‘तें’ अजूनही अ-जून !

Submitted by कुमार१ on 26 January, 2021 - 04:55

शालेय वयात असताना पेपरांत मनोरंजनाच्या पानावरती विजय तेंडुलकर लिखित ‘शांतता ! कोर्ट चालू आहे’ या नाटकाची जाहिरात नेहमी दिसायची. जाहिरातीची रचना आणि या वैशिष्ट्यपूर्ण नावावरून त्याबद्दल खूप उत्सुकता वाटायची. पुढे कॉलेज जीवनातही अधूनमधून ती जाहिरात पाहिली. पण ते नाटक काही पाहणे झाले नाही. कॉलेजच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केलेले ‘घाशीराम कोतवाल’ पाहिले होते. सन 2000 च्या सुमारास टीव्हीवर तेंडूलकरांच्या नाटकांवर आधारित काही कार्यक्रम पाहण्यात आले. तेव्हा त्या चर्चांमधील दिग्गजांनी ‘शांतता’चा आवर्जून विशेष उल्लेख केलेला आढळला. दरम्यान ‘तें’ ची काही मोजकी पुस्तके मी वाचली. त्यामध्ये ‘कोवळी उन्हे’ हे ललिगद्य लेखन भलतेच आवडले. त्यातून ‘तें’ बद्दल मनात काहीसे कुतूहल निर्माण झाले होते.

अशातच एकदा युट्युबवर चक्कर मारली असता तिथे ‘शांतता’ हे नाटक उपलब्ध असल्याचे दिसले. मग तातडीने ते अधाशासारखे पाहिले. अर्थातच आवडले. त्या पाठोपाठ त्यांचेच ‘अशी पाखरे येती’ हेही नाटक तिथेच बघायला मिळाले. ‘तें’चे १-२ कथासंग्रह मी वाचनालयातून आणले होते पण ते अर्धवट वाचूनच परत केले होते. ‘तें’ नी सुमारे पन्नास वर्षांच्या( १९५० – २०००) त्यांच्या लेखन कारकि‍र्दीत विपुल लेखन केले आहे. त्यापैकी मी अत्यंत मोजक्या साहित्याचा आस्वाद घेतलाय. तरीसुद्धा त्यातून त्यांच्याबद्दल एक विलक्षण आदर वाटला आणि जबरदस्त आकर्षण वाटत राहिले. ‘तें’ना स्वर्गवासी होऊन आता तप उलटलेले आहे. मग आज अचानक मी त्यांच्याबद्दल का लिहितोय ?
सांगतो.

दोन महिन्यांपूर्वी पुस्तक प्रदर्शनात गेलो असताना एका २९२ पानी पुस्तकाने लक्ष वेधून घेतले. त्याचे नाव आहे ‘अ-जून तेंडुलकर’. रेखा इनामदार-साने यांनी संपादित केलेलं हे पुस्तक 2015 मध्ये प्रकाशित झालंय. मी उभ्यानेच पुस्तक दोनदा चाळले – आधी पुढून मागे आणि नंतर मागून पुढे. बस्स ! एवढ्यानेच लक्षात आले की ते माझ्यासाठी योग्य आहे. त्याच्या शीर्षकातला ‘अ-जून’ हा शब्दप्रयोग अगदी दिलखेचक ठरला. ‘तें’ना जाऊन बरीच वर्षे लोटली असली तरी त्यांच्या साहित्यावरील चर्चा मात्र अजूनही बरीच वर्षे चालणार आहे, असेच ते सुचवते. पुस्तकात नाट्यचित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या साहित्यावर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. सोबत संपादकांची दीर्घ प्रस्तावना देखील.

आता डोकावूया पुस्तकाच्या अंतरंगात. ‘मनोगता’तील संपादकांच्या पहिल्याच वाक्याने ‘तें’ च्या लेखनाचा व्यापक पल्ला व भिन्न आवाका लक्षात येतो त्यामध्ये एका टोकाला प्रसन्न आणि सतेज असे ललितलेखन, तर दुसर्‍या टोकाला वाचकाच्या अंगावर चालून येणारे लेखन यांचा समावेश आहे. पुस्तकात तब्बल 17 मान्यवरांचे लेख आहेत. प्रस्तावनेत स्पष्ट केल्याप्रमाणे हा निव्वळ गौरवग्रंथ नाहीच; किंबहुना तें च्या साहित्याचे अगदी सांगोपांग विच्छेदन करणारा समीक्षाग्रंथ आहे.

• या संग्रहलेखकांमधील काही ठळक नावे अशी :
गिरीश कार्नाड, शांता गोखले, रत्नाकर मतकरी, मुकुंद टाकसाळे. याशिवाय श्याम बेनेगल, जब्बार पटेल, अमोल पालेकर आदी दिग्दर्शकांच्या मुलाखतींचे शब्दांकनही केलेले आहे.

* पुस्तकात हाताळलेले ‘तें’ च्या साहित्याचे पैलू असे आहेत :
1. नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखा
2. नाटक आणि हिंसा
3. नाटकांतील रंगसूचना
4. एकांकिका, बालनाटिका व चित्रपटाच्या पटकथा
5. कथा व कादंबऱ्या आणि
6. ललित लेखन.

या व्यतिरिक्त ‘तें’ च्या ‘हे सर्व कोठून येते’ या व्यक्तिचित्रणात्मक एकाच पुस्तकाबद्दल तब्बल तीस पानी स्वतंत्र लेख आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर वरील मान्यवरांनी त्यांच्या लेखनाचे किती मार्मिक विश्लेषण आणि प्रसंगी चिरफाड केलेली आहे ते दिसते. त्यातील मला भावलेले काही ठळक मुद्दे लिहितो.

१. ते स्वतः पुरोगामी विचारांचे होते. तरीही त्यांनी नाटकातील स्त्रिया मात्र दुबळ्या, खचलेल्या आणि परिस्थितीशरण दाखवल्या आहेत. त्यांच्या बऱ्याच नाटकांचा पूर्वार्ध संपून उत्तरार्ध चालू झाला, की ‘तें’ आपले रंग बदलतात असे निरीक्षण गिरीश कार्नाडनी नोंदवले आहे.

२. माणसांच्या चेहऱ्यावरील मुखवटे उतरवून आतील हिंसा बाहेर काढून दाखवायचे काम ‘तें’नी अगदी चोख बजावले आहे. त्यानुसार तशा लेखनात रांगडी भाषा, अर्वाच्च्य शिव्या यांची त्यांनी मुक्त उधळण केलेली आहे.

३. नाटक हा वाचायचा साहित्यप्रकार नसून ते एक सादरीकरण असते याचे ‘तें’ ना पुरेपूर भान होते. त्यानुसार त्यांच्या रंगसूचना खूपच मौलिक आहेत. समकालीन नाटककारांशी तुलना करता त्यांचे हे वैशिष्ट्य नजरेत भरते. नाटक बरेच जण लिहू शकतात, पण नाटकांचे शेवट लिहावेत ते फक्त आणि फक्त ‘तें’ नीच, असेही एका नाट्यकर्मीने अनुभवातून लिहिले आहे.

४. ‘तें’ नाटककार म्हणून श्रेष्ठ आहेतच आणि जागतिक पातळीवरही त्यांचा सन्मान झालेला आहे. पण त्यांनी लिहिलेल्या चित्रपटांच्या पटकथांची भट्टी तितकीशी जमलेली नाही. यासंदर्भात त्यांचे दिग्दर्शकांशी तीव्र मतभेद झालेले असायचे.
५. त्यांनी दोनच कादंबऱ्या लिहिल्या आणि त्यांची नावेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत – ‘कादंबरी एक’ आणि ‘कादंबरी दोन’. त्यातील ‘एक’ मध्ये लग्नसंस्थेचे विदारक रुप त्यांनी समोर आणले आहे. इतकेच नाही तर तथाकथित सुखी संसाराची व्यवस्थित चिरफाड करूनही दाखवली आहे. कादंबरी म्हणून ती जमलेली नसली तरी लग्नसंस्थेच्या दुटप्पीपणावरचे त्यांचे भाष्य अत्यंत नेमकं आहे.

६. त्यांचे ललित लेखनही कमालीचे सुंदर आहे. त्यापैकी ‘कोवळी उन्हे’ हे मुळात वृत्तपत्रीय दैनिक सदर होते. त्यातील बहुतांश लेखन हे अगदी प्रसन्न आहे. यासंबंधीच्या लेखात मुकुंद टाकसाळे म्हणतात, की या संग्रहातील ३-४ लेख हे ‘तें’ नी लिहिलेले आहेत की पुलंनी, असा प्रश्न पडावा इतके ते मध्यमवर्गीय खाक्यातील आहेत.

