निळू दामल्यांना दिसलेलं लवासा

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

लवासा.

कुठे आहे हे लवासा?

*पुणे जिल्ह्यात, मुळशी तालुक्यातल्या मोसे नामक नदीवर बांधलेलं वरसगाव धरण. धरणाच्या भिंतीमुळे तयार झालेला, चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला, असा जलाशय. ह्या डोंगरांमधून अठरा गावं वसलेली - दासवे, भोईनी, मुगाव, कोळोशी, उगावली, धामण ओहोळ, गडले, साखरी, वदवली, पडलघर, आळमळ, पाथरशेत, बेंबटमाळ, मोसे बुद्रुक, साईव, वरसगाव आणि भोडे.

ह्या परिसरातील एकूण १२ हजार ८० एकर जमीन लवासा कॉर्पोरेशन ह्या कंपनीने विकत घेतलेली आहे आणि दासवे इथे प्रकल्पाचा पहिला टप्पा २०१० च्या शेवटापर्यंत पूर्णपणे तयार व्हायचा आहे. त्यानंतर, एक डोंगर पार करुन येणार्‍या भोइनी गावात बांधकामं होतील, आणि त्यानंतर मुगावमध्ये. धामण ओहोळ ह्या टोकाला असलेल्या गावात शेवटचं बांधकाम होईल, हे ३ टप्पे २०२० सालापर्यंत पूर्ण होतील.*

सुरुवातीपासूनच लवासा प्रकरण बर्‍यापैकी प्रकाशझोतात आहे. वर्तमानपत्रं, टीव्ही चॅनेल्स, इंटरनेट अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून त्याविषयी तुकड्यातुकड्याने माहिती मिळते. लवासावाले अर्थातच प्रकल्पाची भलावण करतात, तर आक्षेप घेणार्‍यांसाठी, पर्यावरणाचा होणारा आणि झालेला र्‍हास, विस्थापितांचं पुनर्वसन, त्यांना मिळालेली व काहीजणांच्या बाबतीत अजिबातच न मिळालेली नुकसानभरपाई, हे महत्वाच्या मुद्द्यांपैकी काही.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर लवासाबद्दल अधिक खोलात जाऊन जाणून घ्यावसं वाटत होतं. त्याच सुमारास 'सकाळ' वृत्तपत्रात 'लवासा' ह्या निळू दामले लिखित पुस्तकाची जाहिरात पाहिली, आणि हे पुस्तक एक अभ्यास पूर्ण विवेचन वाचायला मिळेल म्हणून घ्यायचं ठरवलं, घेतलं आणि वाचूनही काढलं.

पुस्तकाची सुरुवात होते, ती लवासा ह्या शहराच्या कल्पनेचे जन्मदाते, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, अजित गुलबचंद ह्यांच्या करुन दिलेल्या ओळखीने. लवासाच्या अठरा गावांतून पसरलेल्या क्षेत्रफळाची ओळख करुन देत, त्याच्या पसार्‍याची जाणीव करुन देत हे पुस्तक पुढे सरकतं. लवासाच्या जडणघडणीत ज्या अनेक कार्यकुशल लोकांचा हातभार लागलेला आहे, अशा लहान थोरांशी साधलेला संवाद आणि त्या संवादांमधून हाताशी लागलेली माहिती असं बहुतांशी पुस्तकाचं स्वरुप आहे. त्याचबरोबर, ह्या प्रकल्पाची पाहणी करताना, पत्रकाराच्या तटस्थ भूमिकेतून (लेखकाच्या मते) घेतलेला वेध आणि काही ठिकाणी केलेलं भाष्य आणि काही ठिकाणी मांडलेली मतं, हेही पुस्तकात वाचायला मिळतं.

लवासा उभारताना तिथे वसलेल्या स्थनिकांपासून ते त्यांच्या जमिनीच्या व्यवहारांमधून उद्भवलेल्या अडचणी, पर्यावरणविषयक व इतर, जसं की, जमिनीविषयक कायदे कानून, वेगवेगळ्या सरकारी खात्यांच्या नियमावली व त्यांची पूर्तता करताना उद्भवलेल्या अडचणी, समस्या आणि त्यावर लवासावाल्यांनी आपापलं कार्यकौशल्य वापरुन केलेली मात, ह्याचं समरसून केलेलं वर्णन ह्या पुस्तकात आहे.

जमिनींचे गैरव्यवहार कसे चालतात, का होतात इत्यादि बाबींवर पुस्तकात काही पानं खर्ची पडलेली आहेत. तलाठी, मधले दलाल ह्यांचे व्यवहार, साताबाराच्या भानगडी आणि ह्या सर्वाचा लवासावाल्यांना झालेला त्रास. त्यातून लवासा उभारण्याच्या ध्येय्याने (!) प्रेरीत होऊन काढलेले मार्ग उपाय वगैरे. नोकरशाहीचा त्रास. वाचताना, इतके लागेबांधे असलेल्य कंपनीला इतका त्रास होतो, तर, सामान्य माणसाची काय गत, हा विचार मनात आल्यावाचून रहात नाही.

मेधा पाटकर व त्यांच्या संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी पुस्तकात विरोधी सूर मांडलेला आहे, पाटकरांच्या कार्यपद्धतीमधील त्रूटी दाखवल्या आहेत, त्याचप्रमाणे पवार कुटुंबियांचा लवासाशी काहीही संबंध नसून त्यांच्यावर केवळ राळ उडवलेली आहे, आणि पवारांनी इंग्लंडमधल्या लेक डिस्ट्रिक्टवरुन तलावाकाठी हिल सिटी बांधण्याची केवळ कल्पना सुचवली होती, ह्याचाही उल्लेख करायला दामले विसरलेले नाहीत. लवासा स्थानिकांसाठी रोजगार निर्माण करत असूनही स्थानिक लवासावाल्यांना लहान सहान बाबींवरुन त्रास देताना आपण पाहिल्याचं दामले नोंदवतात. पर्यावरणवालेही पर्यावरणाचा र्‍हास झाल्याची उगाचच आरडाओरड करत आहेत, कारण लवासा पर्यावरणाची काळजी घेते आहे, हे उदाहरणं देऊन दामल्यांमधला पत्रकार पटवू पाहतो. त्यासाठी लवासाने नांदते वृक्ष न तोडता एका जागेवरुन दुसर्‍या जागी स्थलांतरीत केले आहेत, हे ते आवर्जून सांगतात. एकूणातच मीडीया सांगोवांगीच्या गोष्टी सांगत, काहीही अभ्यास न करता लवासाविरोधी बातम्या पसरवण्यातच कशी धन्यता मानत होती/ आहे, हे दामल्यांचं प्रतिपादन. पण प्रश्न हा आहे, की एखादा नांदता वृक्ष जरी दुसरीकडे जगला तरी मूळ जागी जिथे तो वाढत, जगत होता, तिथे त्याच्या आडोशाने जगणारी पक्षीसृष्टी, त्याच्या सावलीत वाढणारी इतर झाडं झुडपं, अनेक वर्षांनी वाढू लागलेल्या वेली, त्यावर येणारे कीटक आदी सगळी इकोसृष्टीच हादरून जाते. एकेका वृक्षाबरोबर हे सारं गोकुळ उभं राहतं, म्हणून तर तो नांदता वृक्ष. नुसता वृक्ष स्थलांतरीत केला म्हणजे संपले, इतके पर्यावरण सोपे आहे की काय, हा प्रश्न मनात उभा राहतो, निदान रहावा. ह्याबाबतीत दामल्यांनी काहीच भाष्य का केलेले नाही, कोणास ठाऊक!

पुस्तकाच्या शेवटच्या पानांमध्ये दामले म्हणतात, लवासा बनत आहे, तिथे २००१ साली ३११७ माणसं रहात होती, परगावी जाऊन नोकर्‍या करुन पोटं भरत होती, कारण, गावांतील उत्पन्नावर त्यांची आबाळ होत होती. लवासामुळे त्यांची रोजगारीची सोय झाली. काही माणसं श्रीमंत झाली! म्हणजे नक्की किती? अभ्यासात तो मुद्दा येत नसावा.

वरील ३११७ माणसांपैकी ३१७ आदिवासी आणि ९५% पेक्षा अधिक अ-आदिवासी व अ-दलित आणि वाईट परिस्थितीत जगणारी, ही त्यांनीच दिलेली आकडेवारी. लवासा लोकांची काळजी घेत आहे, हे सिद्ध करण्यासाठी २०१० साली लावसाने दासवे इथे उभं केलेल्या २२ घरांच्या गावाचं आणि तिथे राहणार्‍या एका कुटुंबाचं उदाहरण ते देतात. उदाहरण वाचताना, वरवर आलबेल वाटलं तरी कळीचा मुद्दा हा की, २२ घरांपैकी ६ घरं ही एकाच कुटुंबाची आहेत. उरली १६. ती कितीजणांना पुरेशी आहेत?

दासवेत उभं राहिलेल्या लवासाची अप्रत्य्क्षरीत्या भलावण करताना हा पत्रकार सांगतो की,

१. दासवेत ३५,००० लोक राहतील आणि दोनेक लाख ये जा करतील
२. विकासामुळे दर एकरी उलाढाल काही कोटींची होईल आणि महाराष्ट्र सरकारच्या उत्पन्नात काही अब्जांची वाढ होईल.
३. दासवे हा केवळ टप्पा. एकूण लवासा कितीतरीपट मोठं असेल आणि एकूण रोजगार निर्मिती दासवेपेक्षा खूप अधिक.

पण, काही प्रश्नांची उत्तरं मात्र ह्या पुस्तकात नाहीत, जसं खूप सारे लोक लवासात येऊन आनंद लुटताना, ३११७ स्थानिक तेह्वा कुठे असतील, किंवा आत्ता कुठे आहेत? २२ घरांतून राहणारे सोडून देऊयात. बाकीचे? ३१७ आदिवासींचा वाली कोण? वृक्ष स्थलांतरीत करताना बाकीच्या इकोसिस्टीमचं काय? सगळी शेतजमीन आज अन उद्या अशा तर्‍हेच्या विकासासाठी वापरली जाणार असेल, तर शेती कुठे होईल? होणारा हा फायदा नक्की कोणाचा असेल? कुठे जाईल? कोणाचा विकास साधला जाईल?

एकूण हे पुस्तक वाचल्यावर लवासाशी संबधित कोणावरच विश्वास ठेवावा असं वाटत नाही! ना लवासावाल्यांवर, ना पाटकरांवर, ना गावकर्‍यांवर आणि दामल्यांवरही. एक गोष्ट नक्कीच आहे की प्रत्येकाचे लागेबांधे असतात आणि त्यानुसार सगळी सत्यं वळवली जातात! आणि हे संबंधित सर्वांनाच कमीअधिक प्रमाणात लागू पडत असणारच... पुस्तक खूप एकांगी वाटते. सामान्य जनमानस आपल्या बाजूने असावे हाच शेवटी ह्यातील प्रत्येक घटकाचा अट्टाहास. त्याप्रमाणे वळणार्‍या, वळण दिलेल्या बातम्या आणि सांगितली जाणारी सत्यं. शेवटी काय? कोणीही कोणाचेही नाही. मामला खतम. माझ्या मते तरी, दामल्यांकडून निराशा. कदाचित ते म्हणतात ते बरोबरही असेल, तरीही दामल्यांना अप्रत्यक्ष पीआरच्या कामाला जुंपले आहे की काय असे वाटते पुस्तक वाचताना, खरे तर. प्रकल्पाची दामल्यांनी मांडलेलीही बाजूही असेलच. तेह्वा, ती मांडण्यातही चूक नाही, असेही वाटते. एकूण काय, माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाचा तुकड्या तुकड्याने परस्परविरोधी माहिती मिळाल्याने भेजा फ्राय! पुस्तक संग्राह्य आहे. एक रेफरन्स म्हणून माहिती, डिटेल्स हयासाठी नक्कीच बरे आहे.

