यू -ट्युबवरील मराठी नाटके: दृष्टीक्षेप

Submitted by कुमार१ on 17 April, 2023 - 23:33

नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत.

काल पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला. त्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटले आहे की नाटकांचे प्रयोग करून आम्ही कधीच दमत नाही परंतु रंगमंदिरांबाबतच्या तक्रारी करून मात्र आता खरंच प्रचंड दमलो आहोत ! त्यांचे हे विधान सर्व कलाकार व नाट्यरसिकांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.

आता एकंदरीत रंगमंदिरांची भाडेवाढ, कमालीची अव्यवस्था आणि अस्वच्छता, घटता प्रेक्षकवर्ग आणि आंतरजालावरील उपलब्ध असलेली व्यापक करमणूक या सगळ्यांचा परिणाम प्रत्यक्ष नाट्यप्रयोगांवर झालेला दिसतो. कोणे एकेकाळी रंगमंदिरातील बाल्कनीमधून कमी दरात नाटक पाहायची सोय असायची. अलीकडे ती बंद झाल्यात जमा आहे. त्यामुळे फक्त खालच्या मजल्यावरील आसनव्यवस्थेतील नाटकांचे वाढीव दर हे सर्वांनाच परवडण्याजोगे नाहीत. मध्यंतरीच्या कोविड पर्वात तर जाहीर नाट्यप्रयोग दीर्घकाळ बंदच होते.

मी काही महिन्यांपूर्वी रंगमंदिरात जाऊन २ नाटके पाहिली. तेव्हा ते नाटक संपल्यानंतर त्यातील चारही कलाकारांनी उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन केले. तसेच त्यांनी त्यांच्या पुढील प्रयोगांची जाहिरातही अशी केली:

" नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास जरूर सांगा, जेणेकरून ही खालची सर्व आसने भरली जावीत".

यावर अधिक बोलणे न लगे.

खऱ्याखुऱ्या नाट्य रसिकाला अधूनमधून नाटक पाहिल्याशिवाय काही चैन पडत नाही आणि नवे नाटक वरील कारणांमुळे पाहण्याचे राहून जाते. मग अशा रसिकासाठी दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवण्यासाठी आंतरजालावरील युट्युबचा एक बरा पर्याय उपलब्ध आहे. तिथे आपल्याला अनेक जुनी नाटके पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी काही नाटके ही मुळातच चांगल्या अनुभवी कलाकारांना घेऊन व्यावसायिक पद्धतीने चित्रित केलेली आहेत. काही नाटके महाराष्ट्रातील विविध नाट्य स्पर्धांमध्ये किंवा हौशी रंगभूमीवर सादर झालेली आहेत. तर अन्य काही नाटके दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पूर्वी प्रक्षेपित झालेली आहेत.

गेल्या ७ वर्षांमध्ये युट्युबवरील अशा अनेक नाटकांचा मी आस्वाद घेतला. मी पाहिलेल्या नाटकांची यादी एक संदर्भ म्हणून इथे लिहून ठेवतो. यथावकाश प्रतिसादांमधून त्या नाटकांबद्दल अजून माहितीची भर घालत राहीन. ज्या वाचकांनी या माध्यमातून नाटके पाहिली असतील त्यांनीही प्रतिसादांमधून त्या नाटकाबद्दल थोडक्यात लिहायला हरकत नाही. अशा तऱ्हेने या धाग्याच्या निमित्ताने मराठी नाटकांची एक आंतरजाल संदर्भयादी सर्वांसाठी उपलब्ध राहील.

आता थोडे अशा नाटकांच्या चित्रफित-दर्जाबद्दल. काही नाटकांचा दर्जा खरोखरच उत्तम आहे. काहींचा तो मध्यम आहे परंतु त्यातून नाट्य संवादांचा अनुभव चांगला घेता येतो. सह्याद्री वाहिनीवरील जी नाटकं इथे चढवली गेली आहेत त्यांचा दर्जा मात्र साधारण आहे आणि त्यातील ध्वनीमुद्रण फारसे खास नसते.

