बालपणीचा काळ सुखाचा!
त्यातही जर ते बालपण नव्वदीच्या दशकात आणि दक्षिण मुंबईमधील चाळ संस्कृतीत गेले असेल तर क्या बात!!
पण आयुष्य सारेच धमाल नसते. आणि नसावे. सुखाची किंमत तेव्हाच जेव्हा दुःखाचे चटके बसलेले असतात. धमाल मस्तीची मजा देखील तेव्हाच जेव्हा रोजच्या जीवनात थोडाफार संघर्ष असतो. म्हणजे थंड झुळकेचा खराखुर आनंद त्यालाच जो उन्हातान्हात राबला आहे. ती मजा एसीच्या थंडाव्यातून बाहेर आलेल्याला नाही. तर असेच काहीसे ते दिवस होते. पाच आदमी, एक उस्सल, और पाव नही? या माझ्याच एका सोशल मिडिया प्रसिद्ध कथेसारखे.. तेव्हाची ही गोष्ट!
कुठून सुरुवात करू.. तर हो,
आमच्या भल्या मोठ्या चाळीला तीन गल्ली सदृश्य आयताकृती मैदाने होती. त्यापैकी एकात दरवर्षी १ मे ला सत्यनारायणाची पूजा व्हायची, रंगपंचमीच्या सणाला होळी पेटवली जायची, शिवजयंतीला महाराजांची स्थापना केली जायची..
तर दुसऱ्या मैदानात गणेश जन्माला महाप्रसाद, नवरात्रीला डिस्को दांडिया आणि गोकुळाष्टमीला दहीहंडी बांधली जायची.
या सण उत्सव साजरे करण्याच्या परंपरांमुळे ही दोन्ही मैदाने कायम स्वच्छ ठेवली जायची. ज्याचा फायदा उचलत आम्ही मुले तिथे वर्षभर क्रिकेट खेळायचो.
पण मैदान म्हणून जो तिसरा इलाका होता त्यावर मात्र गरजूनी आपला कब्जा केला होता. छे, राहायला म्हणून नाही. तर ते आमच्या चाळीचे डंपिंग ग्राउंड झाले होते. भुसभुशीत मातीचा प्रदेश, जो त्यावरच्या कॉमन पॅसेजमधून प्रत्येकाने कधीतरी आपल्या सोयीने आणि आळसाने फेकलेल्या कचऱ्यामुळे भरलेला असायचा. आंब्याच्या सीजनला कोणी तिथे कोयी टाकल्या तर त्यातून अंकुर फुटून आमराई तयार व्हायची असा तो सुपीक प्रदेश होता. आणि या सुपीक प्रदेशाचे रहस्य दडले होते तेथील मातीत. जिथे उंदरांनी आपली बिळे बनवून वास्तव्य केले होते.
पुढे काळ बदलला. आमची चाळ बदलली. एक अपक्ष नगरसेवक आले आणि त्या डंपिंग ग्राऊंडचा कायपालट करून गेले. तिथे आमचे तिसरे मैदान तयार झाले. सोबत गार्डन आले. बाकडे, झोके आणि हत्तीची घसरगुंडी लागली. दहा बाय बाराच्या खोलीत राहणार्या चाळकर्यांसाठी ते वृंदावन झाले.
ऊंदीर मात्र बेघर झाले. निसर्गाच्या नियमानुसार आम्ही त्यांचा हक्काचा निवारा हिरावून घेतल्यावर त्यांनी आमच्या हद्दीत घूसखोरी करणे अपेक्षित होते. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. त्याच सुमारास आमच्या बिल्डींग शेजारील फॅक्टरी बंद पडली. आमच्या बिल्डींगच्या ग्राऊंड फ्लोअरवर असलेल्या गोदामांना टाळी लागली. आणि नवीन आसर्याच्या शोधात असलेले सारे उंदीर तिथे शिफ्ट झाले.
अजून काही वर्षे अशीच गेली. ते त्यांच्या आणि आम्ही आमच्या हद्दीत खुश होतो. रात्रीचे ते मैदानाच्या कडेकडेने किंवा पाण्याच्या पाईपावरून बागडायचे. पण कधी आमच्या खेळाच्या किंवा सणांच्यामध्ये आले नाहीत. त्यामुळे आम्हीही त्याचा बंदोबस्त करायला कधी गेलो नाही.
