शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

* कुमार रागवत असतील >>>> छे छे ! छान चालू आहे Happy
शब्दरंजन हा तर आपला मूळ हेतू आहेच.

राया आता रिक्षा होऊ द्या सुरू . . .

कुमार रागवत असतील त्यांच्या सिरियस धाग्यावर आपण करत असलेल्या टिवल्याबावल्यांवर>>>>> खरंय. एक टिवलेशु क्लब काढायला हवा अशा अवांतरासाठीं.

राया मला पावसात नेऊ नका >> हे मीच लिहून खोडले. म्हटले आधी कल्याण करू.>>>>>> म्हणजे सगळ्यांनाच पावसात जायचं होतं तर.

'राय'वरून आठवले . . .
बाई
या शब्दाच्या वेगवेगळ्या वापराबद्दल.
शब्दकोशानुसार बाई हा सामान्यतः स्त्रियांच्या नावाला जोडून आदरार्थीं योजण्याचा शब्द आहे. परंतु काही वेळेस तो स्त्रीच्या नावाच्या आधी सुद्धा किताबाप्रमाणे वापरलेला दिसतो. उदाहरणार्थ :
बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर

(यांच्या स्मरणार्थ त्या नावाने मुंबई मनपाचे एक रुग्णालय आहे)
. .
कालौघात मात्र ‘ बाई’ या संबोधनातून अन्य अर्थ देखील ध्वनीत झालेले आढळतात आणि सर्वच स्त्रियांना ते संबोधन आवडते असे नाही. (खरे तर त्यात अवमानकारक असे काही वाटत नाही). किंबहुना बोलण्याच्या पोत आणि रोखावरून ‘ओ, बाई’चा ध्वनित अर्थ वेगवेगळा घेतला जातो.

त्यामुळे हाक मारताना बाई ऐवजी ताई असा एक प्रघात काही वर्षांपूर्वी पडला. तसेच घरेलू कामगारांसाठी बाईऐवजी मावशी हा शब्दप्रयोग वापरात आला.

रोचक
मी मुंबईतील पाटकर महाविद्यालयात होतो.
त्याचे पूर्ण नाव Sir Sitaram and Lady Shantabai Patkar College असे होते.
त्यातील Lady हे वर सांगितलेल्या किताबासारखे वाटते.
लहानपणी आम्ही शाळेत बाईंना बाईच म्हणायचो आता मॅडम म्हणतात बहुतेक.
अजूनही मनपा मध्ये आडनाव घेऊन बाई असेच म्हणतात.
(उदा. पाटील बाई, पवार बाई..)

लेडी रमाबाई, शिवाय रमाबाई रानडे पण
लक्ष्मीबाई - झाशीची आणि टिळक दोन्ही.
आनंदीबाई - पेशवे, जोशी इत्यादी
जिजाबाई
ताराबाई
सोयराबाई
सईबाई

अशा कित्येक कर्तृत्ववान बाया होऊन गेल्यात. गायिकांमध्ये केसरबाई, मोगूबाई, गंगुबाई, लताबाई, आशाबाई इत्यादी हल्लीच्या शतकभरात होऊन गेल्या आणि आहेत.

ऋतुराज बरोबर.
लेडी हा ब्रिटनच्या सरदार घराण्यांमधून आलेला किताब आहे. तो त्या काळात इकडे देखील रुजला असावा.
. . .
एक कौटुंबिक आठवण.
माझी आजी शिक्षिका होती आणि तिने पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले होते. माझ्या आजोबांना तिच्या पहिल्या नावानंतर बाई हा प्रत्यय जोडायची जात्याच सवय होती. त्यांच्या मते ते त्या कालानुरूप योग्यच होते परंतु तिला ते जाम आवडत नसे.

कित्येकदा तिने परिचिताना सांगितले होते की माझ्या शिक्षिका या पेशावरून तुम्हाला बाई म्हणायचं असेल तर माझ्या आडनावानंतर बाई लावा पण प्रथमनावानंतर अजिबात नको.

माझ्या आजीच्या पिढीच्या सगळ्या बायकांच्या पुढे बाईच आहे
शांताबाई, इंदिराबाई, सजाबाई, मीराबाई, पुतळाबाई.
माझ्या आईच्या वेळी लागपत्रिकेत मुलीच्या नावानंतर देवी लिहायची पद्धत होती बहुतेक १९७०-८०.
अरुणादेवी, उषादेवी, निर्मलादेवी....

शिक्षिका या पेशावरून तुम्हाला बाई म्हणायचं असेल तर माझ्या आडनावानंतर बाई लावा पण प्रथमनावानंतर अजिबात नको. >> गेल्या काही वर्षांत (कदाचित इंग्रजी अमलानंतर असेल) नावाने हाक मारणे अप्रशस्त समजले जाऊ लागले. जसे इंग्रजीत मिस्टर, डॉक्टर वगैरे नंतर नाव न लावता आडनाव लावावे (किंवा पूर्ण नाव) असा संकेत आहे, तसा शिक्षकी पेशात प्रघात पडला असावा. वरच्या उदाहरणात मात्र मला शांताबाई पाटकर हे नाव कानाला खटकत नाही. शांता पाटकर बाई हे खटकतं. नुस्तं पाटकर बाई ठीक आहे. पण तोच न्याय सरांना पण लावला तर पाटकर सर आणि पाटकर बाई महाविद्यालय हे आणखीन विचित्र वाटतं.

बाई संदर्भाप्रमाणे बदलतो शब्द आणि शब्दार्थ.

मास्तरीण बाई आलेच आहे वर.