पुस्तकात एके ठिकाणी दामले लवासाची उभारणी आणि आजच्या नोकरशाही आणि राजकीय पक्षांबद्दल भाष्य करताना म्हणतात की, "आगरकर किंवा टिळक आजच्या जमान्यात असते तर त्यांना मुंबई - दिल्ली इथले पुढारी आणि नोकरशहा यांना लाच दिल्याशिवाय शाळा काढता, चालवता आली नसती. हे वास्तव आहे."

एका पत्रकाराने लवासाची आणि अनुषंगाने घडलेल्या व्यवहारांची भलावण करण्यापायी असे उद्गार काढावेत, ह्यापेक्षा पत्रकारितेची अधिक शोकांतिका ती काय असेल?

* * - हा भाग 'लवासा' ह्या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकात जरी अठरा गावं म्हटलेली असली, तरी प्रत्यक्षात १७ गावांचाच उल्लेख आढळला.

पुस्तकाचं नाव: लवासा
लेखक: निळू दामले
किंम्मत: रुपये १५०/-
प्रकाशकः मौज प्रकाशन

विषय: 
प्रकार: 

हो अस्मी, बरोबर. ह्या संदर्भात एका तज्ज्ञ मित्राशी चर्चा झाली होती, आणि तेह्वा त्याने सांगितलेले होते की, एक तर,

१. वरसगाव हा नैसर्गिक जलाशय नाही. तो फुगवटा आहे (कॅचमेंट एरीया). त्यावरून अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आता जे स्थानिक आहेत त्यातील काही त्यांच्या मूळ जमिनीपासून आधीच तुटलेले आहेत (जमीन पाण्याखाली गेल्याने आधीच विस्थापित आहेत आणि आता लवासामुळे अजून एक विस्थापन). त्यामुळे त्यांचा प्रश्न वाटतो तितका सरळ नाही. हे असे दुहेरी विस्थापनाचे पदर आहेत त्याला. ( हे पुस्तकात नाहीच. )

२. पाणीसाठ्याच्या चारी बाजूनी घरे झाल्यावर जंगलातील प्राणी पाणी कसे पिणार? कुठे पिणार? जंगलातील प्राणीसृष्टीसाठी पाणी हा मुख्य स्त्रोत आहे. तो एकतर तुम्ही-आम्ही - माणसे अडवतो. बरं अडवतो तर अडवतो, त्या साठलेल्या पाण्याभोवती त्यांना फिरकूही दिले जात नाही. शिवाय सुरक्षेच्या कारणाने साप मारले जाता, कीटकनाशके फवारली जातात.. एसीने ग्रीन हाऊस गॅस पसरतो तो वेगळाच.. असे कितीतरी मुद्दे... सामान्य माणसाला हे कुठे एवढे लक्षात येते...

अल्पना, नी चांगल्या पोस्ट्स.

अल्पना एकदम छान पोस्ट. मीपण छत्तीसगढ मध्ये मायनींगच्या संदर्भात अभ्यास केला होता. तू कुठल्या गावाबद्दल उल्लेख केला आहेस?

छत्तिसगढ मधली गावं कोरबा जिल्ह्यातली होती. मी तिथेही फिल्डवर गेले नव्हते (बाकी टीम मात्र होती फिल्डवर), फक्त सर्वेक्षणाचा डेटा अन सेकंडरी डेटा अभ्यासला होता. आमच्या टीमने तिथे PRA technique वापरून participatory social impact assesment केलं होतं, त्याचा अभ्यास केला होता. पण वाचलेल्या रिपोर्ट, केसस्टडी अन सर्व्हेच्या डेटावरूनही तिथली भयाण गरिबी दिसत होती.

