Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात !

Submitted by अनिंद्य on 1 December, 2022 - 05:37

या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.

तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

234AC136-9135-40CF-861E-54C28ABCED3C.jpeg

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

DF14D928-AA11-48CE-A7F5-28DE72F45400.jpeg

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :

१. एकट्याने सुरुवात करणे :-

हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.

२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.

३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.

४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.

५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.

६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.

७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.

आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!

सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिंद्य यांची पोस्ट खूप आपुलकीने लिहिलेली वाटली, सांगण्याची पद्धत आवडली, त्यांच्या घरचे वातावरण आवडले म्हणून कौतुक करावेसे वाटले>>> अगदी. नुसत्या पोस्ट्स वरून ही प्रेमळ व्यक्तिमत्व कळते, ते असे. Happy

हल्ली ६-९ वर्ष मुलींमधे १ एग प्रकार मिळतो खेळण्याचा. तो १ अ तिशय इरीटेटींग प्रकार आहे. १ तर त्याचा आकार टरबूजा हून मोठा असा असतो, त्यात १ सॉफ्ट टॉय असते & काही अ‍ॅक्सेसरीज असतात. मुल ते खेळणे खेळते पण ते बाहेर चे कव्हर (एग शेल सदृश) तसेच जागा व्यापत पडून असते. मुलगी ते टाकून देऊ देत नाही. असे २ मोठे शेल्स पडलेत जागा खात. कपाटावर. Sad
मुलगी तिचे पडलेले दात (दुधाचे) ही टाकू देत नाही, डबीत जपून ठेवलेत अवघड आहे Lol Lol किती पसारा जमा करेल ती पुढे..

…. डोनेट केल्यावर दुसऱ्याच दिवशी ती वस्तूच लागते…..

येस, खूप जणांना हा अनुभव येतो. याच्यासाठी Hide Now, Donate Later हे माझे पसंदीदा टेक्निक वापरतो.

उदा वर मी लिहिले तसे : कुटुम्बाच्या परवानगीने काही भांडीकुंडी सहा- आठ महिने एका गोणीत बांधून ठेवली होती - लागली तर काढून देईन या बोलीवर. कुणीच त्यांची आठवण न काढल्याने त्यांना “बेवारस” घोषित केले नी मदतनीस ताईला ती गोणी न उघडता घेऊन जायला सांगितले.

भांडी लागली असती तर काढून वापरली असती. So, the Game is : वापरात नसलेल्या अधिकच्या वस्तू pack करून सर्वांच्या दृष्टीआड ठेवायच्या काही दिवस. ( माळ्यावर ? Proud )

हा लपाछपीचा कालावधी जास्त कमी करता येईल. ६ महिने/१-२ वर्ष / ५ वर्ष फार तर. लागलेच त्यातले काही तर तेव्हढेच काढायचे. अन्यथा ती झोळी “न उघडता” बाहेर.

न उघडता महत्वाचे, म्हणजे परत शुन्यापासून सुरुवात/ पुनर्विचार होत नाही.

>>>. डोनेट केल्यावर दुसऱ्याच दिवशी ती वस्तूच लागते…..

