मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमित, तुला आवडला हे वाचून बरं वाटलं! निर्मिती सावंत ची फार चांगली भुमिका आहे ही - नेहमीच्या विनोदी भुमिकेपेक्षा वेगळी. मला फार आवडलंय तिचं काम - खूप raw खरी expressions! प्रार्थनानेही चांगले काम केले आहे.

मोक्षूचा मुद्दा अगदी बरोबर! बरंच वास्तववादी दाखवलं आहे जे पटतं.

छान लिहिले आहेस अमित.
जे दोन रुपये तू नेहमीच बुडवलेले आहेत ते न देण्याची टाळाटाळ का ? Lol पण मला दोन मिनिटे चित्रपटाचे नाव बघून जज करू नये वाटल्याने मी अर्धा तास पाहून बघितला व लिहिले, नसते आले टेंपररी उच्च विचार तर तूही पाहिला नसता. त्यामुळे दोन रुपये पुन्हा हवेत. ते देवाचे देवाला, मित्राला वालं कोड्यात शेवटी आपल्याला काही मिळत नाही तसा हिशोब.

मीही पाहणार आहे आता. Happy

ह्या पिक्चरचं नाव आणि प्राबे बघुन मी हा जन्मात लावला नसता हे अगदी खरंच! Lol
खुसपटं काढायला ही भरपूर काय्काय आहे, पण मराठी पिक्चरला तेवढी सूट देतो त्यामुळे त्यावर नंतर बोलू Proud म्हणजे बोलूच पण जरा नंतर! कोरम जमला की बोलू.

>>> कोरम जमला की बोलू.
म्हणजे कोण? मी बघणार नाहीये, सांगून ठेवते. Proud

मी, मी! कालच पाहणार होते पण मार्व्हलचा डूम्स डे जुलै मधे येत आहे म्हणून त्याचं मॅराथॉन सुरू केले आहे. डॉ स्ट्रेंज आणि थंडरबोल्ट पाहात बसले. विसरायला नकोत संदर्भ. Proud डॉ स्ट्रेंज अर्धा झाला आहे, आता अगं अगं!

आज पाहून येते, तोपर्यंत कोरम जमवू नका. जिज्ञासा आणि मोक्षू तुम्ही सुद्धा. Happy मला आवडला नाही तर गट पाडायला तुलाही पाहायला लावेन स्वाती.

कोरम जमला की बोलू.
म्हणजे कोण? मी बघणार नाहीये, सांगून ठेवते. >>> Lol

आपण ट्रेडिंग करू पाहिजे तर. मी पीएस पाहीन, तू अगं अगं पाहा.

एकंदरीत पिक्चर एवढा पण टाकाऊ नाही हे कळतंय वरच्या कमेंट्स वरून. मग नाव एवढं विचित्र का ठेवलं असावं की निम्मी पब्लिक नाव पाहूनच वाट्याला जाणार नाही !

बाप रे वरची एकदम विरुद्ध चर्चा वाचून आपण अलिकडे मराठी चित्रपट आधिपासूनच दुषित नजरेने बघतो की काय असं वाटायला लागलं आहे.

मग नाव एवढं विचित्र का ठेवलं असावं की निम्मी पब्लिक नाव पाहूनच वाट्याला जाणार नाही ! - विकी म्हणतोय ५० दिवस चालला.
तेव्हा आपण निम्म्याहून शिम्म्या पब्लिकमध्ये मोडतो.

कोरम जमला की बोलू.>>>>>
मग चर्चा करताना लिहा..
अग्ग अग्ग अमुकतमुक...
काय म्हणता अमुकतमुक....

