मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'हिंदू' वाचली. आशयापेक्षा कादंबरीत अडगळच जास्त जाणवली. या कादंबरीचं नाव 'हिंदू' का, हा पहिला प्रश्न पडला. शिवाय भरमसाठ तपशिलांमागचा हेतूही कळला नाही.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठीत आणलेलं 'बायबल' वाचनीय आहे. अनुवाद अतिशय सुरेख आणि रसाळ झाला आहे.

समकालीन प्रकाशनाने अनिल अवचटांचं 'गोष्ट मुक्तांगणची' हे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची कहाणी सांगणारं पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. पुस्तकात रुग्णांच्या अनुभवांचा क्वचित भडिमार होतो आहे, असं वाटतं, पण एकंदरीत वाचनीय असं हे पुस्तक आहे.

अण्णा भाऊ साठ्यांचं 'माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णन मस्त आहे. पुस्तक फक्त ४३ पानी आहे, पण भाषा आणि शैली सुरेख आहे.

मला पण वाचायचंय मराठी बायबल. फादर फ्रान्सिस दिब्रेटो चांगलं लिहीतात. सकाळमधे सप्तरंग मधे जे वाचलं ते आवडलं मला.

पत्रकार व अभ्यासक गिरिश कुबेर यांनी लिहिलेली 'हा तेल नावाचा इतिहास आहे', 'एका तेलियाने', 'अधर्मयुध्द' ही पुस्तके वाचून झाली नुकतीच. तिन्ही पुस्तके अतिशय सुंदर आहेत. मराठीत या विषयावर कदाचित पहिलीच व रंजक पुस्तके आहेत. तिन्ही पुस्तके वाचताना कुबेरांचा त्या विषयांवरचा अभ्यास जाणवतो व त्यांच्या मेहनतीला नक्कीच सलाम.

'हा तेल नावाचा इतिहास आहे' यात तेलाचा संपूर्ण इतिहास दिलाय. तेल उत्खननाची सुरुवात कशी झाली. अमेरिकन्सनी नेहेमीप्रमाने व्यावसायिक वृत्ती दाखवत तेलबाजारावर वर्चस्व कसे मिळवले हे कळते. जगातल्या मोठ-मोठ्या तेलकंपन्यांची सुरुवात कशी झाली, युरोप-आशियातील तेल वर्चस्वाची लढाई व जगाचे तेलाचे कोठार असलेल्या मध्य-पूर्वेतील तेलावरुन घडत असलेले राजकारण व त्याचे पूर्ण जगावर होणारे परिणाम या पुस्तकातून कळतात. भारतात पण तेल आढळते त्याचा छोटास इतिहासही दिलाय.

'एका तेलियाने' हे पुस्तक 'ओपेक' या जगप्रसिध्द तेल्-मंडळाच्या अध्यक्षपदी २६ वर्षे काम केलेल्या 'झाकी यामानी' यांच्या कारकिर्दीशी ओळख करून देते. पाश्चात्त देशातील तेलकंपन्या अरबभूमीतील तेल कवडीमोलाने विकत घेतात व बाहेर चढ्या दराने विकत. यावर आळा घालण्यासाठी ओपेकचा जन्म झाला. या संघटनेचा पूर्ण इतिहास, त्याने केलेल्या तेलास्त्राचा उपयोग व त्यामुळे अख्या जगात उद्भवलेले तेलसंकट यांची माहिती मिळते. यामानींनी या संघटनेत अत्यंत महत्वाची कामगिरी पार पाडत तेल उत्पादन व वितरणात आढळणारे आजचे अनेक नियम लागू केलेत. त्यात त्यांना आलेल्या अडचणी पण खूप होत्या, एकदा तर त्यांच्या जीवावरच बेतले होते पण त्यांनी धैर्याने मुकाबला करत आपले कार्य चालू ठेवले.

'अधर्मयुध्द' या पुस्तकात जिहादचा आधुनिक दहशतवादी अवतार कसा उद्भवला, त्याला स्वार्थी राजकारण्यांकडून कसे खतपाणी मिळाले/मिळत आहे याबाबत सविस्तर माहिती आहे.

एकूण ही तिन्ही पुस्तके अवश्य वाचावीत या गटात मोडतील हे नक्की.

ज्योत्स्ना संभाजी कदम यांचे 'सर आणि मी' वाचलं. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या आणि आपल्याच शिक्षकाच्या प्रेमात पडल्यापासुन ते त्यांच्याशी लग्न करुन त्यांच्या मॄत्युपर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केलाय.

संभाजी कदम हे कला शिक्षक होते त्यामुळे त्यांनी काढलेली चित्रे ही पुस्तकात आहेत.

संभाजी कदमांबद्दल त्यांना वाटणारं प्रेम/ममत्व अतिशय मोकळेपणाने लिहिलय. घरच्यांकडून झालेला लग्नाला विरोध, सरांच्या मित्र परिवाराकडून आलेला अनुभव अशा सगळ्या गोष्टी लिहिल्यात.

'सर आणि मी' वाचले. पुस्तक नाही आवडले. पण संभाजी कदमांबद्दलची माहिती इंट्रेस्टिंग वाटली.
लेखन सम्यक नाही वाटले. कलावंताने सहचर कलावंताच्या कारकीर्दीबाबत घेतलेला प्रामाणिक मागोवा वाटत नाही. नात्यावरच, आणि नाते जस्टिफाय करण्यावरच जास्त भर. तरीदेखील सामान्य माणसाला चित्रकारांबद्दल अजिबातच माहीती नसते, म्हणून एकदा वाचायला ठिक.
'आहे मनोहर तरी', 'बंध अनुबंध' , 'स्मृतीचित्रे' वगैरेंच्या तोडीचे नाही वाटत. पुस्तकात केवळ नवर्‍याचे कौतुकच केल्यामुळे की काय हा प्रश्न मी विचारला आहे स्वतःला. तुम्हीही विचारून पहा.
अगदीच 'नाथ हा माझा' छाप ही नाहीये. (पण त्यातही डॉक्टरांचा अभिनय लाऊड होत गेला वगैरे सत्याच्या जवळ जाणारे काही परिच्छेद होते मात्र हे नमुद करावयास हवे जाता जाता.)

'सर आणि मी' हे पुस्तकच मुळी पतीपत्नीच्या नात्याबद्दल आहे. कलावंत दांपत्य, त्यांची कला आणि त्या कलेभोवती फिरणारं त्यांचं नातं, हाच या पुस्तकाचा विषय आहे. हे पुस्तक संभाजी कदमांचं चरित्र किंवा ज्योत्स्ना कदमांचं आत्मचरित्र नाही. यातले खाजगी उल्लेख कदाचित कुणाला खटकू शकतील, पण लिखाण अतिशय प्रामाणिक आहे. ज्योत्स्ना कदमांनी वेळोवेळी ललित लेखन केलं आहे. त्या लेखांमध्ये त्यांचं बदलापूरचं आयुष्य, 'सह्याद्री' मालिकेचं जेनेसिस यांबद्दल बरंच लिहिलं गेलं आहे. या लेखांच्या पार्श्वभूमीवर 'सर आणि मी'मधले उल्लेख कदम दांपत्याच्या चित्रांबद्दल अधिक विचार करायला लावतात.
किंबहुना 'सर आणि मी' हे शीर्षक पुस्तक वाचल्यानंतर अतिशय चपखल वाटतं.

कलाकाराच्या सहचराने लिहिलेले आणि मला सर्वात आवडलेले पुस्तक 'रास'. हे विंदांच्या बायकोने लिहिले आहे (सुमती? करंदीकर)..

कलाकार म्हणून संवेदनांच्या / जाणीवांच्या पातळीवरचे धुंडाळत जाणे आणि सहजीवन हे दोन्ही त्यात असायला हवे होते. वरवरचे वाटत रहाते सर्व. आणि मग ' मी कधीच त्यांनी म्हणले ते जसेच्या तसे स्वीकारले नाही' वगैरेंने अजूनच गोंधळ होतो. भक्तीच्या पातळीवर नवराबायकोचे नाते असुच नये असे मला म्हणायचे नाही. असावे की खुशाल. पण स्वतःचीच समजुत घातल्यासारखी पानेच्या पाने?

हे पुस्तक संभाजी कदमांचं चरित्र किंवा ज्योत्स्ना कदमांचं आत्मचरित्र नाही.>> फेअर पॉईंट.

करेक्ट टण्या- रास. नितळ आणि प्रामाणिक. रोखठोक. सहचरातील प्रातिभशक्तीची यथायोग्य जाणीव, स्वीकार आणि आदरही. पण व्यक्तित्व नाही झाकोळत सुमाताईंचे.

