उपवासाचे पदार्थ

उपवासाचे पदार्थ १) सुरणाचे काप

लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुरण
मिठ
तुप
चिंच कोळ

क्रमवार पाककृती: 

सुरणाच्या चकत्या पाडून साल काढा म्हणजे साल काढायला सोप्पे जाते.
मोठ्या चकतीचे कापुन त्रिकोण करा.
ह्या त्रिकोणांना चिंचेचा कोळ करुन त्यात पाणी घालुन सुरण उकडून घ्या. उकडल्यावर भांड्यातले पाणी काढून सुरणाच्या फोडी ताटात काढा. त्याला मिठ चोळा. पॅनवर तुप किंवा तेल टाकुन खरपुस भाजुन घ्या.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

तुम्ही मिठाबरोबर मिरचीपुडही घालु शकता. उपवास नसेल तर मिरपुडही लावता येते. मिरपुडचे काप खुप छान लागतात.
उपवासासाठी करताना जर शिंगाडापिठ असेल तर भजी करु शकता. वरीच्या तांदळात काप घोळवुन शॅलोफ्राय करु शकता.

माहितीचा स्रोत: 
आई

फराळी मिसळ

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रात्रभर भिजवून उकडलेले शेंगदाणे - दिड वाटी
बटाट्याच्या फोडी - १ वाटी
सुरणाच्या फोडी - १ वाटी
हिरव्या मिरच्या - २
जीरे - २ मोठे चमचे
चिंचेचा कोळ - २ मोठे चमचे
दाण्याचे कूट - ४ चमचे
ओलं खोबरं - अर्धी वाटी
मीठ, साखर चवीप्रमाणे
फोडणीसाठी तूप
वरून घेण्यासाठी : अगदी बारीक चोचवलेली काकडी, बटाट्याच्या किसाचा तळलेला चिवडा, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१. थोड्या जिर्‍याबरोबर हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक वाटून घ्याव्यात.
२. कढईमध्ये तूप तापवून त्यात उरलेले जीरे घालून फोडणी करावी.
३. त्यात बटाट्याच्या व सुरणाच्या फोडी घालाव्यात. मग मिरची - जिर्‍याचे वाटण घालून परतावे. झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी.
४. बटाटा आणि सुरण शिजत आले की त्यात उकडलेले शेंगदाणे घालून परतावे.
५. त्यात दाण्याचं कूट, खोबरं, चिंचेचा कोळ घालावा. साधारण भांडंभर पाणी घालून उकळी येऊ द्यावी.
६. चवीप्रमाणे मीठ, साखर घालावे.
७. मिसळ सरसरीतच असावी. गरज वाटल्यास अजुन पाणी घालून एक उकळी काढावी.

खायला देताना डिशमध्ये बटाट्याचा चिवडा घेऊन त्यावर ही मिसळ घालावी. वरून चोचवलेली काकडी आणि कोथिंबीर घालून सजवावे आणि सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी पोटभर
अधिक टिपा: 

किंचीत आंबट, गोड आणि तिखट अश्या चवीची ही मिसळ होते.
बटाट्याच्या किसाचा चिवडा नसेल तर आवडीप्रमाणे कुठलाही उपासाचा चिवडा घ्यावा.

माहितीचा स्रोत: 
दादरची तमाम महाराष्ट्रीय हॉटेल्स आणि माझी आई :-)