केला पूर्ण. धन्यवाद मोक्षू आणि जिज्ञासा. Happy

नंतर आधीसारखा नाही आणि एंगेजिंग व वास्तववादी वाटला. निर्मिती सावंतचे काम, हावभाव, हळदीकुंकवाला जाऊन अपमानास्पद वागणूक मिळाल्यानंतरचे हावभाव, प्रार्थनाला मेनॉपॉज बद्दल सांगताना वगैरे सीन्स आवडले. एवढ्या प्रचंड दुःखानंतर वेड लागायची पाळी येईल तरीही त्या जमेल तसं पडत, रखडत पुढे जात राहतात. मी माझ्या आयुष्यात एकदम झालेले दोन मृत्यू दोनदा अनुभवलेले आहेत. त्सुनामी येऊन सगळं बरबाद झाल्याचा अनुभव असतो. बॅनरचा अपघात फारच फ्रिकी आहे, पण तशा बातम्याही वाचलेल्या आहेत. माझ्या आजोळी माझे दोन चुलत मामा वीज पडून गेले होते, संयुक्त कुटुंब असल्याने एकत्र जांभळं खायला गेलेले चुलत भाऊ. माझ्या आजोळी जांभूळ खात नाहीत तेव्हापासून. जांभळाच्या झाडाखाली पाऊस आला म्हणून थांबले तर त्यावरच वीज पडली होती. तरूण, दांडगे होते दोघेही. बैलगाडीत प्रेतं मावत नव्हती असं मला सांगितलं माझ्या मामीने. माझी चुलतमामी एक्सेप्शनली बुद्धिमान आणि धीट तरीही प्रेमळ आहे. आम्ही खूप क्लोज आहोत. त्यामुळे माझ्या मनावर या घटनेचा परिणाम झाला आहे. फ्रीकी अपघात असल्याने मला हेच आठवलं ते पाहताना. त्यामुळे मला याचा इंपॅक्ट माहिती आहे. चित्रपट टीमने मोठी हिंमत दाखवली आहे असे सगळे दुःख आणि अपयश दाखवून.

प्रार्थना फार उग्र दिसते/ वावरते, तरीही तिचं कामही बरंच चांगलं झालं आहे. सततच्या अपयशाने त्या खचतात व बाहेरही निघतात कसंबसं ते एकदम रिलेटेबल. काहीही चांगले न घडणे तरीही तुम्ही जसं जमेल तसं जगत राहाणं एकदम रिलेटेबल. कोर्ट केस तरी जिंकून थोडा आशादायी शेवट केला असता तर आवडलं असतं पण त्याने वास्तवाला तडा गेला असता. सामान्य माणूस कुठे बिल्डरच्या विरूद्ध जिंकणार! मला उळ्ळोळ्ळुकची आठवण आली थोडी. पण तरीही बराच वेगळा आहे. चित्रपट चांगला आहे पण आवर्जून दुःखाचा कडेलोट पाहायची तयारी ठेवून बघावा लागेल. नाही पाहिला तरी चालेल आणि पाहिला तरी. Woman to woman - The truth is if she embodies peace, she is most likely skilled at war !

आता Proud
अमलताशमधे अमोल होता तसा येथे अमित आहे. बॅकअप प्लॅन Rofl काही जमलं नाही त्या वकीलाला, केस हारलेच शेवटी. वर "आन्टी आन्टी" म्हणत होता निर्मितीला. काकू म्हणायला काय धाड भरली!

युट्युबवर ओवा नावाचा सिनेमा पाहिला (का? असंच) Proud

मकरंद अनासपुरेने गंभीर भुमिका केली आहे. पण मधेच एकदम तो त्याच्या टिपिकल स्टाईल मधे हसेल असं बर्‍याचदा वाटून गेलं.
त्याची बायको झालेली कोणीतरी अ‍ॅक्ट्रेस आशा काळे टाईप्स आहे. बहुतेक तो काळ तेव्हाचाच आहे (गजरा आणणे, टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकणे). पुढे मॉडर्न काळातही ती तशीच राहते, वागते.

हां तर मक्या एकदम तुसडा, विक्षिप्त माणूस असतो (आजकालच्या भाषेत टॉक्सिक) तो म्हणेल तसंच होणार घरात, त्याची शिस्त, बायको मुलाला काही मत किंमत नसणे वगैरे वगैरे.

