१ ली पासून हिंदीसक्ती कशासाठी? महाराष्ट्राच्या हिंदीकरणाचा डाव?

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 19 April, 2025 - 13:00

सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत!
-महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का?
- उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का?
- ⁠२२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय?
- ⁠हिंदीचा नी महाराष्ट्राचा संबंध काय?
- ⁠हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का?

संघटनांच्या मागण्या:-

१. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती केवळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच एक राज्यभाषा असून तिची सक्ती करणे अयोग्य आहे.

२. राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात: महाराष्ट्राची ओळख ही स्वतंत्र मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरेशी निगडित आहे. अन्य राज्यातील भाषा लादणे हे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल.

३. शिक्षणाचे ओझे वाढवणारा निर्णय: पहिलीपासूनच तीन भाषा सक्तीने शिकविणे बालकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी अयोग्य व अन्यायकारक ठरेल.

४. मराठीतील बोलीभाषांना सरकारकडून प्रोत्साहन नाही: मराठीच्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासन काहीही प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैवी आहे.

५. स्थानिक विद्यार्थ्यांवर स्थलांतरितांचे भाषिक वर्चस्व लादले जात आहे, ज्यामुळे स्थानिक भाषिक विद्यार्थ्यांचा अधिकार आणि संधी हिरावली जाऊ शकते.

६. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा चुकीचा अर्थ: त्रिभाषा सूत्र हा प्रशासनापुरता मार्गदर्शक आहे; त्याची सक्ती शालेय शिक्षणात लादणे अन्यायकारक आहे.

७. भाषिक स्वायत्ततेचा संपूर्ण अभाव: प्रत्येक राज्याला त्याच्या भाषिक गरजेनुसार शिक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या दबावाखाली घेतलेला निर्णय हे राज्याच्या स्वायत्ततेचे उल्लंघन आहे.

त्यामुळे, आम्ही खालील मागण्या आपल्यास सादर करीत आहोत –

१. राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.

२. या निर्णयाच्या रद्दबाबत तात्काळ शासन आदेश किंवा स्पष्ट परिपत्रक निर्गमित करावे.

३. सदर बाबीबाबत शालेय शिक्षण संचालनालय, शिक्षण आयुक्त, शिक्षण मंडळ, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या यांना स्पष्ट सूचना द्याव्यात.

४. बालभारतीसह इतर सर्व पुस्तक छपाई केंद्रे व मुद्रण विभागांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हिंदी सक्तीबाबत कोणतीही योजना राबवू नये, याबाबत स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात.

५. यापुढील अभ्यासक्रम नियोजन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडीचा संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावा, कोणतीही सक्ती करू नये.

६. त्रिभाषा सूत्राचे पालन हे राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने व ऐच्छिक स्वरूपात मर्यादित ठेवावे.

७. राज्यातील मराठी बोलीभाषा, लोकपरंपरा व स्थानिक संस्कृती यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करून स्थानिकतेला प्राधान्य द्यावे.

८. सदर निर्णयामुळे निर्माण होणारा संभ्रम, असंतोष आणि प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी त्वरित ठोस कृती करण्यात यावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>इंग्रजी ऐच्छिक समजू शकतो. ज्याला गरजच नाही असे वाटेल तो नाही शिकणार.
पण गुजराती कश्याला हवी आहे तुम्हाला? ?||>> ऋन्मेष ... जोक सम झा करो दोस्त

मी सुद्धा गंमत केली ओ..
मला तो उपरोध समजलेला.
कधी मी केला तर मला असेच प्रतिसाद येतात आणि नंतर मी सांगितले की तो उपरोध होता तर पलटी खाल्ली असे म्हणतात. म्हणून म्हटले चला आज आपण गंमत करूया Happy

तसेही यामागे जे राजकीय अँगल आहेत त्यात मी पडत नाही. मी सामान्य माणसाच्या नजरेतून त्याच्या भल्याचे काय इतकाच विचार करतो.

आपल्या देशाला एक राष्ट्रभाषा नाही ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. इस्रायल हा देश स्थापन होताच त्यांनी हिब्रू ही राष्ट्रभाषा स्वीकारली आणि आज तो देश एक राष्ट्र म्हणून किती सशक्त आणि समर्थ आहे, हे सांगायला नको. हिंदी ही भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. बहुसंख्यकांना ती कळते. म्हणून तीच आपली राष्ट्रभाषा असली पाहिजे. हिंदी राष्ट्रभाषा केली आणि सगळ्यांनी शिकली की आपला राष्ट्रवाद भक्कम होईल.

गुजरात ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत जे काही उद्योग आले ते गुजरात्यांमुळे आले. देशातल्या सर्वांत ४ शक्तिशाली व्यक्ती गुजराती आहेत. सगळ्यांनी गुजराती शिकली की भारत लवकरच तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल.

संस्कृत हा आपल्या संस्कृतीचा पाया आहेच. तिचा पाया शास्त्राधारित आहे. नासा संस्कृतमध्ये कोडिंग करते. शिवाय आपली धार्मिक स्तोत्रे इत्यादि संस्कृतमध्ये आहेत.

मराठी बोलण्यापुरती शिकली तरी पुरे आहे. हिंदी आणि मराठीची लिपी एकच असल्याने मराठी लिहा-वाचायला वेगळं शिकायची गरज नाही.
शाळेत मराठीची फक्त तोंडी परीक्षा घ्यायची. पहिलीत जय भवानी जय शिवराय पासून सुरू करायचं. मनाचे श्लोक, गणपतीची आरती पुढे कधीतरी महाराजांची गारद. मग दहावीत जयोस्तुते. एवढं मराठी पुरेसं आहे.

शिवाय आणखी मराठी शिकून उपयोग काय? मेलेल्या महान लोकांच्या जयंत्या मयंत्या करतात, तसं २७ फेब्रुवारीला गर्व से कहो हम मराठी है म्हणायचं आणि दुसर्‍या मराठी अभिमान दिनी म्हणजे ज्या दिवशी मराठी अभिजात भाषा घोषित झाली, त्या दिवशी तिला आदरां जली वाहायची.

आता इंग्रजी शिकूनही उपयोग नाही. ट्रंप इतर देशांतून आलेल्यांना परत पाठवतोय. जगभरात असेच राष्ट्रवादी विचारांचे लोक सत्तेवर बसतील, तेही तेच करतील.

वैद्यक अभियांत्रिकीचा अभ्यास हिंदीतून शिकवायला सुरुवात झालीच आहे.

भारताबाहेरच्या लोकांशी संवाद साधायची वेळ आली तर ए आय वापरून अनुवाद करायचा.

मराठी तरुण तरुणींना हिंदीत स्टार व्हायचं असेल तर नुसतं हिंदी चांगलं येऊन य उपयोग नाही. त्याची गरजही नाही. चांगलं हिंदी बोलणारे मनोज वाजपेयी, आशुतोष राणा हे काही स्टार नाहीत. जे स्टार आहेत, ते इतर वेळा इंग्रजीत बोलतात. त्यांचे पुरस्कार समारंभ सुद्धा इंग्रजीत असतात.

मराठी तरुण तरुणींनी बॉडी बनवण्यावर लक्ष दिले पाहिजे. तसंच शरीरप्रदर्शन करायला कचरता नये. शाहरुख, सलमान, अमीर ते रणवीर ,रणबीर , जॉन , अगदी इब्राहिम पर्यंत सगळ्यांनी आपली बॉडी मिरवली आहे. खरं तर सुबोध भावे, स्वप्नील जोशी, संतोष जुवेकर हे कोणत्याही हिंदी स्टारला अभिनयात भारी पडतील. पण त्यांची बॉडी नाही. मराठीत चांगल्या बॉडीचे अ‍ॅक्टर नाहीत , त्यामुळे त्या अंकित मोहनला किती भाव आहे!
संतोष जुवेकरने छावासाठी किती मेहनत केली. घोड्याशी , ढालतल वारींशी बोलायचा आणि मुगल रंगव णार्‍या अभिनेत्यांकडे बघायचाही नाही. विकीने काहीही मेहनत केली नाही. उलट त्याच्यासमोर बसायचं नाही वगैरे मेहनत इतरांनी केली. आणि कौतुक होतं विकीचं. मराठी चॅनेल्स आणि यु ट्यूबर्स संतोषच्या मुलाखती घेतात, पण हिंदीवाले त्याच्याकडे बघतही नाहीत.

बंगाल मधे सुद्धा खूप जणांना हिंदी येत नाही. त्यांच्या कडे प्रखर विरोध वगैरे नाही. पण अडचण इतर भाषा शिकण्याची आहे.
आपल्यापुढे जो बंगाली मनुष्य येतो तो इतर कुठल्याही प्रांता / भाषे प्रमाणे प्रगत माणूसच असतो. इतरांपैकी बहुतेकांचे हातावर पोट असते.

हावडा इथे एका कॉलेजातले समीर बेरा नावाचे एक हिंदीचे प्राध्यापक आहेत. त्यांचे स्वतःचे म्हणणे आहे कि हिंदी बंगाली मुलांना जड जाते.
इतकंच नाही तर खुद्द हिंदी बेल्ट मधेही हिंदी शिकायला जड जाते. कारण जी हिंदी आपण हिंदी समजतो ती बहुसंख्यंकाचीं भाषा नाही.
हिंदी बेल्टच्या राजकारणासाठी (कसं ते मला माहिती नाही) हिंदी सदृश्य बोलींना सुद्धा हिंदीच ठरवले गेले आहे.

यात मैथिली, भोजपुरी, अवधी , बाघेली, चंबेली, मगधी, गढवाली (उत्तराखंड), खडी बोली ( महाराष्ट्रात सुद्धा बोलली जाते), ब्रज, बागडी (बागदी / बागची ), पहाडी, कुमाऊंनी तसेच राजस्थानातल्या भाषा (मारवाडी, राजस्थानी) अशा सर्व भाषांना हिंदी ठरवले गेले. राजस्थानने तर हिंदीशी जवळीक नसताना प्रथम भाषा हिंदी स्विकारल्याने ते हिंदी बेल्टचा हिस्सा झाले.

हरियाणवी ही स्वतंत्र भाषा आहे. पण त्यांनीही प्रथम भाषा हिंदी स्विकारल्याने ते हिंदी भाषी राज्य झाले.
या भाषांची हिंदीच्या सक्तीने गळचेपी झाली आहे. या सर्व भाषिक राज्यांनी त्या वेळी काही तरी लाभासाठी तडजोड केली. त्यामुळे हिंदी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असे चित्र बनले.

बेरा यांच्या मते तमिळ नंतर बंगाली ही सर्वाधिक लोकांकडून ( एकजिनसी भाषा) बोलली जाणारी भाषा आहे.
मी त्यांना महाराष्ट्राची लोकसंख्या बंगाल पेक्षा जास्त आहे हे सांगितले. त्यांचे म्हणणे असे कि मराठी पण सर्व महाराष्ट्राची भाषा नाही.
ते बोलीला भाषाच मानतात.

जे स्टार आहेत, ते इतर वेळा इंग्रजीत बोलतात. त्यांचे पुरस्कार समारंभ सुद्धा इंग्रजीत असतात.
>>>>>

शाहरुख आणि अमिताभ हे बॉलीवूडच्या इतिहासातील दोन सर्वात मोठे सुपरस्टार आहेत. त्यांना मी जास्तीत जास्त वेळा हिंदीतच बोलताना पाहिले आहे. किंबहुना म्हणूनच ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि कनेक्ट होतात. जर इंग्लिशचाच हट्ट धरला तर केवळ वरच्या सर्कल पुरते उरतील. मासशी कनेक्स्ट होणार नाहीत.

इतकंच नाही तर खुद्द हिंदी बेल्ट मधेही हिंदी शिकायला जड जाते. >>
हे एकंदरीतच बोली हिंदी येणे आणि हिंदी शिकणे या बाबत खरं आहे. पाचवी पर्यँत बऱ्यापैकी हिंदी येत असे सर्वांना.
चित्रपट, गाणीबऱ्यापैकी कळत असत कठीण शब्द वगळता.
पण बोली हिंदी वेगळी आणि पुस्तकातील हिंदी वेगळी. हिंदी मासिके, वर्तमानपत्र वाचणे कंटाळवणे वाटे. त्यात हिंदी विषयाची पुस्तके काही थोडीफार मजेदार धडे, कविता वगळता रटाळ वाटत, शुद्ध हिंदीमुळे. हिंदीत चांगले मार्क्स मिळवणे अवघड असेच. शाळेत हिंदी शिकुन काही खास फायदा झाला असे वाटत नाही.
मै, है असे शाळेच्या पुस्तकात वाचून तर आधी आपण मय्, हय् करतो तो चुकीचा आहे असे वाटले आणि मराठी दोन मात्रा प्रमाणे मै, है करू लागलो. मग कळले की दोन मात्रांचा उच्चार अय् असा करायचा. या व्यतिरिक्त शाळेत काय हिंदी शिकलो पाचवी ते दहावी आठवत नाही, काही दोन तीन कविता आणि काही धडे वगळता.

भरत ह्यांच्या वरील दोन्ही पोस्ट ला अनुमोदन.
आपण हिंदी जागतिक भाषा बनवण्याचे प्रयत्न करायला पाहिजेत.
सुरवात करुया क्रिकेट पासून. नाहीतरी क्रिकेट खेळणारे सर्व देश आपले मिंधे आहेतच. ते लगेच हिंदी ही त्यांच्या त्यांच्या देशाची राष्ट्र भाषा करून टाकतील.

शिक्षण क्षेत्रात बर्‍याच नव्या गोष्टी होताहेत. जसं स्टेट बोर्ड पण सीबीएसई प्रमाणेच चालणार.अभ्यासक्रम आणि वार्षिक वेळापत्रकही तसंच.
शिवाय कॉलेजात उदा: आर्टसच्या विद्यार्थ्यांना गणित आणि सायन्स वाल्यांना इतिहास शिकता येतो. याबद्दल कोणाचे काही अनुभव?

भरत,
तुम्ही तर आज अगदी फुल्ल फॉर्म मध्ये आहात Lol

आपण हिंदी जागतिक भाषा बनवण्याचे प्रयत्न करायला पाहिजेत.
>>>>>

हे actually करायला हवे.
आपसात भारतीय भाषांना विरोध करत भांडण्यापेक्षा आपली एक भाषा निवडून तिला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देऊन भारताची भाषा म्हणून जगासमोर तिची ओळख ठेवायला हवी.

हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हे ऐकतच लहानाचे मोठे झालों. हल्ली मात्र तिला विरोध करायचे खूळ कुठून आले हे समजत नाही.

प्रत्येकाला आपल्या भाषेचा आणि प्रांताचा अहंकार जपत बसायचा असेल तर एक राष्ट्र म्हणून आपण अपयशीच ठरणार. त्यापेक्षा सगळे राज्ये वेगवेगळे देश घोषित करा, त्या त्या राज्याची भाषा ही राष्ट्रभाषा बनवा आणि नांदा सुखाने.

पण बोली हिंदी वेगळी आणि पुस्तकातील हिंदी वेगळी. हिंदी मासिके, वर्तमानपत्र वाचणे कंटाळवणे वाटे. >>> टोटली. लेखी हिंदी वाचायला खूप बोजड वाटते. पण हिंदीच्या विविध बोली ऐकायला फार छान वाटतात. पण शाळेत पाचवीपासून आहे ते ठीक आहे.

भरत Lol

भरत Lol
हिंदी वाचनाची आणि आकलनाची गती इंग्रजीपेक्षाही मंद असल्याने हिंदी कळत असूनही गोडी लागली नाही. वाचायला सुचवा काही म्हटले की एकदम 'प्रेमचंद' वगैरे च ऐकलं. मराठी नंतर इंग्रजीच सुचते आता. विचारही मिंग्लीशमधेच केले जातात. लिहिताना मात्र वळवून प्रमाण मराठी लिहिले जाते. बोलताना येत नाही. चित्रपट बघताना मात्र हिंदी सारखी मजा कुठेच येत नाही. बरं इंग्रजी तरी उत्तम आहे का नाही, व्याकरणाच्या चुका होतात. प्रमाण मराठी तर कधी कानावरच पडले नाही, त्यामुळे तेथेही शब्दच माहिती नाहीत. आठवीत हिंदी सोडून संस्कृत घेतले आणि पुढे अकरावीला सायन्स घेऊन दोन्ही विसरले. असं काही तरी वेगळंच होऊन बसलंय. सगळंच आपलं म्हणून गप बसायचं.

त्रिभाषा सूत्रांनुसार इंग्रजी , हिंदी आणि गुजराती अश्या तीन भाषा शिकव्यावात. इंग्रजीने जागतिक स्तरावर पोट भरेल, हिंदी मुळे राष्ट्रीय स्तरावर प्रगती होईल आणि गुजराती मुळे बेपार करायला सोपे जाईल. तसेही काही वर्षात महाराष्ट्राची अधिकृत भाषा गुजराती होणार आहेच . आतापासूनच मुलाना शिकवले तर बरे पडेल

मी अजून एक अनुभव शेअर करतोय- मी 2010 साली बंगलोरमध्ये एका स्टार्ट-अप मध्ये ऑपरेशन्स बघत होतो. माझ्या टीममध्ये एक पंजाबी आणि एक राजस्थानी मुलगी होती. पंजाबी मुलगी डेंटिस्ट तर राजस्थानी मुलगी एमबीबीएस डॉक्टर होती. एके दिवशी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आम्ही जवळून डोसा मागवला होता. तो डिलिव्हर झाल्यावर डिलिव्हरी बॉय बरोबर त्या दोघी कन्नडमध्ये काहीतरी बोलल्या. हे बघून मला फार आश्चर्य वाटले. त्या दोघींचे बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या राज्यात झाले होते आणि त्यांनी एमबीबीएस आणि डेंटिस्ट्री पदवीचे शिक्षण कर्नाटकात घेतले होते. त्यांना इंटर्नशिपमध्ये पेशन्ट बरोबर बोलायला लागते म्हणून त्यांच्या एमबीबीएस आणि डेंटल अभ्यासक्रमात कन्नड भाषा वेगळी शिकवली जात असे. दोघींनाही कामचलाऊ कन्नड बोलता येत असे. कर्नाटक राज्याच्या बाहेरून मेडिकल आणि डेंटल शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात कन्नड ही शिकावी लागते.
आपल्याकडे काही बघायला नको. "मेरे गुडघे मैं दुखता है" असा आपला मराठी माणूस हिंदीमध्ये हावभाव करत बोलतो, मग महाराष्ट्राच्या बाहेरून येणार्‍याला मराठी शिकण्याची गरजच काय?
स्वतःची संस्कृती, भाषा, पेहेराव, खाणेपिणे कसे टिकवावे यासाठी दक्षिण भारत खरोखरच आदर्श आहे.

- मंदार केळकर - जोशी.

त्यांच्या एमबीबीएस आणि डेंटल अभ्यासक्रमात कन्नड भाषा वेगळी शिकवली जात असे. दोघींनाही कामचलाऊ कन्नड बोलता येत असे. >>>>

इथे ह्या अभ्यासक्रमात मराठी आहे का?? नसल्यास कोणी निषेध करणार आहे का?

एक विषयांतर
मी बेंगळूरू मध्ये ११ वर्षे होतो.... तिथे मी कन्नड शिकलो, दुकानाच्या पाट्या वाचत तसेच स्थानिकांशी कटाक्षाने संवाद साधत. परंतु बहुशः मराठी भाषिक, जे तिथे दशकानुदशके वास्तव्यास होते, त्यांची कन्नड शि कण्याची इच्छा व कल दोन्ही नव्हते, तसेच सांस्कृतिक घडामोडी, साहित्य, संगीत इ. मध्ये सह्भागी होण्याची इच्छा नव्हती
नंतर मी नासिकला आलो... येथील क न्नड समाजातील प्रत्येकास मरा ठी- बरेच चांगले येते व ते समरस झाले आहेत... त्यांचे स्वतःचे सांस्कृतिक कार्यक्रम तितक्याच आवडीने व आसक्तीने साजरे करतात.

<मात्र नीट स्पष्टीकरण देऊन हा निर्णय लागू केला तर भविष्यात तो विद्यार्थ्यांना लाभदायक ठरूही शकेल>

इतका चांगला निर्णय मागे घेतल्याबद्दल (त्याबद्दल पुढे) फडणवीसांचा निषेध करायला हवा ना?

पहिलीपासून तिसरी भाषा का? याचे उत्तर अजूनही आलेले नाही. ते नवीन शैक्षणिक धोरणात असावे.

हिंदीच्या सक्तीवरून एक पाऊल मागे

हिंदी ऐवजी दुसरी भारतीय भाषा शिकायची असेल तर विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल. पुढे म्हटलंय की हिंदीचे शिक्षक उपलब्ध आहेत, अन्य भाषांसाठी शिक्षक नाहीत. मग संधी नक्की कशी देणार? वर इंग्रजी भाषेचे गोडवे गाताना हिंदीसारखी भारतीय भाषा लांबची का वाटते याचा विचार झाला पाहिजे, असा चिमटा काढला. इंग्रजी शिकण्याचे फायदे आणि हिंदी शिकण्याचे फायदे याची तुलना करतील का ते?

बरं ते आमचे विश्वगुरू परदेशात जाऊन कुठल्याही प्रश्नाला वसुधैव कुटुंबकम असं उत्तर देतात, त्यात इंग्रजी परकी भाषा बसते का?

" ही महाराष्ट्राची भक्ती" , हिंदी सक्तीच्या समर्थ नार्थ भाजपचे दादरमध्ये बॅनर. उद्धव व राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न

हिंदी भाषक राज्यांत तिसरी भाषा म्हणून संस्कृत घेतात असं वाचलं.

कर उत्पन्न वाढवण्यासाठी निर्मलाताईंना नवी आयडिया - भारताबाहेरच्या भाषांच्या शिकवणीवर २८ % जीएसटी.

>>लेखी हिंदी वाचायला खूप बोजड वाटते.
अगदी अगदी. मी हिंदी विषारद ची परिक्षा दिली आहे. त्याच्या अभ्यासक्रमात प्रेमचंद ची पुस्तके होती. ती अगदी डोक्यावरून गेली नाही तरी डोक्यात देखील गेली नाही. कामापुरता इंग्रजी वापरतो. वाचनासाठी आजही पहिलं प्राधान्य मराठी साठीच, पण हिंदी गाणी मराठी गाण्यांपेक्षा आणि हिंदी चित्रपट मराठी चित्रपटांपेक्षा जास्त आवडतात हे नक्की.

>>> इतका चांगला निर्णय मागे घेतल्याबद्दल (त्याबद्दल पुढे) फडणवीसांचा निषेध करायला हवा ना?

रुन्मेष ने प्रतिसाद दिला की काय असे वाटले आधी

१७९५ साली मराठा साम्राज्यातील सर्व सरदारांनी मिळून खर्डा येथे निजामाचा पराभव केला. तेव्हा दिल्लीवर मराठ्यांचा जरीपटका फडकत होता. राजपुताना मराठ्यांच्या अंकित होता. गुजरातपासून ओरिसापर्यंत भारताच्या निम्म्याहून अधिक भागावर मराठ्यांची सत्ता होती. तेव्हा जर कुणी एखाद्या मराठी माणसाला सांगितले असते की केवळ पंचवीस वर्षांच्या आत तुमचे साम्राज्य लयाला जाऊन तुमच्या पेशव्याला इंग्रज महाराष्ट्राबाहेर हाकलून देतील तर तो खो खो हसला असता. परंतु अत्यंत नादान मराठी राज्यकर्त्यांमुळे हे प्रत्यक्ष घडले.

आज मराठीची स्थिती मुळातच बिकट आहे. उत्तर प्रदेशातल्या खेडेगावातील माणसाला पुण्यातल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा बँकेत संपूर्णपणे त्याच्या भाषेत सेवा मिळते. तो हिंदीत बोलतो आणि त्याला कुणाला हिंदीत बोल म्हणून सांगावे लागत नाही. पण तेच देहूचा एखादा मराठी माणूस त्याच हॉस्पिटलात/बँकेत गेला तर त्याला संपूर्ण सेवा मराठीत मिळत नाही. मराठीची मागणी केल्यावर काही सेवा मिळू शकतात पण काही पदांवरचे कर्मचारी मराठी बोलू शकत नाहीत. त्यांच्याशी हिंदीतच बोलावे लागते. नुकतेच मुंबईतल्या एरटेल आणि बिग बाजार ह्या दुकानातल्या कर्मचाऱ्यांचे - "मला मराठी येत नाही. तू माझ्याशी हिंदीत बोल" असे मराठी ग्राहकांना दरडावणारे विडिओ आले होते. मुंबई रेल्वे स्टेशनवर एका उत्तर भारतीय टी सी ने मराठी जोडप्याला detain करून "मी पुन्हा कधी मराठीमध्ये सेवा मागणार नाही. असे जबरदस्तीने लिहून घेतले होते". पूर्वी सरकारी बँकांमध्ये कर्मचाऱ्यांना त्या त्या राज्यातली भाषा बोलता आली पाहिजे असा नियम होता. २०१४ साली मोदी सरकारने तो रद्द केला. मी स्वतः ठाण्यातल्या बँकेत मराठीत सेवा मागितली तर तिथल्या मराठी मॅनेजरने मला सांगीतले की त्यांना त्यांच्या स्टाफला मराठी बोलायला उद्युक्त करणे शक्य नाही. त्यांच्या परफॉर्मन्स appraisal मध्ये मराठी हा मुद्दाच नाही. पण हिंदीचा वापर आणि प्राविण्य हे मुद्दे आहेत. मराठी आलं नाही तर शहरी महाराष्ट्रात अजिबात अडत नाही. पण हिंदी आलं नाही तर पदोपदी अडतं. हे लोण आता कोकण आणि ग्रामीण महाराष्ट्रात सुद्धा पोहोचले आहे.

आज कित्येक मराठी भाषक घरातल्या मुलांनासुद्धा मराठी येत नाही. मध्यन्तरी मुंबईतल्या गुणरत्न सदावर्ते ह्या मराठी पत्रकाराच्या मुलीची विडिओ क्लिप पहिली. तिला मराठी येत नव्हते पण हिंदी व्यवस्थित बोलत होती. सुप्रिया कर्णिक ह्या अभिनेत्रींच्या बहिणीच्या मुलीने एका मराठी मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी आपल्या मावशीबद्दल एका मिनिटाची क्लिप दिली - हिंदी मध्ये, कारण मुंबईत राहून सुद्धा ह्या मराठी मुलीला मराठी बोलता येत नाही. मी स्वतः ठाण्यातल्या नाट्यगृहात एका मध्यमवर्गीय मराठी जोडप्याला त्यांच्या १०-१२ वर्षांच्या मुलाला मराठी नाटक हिंदीतून समजावताना पहिले आहे, कारण शाळेत आणि बाहेर तो हिंदीत बोलतो, आई वडिलांना सुद्धा हिंदी येते, म्हणून तो घरी सुद्धा हिंदीच बोलतो. आता सार्वजनिक जीवनात बोलायची default भाषा हिंदी झालेली आहे. मराठीत बोलले तर कित्येक जण भूत पहिल्यासारखा चेहरा करतात. महाराष्ट्रात "मला मराठी येत नाही" हे विनातक्रार स्वीकारले जाते. पण "मला हिंदी येत नाही" म्हटले की भुवया चढतात. "त्याला मराठी येत नाही. त्याच्याशी हिंदीत बोल" असे आपले मराठी लोकच बोलतात. पण "त्याला हिंदी येत नाही, त्याचाशी मराठीत बोल" असे कुणी बोलत नाही.

उच्चभ्रु वर्गातील मुले CBSE च्या शाळेत जातात. तिथे मुळातच मराठी नाही. परंतु हिंदी सक्तीची आहे. राज्य सरकारच्या शाळांमध्ये पाचवी पासून मराठी सक्तीची आहे, पण ती फक्त ग्रेड साठी. हिंदी मात्र सक्तीची आहे. त्यातून कित्येक शाळा एक लाखरुपयांचा दंड तोंडावर फेकून शाळेत मराठी शिकवत नाहीत. आतासुद्धा फडणवीसांनी टाकलेली गुगली जास्त लोकांच्या लक्षात आलेली नाही. मुळात पहिलीपासून तिसरी भाषा लादणे हेच चूक आहे. हिंदी सक्तीवर लक्ष विचलित करून. तिसरी भाषा गळ्यात मारली. आता हिंदी सक्तीची न करता कुठलीही भाषा घेण्याचा पर्याय देणार आहेत. म्हणजे बहुतांशी विरोध थंडावेल. पण प्रॅक्टिकली तिसरी भाषा शिकवायचीच झाली तर बहुतेक शाळांमध्ये हिंदीच शिकवली जाईल. इतर भाषा शिकवण्याची व्यवस्था करणे कठिण आहे. पालकसुद्धा म्हणतील की इतक्या लहान वयात अगदी परकी भाषा शिकवण्यापेक्षा आजुबाजुला कानावर पडणारी, आणि शिक्षकांना सुद्धा येणारी हिंदीच बरी. त्यामुळे मराठी लोकांना गंडवून हिंदीकरणाचा हा डाव यशस्वी झालेला आहे.

परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रावर आदळत असताना त्यांना मराठी शिकवण्यासाठी दळभद्री राज्यकर्त्यांनी (सर्वपक्षीय) काहीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे "मराठी येत नाही" म्हटलं की त्यांचं काम झालं. "येत नाही तर ही इथे शिका", असं म्हणून त्यांच्या तोंडावर मारण्यासाठी एक सुलभ हिंदी-मराठी पुस्तिका, किंवा YouTube चॅनेल किंवा स्मार्टफोन अप्लिकेशन, किंवा दूरदर्शन कार्यक्रम शासनाने निर्माण केले नाही, की त्याचा प्रसार केला नाही. तसेच बँका, दुकाने, रेस्टॉरंट्स वगैरे मध्ये मराठीत सेवा देणे बंधनकारक करण्याचा नियम केला नाही. हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे.

मुळात कुठल्याच पक्षाची महाराष्ट्राचे मराठी भाषकत्व टिकवण्याची इच्छाशक्ती नाही. संघ/भाजप ह्यांची तर एक देश एक भाषा ही उघड घोषणा आहे. जर राज्यकर्तेच मराठी नष्ट करून पद्धतशीरपणे हिंदी लादत असतील तर मराठी भाषा museum मध्ये जाणे हे भागधेयच आहे. इथून पुढची पायरी म्हणजे हिंदी ही महाराष्ट्राची दुसरी अधिकृत भाषा केली जाईल. "मराठी आहेच. मराठीला धक्का लागू दिला जाणार नाही" वगैरे धूळफेक केली जाईल. त्यानंतर सर्व सरकारी आणि सार्वजनिक व्यवहार हिंदीतच होतील. तोंडदेखले सुद्धा मराठी उरणार नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात तामिळ संघ, बंगाली असोशिएशन वगैरे त्यांचे कार्यक्रम करतात, तसे मराठी लोक आपापसात मराठी कार्यक्रम करतील - तेही पुढच्या पिढीतले कमीच. कालांतराने जशी हरियाणा, राजस्थान वगैरे हिंदी भाषक राज्ये झाली तसे महाराष्ट्रसुद्धा होईल. आज जे पन्नाशीच्या आत आहेत त्यांना हे याचि देहि याचि डोळा बघण्याचे नशिबी आहे.

अजबराव अचुक लिहिले आहे.

मराठी लोकांनाच आस्था नाहीय कशाबद्दलच. गावागावात इन्ग्रजी मिडियमच्या शाळा ओसंडुन वाहताहेत, परवडत नाही तेच
सरकारी मराठी शाळेत जातात. cbse ला उच्चभ्रुंचीच मुले जातात असे नाहीय तर सगळ्या मराठी खाजगी शाळा cbse ला बदलल्यात. पुढच्या वर्षीपासुन स्टेट बोर्ड पण हाच अभ्यासक्रम आणणार हे काल ऐकले. हिंदी सक्तीची तिथे आहेच, ती इथेही सुरु राहिल याची आडवळणी घोषणा कदाचित मुमंनी केली असावी.

साधना, आस्था हा शब्द हल्ली हिंदीप्रमाणे मराठीत श्रद्धा ह्या अर्थाने सर्रास वापरला जातो. त्यामुळे तुम्हालाच चुकीचा शब्द वापरल्याबद्दल कुणी झापलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका Happy

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणे हे आता रोखले जाऊ शकत नाही. इंग्रजी ही ज्ञानभाषा, रोजगार आणि उद्योगधंद्याची भाषा, जगाशी संपर्काची भाषा आहे मराठी ते स्थान घेऊ शकत नाही. कामधंद्यासाठी इंग्रजी आणि रोजच्या व्यवहारासाठी मराठी इतकेच फारतर शक्य आहे. पुढेमागे इंग्रजीही मराठीला गिळंकृत करू शकेल, पण त्याला वेळ लागेल.

मराठीला खरा धोका हिंदीचा आहे. हिंदी ही मराठीला व्यवहाराची भाषा म्हणून रीप्लेस करत सुटली आहे. ज्ञानभाषा, मेडिसिन, इंजिनीरिंग, आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरेसाठी इंग्रजी शिकणे भाग आहेच. तिथे हिंदीचा काहीही फायदा होत नाही. विनाकारण भैय्यांच्या सोयीसाठी हिंदी शिकण्यापेक्षा त्यांना महाराष्ट्रात मराठी शिकायला लावले पाहिजे होते. हिंदी हा विषय शाळेतून (राज्य शासन आणि CBSE शाळांमध्ये सुद्धा) पूर्णपणे बाद करून (अगदी हौस असेल तर आठवीनंतर इतर भारतीय/परदेशी/कॉम्पुटरची भाषा, कार्यानुभव, संगीत वगैरेंपैकी एक म्हणून ग्रेडवरचा ऑप्शनल विषय म्हणून ठेवायला हरकत नव्हती. महाराष्ट्रात जे स्थान बंगाली किंवा तामिळचे आहे तेच हिंदीला द्यायला हवे होते) वाचलेली शक्ती इंग्रजीवर फोकस केली असती तर महाराष्ट्राचे आणि मराठी समाजाचे भले झाले असते. प्रत्येक राज्याने असे केले असते तर त्या त्या राज्याची आपली भाषा, संस्कृती सुदृढ राहून इंग्रजी ही pan India link language (जी समाजाच्या वरच्या स्तरात आजही आहे) व्हायला मदत झाली असती. पण आता ती वेळ गेली आहे.

मराठी लोकांनाच आस्था नाहीय ह्याबद्दल पूर्ण सहमत. आजच मराठी भाषक महाराष्ट्रात दुय्यम नागरिक म्हणून अपमानास्पद जीणे जगत आहेत हे कित्येकांच्या लक्षातच येत नाही. कित्येक मराठी लोकच हिंदीच्या समर्थनार्थ हिरिरीने पुढे येतायत. पण बऱ्याच भैयांचा attitude मात्र "नाही बोलेंगे मराठी. तुम क्या, तुम्हारा बाप भी हिंदीमे बोलेगा" असा असतो. हे मी अनुभवले आहे. जर एक बाजू इतकी कट्टर असेल आणि त्यांना राज्यकर्त्यांचा पाठिंबा असेल, आणि मराठी लोक इतके pliable असतील तर निकाल सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आहे.

Pages