
नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत.
काल पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला. त्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटले आहे की नाटकांचे प्रयोग करून आम्ही कधीच दमत नाही परंतु रंगमंदिरांबाबतच्या तक्रारी करून मात्र आता खरंच प्रचंड दमलो आहोत ! त्यांचे हे विधान सर्व कलाकार व नाट्यरसिकांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.
आता एकंदरीत रंगमंदिरांची भाडेवाढ, कमालीची अव्यवस्था आणि अस्वच्छता, घटता प्रेक्षकवर्ग आणि आंतरजालावरील उपलब्ध असलेली व्यापक करमणूक या सगळ्यांचा परिणाम प्रत्यक्ष नाट्यप्रयोगांवर झालेला दिसतो. कोणे एकेकाळी रंगमंदिरातील बाल्कनीमधून कमी दरात नाटक पाहायची सोय असायची. अलीकडे ती बंद झाल्यात जमा आहे. त्यामुळे फक्त खालच्या मजल्यावरील आसनव्यवस्थेतील नाटकांचे वाढीव दर हे सर्वांनाच परवडण्याजोगे नाहीत. मध्यंतरीच्या कोविड पर्वात तर जाहीर नाट्यप्रयोग दीर्घकाळ बंदच होते.
मी काही महिन्यांपूर्वी रंगमंदिरात जाऊन २ नाटके पाहिली. तेव्हा ते नाटक संपल्यानंतर त्यातील चारही कलाकारांनी उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन केले. तसेच त्यांनी त्यांच्या पुढील प्रयोगांची जाहिरातही अशी केली:
" नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास जरूर सांगा, जेणेकरून ही खालची सर्व आसने भरली जावीत".
यावर अधिक बोलणे न लगे.
खऱ्याखुऱ्या नाट्य रसिकाला अधूनमधून नाटक पाहिल्याशिवाय काही चैन पडत नाही आणि नवे नाटक वरील कारणांमुळे पाहण्याचे राहून जाते. मग अशा रसिकासाठी दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवण्यासाठी आंतरजालावरील युट्युबचा एक बरा पर्याय उपलब्ध आहे. तिथे आपल्याला अनेक जुनी नाटके पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी काही नाटके ही मुळातच चांगल्या अनुभवी कलाकारांना घेऊन व्यावसायिक पद्धतीने चित्रित केलेली आहेत. काही नाटके महाराष्ट्रातील विविध नाट्य स्पर्धांमध्ये किंवा हौशी रंगभूमीवर सादर झालेली आहेत. तर अन्य काही नाटके दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पूर्वी प्रक्षेपित झालेली आहेत.
गेल्या ७ वर्षांमध्ये युट्युबवरील अशा अनेक नाटकांचा मी आस्वाद घेतला. मी पाहिलेल्या नाटकांची यादी एक संदर्भ म्हणून इथे लिहून ठेवतो. यथावकाश प्रतिसादांमधून त्या नाटकांबद्दल अजून माहितीची भर घालत राहीन. ज्या वाचकांनी या माध्यमातून नाटके पाहिली असतील त्यांनीही प्रतिसादांमधून त्या नाटकाबद्दल थोडक्यात लिहायला हरकत नाही. अशा तऱ्हेने या धाग्याच्या निमित्ताने मराठी नाटकांची एक आंतरजाल संदर्भयादी सर्वांसाठी उपलब्ध राहील.
आता थोडे अशा नाटकांच्या चित्रफित-दर्जाबद्दल. काही नाटकांचा दर्जा खरोखरच उत्तम आहे. काहींचा तो मध्यम आहे परंतु त्यातून नाट्य संवादांचा अनुभव चांगला घेता येतो. सह्याद्री वाहिनीवरील जी नाटकं इथे चढवली गेली आहेत त्यांचा दर्जा मात्र साधारण आहे आणि त्यातील ध्वनीमुद्रण फारसे खास नसते.
