मराठी गझल

जरी सदा शांत...

Submitted by अ. अ. जोशी on 3 October, 2010 - 09:07

जरी सदा शांत मी भासतो
कधीतरी मीसुधा पेटतो

किती धरा मार्ग आपापला
कुणी उगाचच पुन्हा भेटतो

गुणाप्रमाणे समाजात मी
वयाप्रमाणे कुणी पाहतो

कधीच मी सोडली काळजी
तरी तुझा चेहरा भावतो

जगू नको तू दुराव्याविना
तुझ्यावरी जो सदा भाळतो

कळेल का झगमगाटा या...?
जगात साध्या 'अजय' राहतो...

गुलमोहर: 

विसरण्याला मद्यप्याला....

Submitted by अ. अ. जोशी on 2 October, 2010 - 06:32

विसरण्याला, मद्यप्याला ओठ हे धरतात का रे?
अन नशा आल्यावरीही अश्रु ओघळतात का रे?

ज्या फुलांना पाहिले की त्या मिठीचा गंध येतो
नेहमी गंधाळण्या कोमेजली असतात का रे?

पाखरे येतात काही आजही घरट्यात माझ्या
आठवांचे वेचुनी दाणे... पुन्हा उडतात का रे?

देह, घरटे एक झाले; वाटते होईल मनही...
या जशा जमतात आशा, त्या तशा उरतात का रे?

आजही साधेपणाने गात आहे 'अजय' गीते
ऐकणारेही तसे साधे कुणी मिळतात का रे?

गुलमोहर: 

या नभी अंधारवेना

Submitted by अ. अ. जोशी on 4 September, 2010 - 00:41

सांजले ! पण सूर्य कलती दाखवेना...
ती दिसेना ! या नभी अंधारवेना ...

पाहिले विस्फोट, आई विखुरलेली...
आज कोणी तान्हुल्याला जोजवेना

एवढी नव्हती सवय कुठल्या सुखाची
दूरदेशी, बघ, मलाही राहवेना

मी तिचा नाही असे वाटून गेले..
आणि नंतर वाटले ते बोलवेना

ते तिचे जाणे नि येणे याच हृदयी...
सोसले पूर्वी ! नव्याने सोसवेना

प्राण मी झालो तिचा नजरेत एका
ओढणी आता तिलाही ओढवेना

पाहिले होते तिला मी लाजलेले...
एवढे की, सभ्यतेने पाहवेना

शस्त्रक्रीया आज हृदयाचीच केली
गुंतलेल्या भावनांशी खेळवेना

दु:ख इतके आर्त विणले वेदनांनी
एकही धागा सुखाचा जोडवेना

गुलमोहर: 

वेगळा

Submitted by अ. अ. जोशी on 15 August, 2010 - 14:22

परंपरेने झालोच पहा कसा वेगळा
विचार करताच मी जरासा 'तसा' वेगळा

माझी फांदी मलाच म्हटली, 'सोड मला तू...'
लटपट उडली झालो मी जसजसा वेगळा

एकरूप मी तुझ्या अंतरी निश्चित आहे
काय करावे? तरी उमटतो ठसा वेगळा

बोलायाचे असते पण ती बोलत नाही
स्वभाव असतो एकेकाचा असा वेगळा

वेगवेगळा मी असतो प्रत्येक ठिकाणी...
की असतो बघणार्‍याचा आरसा वेगळा ?

कुणास काही पडले नाही गुणवत्तेशी
मीच ठरवले घ्यावा आता वसा वेगळा

जवळीक बघुन ठरवू नकोस तू गूण 'अजय'
सूर्य वेगळा अन् त्याचा कवडसा वेगळा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल