यू -ट्युबवरील मराठी नाटके: दृष्टीक्षेप

Submitted by कुमार१ on 17 April, 2023 - 23:33

नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत.

काल पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला. त्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटले आहे की नाटकांचे प्रयोग करून आम्ही कधीच दमत नाही परंतु रंगमंदिरांबाबतच्या तक्रारी करून मात्र आता खरंच प्रचंड दमलो आहोत ! त्यांचे हे विधान सर्व कलाकार व नाट्यरसिकांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.

आता एकंदरीत रंगमंदिरांची भाडेवाढ, कमालीची अव्यवस्था आणि अस्वच्छता, घटता प्रेक्षकवर्ग आणि आंतरजालावरील उपलब्ध असलेली व्यापक करमणूक या सगळ्यांचा परिणाम प्रत्यक्ष नाट्यप्रयोगांवर झालेला दिसतो. कोणे एकेकाळी रंगमंदिरातील बाल्कनीमधून कमी दरात नाटक पाहायची सोय असायची. अलीकडे ती बंद झाल्यात जमा आहे. त्यामुळे फक्त खालच्या मजल्यावरील आसनव्यवस्थेतील नाटकांचे वाढीव दर हे सर्वांनाच परवडण्याजोगे नाहीत. मध्यंतरीच्या कोविड पर्वात तर जाहीर नाट्यप्रयोग दीर्घकाळ बंदच होते.

मी काही महिन्यांपूर्वी रंगमंदिरात जाऊन २ नाटके पाहिली. तेव्हा ते नाटक संपल्यानंतर त्यातील चारही कलाकारांनी उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन केले. तसेच त्यांनी त्यांच्या पुढील प्रयोगांची जाहिरातही अशी केली:

" नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास जरूर सांगा, जेणेकरून ही खालची सर्व आसने भरली जावीत".

यावर अधिक बोलणे न लगे.

खऱ्याखुऱ्या नाट्य रसिकाला अधूनमधून नाटक पाहिल्याशिवाय काही चैन पडत नाही आणि नवे नाटक वरील कारणांमुळे पाहण्याचे राहून जाते. मग अशा रसिकासाठी दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवण्यासाठी आंतरजालावरील युट्युबचा एक बरा पर्याय उपलब्ध आहे. तिथे आपल्याला अनेक जुनी नाटके पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी काही नाटके ही मुळातच चांगल्या अनुभवी कलाकारांना घेऊन व्यावसायिक पद्धतीने चित्रित केलेली आहेत. काही नाटके महाराष्ट्रातील विविध नाट्य स्पर्धांमध्ये किंवा हौशी रंगभूमीवर सादर झालेली आहेत. तर अन्य काही नाटके दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पूर्वी प्रक्षेपित झालेली आहेत.

गेल्या ७ वर्षांमध्ये युट्युबवरील अशा अनेक नाटकांचा मी आस्वाद घेतला. मी पाहिलेल्या नाटकांची यादी एक संदर्भ म्हणून इथे लिहून ठेवतो. यथावकाश प्रतिसादांमधून त्या नाटकांबद्दल अजून माहितीची भर घालत राहीन. ज्या वाचकांनी या माध्यमातून नाटके पाहिली असतील त्यांनीही प्रतिसादांमधून त्या नाटकाबद्दल थोडक्यात लिहायला हरकत नाही. अशा तऱ्हेने या धाग्याच्या निमित्ताने मराठी नाटकांची एक आंतरजाल संदर्भयादी सर्वांसाठी उपलब्ध राहील.

आता थोडे अशा नाटकांच्या चित्रफित-दर्जाबद्दल. काही नाटकांचा दर्जा खरोखरच उत्तम आहे. काहींचा तो मध्यम आहे परंतु त्यातून नाट्य संवादांचा अनुभव चांगला घेता येतो. सह्याद्री वाहिनीवरील जी नाटकं इथे चढवली गेली आहेत त्यांचा दर्जा मात्र साधारण आहे आणि त्यातील ध्वनीमुद्रण फारसे खास नसते.

