आम्रसांदणी (अजूनही चुकवून दाखवा!)

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 April, 2024 - 17:37
आंबा इडली
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप* गव्हाचा बारीक^ रवा
१ कप* आंब्याचा रस
अर्धा कप* दही
साखर चवीप्रमाणे
मिठाची चिमूट चवीप्रमाणे आणि ऐच्छिक
दीड टेबलस्पून तूप
थोडंसं दूध

क्रमवार पाककृती: 

तुपावर रवा छान गुलाबी भाजून घ्या.
भाजलेला रवा ताटात पसरून निवू द्या.
तोवर आमरस गाळून त्यात दही रवी किंवा व्हिस्कने एकजीव करून ठेवा.
निवलेला रवा रसात हलक्या हाताने (व्हिस्कने) नीट मिसळून घ्या, त्यात गुठळ्या राहू देऊ नका.
मिश्रणात चवीनुसार साखर आणि आवडत असेल तर किंचित मीठ घाला.
दोनेक तास हे मिश्रण मुरत ठेवा.
दोन तासांनी रवा रसात मस्त फुलून आलेला असेल.
आता वाफवायची तयारी - पाणी उकळायला ठेवा आणि इडलीपात्राच्या वाट्यांना तुपाचा हात लावा.
मिश्रण घट्ट वाटलं (आणि वाटेलच) तर थोडं दूध घालून इडलीच्या पिठासारखं सरसरीत करून घ्या.
डावेने इडलीपात्रात घालून वीस मिनिटं वाफवा.
तुपाशी किंवा नारळाच्या दुधाला लावून छान लागतात.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात १६ इडल्या होतात.
अधिक टिपा: 

१. *कप म्हणजे मेझरिंग कप

२. ^मी बारीक रवा, लापशी रवा, इडली (तांदुळाचा) रवा असे बदल करून पाहिलेत. गव्हाच्या बारीक रव्याच्याच छान होतात या पद्धतीने.

३. मोसमात ताज्या रसाच्या इडल्या उत्तमच होतील, पण या मी देसाईंच्या कॅन्ड रसात केल्यात आणि सुंदर झाल्यात.
ताजा रस हॅन्ड मिक्सीने घुसळून मग गाळून घ्यावा लागेल.

४. सांदणांच्या पारंपरिक रेसिपीत दही घालत नाहीत, दूधच वापरतात, आणि ती सहसा तांदुळाच्या रव्याची करतात. म्हणून पाककृतीच्या नावात ‘पण’ आहे.

५. कृती फार म्हणजे फारच सोपी आहे. मी तर म्हणते चुकवून दाखवाच!

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अह्हा सुरेख दिसत आहेत हो सांदणं.
गव्हाचा बारीक^ रवा वाचल्यावर जे व्हायचं ते कन्फ्युजन होऊन गेलंय आता लिहित नाही Wink
करुन बघतेच नक्की.. चुकणार नाहीत याची खात्री देत नाही आत्ताच

आम्रपाली / आम्रडली ही दोन नावं (आपली उगीच)सुचवते Lol

छान रेसिपी, मस्त दिसत आहेत इडली..
आता आज काय उद्योग केला ते थोडक्यात. वरील जिन्नस आहेत त्याच प्रमाणात घेऊन (फक्त तूप अर्धा वाटी एक वाटी रव्याला, पाऊण वाटी रस आणि केक फुलून येण्यास प्रत्येकी अर्धा चमचा सोडा आणि बे पावडर) केक केला. (सौजन्य: ही रेसिपी अन् अनुया फीड्स चायनेल, त्या काकू फारच छान टापटीप रहातात आणि एकदम मस्त टापटीप पदार्थ पण करतात) पण हाय रे कर्मा नाटक बसते तसा हा केक बसला. काही केल्या रंगच बदलेना मग वट्ट ४५ मिनिटांनी बाहेर काढला (मूळ रेसिपी मध्ये २० मिनिट आहे फक्त), कडा सोनेरी झाल्या फक्त. मग pan घेतली. त्यात हे प्रकरण अलगद सोडले वरून झाकण लावले पाच मिनिटांनी खरपूस वास यायला लागला, मग उलटण्यासाठी उलथण घेतलं आणि घात झाला.. केक तुटला Proud मग तसाच तुटका केक दुसऱ्या बाजूने भाजून घेतला. चव बेस्टच आली पण केक तुटला हो Happy अगदी पंधरा मिनिटात फडशा पडला. पण इथे फोटू नाही देता आला ह्याहून मोठे काय ते दुःख असणार Wink

>>> आम्रांदणं, आम्रपाली / आम्रडली, इडलिंबा
Lol

आमदान - आपलं, मतदान घ्यावं लागेल अशाने नाव ठरवायला. Proud

लंपन यांनी केकांबा केलेला (मोडलेला) दिसतो - तुमच्या टापटीप काकूंची रेसिपीही शेअर करा मग. Happy

धमाल नावं आहेत. आम्रांदणं हे एकदम दणकट नाव आहे. कडक झाली तर हे नाव देता येईल. आम्रपाली आवडली... आपलं.... आवडलं.