प्रतिसादांमधून लिहिताना आपणही संबंधित नाटकाचे नाव, लेखक, प्रमुख कलाकार, तुमचे मत आणि चित्रफितीच्या दर्जाबद्दल जरूर लिहावे. आता मी पाहिलेल्या नाटकांची लेखकानुसार फक्त यादी लिहितो. ती गेल्या ५-७ वर्षांपासून पाहत असल्याने आता एकदम प्रत्येकाबद्दल छोटा परिच्छेद लिहीणे अवघड आहे. पण अगदी अलीकडे जी नाटके पाहिलीत किंवा यापुढे जी पाहीन, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती प्रतिसादांमधून देईन. या नाटकांचा लेखनकाल अंदाजे गेल्या ५०-५५ वर्षांपूर्वीपासूनचा आहे. सध्याच्या तरुण पिढीला आवड असल्यास ही नाटके जरूर पाहता येतील. त्यातले एखादे नाटक आपण पूर्वी प्रत्यक्ष रंगमंदिरात पाहिले असल्यास आता त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येईल.
मी पाहिलेली (चित्रित) नाटके:
* विजय तेंडुलकर
शांतता ! कोर्ट चालू आहे
अशी पाखरे येती
सखाराम बाईंडर
कमला
*जयवंत दळवी
बॅरिस्टर, पर्याय, लग्न, महासागर
*वसंत कानेटकर
अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, बेइमान, मला काही सांगायचंय
* पु ल देशपांडे
सुंदर मी होणार
* आचार्य अत्रे
तो मी नव्हेच
* रत्नाकर मतकरी
इथं हवय कुणाला प्रेम
* शं ना नवरे
सूर राहू दे
धुक्यात हरवली वाट
* मधुसूदन कालेलकर
शिकार
* अशोक समेळ
कुसुम मनोहर लेले
{केशव मनोहर लेले : लेखक आठवत नाही. सध्या उपलब्ध नाही }
* प्र. ल. मयेकर
आसू आणि हसू
* उदय नारकर
खरं सांगायचं तर ( मूळ इंग्लिश; अगाथा ख्रिस्ती)
* शेखर ढवळीकर
नकळत सारे घडले
* डॉ. शिरीष आठवले
मित्र
* समीर कुलकर्णी
तुझ्या माझ्यात
* वसंत सबनीस
कार्टी काळजात घुसली
* मनोहर सोमण
द गेम
* विजय निकम
रघुपती राघव राजाराम
*सुरेश जयराम
डबल गेम
* चंद्रशेखर गोखले
अनोळखी ओळख
* शिवराज गोर्ले
बुलंद
* क्रांती बांदेकर
कोर्ट मार्शल (मूळ हिंदी - स्वदेश दीपक)
*सुरेश खरे
ती वेळच तशी होती
* बाळ कोल्हटकर
वेगळं व्हायचंय मला
..
मागच्या पिढीतील गाजलेले अभिनेते प्रभाकर पणशीकरांच्या वरीलपैकी एका नाटकाच्या शेवटी त्यांची मुलाखत दिलेली आहे. त्यात त्यांनी नाटकांच्या चित्रीकरणाबद्दलचे त्यांचे बदललेले मत व्यक्त केले आहे. एकेकाळी त्यांचा अशा चित्रीकरणाला कट्टर विरोध होता. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले, की महाराष्ट्रातील मोजकी पाच सहा शहरे वगळता अन्यत्र जिल्हा पातळीवर देखील चांगली नाट्यगृहे नाहीत. जर नाटकाला महाराष्ट्रातील सर्व इच्छुक प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे असेल तर आता नाटक चित्रीकरण हाच पर्याय उरतो.
कदाचित, अजून पंचवीस तीस वर्षांनी वरील हेतू साध्य करण्यासाठी सशुल्क आंतरजाल वाहिन्या हेच व्यावसायिक नाटक सादरीकरणाचे महत्त्वाचे माध्यम ठरेल काय? माहित नाही. सच्चा नाट्यप्रेमीला हा विचार मानवणारा नसला तरी भविष्यात तो स्वीकारायला लागू शकतो.
***********************************************************************************
मला खरच आवडेल नाटकाचे
मला खरच आवडेल नाटकाचे व्हिडियो चित्रिकरण पण झालेले अर्थात लाउव्ह प्रयोगाची मजा वेगळिच असते तेव्हा नाट्यग्रह नक्किच सुधारावी,
नाट्यगृहे सुधारली पाहिजेतच.
नाट्यगृहे सुधारली पाहिजेतच.
अजून एक .
नाटकांची ऑनलाइन बुकिंगची पद्धत पारदर्शक पाहिजे. कोविडपूर्व काळातील माझा त्याचा अनुभव चांगला नाही. ज्या दिवशी नाटकाची जाहिरात येते त्याच दिवशी तुम्ही ऑनलाईन करायला गेल्यावर देखील सर्व मोक्याच्या जागा गेलेल्या दाखवल्या होत्या.
नंतर कळले की अशा मोक्याच्या जागा खपवण्याचे कंत्राट कोणाला तरी दिलेले असते.
सध्या काय चाललय माहित नाही
अश्रूंची झाली फुले खूप छान
अश्रूंची झाली फुले खूप छान आहे.
पणशीकर, भाटकर आणि सगळे कलाकार उत्तम.
https://www.youtube.com/results?search_query=ashrunchi+zali+phule+marath...
आज सकाळीच एक रंगभूमि
आज सकाळीच एक रंगभूमि नावाचे चॅनेल सजेशन मध्ये आले. संकर्षण ने एक नाटक लिहिले आहे त्याचे प्रिव्यु व काही क्लिप्स, नाटकाच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया असा व्हिडीओ आहे. घरी जाउन परत बघीन व नाटकाचे नाव लिहीन. जोडप्यातील वादाची काही कथा आहे.
१. अश्रूंची झाली फुले, >>
१. अश्रूंची झाली फुले, >>
शालेय जीवनात ते वाचले होते तेव्हापासूनच ते नाटक बघण्याची उत्सुकता होती. परंतु प्रत्यक्ष काही बघता आलेले नव्हते. यूट्यूबमुळे तो आनंद मिळाला.
.. ..
२. रंगभूमि नावाचे चॅनेल >>>
वा ! माहिती जरूर लिहा.
१. अश्रूंची झाली फुले, >>
"रघुपती राघव राजाराम "
प्रमुख भूमिका : डॉ. गिरीश ओक, वैभव मांगले
छान, आवडलेच..
त्या नावाचा भजनाशी काही संबंध नाही ! नाटकातल्या तीन भावांची नावे आहेत ती.
दोन भावांची कुटुंबे. त्यातील एक परदेशात स्थायिक झालेले. ते जेव्हा भारतात आले आहेत तेव्हा मालमत्तेची वाटणी.. इत्यादी कटकटीचे विषय.
संपूर्ण नाटकभर या कुटुंबात टीव्ही दुरुस्त करायला आलेला एकजण दाखवला आहे. त्याचे बोलणे आणि संवादफेक वैशिष्ट्यपूर्ण आहे ! तो कोण याचा उलगडा नाटकाच्या शेवटी होतो. ते धक्कातंत्र सुरेख आहे.
खुप छान लेख.
खुप छान लेख.
काही मोजकी नाटके यु ट्यूबवर पहिली. त्यातले "डॉक्टर तुम्ही सुद्धा" या नाटकाने खिळवून ठेवले. जबरदस्त गोळीबंद लेखन आणि अभिनेते गिरीश ओक, प्रतीक्षा लोणकर समीर पाटील यांचा अप्रतिम अभिनय या मुळे हे नाटक विसरू शकत नाही.
<< कदाचित, अजून पंचवीस तीस वर्षांनी वरील हेतू साध्य करण्यासाठी सशुल्क आंतरजाल वाहिन्या हेच व्यावसायिक नाटक सादरीकरणाचे महत्त्वाचे माध्यम ठरेल काय? माहित नाही. सच्चा नाट्यप्रेमीला हा विचार मानवणारा नसला तरी भविष्यात तो स्वीकारायला लागू शकतो.>>
असा " नेटक" नावाचा अभिनव उपक्रम लॉकडाऊनच्या काळात अभिनेते-दिग्दर्शक हृषीकेश जोशी यांनी केला होता. त्यात बरेच तांत्रिक प्रयोग केले होते. या संबंधीची मुलाखत मुळापासून ऐकण्यासारखी आहे. या चर्चेत मराठीतल्या दिग्गज कलाकारांचा समावेश होता.
