निळू दामल्यांना दिसलेलं लवासा

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

लवासा.

कुठे आहे हे लवासा?

*पुणे जिल्ह्यात, मुळशी तालुक्यातल्या मोसे नामक नदीवर बांधलेलं वरसगाव धरण. धरणाच्या भिंतीमुळे तयार झालेला, चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला, असा जलाशय. ह्या डोंगरांमधून अठरा गावं वसलेली - दासवे, भोईनी, मुगाव, कोळोशी, उगावली, धामण ओहोळ, गडले, साखरी, वदवली, पडलघर, आळमळ, पाथरशेत, बेंबटमाळ, मोसे बुद्रुक, साईव, वरसगाव आणि भोडे.

ह्या परिसरातील एकूण १२ हजार ८० एकर जमीन लवासा कॉर्पोरेशन ह्या कंपनीने विकत घेतलेली आहे आणि दासवे इथे प्रकल्पाचा पहिला टप्पा २०१० च्या शेवटापर्यंत पूर्णपणे तयार व्हायचा आहे. त्यानंतर, एक डोंगर पार करुन येणार्‍या भोइनी गावात बांधकामं होतील, आणि त्यानंतर मुगावमध्ये. धामण ओहोळ ह्या टोकाला असलेल्या गावात शेवटचं बांधकाम होईल, हे ३ टप्पे २०२० सालापर्यंत पूर्ण होतील.*

सुरुवातीपासूनच लवासा प्रकरण बर्‍यापैकी प्रकाशझोतात आहे. वर्तमानपत्रं, टीव्ही चॅनेल्स, इंटरनेट अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून त्याविषयी तुकड्यातुकड्याने माहिती मिळते. लवासावाले अर्थातच प्रकल्पाची भलावण करतात, तर आक्षेप घेणार्‍यांसाठी, पर्यावरणाचा होणारा आणि झालेला र्‍हास, विस्थापितांचं पुनर्वसन, त्यांना मिळालेली व काहीजणांच्या बाबतीत अजिबातच न मिळालेली नुकसानभरपाई, हे महत्वाच्या मुद्द्यांपैकी काही.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर लवासाबद्दल अधिक खोलात जाऊन जाणून घ्यावसं वाटत होतं. त्याच सुमारास 'सकाळ' वृत्तपत्रात 'लवासा' ह्या निळू दामले लिखित पुस्तकाची जाहिरात पाहिली, आणि हे पुस्तक एक अभ्यास पूर्ण विवेचन वाचायला मिळेल म्हणून घ्यायचं ठरवलं, घेतलं आणि वाचूनही काढलं.

पुस्तकाची सुरुवात होते, ती लवासा ह्या शहराच्या कल्पनेचे जन्मदाते, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, अजित गुलबचंद ह्यांच्या करुन दिलेल्या ओळखीने. लवासाच्या अठरा गावांतून पसरलेल्या क्षेत्रफळाची ओळख करुन देत, त्याच्या पसार्‍याची जाणीव करुन देत हे पुस्तक पुढे सरकतं. लवासाच्या जडणघडणीत ज्या अनेक कार्यकुशल लोकांचा हातभार लागलेला आहे, अशा लहान थोरांशी साधलेला संवाद आणि त्या संवादांमधून हाताशी लागलेली माहिती असं बहुतांशी पुस्तकाचं स्वरुप आहे. त्याचबरोबर, ह्या प्रकल्पाची पाहणी करताना, पत्रकाराच्या तटस्थ भूमिकेतून (लेखकाच्या मते) घेतलेला वेध आणि काही ठिकाणी केलेलं भाष्य आणि काही ठिकाणी मांडलेली मतं, हेही पुस्तकात वाचायला मिळतं.

लवासा उभारताना तिथे वसलेल्या स्थनिकांपासून ते त्यांच्या जमिनीच्या व्यवहारांमधून उद्भवलेल्या अडचणी, पर्यावरणविषयक व इतर, जसं की, जमिनीविषयक कायदे कानून, वेगवेगळ्या सरकारी खात्यांच्या नियमावली व त्यांची पूर्तता करताना उद्भवलेल्या अडचणी, समस्या आणि त्यावर लवासावाल्यांनी आपापलं कार्यकौशल्य वापरुन केलेली मात, ह्याचं समरसून केलेलं वर्णन ह्या पुस्तकात आहे.

जमिनींचे गैरव्यवहार कसे चालतात, का होतात इत्यादि बाबींवर पुस्तकात काही पानं खर्ची पडलेली आहेत. तलाठी, मधले दलाल ह्यांचे व्यवहार, साताबाराच्या भानगडी आणि ह्या सर्वाचा लवासावाल्यांना झालेला त्रास. त्यातून लवासा उभारण्याच्या ध्येय्याने (!) प्रेरीत होऊन काढलेले मार्ग उपाय वगैरे. नोकरशाहीचा त्रास. वाचताना, इतके लागेबांधे असलेल्य कंपनीला इतका त्रास होतो, तर, सामान्य माणसाची काय गत, हा विचार मनात आल्यावाचून रहात नाही.