‘तें’ च्या ‘शांतता !’ नाटकाने मी तर खूप प्रभावित झालो. एका परिसंवादात विजया मेहता म्हणाल्या होत्या की ‘तें’ चे ते अत्यंत महत्त्वाचे नाटक आहे. त्यांची चिकित्सा करताना आपल्याला शांतताची ठळक दखल घ्यावी लागते. या संदर्भात या नाटकाबद्दल प्रत्यक्ष घडलेला आणि मी वाचलेला एक किस्सा सांगायचा मोह होतोय.

या नाट्यप्रयोगात सुरुवातीपासून दीर्घकाळ बेणारेबाईंची भूमिका सुलभा देशपांडे करीत असत. त्याचा एक प्रयोग पुण्यात चालू होता. नाटकातील बेणारेबाई त्यांची दुर्दैवी कथा सांगून मंचावर हतबल अशा उभ्या असतात. तेवढ्यात प्रेक्षागृहातून एक प्रेक्षक चक्क रंगमंचावर चालत जातो आणि सुलभाताईपुढे उभा राहून त्यांना म्हणतो, “बेणारे बाई, मी तुम्हाला काही मदत करू का ?” त्यावर प्रेक्षागृह अक्षरशः हादरते आणि मग पुढे टाळ्यांचा कडकडाट होतो. या नाटकाच्या बाबतीत लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्हींच्या उत्कृष्टतेचा संगम झालेला असल्यानेच प्रेक्षकांवर त्याचा इतका खोल परिणाम होऊ शकतो. अशा अभूतपूर्व प्रसंगी आपण त्या प्रेक्षागृहात का नव्हतो याची चुटपुट नक्कीच लागून राहते !

‘तें’ त्यांच्या कारकिर्दीच्या पूर्वार्धात खरे गाजले ते घाशीराम, सखाराम बाइंडर, गिधाडे इत्यादी स्फोटक नाटकांमुळे. त्याकाळी त्यांना यासंदर्भात बराच काळ सामाजिक रोष आणि कोर्टकचेऱ्यांचाही सामना करावा लागलेला आहे. त्यांचे स्वतःचे आयुष्यही दुःखांनी भरलेले होते. पुढे त्यांनी अभ्यासवृत्तीच्या निमित्ताने गलिच्छ झोपडपट्ट्या, वेश्या वस्त्या आणि तुरुंग हेही पालथे घातले. एकंदरीत या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांचे बरेचसे लेखन हे प्रखर, स्फोटक आणि वाचकांच्या अंगावर येणारे झालेले असावे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेचा शेवट करताना संपादकांनी ‘तें’ चा अगदी ‘अर्क’ काढून आपल्यापुढे ठेवला आहे. कलेतून छान छान गोष्टी समाजापुढे मांडणारे कलावंत पुष्कळ असतात. पण समाजाचा कुरुप चेहरा दाखवणारे कलावंत तसे विरळा. त्यामुळेच असा लेखक कधी आपले ‘लाडके व्यक्तिमत्व’ बनू शकत नाही. पण मानवी मनाची चिरफाड करून (कटू) वास्तव समोर आणण्याची ‘तें’ ची कामगिरी समाजासाठी आवश्यक आणि अविस्मरणीय आहे हे निसंशय.
……………………….
अ-जून तेंडुलकर
संपादक : रेखा इनामदार-साने
राजहंस प्रकाशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान

पहिली आवृत्ती, २०१५
पाने २९२, किं. रु. ३००

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

‘अ-जून तेंडुलकर’.>>>> खरंच छान शीर्षक आहे.वाचायला हवे हे.

'तें' की तें नावाचे बाबा अशा नावाचे पुस्तक सुषमा तेंडुलकर यांनी लिहिले आहे.तेही वाचनीय आहे.

किती समर्पक शीर्षक आहे. तेंडुलकर काळाच्या किती तरी पुढे होते त्यामुळे ते अजून काही शे वर्षे 'अ-जून तेंडुलकर'च रहाणारं !! त्यांनी लिहिलेले जे जे वाचलंय ते नेहमीच काही तरी भर घालून गेलंय. 'कटू वास्तव' म्हणा किंवा 'रॉ इमोशन्स' म्हणा फार प्रामाणिक लिखाण वाटायचं त्यांचं...
सुरेख परिचय. धन्यवाद.

