यू -ट्युबवरील मराठी नाटके: दृष्टीक्षेप

Submitted by कुमार१ on 17 April, 2023 - 23:33

नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत.

काल पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला. त्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटले आहे की नाटकांचे प्रयोग करून आम्ही कधीच दमत नाही परंतु रंगमंदिरांबाबतच्या तक्रारी करून मात्र आता खरंच प्रचंड दमलो आहोत ! त्यांचे हे विधान सर्व कलाकार व नाट्यरसिकांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.

आता एकंदरीत रंगमंदिरांची भाडेवाढ, कमालीची अव्यवस्था आणि अस्वच्छता, घटता प्रेक्षकवर्ग आणि आंतरजालावरील उपलब्ध असलेली व्यापक करमणूक या सगळ्यांचा परिणाम प्रत्यक्ष नाट्यप्रयोगांवर झालेला दिसतो. कोणे एकेकाळी रंगमंदिरातील बाल्कनीमधून कमी दरात नाटक पाहायची सोय असायची. अलीकडे ती बंद झाल्यात जमा आहे. त्यामुळे फक्त खालच्या मजल्यावरील आसनव्यवस्थेतील नाटकांचे वाढीव दर हे सर्वांनाच परवडण्याजोगे नाहीत. मध्यंतरीच्या कोविड पर्वात तर जाहीर नाट्यप्रयोग दीर्घकाळ बंदच होते.

मी काही महिन्यांपूर्वी रंगमंदिरात जाऊन २ नाटके पाहिली. तेव्हा ते नाटक संपल्यानंतर त्यातील चारही कलाकारांनी उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन केले. तसेच त्यांनी त्यांच्या पुढील प्रयोगांची जाहिरातही अशी केली:

" नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास जरूर सांगा, जेणेकरून ही खालची सर्व आसने भरली जावीत".

यावर अधिक बोलणे न लगे.

खऱ्याखुऱ्या नाट्य रसिकाला अधूनमधून नाटक पाहिल्याशिवाय काही चैन पडत नाही आणि नवे नाटक वरील कारणांमुळे पाहण्याचे राहून जाते. मग अशा रसिकासाठी दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवण्यासाठी आंतरजालावरील युट्युबचा एक बरा पर्याय उपलब्ध आहे. तिथे आपल्याला अनेक जुनी नाटके पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी काही नाटके ही मुळातच चांगल्या अनुभवी कलाकारांना घेऊन व्यावसायिक पद्धतीने चित्रित केलेली आहेत. काही नाटके महाराष्ट्रातील विविध नाट्य स्पर्धांमध्ये किंवा हौशी रंगभूमीवर सादर झालेली आहेत. तर अन्य काही नाटके दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पूर्वी प्रक्षेपित झालेली आहेत.

गेल्या ७ वर्षांमध्ये युट्युबवरील अशा अनेक नाटकांचा मी आस्वाद घेतला. मी पाहिलेल्या नाटकांची यादी एक संदर्भ म्हणून इथे लिहून ठेवतो. यथावकाश प्रतिसादांमधून त्या नाटकांबद्दल अजून माहितीची भर घालत राहीन. ज्या वाचकांनी या माध्यमातून नाटके पाहिली असतील त्यांनीही प्रतिसादांमधून त्या नाटकाबद्दल थोडक्यात लिहायला हरकत नाही. अशा तऱ्हेने या धाग्याच्या निमित्ताने मराठी नाटकांची एक आंतरजाल संदर्भयादी सर्वांसाठी उपलब्ध राहील.

आता थोडे अशा नाटकांच्या चित्रफित-दर्जाबद्दल. काही नाटकांचा दर्जा खरोखरच उत्तम आहे. काहींचा तो मध्यम आहे परंतु त्यातून नाट्य संवादांचा अनुभव चांगला घेता येतो. सह्याद्री वाहिनीवरील जी नाटकं इथे चढवली गेली आहेत त्यांचा दर्जा मात्र साधारण आहे आणि त्यातील ध्वनीमुद्रण फारसे खास नसते.

प्रतिसादांमधून लिहिताना आपणही संबंधित नाटकाचे नाव, लेखक, प्रमुख कलाकार, तुमचे मत आणि चित्रफितीच्या दर्जाबद्दल जरूर लिहावे. आता मी पाहिलेल्या नाटकांची लेखकानुसार फक्त यादी लिहितो. ती गेल्या ५-७ वर्षांपासून पाहत असल्याने आता एकदम प्रत्येकाबद्दल छोटा परिच्छेद लिहीणे अवघड आहे. पण अगदी अलीकडे जी नाटके पाहिलीत किंवा यापुढे जी पाहीन, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती प्रतिसादांमधून देईन. या नाटकांचा लेखनकाल अंदाजे गेल्या ५०-५५ वर्षांपूर्वीपासूनचा आहे. सध्याच्या तरुण पिढीला आवड असल्यास ही नाटके जरूर पाहता येतील. त्यातले एखादे नाटक आपण पूर्वी प्रत्यक्ष रंगमंदिरात पाहिले असल्यास आता त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येईल.

मी पाहिलेली (चित्रित) नाटके:

* विजय तेंडुलकर
शांतता ! कोर्ट चालू आहे
अशी पाखरे येती
सखाराम बाईंडर
कमला

*जयवंत दळवी
बॅरिस्टर, पर्याय, लग्न, महासागर

*वसंत कानेटकर
अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, बेइमान, मला काही सांगायचंय

* पु ल देशपांडे
सुंदर मी होणार

* आचार्य अत्रे

तो मी नव्हेच

* रत्नाकर मतकरी
इथं हवय कुणाला प्रेम

* शं ना नवरे
सूर राहू दे
धुक्यात हरवली वाट

* मधुसूदन कालेलकर
शिकार

* अशोक समेळ
कुसुम मनोहर लेले
{केशव मनोहर लेले : लेखक आठवत नाही. सध्या उपलब्ध नाही }

* प्र. ल. मयेकर
आसू आणि हसू

* उदय नारकर
खरं सांगायचं तर ( मूळ इंग्लिश; अगाथा ख्रिस्ती)

* शेखर ढवळीकर
नकळत सारे घडले

* डॉ. शिरीष आठवले
मित्र

* समीर कुलकर्णी
तुझ्या माझ्यात

* वसंत सबनीस
कार्टी काळजात घुसली

* मनोहर सोमण
द गेम

* विजय निकम
रघुपती राघव राजाराम

*सुरेश जयराम
डबल गेम

* चंद्रशेखर गोखले
अनोळखी ओळख

* शिवराज गोर्ले
बुलंद

* क्रांती बांदेकर
कोर्ट मार्शल (मूळ हिंदी - स्वदेश दीपक)

*सुरेश खरे
ती वेळच तशी होती

* बाळ कोल्हटकर
वेगळं व्हायचंय मला
..

मागच्या पिढीतील गाजलेले अभिनेते प्रभाकर पणशीकरांच्या वरीलपैकी एका नाटकाच्या शेवटी त्यांची मुलाखत दिलेली आहे. त्यात त्यांनी नाटकांच्या चित्रीकरणाबद्दलचे त्यांचे बदललेले मत व्यक्त केले आहे. एकेकाळी त्यांचा अशा चित्रीकरणाला कट्टर विरोध होता. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले, की महाराष्ट्रातील मोजकी पाच सहा शहरे वगळता अन्यत्र जिल्हा पातळीवर देखील चांगली नाट्यगृहे नाहीत. जर नाटकाला महाराष्ट्रातील सर्व इच्छुक प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे असेल तर आता नाटक चित्रीकरण हाच पर्याय उरतो.

कदाचित, अजून पंचवीस तीस वर्षांनी वरील हेतू साध्य करण्यासाठी सशुल्क आंतरजाल वाहिन्या हेच व्यावसायिक नाटक सादरीकरणाचे महत्त्वाचे माध्यम ठरेल काय? माहित नाही. सच्चा नाट्यप्रेमीला हा विचार मानवणारा नसला तरी भविष्यात तो स्वीकारायला लागू शकतो.
***********************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धुक्यात हरवली वाट
शं ना नवरे

सुबोध भावे, सृजा प्रभूदेसाई रवी पटवर्धन व इतर
मध्यवर्ती विषय: विवाहबाह्य संबंध.

मध्यमवयीन पुरुषाने एका तरुणीला रखेल म्हणून ठेवलेले.. सुरुवातीस चोरून परंतु नंतर ते त्याच्या पत्नीला समजते. पत्नी व रखेलीची भेट आणि पत्नीने मांडलेला प्रस्ताव. त्यावर पूर्ण विचारांची रखेल तिचा निर्णय घेते.
आवडले.

लग्न
जयवंत दळवी
माधव अभ्यंकर, लालन सारंग व इतर.

या नाटकाचा सारांश त्यातल्या शेवटच्या दोन वाक्यातच आलेला आहे:

लग्न न करता माणूस सुखी असतो का ?
आणि
लग्न केलेला माणूस सुखी होतो का ?

( ज्याने त्याने या प्रश्नांची उत्तरे आपापल्या मनात द्यावीत !)