इडलिंबा >>> हे राहून गेलं वाचायचं. जिंकलेलं आहे हे.

आम्रकलिका, सुवर्णमधुरा, आम्रसांदणी (चांदणी सारखं), काषायमुग्धा. काषाय म्हणजे केशरी, सगळं ओढूनताणून.

आम्रांदणं, आम्रपाली / आम्रडली, इडलिंबा>>> Lol

आम्रपाली नको, नुकताच पाली धागा वाचून इथे आले Lol

आम्रवल्ली चालेल. वरच्या लिस्टमधलं आम्रसांदणी नाव मस्त आहे.

अन्जू Lol

अस्मिता, सगळी नावं एक से एक आहेत. काषाय >> हे कॉफी फ्लेवर्ड इडलीसाठी राखून ठेऊ.

अंजूताई Lol
कॉफी फ्लेवर्ड इडलीसाठी राखून ठेऊ.>>>
आधी इडली आहे म्हणून नाव शोधलं, आता नाव आहे म्हणून कृती शोधायची की काय Lol

बाळाची आई येईल ती कुठलं निवडतेय बघू. शेवटी तिचाच अधिकार हा. आपण फक्त 'कूर्र' मात्र. मला तर बाई एक्साईट होऊन धडधडायला लागलं आहे. Wink

इडलिंबा Happy
यात मी इडल्यांबा असे सुचवतो.

आम्रांदणं हे एकदम दणकट नाव आहे. कडक झाली तर हे नाव देता येईल.>> हा हा.

हपा Happy
इडांबा >>> Lol
आंबे खरेदी केल्याने इडीचा ससेमिरा मागे लागतो असा अर्थ काढतील लोक.

माझं vote 'आम्रसांदणी'ला.

"गंध सभोती आम्रसांदणी
तू तर मधुराकळी
काय विसरले ते सांग शोधिसी
या पारंपारिक कृती"

पाळणा तयार! Lol

Btw, मला फणसाचीच सांदणे माहित होती आणि ती सुद्धा विविध साईझच्या निदान १-२ इंच खोलगट असलेल्या ताटल्यांमध्ये वाफवून काढलेली. त्यामुळे त्याला कोणी इडली म्हणत नसे Lol

पाळणा >>> Lol
सांदणी, ओ मेरी आम्रसांदणी >> Lol
ही डिश (न चुकता) बनवल्यावर ऋषी कपूर येतो.
चुकली कि ऋषी पकूर !

गंध सभोती आम्रसांदणी >> अफलातून जमलं आहे.

सांदणं ढवळताना माझा भरलाय हात
सखया रे मिसळ नि विसळ तू ही परात

Lol
मी तर या रेसिपीचं नाव 'गर्जेल तो चुकेल काय' ठेवावं म्हणते. नुसती नावं ठेवताय, एकाने तरी चुकवून दाखवली का रेसिपी अजून?! Proud

पिकलेल्या आंब्याचा रस काढून इडल्या बनत असताना , कैर्‍यांचे अर्थव्यवस्थेचे घातले तसे लोणचे घालताना एक सासूबाई
438217451_7506416199451347_9118228532030421492_n.jpg

शेवटी सांबानाच बनवाव्या लागल्या आम्रसांदण्या !
download (1).png

सूनबाईला हेच जमतं फक्त
download (2).png

व्वा, 'आम्रसांदणी' निवडलं का Happy
अश्विनी के, पाळणा फारच छान.

मी करून बघेन स्वाती, सुट्टी लागली की लगेच! Happy
I wish माझ्याकडे ते बटणाएवढ्या इडल्या होणारं इडली पात्र असतं, त्यात या छोट्या सांदण्या करून वर अर्धा काजू चंद्रासारखा लावला असता. किती गोड दिसल्या असत्या. डोहाळजेवणासाठी वाढायला हे फारच गोड आणि औचित्यपूर्ण दिसेल.

मनिम्याऊ, खरंच Lol

wish माझ्याकडे ते बटणाएवढ्या इडल्या होणारं इडली पात्र असतं, त्यात या छोट्या सांदण्या करून वर अर्धा काजू चंद्रासारखा लावला असता. किती गोड दिसल्या असत्या. डोहाळजेवणासाठी वाढायला हे फारच गोड आणि औचित्यपूर्ण दिसेल....
Happy @अस्मिता, आम्रप्पे करून बघ...

Pages