सर्वच दिवाळी अंक भिकार.... मौजेचा तर वर्षाचा आकडा झाकला तर कोणत्याही वर्षीचा कोणत्याही वर्षी खपून जाईल इतका स्टेरिओटाईप. त्याच त्याच दिवाळी अंकांचे तेच तेच पाळीव लेखक....
अस्वलाने जाळाच्या रिन्गनातून त्याच त्याच उड्या मारून दाखवाव्यात तसे एकसुरी लेखन .... छ्या:

देवदत्त पट्ट्नायक यांचं "जय" नावाचं इंग्रजी पुस्तक छान आहे..महाभारतातल्या बर्याच गोष्टींचा उलगडा होतो त्या पुस्तकात,,

रैना ..तु म्हणतेस ना..तसेच काहिसे माझे ह्रुदयस्थ वाचताना झाले..म्हणजे लेखिकेने स्वतःची समजुत घातलिये का मी किती सहन केले ते लिहायचेय की भक्तीच्या पातळीवरचे नाते आहे की मी हि तितकीच समर्थ आहे / होते हे सांगायचेय हे काहि समजले नाहि..

'हिंदू' वाचली. आशयापेक्षा कादंबरीत अडगळच जास्त जाणवली. या कादंबरीचं नाव 'हिंदू' का, हा पहिला प्रश्न पडला. शिवाय भरमसाठ तपशिलांमागचा हेतूही कळला नाही.>> अगदी खरंय!
पहिल्या पहिल्यांदा तर कादंबरी हातातदेखील धरवत नाही. जाम बोअर व्हायला होतं.
पण विकत घेतलिये(नेमाडेच्या सहीसाठी Lol ) म्हणून वाचण्याचे प्रयत्न गेले चार महीने चालूच आहेत, आताशी निम्मी झालिये Proud
पण ह्या कादंबरीइतके मार्केटींग क्वचितच मराठीत इतर कुठल्या पुस्तकाचं झाले असेल. मानलं नेमाडे अ‍ॅन्ड कं. ला!

सध्य वाचत सलेलं पुस्तक आहे "पी. एस. आअय लव यु".. याचाच चित्रपट बघितल्यासारखा वाटतोय मला पण शेवट आठवत नाहिय.. Sad

'सर आणि मी'साठी माझंही रैनाला संपूर्ण अनुमोदन. शिवाय चित्रकारांबद्दलही काही खास माहिती मिळते असं मला नाही वाटलं. त्यांचे गूढ अनुभव, एकमेकांबद्दलची शारीर ओढ (आणि त्याचं केविलवाणं समर्थन. का कुणास ठाऊक.) आणि त्याला आध्यात्मिक पातळीवर नेण्याची धडपड, कदमांचं दैवतीकरण.
फक्त अशाही प्रकारचं नातं स्त्री-पुरुषांत असू शकतं (आणि त्याचं समर्थन केलं नाही तर ते स्वीकारलं जाण्याची शक्यता जास्त असते!) इतकाच पुस्तकातून झालेला लाभ.

सुमाताईन्चे रास नेहमी आवडणारे. पुण्याची अपूर्वाई वाचते आहे. बरे आहे.

अवचट आवडणा-या वाचकांच सारं पॅकेजच नंतर उमगून येतं. >>> या जनरलायझेशन मधे गोची नाही का वाटत?

अवचटांची चार पाच पुस्तके वाचल्यावर पुढची वाचायला कंटाळा येत असेल तर ते समजू शकतो. पण त्या न आवडण्याची केलेली सोशल कॉमेंटरी पटत नाही.

खालची एक कॉमेंट वाचून तर मजा आली: पुलं एवढे लोकप्रिय कारण मराठी माणसाला विनोदातील फारसे वैविध्य वाचायला मिळाले नाही. हे म्हणजे रिचर्ड्स आणि गिलख्रिस्ट भारतीय संघात नाहीत म्हणून सचिन लोकप्रिय आहे म्हणण्यासारखे झाले.