नाटकात खुद्द एक नाटककारच मध्यवर्ती भूमिकेत. त्याची पत्नी आणि दोन मुली ही प्रत्यक्ष दिसणारी पात्रे. इतर न दिसणारी पात्रे म्हणजे, मोठ्या मुलीची सासरची मंडळी आणि धाकटीचा ज्या वृद्धाशी शरीरसंबंध आलेला आहे तो माणूस आणि नाटककाराच्या मैत्रिणी.

अनेक अर्थपूर्ण वाक्यातून लग्नसंस्थेला मारलेले जोडे. लग्नाविना सहजीवनाची कल्पना.
नाटक छान !

इथे ओशाळला ...
https://www.youtube.com/watch?v=KZTEyCrDmXk&t=4232s

प्रभाकरांचा औरंगजेब मस्त पण किरण भोगलेंना संभाजीच्या वेषात पाहवत नाहीत. त्यांच्या किडक्या दाताने मुड ऑफ होतो. पण त्यांचा अभिनय चांगला आहे. डॉ. घाणेकरांचा संभाजी पहाण्याचे भाग्य हवे होते.

छान.
....
सूर राहू दे
शं ना नवरे
संजय मोने, शुभांगी गोखले व सुनील बर्वे

शहरातून खेड्यात आलेला डॉक्टर. त्याची बायको नाईलाजाने त्याच्याबरोबर आलेली पण मनातून सतत कुढत राहणारी. तिचा एक पूर्वाश्रमीचा प्रियकर.. त्याच्याबरोबर ती मुंबईला निघून जाते पण तिकडे तो तिचा धंदा मांडतो.

मग ती ‘आपल्या’ घरी परतते.. तेव्हा तिचा नवरा तिला स्वीकारतो का, हे नाटकात बघा.

>>>>>> त्याच्याबरोबर ती मुंबईला निघून जाते पण तिकडे तो तिचा धंदा मांडतो.
बाप रे! नाही बघवणार.

महासागर
जयवंत दळवी
गिरीराज, किशोरी अंबिये, अमिता खोपकर व गिरीश ओक

मध्यमवर्गीय एकत्र कुटुंब चालवणारा विमा एजंट. त्याची बायको अगदी काकूबाई गृहिणी.
अन्य एक अविवाहित पुरुष आणि नटव्या बाईबरोबर त्याचे संबंध.
दळवींच्या प्रथेनुसार नाटकात एक वेडे पात्र आहे: नायकाचा भाऊ.
शोकांतिका !

मला गिरीराज हा कलाकार या नाटकामुळे माहीत झाला.
https://www.youtube.com/watch?v=A7V0kan-pBQ

'अमर फोटो स्टुडिओ' हे नाटक आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या ७ मे रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी ५ वाजता या नाटकाचा अखेरचा प्रयोग रंगेल.

https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainm...

जगण्यातल्या विसंगती, उणिवा कशा हसत स्विकाराव्या याचा परिपाठ रामनगरकरांचं आत्माकथेसारखं एकपात्री नाटक रामनगरी... एकेकाळी खूप गाजलं...त्याचं आत्मचरित्र याच नावाने प्रसिद्ध झालं. पु.लं. नी त्यांच्या पुस्तकाची दखल घेतली. मी पुस्तकही वाचलं आणि ध्वनीफीतही अनेकदा ऐकली.

https://youtu.be/ez3z41kjSoI

https://youtu.be/Uk_kptcs2aM

भरत धन्यवाद
पण रामनगरकरांच्या भाषेची नजाकत हिंदी संवाद कमजोर करतात.
वरच्या दुव्याची मजा नाही येत. मी तर डोळे मिटून ऐकतो.
रामनगरकर , दादा कोंडके हे कलापथकातून आलेले कलाकार. दोघांनी "विच्छा माझी पुरी करा" त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत प्रचंड गाजवलं. वसंत सबनीस लेखक.

रामनगरी ध्वनीफीतीतला भाषेचा अस्सल गावरान लहेजा आणि सहजता...अहाहा...

रामनगरी सुंदर !
आमच्या कॉलेज जीवनातील स्नेहसंमेलनाला राम नगरकर आले होते.

आत्मचरित्र (एकांकिका)
दीपक कुलकर्णी
विजय केंकरे, सुनील तावडे.

आडगावात येऊन कडेकोट बंदोबस्तात राहिलेला एक लेखक- स्वतःमध्येच बुडून गेलेला व लेखनाच्या सर्व व्यावहारिक लाभांपासून दूर राहणारा.

या लेखकाने आत्मचरित्र लिहावे असा आग्रह धरणारा त्याचा 'मित्र ' आणि प्रत्यक्षात लेखक मात्र, आता लेखन संपवून चित्रकार होण्याची मनीषा धरणारा.