वरील सर्व साहित्यप्रेमी प्रतिसादकांचे आभार !

तेंडुलकरांच्या वाचकांबद्दल या पुस्तकाच्या प्रस्तावनेत एक महत्त्वाचे निरीक्षण लिहिलेले आहे.
समाजातील व्यापक असा वाचक वर्ग त्यांना लाभला होता. अगदी भिन्न वय, वृत्ती-प्रवृत्ती असलेल्या तसेच नोकरी अथवा व्यवसायाच्या दृष्टीने जराही साधर्म्य नसलेल्या स्त्री-पुरुषांनी त्यांच्या साहित्यावर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेले आहेत.
हा मुद्दा लेखकाच्या दृष्टीने कौतुकास्पद आणि साहित्याच्या दृष्टीने मोलाचा ठरतो.

माणस अंधश्रद्ध असतात कारण त्यांची ती गरज असते. असे तेंडुलकरांचे वाक्याचा संदर्भ मी पुस्तकात शोधत होतो . मिळाला नाही त्यात.

वरील सर्व साहित्यप्रेमी प्रतिसादकांचे आभार !

‘तें’चे लेखकांसाठी एक मार्गदर्शक कथन मला फार आवडते. त्यांना कोणीतरी विचारले होते, की चांगले लेखन करण्यासाठी परदेशी लेखकांप्रमाणे भरपूर देशविदेशांचा प्रवास वा दऱ्याखोऱ्यातून भटकणे असे काही करणे आवश्यक आहे काय ?
त्यावर तें म्हणाले, “अजिबात नाही. लेखनासाठीचे असंख्य विषय आपल्या अवतीभवतीच घुटमळत असतात. ते पकडण्याची क्षमता तुम्ही निर्माण करायची असते.

मलाही हे अनुभवातून खूप म्हणजे खूपच पटले.

वरील सर्व साहित्यप्रेमी प्रतिसादकांचे आभार !

‘तें’चे लेखकांसाठी एक मार्गदर्शक कथन मला फार आवडते. त्यांना कोणीतरी विचारले होते, की चांगले लेखन करण्यासाठी परदेशी लेखकांप्रमाणे भरपूर देशविदेशांचा प्रवास वा दऱ्याखोऱ्यातून भटकणे असे काही करणे आवश्यक आहे काय ?
त्यावर तें म्हणाले, “अजिबात नाही. लेखनासाठीचे असंख्य विषय आपल्या अवतीभवतीच घुटमळत असतात. ते पकडण्याची क्षमता तुम्ही निर्माण करायची असते.

मलाही हे अनुभवातून खूप म्हणजे खूपच पटले.

वरील सर्वांचे पूरक माहितीबद्दल आभार.

** माणस अंधश्रद्ध असतात >>>>>

यासंदर्भात मला तेंचा ‘एक गंभीर हसे’ हा लेख फार आवडतो. त्याचा विषय असा आहे. एक हठयोगी प्राध्यापक राव मुंबईत पाण्यावरून चालण्याचा प्रयोग करून दाखवणार होते. तो अर्थातच फसला आणि त्यांचे हसे झाले. परंतु या घटनेचे वर्णन करताना तेंडुलकर मिश्कीलपणे मानवी मनात दडलेली इच्छा बाहेर काढतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास :

“आम्ही या फसलेल्या प्रयोगाला हसणार नाही कारण चमत्कार घडावा अशी वाट आपण रोज पाहत आहोत. अशक्य, अकल्पनीय असे काहीतरी व्हावे असे आपल्यातील प्रत्येकाला वाटत असते”.

लेखातील पुस्तकात सखाराम बाईंडर नाटकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले. गिरीश कार्नाड यांनी तर, ‘गेल्या एक हजार वर्षात असे नाटक झाले नाही’, असा त्याचा गौरव केला आहे. मी काहीही पाहिले नव्हते. सहज युट्युब वर उपलब्ध होते म्हणून पाहिले.

नाटक म्हणून छान आहे. ते 1972 मध्ये गाजले ते त्याला आधी दिलेली परवानगी आणि 13 प्रयोगानंतर काढून घेतलेली परवानगी आणि एकूणच सामाजिक गोंधळ यामुळे. एकंदरीत त्यातील आशय, रांगडी भाषा व अर्वाच्च शिव्या इत्यादी गोष्टी समाजाला मानवल्या नसाव्यात.
कलाकारांचा अभिनय तर उत्तमच आहे.