बाळु जोशी ठिकच आहे. ह्या निमित्ताने माझ्या अनेक MSW,environment sceinceचा अभ्यास केलेल्या अनेक मित्र मैत्रिणीम्ची (पुण्यातले ,विदर्भातले,मराठवाड्यातले) पोट्यापाण्याची सोय झालेली आहे.त्यातले बरेच जण अधुन मधुन CCD मधे मला भेटत असतात, चांगले आहेत सगळे. काहे जण लग्न करुन पुण्यात सेटलही झाले आहेत,फक्त पुण्यात जाग महाग आहेत एव्हदीच त्याम्ची तक्रार त्यामुळे सिंहगड रोडच्या पुढे काही शेतजमिनीम्च्या पट्ट्यात जे housing project सुरु होणार आहेत तिथे घरे घेत आहे.त्यातले काही स्वतःची NGO सुरु करनार आहेत,foreign sponsership मिळतेय त्यांना.काही १०% मधुन मिळवायच्या प्रयत्नात आहेत.एकजण तर मधे कुठे तरी ती प्रसिध्द conference झाली त्याला industry sponsership वर जाउन आला.
जे पुण्यातले आहेत त्यांची कोथरुड मधे वैगरे मधे घरे आहेत्.प्रभात रोडला मात्र कुनीच राहत नाही.
माझा वेळ त्याम्च्यामुळे आनंदात जातो.त्यामुले मी त्याम्च्या विरोधात एक शब्द बोलणार नाही.
@शैलजा
तुमचा असा गैरसमज झाला असेल की माझा चर्चेला विरोध आहे तर माफ करा,मुळीच विरोध नाही.बाकी सामजिक बाम्धिलकीच्या जाणिवेतुन काही पर्यावरणविषयक चर्चा झाली आणि त्यातुन काही win-win solution निघाले तर स्वागतच आहे. सामन्य माणसाकडुन आणि सरकाकडुन.

हरकत नाही arc. तुमचा आणि बाळू जोशी ह्यांचा जो कार्यक्रम आहे तो लक्षात आला Happy
बाकी माझा MSW,environment sceinceचा अभ्यास नाही. CCD वगैरेमध्येही मी जात नाही, मला परवडत नाही. माझी जमीनही नाही, वा मालकीचा पैसे देऊन वा फुकट मिळालेला फ्लॅट/ बंगला नाही.
NGO/ foreign sponsership/ 10% हेसुद्धा नाही, आणि कोथरुड, प्रभात रस्त्यावरही मी रहात नाही.
>>सिंहगड रोडच्या पुढे काही शेतजमिनीम्च्या पट्ट्यात जे housing project सुरु होणार आहेत तिथे घरे घेत आहे>> हेही नाही.

तुमचा कारेक्रम चालूदेत, नंतर अ‍ॅडमिनना विनंती करुन अनावश्यक पोस्ट्स उडवेनच.

पुस्तकात एके ठिकाणी दामले लवासाची उभारणी आणि आजच्या नोकरशाही आणि राजकीय पक्षांबद्दल भाष्य करताना म्हणतात की, "आगरकर किंवा टिळक आजच्या जमान्यात असते तर त्यांना मुंबई - दिल्ली इथले पुढारी आणि नोकरशहा यांना लाच दिल्याशिवाय शाळा काढता, चालवता आली नसती. हे वास्तव आहे."

एका पत्रकाराने लवासाची आणि अनुषंगाने घडलेल्या व्यवहारांची भलावण करण्यापायी असे उद्गार काढावेत, ह्यापेक्षा पत्रकारितेची अधिक शोकांतिका ती काय असेल?>>>
आगरकर आणि टिळक यांच्या सन्दर्भात हे काढलेले उद्गार हे सद्यस्थितीची भलामण करण्यासाठी काढलेले आहेत असे वाटत नाही. ते उपहासाने अथवा असहाय्यपणे , उद्वेगाने काढलेले आहेत.

>>ते उपहासाने अथवा असहाय्यपणे , उद्वेगाने काढलेले आहेत.

