न ही न ज्यातुन्,उत्पन्न ही न काही,
नापिक जमीन ऐसी,कसण्यात अर्थ नाही

हे तथ्य जाणले मी,आयुष्य भोगताना
तू एकटा जगी या,रमण्यात अर्थ नाही

या बेगडी जगातुन्,निष्कर्श काढला मी
तू व्यर्थ चंदनासम ,झिजण्यात अर्थ नाही

विद्येविनाच वंचित्,शूद्रास राखते जी
तसल्या सरस्वतीला,पुजण्यात अर्थ नाही

सांगून काल गेले,ते बुद्ध या जगाला
मुर्खांत सज्जनाने,बसण्यात अर्थ नाही

शरदा च्या चांदण्यातच्,राहून रामदासा
दारुण तुझा पराभव्,बघण्यात अर्थ नाही ( आशयात तडजोड न केल्याने वृत्तात सूट घेतली आहे. )

व्हा संघटीत बंधू,संघर्ष हा कराया
परतून खैरलांजी,घडण्यात अर्थ नाही

जो अर्थबोध ही ना,हो सकल बहुजनांना
असली गझल विनायक्,रचण्यात अर्थ नाही

--विनायक (अण्णा) त्रिभुवन्,वाशी,नवी मुंबई.

विद्येविनाच वंचित्,शूद्रास राखते जी
तसल्या सरस्वतीला,पुजण्यात अर्थ नाही

जो अर्थबोध ही ना,हो सकल बहुजनांना
असली गझल विनायक्,रचण्यात अर्थ नाही

हे दोन शेर खूप आवडले डॉक्टर, माझ्या वतीने कळवा विनायकजींना!!

जाळूनिया जिवाला, जगण्यात अर्थ नाही
टाळूनिया सुखाला, हसण्यात अर्थ नाही

त्यागात गोड होते, लाभेकरीच सारे
उतराइची अपेक्षा, करण्यात अर्थ नाही

अंधारल्या दिशांना, होता तुझा सहारा
भाग्यात रात्र मोठी, रमण्यात अर्थ नाही

मिळते किती जणांना, प्रारब्ध हासलेले
वाटून कण सुगंधी, सजण्यात अर्थ नाही

आला कुणी घराला, दानास हाड वैरी
त्यागून कवच दैवी, लढण्यात अर्थ नाही

अनिल सोनवणे
(ओळीत किंचित बदल करून ..)

( थोडक्यात माझीही भर..)

अंधारल्या दिशांना, होता तुझा सहारा
भाग्यात रात्र मोठी, रमण्यात अर्थ नाही

हा शेर फार छान आलाय अनिल.... दुसरी ओळ आली आहे.... ह्या तरही गझलेची आपणाकडून येण्याची आता उत्सुकता लागलीय. :).. ओळ आहे.;

सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी

खरय मुटेसाहेब..

या कामासाठी हा शेर

आसरा तुला दिला नि धावलो रणात मी
सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी

बेरजा गणीत सर्व सोडले शुन्यात मी
सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी

बेरजा करीत राहिलो तरी शुन्यात मी
सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी

डॉ. साहेब उपक्रमाबद्दल अभिनंदन,

मला अजुन गझल प्रांत उमगला नाही.
त्यामुळे
जाळूनिया जिवाला, लिहीण्यात अर्थ नाही.

नवीन मिसर्‍यावरची माझी तरही.....

जाणले अताच येथ पोळलो कशात मी
सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी

दंभ बोलण्यातला अता उघड उघड दिसे
जीभ ही जरी उगाच घोळली तुपात मी

भोगता सजा मुकाट प्राक्तनी मिळे तशी
माहिती नसेच अटक कोणत्या गुन्ह्यात मी

आज ठाम जाहलो कि वागता जगासवे
राहिलो सदैव ना तळ्यात ना मळ्यात मी

मिट्ट दाटली असूनही अवस चहूकडे
शोधतो कशास शुभ्र चांदणे नभात मी

-विजय दिनकर पाटील

Pages