या तुसड्या माणसाला एका पावसाळी संध्याकाळी भजी खायची ईच्छा होते, बायकोला फर्मान सोडतो आणि स्वतःसाठी दारूचा ग्लास भरतो. भजी खातेवेळी लक्षात येतं यात ओवाच नाही घातलाय. झालं ताटली देतो भिरकावून भज्यात ओवा पाहिजेच. बायको भर पावसात कुठून शेजारपाजारून ओवा आणायला जाते आणि गायबच होते ३-४ दिवस. याला दुसर्‍या दिवशी सकाळी लक्षात येतं बायको आलीच नाहीये. मग शोधाशोध, कित्येक वर्ष कोणत्या नातेवाईकाशी संपर्क नसतो, कोणी मित्रमैत्रिणी नाहीत. अचानक सगळ्यांना फोन करायला लागल्यावर सगळे बच्चन द्यायला लागतात त्याला. वैतागून तो फोन ठेवतो, पोलिस कंप्लेंट करतो. असेच ४ दिवस जातात. मधेच एक ट्विस्ट दिलाय बळंच, त्याच्या ऑफिसातला डुख धरून असलेला सहकारी निनावी फोन करायला लागतो, बायको माझ्याकडे आहे, इथे अमक्या ढमक्या वेळेत ये, तिथे ५ मिनिटं उशिरा पोचतो तर सहकारी निघून गेलेला असतो, कारण मक्या वेळ पाळत नाही. दुसर्‍यांदा सांगतो लवलेटर लिही बायकोला, बघू कसा लिहितो, मक्या पत्र लिहितो पण तेही काय त्या सहकार्‍याला आवडत नाही, म्हणतो बिलकुलच प्रेम दिसत नाही तुझं बायकोवर. कसं कळलं त्याला देव जाणे, मग त्याचा फोन ट्रॅप होऊन पोलिस त्याला पकडतात पण त्याच्याकडे मक्याची बायको नसतेच. तो उगीच पुर्वीचे उट्टे काढत असतो.

या सगळ्यात मक्याला शेजारची मुलगी येऊन खाणं वगैरे देऊन जात असते आणि म्हणते तुमच्याबद्दल लोक बोलतात ते खरं नाही, तुम्ही तुसडे नाही. चांगले आहात.

हळू हळू कट टू परिवर्तन.. बायकोची आठवण, मी असा वागलो तसा वागलो, शेवटी ताप येतो (डोक्याचा नाही अंगातला) आणि उपरती होते!
तो म्हणत असतो शेजारच्या मुलीला....ताप म्हणे बहुतेक माझ्या डोक्यात गेलाय... मला समोर बायको दिसतेय असं म्हणता ती दारात खरंच उभी असते.
आनंदून शेजारची आलेली मुलगी म्हणते मी भज्या तळायला घेते, बायको म्हणते हो पण ओवा घाल बरं का... त्यावरून तर एवढं सगळं रामायण झालं.
सिनेमाचं नाव तेवढ्यावरून ओवा ठेवलंय का ती त्याच्या जिवनात ओव्यासारखी वगैरे प्रतिकं शोधली नाहीत मी पण असोच! टाईमपास झाला माझा Lol अरे हो आणि ती शेजारची मुलगी त्या बायकोला आवडते आणि तिला सून करून घ्यायचं असं ठरवतात. ओव्याची कहाणी सुफळ संपुर्ण!

पाहिलास का! Happy
तो सासरा आणि नवरा मला अजिबात आवडले न्हवते. फार ओव्हर एक्सपोज ते ओव्हरअ‍ॅक्टिंग करत होते. राजन भिसे अगदी कॅज्युअल बेपर्वा वागणं म्हणजे अभिनय समजतो मला वाटतं. बेपर्वा माणसं मला अजिबात आवडत नाहीत. ते लवकर गचकल्याचा मला आनंद झाला.

इथलं वाचुन स्कूटरवर बसल्यापासून मी त्यांच्या मरणाची चातकासारखी वाट बघत होतो. आधी गबाळा शर्ट आणि खिखि हसू घेत कॅज्युअल भिसे आले आणि चातकाला पावसाने भुरळ घातली. म्हटलं घसरले स्कूटर वरुन आणि मागे ट्रक खाली चेंदामेंदा. तर हे वडापाव खात बसले. तो वडापाव इतका डीटेल मध्ये एकेक घास घेत खाल्ला की म्हटलं आता फूड पॉयझनिंग! पण तो वडापाव खाताना दर १० व्या सेकंदाला कॅमेरा त्या होर्डिंग वर गेल्याने हेच डोक्यात येणार याची खात्री पटली. ते इतकं मरतुकडं होर्डिंग होतं, इतकं उंच पण न्हवतं, पण एआयने उंच आणि भव्य करायचं बजेट नसणार. ते होर्डिंग इतक्यांदा दाखवलं की माझा त्यावरच्या जाहिरातीचा मजकुर पाठ झाला.
सासरा आणि नवराच व्हिलन होते. बायका व्यवस्थित वेगवेगळं सुटसुतीत राहू करत असताना हेच दोघे गळ्यातली धोंड होते, बरं झालं गेले.

