आम्रसांदणी (अजूनही चुकवून दाखवा!)

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 April, 2024 - 17:37
आंबा इडली
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप* गव्हाचा बारीक^ रवा
१ कप* आंब्याचा रस
अर्धा कप* दही
साखर चवीप्रमाणे
मिठाची चिमूट चवीप्रमाणे आणि ऐच्छिक
दीड टेबलस्पून तूप
थोडंसं दूध

क्रमवार पाककृती: 

तुपावर रवा छान गुलाबी भाजून घ्या.
भाजलेला रवा ताटात पसरून निवू द्या.
तोवर आमरस गाळून त्यात दही रवी किंवा व्हिस्कने एकजीव करून ठेवा.
निवलेला रवा रसात हलक्या हाताने (व्हिस्कने) नीट मिसळून घ्या, त्यात गुठळ्या राहू देऊ नका.
मिश्रणात चवीनुसार साखर आणि आवडत असेल तर किंचित मीठ घाला.
दोनेक तास हे मिश्रण मुरत ठेवा.
दोन तासांनी रवा रसात मस्त फुलून आलेला असेल.
आता वाफवायची तयारी - पाणी उकळायला ठेवा आणि इडलीपात्राच्या वाट्यांना तुपाचा हात लावा.
मिश्रण घट्ट वाटलं (आणि वाटेलच) तर थोडं दूध घालून इडलीच्या पिठासारखं सरसरीत करून घ्या.
डावेने इडलीपात्रात घालून वीस मिनिटं वाफवा.
तुपाशी किंवा नारळाच्या दुधाला लावून छान लागतात.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात १६ इडल्या होतात.
अधिक टिपा: 

१. *कप म्हणजे मेझरिंग कप

२. ^मी बारीक रवा, लापशी रवा, इडली (तांदुळाचा) रवा असे बदल करून पाहिलेत. गव्हाच्या बारीक रव्याच्याच छान होतात या पद्धतीने.

३. मोसमात ताज्या रसाच्या इडल्या उत्तमच होतील, पण या मी देसाईंच्या कॅन्ड रसात केल्यात आणि सुंदर झाल्यात.
ताजा रस हॅन्ड मिक्सीने घुसळून मग गाळून घ्यावा लागेल.

४. सांदणांच्या पारंपरिक रेसिपीत दही घालत नाहीत, दूधच वापरतात, आणि ती सहसा तांदुळाच्या रव्याची करतात. म्हणून पाककृतीच्या नावात ‘पण’ आहे.

५. कृती फार म्हणजे फारच सोपी आहे. मी तर म्हणते चुकवून दाखवाच!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages