या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.
तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.
तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !
सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :
१. एकट्याने सुरुवात करणे :-
हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.
२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.
३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.
४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.
५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.
६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.
७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.
आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!
सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?
लेख आवडला. हे शब्द माहीत
लेख आवडला. हे शब्द माहीत नव्हते. प्रतिसाद ही छान आहेत.
मला वाटतं यासाठी फक्त वयापेक्षा एकेकाचा स्वभाव, आलेले/पाहिलेले अनुभव असतो त्यानुसार ह्या पसारा आवरायच्या गोष्टी घडत असाव्यात.
एक दीड वर्षांपूर्वी सेम याच विषयावर आम्ही मैत्रिणी एकदा बोलत होतो. निमित्त झालं होतं जीच्याकडे गटग होतं तिच्या अपार्टमेंट मध्ये वरच्या मजल्यावर राहणाऱ्या काकूंनी तिला एक मोठं पितळी पातेलं दिलं होतं. आणि ही बऱ्याच जणांना असच सामान वाटून टाकलेलं. ह्या काकूंची दोन्ही मुलं परदेशात सेटल. इकडे परतण्याची शक्यता नाही. इथं त्या एकट्या राहतात. ह्यांनी हौसेने घेतलेल्या वस्तू प्लस मागच्या पिढीतल्या सांभाळून ठेवलेल्या वस्तू. मुलांना यातल्या कोणत्याही वस्तूंचा उपयोग होणार नव्हता. आठवण म्हणून एखादी वस्तू सोडल्यास. मग म्हणायच्या मी आहे तोवर ज्यांना हवं त्याना देते.
मला स्वतःला वस्तूंचा फार सोस नाही. अहो म्हणतातच संसारात ज्या काही वस्तू झाल्या/होतात त्यात तुझ्यापेक्षा मलाच उत्साह दांडगा असतो.
वरच्या शूज खरेदी वरून आठवलं. काकडी कोचवायची एक खिसणी असते हा मला नुकताच शोध लागलाय. मी नेहमी विळीवर च कोचवते. त्यात ही प्लॅस्टिकची 40- 50 रु ला मिळते म्हणे. एक दोन दुकानात चौकशी केली तर स्टील चीच होती 250-300 रु ची. रोजच्या वापराला दोन तीन ककड्या साठी गरज नाही. पुन्हा ती पडूनच राहील. कधीतरी मोठ्या प्रमाणावर कोचवावी लागते तर घेऊ घेऊ करत अजून घेतलीच नाहीये. हा स्वभाव नडतो माझा. घरात कुणकुण लागली तर मिळेल ती 3 इन वन वगरे खिसणी येईल.
तरीही जाणवतंय की बराच पसारा असतोय.
तुमच्या विचारप्रवर्तक
तुमच्या विचारप्रवर्तक प्रतिसादांसाठी अनेक आभार मंडळी.
वरील चर्चेत काही छान मुद्दे अधोरेखित झाले आहेत, जसे:-
१) पसारा कमी करण्यासाठी आणि सुटसुटीत जगण्यासाठी विशिष्ट वय गाठण्याची किंवा मृत्यूची वाट बघायची गरज नाही. त्याला काही भारदस्त नाव / process असण्याचीही गरज नाही. लेखात म्हटल्याप्रमाणे हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो, करत राहावा.
२) काहींनी स्वतः तर काहींच्या आप्तमित्रांनी जाणते-अजाणतेपणी ही आवराआवर केली आहे, किंवा तशी सुरुवात केली आहे. This is so good ! कारण मागे राहणाऱ्यांना काय काय चॅलेंजेस येऊ शकतात याबद्दलही काही भुक्तभोगीनीं लिहिले आहे. विदेशी/ दूरवर राहणारे आप्त असतील तर फार कटकटीचे होऊ शकते हे बघितले आहे. आता सरासरी वय वाढले आहे, वारस सुद्धा पन्नाशी-साठीच्या पुढचे असणे आणि देशाबाहेर असणे नॉर्मल होऊ लागले आहे. मालमत्ता नोंदणी कार्यालयाला भेट देण्याचा योग आल्यास जे बघायला मिळते ते आनंददायी नसते एवढेच म्हणीन.
३) डिजिटल पसारा आणि कचरा, डिजिटल लीगसी हा विषय आपल्या जीवनात आता बऱ्यापैकी डोकावू लागला आहे. याबाबद्दल लिहीन एकदा, किंवा अन्य कुणी लिहिल्यास भर घालीन. नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप वगैरे घेतानाच जुन्याला फॉरमॅट करून एक्सचेंज मध्ये देणे हा साधा उपाय केला तरी बराच पसारा कमी होतो.
४) मानवी भावभावनांचा, नात्यांचा गुंता हा अवल, अमा, अस्मिता, भरत, प्रज्ञा यांनी मांडलेला मुद्दा सर्वात कठीण इशू आहे ! आवरा आवरीत घरच्यांना सामील करावे / करू नये, त्याचे फायदे-तोटे असा विचार आलाय. त्याबाबतीत 'स्व मुखत्यार' व्हावे, जे आपल्याला पटेल आणि जमेल ते आणि तसे करावे असे मला वाटते. आपण दीर्घ प्रवासाला जाताना घर आवरून, एखाद्याला सोपवून जातो तसे - म्हणजे नीट राहा, हे ते करा/करू नका अशा सूचना देऊन जातो, मागे ते त्यांना हवे तसे करणार आहेतच. आपल्या मागे आपल्यावतीने दुसरेच निर्णय घेणार आहेत, आपल्याला पडून काय फरक पडणार ?
विचारांना श्रीमंत करणाऱ्या चर्चेसाठी पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
माझे प्रतिसाद जरा इरिटेटिण्ग
माझे प्रतिसाद जरा इरिटेटिण्ग वाटल्यास सॉरी आहे. पण मी ह्या विचार प्रक्रियेतून गेले आहे. आपला मृत्यु होणार ही जाणीव व तो नक्की कधी हे माहीत नाही हा कालातला एक पॉइन्ट ह्या मधल्या व्हाइट स्पेस मध्ये सध्या जगत आहे. त्यामुळे जरा कट थ्रोट लिहिले गेले व मॅडम आपल्याहून तीस पस्ति स वर्शे मोठ्या आता हा विचार करु बघत आहेत म्हणून जरा उत्सुकता वाटली होती. पण त्यांच्या प्रायवसीवर आक्रमण होणे आजिबात बरोबर नाही.
काही प्लेनिन्ग न करता नवरा बायको वारसा विना वारण्याचे उदाहरण म्हणजे देविका राणी व त्यांचे रशि यन आर्टिस्ट पती. ह्यांची बंगलोर मध्ये प्रचंड मोठी इस्टेट होती. व भरपूर आर्ट ट्रेझर्स, पैसे दागिने, शिल्पकृती चित्रे प्रत्यक्ष घर व जमीनी. हे सर्व शेवटी अगदी सोडून ते वारले म्हातारे होउन व पुढे फक्त केअर्टेकर ने विकून स्वतःची भर केली. पूर्वीच्या सावी मासिकात ह्या बद्दल तपशिलाने आले होते तेव्हा वाचून वाइट वाटले होते.
अगदी चोरापोरी गेले सर्व.
वारल्या नंतरचे आवरणे हे आई वडि लांसाठी केले आहे. मोलाची पुस्तके व एल पी रेकॉर्ड काढून टाकल्या कार ण ते हैद्राबादेस नेणे शक्य नव्हते. व जागा खाली करून मालकांना द्यायची होती.
@ भरत,
@ भरत,
वस्तू वापराविना पडून राहणं हा नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय आहे..... मिळेल त्या मार्गाने त्या वस्तू वापरात येतील असं पाहावं.
अ ग दी !
हजारदा सहमती याला.
@ अमा,
देविका राणी आणि निकोलस रोएरिच यांचे उदाहरण चपखल आहे. त्यांच्यासारख्या अनेक मोठ्या व्यक्ती अशी आवराआवर नीट करीत नाहीत तर काही फारच उत्तम करतात, उदा. दिलीप कुमार- सायरा बानो हे विनापत्य जोडपे. While living king size, they have planned life and afterlife things so well ! truly inspiring !