हम्म्म, अवचट आवडण्याचा एक काळ असतो (का होता? कारण आताचे टीनेजर्स अवचट वाचतात का ते माहिती नाही). आणि तो बर्‍याचवेळा जगाचा अनुभव न आलेला, रोमँटीसिझमचा असतो.
अवचट कुठलाही फर्म स्टँड घेत नाहीत, विश्लेषण तर नाहीच नाही, नुसती डीसपॅशनेट वर्णने किती दिवस आवडणार?
तरी 'माणसे', व्यसनमुक्तीचे अनुभव लिहिणारे, अवचट बरे होते, आता म्हणजे आला अनुभव की लिही असे चाल्लेय.
पण लोकांना अवचट लागतात, अवचट वाचून 'सामाजिक जाणिवा' विस्तृत झाल्याचे, 'संवेदनशीलता' वाढल्याचे समाधान मिळवण्यासाठी.

कितीही पुस्तकं विकत घेतली तरी अजूनही जेव्हा लायब्ररीमधून एखादं अनवट पुस्तक अचानक मिळून जातं तो आनंद अवर्णनीय असतो. ही पुस्तकं दुकानांमधे कधीच का दिसली नाहीत याचं मग वाईट वाटतं. लोकप्रियता नसल्याने त्यांच्या आवृत्त्या निघत नसाव्या कदाचित. नुकतंच मला टिळकमंदिर मधून सुनीताबाई देशपांडेंचं 'समांतर जीवन' नावाचं सहा छोटेखानी लेखांचं अप्रतिम पुस्तक असंच अकस्मात मिळालय. इंग्रजी साहित्याच्या क्षेत्रातल्या सहा साहित्यिक पती-पत्नींच्या सहजीवनावरचे, त्या नात्यातले सूक्ष्म ताणेबाणे रंगविणारे हे पुस्तक अत्यंत सुंदर आहे. फिलिस रोझच्या 'Parallel Lives' ची ओळख करुन देणारे सुनिताबाईंचे हे स्वतंत्र पुस्तक आहे. महाराष्ट्र टाईम्समधे त्यांचे हे लेख येऊन गेले होते ८५ ते ९० मधे असं पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे.

>>तरी 'माणसे', व्यसनमुक्तीचे अनुभव लिहिणारे, अवचट बरे होते, आता म्हणजे आला अनुभव की लिही असे चाल्लेय.
पण लोकांना अवचट लागतात, अवचट वाचून 'सामाजिक जाणिवा' विस्तृत झाल्याचे, 'संवेदनशीलता' वाढल्याचे समाधान मिळवण्यासाठी.<< पटतयं !

मी नुकतीच 'आवरण' नावाची कादंबरी वाचली. मूळची डॉ भैरप्पा यांनी लिहिलेली आणि उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली. इतिहासाचा एवढा अभ्यास करुन तो ललित लेखनातून सहजगत्या मांडणारा लेखक मी प्रथमच पाहिला. ते स्वतः स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेले, संशोधन करणारे लेखक आहेत. मराठ्यांचा आणि औरंगजेबाने केलेल्या कर्तॄत्वाचा आलेखच त्यांनी या कादंबरीतून मांडला आहे. २६९ पानांची ही कादंबरी एकदा हातात घेतली, की सोडावीशी वाटतच नाही. यातली पात्र इतकी जवळची वाटतात आणि म्हणूनच त्यांच्या तोंडूनच येणारा इतिहास, इतिहासातलं उजेडात आणलेलं सत्य, विजयनगरच्या साम्राज्याविषयी-काशीविषयी-मथुरेविषयी-औरंगजेबाच्या कारभाराविषयी-शिवाजी महाराजांविषयीची संशोधनातून हाती आलेली माहिती संयतपणे कादंबरीतून समोर येते.
खरंच वाचावी अशी ही कादंबरी. पुढच्या महिन्यात ह्या कादंबरीविषयी प्रत्यक्ष लेखकाशी बोलता येणार आहे. पुण्यातल्या गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आपण ११ डिसेंबरला या कादंबरीविषयी चर्चा करायला प्रत्यक्ष येऊ शकता.

अवचटांबद्दल आगाऊ, मेघना, फारेंड सर्वांना अनुमोदन.
पण लोकांना अवचट लागतात, अवचट वाचून 'सामाजिक जाणिवा' विस्तृत झाल्याचे, 'संवेदनशीलता' वाढल्याचे समाधान मिळवण्यासाठी

फार पूर्वी वाचलेली ( अरुण साधु?) 'त्यांच्या ज्वलंत सामाजिक जाणिवांचे निखारे' कथा आठवली.

Pages