शेवट टिपिकल आशादायी नाही केला तेच आवडलं. मराठी आशादायी शेवटांचा मला उबग आलेला आहे. पण जो शेवट केला तो ही सस्टेनेबल आशादायीच होता की! परत लग्न करणार नाही, का? तर प्रेम संपलं, आठवणी वगैरे नाही तर कशाला परत अर्धांगिनी बना! असाच अ‍ॅटिट्युड.!! एकदम बेस्ट!

प्राबेला क्लोजर लगेच मिळालेलं. निसा आधी रंगित साड्या, मंसू/ दागिने, कुंकू लावून मग लंकेची पार्वती बनून परत पूर्वपदावर येते ते ही आवडलं. तिला केस हरल्यावर पूर्ण क्लोजर मिळालं. आधी ही हळूहळू मिळतच होतं. पण केस हरल्यावर क्लोजर हा विरोधाभास मला भावला.

प्राबेचा अन-अपोलोजेटिक, मॉडर्न, ठाम आणि पॉझिटिव्ह रोल प्रेक्षकांनाही पॉझिटिव्ह प्रकाशातच दिसेल याची विचारपूर्वक मांडणी मला सर्वाधिक आवडली. ती दारूचा आसरा घेते ते किती छान दाखवलं आहे!! इट डिड काईंडा हेल्प्ड हर, पण त्यात अडकुन वगैरे ही पडत नाही. दारू == व्यसन असं नाहीच होत खर्‍या आयुष्यात. मराठी काकूबाई नसलेली सून ही घरभेदी पाताळयंत्रीच असते. जर समोर संस्कारी इ. सासू असेल तर मग विचारू नका इतकी! पण तो कॉन्ट्रास्ट असतानाही मराठीत ते केलेलं नाही हे किती आपलं सौभाग्य!

शेवटच्या तीन परिच्छेदांसाठी अगदी, अगदी. आपण जसं बोलू वागू अगदी तसेच संवाद आहेत प्राबेचे.

इथलं वाचुन स्कूटरवर बसल्यापासून मी त्यांच्या मरणाची चातकासारखी वाट बघत होतो >>> Lol मी पण. त्यासाठीच तर केला अट्टाहास. मग मला वाटलं मी किती विकृत आहे. Proud मला राजन भिसेचा तुझ्याइतका राग आला नाही. ते दोघे महत्त्वाचे नव्हतेच असेही. तिचा नवरा तर मला लक्षातही नाही.

सासरा आणि नवराच व्हिलन होते. बायका व्यवस्थित वेगवेगळं सुटसुतीत राहू करत असताना हेच दोघे गळ्यातली धोंड होते, बरं झालं गेले.>>>> Lol पुरुषच खरे व्हिलन आहेत अनादी काळापासून.

ओवा का ? कढिपत्ता सुद्धा दिसला. सगळे मसाले आहेत. Happy

पण ती बायको गेलेली कुठे?
तिला ओवा मिळाला का?
कुठे मिळाला? इतका वेळ का लागला? याची उत्तरं शेवटी मिळतात का? का बायकोची किंमत कळायला ओवा हे निमित्त करुन त्यावरुन सिनेमाचं नावच ओवा ठेवलंय, असं खरंच अचाट काही आहे? का?

भज्यांमध्ये नाही ओवा
डब्यातला संपे ओवा
ध्यास ओवा! श्वास ओवा!
बास ओवा!! बास ओवा!!

औआ औआ... ओवा ओवा!
इसे गाया है भप्पी लेहरीने और सजाया है शंकर जयकिशनने!

