शिर्यासाठी :
एक कप रवा,
अर्धा कप मिल्क पावडर (किंवा एक ते सव्वा कप दूध )
एक टेबलस्पून बेसन (आमच्याकडे अखंड चण्याचे पिठ मिळते, ते वापरलेय ).
एक टिस्पून मेथीदाणे (वगळल्यास चालतील)
एक पिकलेले केळे,
दोन ते तीन टेबलस्पून तूप
पाऊण कप किंवा आवडीप्रमाणे साखर (मी साखर वापरलेली नाही, शुगर फ्री वापरलेय.)
भरल्या मिरच्यांसाठी :
दहा ते बारा हिरव्या मिरच्या ( विशेषणे आपापली लावा )
एक कप जाडसर बेसन,
एक टिस्पून प्रत्येकी तीळ आणि जिरे
बारिक चिरलेली कोथिंबीर मूठभर
तेल, हिंग, हळद, साखर, मीठ
आंबटपणासाठी चिंचेचा कोळ किंवा आंबट दही किंवा लिंबूरस
शिर्यासाठी,
एक टेबलस्पून तूप गरम करुन त्यात रवा भाजायला घ्या. रवा थोडा भाजला गेला कि (वापरत असाल तर ) त्यात मिल्क पावडर घाला आणि दोन्ही मोकळे होईपर्यंत भाजून घ्या. रवा एका भांड्यात काढून घ्या.
मग उरलेले तूप तापवून त्यात मेथीदाणे गुलाबी करुन घ्या. त्यावर बेसन टाकून भाजून घ्या (बेसन जास्त घेतले तरी चालेल.) मग त्यात केळे कुस्करुन टाका व ते बेसनात नीट मिसळून घ्या. मग त्यात रवा टाकून थोडा वेळ कोरडेच परता.
मग त्यात गरम दूध वा पाणी टाका. (पाण्याचे प्रमाण रवा कितपत जाड आहे त्यावर ठरेल)
झाकण ठेवून वाफ येऊ द्या. मग झाकण काढून जरा हलवून घ्या.
मग त्यात साखर घाला. साखर घातल्यावर मिश्रण पातळ होईल, ते जरा कोरडे होईपर्यंत परता. दूध वापरल्याने हा शिरा मऊसरच होईल, अगदी कोरडा होणार नाही.
तयार शिरा असा दिसेल.
=====
भरल्या मिरच्यांसाठी.
भरल्या मिरच्यांसाठी मिरच्या दोन प्रकारे कापता येतील. एकतर उभी चिर द्या किंवा देठाकडची चकती कापून टाका. मग आतल्या बिया काढून टाका.
तेल गरम करुन त्यात जिरे तडतडून घ्या. त्यात तीळ घाला. मग हिंग व हळद घालून बेसन परतून घ्या.
मिश्रण आचेवरुन काढून पुरते थंड होऊ द्या. मग त्यात बाकीचे जिन्नस मिसळा (मिरच्या सोडून) हे सारण कोरडेच ठेवायचे आहे.
सारण असे दिसेल.
सारणात जरा जास्त मीठ घालावे लागेल कारण, मिरच्यांना मीठ लावलेले नाही. मग हे सारण मिरच्यात भरा. फार दाबून भरायचे नाही, कारण हे सारण मग फूगते.
मग या मिरच्या मंद आचेवर तेलात परतून घ्या.
या आहेत तळल्या जाणार्या मिरच्या. (आणखी थोड्या खरपूस करुन घ्या )
खरे तर हे दोन वेगळे पदार्थ पण मी आज दोन्ही केले आणि एकत्र खाल्ले, मजा आली.
मिरच्या फार तिखट नसतील, तर सारणात थोडेसे तिखट घाला.
हेच सारण भरुन, सिमला मिरच्या, ढेमसे (टिंडे), कारली, भोकरे, पडवळ, भेंडी वगैरे करता येतील, अर्थात त्यावेळी सारणात तिखट घालावे लागेल. चिंच वापरून केल्या तर या मिरच्या प्रवासात नेता येतील. एक दोन दिवस टिकतील.