हो, इतर वेळी मी तसंच मानकं असत, पण पुस्तक वाचल्यावर तसं वाटलं नाही.

एआरसी, माझ्या पुण्यातल्या घरात पाणी यावे म्हणुन ४ धरणे बांधली,काही गावे पाण्याखाली गेली, >>पुण्यातल्या माझ्याघराला पाणी येत असताना अजुन काहि लाख लोकांना पाणी मिळालेले असते. मान्य आहे की त्यासाठी काही हजार विस्थापित झाले असतीलही. पण तो सरकारी प्रोजेक्ट असतो आणि त्यात विस्थापतांचे पुनर्वसन होण्याचे चान्सेस जास्त आहेत यापेक्षा, अगदी घोटाळे वगैरे सगळे गृहित धरुन. तसेच ती बाकी लाख लोकांची ती गरज आहे आणि त्यात प्रभात रोड ते दांडेकर पूल सगळेच असतात. लवासा ही गरज असती , विकेंद्रीकरण असते अथवा एखाद्या शहराची नैसर्गिक वाढ असती तर हा मुद्दा २०-८० च्या ऐवजी ८०-२० असा चर्चिला गेला असता.
इतरांसाठी धरणे बाम्धायची वेळ आली की आठवला सारासारा विचार.>> माझ्यामते तरी लवासा कोणाची मुलभुत गरज भागवण्यासाठी नाही उभारत आहेत.

आस माझ्या सगळ्या पोष्ट वाचा. तुम्ही सुध्दा इतराम्सारखा परस्पर गैरसमज करुन घेतलाय मी लवासाचे भलामण करतीये.
लवासाच्या लेखानिमित्ताने समाजवाद,पर्यावरनवादातल्या मला दिसलेल्या दाम्भिकपणावर टीका केली आहे मी. सगले वाचायचे नाही आणि उगीचच लिहित सुटायचे.

लवासाच्या लेखानिमित्ताने समाजवाद,पर्यावरनवादातल्या मला दिसलेल्या दाम्भिकपणावर टीका केली आहे मी. >> ईथे ज्यांनी लवासाच्या विरुद्ध लिहिलेय त्यात मला तरी कुठे दाम्भिकपणा दिसला नाही. प्रत्येकाला सगळ्याच क्षेत्रात काही काम करायला जमेल असे नाही पण म्हणुन त्यांनी आपले मत नोंदवायचेच नाही का?
बाकीचे समाजवादी, पर्यावरणवादी, मानवतावादी असतीलही दांभिक पण म्हणुन ईथे जे लिहित आहेत त्या सगळ्यांमधे फरक आहेच ना. एखाद्या प्रकल्पाविरोधात बोलुन तुमच्या NGOs सारखा त्यांचा काहिच वैयक्तिक फायदा होणार नाही आहे ना. पर्यावरणाबद्दल कळ्कळ वाटतीय म्हणुनच ईथे प्रत्येकजण बोलतोय. भलेही मला पर्यावरणासंदर्भात फार काही मोठे योगदान नाही देता येणार पण पाण्याचा जास्त अपव्यय न करणे, विजेची बचत, कचरा व्यवस्थापन वगैरे ज्या गोष्टी मला जमतात तेवढ्याच मी करते. पण म्हणुन मग मी लवासाविरोधात काही बोलायचेच नाही का?
आपण निवडणुकीत त्यातल्या त्यात बर्‍या उमेदवाराला मत देऊन आपले कर्तव्य केले पण निवडुन गुंड उमेदवार आला तरी कोण काय करु शकतो? जास्तीत जास्त आपण काय करणार मित्रांमधे बोलणार . तसेच हे आहे. प्रकल्प तर होणारच आहे. आता आपण फक्त त्यामुळे काय नुकसान होउ शकते आणि ते नुकसान कमी करायचे असेल तर काय करता येईल हेच बघु शकतो. आणि यासाठी समाजवादी किंवा पर्यावरणवादी बनण्याची गरज नाहिये ना. फक्त एक संवेदनशील नागरिक असणे पुरेसे नाही का?

