मियाऽऽउं! (भाग-२) चंगूमंगू
चिमा्ने जन्म दिलेल्या दोन छाव्यांमुळे अगदी नवजात अर्भक ते पूर्ण वाढलेलं मांजर इथपर्यंतचा प्रवास आम्हाला खूप जवळून पाहता आला, अनुभवता आला. चिमाला मोजून दोनच पिल्ले झाल्याने त्यांना सांभाळणं तसंही अवघड नव्हतंच. (तेव्हा आम्ही पहिल्या मजल्यावर रहायचो. पण मांजरं बाळगण्याच्या दृष्टीने तळमजला असलेला सर्वात योग्य असं मला कायम वाटतं). 'इवली' या शब्दाला सर्वात समर्पक असं उदाहरण म्हणजे मांजरीची नवजात पिल्लं! खरोखर इतके छोटे जीव असतात ते! डोळेही मिटलेली ती नाजूक त्वचेची, चिमणीपेक्षा बारीक आवाजात म्यावम्याव करणारी नाजूक बाळें पाहून यांचेच पुढे इरसाल बोके किंवा लबाड मांजरी होतील असं अजिबात वाटत नाही!