निळू दामल्यांना दिसलेलं लवासा

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

लवासा.

कुठे आहे हे लवासा?

*पुणे जिल्ह्यात, मुळशी तालुक्यातल्या मोसे नामक नदीवर बांधलेलं वरसगाव धरण. धरणाच्या भिंतीमुळे तयार झालेला, चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला, असा जलाशय. ह्या डोंगरांमधून अठरा गावं वसलेली - दासवे, भोईनी, मुगाव, कोळोशी, उगावली, धामण ओहोळ, गडले, साखरी, वदवली, पडलघर, आळमळ, पाथरशेत, बेंबटमाळ, मोसे बुद्रुक, साईव, वरसगाव आणि भोडे.

ह्या परिसरातील एकूण १२ हजार ८० एकर जमीन लवासा कॉर्पोरेशन ह्या कंपनीने विकत घेतलेली आहे आणि दासवे इथे प्रकल्पाचा पहिला टप्पा २०१० च्या शेवटापर्यंत पूर्णपणे तयार व्हायचा आहे. त्यानंतर, एक डोंगर पार करुन येणार्‍या भोइनी गावात बांधकामं होतील, आणि त्यानंतर मुगावमध्ये. धामण ओहोळ ह्या टोकाला असलेल्या गावात शेवटचं बांधकाम होईल, हे ३ टप्पे २०२० सालापर्यंत पूर्ण होतील.*

सुरुवातीपासूनच लवासा प्रकरण बर्‍यापैकी प्रकाशझोतात आहे. वर्तमानपत्रं, टीव्ही चॅनेल्स, इंटरनेट अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून त्याविषयी तुकड्यातुकड्याने माहिती मिळते. लवासावाले अर्थातच प्रकल्पाची भलावण करतात, तर आक्षेप घेणार्‍यांसाठी, पर्यावरणाचा होणारा आणि झालेला र्‍हास, विस्थापितांचं पुनर्वसन, त्यांना मिळालेली व काहीजणांच्या बाबतीत अजिबातच न मिळालेली नुकसानभरपाई, हे महत्वाच्या मुद्द्यांपैकी काही.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर लवासाबद्दल अधिक खोलात जाऊन जाणून घ्यावसं वाटत होतं. त्याच सुमारास 'सकाळ' वृत्तपत्रात 'लवासा' ह्या निळू दामले लिखित पुस्तकाची जाहिरात पाहिली, आणि हे पुस्तक एक अभ्यास पूर्ण विवेचन वाचायला मिळेल म्हणून घ्यायचं ठरवलं, घेतलं आणि वाचूनही काढलं.

पुस्तकाची सुरुवात होते, ती लवासा ह्या शहराच्या कल्पनेचे जन्मदाते, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, अजित गुलबचंद ह्यांच्या करुन दिलेल्या ओळखीने. लवासाच्या अठरा गावांतून पसरलेल्या क्षेत्रफळाची ओळख करुन देत, त्याच्या पसार्‍याची जाणीव करुन देत हे पुस्तक पुढे सरकतं. लवासाच्या जडणघडणीत ज्या अनेक कार्यकुशल लोकांचा हातभार लागलेला आहे, अशा लहान थोरांशी साधलेला संवाद आणि त्या संवादांमधून हाताशी लागलेली माहिती असं बहुतांशी पुस्तकाचं स्वरुप आहे. त्याचबरोबर, ह्या प्रकल्पाची पाहणी करताना, पत्रकाराच्या तटस्थ भूमिकेतून (लेखकाच्या मते) घेतलेला वेध आणि काही ठिकाणी केलेलं भाष्य आणि काही ठिकाणी मांडलेली मतं, हेही पुस्तकात वाचायला मिळतं.

लवासा उभारताना तिथे वसलेल्या स्थनिकांपासून ते त्यांच्या जमिनीच्या व्यवहारांमधून उद्भवलेल्या अडचणी, पर्यावरणविषयक व इतर, जसं की, जमिनीविषयक कायदे कानून, वेगवेगळ्या सरकारी खात्यांच्या नियमावली व त्यांची पूर्तता करताना उद्भवलेल्या अडचणी, समस्या आणि त्यावर लवासावाल्यांनी आपापलं कार्यकौशल्य वापरुन केलेली मात, ह्याचं समरसून केलेलं वर्णन ह्या पुस्तकात आहे.

जमिनींचे गैरव्यवहार कसे चालतात, का होतात इत्यादि बाबींवर पुस्तकात काही पानं खर्ची पडलेली आहेत. तलाठी, मधले दलाल ह्यांचे व्यवहार, साताबाराच्या भानगडी आणि ह्या सर्वाचा लवासावाल्यांना झालेला त्रास. त्यातून लवासा उभारण्याच्या ध्येय्याने (!) प्रेरीत होऊन काढलेले मार्ग उपाय वगैरे. नोकरशाहीचा त्रास. वाचताना, इतके लागेबांधे असलेल्य कंपनीला इतका त्रास होतो, तर, सामान्य माणसाची काय गत, हा विचार मनात आल्यावाचून रहात नाही.

मेधा पाटकर व त्यांच्या संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी पुस्तकात विरोधी सूर मांडलेला आहे, पाटकरांच्या कार्यपद्धतीमधील त्रूटी दाखवल्या आहेत, त्याचप्रमाणे पवार कुटुंबियांचा लवासाशी काहीही संबंध नसून त्यांच्यावर केवळ राळ उडवलेली आहे, आणि पवारांनी इंग्लंडमधल्या लेक डिस्ट्रिक्टवरुन तलावाकाठी हिल सिटी बांधण्याची केवळ कल्पना सुचवली होती, ह्याचाही उल्लेख करायला दामले विसरलेले नाहीत. लवासा स्थानिकांसाठी रोजगार निर्माण करत असूनही स्थानिक लवासावाल्यांना लहान सहान बाबींवरुन त्रास देताना आपण पाहिल्याचं दामले नोंदवतात. पर्यावरणवालेही पर्यावरणाचा र्‍हास झाल्याची उगाचच आरडाओरड करत आहेत, कारण लवासा पर्यावरणाची काळजी घेते आहे, हे उदाहरणं देऊन दामल्यांमधला पत्रकार पटवू पाहतो. त्यासाठी लवासाने नांदते वृक्ष न तोडता एका जागेवरुन दुसर्‍या जागी स्थलांतरीत केले आहेत, हे ते आवर्जून सांगतात. एकूणातच मीडीया सांगोवांगीच्या गोष्टी सांगत, काहीही अभ्यास न करता लवासाविरोधी बातम्या पसरवण्यातच कशी धन्यता मानत होती/ आहे, हे दामल्यांचं प्रतिपादन. पण प्रश्न हा आहे, की एखादा नांदता वृक्ष जरी दुसरीकडे जगला तरी मूळ जागी जिथे तो वाढत, जगत होता, तिथे त्याच्या आडोशाने जगणारी पक्षीसृष्टी, त्याच्या सावलीत वाढणारी इतर झाडं झुडपं, अनेक वर्षांनी वाढू लागलेल्या वेली, त्यावर येणारे कीटक आदी सगळी इकोसृष्टीच हादरून जाते. एकेका वृक्षाबरोबर हे सारं गोकुळ उभं राहतं, म्हणून तर तो नांदता वृक्ष. नुसता वृक्ष स्थलांतरीत केला म्हणजे संपले, इतके पर्यावरण सोपे आहे की काय, हा प्रश्न मनात उभा राहतो, निदान रहावा. ह्याबाबतीत दामल्यांनी काहीच भाष्य का केलेले नाही, कोणास ठाऊक!

पुस्तकाच्या शेवटच्या पानांमध्ये दामले म्हणतात, लवासा बनत आहे, तिथे २००१ साली ३११७ माणसं रहात होती, परगावी जाऊन नोकर्‍या करुन पोटं भरत होती, कारण, गावांतील उत्पन्नावर त्यांची आबाळ होत होती. लवासामुळे त्यांची रोजगारीची सोय झाली. काही माणसं श्रीमंत झाली! म्हणजे नक्की किती? अभ्यासात तो मुद्दा येत नसावा.