आणि मग एके वर्षी चाळीत रिपेयरींग लागले. तोडफोडीला सुरुवात झाली. त्यात शेजारची फॅक्टरी अर्धी तोडली गेली, तर अर्धी विकली गेली. गोदामे आपले स्वरुप बदलून नव्याने उघडली गेली. मैदानांची डागडूजी झाली. ऊंदरांची सर्व बाजूंनी नाकाबंदी झाली. आणि अखेरचा पर्याय म्हणून ईतके वर्षात कधी नव्हे ते त्यांनी वर चाळीच्या दिशेने बघत घूसखोरीला सुरुवात केली.
हो, ती शब्दश: 'घूस'खोरीच होती. कारण जेव्हा ते मैदानातून आमच्या घरात येऊ लागले तेव्हा आम्हाला समजले की गणपतीचे क्यूटसे वाहन उंदीर हा वेगळा प्राणी असतो. आणि भल्यामोठ्या आकाराची घूस हा वेगळा प्राणी असतो. पण आम्ही आमच्या समाधानासाठी आणि लहान मुलांना भिती वाटू नये यासाठी त्या घूशींना उंदीरच म्हणायचो.
चाळीत प्रत्येक मजल्यावर दोन विंग होत्या. एका विंगेत चार रांगा होत्या. आणि एका रांगेत पाच रूम होत्या. त्या समोरून एक कॉमन पॅसेज जायचा. प्रत्येक घराला एक दरवाजा, एक खिडकी आणि त्या दोघांच्या वर वेंटीलेटर होते. त्या वेंटीलेटरमधून प्रत्येकाच्या घरात सतराशे साठ वायरी गेल्या होत्या. आता तिथूनच हे ऊंदीर आत शिरू लागले होते. चाळीत जवळपास प्रत्येकाच्या घरात पोटमाळे असायचे कारण जागेची कमतरता. त्या पोटमाळ्यांना सहसा स्टोअर रूम म्हणून वापरले जायचे. पण काही जण झोपायला सुद्धा वापरायचे. उंदरांनी त्या पोटमाळ्यांवर कब्जा केला. पण त्यातील कुठल्याही ऊंदराचे एक असे फिक्स घर नव्हते. कॉमन पॅसेजमधील वायरींवरून त्यांचा मुक्त संचार चालायचा आणि ते वाट्टेल त्या घरात शिरायचे. अगदी पकडापकडी खेळत आहेत असे बागडत शिरायचे. काही दिवसातच त्यांना आमची नजर आणि आम्हाला त्यांची नजर ईतकी सरावली होती की एकमेकांबद्दल काही वाटेनासे झाले. फक्त जे लोकं पोटमाळ्यावर झोपायचे त्यांनी ते आता सोडून दिले होते.
आमच्या दोन रूम होत्या. त्यातील एकात आमचे किचन होते. तर त्याच रूममध्ये आमचा पोटमाळा होता. आमचे छोटेसे त्रिकोणी कुटुंब असल्याने आम्ही तो पोटमाळा फक्त स्टोअर रूम म्हणून वापरायचो. आता मात्र उंदरांच्या भितीने आम्ही तिथे अश्याच वस्तू ठेवू लागलो ज्या वर्षाकाठी एकदाच लागाव्यात. त्यातही जेव्हा त्या काढायची वेळ यायची तेव्हा ती वेळ दिवसाचीच साधायचो. संध्याकाळनंतर माळ्यावर जायची हिंमत करणे शक्यच नव्हते. दिवसादेखील आधी पाच ते दहा मिनिटे काठीने जोरजोरात ठाकठूक आवाज करून मगच वर चढायचो. बरेचदा त्या ठाकठूक आवाजाने एखादा उंदीर पळताना दिसायचा. अगदी आपल्या डोळ्यासमोरून हात लांब केला की मुठीत येईल ईतक्या अंतरावरून पळायचा. पण अर्थात तसे तो मुठीत येणे शक्यच नव्हते. कारण तुम्ही विसरला असाल तर पुन्हा आठवण करू देऊ ईच्छितो, भले आपण ऊंदीर म्हणत असलो तरी साईजने त्या घूशीच होत्या.
तर असे आपण माळ्यावर चढायच्या जिन्यात अर्धवट चढलेले असताना, आपल्या डोळ्यासमोरून एखादा भलामोठा ऊंदीर आपल्याला खिजवत पळून गेल्यावर, पुन्हा मागे न फिरता पुढे त्याच माळ्यावर जाऊन हवी ती वस्तू शोधून आणने, यासाठी तितकीच भलीमोठी हिंमत लागते. जी महिन्याकाठी मी एकदा तरी दाखवायचो.