प्रतिसादांमधून लिहिताना आपणही संबंधित नाटकाचे नाव, लेखक, प्रमुख कलाकार, तुमचे मत आणि चित्रफितीच्या दर्जाबद्दल जरूर लिहावे. आता मी पाहिलेल्या नाटकांची लेखकानुसार फक्त यादी लिहितो. ती गेल्या ५-७ वर्षांपासून पाहत असल्याने आता एकदम प्रत्येकाबद्दल छोटा परिच्छेद लिहीणे अवघड आहे. पण अगदी अलीकडे जी नाटके पाहिलीत किंवा यापुढे जी पाहीन, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती प्रतिसादांमधून देईन. या नाटकांचा लेखनकाल अंदाजे गेल्या ५०-५५ वर्षांपूर्वीपासूनचा आहे. सध्याच्या तरुण पिढीला आवड असल्यास ही नाटके जरूर पाहता येतील. त्यातले एखादे नाटक आपण पूर्वी प्रत्यक्ष रंगमंदिरात पाहिले असल्यास आता त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येईल.

मी पाहिलेली (चित्रित) नाटके:

* विजय तेंडुलकर
शांतता ! कोर्ट चालू आहे
अशी पाखरे येती
सखाराम बाईंडर
कमला

*जयवंत दळवी
बॅरिस्टर, पर्याय, लग्न, महासागर

*वसंत कानेटकर
अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, बेइमान, मला काही सांगायचंय

* पु ल देशपांडे
सुंदर मी होणार

* आचार्य अत्रे

तो मी नव्हेच

* रत्नाकर मतकरी
इथं हवय कुणाला प्रेम

* शं ना नवरे
सूर राहू दे
धुक्यात हरवली वाट

* मधुसूदन कालेलकर
शिकार

* अशोक समेळ
कुसुम मनोहर लेले
{केशव मनोहर लेले : लेखक आठवत नाही. सध्या उपलब्ध नाही }

* प्र. ल. मयेकर
आसू आणि हसू

* उदय नारकर
खरं सांगायचं तर ( मूळ इंग्लिश; अगाथा ख्रिस्ती)

* शेखर ढवळीकर
नकळत सारे घडले

* डॉ. शिरीष आठवले
मित्र

* समीर कुलकर्णी
तुझ्या माझ्यात

* वसंत सबनीस
कार्टी काळजात घुसली

* मनोहर सोमण
द गेम

* विजय निकम
रघुपती राघव राजाराम

*सुरेश जयराम
डबल गेम

* चंद्रशेखर गोखले
अनोळखी ओळख

* शिवराज गोर्ले
बुलंद

* क्रांती बांदेकर
कोर्ट मार्शल (मूळ हिंदी - स्वदेश दीपक)

*सुरेश खरे
ती वेळच तशी होती

* बाळ कोल्हटकर
वेगळं व्हायचंय मला
..

मागच्या पिढीतील गाजलेले अभिनेते प्रभाकर पणशीकरांच्या वरीलपैकी एका नाटकाच्या शेवटी त्यांची मुलाखत दिलेली आहे. त्यात त्यांनी नाटकांच्या चित्रीकरणाबद्दलचे त्यांचे बदललेले मत व्यक्त केले आहे. एकेकाळी त्यांचा अशा चित्रीकरणाला कट्टर विरोध होता. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले, की महाराष्ट्रातील मोजकी पाच सहा शहरे वगळता अन्यत्र जिल्हा पातळीवर देखील चांगली नाट्यगृहे नाहीत. जर नाटकाला महाराष्ट्रातील सर्व इच्छुक प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे असेल तर आता नाटक चित्रीकरण हाच पर्याय उरतो.

कदाचित, अजून पंचवीस तीस वर्षांनी वरील हेतू साध्य करण्यासाठी सशुल्क आंतरजाल वाहिन्या हेच व्यावसायिक नाटक सादरीकरणाचे महत्त्वाचे माध्यम ठरेल काय? माहित नाही. सच्चा नाट्यप्रेमीला हा विचार मानवणारा नसला तरी भविष्यात तो स्वीकारायला लागू शकतो.
***********************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौजन्याची ऐशी तैशी नावाचं नाटक व्हिडिओ वर (एकदम जुन्या स्टाइल ने लायब्ररी मधून कॅसेट आणून) पाहिलं होतं.आनंद अभ्यंकर आणि राजा गोसावी आणि (बहुतेक सुहिता थत्ते) होते.अतिशय धमाल.