वरील ३११७ माणसांपैकी ३१७ आदिवासी आणि ९५% पेक्षा अधिक अ-आदिवासी व अ-दलित आणि वाईट परिस्थितीत जगणारी, ही त्यांनीच दिलेली आकडेवारी. लवासा लोकांची काळजी घेत आहे, हे सिद्ध करण्यासाठी २०१० साली लावसाने दासवे इथे उभं केलेल्या २२ घरांच्या गावाचं आणि तिथे राहणार्‍या एका कुटुंबाचं उदाहरण ते देतात. उदाहरण वाचताना, वरवर आलबेल वाटलं तरी कळीचा मुद्दा हा की, २२ घरांपैकी ६ घरं ही एकाच कुटुंबाची आहेत. उरली १६. ती कितीजणांना पुरेशी आहेत?

दासवेत उभं राहिलेल्या लवासाची अप्रत्य्क्षरीत्या भलावण करताना हा पत्रकार सांगतो की,

१. दासवेत ३५,००० लोक राहतील आणि दोनेक लाख ये जा करतील
२. विकासामुळे दर एकरी उलाढाल काही कोटींची होईल आणि महाराष्ट्र सरकारच्या उत्पन्नात काही अब्जांची वाढ होईल.
३. दासवे हा केवळ टप्पा. एकूण लवासा कितीतरीपट मोठं असेल आणि एकूण रोजगार निर्मिती दासवेपेक्षा खूप अधिक.

पण, काही प्रश्नांची उत्तरं मात्र ह्या पुस्तकात नाहीत, जसं खूप सारे लोक लवासात येऊन आनंद लुटताना, ३११७ स्थानिक तेह्वा कुठे असतील, किंवा आत्ता कुठे आहेत? २२ घरांतून राहणारे सोडून देऊयात. बाकीचे? ३१७ आदिवासींचा वाली कोण? वृक्ष स्थलांतरीत करताना बाकीच्या इकोसिस्टीमचं काय? सगळी शेतजमीन आज अन उद्या अशा तर्‍हेच्या विकासासाठी वापरली जाणार असेल, तर शेती कुठे होईल? होणारा हा फायदा नक्की कोणाचा असेल? कुठे जाईल? कोणाचा विकास साधला जाईल?

एकूण हे पुस्तक वाचल्यावर लवासाशी संबधित कोणावरच विश्वास ठेवावा असं वाटत नाही! ना लवासावाल्यांवर, ना पाटकरांवर, ना गावकर्‍यांवर आणि दामल्यांवरही. एक गोष्ट नक्कीच आहे की प्रत्येकाचे लागेबांधे असतात आणि त्यानुसार सगळी सत्यं वळवली जातात! आणि हे संबंधित सर्वांनाच कमीअधिक प्रमाणात लागू पडत असणारच... पुस्तक खूप एकांगी वाटते. सामान्य जनमानस आपल्या बाजूने असावे हाच शेवटी ह्यातील प्रत्येक घटकाचा अट्टाहास. त्याप्रमाणे वळणार्‍या, वळण दिलेल्या बातम्या आणि सांगितली जाणारी सत्यं. शेवटी काय? कोणीही कोणाचेही नाही. मामला खतम. माझ्या मते तरी, दामल्यांकडून निराशा. कदाचित ते म्हणतात ते बरोबरही असेल, तरीही दामल्यांना अप्रत्यक्ष पीआरच्या कामाला जुंपले आहे की काय असे वाटते पुस्तक वाचताना, खरे तर. प्रकल्पाची दामल्यांनी मांडलेलीही बाजूही असेलच. तेह्वा, ती मांडण्यातही चूक नाही, असेही वाटते. एकूण काय, माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाचा तुकड्या तुकड्याने परस्परविरोधी माहिती मिळाल्याने भेजा फ्राय! पुस्तक संग्राह्य आहे. एक रेफरन्स म्हणून माहिती, डिटेल्स हयासाठी नक्कीच बरे आहे.

पुस्तकात एके ठिकाणी दामले लवासाची उभारणी आणि आजच्या नोकरशाही आणि राजकीय पक्षांबद्दल भाष्य करताना म्हणतात की, "आगरकर किंवा टिळक आजच्या जमान्यात असते तर त्यांना मुंबई - दिल्ली इथले पुढारी आणि नोकरशहा यांना लाच दिल्याशिवाय शाळा काढता, चालवता आली नसती. हे वास्तव आहे."

एका पत्रकाराने लवासाची आणि अनुषंगाने घडलेल्या व्यवहारांची भलावण करण्यापायी असे उद्गार काढावेत, ह्यापेक्षा पत्रकारितेची अधिक शोकांतिका ती काय असेल?