पण हिंमत ईथेच संपत नाही,
एकदा ठाकठूक करून नेहमीसारखे थोडा वेळ वाट बघून मी वर चढलो. एका स्टीलच्या टाकीतून काही भांडीकुंडी शोधून आणायची होती. टाकी उघडीच होती. त्यावर काही झाकण वगैरे नव्हते. पोटमाळ्याची ऊंची साधारण चारेक फूट होती. तिथे उभे राहणे शक्य नसायचे. त्यामुळे गुडघ्यावर बसून मी आत टाकीत डोकावलो, तर माझी आधीच चाहूल लागलेला एक उंदीर तिथे दबा धरून बसला होता. मी टाकीत डोकावताच आमची नजरानजर झाली. क्षणभरच. आणि पुढच्याच क्षणाला त्याने उडी घेतली. त्याच्या सुटकेचे वेंटीलेटर माझ्याच दिशेने असल्याने त्याने थेट माझ्याच अंगावर ऊडी घेतली. एखाद्या उंदराचा स्पर्श व्हायची ती माझी पहिलीच वेळ होती. सुदैवाने मी घाबरून ताडकन उठलो नाही अन्यथा वरच्या छताला आपटून मस्तकाचे दोन तुकडे झाले असते. मी तसाच बसल्याजागी मागे कोसळलो आणि तो मला चिरडत निघून गेला..!
आमच्या दोन रूम असल्याने एक फायदा होता. रात्रीचे जेवण खाणे उरकले की आम्ही किचन असलेल्या रूमचे दार लावून घ्यायचो आणि दुसर्या रूममध्ये झोपायचो. आतल्या रूमची बत्ती गुल होताच पोटमाळ्यावरचे उंदीर खाली येत बागडायचे. तिथल्या शेल्फ वर पकडापकडी खेळायचे. पूर्ण रात्र धुमाकूळ घालायचे. आम्ही तिथले रोजच्या सवयीचे आवाज ऐकत शांतपणे झोपून जायचो. मध्येच एखादा मोठा आवाज आला की आता त्यांनी काय पाडले असेल असा अंदाज लावायचो. पण एखादी महत्वाची वस्तू किंवा त्या रूममधील देव कधी त्यांनी धक्का देऊन पाडले नाहीत. जणू काही सामंजस्याने आमच्यात एक अलिखित करार झाला होता. याच कराराचा एक भाग म्हणून दिवसा ते कधीच पोटमाळ्यावरून खाली उतरायचे नाहीत. पण एकदा मात्र हा करार अनवधानाने तुटला.
माझे परीक्षेचे दिवस होते. दुसर्या दिवशी पेपर होता. रात्रीचे मी अभ्यास करायला डोंगरावर जायचो. दिवसा मात्र घरीच करायचो. परीक्षेच्या आदल्या दिवशी आणीबाणीच्या प्रसंगी घोकंपट्टी करायची असल्यास हातात पुस्तक घेऊन मोठमोठ्याने वाचत घरभर फेर्या मारायची मला सवय होती. आता घर तर आमचे काही मोठे नव्हते. त्यामुळे या रूममधून त्या रूममध्ये आठचा आकडा काढत मी फिरत राहायचो. त्या दिवशीही असेच फिरत होतो. कधी नव्हे ते दुपारच्या वेळी माळ्यावर उंदरांची मोठमोठ्याने खुडबूड ऐकू येत होती. पण मी एकाग्रता भंग होऊ नये म्हणून तिथे दुर्लक्ष करत अभ्यासाचे पुस्तक हातात घेऊन फिरत होतो. ईतक्यात माळ्याच्या गॅलरीतून एक उंदीर पकडापकडी खेळता खेळता तोल जाऊन खाली पडला ते थेट माझ्या हातातील पुस्तकावर येऊन विसावला. माझी भितीने बोबडीच वळली. एक घुशीसारख्या आकाराचा उंदीर मी पुस्तकरुपी ओंजळीत धरला होता. त्याच्यासाठी देखील हा अनुभव नवीनच असल्याने तो तिथेच माझ्याकडे बघत थांबला. पुस्तक मिटताही येत नव्हते आणि फेकायचेही सुचत नव्हते. आपण जरासेही हललो आणि त्याने दचकून थेट आपल्या तोंडावरच हल्ला करून आपल्याला बोचकारले तर.. ही भिती अनुभवत किती तरी वेळ आम्ही तसेच एकमेकांच्या नजरेत नजर घालून उभे होतो. जेव्हा शुद्ध आली तेव्हा समजले की माझा परीक्षेचा पेपर बुडाला होता.