दोन्ही प्रमुख कलाकारांच्या अभिनयाची आणि संवादांची सुरेख जुगलबंदी.
शेवटाची कलाटणी सुंदर.

https://m.youtube.com/watch?v=nT-NnEj9Qh4#bottom-sheet

हा धागा वाचतेय.साधारण 2 वर्षांपासून यूट्यूबवर नाटके पाहत आहे.महासागर,तो मी नव्हेच,एका लग्नाची गोष्ट,मोरूची मावशी वगैरे.राहून गेलेली नाटके छान वाटली.पण नाट्यगृहात जाऊन पाहण्याची मजा औरच.
इथे ओशाळला मृत्यू ...लावले आणि बंद केले.संभाजीराजांचे दात बघवेना.

*इथे ओशाळला मृत्यू ...लावले आणि बंद केले.>>
अरेरे ! माझ्या आवडीचे नसल्याने पाहायचा प्रश्नच नाही.
...
* खरं सांगायचं तर >>
तीनदा पाहून झालेले आहे !
सर्वच बाबतीत उत्तम आहे....

नाटक या विषयावरचे एक छान काव्यमय स्फुट:
https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/deeddamadi/tambi-durais-bl...

त्यातले हे खूप आवडले:

नाटकाच्या शेवटी नाटक,
लेखकाला खडसावतं.
मी आहे म्हणून तू आहेस,
असं सांगून भेडसावतं.
लेखकापेक्षा नाटक मोठं असतं
नाटक सोडून, सगळं खोटं असतं.

ह्या स्फुटावरून - खास करून "नाटक सोडून, सगळं खोटं असतं." या चपखल ओळींवरून 'मुक्काम शांतिनिकेतन'
पुस्तकाच्या परिचयातल्या या काही ओळी आठवल्या. मूळ नाट्यशेष पुष्कळ मोठं आहे.
(मूळ लेखक: रविंद्रनाथ टागोर, अनुवाद: पु ल देशपांडे.)

नाट्यशेष
दूरवरच्या भूतकालाच्या चेहऱ्याकडे पाहिलं
फडफडातले दिसले फिरते नट
ओळखतो मी त्या सर्वांना
आठवतात सर्वांची नावं
अन् पश्चिमेच्या संध्याप्रकाशात जाणतो मी त्यांच्या सावल्या.
नेपथ्यलोकातून नटरूपाने ते सोंगं सजवून येताहेत
जीवनाच्या त्या अन्तहीन नाट्यात.
दिवसामागून दिवस आणि रात्रीमागून रात्री गेल्या त्यांच्या
आपापल्या ओळी म्हणण्यात आणि आपापल्या भूमिका वठवण्यात,
त्या अदृष्ट सूत्रधाराच्या आभासानुसार
आदेशानुसार रंगवीत आले आपापली नाटकं
कधी आसूं ढाळीत-कधी हांसू फुलवीत
नाना ढंगांनी नाना रंगांनी
शेवटी संपलं नाटक.
............

वा वा !
नाट्यशेष खूपच सुंदर आहे.!!

आता पुलंचा संदर्भ आला आहे तर त्यांचे एक अवतरण लिहील्याशिवाय राहवत नाही:

चित्रपट चित्रांनी फुलतो तर नाटक संवादांनी बहरते.

नाट्यलेखन, अभिनय व दिग्दर्शन या तीनही स्तरांवर आपली हुकूमत सिद्ध केलेले रंगकर्मी
अशोक समेळ
https://maharashtratimes.com/editorial/article/maharashtra-times-editori...

"अश्रूंची झाली फुले" मध्ये त्यांचा अभिनय पाहिला व खूप आवडला

हो यांचं काम पाहिलं आहे.
लेखन, दिग्दर्शन, अभिनय तिन्ही करणारे जुने रंगकर्मी बाळ कोल्हटकर. आता काही अभिनेते लेखक आणि दिग्दर्शकही होऊ लागलेत.

लेखाच्या सुरुवातीला एकच प्याला नाटकासंबंधीचं चित्र आहे. तो संग्राम समेळ. दहशतवादावरचं त्याची मुख्य भूमिका असलेलं एक नाटक गाजलं होतं.

aranyak Rev.jpg

चित्रात दाखवलेले रत्नाकर मतकरी यांचे नाटक मी बघायला घेतले आहे.
चित्रातल्या डाव्या खालच्या कोपऱ्यात (subscribe) आणि वरच्या उजव्या कोपऱ्यात ( Action) जे दोन ठळक अडथळे दिसतात ते नाटक बघताना सतत डोळ्यांना त्रास देतात, कारण ते सतत हलते आहेत.

लॅपटॉपवर बघताना ते काढायचा उपाय कोणाला माहिती आहे का ?
( subscribe करणे हा उपाय सोडून Happy

Pages