यू -ट्युबवरील मराठी नाटके: दृष्टीक्षेप

Submitted by हेमंतकुमार on 17 April, 2023 - 23:33

नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत.

काल पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला. त्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटले आहे की नाटकांचे प्रयोग करून आम्ही कधीच दमत नाही परंतु रंगमंदिरांबाबतच्या तक्रारी करून मात्र आता खरंच प्रचंड दमलो आहोत ! त्यांचे हे विधान सर्व कलाकार व नाट्यरसिकांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.

आता एकंदरीत रंगमंदिरांची भाडेवाढ, कमालीची अव्यवस्था आणि अस्वच्छता, घटता प्रेक्षकवर्ग आणि आंतरजालावरील उपलब्ध असलेली व्यापक करमणूक या सगळ्यांचा परिणाम प्रत्यक्ष नाट्यप्रयोगांवर झालेला दिसतो. कोणे एकेकाळी रंगमंदिरातील बाल्कनीमधून कमी दरात नाटक पाहायची सोय असायची. अलीकडे ती बंद झाल्यात जमा आहे. त्यामुळे फक्त खालच्या मजल्यावरील आसनव्यवस्थेतील नाटकांचे वाढीव दर हे सर्वांनाच परवडण्याजोगे नाहीत. मध्यंतरीच्या कोविड पर्वात तर जाहीर नाट्यप्रयोग दीर्घकाळ बंदच होते.

मी काही महिन्यांपूर्वी रंगमंदिरात जाऊन २ नाटके पाहिली. तेव्हा ते नाटक संपल्यानंतर त्यातील चारही कलाकारांनी उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन केले. तसेच त्यांनी त्यांच्या पुढील प्रयोगांची जाहिरातही अशी केली:

" नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास जरूर सांगा, जेणेकरून ही खालची सर्व आसने भरली जावीत".

यावर अधिक बोलणे न लगे.

खऱ्याखुऱ्या नाट्य रसिकाला अधूनमधून नाटक पाहिल्याशिवाय काही चैन पडत नाही आणि नवे नाटक वरील कारणांमुळे पाहण्याचे राहून जाते. मग अशा रसिकासाठी दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवण्यासाठी आंतरजालावरील युट्युबचा एक बरा पर्याय उपलब्ध आहे. तिथे आपल्याला अनेक जुनी नाटके पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी काही नाटके ही मुळातच चांगल्या अनुभवी कलाकारांना घेऊन व्यावसायिक पद्धतीने चित्रित केलेली आहेत. काही नाटके महाराष्ट्रातील विविध नाट्य स्पर्धांमध्ये किंवा हौशी रंगभूमीवर सादर झालेली आहेत. तर अन्य काही नाटके दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पूर्वी प्रक्षेपित झालेली आहेत.

गेल्या ७ वर्षांमध्ये युट्युबवरील अशा अनेक नाटकांचा मी आस्वाद घेतला. मी पाहिलेल्या नाटकांची यादी एक संदर्भ म्हणून इथे लिहून ठेवतो. यथावकाश प्रतिसादांमधून त्या नाटकांबद्दल अजून माहितीची भर घालत राहीन. ज्या वाचकांनी या माध्यमातून नाटके पाहिली असतील त्यांनीही प्रतिसादांमधून त्या नाटकाबद्दल थोडक्यात लिहायला हरकत नाही. अशा तऱ्हेने या धाग्याच्या निमित्ताने मराठी नाटकांची एक आंतरजाल संदर्भयादी सर्वांसाठी उपलब्ध राहील.

आता थोडे अशा नाटकांच्या चित्रफित-दर्जाबद्दल. काही नाटकांचा दर्जा खरोखरच उत्तम आहे. काहींचा तो मध्यम आहे परंतु त्यातून नाट्य संवादांचा अनुभव चांगला घेता येतो. सह्याद्री वाहिनीवरील जी नाटकं इथे चढवली गेली आहेत त्यांचा दर्जा मात्र साधारण आहे आणि त्यातील ध्वनीमुद्रण फारसे खास नसते.

प्रतिसादांमधून लिहिताना आपणही संबंधित नाटकाचे नाव, लेखक, प्रमुख कलाकार, तुमचे मत आणि चित्रफितीच्या दर्जाबद्दल जरूर लिहावे. आता मी पाहिलेल्या नाटकांची लेखकानुसार फक्त यादी लिहितो. ती गेल्या ५-७ वर्षांपासून पाहत असल्याने आता एकदम प्रत्येकाबद्दल छोटा परिच्छेद लिहीणे अवघड आहे. पण अगदी अलीकडे जी नाटके पाहिलीत किंवा यापुढे जी पाहीन, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती प्रतिसादांमधून देईन. या नाटकांचा लेखनकाल अंदाजे गेल्या ५०-५५ वर्षांपूर्वीपासूनचा आहे. सध्याच्या तरुण पिढीला आवड असल्यास ही नाटके जरूर पाहता येतील. त्यातले एखादे नाटक आपण पूर्वी प्रत्यक्ष रंगमंदिरात पाहिले असल्यास आता त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येईल.