येस, खूप जणांना हा अनुभव येतो. याच्यासाठी Hide Now, Donate Later हे माझे पसंदीदा टेक्निक वापरतो.<<<<<
अनिंद्य,
अजून एक अनुभव सांगतो.ड्राय बाल्कनी मधे एक जादा किचन ओटा व सिंक आहे. तिथे भांडी घासली जातात. वॉशिंग मशिन ही तिथेच आहे. तिथे एक जड असा दगडी पाटा ठेवला.तो क्वचितच वापरला जातो. नंतर नुकताच डिश वॉशर घेतल्याने सिंकजवळ असलेला 25 किलोचा पाटा अडचणीचा वाटू लागला म्हणून मी एक दिवस तो कामवाल्या बाईंना देउन टाकला. बायकोने चारच दिवसांनी अगदी तस्साच पाटा घेउन परत तिथेच ठेवला. मला कॉलर घासायला लागतो. खर तर कॉलर घासण्यासाठी ब्रश व असलेला अतिरिक्त किचन ओटा व सिंक पुरेसे आहे. घराची अलिखित भौगोलिक व आर्थिक विभागणी झालेली आहे. म्हणजे अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ हा खरा मुद्दा आहे. बायकोचे प्रचंड कपड्यांनी कपाटे भरुन वाहात आहेत. जगण्यातील मूल्यातच अलिकडेच मोठा फरक झाला आहे. समाजवादी विचारातून भांडवल वादी विचारांकडे अत्यंत वेगाने प्रवास झाला. उशीरा सुरु केलेल्या व्यवसायात खूप कमी वेळात भरभरुन पैसा मिळाल्यावर जगण्यातील मूल्यात फरक वेगाने पडला.समाजवादाच्या नादाला लागून मी उमेदीचे आयुष्य वाया घालवल असे ती म्हणू लागली. पैसा हेच सर्वस्व आहे व पैशावरच जग चालते हे मला आयुष्यात फार उशीरा कळाले असे ती आता म्हणू लागली. तू खेड्यात असला तरी संपन्न कुटुंबात जन्माला आल्याने तुला कमतरता ही काय चीज आहे हे माहीत नाही. आम्ही एका खोलीत दिवस काढलेत. म्हणजे थोडक्यात आयुष्याचा पसारा हा जगण्याच्या तत्वज्ञानाशी निगडीत आहे. कमतरतेचा सूड अतिरिक्त संचयाने घेतला जातो.

कमतरतेचा सूड अतिरिक्त संचयाने घेतला जातो. >>> बरोबर. मध्यमवर्गातल्याही उतरत्या भाजणीतून पुढे आलेले जास्त कॉम्पिटिटिव्ह आणि अग्रेसिव्ह असतात हे वैम.

माझी एखादी वस्तू मला न विचारता किंवा मी नको म्हणत असताना कोणी देऊन टाकली तर मलाही आवडणार नाही.

कॉलरवाले कपडे कोणाचे आहेत?

>>> घरकवडे
Lol

भरतना अनुमोदन! परस्पर कारभार करू नये. कोणाचे आहेत कॉलरचे कपडे?

@ भरत व @ स्वाती आंबोळे
आपण थेट जरी तसे म्हणले नसले तरी तुम्हाला अस सुचवायचे आहे की कॉलर वाले कपडे पुरुषांचेच असतात व घरात पुरुष म्हणजे मी व माझेच कपडे धुण्यासाठी हे सर्व काही आहे. जे वास्तव नाही. माझे कपडे मी फारच कमीवेळा मशीनला धुतो. टंकन मर्यादेमुळे सर्व चित्र स्पष्ट करता येत नाही त्याची आवश्यकताही नाही. मुद्दा हा आहे. घरातला पसारा कसा कमी करावा याची चर्चा प्रत्येक घरात या ना त्या प्रकारे होत असते. अचानक उठून वस्तू देउन टाकली असे सहसा होत नसते. अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ हा खरा मुद्दा आहे हे मी प्रतिसादात लिहिले आहेच
Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात ! हा मुख्य विषय जगण्याच्या तत्वज्ञानाशी जोडला आहे. त्यामुळे अपरिहार्यपणे जगण्याकडे पहाण्याच्या विविधांगांवर विचार होणे हे स्वाभाविक आहे.
अर्थातच तुम्ही माझ्याशी सहमत असलाच पाहिजे हे बंधन आपल्यावर नाही.

