Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात !

Submitted by अनिंद्य on 1 December, 2022 - 05:37

या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.

तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

234AC136-9135-40CF-861E-54C28ABCED3C.jpeg

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

DF14D928-AA11-48CE-A7F5-28DE72F45400.jpeg

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :

१. एकट्याने सुरुवात करणे :-

हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.

२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.

३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.

४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.

५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.

६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.

७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.

आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!

सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे हळू हळू पसारा कमी करणे सुरु आहे. यात माझ्यासाठी वारंवार जाणवणारी आणि सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे वृद्ध आई वडीलांच्या मायेचे पाश! परवा मी नवर्‍याला म्हणाले सुद्धा की 'तू सुखी आहेस, आई-पपा पुढे निघून गेलेत, माझे तसे नाही, आर्थिक-मानसिक पसारा आवरताना आई-बाबा सतत केंद्र बिंदूवर असतात. माझ्या मागे त्यांचे काय ? हा विचार म्हणजे एक प्रकारचा गर्वच हे बुद्धीला कळते पण वळत नाही. त्या दृष्टीने तिथे त्यांच्यासाठी आधाराचे जाळे विणणे आणि इथे एकीकडे आपला पसारा आवरणे ही दोन देशातली कसरत हाच एक नवा पसारा असे वाटते.

… त्यांच्यासाठी आधाराचे जाळे विणणे आणि इथे एकीकडे आपला पसारा आवरणे ….

This could be tough, but the thought underlines that you have your heart at right place lady Happy

Sending lots of good wishes your way for both tasks.

आज शायर राजेश रेड्डींचा हा शेर वाचताना मला हाच धागा आठवला :

है मोहलत चार दिन की और हैं सौ काम करने को
हमें जीना भी है, मरने की तैयारी भी करनी है!

रोज विष्णु सहस्रनाम व रामस्तवराज वाचताना खूप आनंद मिळतो. बरेचदा 'दृष्टी' जायची भिती वाटते खरी. पण ऑल इन ऑल कशातही गुंतलेले नसावे (बहुधा) कारण मुलगी स्वावलंबी व जाणती झालेली आहे.
मात्र निघून जाणे इतरंकरता व स्वतःकरता पेनलेस असावे असे वाटते.
मरणोपरान्त जीवना बद्दलचे सकारात्मक लेख वाचून, व्हिडीओज पाहून पाहून एक ग्लॅमरच निर्माण झालेले आहे.

नवीन प्रतिसादांचे स्वागत !

Döstädning म्हणून नाही पण जनरल काम म्हणून विकांताला थोडी आवराआवर केली. संचयपिशाच कसा सर्वव्यापी आहे हे (पुन्हा एकदा) नीट समजले Happy

मागच्या चार वर्षातले बर्थडे, दिवाळी, नाताळाचे सजावटीचे सामान, भेटकार्डे, मिळालेल्या पण कुणालाही आठवत नसलेल्या कोऱ्या भेटवस्तू, नवीन घेतल्याने जुने कोणालाही वापरायला नको असलेले सुस्थितीतले लगेज-ब्यागा, छत्र्या, पायताणं, प्लांटर्स, काही 'नंतर कधीतरी वापरू' क्याटेगिरीच्या वस्तू..... बराच भार हलका केला.

आता बिन वापरातली प्रत्यक्ष ब्यांकेत जाऊनच बंद करता येतील अशी सेविंग अकाउंटस आणि लॉकर्स अजेंड्यावर आहेत. त्यानंतर जुने लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू. विश मी लक.

Happy ही ' नंतर कधीतरी वापरू ' कॅटेगरी फार बेकार आहे ..
सामान तसेच राहते..फारतर जागा बदलून ठेवतो आपण!!!

Yes !

Cleaning the house is just putting the things in less obvious places Lol

Submitted by आंबट गोड

हे तुमच्या साठी Happy तुम्ही म्हणालात तेच म्हणतात हे :

IMG_5760.jpeg

.. बराच भार हलका केला.>>>
कसा हेही सांगा.
योग्य विल्हेवाट तरीका (पधत,माझा कीबोर्ड गेला) ..
अशी चर्चा करु शकतो.

पण अनिंद्य मी इथे असेही किस्से वाचलेले आहेत की लोकांनी डाऊनसाइझिंग केले उदा - मोठे घर विकुन लहान घर घेतले. सामान कमी केले व त्यांना पश्चात्ताप झाला.

....कसा हेही सांगा.....

सांगतो.

वापरण्यायोग्य चांगल्या / कोऱ्या वस्तू घ्यायला आमच्या प्रतिवेदींना हरकत नसतेच. घरी-ऑफिसला असलेले मदतनीस, चालक, सोसायटीचे सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी किंवा कोणतीही रँडम गरजू व्यक्ती. मी सर्वांना विचारतो. फक्त एक कुठला दिवस ठरवून ठेवतो, त्यादिवसापर्यंत कुणी नेले नाही तर ट्रॅश ! ती वेळ शक्यतो आली नाही, येत नाही.

तस्मात सुस्थितीतले ब्लँकेट्स, जॅकेट-स्वेटर, लगेज-ब्यागा, छत्र्या, पायताणं, प्लांटर्स सगळे २-३ दिवसात कुणी कुणी नेले. बेस्ट.

फटक्यातुटक्या वस्तू अर्थातच रद्दी - कचऱ्यात जातात.