गंमतीने म्हटले हा.. पेपर वगैरे बुडाला नव्हता किंवा काही बेशुद्ध वगैरे पडलो नव्हतो. पण काही काळासाठी शुद्ध नक्कीच हरपली असावी. कारण तेव्हा नेमके मी काय रिअॅक्ट झालो हे मला आज बिलकुल आठवत नाही. उगाच डोक्याला जास्त ताण देऊन आठवायचे सुद्धा नाही. पण त्यानंतर मात्र असे अचानक माळ्यावरून उंदीर पडायचे किस्से अजून दोन तीन वेळा झाले. फक्त ते अंगावर न पडता जमिनीवर पडताना पाहिले. क्षणभर थांबून क्षणार्धात पसार व्हायचे. पण तो क्षणभर आमचाही श्वास रोखला जायचा.
हळूहळू या घटना चाळीत सर्वांच्या घरात वाढू लागल्या आणि आजपर्यंत जे लोकं आपल्यापुरते उपाययोजना करत होते त्यांनी एकत्रितपणे या संकटाशी लढा द्यायचे ठरवले. अर्थात त्याशिवाय आता पर्याय नव्हता. चाळभर उंदरांचे जाळे पसरले होते. त्यांना एकाच वेळी जाळ्यात पकडून फेकणे गरजेचे होते. पण कुठे फेकायचे हा सुद्धा एक प्रश्न होता. कारण या आधी जेव्हा एखादा उंदीर वाट चुकून वर यायचा तेव्हा त्याला पिंजर्यात पकडून खाली मैदानात फेकले जायचे. त्यानंतर तो तिथेच रमायचा आणि पुन्हा वर यायचा नाही. पण आता तिथलीच वस्ती उठल्याने ते आमच्या घरात शिरले होते. त्यामुळे आता त्यांना दूर कुठेतरी जंगलात सोडणे गरजेचे होते. पण ऊठसूठ एखादा उंदीर पकडून दूर सोडून येणे किचकट काम असल्याने त्यांना मारून टाकणे हाच एक पर्याय आता शिल्लक राहिला होता.
चाळ कमिटीची मिटींग बसली. त्यात अॅक्शन प्लान बनवला गेला. मीटींगचे सारे डिटेल आता मला आठवत नाहीत, पण आमच्या चाळीत अश्या मीटींगमध्ये फार मजा यायची. एखाद्या विनोदी चित्रपटात जशी सारी पात्रे मुदामहून अतरंगी दाखवली जातात, तशी ती आमच्या चाळीत ओरिजिनल भरली होती. प्रत्येकाच्या एकेक तर्हा, एकेक आयड्या, आणि डायलॉग धमाल उडवायचे.
खरेतर हा उंदरांचा त्रास या थराला जाईपर्यंत आम्ही सहनच कसा केला हा प्रश्न आज मलाही पडतो. पण तेव्हा हा प्रश्न पडला नव्हता. कारण चाळ तुम्हाला प्रत्येक समस्येकडे वेगळ्या नजरेने बघायला शिकवते. चाळीत जेव्हा लाईट जायची आणि चाळ अंधारात बुडायची तेव्हा लोकं वैतागून शिवी नाही हासडायचे. तर लहान मुलांचा एकच मोठ्ठा गलका व्हायचा. ऊंऊऊऊऽऽऽऽ अशी अंधारात एखाद्याला घाबरवायला आरोळी ठोकावी तसा आवाज बत्ती गुल झाल्याझाल्या चाळीत घुमायचा. मला आजही तो आवाज जसाच्या तसा आठवतो. मुले आपल्या घरातून टोर्च घेऊन खेळ करायला बाहेर पडायचे, तर मोठे सुद्धा चकाट्या पिटायला दादरावर जमायचे. सर्वांचे दरवाजे तसेही सताड उघडे असायचे त्यामुळे फॅन गेला, गरम होतेय असे प्रश्न कधी कोणाला पडले नाहीत. थोडक्यात काहीही त्रासदायक घडले आणि ते सर्वांसोबत घडत असेल तर किटकिट न करता आधी ते सर्वांसोबत चर्चा करत एन्जॉय कसे करता येईल हेच बघितले जायचे.