मला गंमत वाटते ती socalled मध्यम वर्गाची . स्वतः शहरात राहुन , चारचाकीमधे हिंडुन ,परदेशी प्रवास करुन ,मॉलमधे जाउन हे लोक स्वतःचा carbonfootprint भरपुर वाढवत असतात, पण दुसरीकडे
नागरीकरण होउ नये ही मात्र ह्याम्ची इच्छा असते.
अरे तुम्हाला एव्हदा कळवळा असेल तर जाउन दाखवा एखाद्या खेड्यात जिथे तुमच्या सारख्या intellectual नेतृत्वाची गरज आहे.तुम्ही तिथे जाउन सर्व समावेशक,पर्यावरणपुरक विकास करुन दाखवला तर कुणाची बिशाद आही जमिनी बळकाव्ण्याची? >>
लवासाच्या लेखानिमित्ताने समाजवाद,पर्यावरनवादातल्या मला दिसलेल्या दाम्भिकपणावर टीका केली आहे मी. सगले वाचायचे नाही आणि उगीचच लिहित सुटायचे. >>
मी हे सर्व लिहीण्याचे कारण हे आहे.

पण म्हणुन मग मी लवासाविरोधात काही बोलायचेच नाही का?
>. अहो बोला की. माझे रम्गीबेरेम्गी पान नाहिये हे. पण मी पण मल दिसलेले सत्य मांदायचेच नाही का? की त्यला परस्पर लवासा समर्थन म्हणुन तुम्ही declare की ते गप्प बसुन ऐकुन द्यायचे.
बाकी लायकी वैगरे का काधली जातीये मला कलत नाहिये?

तसे असेल तर निळू दामल्यानीही का लिहू नये (माझा त्याना पाठिम्बा नाही आहे . गै स नसावा :)). असेल त्यांचे म्हणणे चूक मणून ते विकले गेले आहेत , त्यांच्याकडून लिहवून घेतले आहे त्यानी लेखणी गहाण ठेवली आहे असे म्हणण्याचेही कारण नाही.यात कसली आलीय पत्रकारितेची शोकांन्तिका. ? त्याना जर त्यांच्या दृष्टीने प्रकल्पाची यथार्थता पटली असेल तर त्यांचे तांत्रिक मुद्दे खोडा की (काही सभ्य लेखकानी ते खोडलेही आहेत.) पण ते प्रचारीच लेखन आहे हे कशावरून? तुम्हाला वाटते म्हणून? पर्यावरणवाद्यांच्या भूमिकाही जागा ,हितसंबंध पाहून बदलतात . इतरत्र मेधा पाटकरांच्या बरोबर काम करणार्‍या गुजरातमधल्या एन जी ओ सरदार सरोवर चा विषय निघाला की त्यान्च्या तोन्डाला कुलूप बसते. म्हणजे मग त्या प्रकल्पाचे समर्थन कसे होते? गुजरात सरकारने तर या एन जी ओ नाच सरदार सरोवराच्या प्रचाराला गुजरातचा विकास या मुद्द्याखाली कामाला लावले आहे. कोणाची ओळख असेल तर कुसुम कर्णिकाना विचारा !

दासवेत उभं राहिलेल्या लवासाची अप्रत्य्क्षरीत्या भलावण करताना हा पत्रकार सांगतो की,

हे वाक्य पूर्वग्रहदूषित म्हणावे की अनुदार?