>> हा मुख्य विषय जगण्याच्या तत्वज्ञानाशी जोडला आहे. >> मी समजत होतो मरण्याच्या तत्त्वज्ञानाशी! Wink
ऑन सिरियस नोट: हा विषय जगण्याच्या तत्त्वज्ञानाशी एक्स्ट्रापोलेट अजिबात करू नये हे प्रामाणिक मत आहे. हे मिनिमलिझम नाही. भरत वर सरमिसळ म्हणत आहेत ते करू नये.

>> हा मुख्य विषय जगण्याच्या तत्वज्ञानाशी जोडला आहे. >> मी समजत होतो मरण्याच्या तत्त्वज्ञानाशी! Wink>>>>> मृत्यूचे नियोजन हा जगण्याचा विचार आहे. जगायचीही सक्ती आहे.... आणि वैद्यकीय इच्छापत्र
हे या पुर्वीचे माझे धागे जरुर वाचावेत.

@प्रकाश घाटपांडे
<< खरे तर वास्तू शास्त्रानुसार तर अशा वस्तू आपल्या घरात वा जागेत निगेटीव्ह उर्जा निर्माण करतात. >>
अशी विधाने अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. 'अंनिस'बद्दल आपुलकी असणाऱ्या व्यक्तीकडून pseudoscience बद्दल अश्या विधानाची अपेक्षा न्हवती. वाईट वाटले.

मिनिमलिझ्म , चंगळवाद आणि डेथ क्लिनिंग या विषयांची सरमिसळ होते आहे. >> सहमत

अशी विधाने अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. 'अंनिस'बद्दल आपुलकी असणाऱ्या व्यक्तीकडून अश्या विधानाची अपेक्षा न्हवती. वाईट वाटले.>>>>>
अधून मधून मी असे अपेक्षाभंग करीत असतो. खरे तर वास्तू शास्त्रानुसार तर अशा वस्तू आपल्या घरात वा जागेत निगेटीव्ह उर्जा निर्माण करतात हे वाक्य जाणीव पूर्वक मी घातले होते. जेणेकरुन त्या मुद्द्यामुळे तरी सोसायटीतल्या धुळ खात पडलेल्या सायकली दान दिल्या जातील. काही लोक वास्तूशास्त्र मानणारे असतातच ना. लक्ष्मीपूजनाला दिवाळीत फटाके वाजवल्याने घरातली लक्ष्मी वैतागून पळून जाते असेही मी म्हणत असतो.
मनुष्य अंधश्रद्ध असतो कारण त्याची ती गरज असते- विजय तेंडुलकर
वेळोवेळी लिहिलय. फार गांभीर्याने घेउ नका. मला अपेक्षांचे ओझे होउ नये म्हणून मी ही अधनूमधून अंधश्रद्धही असतो. जगण्याचा डिफेन्स मेकॅनिझम आहे तो.

More Power to you !>>>> धन्यवाद अनिंद्य!
हो खरंय.. घरात अशी उदाहरणे पाहिली आहेत वय वाढलं तरी मोह माया हाव कशाचीच (नात्याची, वस्तूंची) सुटत नाही. तुमच्यासारख्या विचारसरणीच्या व्यक्ती ओव्हर द पिरिड ऑफ टाईम विचारात बदल घडवतात हे नक्की. सतत असे वाचत राहिल्याने, आचरणात आणल्याने भावनिक गुंतवणूक कमी होणे/नसणे, वस्तू जमा न करणे जमवता येतंय हळूहळू.

थोडी विस्कळित जरी असली तरी उत्तम चर्चा झाली वर. एकाच मुद्दयाचे कितीतरी कंगोरे असतात !

पुन्हा लक्षात आलेल्या काही बाबी :

१} कोणते आणि किती सामान कमी करावे यावर कोणत्याच कुटुंबाचे एकमत पटकन होत नाही. यावर मूळ लेखातला मुद्दा क्र. १ वापरणे योग्य. सुरुवात “एकट्याने” करावी. जे जमेल तेव्हढेच. एकला चलो रे. हे काम सुद्धा प्रचंड मोठे आणि वेळखाऊ आहे. वाटते तितके झटपट होत नाही.

२} अल्पना, धनुडी, मी - स्वत:च्या एकट्याच्या पूर्ण अखत्यारीत असलेले Stada / declutter करणेच अजून जमले नाहीय हे वर सांगितले आहे. Not fully worked on the easier options available to us. ते करणेच बाकी असतांना जोडीदार, कुटुंब यांची सहमती आवश्यक असलेले Stada ह्या पुढच्या पायरीची घाई नको असे वाटते. ते थोडे नंतर, नाजुक हाताने, धिम्या गतीने. One step at a time. नाहीतर क्लेश आणि backlash ठरलेला Happy

Management मधे आपण ज्याला internal & external buy-in म्हणतो तसे.

३} आपला मूळ स्वभाव, जडणघडण, विचार, आपण आजवर जगलेले आयुष्य, आलेले अनुभव यातूनच आपले व्यक्तिमत विकसित झाले असते ना ? त्याचा प्रभाव अन्य क्रियांवर पडतो तसा Stada वर पण पडणार. Unavoidable.

४} मिनिमलिझ्म, चंगळवाद, जगण्याचे- मरण्याचे आपापले तत्वज्ञान, वास्तुशास्त्र, अंधश्रद्धा, कुटुंबातील अन्य लोकांच्या अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ, कुटुंबातील सुसंवाद किंवा त्याचा अभाव हे आपल्या चर्चेतले मुद्दे Döstädning शी थेट संबंधित नसले तरी त्यावर प्रभाव नक्कीच पाडू शकतात.

५} ओव्हर द पिरिड ऑफ टाईम विचारात बदल …. काहीच विचार केलेला नसल्यापे़क्षा किंवा फक्त विचारच केला असल्यापेक्षा थोडी, छोटी पण significant कृती घडणे, स्वत:साठी आणि आपल्यामागे राहणाऱ्यांसाठी थोडा पसारा जरी कमी करता आला तरी ते सार्थक ! (अंजली_१२)

६} … एखादी गोष्ट दोन वर्षे लागली नाही तर ती आयुष्यभर लागत नाही. कारण दोन वर्षांत सगळे ऋतू, सणवार, पाहुणे, कार्य, सुट्टी, प्रवास व विक्षिप्त लहरींचे प्रकार येऊन जातात….

This is a good pointer ! Makes much sense. (अस्मिता.)

वरच्या लिस्टीत महत्वाचा मुद्दा राहिला.

७} Emotional Döstädning : निर्जीव वस्तूंमधे आपला जीव गुंतला असतांना ही पायरी बरीच दूर असणार, असते. भावनांचा गुंता, आयुष्यातले रिग्रेट्स, लोकांनी दिलेला त्रास, हुकलेल्या संधी, रुतलेले शब्द, मनावरचे ओरखडे…. लिस्ट इज़ ऐंडलेस. या बाबतीत सततचा गृहपाठ “सांगायला सोपा करायला महा कठीण”

अल्प स्वानुभवाने सांगतो - Stada of “things” मधे आपण जसजसे पुढे सरकतो तसतसे नावडते लोक, जागा, नको असलेले संवाद, प्रसंग, नाती, भावना - सर्वत्र “बिनकामाचे टाकून देणे” हळूहळू जमायला लागते. It slowly becomes part of your personality and elates you Happy

पियू, तुम्ही मानव किंवा उबो यांना स्वतंत्रपणे विचारून बघा. त्यांना असल्या गोष्टी माहीत असतात असा अनुभव आहे.

♥️
खूपच सोपं आहे, धन्यवाद अस्मिता

Stada म्हणजे काय?>>> मुद्दा २ मधे लिहिलेय बघ वर. stada= declutter.

संयत चर्चा चालू , मधेच बदाम कुठुन आला? Lol माबो म्हणजे धमाल आहे. ❤️

Pages