खूप छान लिहीत आहातसर्वजण !

व्हिडिओ कॅसेट्स हा प्रकार आंतरजालाच्या झंझावातात कधी संपुष्टात आला ते आता आठवत देखील नाही....

'मित्र' नाटक मस्त आहे. श्रीराम लागू व फैय्याज यांच्या अभिनयाची जुगलबंदी लाजवाब ! लेखन (डॉ. आठवले ) व दिग्दर्शन ( वि. केंकरे) हेही छान.

नाटकाची सुरवात लागूंवर दलित तरूण हल्ला करतात त्याने होते. रुग्णालयात लागूंना 'स्ट्रोक' होतो व त्यामुळे शरीराची उजवी बाजू लुळी पडते. त्यांना घरी आणल्यावर त्यांच्या देखभालीसाठी एका प्रशिक्षित नर्सची (फैय्याज) नेमणूक होते. या बाई दलित आहेत. रुग्ण कडवा ब्राह्मण.
सुरवातीस हे दोघे अगदी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. नाटकाच्या शेवटी 'मित्र' झालेले असतात.
दोघांच्याही अभिनयास हजार सलाम !

नाटकात राखीव जागांच्या सामाजिक प्रश्नास हात घातला आहे पण अतिशय हळूवारपणे. किंबहुना ही दरी मिटावी असाच संदेश दिला जातो.
जरूर पाहावे असे नाटक.

ह्यात त्या त्यांच्यासाठी मोजून चार भजी वाढून देतात आणि मग डॉ विचारतात' हे काय चारच !' हे दृष्य आहे का ?
मी अनेक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर बघितले होते बहुतेक, नाव विसरून गेले होते. मला बाकी तपशील लक्षात नव्हते, लहानपणी बघितलं होतं पण आवडलं होतं. वेगळ्या धाटणीचं आहे. फैय्याज यांचे डोळे फार बोलके वाटायचे आणि डॉ लागूंचा तिरसटपणा फार खरा वाटायचा Happy

अस्मिता
मलाही ते इथे बघून काही वर्षे झाली आहेत. आता आठवावे / शोधावे लागेल. Happy

फैय्याज यांचे डोळे फार बोलके वाटायचे >> अ- ग - दी - च !! +११११

त्या दोघांचाही अभिनय इतका तोडीस तोड आहे की ( दुसऱ्यापेक्षा ) अधिकचा एक गुण कोणालाही द्यावा वाटत नाही !

मला वाटलं तुम्ही हल्लीच बघितलं आहे.

शोधावं लागेल म्हटल्याने शोधलं तर सापडलं. Happy
मित्र (फैय्याज, डॉ लागू)
https://youtu.be/tKpPpGWJTzw

दोघांचाही अभिनय इतका तोडीस तोड आहे की ( दुसऱ्यापेक्षा ) अधिकचा एक गुण कोणालाही द्यावा वाटत नाही ! +१

जरा वेगळे कलाकार बघायची इच्छा असल्यास हे एक चांगले आहे:
द गेम
https://www.youtube.com/watch?v=1E-TSK2e0io&t=2576s
ले. : मनोहर सोमण
प्रमुख भूमिका : रेवती केतकर

विषय : एक उद्योगपती स्त्री राजकारण्यांना कशी नमवते.
डॉक्टर व कामगार हितचिंतक असलेल्या तरुणासंदर्भातील पहिल्या अंकाच्या अखेरचा धक्काबिंदू चांगला.

कुसुम मनोहर लेले...
सुकन्या, संजय मोने..
नटसम्राट.... श्रीराम लागू
रणांगण....
मोहन वाघ... अविनाश नारकर...
बॅरिस्टर.... सचिन खेडेकर, इला भाटे

कुमार सर काय सुंदर नाटक आहे. आपल लक्ष लक्ष आभार. 'मित्र' आहाहा!!! सुरेख.
लागूंचा अभिनय काय लाजवाब आहे. फैय्याझ त्यांच्यापुढे तुल्यबळाने उभ्या आहेत. सुंदर अनुभव.

१. अविनाश नारकर... >>
ज्यांना अविनाश- ऐश्वर्या हे दाम्पत्य आवडते त्यांनी ही मुलाखत जरूर बघावी:
https://www.youtube.com/watch?v=N_mq5VkF-bg

'ग गप्पांचा' हा एक छान कार्यक्रम ठाण्यात होत असतो. त्याचे आतापर्यंत नऊ भाग झालेले आहेत.