मेधा पाटकर व त्यांच्या संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी पुस्तकात विरोधी सूर मांडलेला आहे, पाटकरांच्या कार्यपद्धतीमधील त्रूटी दाखवल्या आहेत, त्याचप्रमाणे पवार कुटुंबियांचा लवासाशी काहीही संबंध नसून त्यांच्यावर केवळ राळ उडवलेली आहे, आणि पवारांनी इंग्लंडमधल्या लेक डिस्ट्रिक्टवरुन तलावाकाठी हिल सिटी बांधण्याची केवळ कल्पना सुचवली होती, ह्याचाही उल्लेख करायला दामले विसरलेले नाहीत. लवासा स्थानिकांसाठी रोजगार निर्माण करत असूनही स्थानिक लवासावाल्यांना लहान सहान बाबींवरुन त्रास देताना आपण पाहिल्याचं दामले नोंदवतात. पर्यावरणवालेही पर्यावरणाचा र्‍हास झाल्याची उगाचच आरडाओरड करत आहेत, कारण लवासा पर्यावरणाची काळजी घेते आहे, हे उदाहरणं देऊन दामल्यांमधला पत्रकार पटवू पाहतो. त्यासाठी लवासाने नांदते वृक्ष न तोडता एका जागेवरुन दुसर्‍या जागी स्थलांतरीत केले आहेत, हे ते आवर्जून सांगतात. एकूणातच मीडीया सांगोवांगीच्या गोष्टी सांगत, काहीही अभ्यास न करता लवासाविरोधी बातम्या पसरवण्यातच कशी धन्यता मानत होती/ आहे, हे दामल्यांचं प्रतिपादन. पण प्रश्न हा आहे, की एखादा नांदता वृक्ष जरी दुसरीकडे जगला तरी मूळ जागी जिथे तो वाढत, जगत होता, तिथे त्याच्या आडोशाने जगणारी पक्षीसृष्टी, त्याच्या सावलीत वाढणारी इतर झाडं झुडपं, अनेक वर्षांनी वाढू लागलेल्या वेली, त्यावर येणारे कीटक आदी सगळी इकोसृष्टीच हादरून जाते. एकेका वृक्षाबरोबर हे सारं गोकुळ उभं राहतं, म्हणून तर तो नांदता वृक्ष. नुसता वृक्ष स्थलांतरीत केला म्हणजे संपले, इतके पर्यावरण सोपे आहे की काय, हा प्रश्न मनात उभा राहतो, निदान रहावा. ह्याबाबतीत दामल्यांनी काहीच भाष्य का केलेले नाही, कोणास ठाऊक!

पुस्तकाच्या शेवटच्या पानांमध्ये दामले म्हणतात, लवासा बनत आहे, तिथे २००१ साली ३११७ माणसं रहात होती, परगावी जाऊन नोकर्‍या करुन पोटं भरत होती, कारण, गावांतील उत्पन्नावर त्यांची आबाळ होत होती. लवासामुळे त्यांची रोजगारीची सोय झाली. काही माणसं श्रीमंत झाली! म्हणजे नक्की किती? अभ्यासात तो मुद्दा येत नसावा.

वरील ३११७ माणसांपैकी ३१७ आदिवासी आणि ९५% पेक्षा अधिक अ-आदिवासी व अ-दलित आणि वाईट परिस्थितीत जगणारी, ही त्यांनीच दिलेली आकडेवारी. लवासा लोकांची काळजी घेत आहे, हे सिद्ध करण्यासाठी २०१० साली लावसाने दासवे इथे उभं केलेल्या २२ घरांच्या गावाचं आणि तिथे राहणार्‍या एका कुटुंबाचं उदाहरण ते देतात. उदाहरण वाचताना, वरवर आलबेल वाटलं तरी कळीचा मुद्दा हा की, २२ घरांपैकी ६ घरं ही एकाच कुटुंबाची आहेत. उरली १६. ती कितीजणांना पुरेशी आहेत?

दासवेत उभं राहिलेल्या लवासाची अप्रत्य्क्षरीत्या भलावण करताना हा पत्रकार सांगतो की,

१. दासवेत ३५,००० लोक राहतील आणि दोनेक लाख ये जा करतील
२. विकासामुळे दर एकरी उलाढाल काही कोटींची होईल आणि महाराष्ट्र सरकारच्या उत्पन्नात काही अब्जांची वाढ होईल.
३. दासवे हा केवळ टप्पा. एकूण लवासा कितीतरीपट मोठं असेल आणि एकूण रोजगार निर्मिती दासवेपेक्षा खूप अधिक.

पण, काही प्रश्नांची उत्तरं मात्र ह्या पुस्तकात नाहीत, जसं खूप सारे लोक लवासात येऊन आनंद लुटताना, ३११७ स्थानिक तेह्वा कुठे असतील, किंवा आत्ता कुठे आहेत? २२ घरांतून राहणारे सोडून देऊयात. बाकीचे? ३१७ आदिवासींचा वाली कोण? वृक्ष स्थलांतरीत करताना बाकीच्या इकोसिस्टीमचं काय? सगळी शेतजमीन आज अन उद्या अशा तर्‍हेच्या विकासासाठी वापरली जाणार असेल, तर शेती कुठे होईल? होणारा हा फायदा नक्की कोणाचा असेल? कुठे जाईल? कोणाचा विकास साधला जाईल?

