Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात !

Submitted by अनिंद्य on 1 December, 2022 - 05:37

या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.

तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.

234AC136-9135-40CF-861E-54C28ABCED3C.jpeg

तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !

DF14D928-AA11-48CE-A7F5-28DE72F45400.jpeg

सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :

१. एकट्याने सुरुवात करणे :-

हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.

२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.

३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.

४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.

५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.

६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.

७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.

आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!

सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिंद्य,

मी पण सुखलोलुपच.
मला हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' जमेल असे अजीबात वाटत नाही आणि अपरिग्रहही.
मुळात मला चांगलेचुंगले खायला ल्यायला प्यायला आवडते थोडक्यात सांगायचे म्हणजे जगण्यात सुख वाटते. त्याकरता म्हणून जगातल्या अगदी नित्योपयोगी स्वयंपाकघरात लागणार्‍या वस्तुंपासून ते हस्तकलेचे विविध प्रकार (ज्यात छोटी शिल्पं, वस्त्र प्रावरणांपासून ते इतर नानाविध प्रकार मोडतात) विविध विषयांवरची पुस्तकं ई. गोष्टींचा चोखंदळ संग्रह करायची हौस आहे.

सगळ्याच बाबतीत पण जास्तकरून कपड्यांच्या बाबतीत सध्या असे धोरण आहे की नवीन घ्यायचेच नाहीत आणि घेतलेच तर तितकेच जुने बाहेर काढायचे.

मला असे नाही वाटत की नको असलेल्या वस्तुंची विल्हेवाट लावणे हे 'काम' पुढच्या पिढीवर / मागे राहीलेल्या लोकांवर पडले तरी त्यांना काही त्रास होईल. किंबहुना असे वाटते की माझ्या संग्रहातील निदान काही वस्तु तरी माझी आठवण म्हणून नेणे हे लोकांकरता आनंददायी ठरेल.

मुळात जरा अजून विचार केला असता वाटते आहे की प्रियजन असतील तर त्यांना त्रासच वाटणार नाही. प्रियजन नसतील तर होऊदे त्रास Wink

पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. >>
नेमका माझा विचार नेमक्या शब्दात वाचायला मिळाला.
कधीच सुरू केलंय हे. आजच सकाळी माझी बाई माझं काम आटोपून एका लग्नाला जाणार होती. मी तिला ताबडतोब एक जरीची साडी देऊन टाकली. साडी मिळाली म्हणून ती खुश तर कपाट थोडं हलकं झालं म्हणून मी खुश.

>> मी पण सुखलोलुपच.
मला हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' जमेल असे अजीबात वाटत नाही आणि अपरिग्रहही.
मुळात मला चांगलेचुंगले खायला ल्यायला प्यायला आवडते थोडक्यात सांगायचे म्हणजे जगण्यात सुख वाटते. >> मी पण. या वर्षी साड्या घ्यायचा सपाटा लावला आहे. माझ्यानंतर ह्या कोण नेसेल किंवा ह्या कोणाला द्यायला आवडतील ह्या प्रश्नाचं उत्तर आत्तातरी माहित नाही. आणखी एक १५,२० वर्षांनी ह्या विषयावर सिरियसली विचार करायला हवा.

छान लेख म्हणवत नाही. सोपं नाहीये तसं आपल्या मरणाचा विचार करून क्लटर कमी करणे. पण खरंच आहे. कन्सेप्ट आवडली.
आपल्या मागे राहिलेल्यांना काय त्रास होतो हे सासरे गेल्यावर अनुभवास आलं. कुठेही काही न लिहिल्यामुळे, स्पेशली बायकोला वगैरे विश्वासात घेऊन गोष्टी न सांगितल्यामुळे त्यांचे बरेसचे आर्थिक व्यवहार निस्तरणे मनस्ताप देणारे ठरले.

बादवे असं करण्याला ही टर्म आहे माहित नव्हतं. आज्या-पणज्या नाही का आपापल्या कुड्या, बांगड्या, नथ, माळ देऊन टाकायला लागायच्या. तेच आठवलं. त्या त्या वयात बहुतेक असे विचार येत असतील आपोआप.
गलबललं पण बाबा गेल्यावर माझ्या आईने पण सामान खूप कमी केलंय. अधू असल्याने एकतर झेपतही नाही उस्तवार. मी मधे भारतात गेले असताना दुसरीकडे लहान खोलीत बस्तान हलवलं. १-२ तासात मुव्हिंग होऊन संध्याकाळ्पर्यंत नवीन खोली तिची लावून पण दिली. इतकं कमी सामान.