अहो मी पण मगाशीच सांगितले की तुम्ही लवासाच्या विरोधात बोला किंवा बाजुने. मला काय फरक पडतो. पण शहरात राहण्यार्‍या आणि चारचाकितुन हिंडणार्‍या लोकांनी ईथे न बोलता एखाद्या खेड्यात जाउनच काहीतरी सर्व समावेशक,पर्यावरणपुरक विकास करुन दाखवावे त्याशिवाय बोलु नये, असे बोलताय तुम्ही. बाकी मला काहीच नाही बोलायचे पण शहरात राहतो, गाडी चालवुन carbonfootprint वाढवतो पण म्हणुन लवासाविरोधात काही बोलला तर लगेच दांभिक का? ज्याला जे जमेल ते तो करतो. जे लोक खेड्यात जाऊन काही करत नाहीत त्यांचा कळवळा खोटाच का? आणि मी पूर्वीच म्हटलय की, लवासा नागरीकरणाचा भाग असता तर तो तितकासा प्रश्न नसता निदान माझ्या द्रुष्टीने तरी. बाकी तुम्हाला दिसलेले सत्य मांडा ना तुम्हाला कोण विरोध करतंय. पण मग socalled मध्यम वर्गाची वगैरे जनरलायझ्ड विधाने करु नका ना.
बाकी कात्रजला अगदी घाटापर्यंत पोचलेली घरे, महाबळेश्वर- लोणावला यासारख्या ठिकाणी डोंगर खरवडुन बांधलेली घरे बघतीयच की मी. ते बघुनही कुठेतरी वाईट वाटतेच की पण त्याला माझ्याकडे काही उपाय नाही कारण पोटापाण्याच्या सोयीसाठी पुण्यात आलेल्याकडे याव्यतिरिक्त उपायही नाही. आणि रोजगारांचे विकेंद्रीकरण आपल्याला कधी जमले पण नाही आहे.

बाकी बर्‍याच ठिकाणी तुमच्या पोष्टी वाचल्या आहेत मी. तुमच्यासाऱख्या व्यक्तीकडुन ईतक्या जनरलायझ्ड विधानाची अपेक्षा नसल्याने मी ईथे लिहिले.
बाकी यासंदर्भात हेमाशेपो.

बाकी मला काहीच नाही बोलायचे पण शहरात राहतो, गाडी चालवुन carbonfootprint वाढवतो पण म्हणुन लवासाविरोधात काही बोलला तर लगेच दांभिक का? > पुन्हा एकदा, लवासविरोधात नक्की बोला. हरकत नाही.

एखाद्या खेड्यात जाउनच काहीतरी सर्व समावेशक,पर्यावरणपुरक विकास करुन दाखवावे त्याशिवाय बोलु नये, असे बोलताय तुम्ही.>.पण कुठल्याही प्रकल्पाला (धरण,उर्जा,खाण इत्यादी.) पर्यावरणासाठी /आदीवासींसाथी विरोध करताना ,जे लोक खेड्यापाड्यात /मागास भागात राहतात आणि आपल्याला सहज उप्ललब्ध असलेल्या सुविधा ज्या अशाच (धरण,उर्जा,खाण इत्यादी.)प्रकल्पांमुलळे मिळतात त्या enjoy करु शक्त नाहीत त्याम्च्यावर आपण अन्याय करतोय हे सोयीस्कर रीत्या विसरले जाते,तेव्हा तो विरोध माझ्या मते दांभिक आहे.आणि म्हणुनच मग तुम्ही जाउन दाखवा की खेड्यात असे tonting उद्गार निघणारच. हे आधीही स्पष्ट शब्दात सांगितले आहे, पण तरी पुन्हा एक्दा तुमच्यासाठी अधोरेखीत करते.

मी लवासा समर्थक नाही. पण GDP growth वाढवुन, हजारो लाखो नोकर्‍या निर्माण करणार्‍या पर्यावरण/आदीवासी विरोधी infrastructure projects ची मी समर्थक आहे.माझ्या पर्यावरण प्रेमासाठी माझ्या लातुर,नांदेड,अमरावतीच्या , नगरच्या लाखो बांधवांनी ,भारनियमन सहन करावे,नोकरीच्या शोधत पुणे MIDC मधे मनाविरुध्द यावे,सोलापुर MIDC बंद पडावी, हे मला मान्य नाही.

ओके. बाफचा विषय लवासा आहे म्हणुन मी फक्त आणि फक्त लवासासंदर्भात लिहित आहे.
बाकींबद्दल मला ईथे बोलायचे नाही आहे.

Pages