एकूण हे पुस्तक वाचल्यावर लवासाशी संबधित कोणावरच विश्वास ठेवावा असं वाटत नाही! ना लवासावाल्यांवर, ना पाटकरांवर, ना गावकर्‍यांवर आणि दामल्यांवरही. एक गोष्ट नक्कीच आहे की प्रत्येकाचे लागेबांधे असतात आणि त्यानुसार सगळी सत्यं वळवली जातात! आणि हे संबंधित सर्वांनाच कमीअधिक प्रमाणात लागू पडत असणारच... पुस्तक खूप एकांगी वाटते. सामान्य जनमानस आपल्या बाजूने असावे हाच शेवटी ह्यातील प्रत्येक घटकाचा अट्टाहास. त्याप्रमाणे वळणार्‍या, वळण दिलेल्या बातम्या आणि सांगितली जाणारी सत्यं. शेवटी काय? कोणीही कोणाचेही नाही. मामला खतम. माझ्या मते तरी, दामल्यांकडून निराशा. कदाचित ते म्हणतात ते बरोबरही असेल, तरीही दामल्यांना अप्रत्यक्ष पीआरच्या कामाला जुंपले आहे की काय असे वाटते पुस्तक वाचताना, खरे तर. प्रकल्पाची दामल्यांनी मांडलेलीही बाजूही असेलच. तेह्वा, ती मांडण्यातही चूक नाही, असेही वाटते. एकूण काय, माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाचा तुकड्या तुकड्याने परस्परविरोधी माहिती मिळाल्याने भेजा फ्राय! पुस्तक संग्राह्य आहे. एक रेफरन्स म्हणून माहिती, डिटेल्स हयासाठी नक्कीच बरे आहे.

पुस्तकात एके ठिकाणी दामले लवासाची उभारणी आणि आजच्या नोकरशाही आणि राजकीय पक्षांबद्दल भाष्य करताना म्हणतात की, "आगरकर किंवा टिळक आजच्या जमान्यात असते तर त्यांना मुंबई - दिल्ली इथले पुढारी आणि नोकरशहा यांना लाच दिल्याशिवाय शाळा काढता, चालवता आली नसती. हे वास्तव आहे."

एका पत्रकाराने लवासाची आणि अनुषंगाने घडलेल्या व्यवहारांची भलावण करण्यापायी असे उद्गार काढावेत, ह्यापेक्षा पत्रकारितेची अधिक शोकांतिका ती काय असेल?

* * - हा भाग 'लवासा' ह्या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकात जरी अठरा गावं म्हटलेली असली, तरी प्रत्यक्षात १७ गावांचाच उल्लेख आढळला.

पुस्तकाचं नाव: लवासा
लेखक: निळू दामले
किंम्मत: रुपये १५०/-
प्रकाशकः मौज प्रकाशन

विषय: 
प्रकार: 

१०००१ % सहमत. दामलेंना पीआर च्या कामाला जुंपले आहे की काय हा तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर हो असावे असेच वाटते.

>>"परव्या त्या डोंगरावर होतो, आज इथं .. उद्या परत सायब येतील अन घराखालचा डोंगरच काढून नेतील."
सूर्यकिरण, हेच कटु सत्य!

नर्मदा आन्दोलनातून 'बेकार' झालेल्या 'माओवादी ' मेधा पाटकराना नवा विषय मिळाला हेही बरे झाले. इलेक्ट्रॉनिक मेडिया सारखे त्यानाही नवा विषय लागत असतो प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी....

राजकारण्यानाही एकमेकावर शरसंधान करण्यासाठी हल्ली 'समाजसुधारकां' ची गरज लागते हल्ली...
एखाद्या मंत्र्याला बदनाम करून मंत्रीमंडळातून हाकलायचे असले की त्याच्या फायली अण्णा हजारेंकडे 'पोचवण्याची ' चोख व्यवस्था होते . काही भाडोत्री पत्रकार ही कामगिरी चोख बजावतात हल्ली... त्याबदल्यात त्याना १० टक्क्याचे फ्लॅटही मिळतात .

शैलजा,
चांगला लिहीला आहेस लेख. लवासाबद्दल पेपरमध्ये थोडेफार वाचले होते तेवढच माहिती होते. तुझ्या लेखामुळे जरा अंदाज आला काय चालू आहे याचा.

पर्यावरणवादी मला प्रचंड दांभिक वाटतात्.पुण्यात एक ग्रुप आहे, सायकली गाडीच्या डीकीत टाकुन एका ठिकाणी जायचे ,छोटी सायकल फेरी काढायची आणि मग पुन्हा पत्रकारांना फोटो देउन सायकली डीकित टाकुन घरी जायचे.
कुठेही प्रकल्प सुरु झाला की ह्यांना आंदोलने सुचतात. प्रकल्प बंद पाडुन आपापल्या मुंबई,पुण्याच्या घरी जायला हे मो़कळे .स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न मात्र अनुत्तरीत.अख्खा विदर्भ ,मराठवाडा मोकळा पडलाय की तुमच्या पर्यावरण व्रुध्दीसाठी, तिथे जा की एवढा कळवळा असेल तर.तिथे मात्र सरकार एकटेच किल्ला लढवत असते.

