वेगळा

Submitted by अ. अ. जोशी on 15 August, 2010 - 14:22

परंपरेने झालोच पहा कसा वेगळा
विचार करताच मी जरासा 'तसा' वेगळा

माझी फांदी मलाच म्हटली, 'सोड मला तू...'
लटपट उडली झालो मी जसजसा वेगळा

एकरूप मी तुझ्या अंतरी निश्चित आहे
काय करावे? तरी उमटतो ठसा वेगळा

बोलायाचे असते पण ती बोलत नाही
स्वभाव असतो एकेकाचा असा वेगळा

वेगवेगळा मी असतो प्रत्येक ठिकाणी...
की असतो बघणार्‍याचा आरसा वेगळा ?

कुणास काही पडले नाही गुणवत्तेशी
मीच ठरवले घ्यावा आता वसा वेगळा

जवळीक बघुन ठरवू नकोस तू गूण 'अजय'
सूर्य वेगळा अन् त्याचा कवडसा वेगळा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एक वेगळा प्रयत्न....

कुणास काही पडले नाही गुणवत्तेशी
मीच ठरवले घ्यावा आता वसा वेगळा

हा शेर छान आहे.

डॉ.कैलास

वेगवेगळा मी असतो प्रत्येक ठिकाणी...
की असतो बघणार्‍याचा आरसा वेगळा ?
.
कुणास काही पडले नाही गुणवत्तेशी
मीच ठरवले घ्यावा आता वसा वेगळा
.
जवळीक बघुन ठरवू नकोस तू गूण 'अजय'
सूर्य वेगळा अन् त्याचा कवडसा वेगळा

खास आवडलेत.

एक वेगळा प्रयत्न....
प्रयत्न?

धन्यवाद कैलास, गंगाधर.

खूप छान!!!

<< बोलायाचे असते पण ती बोलत नाही
स्वभाव असतो एकेकाचा असा वेगळा >> क्या बात है!!!