आईच्या मागे तिचा संसार आवरणे यातून गेलोय, बाबा आणि कोवळ्या वयातली आम्ही भावंडे सैरभैर झालो होतो. it can be hugely draining for sensitive souls ....
@ हर्पेन,
@ हर्पेन,
... प्रियजन असतील तर त्यांना त्रासच वाटणार नाही. प्रियजन नसतील तर होऊदे त्रास ....
हा हा, छान आहे हे
तुम्हाला आणि चोखंदळ संग्रह करणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा. कबूल केल्याप्रमाणे मी 'सुखलोलुप' श्रेणीत येतो, अगदी ह्या लेखात माझे रिक्तहस्त दाखवणारा फोटोसुद्धा मालदीवच्या श्रीमंत समुद्रातला आहे. such a funny contradiction ! त्याचवेळी मोठा पसारा आता आवडेना झाला आहे. त्यामुळे 'मिनिमीलिझम'चा माझ्यापुरता 'keeping / using only the very best' असा सोईस्कर अर्थ मी ठरवला आहे
बिलिव्ह मी, त्यानेसुद्धा खूप पसारा कमी होतो आणि फक्त सर्वोत्तम, आवडीच्याच वस्तू सतत वापरल्यामुळे फार आनंद मिळतो.
अनिंद्य आपल्याही कमेन्टस
अनिंद्य आपल्याही कमेन्टस इतक्या वाचनिय आहेत. गोषवारा छान मांडला आहे. खूपच छान मांडणी व प्रतिसाद दोन्ही.
Submitted by सामो on 6
Submitted by सामो on 6 December, 2022 - 01:15
You are very kind, thank you!
आपले चार आश्रम, 'शतायुषी भव'
आपले चार आश्रम, 'शतायुषी भव' उक्तीस स्मरून वयाची पहिली पंचवीस वर्षे शिक्षण, पंचवीस ते पन्नास गृहस्थाश्रम, पन्नास ते पंचाहत्तर वानप्रस्थाश्रम आणि वयाच्या पंचाहत्तरपासून पुढे संन्यासाश्रम प्रकाराने घालवायची असतात असे माझ्यापुरते ठरवले आहे.
मनुष्य साधारणपणे वानप्रस्थाश्रमाच्या टप्प्यापाशी पोचला की त्यासुमारास हळूहळू आवरासावर करावी असे वगैरे आपोआपच वाटत असावे.
मृत्यू त्याआधी / अकाली आला तर त्या वेळच्या वया-परिस्थितीनुसार पसारा हा असायचाच.
संन्यासाश्रमात कसे जगावे वगैरे फार विचार केलेला नाही. पण मृत्यु येण्याअगोदरची शेवटची काही वर्षे थोरो प्रमाणे निसर्गाच्या सानिध्यात घालवायला मिळावी असे माझे देवाकडे मागणे आहे.
भरत. यांच्या खालील दोन्ही विधानांना अनुमोदन
१. कुटुंबात, पुढच्या पिढीसोबत राहत असलेल्या वृद्धांच्या बाबत हा प्रश्न तितका गंभीर होत नाही. पण ज्यांची पिढी जवळ राहत नाही, त्यांनी स्वतःचे वेगळे संसार थाटले आहेत, अश्यांच्या बाबतीत मात्र होतो. आणि हे परदेशात , दूरच्या गावात राहत असतील तर आणखीनच.
२. वस्तू वापराविना पडून राहणं हा नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय आहे आणि मिळेल त्या मार्गाने त्या वस्तू वापरात येतील असं पाहावं
छान लेख! प्रतिसादही वाचनीय!
छान लेख! प्रतिसादही वाचनीय!