याची उत्तरं शेवटी मिळतात का?> >>>>>>>>>> हो
पण ती बायको गेलेली कुठे?>>>>> कोणाला बघायचा असेल तर स्पॉयलर्स नको म्हणून लिहिलं नाही Lol

बायकोची किंमत कळायला ओवा हे निमित्त करुन त्यावरुन सिनेमाचं नावच ओवा ठेवलंय, असं खरंच अचाट काही आहे? का?>>>>>>>>>>> मला तरी असाच अर्थ लागला.. नाहीतर पोटदुखी (नवरा) ओवा वगैरे असं काही असेल वाटलेलं Lol

औआ औआ... ओवा ओवा!>>>>>>>>>>> आवराच Rofl

बाबो ! अग अग सूनबाईचे इतके कौतुक ? इतके डायरेक्शण दिसले? पार सैराटच करून टाकलाय की तुम्ही आता. इतका आग्रह नका बै करु.

आता थांबायचं नाय - पाहिला. खूप आवडला. अमितलाही रेको दिला होता. आता येईलच तो Proud

ऋ चा यावर धागा होता पण नंतर हा ओटीटीवर यायला इतका वेळ लागला की पूर्ण विसरून गेले. नक्की पहा. खूप छान सिनेमा आहे. चौथ्या दर्जाचे सफाई कामगार, ड्रेनेज साफसफाई साठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे लोक यांना मध्यवर्ती घेऊन सिनेमा बनवला आहे. सगळ्यांचीच कामं खूप छान झाली आहेत. भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांचे विशेष आवडले. भरत जाधव जीव तोडून काम करतो, असे लोकच आवडायला लागतात. त्याने तरूण मुलगा गमावलेला जरा वयस्क बाप, ज्याच्या स्वतःच्या नोकरीचा भरवसा नाही, तरूण सुनेला कामाला लावून घरी बसणं पटत नाही, नातवाला द्यायला वेळही नाही आणि पैसाही नाही. सगळं आयुष्य गरीबीत आणि अधांतरी गेलेले - या सगळ्याची चिडचिड, तगमग चांगली दाखवली आहे.

सिद्धार्थ जाधव अतिशय प्रेमळ नवरा, मुलगा व गोड मुलीचा हळवा बाबा आहे. गुणी मुलीला शिकवण्याची धडपड, स्वतः आठवी नापास, तीन नोकऱ्या तरीही चणचण. खूप चांगले हळवे क्षण आहेत. चाळीतले, झोपडपट्टीतलेच आयुष्य. कुणाचाच आधार नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी सतत तणावाखाली, आत्मविश्वासशून्य झालेली अवस्था. असेच सगळे दहा बारा जणं त्यांच्या बॉसच्या सांगण्यावरून रात्र शाळेत जातात. यापैकी कुणीही दहावी पास नसते.

आशुतोष गोवारीकर फारच इंप्रेसिव्ह आणि प्लेझंट वाटला. समाजसेवेचा आणि एकंदरीत इतरांच्या संघर्षाची जाणीव असलेला मोठा माणूस म्हणून प्रामाणिक वाटला. उगाचच जास्त सुधारकी आव नाही तरीही वास्तववादी आणि स्ट्रेटफॉरवर्ड. आई म्हणून रोहिणी हट्टंगडी पण भावली.

प्राजक्ता हणमगरचे कामही खूप मस्त आहे. सगळे स्वच्छता कामगार दिवसभर कष्ट करून रात्रशाळेत जाऊन दहावी पास होतात याची कथा. दिवसाचा संघर्ष आणि रात्रीची जिद्द दोन्ही आवडले. छोट्या छोट्या गोष्टी जसं जपानी माणसाला आपल्या ड्रेनेजचे सिस्टीम समजावून सांगताना झालेले ततपप पण त्यानीही मलाही इंग्लिश येत नाही म्हणून समजून घेणे. गोवारीकरने यांना त्या मिटींग मधे सहभागी करणे, त्यांच्या मताला व अनुभवाला किंमत देणे वगैरे आवडले. तेव्हा हॅंड शेकसाठी हात पुढे करण्याआधी भरत जाधव वारंवार शर्टला हात पुसताना दाखवला आहे.