मी पाहिलेली (चित्रित) नाटके:

* विजय तेंडुलकर
शांतता ! कोर्ट चालू आहे
अशी पाखरे येती
सखाराम बाईंडर
कमला

*जयवंत दळवी
बॅरिस्टर, पर्याय, लग्न, महासागर

*वसंत कानेटकर
अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, बेइमान, मला काही सांगायचंय

* पु ल देशपांडे
सुंदर मी होणार

* आचार्य अत्रे

तो मी नव्हेच

* रत्नाकर मतकरी
इथं हवय कुणाला प्रेम

* शं ना नवरे
सूर राहू दे
धुक्यात हरवली वाट

* मधुसूदन कालेलकर
शिकार

* अशोक समेळ
कुसुम मनोहर लेले
{केशव मनोहर लेले : लेखक आठवत नाही. सध्या उपलब्ध नाही }

* प्र. ल. मयेकर
आसू आणि हसू

* उदय नारकर
खरं सांगायचं तर ( मूळ इंग्लिश; अगाथा ख्रिस्ती)

* शेखर ढवळीकर
नकळत सारे घडले

* डॉ. शिरीष आठवले
मित्र

* समीर कुलकर्णी
तुझ्या माझ्यात

* वसंत सबनीस
कार्टी काळजात घुसली

* मनोहर सोमण
द गेम

* विजय निकम
रघुपती राघव राजाराम

*सुरेश जयराम
डबल गेम

* चंद्रशेखर गोखले
अनोळखी ओळख

* शिवराज गोर्ले
बुलंद

* क्रांती बांदेकर
कोर्ट मार्शल (मूळ हिंदी - स्वदेश दीपक)

*सुरेश खरे
ती वेळच तशी होती

* बाळ कोल्हटकर
वेगळं व्हायचंय मला
..

मागच्या पिढीतील गाजलेले अभिनेते प्रभाकर पणशीकरांच्या वरीलपैकी एका नाटकाच्या शेवटी त्यांची मुलाखत दिलेली आहे. त्यात त्यांनी नाटकांच्या चित्रीकरणाबद्दलचे त्यांचे बदललेले मत व्यक्त केले आहे. एकेकाळी त्यांचा अशा चित्रीकरणाला कट्टर विरोध होता. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले, की महाराष्ट्रातील मोजकी पाच सहा शहरे वगळता अन्यत्र जिल्हा पातळीवर देखील चांगली नाट्यगृहे नाहीत. जर नाटकाला महाराष्ट्रातील सर्व इच्छुक प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे असेल तर आता नाटक चित्रीकरण हाच पर्याय उरतो.

कदाचित, अजून पंचवीस तीस वर्षांनी वरील हेतू साध्य करण्यासाठी सशुल्क आंतरजाल वाहिन्या हेच व्यावसायिक नाटक सादरीकरणाचे महत्त्वाचे माध्यम ठरेल काय? माहित नाही. सच्चा नाट्यप्रेमीला हा विचार मानवणारा नसला तरी भविष्यात तो स्वीकारायला लागू शकतो.
***********************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे ओशाळला मृत्यु पहात होते. अप्रतिम कामे केलीत. अर्धवट पाहीले. काहीतरी काम निघाल्याने, नाटक सोडुन जावे लागले. आता वीकेन्डला, पूर्ण करेन.

गार्बो पाहून संपवले. प्रायोगिक बघायची सवय नसल्यामुळे डोके जड पडते.
कलाकारांचा अभिनय चांगला आहे.

कथा कुणाची व्यथा कुणा
गो. गं. पारखी

नाटक दुसऱ्यांना पाहिले. चांगले आहे. रहस्यकथा वाचून त्यातून खुनाची कल्पना मिळते हा विषय. प्रसाद पंडित यांनी खलनायकाची भूमिका उत्तम वठवली आहे.
https://www.youtube.com/watch?v=Tak73S-b1Xg

पाहुणा
अभिराम भडकमकर

व्यावसायिक शास्त्रीय गायक होण्याच्या उद्देशाने गावाकडून मुंबईत आलेला पाहुणा अखेर पाहुणाच राहतो का ?
प्रशांत दामले एका चांगल्या गंभीर भूमिकेत
https://www.youtube.com/watch?v=iwRnu18V8BA

सर्वांचा अभिनय उत्तम. आवडले.

मुक्ता
जयवंत दळवी

एका बेवारस मनोरुग्ण स्त्रीची कथा आणि व्यथा आणि आजूबाजूच्या पुरुष समाजाची दांभिकता आणि चोची मारण्याची वृत्ती.
चित्रीकरण सुरेख.

https://www.youtube.com/watch?v=OP5JkrPWF04

झुंज
लेखक: मधुकर तोरडमल
३ अंकी

एका महाविद्यालयातील प्राचार्य पदावरून सुरू असलेला जातीय संघर्ष आणि त्या पार्श्वभूमीवर उद्भवलेली उपोषणाची गंभीर परिस्थिती, हा नाटकाचा मुख्य विषय आहे.
उत्तम !
https://www.youtube.com/watch?v=EMH-DhWa-Lk

मधुकर तोरडमलांची नाटके त्या काळी गाजली असतील पण ती भलतीच नाटकी असत, अगदी तोरडमलांच्या अभिनयासहीत.
गगनभेदी या नाटकाची कय जाहीरात होती आणि नाटक एकदम फुसकं. त्याचं पुस्तक वाचलं होतं. ते नाटकापेक्षा जरा बरं होतं.