पश्चिम बंगालमधे सिंगुरचे काय झाले?लोकल माणुस एका फार मोठ्या संधीपासुन वंचित राहीला.ती संधी गुजरातने पळविली.
अहमदनगरचे पण असेच नुकसान ह्या युनियनवाल्यांनी केले. आज पुण्याला पर्याय म्हणुन auto-hub अहमदनगर जिल्हा झाला असता. पण सुरवातीलाच संप यशस्वी करुन सगळे बम्द पाडले, पर्यावसन अहमदनगरच्या तरुण मुलांना झक मारत पुण्या मुंबईत यावे लागतय काम शोधायला. आपोआप real-estate चे रेट वाढतात मग म्हणायचे बिल्डर लॉबीने सरकार विकत घेतले आहे.

मला गंमत वाटते ती socalled मध्यम वर्गाची . स्वतः शहरात राहुन , चारचाकीमधे हिंडुन ,परदेशी प्रवास करुन ,मॉलमधे जाउन हे लोक स्वतःचा carbonfootprint भरपुर वाढवत असतात, पण दुसरीकडे
नागरीकरण होउ नये ही मात्र ह्याम्ची इच्छा असते.
अरे तुम्हाला एव्हदा कळवळा असेल तर जाउन दाखवा एखाद्या खेड्यात जिथे तुमच्या सारख्या intellectual नेतृत्वाची गरज आहे.तुम्ही तिथे जाउन सर्व समावेशक,पर्यावरणपुरक विकास करुन दाखवला तर कुणाची बिशाद आही जमिनी बळकाव्ण्याची?

>>मला गंमत वाटते ती socalled मध्यम वर्गाची . स्वतः शहरात राहुन , चारचाकीमधे हिंडुन ,परदेशी प्रवास करुन ,मॉलमधे जाउन हे लोक स्वतःचा carbonfootprint भरपुर वाढवत असतात, पण दुसरीकडे
नागरीकरण होउ नये ही मात्र ह्याम्ची इच्छा असते.

हे सर्व करायला सरकारची थेट मदत वा राजकीय पाठींबा लागत नाही. सामन्य माणूस या गोष्टी स्वताच्या बळावर आजवर करत आला आहे- पुढेही करत राहील.

>>अरे तुम्हाला एव्हदा कळवळा असेल तर जाउन दाखवा एखाद्या खेड्यात जिथे तुमच्या सारख्या intellectual नेतृत्वाची गरज आहे.तुम्ही तिथे जाउन सर्व समावेशक,पर्यावरणपुरक विकास करुन दाखवला तर कुणाची बिशाद आही जमिनी बळकाव्ण्याची?
हे करायला सरकारची थेट मदत नाही तरी कमीत कमी राजकीय पाठींबा लागतोच हे सत्त्य आहे. अनेक ngo जे अशी कामे करतात त्यांन्नाही थोडा बहुत राजकीय अन सामजिक पाठींबा लागतोच. शिवाय, पर्यावरणपुरक विकास अन जमिनी बळकावणे या दोन वेगळ्या गोश्टी झाल्या.

तेव्हा मला वाटतं वरील दोन्ही विधाने भावनिक आधारावर अपिलिंग आहेत पण त्यातला मुद्दा चुकीचा आहे.
- एक मध्यमवर्गीय- चू.भू.दे.घे.

ए आर सी,
कणभरही अभ्यास/ विचार नसलेलं आणि विनोदी पोस्ट.
प्रत्येक जण आंदोलनात उतरू शकत नाही म्हणून त्याला अवेअरनेस आणि कन्सर्न असूच नये असला मूर्ख विचार देणारं पोस्ट.

>>सायकली गाडीच्या डीकीत टाकुन एका ठिकाणी जायचे ,छोटी सायकल फेरी काढायची आणि मग पुन्हा पत्रकारांना फोटो देउन सायकली डीकित टाकुन घरी जायचे.<<
या लोकांच्यामुळे कुठल्याही प्रकल्पावर/ वस्तुस्थितीवर परिणाम होतो की काय?

>>कुठेही प्रकल्प सुरु झाला की ह्यांना आंदोलने सुचतात. प्रकल्प बंद पाडुन आपापल्या मुंबई,पुण्याच्या घरी जायला हे मो़कळे .स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न मात्र अनुत्तरीत.<<
प्रकल्पामुळेच स्थानिकांना रोजगार मिळणार असतो. आणि सगळे आंदोलन करणारे प्रकल्प बंद पाडून आपापल्या घरी जातात बेजबाबदारपणे. हे गृहितक कशावरून मांडलंय?