उंदरांचा बीमोड कसा करायचा या मिटींगमध्ये देखील आधी असेच हसतखेळत एकमेकांच्या किस्से अनुभवांची देवाणघेवाण झाली. त्यावर एकेकाच्या अतरंगी आयड्या आल्या. आणि अखेर म्युन्सिपालटीचे विष आणून एकाच वेळी ते चाळभर टाकूया, सोबत मोठाले पिंजरे लाऊया, पिंजर्यातील उंदरांना सुद्धा विष खाऊ घालुया किंवा बुडवून मारुया आणि दोन तीन दिवसातच एक साथ सर्व उंदीरांचा सफाया करुया असे ठरले. आणि पुढच्या काही दिवसातच ते कार्य ठरल्याप्रमाणे तडीस गेले.
त्यातून तेव्हा जे काही पाप लागले असेल ते असेल. पण आता त्याचे डिटेल सर्वांना सांगून आणि उंदीर मारायची आयड्या देऊन अजून पाप डोक्यावर चढवून घ्यायचे नाहीये. खरे तर फारसे डिटेल आठवत सुद्धा नाहीयेत. पण त्या दिवशी असेच मायबोलीवर एका धाग्यावर विषय निघाला आणि म्हणालो एकेकाळी आमच्या घरात हे असे मोठमोठाले घूशीसारखे उंदीर फिरताना पाहिले आहेत. ते समोरच्याला खोटे वाटले कारण कदाचित असे काही जग असते हा अनुभवच नसावा किंवा अश्यांना हे वाचूनही पटणार नाही. पण म्हटले कोणाला मुद्दाम पटवून द्यायला म्हणून नाही, तर स्वतःसाठी म्हणून एकदा लिहून काढावे. तेवढेच लिहिताना मन जरा भूतकाळात, आयुष्यातील एका सोनेरी काळात एक चक्कर मारून येते 
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
एवड्या कालखंडात शाहरूखखानची
एवड्या कालखंडात शाहरूखखानची एकदाही आठवण आली नाही का ? कुठेच उल्लेख नाही.
छान लिहिले आहे. आवडल्या
छान लिहिले आहे. आवडल्या आठवणी.
>> चाळीत प्रत्येक मजल्यावर
>> चाळीत प्रत्येक मजल्यावर दोन विंग होत्या. एका विंगेत चार रांगा होत्या. आणि एका रांगेत पाच रूम होत्या. त्या समोरून एक कॉमन पॅसेज जायचा. <<<
म्हणजे नक्की कसे तेच कळले नाही. आणि कुठली चाळ मुंबईतली?
उंदीर की घुशी? उंदीर कधीच झेप
उंदीर की घुशी? उंदीर कधीच झेप घेत नाही. (टाकीचा किस्सा)… घूस मात्र तिला कोंडले असेल आणि त्या खोलीचा दरवाजा उघडला की झेप घेते. उंदीर हा कधीच घुशीएवढा आकाराने मोठा होत नाही. असो.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
@ केशवकूल, शर्मिला
@ केशवकूल, शर्मिला
धन्यवाद
@ झंपी,
ते तर आता एखादा प्लॅन काढून सांगावे लागेल. संध्याकाळी टाकतो. बाकी आमची चाळ प्लॅनिंग आणि structure म्हणून इतर चाळींच्या तुलनेत उजवी आणि त्यासाठी फेमस होती.
का ते सुद्धा त्या प्लान सोबतच लिहितो.
@ भ्रमर,
हो, घुशीच होत्या त्या. तसे लिहिले आहे लेखात.
शाहरूख खानचा उल्लेख करूनही
शाहरूख खानचा उल्लेख करूनही इग्नोर केलं ? कमालच आहे.


इतर धाग्यात संबंध नसताना शाहरूख खान आणला जातो एव्हढं त्याने आयुष्य व्यापलंय आणि प्रत्यक्ष जीवनात त्याचा मागमूसही नाही.
ये कैसे चलेगा ? कि फक्त मायबोलीवरच्या आयुष्यात शाखाने झपाटलंय?
कि शाखाच्या उल्लेखाने इरीटेट होतंय ?
आमचे घर जमिनीवर आहे. आणि समोर
आमचे घर जमिनीवर आहे. आणि समोर एक रिकामा प्लॉट आहे. तो पण डम्पिंग एरियाच झाला आहे. तिथून येऊन असंख्य उंदीर सगळया घरांमध्ये बागडत असतात. तूम्ही म्हणता तसे नेहमीचे छोटे आणि बऱ्यापैकी मोठे, अगदी घुस वाटतील असे मोठे उंदीर आहेत. कितीही पिंजरा लावा, काही फरक पडत नाही.
वामिका, हो. बैठ्या घरात,
वामिका, हो. बैठ्या घरात, बैठ्या वस्तीत जर हा प्रॉब्लेम उद्भवला तर अवघड होते.
