समोर उभ्या असलेल्या शाळेच्या इमारतीच्या साक्षीने दामोदर हॉटेलच्या छोट्याशा जागेने तिशीत पदार्पण केले. शाळेची इमारत ह्या जागेपेक्षा १० वर्ष मोठी. आणि म्हणून कदाचित मोठेपणाचा आव आणीत त्या छोट्या जागेकडे सदैव डोळे वटारून बघत असते. शाळेच्या इमारतीला माहिती आहे - मोठी होऊन होऊन किती मोठी होणार ही जागा? मोठेपणाचा हक्क आणि ठेका आपल्याकडेच असणार आहे - सतत! शाळेची इमारत दहा वर्षांची होती तेव्हा समोरच्या जागी, जिथे काहीही नव्हतं, थोडी हालचाल सुरु झाली. 'शाळेच्या ठिकाणी हे काय?' अशी बऱ्याच जणांची भावना त्या दिवसात होती. पण शेवटी थोडा संघर्ष करून दामोदर हॉटेल ह्या इमारतीने आपले अस्तित्व मिळवले.
" काय रे? काय झाले एकदम?" आश्चर्यचकित होत तिने विचारले. "एवढा दचकून काय पाहतो आहेस?"
" काही नाही ग. असाच एक विचार आला मनात." मी उत्तर दिले.
" मी हे सांगितले म्हणून तू एवढा दचकलास?का रे? एरवी तुझ्याशी बोलताना वाटले होते की तू एकदम frank असशील", पायल म्हणाली. मी काहीच बोललो नाही आणि चूक करून बसलो. कुणी असं बोलल्यावर गप्पं बसणं म्हणजे एका अर्थाने त्याला किंवा तिला दुजोरा देण्यासारखेच असते. आणि नेमके तेच झाले. मी काही बोलत नाही हे पाहून पायलसुद्धा काही सेकंद गप्पं बसली. शेवटी मीच तिला म्हणालो.
आमच्या बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावर ती राहायची. सदैव आपल्या विश्वात. मी तिला बिल्डींगच्या इतर सदस्यांशी बोलताना कधी बघितलं नाही. तसेच बिल्डींग बाहेरचे कुणी तिच्या ब्लॉक मध्ये आल्याचे देखील मला स्मरत नाही. सकाळी ९ च्या सुमारास ती घरून बाहेर पडायची. बहुदा कामाला जात असावी. आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास पायऱ्या चढताना दिसायची. पण त्या दिवसात तिने एकदाही माझ्याकडे पाहिले नाही. सदैव मान खाली घालून जात असे. जिन्यातच काय पण बिल्डींगच्या आवारात देखील ती कधीही कुणाकडे पाहून हसल्याचे मला आठवत नाही. एक मात्र होते. ती समोरून गेल्यानंतर वातावरणात एक अस्वस्थ शांतता पसरायची.