आणि अनिंद्य तुमचं वय कळलं बरं का Wink

पण हे सगळं का करावं?

मला मंजूताईंच्या बहीणीच्या सासर्‍यांसारखं व्हायला आवडेल. ते जमण्याकरता अशी बोजड संज्ञा, इतकी कठीण प्रक्रिया या कशाचीच गरज नसते. ते आतून येतं आणि तेंव्हाच जमतं. मला ते ९९% जमणार नाहीच हे माहीत आहे त्यामुळे हर्पेनचा मार्ग निवडेन. प्रियजन असतील तर त्यांना त्रासच वाटणार नाही. प्रियजन नसतील तर होऊदे त्रास - हे सत्य आहे.

२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे - हे तर करूच नये. बहुतांशी मृत्यू सुंदर असतात - वेदना संपवतो मृत्यू. पण मृत्यूची सावली खूप भयाण असते - खास करून तुम्ही ज्यांना प्रीय आहात्त त्यांच्याकरता. जेंव्हा तुमच्या Death Cleaning बद्दल त्यांच्याशी बोलाल, तेंव्हा नकळत तुम्ही त्यांना मरणाच्या सावलीत ओढता आहात. प्रत्येक माणसाची ती सावली पेलायची ताकद वेगवेगळी असते. नैराश्य येऊ शकते.

कपडे -सुतींची आपोआपच विल्हेवाट लागते. पुनर्वापर होतो कापसाचा. कृत्रिम कपडे - हे नेऊन वापरणारे येतात दारावर. करोना काळात काही येत होतेच.

विभक्त कुटुंबपद्धतीमुळे विल्हेवाट लावणे गरज झाली. मुले मोठी होऊन प्रदेशात गेली तर खूपच पसारा काढावा लागतो. आणि काहींनी लग्नात आलेली पुडकी उघडलीही नाहीत. आता आहेर न घेण्याची पद्धत वाढल्याने काम कमी झालं.
मोठ्या कुटुंबात तसं करावं लागतं नव्हतं. अर्थात हा खूप जुना प्रश्न होता.

पसारा आवरण्यासाठी मृत्यू येण्याची किंवा म्हातारपणाची वाट का बघावी लागते, ते काही कळलं नाही.

कुटुंबात, पुढच्या पिढीसोबत राहत असलेल्या वृद्धांच्या बाबत हा प्रश्न तितका गंभीर होत नाही. पण ज्यांची पिढी जवळ राहत नाही, त्यांनी स्वतःचे वेगळे संसार थाटले आहेत, अश्यांच्या बाबतीत मात्र होतो. आणि हे परदेशात , दूरच्या गावात राहत असतील तर आणखीनच.
वृद्धांच्या घरी त्यांचा स्वतःचा पूर्ण संसार असतो. त्यांच्या काळातल्या गरजांप्रमाणे तो पसार्‍याचा असतो. त्यातल्या अनेक वस्तूंना पुढच्या पिढीच्या आटोपशीर संसारात जागा असेलच असं नाही. पुरुषांच्या कपड्यांचा कदाचित एवढा प्रश्न येत नसेल. पण स्त्रियांच्या साड्या भरपूर असतात. पुढच्या पिढ्या नियमित साड्या नेसणार्‍या नसतात. त्यांनी यातल्या साड्या घेतल्या तरी त्यांच्यासाठी ती समृद्ध अडगळ ठरू शकते. हे फक्त कपड्यांचं उदाहरण झालं. यात भांडीकुंडी, फर्निचर, घर या सगळ्या गोष्टींची भर पडते.

वृद्ध व्यक्ती गेल्यावर पुढची पिढी दुरून , हाताशी थोडाच वेळ घेऊन येते तेव्हा आपल्या आईवडिलांच्या जाण्याच्या दु:खासोबत या सगळ्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो.

माणसाने वयाचा विशिष्ट टप्पा गाठल्यावर त्याच्या जाण्याची त्याने स्वतः व त्याच्या कुटुंबाने नकळत का होईना मानसिक तयारी केलेली असते. तोवर आपण अनेक मृत्यू पाहिलेले असतात. गेल्या दोन वर्षांत तर हे आणखीनच गडद झालंय. आधीच्या काळासारखं साग्रसंगीत शोक करणं, दु: खात सहभागी होणं हेही कठीण झालं आहे , त्याची सवय सुटली आहे. (सगळ्यांच्याच बाबत झालं असेल असं नाही. मला दिसलेल्या गोष्टींतून लिहितोय. यावरही जर तुम्ही आयुष्यभर माणसं जोडली असतील, प्रेमाने वागले असाल तर...... टाइप टिप्पणी येऊ शकेल)

दागिने, घर , गुंतवणूक इ. मौल्यवान वस्तू कोणाला द्यायच्या हे बोलून ठेवलेलं बरं असतं (किंवा नसतंही - जिवंतपणी धुसफूस पहायला लागू शकते)

माझ्या आईचं गेल्या काही १०-१२ वर्षांत बाहेर जाणं अगदी कमी झालं होतं. नात्यातल्या लोकांकडे सुद्धा तीनचार महिन्यांतून एकदा. त्यामुळे तिने नव्या साड्या अजिबात नको असंच ठरवलं होतं. कोणी दिलेल्या साड्याही ती निग्रहाने परतवून लावत असे.

बाबांनी देहदानाचा फॉर्म भरला होता. त्यांनाही वेळोवेळी शाली मिळाल्या होत्या. त्या कोणाला तरे देऊ या असं म्हटल्यावर त्यांचा प्रथम नकार आला, पण तो काही क्षणांपुरताच. देहसान, नेत्रदान करायचं तर कुटुंबासमवेत बो लणं अर्थातच भाग आहे. अन्यथा किंवा तसं बोलूनही त्या इच्छेचा आदर राखला जाईलच असं नाही. (असलं काही बोलायचं नाही, असं म्हणून अशा विषयाला कुलूप लावलेलं पाहिलं आहे)

दुसरं - अशा गोष्टी - चांगले कपडे, भांडी, फर्निचर वापराविना घरात पडून राहणं हा मला त्यासाठी लागलेल्या नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय वाटतो. ज्यांना अशा वस्तूंची गरज आहे, त्यांच्याकडे त्या पोचणं कधीही चांगलं. अशी माणसं आपल्या नात्यातलीच असायला हवीत असंही नाही. अर्थात भेट -दान - देणगी - भंगार - जुने कपडे ज्या मिळेल त्या मार्गाने त्या वस्तू वापरात येतील असं पाहावं.

मलाही हे करायची गरज आहे. आणि ती जा णवताच कृती करणे गरजेचे आहे. माझ्याकडे वेळोवेळी घेतलेली चार मनगटी घड्याळे आहेत. एक पहिल्या पगारात घेतलेलं. दुसरं ते जुनं झालं म्हणून. तिसरं खास प्रसंगी घालायला. चौथ कशावर तरी मिळालेलं. आता फिटनेस बँड मुळे घड्याळ कधीतरीच लावलं जातं. तर यातली तीन घड्याळं मी देऊन टाकणार आहे. आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंतच पोचेल असा पर्याय निवडेन. किंवा सरळ रिसायकल होतील. घड्याळं ही सुरुवात.

>>>प्रियजन असतील तर त्यांना त्रासच वाटणार नाही. प्रियजन नसतील तर होऊदे त्रास<<> हे खरय. पण मला वाटतं की जसजसं वय वाढू लागतं, प्रामुख्याने 60-70+ नंतर जगण्याची आसक्ती कमी व्हायला याची मदत होऊ शकते. मागे रहाणाऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष त्या व्यक्तीसाठी हे उपयोगी पडेल असं मला तरी वाटतं. म्हणतात न, कशात जीव अडकून राहू नये; तर त्याची ही सुरुवात वाटते. एक एक जबाबदारी पूर्ण करणं, एका एका जबाबदारीतून मुक्त होणे असे काहिसे. आणि यात नकारात्मक काही नाही, आनंदाने, समजून उमजून, मनापासून हात मोकळे करता यायला हवेत. जोर जबरदस्तीचं काम नाही हे Happy

झाडांबरोबरच जास्तीची भांडी, जी गेल्या चार वर्षात वापरली गेली नाहीत, तीपण मागच्या वर्षी काढून टाकली.

भरत छान प्रतिसाद!

<, प्रामुख्याने 60-70+ नंतर जगण्याची आसक्ती कमी व्हायला याची मदत होऊ शकते> हेही खरंय. यात अंडं कोणतं आणि कोंबडी कोणती हे सांगणं कठीण किंवा व्यक्तिपरत्वे बदलेल. म्हणजे कोणाची जग ण्याची आसक्ती कमी होऊ लागली म्हणून वस्तू कमी करेल तर को णाला उलट करावं लागेल.
६०-७० हा वयोगट आता पुढे सरकू लागला आहे. माणसं कार्यरत राहण्याचा टप्पा लांबतो आहे. पण सुरुवात करायला कोणतंही वय चांगलंच.

किंडलवरची पुस्तके.
Kindle app मधले पुस्तक गूगलड्राईव'वर टाकून लिंक शेअर केली तर ते कुणालाही डाउनलोड करून वाचता येतं. फाईल azw3 असल्याने ते वाचणारे इबूक रीडर (किंडल app )असले की झालं.
उदाहरणार्थ हा एक प्रयत्न.
Ottoman Empire

साड्या प्रकरण सोडून बोला. मुळात साडी पिरामिड मध्ये जाईल वाटतं. पॅन्टस जाऊन अर्ध्या पॅन्टससुद्धा आल्यात. धोत्रे /लुंगी/ धोती यांचा बहुविध उपयोग तरी असतो कारण साधे पांढरे कापड म्हणजे स्वस्त आणि काहीही वापर होतो. भरजरी साड्या विकतसुद्धा घेऊ नयेत. उगाचच कपाटाला भार आणि ड्राईक्लिनिंगचा खर्च.

फोटो अल्बम चे काय करावे? विशेषतः लग्नातले जडच्या जड. पुढच्या पिढीला ते सांभाळणे अवघड होणार

फोटो अल्बम …
मी गेले २-३ वर्ष घरात साठलेल्या एकूण १२००० नव्या -जुन्या फोटोंचे sorting/ digitalisation केले आहे. आजच्या युगात स्क्रीन वर नसलेले फोटो घरात कुठेतरी पडून राहातात, त्यापेक्षा ते digitalise केले तर फोन, laptop वर पुन्हा पुन्हा पाहता येतात.

digitalisation केले मीपण, परंतू खरे फोटोच चांगले. आताचे सर्व डिजिटली आहेत तरीही शंभरात पाच प्रिंट काढतो.
लग्नाचे तर होमाचे वगैरे फुकटचा भरणा असतो. शिवाय ओटी भरणे (चाळीस बायकांचे चाळीस!) . फोटोग्राफरना कधीही बोलवू नये आपणच टोटल शंभर फोटो काढावेत. विडिओ तर उगाचच कुठलेतरी संगीत चिकटवून ठेवतात. ते काढताही येत नाही. मुळात कमीच काढावे म्हणजे पुढचा त्रास वाचतो.

खरंतर विल्हेवाट कशी लावावी हाच प्रश्न होता. मी नीट लिहिलं नाही आधी. आताचे सगळे डीजीटलच आहेत. प्रिंट करतच नाही आजकाल. पण जुने/ लग्नाचे स्कॅन झाल्यावर नष्ट कसे करायचे? यापूर्वी नको असलेले कागद रद्दीत आणि अति confidential जाळून टाकले आहेत. पण प्रिंट फोटोचे काय करणार?

प्रिंट फोटोचे काय करणार?
काही अल्बम मिळतात ना त्यात ते फोटो लावून माहिती लिहिली जात होती. तसे अल्बम '५० -'६० काळातलेसुद्धा डॉक्युमेंटरीमध्ये दाखवतात. अर्थात प्रिंट्स कमीच असत.
आताही डिजिटल असले तरी काही प्रिंट्स काढून मुलांचेही एक, दोन,पाच,दहा,पंधरा . . .वयाचे प्रत्येकी दोन तीन लावून संकलीत अल्बम करता येईल.

वस्तू काढायला घेतली की किंमतीचेच लेबल समोर नाचू लागते. माजल्यासारखे उधळपट्टी करत आहोत असे वाटू लागते. ही अर्थात मेंदूची ट्रिक आहे. आहे तो मोह. पण जर व्यवस्थित वापरुन झालेली असेल तर त्या वस्तूने पुरेपुर मोबदला दिलेला असेल तर, आयडियली काढता यावी. हां नव्या नव्या वस्तूंची भर घालू नये - हे फारच पटते.
या ब्लॅक फ्रायडेला फक्त शूज घेतले. तेही लागणारच होते म्हणुन.

मागे एकदा पिसीवर फोटो upload केले होते.पेन ड्राईव्ह वर घ्यायचे राहिले.काही महिन्यांनी हार्ड डिस्क क्रॅश झाली.बरेच फोटो (नंतर न मिळणारे) कायमचे गेले.

फोटो स्टोरेज -
३२ जीबीची मेमरी कार्डे (SanDisc/Nitro Strontium घेतली आहेत.) ६४/१२८ उडाली तर फार नुकसान होईल. कार्ड रीडर वापरून ओटीजी केबलने फोटो ट्रान्स्फर केलेत. लेबल लावून ठेवले आहे कोणत्या कार्डात कोणते आहेत. उडाले तर /कार्ड करप्ट झाले तर नोकियाच्या जुन्या फोनमधून एक कार्ड उघडले . त्यातून फोटो काढून घेतले.
एखाद्या फोनात युएसबी ओटीजी नसेल तर https share apps वापरून फोटो दुसऱ्या फोनात/पीसीवर नेता येतात. ((उदाहरणार्थ Wi fi file transfer app https://play.google.com/store/apps/details?id=com.smarterdroid.wififilet... )

लेख आणि त्यातला विचार दोन्ही आवडले. ही चर्चा सुरू केल्याबद्दल धन्यवाद अनिंद्य.

पसारा आटोपशीर ठेवावा त्यासाठी एका विशिष्ट वयापर्यंत थांबु नये हा उपाशी बोका ह्यांचा मुद्दा पण पटला. पर्यावरणाच्या संदर्भात हा मुद्दा नेहमी मांडला जातो आणि मला पटतो.

लेख आवडला. तुमचे सारेच लेख रोचक असतात.

यातला विचार अगदीच वेगळा आहे आहे असे नाही. सगळेच आपापल्या परीने छोट्यामोठ्या स्केलवर हे करत असतात. आमच्याकडेही दोन्ही घरातले आजीआजोबा हा विचार करतात आणि तशी पावले उचलताहेत हे जाणवते. तरी कोणी ठरवून सिस्टमेटीक पद्धतीने करत असेल तर ते केव्हाही चांगलेच.

पण मला स्वत:ला हा लेख आणि त्याखालील प्रतिसाद वाचत गेलो तसे एक नकारात्मक भावना मनात तयार होत गेली. म्हणजे मृत्युचे भय असे नाही, पण प्रत्येक क्षणाला भरभरून जगण्याचा विचार करायचा ऐवजी हे असे जाण्याची तयारी करा हा विचार मला जमेलसे वाटत नाही.
कदाचित माझे वय तितके नाही जे शेवटाचा विचार करावा त्यामुळे कदाचित असे झाले असावे. पण मग माझ्याबाबत ते वय काय असेल हा विचार करतानाही, छे, हे कधीच नाही जमणार असेच वाटते. माझीच पोस्ट कोणाला नकारात्मक वाटली तर क्षमस्व! पण लोकं बघतील आपल्या पश्चात कोणाला काय द्यायचेय ते असेच वाटते. हे मी कमावलेय, मी जमवलेय तर मीच वाटायला हवे हे गरजेचे नाही. फक्त एखादा गुप्त खजाना नकाश्यात लपवून जाऊ नये ईतकेच Happy

किंडलची सूचना -
पुस्तकं विकत घेणारे नंतर कुणाला देऊन टाकतात, तोही वाचून झाल्यावर आणखी कुणाला देतोच. तसंच किंडलवरही डिजिटल पुस्तक विकत घेतलेलं ते नंतर कुणालाही देण्यात गैर नाही. अर्थात इकडे किंवा फेसबुक/वाटसपवर लिंक द्यायची नाही, कुणी मागेल त्यालाच द्यायची.
असो.

मुळात किंडलची पुस्तके तुमच्या मालकीची नसतातच, ती तुम्ही भाड्याने वापरत असता. एक वेगळा धागा काढतो या विषयावर.

@ उपाशी बोका , @सामो, ओके.
वेगळा प्रकार आहे. I tunes वरची गाणी पर्सनल वैयक्तिक वापरासाठी असतात तसं असावं.
डाउनलोडची फाईल appमध्ये सापडत नाही. मी एक पुस्तक बाहेरून टाकलेले android app data मध्ये. ते काढून टाकले. त्यामुळे हा विषय संपला.
डिजिटल माध्यम नवीन आहे. पूर्ण समजलेले नाही. गैरसमज झाला.

Pages