केस, उंदीर आणि बॅट
आज पहाटे तीन वाजताच्या साखरझोपेत अस्मादिक बिनघोरी घोरत असताना, माझ्या विपुल केशसंभाराशी ( उच्च लिखाणासाठी घेतलेली स्वायत्तता... मराठीत सिनेमॅटिक लिबर्टी हो! बाकी प्रत्यक्षात त्या दिल से मधल्या ' तू तो नही है मगर, तेरी आहटे है' असा भास माझ्या घरच्यांना देण्याचा चंग बांधल्यागत इथे तिथे पण माझं डोकं सोडून सगळीकडे स्वतःला टाकून घेणाऱ्या केसांचं काय करावं हा प्रश्न मला छळतो. पण ते असो.) तर माझ्या विपूल केशसंभाराशी कुणीतरी खेळत आहे असा भास झाला. 'अग्गोबाई, इतकी कसली आता लाडीगोडी!' असा विचार करत हलकेच डोळे किलकिले करत, ओठांवर अर्धोन्मिलीत का काय म्हणतात तसे स्मित आणण्याचा प्रयत्न करत पाहिले!