माझ्या बाबतीत जवळच्या व्यक्तीमागे आवरा आवर, घर बंद करणे हे बघायचा, मोठ्यांना या कामात मदत करायचा योग फार लवकर, अवघ्या १६ व्या वर्षी आला. वास्तू पुढील पिढीकडे सोपवणे हे यथावकाश, वकीलांच्या मदतीने होते पण आपल्या आईवडीलांचा इतक्या वर्षांचा संसार, आपले बालपण- काही तारुण्याची वर्षे - तो सगळा पसारा आवरणे हे शरीराला आणि मनालाही फार थकवणारे. आजोळच्या त्या मोठ्या घराचा पसारा आवरणे मग टप्प्या टप्प्याने बराच काळ चालले.
बाबांच्या माहेरचे घर आवरणे हे असेच आईच्या मनाला थकवणारे होते. मदतीला मोठी झालेली भाचे-पुतणे मंडळी होती तरीही मनाचा थकवा होताच. त्या अनुभवातून शहाणे होवून आईबाबांनी त्यांचे सामान हळू हळू कमी करायला सुरुवात केली. आता तर आई कुणी नवीन साडी वगैरे दिली की तशीच घडीही न मोडता, हौसेने साडी नेसणार्या कुणा तरुणाईला देवून टाकते. गेल्या भारत भेटीत मला लेकासाठी स्टीलची भांडी खरेदी करायची होती तर आईने तिच्याकडची कुणीकुणी दिलेली लहान भांडी,वाट्या-ताटल्या वगैरे माझ्या लेकाला विडीओ कॉलवर दाखवली. त्याला त्याच्या काटकसरीच्या नव्या संसारात गरज होतीच. त्याला पसंत पडली ती सगळी भांडी माझ्या सोबत पाठवून दिली. 'आजी, तू भांडी दिल्याने माझी किती सोय झाली!' म्हणत नातवाने त्याचा विकेंड भटारखाना दाखवला ते कौतुक आईला पुढे बरेच महिने पुरले.
या वर्षी 'आमच्या आईबाबांची बाग आवराल का' म्हणून काही रिक्वेस्ट आल्या. काहींच्या बाबतीत नव्या ओनरला हा पसारा नको, त्यांना नुसते लॉन हवे आहे आणि कधीकाळी मास्टर गार्डनर असलेल्या पालकांनी हौसेने गोळा केलेली फुलझाडे, कंद, अवजारे, पुस्तके यांना योग्य घर मिळावे अशी मुलांची इच्छा आहे. काहींच्या बाबतीत वृद्ध पालकांना रहात्या घरातच ठेवायचे आहे पण त्यांच्या सेफ्टीसाठी बाग आवरणे गरजेचे अशी परीस्थिती.
आम्हीही हळू हळू पसारा आवरायला सुरुवात केली आहे. बघू कसे जमते ते.
@ स्वाती२,
@ स्वाती२,
बरोबर आहे. प्रियजनांच्या पश्चात आवरणे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक थकवा आणणारे असते. मनाला वेदना देणारे, थकवणारे. विशेषतः हळवा स्वभाव असेल तर.
मुख्य म्हणजे लेखातील ज्ये ना
मुख्य म्हणजे लेखातील ज्ये ना बाईंनी. देहदान, नेत्रदान डु नॉट रिससिटेट, व्हेंटिलेटर सपोर्ट विषयी क्लीअर मते लिहून वकीलाकडून कायदेशीर पेपर आधी बनवायला हवे. कारण मुले अमेरिकेत असतील तर करणा र्या दुसर्या व्यक्तीस क्लीअर सूचना हव्यात. नाहीतर मागाहून मुले पण खुसपटे काढतील. मृत्यु पत्र बनवलेले असेलच ते अप्डेट करायला हवे. माझ्या नवर्याने वारल्यावर नेत्रदान केले. त्या लोकांना बोलावून ते करुन घेउ परेन्त मी तिथेच हजर होते. इट इज अ हॉरिबल एक्स्पिरीअन्स. पण तेव्हा त्याच्या बरोबर कोणीतरी हवे. असे वाटत होते.
व्हेंटिलेटर सपोर्ट आणि
व्हेंटिलेटर सपोर्ट आणि डॉक्टरांच्या मतानुसार रुग्णावरचे उपचार थांबवणे ह्याबद्दल बराच घोळ होतो खरा. नुकतेच एक उदाहरण बघण्यात आले. रुग्णाची एक मुलगी त्यांच्याजवळ पूर्णवेळ होती, दुसरी दुसऱ्या देशी. व्हेंटिलेटर सपोर्ट कुटुंबाने बहुदा फोनवर आपसात विचारविमर्श करून काढला. नंतर दुसऱ्या मुलीचे मत बदलले असावे, कुटुंबात वाद झाले.
याउलट लेखिका कविता महाजनांचे उदाहरण. सुस्पष्ट सूचना असल्यामुळे डॉक्टर आणि वारसांचे काम सोपे झाले.
मृत्युपत्र बनवणे आता हळूहळू रुजू लागले आहे, पण त्याला परिस्थितीनुसार अपडेट करणे अजून नाही.
मुंबईचे डॉ. निखिल दातार
मुंबईचे डॉ. निखिल दातार “Living Will’ चे समर्थक आहेत, त्यांनी स्वत: असे इच्छापत्र तयार करुन नोटराईज केले आहे. इच्छुकांना ते फ़ॉर्मेट म्हणून वापरता यावे यासाठी पत्र सार्वजनिक केले आहे.
दुवा:-
https://m.timesofindia.com/city/mumbai/pushing-movement-to-seek-dignifie...
मनोरंजनार्थ-
मनोरंजनार्थ-
आज एका जेष्ठांनी हे ढकलपत्र पाठविले. त्यांना मग ह्या लेखाची लिंक पाठवली
हसलो, पण ही अनेकांची खरीखुरी समस्या असू शकेल याची जाणीव आहे.
(No subject)
अनिंद्य, नेटफ्लिक्सवर एक शो
अनिंद्य,
नेटफ्लिक्सवर एक शो आहे Hoarders नावाचा. त्यात असंच काहीसं दाखवलं आहे. बऱ्याचदा मानसिक आरोग्य चांगलं नसलं की माणूस वस्तुंमध्ये जीव गुंतवतो. त्यात तर थेरपिस्ट येऊन मदत करतात. म्हातारपणी प्रचंड एकटेपणा येतो. तेव्हा कदाचित वस्तुंमधल्या आठवणींची सोबत वाटत असावी.
तरुणपणी वाटणारा एकटेपणा व म्हातारपणी वाटणारा एकटेपणा यात खूप फरक असावा असं वाटायला लागलं आहे हल्ली. मी पाच मिनिटे हा शो बघितला पण टिव्हीवरचा पसारा बघून देखील मलाच ताण यायला लागला. मला भांड्यामधला जीव- कपड्यांमधला जीव - वस्तुंमधला जीव ही आसक्ती समजत नाही. भावनिक मूल्य असणाऱ्या वस्तू असतात,मलाही आहेत. पण काही जणांचा प्रत्येकच वस्तुवर प्रचंड जीव असतो. मग ते खूप छान संसार करत असावेत असं म्हणावं तर मीही सगळं मन लावूनच करते. म्हातारपण आलं म्हणून काही आपण समजदार, शहाणं उदार वा निरासक्त होऊ असं काही नाही, उलट कधीकधी या सगळ्याचा आटापिटा वाढलेलाच दिसतो. कुठतरी cling केलं की आधार वाटत असावा, sense of belonging, sense of life वगैरे. प्रत्येकानं आपापलं equilibrium शोधावं झालं.
तरुणपणी वाटणारा एकटेपणा व
तरुणपणी वाटणारा एकटेपणा व म्हातारपणी वाटणारा एकटेपणा यात फरक - हे शक्य आहे.
वस्तू as sense of belonging ? असा विचार नव्हता केला. माझे निर्जीव वस्तूंमधे फार गुंतणे होत नाही, I just enjoy using things, without necessarily owning them.
Fellow humans are my true treasure, तिथे गुंतवणूक आणि गुंता दोन्ही जास्तच आहे
Fellow humans are my true
Fellow humans are my true treasure, तिथे गुंतवणूक आणि गुंता दोन्ही जास्तच आहे
आणि माझ्या कुत्र्यातही
+माझाही.