२. फैय्याझ >>
खरंय ! यांचे मी प्रत्यक्षात एकही नाटक पाहिलेले नाही. पूर्वी त्यांच्याबद्दल फक्त ऐकून होतो.
मित्रच्या निमित्ताने त्यांचा सुरेख अभिनय बघायला मिळाला.
मी हे दोनदा पाहिले.

इथे नोंदवलेली नाटके लगेच पाहून अभिप्राय देणाऱ्या सर्वांना धन्यवाद !
...
हे पण एक चांगले वाटले:
अनोळखी ओळख
लेखक - चंद्रशेखर गोखले..

प्र भू : वैजयंती चिटणीस , आनंद अभ्यंकर

प्रेमलग्न, सामाजिक स्तर, वांझोटेपणा, इत्यादी.

https://www.youtube.com/watch?v=7s01C6pGpB4&t=10s

'ग गप्पांचा' हा एक छान कार्यक्रम ठाण्यात होत असतो. त्याचे आतापर्यंत नऊ भाग झालेले आहेत.
नारकर बघितले...
उर्वरित वेळ मिळेल तसे पाहतो...
धन्यवाद सरजी

फैयाझ मला वाटते जुन्या कट्यार काळजात घुसली मध्ये पण होत्या. वसंतरावांच्या कास्टचे. मस्त कलेक्षन आहे. मित्र बघीन. घरचे नेट जरा स्लो आहे मेलं सध्या.

फैयाझ मला वाटते जुन्या कट्यार काळजात घुसली मध्ये पण होत्या. >>होय. खॉसाहेबांच्या मुलीची भूमिका करायच्या.
तसेच "वीज म्हणाली धरतीला" या नाटकात देखील होत्या. त्यामध्ये एक छान गाणे गायच्या. शब्द अंदाजे..."स्मरशील यमुना, स्मरशील राधा, स्मरशील गोकुळ सारे"......

दूरदर्शन सह्याद्रीने पुलंच्या वयम् मोठम खोटम नाटकाचं एक चित्रीकरण युट्यूबवर टाकलं आहे. खूप गोड नाटक आहे. नव्वदच्या दशकातील संच वाटतो आहे.

आहा, नाटकं! खूप छान धागा. मस्त संकलन होतय. युट्युब लिंक्स मुळे अजूनच छान वाटतय. बघणार आता ही सगळी पुन्हा. धन्यवाद डॉ कुमार आणि सर्वांना.

फार मस्त आठवणी आहेत. अगदी छोट्या गावातल्या ओपन एअर थिएटर पासून मोठ्या एअर कंडिशन थिएटर पर्यंत आणि शाळा-सोसायटी पासून सुदर्शन कलामंचापर्यंत विविध ठिकाणी फार सुंदर नाटकं बघायला, अनुभवायला मिळालीत.
वसंतराव देशपांडेंनी अजरामर केलेलं कट्यार; आळेकरांचं बेगम बर्वे, महानिर्वाण; कानेटकरांची तर कित्येक नाटकं (अखेरचा सवाल, गरुड झेप, गोष्टजन्मांतरीची, बेईमान, मला काही सांगायचय, मत्स्यगंधा, सुर्याची पिल्ले, अजून कितीतरी); खरेंचे काचेचा चंद्र; शंकर नवरेंचं गुंतता हृदय हे; मतकरींचं अश्वमेध, खोल खोल पाणी;
पणशीकरांचं बेईमान, तो मी नव्हेच, इथे ओशाळला मृत्यू; भक्ती बर्वेंचं अखेरचा सवाल, ती फुलराणी; विक्रम गोखलेंचं बॅरिस्टर, मी मालक या देहाचा; सतीश दुभाषींचं बेईमान, ती फुलराणी, अंमलदार, हा खेळ सावल्यांचा; सुधा करमरकरांचं थँक्यु मि ग्लाड, वीज म्हणाली धरतीला, बेईमान, मला काही सांगायचय, ...

