बिलोरी

श्रावण पक्षी

Submitted by पुरंदरे शशांक on 13 August, 2025 - 01:30

श्रावण पक्षी

हलके हलके पानांवरती
थेंबांची ती नाजुक नक्षी
सरसर सरसर झाडांवरती
बरसत येतो श्रावण पक्षी

घनघन घनघन निळ्या आकाशी
अवचित येता मेघ अंबरी
झळझळणार्‍या रवी करांनी
पात उजळते मस्त बिलोरी

सळसळणारे शिवार थबके
क्षणात वाजे झरा खळाळी
भिरभिरणारी रंगबिरंगी
फुलपाखरे सोनझळाळी

खुळावणारा निसर्ग सारा
फिटे निराशा उदासवाणी
लवलवणारे मानस डोले
मिटूनी डोळे अंतर्यामी

थेंबांत उन्हाच्या रेषा

Submitted by पुरंदरे शशांक on 25 August, 2023 - 00:29

थेंबांत उन्हाच्या रेषा

थेंबांत उन्हाच्या रेषा
पाचूत मिरवल्या वाटा
रंगाची उधळण होता
स्वप्नात बिलोरी लाटा

जरतारी हिरवी शिखरे
ठिबकता थेंब हळुवार
बिंबातून झळके सोने
मऊ वाटेवर अलवार

किणकिणती घंटा दूर
मंजूळ सुरावट रानी
वार्‍यावर हलके गीत
वेळूतून पाऊस गाणी

भवताल स्वप्नसे भासे
नंदनवन अवनी सारी
सुख मावेना ह्रदयात
आकाशी घेत भरारी

Subscribe to RSS - बिलोरी