प्रतिसादांमधून लिहिताना आपणही संबंधित नाटकाचे नाव, लेखक, प्रमुख कलाकार, तुमचे मत आणि चित्रफितीच्या दर्जाबद्दल जरूर लिहावे. आता मी पाहिलेल्या नाटकांची लेखकानुसार फक्त यादी लिहितो. ती गेल्या ५-७ वर्षांपासून पाहत असल्याने आता एकदम प्रत्येकाबद्दल छोटा परिच्छेद लिहीणे अवघड आहे. पण अगदी अलीकडे जी नाटके पाहिलीत किंवा यापुढे जी पाहीन, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती प्रतिसादांमधून देईन. या नाटकांचा लेखनकाल अंदाजे गेल्या ५०-५५ वर्षांपूर्वीपासूनचा आहे. सध्याच्या तरुण पिढीला आवड असल्यास ही नाटके जरूर पाहता येतील. त्यातले एखादे नाटक आपण पूर्वी प्रत्यक्ष रंगमंदिरात पाहिले असल्यास आता त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येईल.

मी पाहिलेली (चित्रित) नाटके:

* विजय तेंडुलकर
शांतता ! कोर्ट चालू आहे
अशी पाखरे येती
सखाराम बाईंडर
कमला

*जयवंत दळवी
बॅरिस्टर, पर्याय, लग्न, महासागर

*वसंत कानेटकर
अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, बेइमान, मला काही सांगायचंय

* पु ल देशपांडे
सुंदर मी होणार

* आचार्य अत्रे

तो मी नव्हेच

* रत्नाकर मतकरी
इथं हवय कुणाला प्रेम

* शं ना नवरे
सूर राहू दे
धुक्यात हरवली वाट

* मधुसूदन कालेलकर
शिकार

* अशोक समेळ
कुसुम मनोहर लेले
{केशव मनोहर लेले : लेखक आठवत नाही. सध्या उपलब्ध नाही }

* प्र. ल. मयेकर
आसू आणि हसू

* उदय नारकर
खरं सांगायचं तर ( मूळ इंग्लिश; अगाथा ख्रिस्ती)

* शेखर ढवळीकर
नकळत सारे घडले

* डॉ. शिरीष आठवले
मित्र

* समीर कुलकर्णी
तुझ्या माझ्यात

* वसंत सबनीस
कार्टी काळजात घुसली

* मनोहर सोमण
द गेम

* विजय निकम
रघुपती राघव राजाराम

*सुरेश जयराम
डबल गेम

* चंद्रशेखर गोखले
अनोळखी ओळख

* शिवराज गोर्ले
बुलंद

* क्रांती बांदेकर
कोर्ट मार्शल (मूळ हिंदी - स्वदेश दीपक)

*सुरेश खरे
ती वेळच तशी होती

* बाळ कोल्हटकर
वेगळं व्हायचंय मला
..

मागच्या पिढीतील गाजलेले अभिनेते प्रभाकर पणशीकरांच्या वरीलपैकी एका नाटकाच्या शेवटी त्यांची मुलाखत दिलेली आहे. त्यात त्यांनी नाटकांच्या चित्रीकरणाबद्दलचे त्यांचे बदललेले मत व्यक्त केले आहे. एकेकाळी त्यांचा अशा चित्रीकरणाला कट्टर विरोध होता. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले, की महाराष्ट्रातील मोजकी पाच सहा शहरे वगळता अन्यत्र जिल्हा पातळीवर देखील चांगली नाट्यगृहे नाहीत. जर नाटकाला महाराष्ट्रातील सर्व इच्छुक प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे असेल तर आता नाटक चित्रीकरण हाच पर्याय उरतो.

कदाचित, अजून पंचवीस तीस वर्षांनी वरील हेतू साध्य करण्यासाठी सशुल्क आंतरजाल वाहिन्या हेच व्यावसायिक नाटक सादरीकरणाचे महत्त्वाचे माध्यम ठरेल काय? माहित नाही. सच्चा नाट्यप्रेमीला हा विचार मानवणारा नसला तरी भविष्यात तो स्वीकारायला लागू शकतो.
***********************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>> subscribe करणे हा उपाय सोडून
पण 'सबस्क्राईब' केलेत तरी ती जाहीरात जाईलसे नाहीच.