आपल्याकडे “बाईसाहेब” भारदस्त आणि “बाई वाड्यावर…” अपमानजनक; अगं कमला घरी आणि अहो कमलाबाई दारी

मुंबईत “लेडी” जेरबाई वाडिया ऐवजी “बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल” असे नाव दिलेय हॉस्पिटलला. सर्व पारशी तसेच लिहितात: बाई नवाजबाई पेटिट वगैरे.

उत्तरेत गाणेबजावणे करणाऱ्या स्त्रीला बाई म्हणतात आणि घरंदाज स्त्रिया बाई संबोधल्यास ऑफेंड होतात.

याउलट राजस्थानात आई ला “बाई” अशी हाक मारतात आणि माहेरवाशिणीला “बाईसा” किंवा “बाईसा राज” असे आदराने म्हणतात.

जर इंग्लंडच्या राजाने/ राणीने कुणाला "knight or baronet " ही उपाधी बहाल केली असेल तर त्याच्या पत्नीला "लेडी" असे संबोधले जाते.
माला आठवते त्या प्रमाणे फर्गसन कॉलेजच्या ग्रंथालयाचे नाव बाई जेरबाई वाडिया असे आहे. चू. भू. दे. घे.
"Lady, you are beautiful!" हा कुठल्यातरी नाटकातला डायलॉग आठवला.

अजून एक
सातारा भागात आधीच्या पिढीत नणंदांना आणि दिरांना विशेष संबोधन वापरले जाते.
नणंदांना:
ताईसाहेब, राणीसाहेब, आक्कासाहेब, मास्तरीणबाई, नाजूकबाई, छोटीबाई, दिवाणसाहेब .....
आताशा नाव आणि ताई अशीच हाक मारतात.
दिरांना:
दादासाहेब, काकासाहेब, अण्णासाहेब, फडणीस, सरदार.....
आता सरळ नाव आणि भावोजी असे म्हणतात...

थोडे अवांतर.
Lord is from the Old English hlaford, a blend of hlaf (loaf) + weard (guardian). And lady is from the Old English hlæfdige; that is hlaf (loaf) + *dige (kneader). Therefore, a lord is literally a guardian of bread, and a lady is a kneader of bread, two etymologies that tell us something about gender roles in early medieval England.
आंतर जालावरून.
हे खर तर त्या दुसरया धाग्यावर लिहायला पाहिजे पण इथे "Lady" चा संदर्भ आला म्हणून इथे लिहिले आहे.

केशव,

‘baronet" ही उपाधी पुरुषाला देत नाहीत. तो baron

अरे सॉरी
हे पहा
baronet
noun

A man holding a British hereditary title of honor reserved for commoners, ranking immediately below the barons and above all orders of knighthood except the Garter.

baron आणि baronet मध्ये सूक्ष्म फरक आहे.

रोचक
Common baron नावाचे एक फुलपाखरू आहे आपल्याकडे

बाई - जुन्या काळी (माझे आईबाबाच्या पिढीत) आईला बाई म्हणायची पद्धत बहुतांश सीकेपी घरांमधे होती. कारण माहिती नाही

ऋतुराज.
छान माहिती.
पण दाजी वडील दीर का मिसलेत?

@ baronet

केशवकूल, यू आर राइट. हे non-peer title पुरुषांसाठीही आहे आणि कित्येकदा awardee कडून चक्क पैसे घेऊन मग देण्यात आले आहे.

अनेक भारतीयांनाही दिले गेले आहे.

I stand corrected.

शब्दरत्नाकर प्रमाणे "वडील दीर".
आणि अजून एक
दाजी
पु. १. एखाद्याविषयी, एखाद्याशी आदरपूर्वक बोलताना त्याच्या नावापुढे जोडून वापरण्याचा शब्द. २. (एखाद्याला) आदराचे संबोधन; व्यावहारिक नाव. ३. वडील दीर. (खा.) ४. मोठ्या बहिणीचा नवरा.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

दाजी वडील दीर का मिसलेत?>>>>> दाजी आमच्याकडे मेहुण्याला म्हणतात. वडील दीर नवी माहिती.
मला आपलं 'कुणीतरी बोलवा दाजीबाला' आठवलं!>>>>> आणि मला "ऐका दाजीबा"

माझ्या मावश्यांची संबोधने - ताई, बाई, बेबी. माझी आई सगळ्यबहिणींत धाकटी म्हणून तिला वेगळे नाव मिळाले नाही.
मामांची संबोधने - बाबा, भाऊ. धाकट्या मामाला वेगळे संबोधन नाही.
हे सगळे आपल्या वडिलांना काका म्हणत.
यांचा वयानुसार क्रम - ताई, बाई, बाबा, भाऊ, बेबी, माझी आई, धाकटे मामा .
आता यात गंमत अशी की आपल्यापेक्षा मोठ्या भावंडाचे नाव घ्यायचे नाही. धाकट्याचे घेतले तरी चालते.

त्यामुळे ताई आणि बाई बाबाला त्याच्या नावाने बोलवायच्या. हे सगळे अधिक दोन मोठे मामा, बेबीला तिच्या नावाने बोलवायचे. तेच माझी आई आणि धाकटे मामा तिला बेबी म्हणायचे.
पुढच्या पिढीतही आपले आईवडील जे संबोधन वापरीत त्याला त्यांची मुले काका, मामा, मावशी, आत्या जोडत.

धाकट्या मामांना इतर दोन मामांची मुले भाईकाका म्हणत. मी व मावश्यांची मुले त्यांचे नाव + मामा.

Pages