यादी फार मोठी आहे. अन ही सगळी नाटकं प्रत्यक्ष बघता आली हे माझं भाग्य. कोल्हापूर,पेण, पुणे अशा नाट्यप्रेमी गावांमधे रहाता आलं त्यामुळे हे शक्य झालं. अर्थातच आईबाबांचं नाटक प्रेमही याला कारणीभूत.
1970-90 या काळात खूप सुंदर नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार तसेच अनेक नाट्य संस्थांमुळे नाटक फुलत गेले. या नाटकांनी कळतनकळत खूप घडवलं.
यातली जुन्या संचातली कोणती नाटकं युट्युबवर आहेत, शोधायला हवं.

सुंदर संकलन होतय. धन्यवाद सर्वांना.

1970-90 या काळात खूप सुंदर नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार तसेच अनेक नाट्य संस्थांमुळे नाटक फुलत गेले. >>> +११११

जी नाटके 50 वर्षे किंवा त्याहून जुनी आहेत ती कलाकारांच्या मूळ संचासह इथे बरीच कमी आहेत. परंतु त्यानंतरच्या दुसऱ्या पिढीतील कलावंतांची बऱ्यापैकी आहेत.
उदाहरणार्थ,
शांतता कोर्ट चालू आहे हे मूळ सुलभा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिकेने गाजले होते. इथे असणाऱ्या नाटकात रेणुका शहाणे आहेत.

रच्याकने,
सुलभा देशपांडे अभिनित 'शांतता कोर्ट चालू आहे' याच्या एका प्रत्यक्ष प्रयोगादरम्यान घडलेला एक अभूतपूर्व आणि थरारक प्रसंग मी इथे लिहिला आहे :

https://www.maayboli.com/node/77952

आसू आणि हसू
प्र ल मयेकर
मोहन जोशी, रिमा लागू आणि इतर.

नामांकित डॉक्टर व त्याचे मोठे रुग्णालय.
या प्रेमविवाहित पती-पत्नीमधील ताणेबाणे आणि भांडणे.. डॉक्टरांच्या रुग्णालयात आलेली एक तरुण स्त्री डॉक्टर.. त्यातून निर्माण झालेल्या कटकटी.. एकमेकींच्या झिंज्या ओढण्यापर्यंत..
अखेरीस नवरा बायकोमधील हृद्य संवाद..
प्रेम, लग्न, मैत्री, संसार, प्रेयसी, सहनिवासी.. अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करीत तरल शेवट.

https://www.youtube.com/watch?v=yV2fn7JXnpI
सुंदर नाट्य !

मूळ संचामधे नाही पण नवीन संचात सापडली काही नाटकं
1.अखेरचा सवाल : https://youtu.be/DmuCU9Y33sg
2. गोष्ट जन्मांतरीची : https://youtu.be/N9aF3DAHoss
3. मला काही सांगायचय : https://youtu.be/xssEgSH77RI
4. शांतता कोर्ट चालू आहे : https://youtu.be/QG_Pi051qao
5. एका रविवारची कहाणी: https://youtu.be/Fj91E6o2pP0 ( वरच्या यादीत हे लिहायचं राहिलेलं. पुलं चं एक सदाबहार नाटक. पुलं स्वत: पेटीवर, श्रीकांत मोघे, पुलंचे भाऊ, आशालता वाबगावकर . एकदम मुड छान करून टाकणारं. - काही ठिकाणी बायकांची टर उडवणं वाटू शकतं पण ठिके. एकुण ज्यांना संगीत- नाट्य संगीत आवडतं, हलकं फुलकं नाटक आवडतं, जरूर बघा) मूळ संचात असल्याने अगदी आवर्जून बघाच
6. सूर्याची पिल्ले : https://youtu.be/JNL2tEBJJzo बहुदा हेही मूळ संचातलं आहे
7. श्रीमंत दामोदर पंत : https://youtu.be/U7350LnlKCk हे थोडं फार्सिकल अंगाने जाणारं पण ध मा ल नाटक

वरील यादीतील ही पाहिली आहेत : १ ते ४ व ६. छान.
अजून एक चांगले :

‘नातीगोती’
जयवंत दळवी.
दिलीप प्र., रीमा, मोहन जोशी व अतुल परचुरे या सर्वांचाच अभिनय लाजवाब.
एका मध्यमवर्गीय पांढरपेशा जोडप्याचा मंदमती मुलगा ही मध्यवर्ती कल्पना. त्या मुलाला सांभाळण्यासाठी बायको दिवसा व नवरा रात्री नोकरी करतात.