अच्छा समजले.
ते नाटक दमादमानं पाहतो आहे .
संवाद मुक्तछंदात असून प्रगल्भ आहेत.
एकदम सगळे पेलणार नाही

आता वारंवार हेच ऐकायला मिळते आहे:

नाट्यगृहांतील गैरसोयीबाबत अभिनेता वैभव मांगलेंनी एक संतप्त फेसबुक पोस्ट लिहिली आहे. वैभव यांचा अलिकडेच ‘संज्या-छाया’ या नाटकांचा पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणी नाटकाचे प्रयोग झाले. तिथं आलेल्या अनुभवावर ही पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ' टपुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्रयोग 'संज्या छाया'चे प्रयोग झाले. एकाही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला.
प्रेक्षक देखील डास आणि प्रचंड उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास आणि उकाडा, कोथरूड यशवंतराव उकाडा) प्रयोग पाहत होते. एका मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का? याचा विचार करू लागले...'

https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainm...

आवड नसल्यामुळे पौराणिक नाटक कित्येक वर्षात पाहिले नव्हते. परंतु नुकतेच रत्नाकर मतकरी यांचे 1974 मधील आरण्यक पाहिले. ते पाहायला एक कारण घडले, गोष्ट खास पुस्तकाची (https://www.maayboli.com/node/82869) या पुस्तकात मतकरी यांनी त्या नाटकावर एक लेख लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. ती वाचल्यावर नाटकाबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली.
महाभारतातील विदुर, कुंती, ध्रुतराष्ट्र आणि गांधारी यांच्या वानप्रस्थाश्रमातील आयुष्यावर बेतलेले हे नाटक आहे; एक प्रकारचे उत्तरकांड.

नाटक मुक्तछंदात असून शब्दप्रधान आहे. त्यातील एकेक वाक्य इतके सुरेख आहे की काय विचारू नका. अनेक वाक्यांमध्ये खोल अर्थ आणि जीवनतत्वज्ञान भरलेले आहे. अरण्यामध्ये गांधारीच्या डोळ्यावरची पट्टी सोडतानाचा प्रसंग केवळ हृद्य आहे. तो संपताच प्रेक्षागृहातील प्रेक्षक टाळ्या वाजवताना दिसतात. आपणही सुन्न होतो.

एक सुंदर नाट्य अनुभव ! सुमारे अडीच तासांचे हे नाटक मी पाच टप्प्यांमध्ये विभागून पाहिले. ते एका दमात बघू नये हे माझे मत. सावकाश रवंथ करीत बघण्यात आणि ते समजावून घेण्यात खरी मजा आहे !

दिलीप प्रभावळकर (विदुर), रवी पटवर्धन (धृतराष्ट्र), प्रतिभा मतकरी (गांधारी) या दिग्गज कलाकारांसहित इतर सर्व कलाकारांच्या भूमिकाही उत्तम झाल्यात.

https://www.youtube.com/watch

एक सुंदर नाट्य अनुभव ! सुमारे अडीच तासांचे हे नाटक मी पाच टप्प्यांमध्ये विभागून पाहिले. ते एका दमात बघू नये हे माझे मत. सावकाश रवंथ करीत बघण्यात आणि ते समजावून घेण्यात खरी मजा आहे !>>>> या पाच टप्प्यातील अंतर किती होते? लिंक डिस्टर्ब होत नाही का?

प्र घा
मी एकूण दोन दिवस मिळून पाच टप्पे केले. मला पौराणिक प्रकार फारसे आवडत नसल्याने ही मी माझ्यापुरती केलेली विभागणी होती. ज्यांना आवडत असेल त्यांनी एका दमात बघितले तर काहीच हरकत नाही Happy

दुसरे म्हणजे, यातले संवाद मुक्तछंद काव्यात आहेत. ते सावकाश आणि एका वेळेस थोडे ऐकले तर अर्थबोध जास्त होतो असे मला वाटले. काही काही वाक्ये इतकी सुंदर आहेत की ती आपल्याला लिहून घ्यायचा मोह देखील होतो.
अशा वेळेस 100 मीटर धावण्याच्या शर्यतीपेक्षा निवांत मॅरेथॉन केलेली बरी !