* * - हा भाग 'लवासा' ह्या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकात जरी अठरा गावं म्हटलेली असली, तरी प्रत्यक्षात १७ गावांचाच उल्लेख आढळला.

पुस्तकाचं नाव: लवासा
लेखक: निळू दामले
किंम्मत: रुपये १५०/-
प्रकाशकः मौज प्रकाशन

विषय: 
प्रकार: 

ह्म्म्म.... लवासासारखे प्रोजेक्ट उभारताना आम्ही पर्यावरण कसे जपतोय हे संबंधित अगदी आतडे तोडुन सांगतात, पण वर लिहिल्याप्रमाणे जंगलातला एक ५० वर्षे जुना वृक्ष तोडुन त्याबदल्यात तुमच्या अंगणात तुम्ही एक शोभेचे झाड लावल्याने जंगलातली इको सिस्टिम वाचणार आहे का??

पुण्यात जाताना लोणावळ्याच्या आसपास सुरू असलेली अगदी वर डोंगरांच्या टोकाशी जाऊन ठेपलेली घरे पाहिली की मन उदासीने भरुन येते. बिल्डर पैशांसाठी समुद्रकिनारीही घरे बांधुन देतील, पण तिथे घर विकत घेणा-यांनी तरी पुढचा विचार करायला हवा...

शैलजा,
जबरदस्त! अत्यंतीक आभार! पुस्तक घेवून नक्की वाचणार पण तुम्ही ऊपस्थित केले मुद्दे निश्चीतच मह्त्वाचे आहेत.
सध्ध्या असच काहीसं नवी मुंबई विमानतळाबद्दल चालू आहे. सर्वांची "दिलजमाई" झाली की प्रकल्प मार्गी लागेलच. एक सामान्य माणूस निव्वळ सर्व खेळ पहाणे आणि "after the facts" माहिती वाचणे या पलिकडे जास्त करू शकत नाही. पण ज्या लोकांनी ते करणे अपेक्षित आहे, ज्यांना त्यासाठी पगार मिळतो ते मात्र नेमके कुंपणावर बसून कुठल्या बाजूला ऊडी मारणे फायद्याचे ठरेल याची वाट पहात असतात.
असो.

>>पण तिथे घर विकत घेणा-यांनी तरी पुढचा विचार करायला हवा...
नेमकी ईथेच लोचा आहे: लोकांना तीथेही घरे बांधून हवी आहेत. सरकारने अशा जागा मुळात बांधकाम क्षेत्रातून वर्ज्य करायला हव्यात तो भाग वेगळा.

शैलजा, फार चांगली ओळख करून दिली आहेस पुस्तकाची! लवासाबद्दल बोलावे, लिहावे तितके थोडेच, इतके परस्परविरोधी लेख, मुलाखती इत्यादी प्रकाशित झाले आहेत. ह्या सर्व प्रकारात सत्य काय याची नेमकी कल्पना येतच नाही. मात्र आपल्या लक्झुरिअस लिव्हिंग स्टाईल साठी आपण निसर्गाचा बळी असा किती दिवस देत राहाणार हा प्रश्न अनुत्तरितच रहातो.

चांगलं परिक्षण आहे. थोडं धावतं वाटलं. अजून विस्तारात लिहिलं असतंस तर.....
वाचताना 'माते नर्मदे' ची आठवण होणं अपरिहार्य होतं. ते असंच मला अतिशय एकांगी वाटलेलं पुस्तक.

बाकी भूसंपादन, प्रकल्प, त्याबद्दलच्या जनसुनावण्या यातले इतके फार्स सध्या प्रत्यक्ष बघतेय की हे पुस्तक 'लिहून घेतलं' असेल तरी आश्चर्य वाटणार नाही.

एखादा मुद्दा जसा मांडावा तसा मांडला जाऊ शकतो. माझ्या आजोबांना त्यांची शेती कुठे आहे हे माहित नव्हत. ते मुंबईला नोकरी करायचे. त्यांच्या मागे माझे तीन काका वडील आणि आत्या ही भावंडे, आजी आणि वडीलांची आजी ही माणसे शेतीच येणार अर्ध उत्पन्न व आजोबांच्या नोकरीचे पैसे यावर सधन म्हणुन गणली जायची.

पुढे कुळकायदा आला. शेती गेली. आजोबांची नोकरी संपली. चारही भाउ पुण्याला नोकर्‍या शोधायला आले. मोठ्या घरात रहाणारे टीचभर भाड्याच्या खोलीत राहु लागले. दुसर्‍या महायुध्दानंतर महागाई वाढली. रेशनचे धान्य पुरेना व खुल्या बाजारातले धान्य विकत घेता येइना म्हणुन आठवड्याला एक दिवस रताळी उकडुन खाउन दिवस काढले.

हे कधितरी कुठेतरी होतच असते.

सुरेख!

चांगल मांडलय Happy मी अजून लव्हासाला गेलो नाही पण जवळपासच्या अँबी व्हलीला जाऊन आलोय. एकून पर्यावरणाची झालेली हानी बघून वाईट वाटते. जमिनीचे भावपण आभाळाला भिडलेत.

हे पुस्तक 'सकाळ' ने छापले आहे का? तसे असेल तर त्याचा 'बोलविता धनी' कोण आहे ते स्पष्ट आहे.
लवासाला भेट देणार्‍या कोणाकडेही आपल्या सिस्टीमचे सामान्यज्ञान असेल आणी त्याला थोडे लॉजिक वापरता आले तर हे कळेल की एवढा मोठा प्रकल्प, सामान्य लोकांना हुसकावून लावल्याशिवाय, नियमांची पायमल्ली केल्याशिवाय आणि प्रचंड भ्रष्टाचाराशिवाय होणे शक्य नाही त्याला कसल्याही 'अभ्यासा'ची गरज नाही.

सरकारने अशा जागा मुळात बांधकाम क्षेत्रातून वर्ज्य करायला हव्यात तो भाग वेगळा.

सरकार हे कधीही करणार नाहीच कारण सरकारात जे बसलेत त्यांच्याच सगेसोय-यांचे हे प्रोजेक्ट्स आहेत. गरज आहे ती लोकांनी शहाणे व्हायची आणि आपली वनसंपत्ती, सागरसंपत्ती इ.इ. वाचवायची. पण इथे ज्यांना ते करणे शक्य आहे त्यांना आपल्या बॅकयार्डमध्ये 'प्रायवेट सी-शोअर' आणि 'एन्चांटींग वॉटरफॉल' पाहिजेय, त्याला काय करणार???? ज्यांच्या हातात करण्यासारखे काहीच नाही ती तुमच्या आमच्यासारखी मंडळी पर्यावरणाचे रक्षण करा म्हणुन बोंबा मारताहेत. कोण ऐकणार ह्या बोंबा????? Proud

चांगली माहिती, शैलजा. आणि तुझा संभ्रमही नेमका मांडला आहेस.
लवासा प्रकल्पाबद्दल अधिक माहिती मिळवायचा आता नक्कीच प्रयत्न करेन.

शैलजा, चांगला लेख लिहिला आहेस.

>>>त्याचप्रमाणे पवार कुटुंबियांचा लवासाशी काहीही संबंध नसून त्यांच्यावर केवळ राळ उडवलेली आहे,
याबद्दल इथे खालीलप्रमाणे वाचायला मिळालं.
According to Ms. Suniti of the National Alliance of People's Movement, they have proof of Union Minister and Nationalist Congress president Sharad Pawar's daughter Supriya Sule and son-in-law Sadanand Sule having held a 21.97 per cent stake in LCC from 2002 to 2004. “All the necessary permission from the government for Lavasa was received in this period. After that, both of them quietly sold off their stakes. So the argument that no politicians are involved is not valid,” she said.

लेख पुर्ण वाचला नाहीये अजुन पण ह्या निळू दामल्यांची लवासाबद्दल्ची मते IBN lokmat वरच्या चर्चेत ऐकली होती.
आगाऊ ला अनुमोदन!! त्यांच्या त्या गप्पा ऐकताना या माणसाचे नक्की काहीतरी हितसंबंध असणार असे राहुन राहुन वाटत होते.

जोरदार निषेध नोन्दवा! प्रत्येकी एक एक गुंठा जमीन मिळायचे चान्सेस आहेत! Happy

सर्वांचे अभिप्रायांबद्दल आणि आपापले मत मांडल्याबद्दल आभार.