>>अख्खा विदर्भ ,मराठवाडा मोकळा पडलाय की तुमच्या पर्यावरण व्रुध्दीसाठी, तिथे जा की एवढा कळवळा असेल तर.तिथे मात्र सरकार एकटेच किल्ला लढवत असते.<<
खरंच शेंडाबुडखा नसलेलं विधान. जिथे जैववैविध्य भरपूर, पिकाऊ जमीन आणि जंगल नैसर्गिकरित्या आहे तिथे ते सगळं नष्ट करून प्रकल्प व्हावेत का? आणि तेही लवासासारखे? केवळ राजकीय नेते आणि अतिश्रीमंतांच्या चैनीसाठी केलेले? ती पर्यावरणाची हानी नाही? आणि विदर्भ-मराठवाडा मोकळा पडलाय तिथे का नाही प्रकल्प होत? सरकार कसला किल्ला लढवतंय तिकडे ते पुरेपूर माहितीये. प्रकल्पांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देताना तिथे फेस येईल सरकारच्या तोंडाला म्हणून तिकडे होऊ देत नाहीत प्रकल्प.

>>मला गंमत वाटते ती socalled मध्यम वर्गाची . स्वतः शहरात राहुन , चारचाकीमधे हिंडुन ,परदेशी प्रवास करुन ,मॉलमधे जाउन हे लोक स्वतःचा carbonfootprint भरपुर वाढवत असतात, पण दुसरीकडे
नागरीकरण होउ नये ही मात्र ह्याम्ची इच्छा असते.<<<
लवासा हे कुठल्या पद्धतीने नागरीकरण आहे? नागरीकरणामधे समाजातल्या सगळ्या स्तरांचे हीत असते. लवासामधे ते कुठे आहे? आणि ही अशी मध्यमवर्गावर जनरलाइज्ड शेरेबाजी करताना जरा विचार करा आधी की आपण काय बोलतोय ते. किंचितही कार्बन फुटप्रिंट न वाढवता रहायचे असेल तर डोंगरातल्या गुहेत एकही कपडा न घालता केवळ कच्चे मांस आणि मिळेल ती कंदमुळे खाऊन रहावे लागेल. ते शक्य असेल तर ही अशी शेरेबाजी करावी अन्यथा जनरलाइज्ड विधाने टाळावी आणि जमलं तर थोडा अभ्यास करावा

>>अरे तुम्हाला एव्हदा कळवळा असेल तर जाउन दाखवा एखाद्या खेड्यात जिथे तुमच्या सारख्या intellectual नेतृत्वाची गरज आहे.तुम्ही तिथे जाउन सर्व समावेशक,पर्यावरणपुरक विकास करुन दाखवला तर कुणाची बिशाद आही जमिनी बळकाव्ण्याची?<<
असे काम करणारे कोण आहेत आणि त्यांच्या वाट्याला येणारे अडथळे आणि त्यांचं काम इत्यादीचा कधी अभ्यास केलाय का? पुस्तकात वाचून नाही. त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम बघून?

इथे मध्यमवर्गीय दांभिक म्हणायचं आणि कुणीतरी फुकटात प्रभात रोडला फ्लॅट द्यावा याची अपेक्षा करत रहायची याच्यापेक्षा खूप अवघड असतात या इतर गोष्टी.

बाकी अभ्यास करायचाच असेल ना तर खालील मुद्दे घ्या सुरूवातीला
१. पर्यावरण म्हणजे काय?
२. जैववैविध्य म्हणजे काय?
३. हे दोन्ही टिकवण्याची गरज का असते?
४. ज्याच्यामुळे पर्यावरण धोक्यात आलेले आहे/ येऊ पहात आहे असे महाराष्ट्रातले प्रकल्प कुठले? कशासंबंधीचे? (सरकारी, निमसरकारी, खाजगी आणि लवासासारखे केवळ श्रीमंतांच्या चैनीसाठीचे)
५. कुठले प्रकल्प बंद पाडले गेले? कशामुळे? कोणामुळे? हे काम केलेल्या लोकांचे वैयक्तिक रहाणीमान काय?
६. कार्बन फुटप्रिंट अजिबात न वाढवता २ दिवस राहून दाखवणे. (यामधे अन्न शिजवण्यालाही बंदी आहे आणि बांधलेल्या घरात रहाण्यास, फॅक्टरीमधे बनलेले कपडे घालण्यासही)

पर्यावरणवाद्यांमधले आत्यंतिक 'डार्क ग्रीन' एनजिओ आणि त्यांचे उद्देश बर्‍याचवेळा संशयास्पद आहेत हे मान्य केले तरी........एखाद्या प्रकल्पातून नक्की कोणाचा 'विकास' होणार आहे? त्याचे दूरगामी परिणाम काय आहेत? त्याची पर्यावरणीय किंमत किती आहे? या सर्व गोष्टींचा विचार केला तर लवासासारखे प्रकल्प आपल्या काहीही उपयोगाचे नाहीत हे कळून येईल. आपली गरज जंगले उध्वस्त करुन तिथे नवी शहरे वसवण्याची आहे की सध्याची शहरे जास्त इफिशियंट करण्याची?
'CAVE' mentality अर्थात सिटीझन्स अगेन्स्ट व्हर्चुअली एव्हरीथिंग आणि केवळ ओरबाडण्याच्या उद्देशाने असलेले मुजोर प्रॉजेक्टस यामधला मध्यममार्ग सरकारने साधावा अशी अपेक्षा असते, मात्र सरकार केवळ धनदांडग्यांचेच आहे ही भावना झाल्याने दुसर्‍या टोकाला जाणार्‍या आंदोलकांची संख्या वाढते आहे.