पौराणिक नाटकांची पण एक वेगळीच मजा आहे. शाकुंतल, सौभद्र, स्वयंवर आणि नंतरची सुवर्णतुला इ. त्यातल्या नाट्यसंगीतासाठी. त्या काळात त्या नटांचा अभिनय, भरजरी कपडे , दागिने, अत्तरे हे आकर्षण होते आणि त्यावर सगळ्यात मोठा साज गाण्यांचा.
नंतरच्या काही नाटकांत त्यातलं नाट्य आणि व्यक्तिचित्रण हे आकर्षण - विद्याहरण, कौंतेय, ययाति आणि देवयानी, मत्स्यगंधा, इ.
मी यातली काही दूरदर्शनवर पाहिलीत. तर काही रेडियोवर ऐकलीत. दिवाळी निमित्त आकाशवाणीवर दुपारी संगीत नाटके ऐकवीत.

त्यातल्या नाट्यसंगीतासाठी.
>>> +११
अशी काही आवडती पदे मला ऐकायला आवडतात. संपूर्ण नाटक बघायला मात्र नको वाटते.
....
आरण्यकसारख्या महाभारतावर आधारित कलाकृतींचे एक वैशिष्ट्य आहे. त्या कधी जुन्या होत नाहीत. आता हेच 1974 मधले नाटक आपण आज किंवा अजून कित्येक वर्षांनी पाहतानाही त्यातील मूलभूत संकल्पना कालसुसंगतच राहतात.

कालच युट्युब वर आलेले हे नाटक पाहिले:
ब्लाइंड गेम

रत्नाकर मतकरी

रहस्यप्रधान गूढ नाटक
प्रत्यक्ष प्रयोगाचे चित्रीकरण आहे.
कोव्हिडबंदी नंतर प्रथमच नाट्यगृहात साकारलेला 'ब्लाइंड गेम'चा हा प्रयोग..मास्क आणि ५०% प्रेक्षकांच्या उपस्थितीत झाला होता.
चित्रीकरण ठीक परंतु संवाद नीट ऐकण्यासाठी हेडफोन्स लावलेले बरे.

‘ ब्लाइंड’ चे इथे दोन अर्थ आहेत- मुख्य कलाकार भाग्यश्री देसाई अंध भूमिकेत आहे आणि दिवाणखान्यातील खोलीला बसवलेले पडदे venetian blinds या प्रकाराचे आहेत. काही पात्रे त्या पडद्यांची उघडझाप करतात तो एक संकेत आहे.
एका अंध स्त्रीने तीन बदमाशांशी दिलेला लढा असे नाटकाचे कथानक आहे. नाटक बरे आहे.

https://www.youtube.com/watch?v=_az8tkCuWSQ

एका अंध स्त्रीने तीन बदमाशांशी दिलेला लढा असे नाटकाचे कथानक आहे.>>मूळ नाटक Wait Until Dark (1966) यावरून घेतले असेल. याच नावाने १९६७ साली चित्रपटही आला होता.

अच्छा, हे माहीत नव्हते. चांगली माहिती.
मतकरींनी मूळ नाटककाराला श्रेय दिले असावे. युट्युबवरील श्रेयनामावलीत तसा काही उल्लेख नाही,

सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित हे दोन चांगले नाट्य कलाकार आहेत.
नुकतीच त्या दोघांची एकत्रित मुलाखत "ग गप्पांचा" या मुलाखत मालिकेच्या १० व्या भागात प्रसारित झालेली आहे:

https://www.youtube.com/watch?v=X6e1HZ9zuvU
इच्छुकांनी जरूर लाभ घ्यावा.
चिन्मयीने इथल्या 'सखाराम बाईंडर' मध्ये काम केलेले आहे.
त्या संदर्भात तिच्या विजय तेंडुलकरांशी झालेल्या चर्चेबद्दल तिने काही सांगितले आहे.