आगाऊ, माझ्या लक्षात नाही, कोणाचे प्रकाशन आहे ते, पाहून सांगते.
मृण्मयी, तू दिलेला दुवा वाचेन.
चंपक, माझ्यासारख्या मध्यमवर्गीय व्यक्तीला नाही ना एवढं जमत. Happy
ही गुंठे वगैरे मिळवायची कामं राजकारण्यांची किंवा फायद्यासाठी त्यांच्याशी जवळीक साधून असणार्‍यांची. त्यांनाच लखलाभ.

चांगला लेख शैलजा, तू मांडलेले प्रश्न देखील उत्तम... अशावेळेला नेमकं सरकार (?) कडे व्यवस्थित उत्तरं असतात...सारवासारवी करायला बरेच लोक उभे राहतात.
पर्यावरणाचा -हास हा मुद्द्याला सध्या किती प्राथमिकता द्यायला हवी हे अजून आपल्याकडे लक्षात येत नाही, ही खरोखर खेदजनक बाब आहे.

नुसता वृक्ष स्थलांतरीत केला म्हणजे संपले, इतके पर्यावरण सोपे आहे की काय, हा प्रश्न मनात उभा राहतो, >>> अगदी हेच आलं मनात, काय पण पर्यावरणचा समतोल राखण्याचा प्रयत्न आहे या मंडळींचा.:अओ:

शैलु, छान आढावा घेतला आहेस पुस्तकाच्या माध्यमातुन. मलाहि बरेच प्रश्न होते या लवासा वादाबद्दल.
आदिवासींची खरच सगळीकडुनच कुतरओढ होते हे खरं. आपल्याला दिसतो तो एखादा प्रोजेक्ट पण तो पुरा होताना तिथुन हिसकावुन दिलेल्या किंवा थोडेसे पैसे देवुन पान पुसलेल्या लोकांची व्यथा नाहिच येत दुनियेसमोर.

शैलजा, छान मांडलं आहेस.

खरं सांगू काल एकलाच गेलो होतो लवासा पहायला.. निसर्गाच्या दृष्टीने म्हणशील तर अप्रतिम, अवर्णणीय आहे तो परीसर. पण मी काही घरात सहज गेलो ५:३० च्या सुमारास .. घरं कसली अगदी झोपड्याच होत्या चारही बाजूंनी नागड्या भिंती, अन वरती जटांचं विस्कटलेलं छप्पर. मी विन्टर जॅकेट घालूनही थंडी वाजत होती पण तिथली लेकरं मात्र उघडीच, त्यांना संध्याकाळ होणार , रात्र होणार, अंधार होणार याचं काही वाटतं नव्हतं. कारण त्यांनी एवढं दरिद्री सोसूनही अंधाराला दत्तक घेतलं होतं, सहज म्हणून तिथे एकाला विचारलं कि कधी पासून राहताय इथे तो लगेच समोरच्या छोटेखानी डोंगरावर हात करून म्हणाला कि "परव्या त्या डोंगरावर होतो, आज इथं .. उद्या परत सायब येतील अन घराखालचा डोंगरच काढून नेतील." Uhoh मी परत निघता निघता , बॅगेत काही फराळ होता, अन काही फटाके घेतलेच होते बरोबर ते त्यांच्या हातात ठेवले अन मागे वळून पाहताना निसर्ग सुद्धा किती सहन करतो अश्या अदिवासी लोकांच्या जगण्यातून हे आठवत राहीलो.

Uhoh

लवासा मधे काय गमवलं- सुंदर निसर्गसौंदर्य, कित्येक औषधी वनस्पती संप्पती, नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत अन लाख मोलाची माणसं. Uhoh

लिहिल छान लिहिलयस गं. अन अगदी खरं.
तुझं हे वाक्य >>>एकूण हे पुस्तक वाचल्यावर लवासाशी संबधित कोणावरच विश्वास ठेवावा असं वाटत नाही! ना लवासावाल्यांवर, ना पाटकरांवर, ना गावकर्‍यांवर आणि दामल्यांवरही. एक गोष्ट नक्कीच आहे की प्रत्येकाचे लागेबांधे असतात आणि त्यानुसार सगळी सत्यं वळवली जातात! << < अगदी पटलं.
वाचेन हे पुस्तक आता.

Pages