1970 च्या दशकातील त्यांचे तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक खूप आवडले होते.
त्याचा ठसा दीर्घकाळ उमटून राहिला.

त तु म्हा अ या नाटकाबद्दल ऐकून आहे. पण कधी बघण्याचा योग नाही आला. मधुकर तोरडमलांचे नाटक त्यांचा जमाना ओसरल्यावर दूरदर्शनवरच बघता आले. पण अखेरचा सवाल आणि अशा काही नाटकांची पुस्तके प्रकाशित व्हायची ती वाचलेली आहेत. अखेरचा सवाल हे नाटक सुद्धा आवडले नव्हते. कथा आठवत नाही, पण नायिका व्हीलचेअरवर असते हे लक्षात आहे. ते ही मूळ संचात नाही पाहिले.

या नाटकांचे विषय जुने झाले असल्याने कदाचित आवडले नसतील. जुने सिनेमे, नाटकं, पुस्तकं वाचताना, बघताना त्या त्या काळात कोणती नैतिक मूल्यं होती, विचारसरणी कशी होती याचा अंदाज येतो हे त्यांचं महत्व आहे. पण त्यांचे विषय कालबाह्य होतात. जुन्या मंडळींना नॉस्टॅल्जिया मुळे या कलाकृती आवडतात. त्यात काही गैर नाही. अशा कलाकृतींमुळे तो काळ त्यांच्यापासून कधीच हिरावून घेता येत नाही.

* अशा कलाकृतींमुळे तो काळ त्यांच्यापासून कधीच हिरावून घेता येत नाही. >>>
अगदी ! +१२३
विशेषतः कॉलेजच्या वयात पाहिलेल्या नाटकांचा ठसा मनावर दीर्घकाळ राहतो.

अखेरचा सवाल कानेटकरांचं.
नायिकेला कॅंसर होतो.
मिली हा चित्रपट त्यावरून बेतलेला आहे.
पण त्यात नायिकेला आईच नाही.

मुलीच्या कॅंसरची माहिती डॉक्टर आई सगळ्यांपासून लपवून ठेवते आणि ते दु:ख एकटीने सोसते.
मुलीला हे कळतं.
आज मी तुला थोडी आई होते, असं मुलगी आईला म्हणते हा संवाद लक्षात आहे.

भाग्यवान
पु.ल. देशपांडे

एका रद्दी विक्रेत्यांनी धनलाभ झाल्यानंतर दाखवलेली मनाची श्रीमंती व सुसंस्कृतपणा

https://www.youtube.com/watch?v=skHRFVKOYNI

एक झुंज वाऱ्याशी
पु. ल. देशपांडे
एक सामान्य माणूस एका आरोग्य- उपमंत्र्याच्या खोलीत शिरून राजीनामा मागतो - दुसऱ्या कुणावर तरी झालेल्या अन्यायासाठी आणि तेही सगळ्या पुराव्यांनीशी. या घटनेवर बेतलेले.

हौशी कलाकारांचा प्रयोग; ध्वनिमुद्रण सदोष.
एकंदरीत ठीकठाक.
https://www.youtube.com/watch?v=tU0JKyMxzgI

परवा मी संगीत शारदा बघितलं .
जवळ जवळ शंभर वर्षापूर्वीच नाटक , जरठ कुमारी विवाहा सारखा कालबाह्य विषय पण नाटकाने मला खिळवून ठेवले.

मिस्टर ना.म.देव म्हणे
प्र ल मयेकर
अरुण नलावडे, मिलिंद फाटक व इतर (सर्व पुरुषपात्रे)
मुंबई . . बकालपणा . . मराठी माणूस . . परप्रांतीय, वगैरे ज्वलंत प्रश्न

https://www.youtube.com/watch?v=S26Z69T1Dto

संगीत कुलवधू
मो. ग. रांगणेकर
सर्व पात्रांचा सुरेख अभिनय. चित्रीकरणही उत्तम.
1942मधील काही संदर्भ पाहताना आता गंमत वाटते. उदा. : “मुंबईच्या वर्तमानपत्रातल्या मुलं न होण्याच्या जाहिराती”.. .
शेवटच्या दहा मिनिटातले संवाद अतिशय प्रभावी.

https://www.youtube.com/watch?v=cppgS9KrVK8&t=5919s
. .
रोचक :
“पुण्यातील ज्या थिएटरमध्ये कुलवधू नाटकाचे प्रयोग सलग महिनाभर रोज रात्री हाऊसफुल्ल गर्दीत झाले, त्या थिएटरचे नाव कुलवधू नाटकातील नायिकेच्या नावावरून पुढे भानुविलास असे ठेवण्यात आले”:
https://divyamarathi.bhaskar.com/news/mah-pun-after-70-years-sangeet-kul...

Pages