परवा तुझे आहे तुजपाशी लिस्ट मध्ये आले. जुने नाटक आहे पुलंचे. पण आता नेपथ्य व संवाद जरा ओव्हर डन वाटतात. मी ह्याचा पण मूळ प्रयोग बघितला आहे.

छान.
…..
गुलमोहर
म. कालेलकर
मोहन जोशी, प्रदीप पटवर्धन, अशोक शिंदे आणि इतर

गुलमोहर नावाचा बंगला…. त्याचे हॉटेल रूपांतर… तिथे राहायला आलेले विविध लोक…. त्यातला एक लैंगिक कादंबरी लेखक….एक प्रेमभंग झालेली मध्यमवयीन बाई व तिची भाची…बंगल्याचा मालक तिथे येणे…
त्या तरुण भाचीचे प्रेमप्रकरण….
दुसरे मध्यमवयीन प्रेम प्रकरण…. होकार…… नकार…… गैरसमज…. दुर्घटना आणि गोड शेवट.

https://www.youtube.com/watch?v=jTfDXIf-Kc8&t=5455s

लहान मुलांसाठी youtube काही नाटके आहेत का? म्हणजे ती बालनाट्ये हल्ली असतात, त्यात मुले पाठ केल्या सारखे संवाद बोलतात तशी नव्हे..... लहान मुलांना समजतील अशी clean....... उदाहरण द्यायचे तर मी 'चिल्लर पार्टी' य चित्रपटाचे देऊ शकते. नाटक पटकन डोळ्यासमोर आले नाही.

शिल्लक
सागर देशमुख.
डॉ. विवेक बेळे, रूपाली भावे आणि इतर.

एक निम्न मध्यमवर्गीय नायक आणि त्याचे चौकोनी कुटुंब.
पत्नी एक सामान्य नोकरदार आणि गृहकृत्यदक्ष गृहिणी.
मुलगा चार वेळेस बारावी नापास होऊन आता छोटी मोठी संगणक हमाली करतोय.
मुलगी शाळेत आहे…

सतत आर्थिक तंगी.. थकलेली उधारी..
या सगळ्या वातावरणात नाटक तसेच शांतपणे पुढे सरकते. परंतु शेवटच्या पंधरा मिनिटात जरा वेगळीच कलाटणी मिळते.

नायक भ्रमिष्ट झालाय आणि काही वेळासाठी त्याच्यात ‘डोंबिवली फास्ट’ संचारलाय.
काहीसा गूढ शेवट.

नाटक जास्ती करून प्रकाशापेक्षा अंधारातच चालते. सामान्य घरातलं नेपथ्य अगदी उत्तम.
सर्व कलाकारांचे उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट.

एक तास वीस मिनिटांचा चांगला नाट्य अनुभव !

https://www.youtube.com/watch?v=4OhWwU7h08A

पर्याय
जयवंत दळवी
* उषा नाडकर्णी, सुधीर जोशी, जयंत सावरकर व इतर.

एकत्र कुटुंब:
कजाग सासू , मनमिळाऊ सासरा. मुलीचा नवरा ठोंब्या
हुंडाबळी हा नकोसा आणि अंगावर येणारा विषय.
शोकांतिका !
..
याच विषयावरचा एक मराठी चित्रपट आहे असे वाटते. नाव आठवत नाही

1980 च्या दशकात महाराष्ट्रात काही भयानक हुंडाबळीच्या घटना घडल्या होत्या. तेव्हा
"जाळल्या जाणाऱ्या महिला" हा भेदक अग्रलेख 'केसरीने ' लिहिला होता तो आठवतो.

इथं हवय कुणाला प्रेम
रत्नाकर मतकरी
* राजन भिसे, चिन्मय सुमित, स्वाती चिटणीस, वैभव मांगले व इतर

एक नाटककार आणि त्याला प्रेमाचे नाटक लिहायचा आग्रह करणारी एक प्रसिद्ध नटी ..

प्रेमाचे नमुने दाखवणाऱ्या विविध प्रसंग नाटिका. त्यांतून प्रेम, लग्न, संसार, निव्वळ सहजीवन, व्यापताप, घटस्फोट आणि जुन्या व नव्या जमान्यातील प्रेमाच्या व्याख्या या सगळ्यांवर मार्मिक भाष्य.