बायकोचा बॉस आणि त्या दोघांचे तरल संबंध हे एक उप-कथानक. परंतु हे संबंध अगदी निखळ मैत्रीचे राहतात हे वैशिष्ट्य.
तो मुलगा वयात येताना त्याच्या आईशीच लगट करायला बघतो हा प्रसंगही सुरेख व संयमित दाखवला आहे.

नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व कलाकारांचा अभिनय हे सर्व रसायन झकास जमल्याने नाटक एक वेगळीच उंची गाठते.
https://www.youtube.com/watch?v=F7dlUMpA5JU

रविवारची कहाणी मूळ संचात (ज्यात पुलं-नीलम प्रभू -श्रीकांत मोघे-आशालता वगैरे आहेत) बघताना स्त्रियांची टर उडवणारं नाही वाटत . पण तेच संवाद आणि प्रसंग असूनही चंद्रकांत काळे (बाकीचे कलाकार आठवत नाहीत) असलेल्या संचात मात्र स्त्रियांची टर उडवणारं वाटतं असं माझं निरीक्षण आहे ! ( फोनवरून इडलीची रेसिपी सांगण्याचा प्रसंगसुद्धा)
हा 'वाऱ्यावरची वरात'चाच एक भाग आहे ना? मग संपूर्ण वाऱ्यावरची वरात चांगल्या चित्रीकरणासहित कशी उपलब्ध नाही कुणास ठाऊक. माझ्याकडे सीडी आहे, त्यातलं चित्रीकरण तसं अस्पष्ट आहे. अर्थात तरीही भन्नाट आहे.

अशी पाखरे येती
विजय तेंडुलकर
एकदम मस्त !

संजय नार्वेकर, लीना भागवत, ज्योती सुभाष आणि हेमू अधिकारी या सर्वांचा अभिनय एकदम खास.
संजय हा प्रेक्षकांना त्याची जीवनकहाणी सांगतोय या पार्श्वभूमीवर नाटक पुढे सरकते. प्रेक्षकांकडे बघून केलेली त्याची स्वगते तर लाजवाब आहेत. किंबहुना त्याने संपूर्ण नाटक आपल्या करंगळीवर तोलले आहे.

सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे कौटुंबिक वातावरण. मुलगी उपवर आहे. तिचा बाप स्थळासाठी ‘जोडे झिजवतोय’. तेव्हा फक्त मुलाचा होकार म्हणजे अंतिम उत्तर असायचे. मग मुलीने फक्त मान डोलवयाची. मुलीचे लग्न जमत नसल्यास आईवडिलांच्या जीवाला काय तो घोर. अशा कुचंबणा झालेल्या मुलीची भूमिका लीनाने समर्थपणे पेललीय.

नाटकातील शेवटचा अर्धा तास तर अगदी उत्कंठापूर्ण. शेवट काय होईल याचा प्रेक्षकांचा अंदाज सतत चुकत राहतो. पण एक गोष्ट मनात येत की शेवटी हे ‘’तें’’ चे नाटक असल्याने अगदी गोग्गोड शेवट नक्कीच होणार नाही.

जर आपण मनात ‘अशी पाखरे येती...’ या गाण्याची संपूर्ण ओळ म्हटली तर मग शेवटाचा अंदाज येतो.
‘’तें’’ चे हे हळुवार नाटक पाहिल्यानंतर बाईंडर व गिधाडे लिहीणारे तेंडुलकर हेच का ते, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

आनंद इंगळे>> +11
……

लढाई अजून संपलेली नाही
अजित दळवींचे म्हणून पाहिले पण निराशा झाली.

एका तरुण विवाहितेचा जळून झालेला मृत्यू आणि त्यानंतरचा तिच्या नवऱ्यावरचा न्यायालयीन खटला, ही कथा.
कलाकार परिचित नाहीत. एक दोघांची कामे बरी; बाकी सामान्य.
साक्षीदार म्हणून कोर्टात उभी केलेली पात्रे बावळट वाटली.

सह्याद्री-प्रणित चित्रफीत असल्याने दर्जा मध्यम.

Pages