स्वच्छता कर्मचारी आपल्यासारखेच स्वच्छ असतात एरवी. त्यांची स्वप्नं, आशा, आकांक्षा सगळ्या सामान्यांसारख्याच असणार. पण समाजात सतत अदृश्य राहिल्याने एक न्यूनगंड आलेला देहबोलीतून दाखवला आहे. जे एकदम सटल आहे. कुठेही लाऊड नाही. शिक्षणाचं महत्त्व वगैरे सगळं अंधूक होणं फेअर वाटावं इतक्या रोजच्या विवंचना यांना. आपल्याला ज्या गोष्टी सहज मिळतात व म्हणून आत्मविश्वास येतो. त्या गरजा सुद्धा पूर्ण झालेल्या नसतात यांच्या. त्या दुष्टचक्रात अडकलेले लोक. त्यांचे हे आपल्यासाठी फार मोठे न वाटणारे पण प्रतिकूल परिस्थितीत डोंगराएवढे होऊन बसलेले दहावी पास व्हायचे स्वप्न पूर्ण होते. आवडला. एकदम सकारात्मक, प्रेरणादायी, वेगळ्या जगाची ओळख करून देणारा - कुठेही अतिरंजित वाटला नाही. ओम भुतकर शिक्षकाच्या भुमिकेत छान वाटला आहे. वैदिक गणित नावाच्या पुस्तकातल्या टिप्स वापरून गणित शिकवलं असं मला वाटलं. त्याचे व पर्ण पेठे दोघांचेही काम खरे वाटते. साधा सरळ तरीही काही आवंढ्याचे क्षण देणारा आणि तरीही करमणूक करणारा चित्रपट आहे.

आलोच! Proud

अस्मिताच्या सगळ्या पोस्टला +१.
मराठीत असे सामाजिक समस्यांवरचे सिनेमे एकतर प्रचारकी असतात, किंवा अन्यायग्रस्त लोकांनी उठवलेला आवाज, मालकशाही मुर्दाबाद, शह-काटशह आणि शेवटी सत्याचा झालेला विजय अशा काही टेम्प्लेटचे असतात. चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या समस्या या मॅटर ऑफ फॅक्ट दाखवत त्याचा फील-गुड सिनेमा होऊ शकतो हेच माझ्यासाठी नविन होतं. अनेक क्षणी आवंढा ते डोळ्यात पाणी येणे झाले.

भरत जाधव असं काम करू शकतो हा सुखद धक्का होता. तो पूर्ण वेळ काहीसा सिनिअर सफाई कामगार, चाळीत रहाणारा टक्के टोणपे खाल्लेला, जीवनाचे तत्त्वज्ञान कोळून प्यायलेला, तरुण पोरगा गमावलेला, सुनेशी आणि नातवाशी जवळीक साधायची इच्छा असलेला पण तरी चाळीत गॅलरीतच अंतर ठेवून रहाणारा, समंजस पण तरी नो-नॉनसेंस असा मंचेकर जगला आहे. भूमिका जगला आहे वगैरे क्लिशे वाटेल पण यात भरत जाधव कुठेच दिसत नाही. फक्त सखाराम मंचेकरच दिसतो. अक्षरशः सोनं केलं आहे भूमिकेचं.
दीपक शिर्के खूप वर्षांनी दिसला. मला रात्र आरंभच आठवला. त्याला बघुनच माझ्या तोंडावर हसू आलं. कनिष्ठ मव. पापभिरू बाप.. असे काका मामा लोक बघितलेले आहेत मुंबईत.

या सगळ्या प्रवासात समस्या येत नाहीत असं नाही. पण युनिअन लीडर बनू पहाणारा नवा नेता हा माईल्डली स्वार्थी आहे पण टोकाचा व्हिलन नाही, राजकारणी ही टोकाचे प्रकार करत नाहीत. आयुक्त चांगलाच आहे पण तो थोडं आऊट ऑफ द वे करतो पण ओव्हरअ‍ॅक्टिंग करत सुटत नाही. सून नवं नातं जोडू पहाते, त्याला मंचेकर माफक अनकंफर्ट दाखवतो पण मराठी सिरिअल सारखा विरोध करत नाही, अ‍ॅक्सेप्ट करतो. फील गुड तरी वास्तवाशी नाळ पूर्ण तुटू न दिलेला असा सिनेमा वाटला.
मला ही खूप आवडला. रिफ्रेशिंग आहे!
मुंबई आहेच, ओसंडणार्‍या कचराकुंड्या, तुंबलेली गटारं ही आहेत, पण जे आहे ते असं आहे!

Pages