श्रवणीय गीते आणि प्रेक्षणीय समूह नृत्ये.
अखेरीस, “प्रेम असतं की नसतं” या पेचात पडलेला नाटककार आणि त्याच्या बायकोने त्याला एका प्रेमाच्या ‘नाटका’तूनच दिलेले उत्तर .

सुंदर नाटक व संगीतिका !
https://www.youtube.com/watch?v=N6a6fA3RFuw

गोष्ट जन्मांतरीची
वसंत कानेटकर
मोहन जोशी, कुणाल लिमये, भाग्यश्री देसाई व इतर.

एका हॉटेलमध्ये अनेक ठिकाणाहून विविध ग्राहक येऊ घातलेले..
अचानक आलेला एक ग्राहक म्हणजे डॉ. धर्मानंद लीलावती विश्वमित्र हा गणितज्ञ आणि प्राध्यापक. हा भविष्य सुद्धा सांगतो.
लोकांच्या पूर्वजन्मातील घटना वगैरे..

घाटात अचानक झालेल्या अपघातानंतर हॉटेलमध्ये आलेले एक जोडपे- उद्योगपती आणि त्याची खूप तरुण बायको.
त्या बायकोचे तिथे उतरलेल्या एका लेखकाबरोबर प्रेम संबंध जडणे.
उद्योगपतीची चिडचिड संताप वगैरे…
..
ठीक आहे परंतु कानेटकर यांच्या इतर नाटकांइतके नाही आवडले. चित्रफीत व ध्वनिमुद्रणाचा दर्जा साधारण.

‘बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी’ :
https://www.aksharnama.com/client/article_detail/6776

भारतीय आधुनिक रंगभूमीचे चार शिलेदार मानले जातात - बादल सरकार (बंगाली), गिरीश कार्नाड (कन्नड), मोहन राकेश (हिंदी) आणि विजय तेंडुलकर (मराठी). बादल सरकारांनी ‘तिसरी रंगभूमी’ ही संकल्पना मांडून नाटक आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर पुसणारे विविध प्रयोग केले. अशा या बादल सरकार आणि त्यांच्या तिसरी रंगभूमीची ओळख करून देणारे ‘बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी’ हे पुस्तक अविनाश कदम यांनी लिहिले आहे.
......
सरकारांचे एवम इंद्रजीत हे नाटक 1960 च्या दशकात गाजले होते.
त्या मूळ बंगालीचे हिंदी व गुजराती अनुवाद झाले होते. हिंदी नाटकाचा परीक्षणरूप लेख विजय तेंडुलकर यांनी सुरेख लिहिला होता.

जिगर
एक सुंदर दूरदर्शनपट ( २ भागांत).
चित्रपटापेक्षा नाटकाच्याच अधिक जवळ जाणारा.
सुंदर रहस्यप्रधान कथानक आणि दमदार संवाद .

* यशवंत रांजणकर
* अनंत जोग, अरुण नलावडे, सुनील बर्वे, क्षिती जोग व इतर
https://www.youtube.com/watch?v=xVC_uPRTrFQ

५ नोव्हेंबर रोजी झालेल्या मराठी रंगभूमी दिनानिमित्तचा
" आणि नाटक सुरू असतं" हा कार्यक्रम छान आहे
https://www.youtube.com/watch?v=fRZ49uAW0Yc

मराठी रंगभूमीची स्थित्यंतरे छान दाखवली आहेत.

६२ व्या राज्यनाट्य स्पर्धेतले नाटक (२०२३) :
https://www.youtube.com/watch?v=7N9ZU9hFzLU
एक्झिट
लेखक - अरविंद लिमये
दिग्दर्शक - उषा धावडे, मृणाल ढोले
कलाकार : मृणाल ढोले, किशोर तळोकार

एक गाजलेली अभिनेत्री नैराश्यात जाते. तिला बाहेर काढण्यासाठी तिच्या चाहत्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने रचलेले एक 'नाटकातले नाटक'.
ठीक आहे. ध्वनीमुद्रण सामान्य.
अगदी बघितलेच पाहिजे असे नाही…….

Pages