धागा :
https://www.youtube.com/watch?v=bAmKvbfbMeE
मला पु. ल. चं
छान चर्चा
पुढारी पाहिजे...पु.ल.
कुठे मिळेल?
असा " नेटक" नावाचा अभिनव
असा " नेटक" नावाचा अभिनव उपक्रम >>>
होय, आठवले.
त्याबद्दलचा लेख मी तेव्हा वाचला होता. आता युट्युब दुवा बघतो
धन्यवाद !
द सा
द सा
इथे पहा बरं
https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b51382&lang=marathi
वसंत कानेटकरांचं सूर्याची
वसंत कानेटकरांचं सूर्याची पिल्ले हे माझं अत्यंत आवडतं नाटक आहे, मूळ दामूकाका केंकरे ह्यांनी दिग्दर्शित केलेलं, विडिओसाठी विजय केंकरे ह्यांनी दिग्दर्शित केलेलं.मोहन गोखले, सदाशिव अमरापूरकर, बाळ कर्वे,,दिलीप प्रभावळकर,नीरा आडारकर अशी तगडी स्टार कास्ट आहे.पूर्वी त्यात माधव वाटवे आणि शांताबाई जोग हे दोघेही काम करायचे ,फार आवडतं मला .
वसंत कानेटकरांचं अखेरचा सवाल
वसंत कानेटकरांचं अखेरचा सवाल हे पण एक चांगले नाटक आहे.
सुकन्या कुलकर्णी, संजय मोने आणि इतर कलाकार पण छान.
https://www.youtube.com/watch?v=DmuCU9Y33sg
घेत्लं शिंगावर नावाचं एक नाटक
घेतलं शिंगावर नावाचं एक नाटक मला लहानपणी आवडलं होतं. स्मिता तळवलकर, मोहन जोशी, आनंद अभ्यंकर, दिलीप प्रभावळकर... वगैरे. ते आहे युट्युबवर. अगदी खळखळून पोट धरून हसायला लावणारं अजिबात नाही. पण मिश्किल आहे. शिवाय त्यात रहस्य, चुकामूक, गैरसमज वगैरे सगळे आवश्यक गुण आले आहेत.
उत्तम संकलन होत आहे. धन्यवाद
उत्तम संकलन होत आहे. धन्यवाद !!
...
वसंत कानेटकर यांच्या वरील सर्व नाटकांबाबत सहमत. +१११
मागे एकदा दिवाळी अंकात मराठी नाटककारांचा आढावा घेणारा लेख वाचला होता. साधारणपणे प्रत्येक दशकात मराठी रंगभूमी एका ठराविक साच्यात अडकलेली होती. त्यावेळी पुढच्या पिढीतील नाटककाराने तिला त्या साच्यातून बाहेर काढण्याचे काम केले.
त्यात कानेटकरांबद्दल लिहिलेला उल्लेख आवडला होता:
“कानेटकरांनी मराठी रंगभूमीला तुळशी वृंदावनाभोवतालच्या फेऱ्यांमधून बाहेर काढले”.
छानच लेख.
छानच लेख.
उत्तम संकलन होत आहे. धन्यवाद !! >>+1
घेतलं शिंगावर मनोहर काटदरे
घेतलं शिंगावर मनोहर काटदरे ह्यांचं आहे का?
होय, मनोहर काटदरे ह्यांचंच
होय, मनोहर काटदरे ह्यांचंच आहे.
दिग्दर्शक : संजय सूरकर
उत्तम संकलन होत आहे. धन्यवाद
उत्तम संकलन होत आहे. धन्यवाद !! >>+1
काल सुंदर मी होणार बघितले.
काल सुंदर मी होणार बघितले.
कुमार ह्या धाग्यासाठी धन्यवाद ! जमेल तशी सुचवलेली नाटकं बघीन ...
ताई
ताई
बऱ्याच दिवसांनी तुमची भेट झाली आणि छान वाटले !
ते नाटक आहेच सुंदर
प्रशांत दामले ची सर्व नाटके
प्रशांत दामले ची सर्व नाटके(लाडाने बोलत असल्याने आदरार्थी संबोधन वापरत नाहीये.) शिवाजी मंदिर ला पाहिली आहेत.आम्ही 4.40 च्या रेल्वे ने जाऊन, 8 ला पोहचून, विसावा ला नाशता कम जेवण करून, 11.30 ची तिकिटं काढायचो.
प्रभावळकरांचं वासूची सासू,तरुण तुर्क म्हातारे अर्क तोरडमल आणि सुनील तावडे राजन पाटील हा क्रु असताना पण पाहिलंय.इतकी मस्त नाटकं मूळ संचासह बघता आली याबद्दल खूप लकी वाटतं.आता नाटकं पाहिली जात नाहीत.बुकमायशो वर तिकिटं मिळतात, पण खूप महाग आणि वेळा सोयीच्या नसतात.
नाटक, नाटकातली संवाद फेक हा थोडा लाऊड,पण लाईव्ह मध्ये एकदम भारी वाटणारा प्रकार आहे.व्हिडीओत पण फार खटकत नाही.
छान !
छान !
.........
दिवाणखान्यातील नाटकांना कंटाळला असाल तर बदल म्हणून इथले कोर्ट मार्शल हे अनुवादित नाटक (मूळ हिंदी) जरूर पहा.
(https://www.youtube.com/watch?v=1_ytLzmHik4&t=2176s)
दिग्दर्शक: प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे.
लष्करी न्यायालयाच्या पटावर हे नाटक घडते. एका जवानाने त्याच्यावर झालेल्या जातिवाचक अन्याय व मानहानीचा बदला म्हणून दोन लष्करी अधिकाऱ्यांवर गोळीबार केलेला असतो आणि त्यातील एक अधिकारी मरण पावतो. त्या जवानावरील हा लष्करी न्यायालयीन खटला आहे.
लष्करी न्यायाधीशाच्या भूमिकेत प्रा. विजय दिवान तर आरोपीच्या वकिलाच्या भूमिकेत डॉ. चंद्रकांत शिरोळे आहेत. या दोघांचीही कामे खूप आवडली.
'अखेरचा सवाल' पहाते आहे. फार
'अखेरचा सवाल' पहाते आहे. फार रडं नाटक आहे ब्वॉ. बोअर झालं मला तरी.
यू ट्युबवर काही
यू ट्युबवर काही नाट्यस्पर्धेतल्या प्रयोगांचे चित्रीकरण आहे. ते पाहताना काही मर्यादा उघड असतात. रंगमंच आणि त्यावरील कलाकार हे आपल्यापासून खूप दूर असल्यासारखे दिसतात; काही वेळेस धूसरही. रंगमंचाच्या पायथ्याशी बसलेल्या तंत्रज्ञांची डोकी आणि त्यांच्या संगणकाचे वरचे भागही दिसतात ! तसेच संवादही स्वच्छ ऐकू येत नाहीत. त्यामुळे अशी नाटके पाहण्याचे सहसा टाळले जाते.
पण अशी काही जुनी नाटके आता चांगल्या व्यावसायिक कलाकारांना घेऊन इथे उपलब्ध होणे अवघड वाटते.
म्हणून हिय्या करून मी तेंडुलकरांचे (स्पर्धेतले) कमला नाटक पाहिले आणि एक चांगला नाट्य अनुभव मिळाला. त्या कलाकारांनी खरंच समरसून अभिनय केलेला आहे. संवाद ऐकताना मात्र इअरफोन्स लावलेले चांगले.
नाटक १९७०मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. उत्तर भारतातील ढोलापुरात चालत असलेल्या स्त्री-विक्री बाजारातून इंडियन एक्सप्रेसचा एक पत्रकार एका बाईला २३०० रु. ना विकत घेऊन येतो आणि तिला पत्रकार परिषदेत पुरावा म्हणून सादर करतो, ही ती घटना.
नाटकाचा सारांश दोन वाक्यात सांगता येईल:
१. बायकोसह कुठलीही स्त्री ही पुरुषाच्या दृष्टीने व्यवहारातील फक्त एक प्यादे आहे.
२. हुच्च सनसनाटी इंग्लिश पत्रकारितेचा केलेला दंभस्फोट.
पत्रकाराने विकत आणलेली कमला जेव्हा खुद्द त्याच्याच बायकोला विचारते,
“तुला केवढ्याला विकत घेतलेले आहे ?”
हे भेदक वाक्य म्हणजे नाटकाचा आत्मा आहे.
तसेच...
“अहो, मोठ्या पेपरला प्रतिष्ठा नसते, त्यांना असतो तो फक्त खप आणि जाहिराती !”
या वाक्यातून तसल्या पत्रकारितेच्या अक्षरशः चिंध्या उडवलेल्या आहेत.
'कमला'वर त्याच नावाचा हिंदी
'कमला'वर त्याच नावाचा हिंदी चित्रपट आहे.
>>>'कमला'>>>
>>>'कमला'>>>
पहायला पाहिजे. तेंडुलकरांची अजून राहून गेलीत.
>>>'कमला'>>>
ड पो
कमला : नाटक-लेखन/
कमला : नाटक-लेखन/ नाट्यप्रयोग/ चित्रपट
कमला हे मूळ नाटक कोणी वाचलेले किंवा प्रत्यक्षात पाहिलेले असल्यास माझी एक शंका आहे.
गिरीश कारनाड यांचा ‘विजय तेंडुलकर: उत्तरपक्ष’ हा एक लेख मी वाचला आहे. त्यात त्यांनी या नाटकातील खटकणाऱ्या गोष्टींवर टीका केलेली आहे. नाटकाच्या शेवटाबद्दल त्यांनी असे लिहिले आहे,
“नाटकाच्या अखेरच्या रंगसूचनेनुसार सरिता नवऱ्याच्या पायातील जोडे काढून ठेवते आणि खाली जमिनीवर बसते”.
इथे youtube वर मी जे नाटक पाहिले त्यात जोडे काढणे दाखवलेले नाही. हिंदी चित्रपट मी पाहिलेला नव्हता परंतु आत्ता फक्त त्याचा शेवट बघितला. तिथेही तो जोडे काढण्याचा प्रसंग नाही.
म्हणजेच, मूळ नाटकाच्या शेवटात (सामाजिक टीका झाल्यावर वगैरे ??) नंतर बदल केला होता का ? की नाटक रंगमंचावर/ चित्रपटात आणताना त्यात कालानुरूप / दिग्दर्शकीय बदल केला गेला आहे ?
कमला - सिनेमा पाहीलेला आहे.
कमला - सिनेमा पाहीलेला आहे.
मस्त धागा.
मस्त धागा.
(वरील लिंकवर ३८.०२ पासून आहे, इच्छुकांनी लाभ घ्यावा) पण हे मला प्रत्यक्ष रंगभूमीवर कधीच बघायला मिळाले नाही.
शांतेचं कार्ट अशक्य विनोदी आहे, कितीही वेळा बघू शकेन. सुदैवाने यूट्यूबवर उपलब्ध आहे: https://www.youtube.com/watch?v=twOnQ3JCTxE
सुधीर जोशी, लक्ष्या, रवींद्र बेर्डे, उज्ज्वला जोग आणि सर्वात भारी डोक्यात फूल उभे खोवणारी नयनतारा! तिची सुनेबद्दलच्या अटींची लिस्ट तर कळस आहे
रंगभूमीवर बघितलेली काही अशी आहेतः
ऑल द बेस्ट (संपदा जोगळेकर, अंकुश, भरत, नार्वेकर इ)
टूरटूर
एका लग्नाची गोष्ट
ती फुलराणी (भक्ती बर्वे)
रंग उमलत्या मनाचे (बहुतेक सुमित राघवन)
नाटक नाही पण अशोक हांडेंचे मराठी ऑर्केस्ट्रा विसरु शकत नाही. मंगलगाणी दंगलगाणी आणि नंतर अजून एक उत्तम होता. मराठी बाणा (?) बहुतेक. फॉर मी, मराठी नाटक = मुलुंड कालिदास नाट्यगृह विथ मध्यंतरात येणारा बटाटेवडा +पर्फ्यूमचे सुगंध + प्रेक्षकात दिसणारे ओळखीचे चेहरे! गेले ते दिन गेले!
Pages