एआरसी, मी कोणत्याही 'वादा'ची भूमिका घेऊन लिहिलेलं नाहीये, हे पुस्तक वाचल्यानंतरचे स्वाभाविकपणे मनात आलेले प्रश्न म्हणा, विचार म्हणा, मांडलेत. तुम्ही एकदम एवढ्या टोकाला जाऊन का बोलत आहात?

योग, आगाऊ आणि नीरजा, धन्यवाद. तुम्ही मुद्दे मांडलेच आहेत, तेह्वा परत तेच लिहित नाही. Happy

arc यांच्या विधानाचा संपुर्ण विपर्यास करुन दिलेली आक्रस्ताळी आणि टाळ्या मिळवणारी उत्तरं. सगळ्या गोष्टींची जाणीव आणि अभ्यास फक्त माझांच आहे, या धुंदीत केलीली पल्लेदार विधाने. त्यामुळे पुढे कुठलीच चर्चा-संवाद होउ शकत नाही. नुस्ते प्रश्न फेकुन काय साध्य होते ? त्याची तुम्ही तुमच्या विद्वत्तापुर्ण अभ्यासातुन शोधलेली उत्तरे सांगितलीत तर जास्त बरं होईल. (ह्यावर, बर्‍याच ठिकाणी यांच विषयांत लिहिले आहे... ते जाउन वाचा आधी.. असे सोयीचे उत्तरच अपेक्षीत आहे. ) असो. इथलं हे मा शे पो . कारण ह्यांच्याशी घातलेल्या वादातुन पुढे काहीच साध्य होउ शकत नाही याला इतिहास गवाह हय ! Proud

@ शैलजा
लेख खरच खुप सुंदर आणि पोटतिडकीने लिहिल्याचे जाणवते. पण प्रत्येक गोष्टीला कमी-अधीक योग्य-अयोग्य दुसरी बाजु असते हे देखील नजरेआड करुन चालणार नाही. असो. निळु दामल्यांशी या विषयावर थेट संवाद साधावयाचा असल्यास तशी व्यवस्था मी करु शकतो.

नक्कीच परेश. तुम्ही माझा लेख वाचलात, तर मी तसं म्हटल्याचं तुम्ही वाचलंच असेल ना?
>>इथलं हे मा शे पो . कारण ह्यांच्याशी घातलेल्या वादातुन पुढे काहीच साध्य होउ शकत नाही याला इतिहास गवाह हय ! >> वाद असेच सुरु होतात. Happy प्रत्येक जण आपली मतं मांडत आहेत ना इथे?

बर बाबा ए आर सी आणि परेश यांनाच सगळं काही माहितीये.
एकुण एक पर्यावरणवादी दांभिकच असतात.
एकूणएक मध्यमवर्गीय दांभिकच असतो.
पर्यावरण टिकवणे असं काही करायची गरजच नसते.
सगळे प्रकल्प झालेच पाहिजेत.

खुश?

इतकी ढोबळ आणि आक्रस्ताळी जनरलाइज्ड विधानं अभ्यासावर आधारीत असू शकत नाहीत पण तुम्हाला विरोध केला की विपर्यास आणि वाद होतो ना...

या सर्व गोष्टींचा विचार केला तर लवासासारखे प्रकल्प आपल्या काहीही उपयोगाचे नाहीत हे कळून येईल. आपली गरज जंगले उध्वस्त करुन तिथे नवी शहरे वसवण्याची आहे की सध्याची शहरे जास्त इफिशियंट करण्याची?
'CAVE' mentality अर्थात सिटीझन्स अगेन्स्ट व्हर्चुअली एव्हरीथिंग आणि केवळ ओरबाडण्याच्या उद्देशाने असलेले मुजोर प्रॉजेक्टस यामधला मध्यममार्ग सरकारने साधावा अशी अपेक्षा असते, मात्र सरकार केवळ धनदांडग्यांचेच आहे ही भावना झाल्याने दुसर्‍या टोकाला जाणार्‍या आंदोलकांची संख्या वाढते आहे.
>>

सारासार विवेक असलेली पोस्ट. आगाव्या.. जंगले उध्वस्त करुन नव्हे तर, शहरांप्रमाणे गावागावांत सोयी सुवीधा उपलब्ध करु देउन, तिथेच विकास करुन, जिवनस्तर उंचावुन देण्याची जास्त गरज आहे. जिथे आहेत तिथेच , उद्योगांना चालना मिळेल असे infrastructure देण्याची गरज आहे. विषय व्यापक आहे. २-४ ओळीत संपणारा नाही.