माझ्या मामाची वाडी अशी बैठी होती. मागच्या बाजूने रेल्वे ट्रॅक जायचा. भायखळा यार्ड म्हणजे कित्येक ट्रॅक एकत्र आले होते. वाडी आणि रेल्वेलाईन यांच्यामध्ये रेल्वेची कंपाऊंड वॉल होती. पण एकदा ती कोसळली. आणि तिथून उंदरांचे इनकमिंग सुरू झाले.
त्यांचे तर मोठाले पोटमाळे होते. म्हणजे डुप्लेक्सच जणू. पण उंदराच्या त्रासाने काही महिने वर्षभर ते माळे वापरायची भीती झाली होती. मी दर मे महिन्याच्या सुट्टीत दोनतीन आठवडे तिथे राहायला जायचो. तेव्हा एका वर्षी हे अनुभवले आहे. माझ्या लेखातील अनुभवाच्या आधीचा अनुभव होता हा. त्यामुळे नवा होता. उंदीर असे सहजी लाभलेली जागा सोडत नाहीत. आणि उपाय करून थकले की लोकं हतबल होतात आणि काही प्रमाणात हा त्रास राहणारच हे स्वीकारतात.
घराच्या जवळच राहणाऱ्या
घराच्या जवळच राहणाऱ्या मैत्रिणीच्या पार्किंग मध्ये ह्यावर्षी क्लास रूम तयार करून घेतली. तिथे येतात अधून मधून उंदीर.
एकदा तर माझ्यासकट सगळे वर पाय करून बसलो होतो बराच वेळ.
शर्मिला,
शर्मिला,
स्मशानात घर बांधाल तर भुते दिसणारच
पाय वर करण्यावरून आठवले. लहानपणी आमच्या इथे स्टार टॉकीज नावाचे चित्रपटगृह होते. अगदीच लो बजेट, भोजपुरी चित्रपटांचे होते. मी कधी तिथे गेलो नाही. पण तिथे पाय वर घेऊन बसावे लागायचे कारण खुर्ची खालून उंदीर फिरतात म्हणून ते प्रसिद्ध होते.
उंदरांच्या आठवणी -
उंदरांच्या आठवणी -
- कॉलेजच्या मेसमध्ये, सात आंधळ्या चिचुंद्र्या एकमेकींच्या शेपट्या धरुन पिरॅमिडच्या आकारात जाताना पाहीलेल्या आहे. याईक्स इतकी घाण वाटली.
- एक घूस धावत धावत आली व तिने डायरेक्ट एका मांजरी वरच सूर मारला, (कॅन यु बिलीव्ह इट) मांजराची उस्फूर्त प्रतिक्रिया झाली अक्षरक्षः तीन ताड उडण्याची खालून घूस झूम निघुन गेली.
- गेल्या अपार्टमेन्टमध्ये आम्ही एक उंदराचे पिल्लू आमच्या अडगळीच्या खोलीत कोंडुनच ठेवले. ते यथावकाश मेले व दुर्गंध येऊ लागली. रामा! ते साफ करणे म्हणजे ... दिव्य झाले कारण तो दुर्गंध लवकर जात नाही.
एक घूस धावत धावत आली व तिने
एक घूस धावत धावत आली व तिने डायरेक्ट एका मांजरी वरच सूर मारला, (कॅन यु बिलीव्ह इट)
>>>>
येस आई कॅन..
आमच्या बिल्डिंगमध्ये मांजरी घाबरायच्या उंदरांना.
सात आंधळ्या चिचुंद्र्या एकमेकींच्या शेपट्या धरुन >>>> चिचुंद्र्याचा आवाज फार irritating तसेच भीतीदायक असतो. त्यात त्यांना फार दिसत नसल्याने काय करतील कुठे जातील याचा नेम नसतो.
बाकी तो मेलेल्या उंदराच्या वासाचा विषय नको. ते वाक्य वाचताच नाकात दरवळला
तो वास आला तर एक उंदीर कमी झाला याचा आनंद कमी व्हायचा आणि आता मेल्याला शोधावे लागणार याचे दुःख जास्त..
KEM मध्ये असताना हे सगळे
KEM मध्ये असताना हे सगळे घुसखोरीचे प्रताप पाहिले आहेत.
मांजरी घुशींना घाबरून अंग चोरून बसायच्या.
मागे काहीतरी मोहीम पण निघाली होती वाटते उंदीर मारा, पैसे मिळवा.
उंदीर यक्क... वाचूनच पोटात
उंदीर यक्क... वाचूनच पोटात ढवळले.
घुस ह्या प्राण्याला तर कुत्रे पण घाबरतात. एकदा तर मी टॉम-जेरी मधील कार्टून सारखा प्रसंग प्रत्यक्ष जीवनात पाहिला आहे. असेच बोरीवलीत कुणाची तरी वाट पहात रस्त्यावर उभे होतो. थोड्याच अंतरावर एक जुनी गाडी होती आणि सहा सात मांजरे त्या गाडी जवळ, कोणी टपावर, कोणी बॉनेटवर बसून आराम करत होती. कुठून तरी एक घूस त्या गाडीजवळ आली. तिला पाहिल्याबरोबर त्या मांजरांची अशी काय तारांबळ उडाली की विचारू नका. अक्षरशः ३-४ सेकंदात सगळी मांजरे जणू जीवावरच बेतले आहे असे दर्शवत घाबरून दूर पळून गेली.
टॉम-जेरीमध्ये अगदी असाच एक प्रसंग होता. जेरीला एकदा टॉम खूपच जेरीस आणतो, तेव्हा जेरी त्याच्या एका अंकलला मदतीला बोलावतो. तो अंकल जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा आजूबाजूच्या मांजरांची अशीच धावपळ होते. सगळी मांजर जीव घेऊन मिळेल त्या दिशेने पळून जातात. एक मांजर तर त्या जेरीच्या अंकलला पाहून स्वतःच स्वताची कबर खोदून स्वत:ला गाडून घेते.
>>>>एक मांजर तर त्या जेरीच्या
>>>>एक मांजर तर त्या जेरीच्या अंकलला पाहून स्वतःच स्वताची कबर खोदून स्वत:ला गाडून घेते.

त्यांचे तर मोठाले पोटमाळे
त्यांचे तर मोठाले पोटमाळे होते. म्हणजे डुप्लेक्सच जणू. पण उंदराच्या त्रासाने काही महिने वर्षभर ते माळे वापरायची भीती झाली होती. >> बरोबर. ही जमात पोटमाळ्यावर बस्तान बसवते. आमचा कुत्रा पण दर दिवसाआड एक तरी उंदीर मारतोच. आणि मग बरेचदा बेड खाली, कार्पेटवर कोणाचे लक्ष नसले की मग बेडवर सुध्दा आणून ठेवतो.
त्याचं लक्ष नसले की मगच तो उंदीर फेकून देता येतो. नाहीतर हा आमच्यावर गुरगुरणार. 
बापरे वामिका, तुम्हाला तर डबल
बापरे वामिका, तुम्हाला तर डबल त्रास आहे!
उंदीर मारा, पैसे मिळवा.
उंदीर मारा, पैसे मिळवा.
>>>>
हो, ही योजना आलेली आठवतेय
आम्ही एका मित्राला सुद्धा यावरून चिडवायचो. कॉलेज कॅम्पसमधून नवीन जॉबला लागलेलो तेव्हा त्याला कसेही करून सरकारी नोकरीत आणि ते देखील बीएमसीमध्ये लागायचे होते. भले मग इंजिनीयर ची पोस्ट का नसेना. कसले कसले फॉर्म आणून भरत बसायचा. त्याला मूषक संहार विभागात वेकेन्सी आहे, जातोस का म्हणून चिडवायचो
रानभुली, तुम्हाला इथे उत्तर
रानभुली, तुम्हाला इथे उत्तर दिले आहे.
https://www.maayboli.com/node/44565?page=2
इथे दिले तर बरं होईल.
इथे दिले तर बरं होईल. धागे वर आणण्यात इंटरेस्ट नाही.
घुशींच्या / उंदिरांच्या आठवणी
घुशींच्या / उंदिरांच्या आठवणी चांगल्या आहेत असं म्हणणार नाही मात्र लेख चांगला लिहिलायं.
उंदिर , घूस फार विध्वंसक प्राणी आहेत. नतद्रष्ट उंदिर तर शेतकऱ्यांचा जन्माचा शत्रू.. शेतात भाताच्या पेंड्याचं उडवं घातलं रे घातलं की ह्याच्या रात्रंदिवस चोऱ्यामाऱ्या सुरु झाल्या समजायचं..!
घुशीला आम्ही उतळ म्हणतो.. ही तर घराच्या भिंती जमिनी खालून पोखरते म्हणतात.
माहेरचे घर बऱ्याच महिन्यांपासून बंद आहे.. कौलारू घर असल्याने कुठून तरी फटीतून उंदिर घुसतात. महिन्या दोन महिन्यातून माझी फेरी होते. प्रत्येक वेळी मामाने घरात काहीतरी नुकसान केलेले असते. आजूबाजूला शेतजमीन असल्याने आणि त्यात घर बंद म्हटल्यावर मामाला रोखायला कुणीच नाही. देव्हाऱ्यातल्या देवांना सुद्धा सोडत नाहीत .. सगळीकडे नासधूस करून ठेवतात. या वेळेस ठरवलं , गणपती बाप्पाला वाईट वाटलं आणि मला पाप लागलं तरी चालेल पण ह्या उंदरांना सोडणार नाही. घरी गेले तेव्हा माळ्यावर औषध टाकून आले.. माळा तसा रिकामी आहे.. जास्त सामान नाही.. बहिण दिवाळीला जाऊन आली म्हणाली दोन सांगाडे होते उंदिरांचे माळ्यावर .. आता पुन्हा उंदारांचा बिमोड करायला हाच मार्ग अवलंबणार.
तुम्ही लिहिली आहे काहिशी तश्याच प्रकारची चाळीतील खोली मुलूंडला चुलत काकीच्या माहेरी पाहिली होती. आता तिथे बिल्डिंग झाली. किचनला कडी / कुलूप घालून दुसऱ्या रूममध्ये झोपायला जायचे.. मला नवल वाटलेले ते पाहून..!
घुशीला आम्ही उतळ म्हणतो >>
धन्यवाद रुपाली,
घुशीला आम्ही उतळ म्हणतो >> नवीन शब्द समजला
दोन सांगाडे होते उंदिरांचे >>> वर म्हटले तसे वास सहन होत नाही म्हणून हा मारायचा उपाय नकोसा वाटतो. पण तुम्ही राहतच नसाल आणि थेट सांगाडे उचलायला जात असाल तर हरकत नाही
किचनला कडी / कुलूप घालून दुसऱ्या रूममध्ये झोपायला जायचे.. मला नवल वाटलेले ते पाहून..! >>>> माझ्या आयुष्यात ते काही महिने आले नसते तर मलाही आश्चर्य आणि भिती वाटली असती की इतक्या दहशतमध्ये लोकं राहतात कसे?
मला दुसर्यांचे धागे ट्रोल
मला दुसर्यांचे धागे ट्रोल करायला आवडत नाहीत.
धागालेखकाने पूर्वी अनेकांचे धागे कसलाच संबंध नसताना ट्रोल केलेले पाहिलेले आहेत. लोक चिडले कि काही जण कौतुक करायला येतात. हेच लोक इतर ठिकाणी साजूक आहोत असा आव आणतात. सगळी मज्जा आहे. माझेही धागे ट्रोल केले आणि मग मी चेष्टा केल्यावर तापट प्रतिसाद आले, खुसपट काढलं म्हणून राग व्यक्त केला. आपणच ट्रोलिंग करायचं आणि आपणच चिडायचं. कसं जमतं ?
एव्हढ्यासाठी फक्त. बाकी वेळ अजिबात नाही. त्याचा गैरफायदा घेऊ नये ही अपेक्षा.
मात्र, मायबोलीवर जर एखादा मी
मात्र, मायबोलीवर जर एखादा मी अमूक तमूक याचा एव्हढा मोठा फॅन आहे असं रोज उठून २४ तास सांगत असेल तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तो व्यक्ती डोकावला पाहीजे हे माझं मत आहे. चूक बरोबर अलाहिदा. ट्रोलिंग करताना शाहरूखचा विषय आणणे हे मनापासून होत असेल तर.
नाहीतर शाहरूखखानला वेठीस धरले आहे आणि त्याच्या आडून वेळ घालवण्याचा एक कोडगेपणीचा हा टाईमपास आहे. लक्ष दिलं नाही हे पाहीजे हे पटतं, पण कधी कधी मुद्दामून आडवे जावे लागते.
शाहरूखखान हा इतका आवडीचा शब्द असता तर उंदीर घुशी सोडून शाहरूखखानकडे गाडी वळायला हवी होती. ती वळली नाही. याचा अर्थ उंदीर घुशी या शाहरूख खानपेक्षा महत्वाच्या आहेत. म्हणून याच धाग्यावर उत्तर हवे होते.
इथे उलटे झाले. लोक आली ब्याद म्हणून शाहरूख खान बद्दलच्या कमेण्ट्स इग्नोर करतात. इथे लेखकानेच इग्नोर केल्या. संपूर्ण मायबोलीने प्रत्येक कमेण्टनंतर शाहरूख खान चा विषय काढला तर ?