इलेक्ट्रॉनिक वस्तू, जुने फोन, लॅपटॉप, डेस्कटॉप, हार्डडिस्क आणि त्यातील डेटा याबाबत योग्य विल्हेवाट हा मुद्दा आहे.

हे सगळे शक्यतो एक्सचेंज मध्ये द्यावे. त्याने आपला कचरा ताबडतोब कमी होतो, आणि योग्यप्रकारे विल्हेवाट लागते.

शक्य नसेल तर सेकंड हॅन्ड विकत घेणारे असतात. माझे जुने लॅपटॉप सफरचंदी परिवारातील असल्यामुळे काम सोपे झाले. फोटो + सगळा कामाचा डेटा योग्य ठिकाणी कॉपी करून, ती डबडी डीलिंक करून, फॉरमॅट करून मग विकले.

जुने फोन विकत घेणारे नाही सापडले. त्यात सिमकार्ड काढून टाकल्यावरही काही रेसिड्युअल डेटा असतो. त्यामुळे त्यांची विल्हेवाट अजून लागली नाही, सूचना आणि सल्ल्यांचे स्वागत आहे.

मुंबई-पुणे शहरात काहीजण 'वॉल ऑफ काइंडनेस' असा उपक्रम चालवतात. तिथे न लागणाऱ्या वस्तू -कपडे पादत्राणे वगैरे लोक नेवून ठेवतात आणि गरजू लोक घेऊन जातात.

मला ते माणुसकी भिंत जरा ट्रिकी वाटते.म्हणजे ठेवलेल्या वस्तू कोणी नेईपर्यंत प्रचंड धुळीला, अचानक पाऊस पडला तर पावसाला एक्सपोझ होणे, प्राण्यांच्या जवळपास फिरकणे वगैरे.उपक्रम चांगला आहे पण भिंतीला छप्पर हवे.

आमच्या गृहसंकुलात २ महिन्यातून एकदा ई वेस्ट वाले येणार असे आता ठरले आहे. १५ जानेवारीच्या आसपास येतील म्हणतात. नाही आले तर तुम्हाला नंबर विचारीन. Happy

<< त्यात सिमकार्ड काढून टाकल्यावरही काही रेसिड्युअल डेटा असतो. >>

फॅक्टरी रिसेट केल्यावर सगळा डाटा साफ होतो.

... लहान घर घेतले. सामान कमी केले व त्यांना पश्चात्ताप झाला....

याचा अर्थ त्यांनी पुरेसा विचार करण्याआधीच निर्णय घेतले असा तर नसेल ? कारण लेखात 'Stada' चा फोकस आपले राहते घर, आत्ताचा पसारा आणि एकूणच आयुष्य सुटसुटीत, मोकळे आणि वापरण्यास सोपे करणे असा आहे. स्वतःसाठी आणि आपल्या मागे राहणाऱ्या लोकांसाठी. आणि हे सगळे हळू-हळू करण्यावर भर आहे, भर्रकन नाही. मेजर डाऊनसाईझ, छोट्या जागेत जाऊन राहणे ही बरीच पुढची आणि कठीण पायरी आहे असे मला वाटते, फार कमी लोकांना जमेल ते.


....उपक्रम चांगला आहे पण भिंतीला छप्पर हवे.....

+१

.....फॅक्टरी रिसेट ...

ओके !

होय अनिंद्य हळूहळू/ग्रॅज्युअली सामान कम करत नेण्यावरती भर आहे. बरोबर.
मी ज्या घटना वाचल्या त्यात लोकांनी रिटायरमेन्टपश्चात आपले मोठे घरच विकून, लहान घर घेतले वगैरे केसेस आहेत.

अनया , इ वेस्ट घेणाऱ्यांचा नंबर देऊ शकता का ? घरी आले तर ठीकच , नाहीतर त्यांचे काही ऑफिस असेल तर तिथे नेऊन देईन. पुण्यातला आहे ना ?

आज घरातले जवळपास २० कपडे दिले.
https://sadsindia.org/ यांच्या पोस्ट्स फेस बुकवर दिसल्या होत्या. दाते आणि सेवाभावी संस्था यात मध्यस्थ म्हणून हे काम करतात.
त्यांनी डन्झो करवी कपडे उचलले. त्याला मालाडच्या एका संस्थेचा पत्ता दिला होता. डन्झोचा खर्च आपण करायचा. त्यांचे दृऑप ऑफ सेंटर्सही आहेत

पुढचा नंबर भांड्यांचा.

मी पण एकदा बायकोचे जुने कपडे घेऊन एका संस्थेत गेलो होतो, तर तिथली बाई म्हणाली की बोहारणीला द्या.
मी म्हटले, अहो, जगात इतके गरीब, उपाशीपोटी लोक आहेत त्यांना द्या जरा. तर ती बाई मला म्हणे या आकाराचे कपडे कुणाला होत असतील तर ती व्यक्ती नक्कीच उपाशीपोटी नसणार. मग मी तो नाद सोडला.
/s

गरिबांना कमी वजन आणि भरपूर शारीरिक श्रमामुळे श्रीमंती आजार/ओबेसिटी होत नाही हा समज हल्ली बाजूला ठेवावा लागतोय.अपुरी झोप,कमी पोषणवाला आहार,काही बसून करायचे व्यवसाय(कॅब ड्रायव्हिंग) यामुळे डायबिटीस/ओबेसिटी/बीपी/थायरॉईड हे गरीब वर्गातही आहे.(संदर्भ: जवळपास पाहिलेली नुकतीच उदाहरणे)

Pages