आगाऊ,
मान्य! पण दुसरा पर्याय तरी काय आहे? टोकाची भूमिका घेतल्याशिवाय कुणिही त्याकडे लक्ष देत नाही.. ती टोकाची भूमिका कितपत योग्य आहे हा वादाचा विषय असू शकतो.
आणि जी जबाबदारी मुख्यत्वे सरकारची आहे त्यात मध्यमवर्गीयाला दोष का द्यावा? मध्यमवर्गीय मनुष्य लवासा मध्ये घर घ्यायच्या चिंतेत नसतो- त्याला ईतर मुलभूत चिंता आयुष्यभराला पुरेशा आहेत. थोडक्यात दोन्ही कडून मध्यमवर्गीयाला झोडायचे. झोडणे सोपे आहे पण "जोडणे" अवघड आहे. त्यासाठी ऊपाय सुचवावेत. पण ते सुचवायला परिस्थितीचे संपूर्ण आकलन, अभ्यास अन अनुभव लागतो- नेमका हाच मुद्दा नीधप ने वर लिहीला आहे असे मला वाटते.
तेव्हा शक्यतो वैयक्तीक मुद्दे ऊपस्थित न करता वरील लेखात जे मुद्दे मांडले आहेत त्यावर सर्वांनी चर्चा केली तर बरे होईल.
भविष्यात असा बुडाखालून डोंगरच काढून नेणारा लवासा पुन्हा होणार नाही यासाठी काय संघटीत ऊपाय करता येतील का यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. त्यासाठी सामूहीक रीत्या निळू दामले सारख्यांचा निषेध, हेटाळणी वा तीरस्कार करण्याची गरज नाही- किंबहुना त्यांच्याशी/त्यांच्या सारख्यांशी मुलाखत करून ही दुसरी बाजू समोर आणता येईल का ते पहावे.

परेश,
तुम्ही या विषयावर सर्व ईच्छुकांचे निळू दामल्यांशी चर्चासत्र आयोजित कराच. पण चर्चा म्हणजे त्यांचे व्याख्ख्यान नको- विचारांची देवाण घेवाण व्हावी सर्व वैयक्तीक हित संबंध बाजूला ठेवून. मी नक्की हजर राहीन. (१२-२० नोव्हेंबर वैयक्तीक कारणांसाठी देशात आहे- नक्की वेळ काढेन.) बाकी ज्यांना हजर रहायचे असेल त्यांनी ईथेच किंवा परेश ला वि.पु.मध्ये कळवा. एक असेही गटग होवून जावू देत ना काय? Happy

arc: अरे तुम्हाला एव्हदा कळवळा असेल तर जाउन दाखवा एखाद्या खेड्यात जिथे तुमच्या सारख्या intellectual नेतृत्वाची गरज आहे.तुम्ही तिथे जाउन सर्व समावेशक,पर्यावरणपुरक विकास करुन दाखवला तर कुणाची बिशाद आही जमिनी बळकाव्ण्याची?
असे अनेक जण भारतात आहेत. महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात दापोडी येथील खेड्यात जाऊन शेती करणारे श्री दिलीप कुळकर्णी हे तर भारतात प्रसिद्ध आहेत. ते पर्यावरणाविषयी एक नियतकालीकही प्रकाशित करतात पण दुर्दैवाने अशा व्यक्तिंची दखल प्रसारमाध्यमे वा सामान्य जनता घेत नाहीत. किंवा त्यांच्या कार्यात साथही देत नाहीत. तेव्हा वरील मुद्दा बरोबर नाही.

पण ते सुचवायला परिस्थितीचे संपूर्ण आकलन, अभ्यास अन अनुभव लागतो- नेमका हाच मुद्दा नीधप ने वर लिहीला आहे असे मला वाटते.<<
बरोबर योग. आणि या संदर्भातली ढोबळ विधाने करण्यालाही आक्षेप आहे,
असो जेवढं तुम्ही परिस्थिती समजून घ्यायला आत आत किंवा पुढे पुढे जाऊ लागता तेवढं तेवढं सगळं चक्रव्यूहासारखं होत जातं. अजून अजून गोंधळायला होतं. व्हाइट आणि ब्लॅक अश्या दोनच भागातली विभागणी नाहीशी व्हायला लागते. असो...

>>पण चर्चा म्हणजे त्यांचे व्याख्ख्यान नको- विचारांची देवाण घेवाण व्हावी सर्व वैयक्तीक हित संबंध बाजूला ठेवून. मी नक्की हजर राहीन. >> मीही.
१३ नोव्हेंबरला नको, वेमांना भेटायचे आहे Happy

परेश,
तुम्ही या विषयावर सर्व ईच्छुकांचे निळू दामल्यांशी चर्चासत्र आयोजित कराच. पण चर्चा म्हणजे त्यांचे व्याख्ख्यान नको- विचारांची देवाण घेवाण व्हावी सर्व वैयक्तीक हित संबंध बाजूला ठेवून. मी नक्की हजर राहीन. (१२-२० नोव्हेंबर वैयक्तीक कारणांसाठी देशात आहे- नक्की वेळ काढेन.) बाकी ज्यांना हजर रहायचे असेल त्यांनी ईथेच किंवा परेश ला वि.पु.मध्ये कळवा. एक असेही गटग होवून जावू देत ना काय?
>>>

हे नक्की जमु शकतय. फक्त आपल्याला त्यांच्या उपलब्धतेनुसार वेळ आणि तारीख आणि ठिकाण ठरवावं लागेल.

नीधप - "व्हाइट आणि ब्लॅक अश्या दोनच भागातली विभागणी नाहीशी व्हायला लागते."
सहमत. कारण असे ब्लॅक अँड व्हाईट काही नसतेच. वास्तव ग्रेच असते. त्यातली काळी छटा किती अधिक किंवा कमी हे सारे ज्याच्या-त्याच्या आकलनावर आणि त्यातून आकारलेल्या भूमिकेवर अवलंबून. आणि ही भूमिकाच फक्त व्हाईट किंवा ब्लॅक (तुम्ही ज्या बाजूला असता त्यानुसार) असते.

>>चक्रव्यूहासारखं होत जातं. अजून अजून गोंधळायला होतं. व्हाइट आणि ब्लॅक अश्या दोनच भागातली विभागणी नाहीशी व्हायला लागते. असो..
नीधप,
तसे असेलही....... सर्व सामान्यांसाठी रोजचे आयुष्य हा देखिल एक चक्रव्यूव्हच आहे. मुद्दे सर्व रास्तच आहेत पण वैयक्तीक तुम्ही आम्ही देखिल किती दिवस कुंपणावर बसून टीका करणार? ईथेच मा.बो. वर पहा कुठली गाडी घ्यावी या बा.फ. वर १००० ने पोस्टी आहेत. चांगलेच आहे कुणितरी म्हणले तसे सामान्यांच्या विकासाचे ते निदर्शक आहे- असेलही- पण माझ्या परीने कार्बन फूट प्रिंट कमी करायची म्हणून मी गाडी घेणार नाही असे म्हणणारे किती आहेत? आणि तसे म्हटले तरी किंवा ईच्छा असली तरी त्याला पर्यायी ऊपाय काय आहेत? आज गाडी ही गरज झाली आहे का निव्वळ स्टॅटस सिंबॉल हा वादाचा विषय होवू शकतो. (परवाच इथे सौ. ने एक आंतर् राष्ट्रीय वृत्तपत्रात ठळक मठळ्यात पानभर वाचले- अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजात भारतीयांनी मोबाईल चा समावेश केला आहे- त्या अनुशंगाने अर्थातच त्या वृत्तपत्रात एकंदरीत आपल्या विकासातील विरोधाभास दाखवला होता). तेव्हा किमान "ग्राहक" म्हणून आपण आपल्या जबाबदार्‍या ओऴखतो का पाळतो का हाही वादाचा मुद्दा होवू शकतो. लवासा सारख्या प्रकल्पांना आपण "ग्राहक" म्हणून विरोध करू शकतो का अन तसे करायचे असल्यास काय करता येईल ही चर्चा अधिक योग्य ठरेल? दुर्दैव हेच आहे की कुठल्याही मुद्द्यांवर वा क्रुतीवर आपण समाज म्हणून संघटीत होवू शकत नाही (क्रु. वैयक्तीक घेवू नका), अशानेच मग ईतर दुष्ट प्रवृत्तींचे फावते. आपलेच दात अन आपलेच ओठ!

>>हे नक्की जमु शकतय. फक्त आपल्याला त्यांच्या उपलब्धतेनुसार वेळ आणि तारीख आणि ठिकाण ठरवावं लागेल.
परेश,
आभारी. त्यांना विचारून कळवाल का? बाकी कुणाला जमले नाही तरी माझा एकखांबी तंबू हजर असेल.
पण १४ चा रविवार सर्वांना सोयीचा असावा? शैलजा , तुम्ही "वाचा" फोडली आहे तेव्हा तुम्ही तर हव्यातच. आम्हाला/मध्यम वर्गीयांना कुणाचे तरी नेतृत्व लागतेच ना Happy

बरोबर आहे योग. चक्रव्यूह रोजचाच आहे.

पण माझ्या परीने कार्बन फूट प्रिंट कमी करायची म्हणून मी गाडी घेणार नाही असे म्हणणारे किती आहेत? आणि तसे म्हटले तरी किंवा ईच्छा असली तरी त्याला पर्यायी ऊपाय काय आहेत? आज गाडी ही गरज झाली आहे का निव्वळ स्टॅटस सिंबॉल हा वादाचा विषय होवू शकतो.<<<
इथे तूच चक्रव्यूहाची अर्धी खोली तरी सांगितलीयेस. गाडी ऐवजी अजून काही... पण चक्रव्यूह आहेच.

नक्की विकास कुठे? किती? आणि विरोध कुठे आणि किती ह्याचा निर्णय घेतानाच इतका गोंधळ उडतोय. पण गोंधळ उडतोय म्हणून विचार करणारे दांभिक कसे हे झेपलं नव्हतं मगाचच्या पोस्ट मधे. असो.

चर्चा या गोंधळाच्या मुद्द्यांवर व्हायला हवी हे बरोबरच.

शैलजा,
तुम्हाला आताच मा.बो वरून संपर्कातून ईमेल केली आहे. कृ. बघून ऊत्तर पाठवाल का?

आभारी.

(कधी नव्हे ते) मला एआरसी अन बाजो[पूर्णविराम] यान्च्या पोस्टना अनुमोदन द्यावेसे वाटतय! Happy

Pages