माझं एक निरीक्षण आहे. काही
माझं एक निरीक्षण आहे. काही लोकांचे सेवानिवृत्ती घेतल्यानंतर वस्तूत जीव रमणे वाढते. त्यात वय, मनातील भावनाशील बदल याशिवाय खर्च कमी करण्याची भावना ही जोर धरत असावी. कमावत असताना जे खर्च सहज केले असते, ते नंतर करताना अपराधीपणा वाटतो. त्यामुळे ज्या आहेत त्या गोष्टी, कधी ना कधी वापर होईल म्हणून, तश्याच ठेवण्याकडे ओढा वाढतो. त्यात डबे, खोकी, वाया गेलेली उपकरणे (त्याचे सुटे भाग वापरता येतील म्हणून), वायरी, भांडी, क्रोकरी, कापडी आणि प्लास्टिक पिशव्या, कपडे (त्याच्या चिंध्या), प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या, तुटून टाकून दिलेल्या बाटल्यांची बुचे, लाकडी फळ्या, तुकडे, विटा अश्या काहीही गोष्टी असतात. त्या शंभर एक गोष्टींपैकी एखाद्या गोष्टीचा टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करण्यात उपयोग होतो आणि त्याच्या जोरावर बाकीही गोष्टी अश्याच उपयोगी पडतील आणि आपला चिकार पैसा वाचेल हा आत्मविश्वास निर्माण होतो.
सध्या मी सुपात असलो तरी कधीतरी याच जात्यात जाऊ शकतो याची कल्पना आहे.
Any update on the old lady
Any update on the old lady who started this discussion? Is she ok?
She is in doing just fine,
She is in doing just fine, thanks अश्विनीमामी for your concern.
वरच्या सगळ्या पोस्ट खूप
वरच्या सगळ्या पोस्ट खूप आवडल्या.
हपा,
हपा,
“टाकाऊतून टिकाऊ” हे जनरली फार फसवे असते. बहुतेक केसेसमधे चार आने की मुर्ग़ी बारा आने का मसाला असे व्यस्त प्रमाण असते
अनुमोदन
अनुमोदन
God bless. Sending positive
God bless. Sending positive vibes
Thanks. Take good care of
Thanks. Take good care of yourself and have a bright day अश्विनीमामी !
(No subject)
मला वाटलं की हा 'रेकी'चा काही प्रकार आहे की काय
पक्षी अंगणी उतरती |
पक्षी अंगणी उतरती |
ते का गुंतोनी राहती ||
तैसे असावे संसारी |
जोवरी प्राचीन्नाची दोरी ||
वस्तीकर वस्ती आला |
प्रातःकाळी उठोनी गेला ||
एकाजनार्दनी शरण |
ऐसे असता भय कवण ||
अचानक आलो. येताना काहीच तयारी केली नाही मग जाताना का करायची ?
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...
काही लोक तर
ऋण कृत्वा घृतं पीबेत
या वृत्तीने जगतात.
सन्मानानं मरणं चांगलं असलं तरी खरंच सन्मान्य मरण येईल? प्रयत्न करायला हरकत नाही.
जास्त जमा नसेल तर उत्तम .
@ दत्तात्रय साळुंके,
@ दत्तात्रय साळुंके,
जास्त जमा नसेल तर उत्तम + १
प्राचीन्नाची दोरी....
सुंदर शब्दरचना !
यावरून तुकोबारायांच्या काही ओळी तुटक आठवतात ..
पक्षीयाचे घरी नाही सामुगरी I त्यांची चिंता करी नारायण II
तुका म्हणे आम्ही पिप्पलिकांची जात I पुरवी मनोरथ पांडुरंग II
सगळ्यांना गरजेपुरते उपरवाला देतो म्हणतात, पण मनुष्याचा unending हव्यास पूर्ण करणे भगवंताच्याही ताकदीबाहेरचे असावे
>>>मनुष्याचा unending हव्यास
>>>मनुष्याचा unending हव्यास पूर्ण करणे भगवंताच्याही ताकदीबाहेरचे असावे >>>
तो तर बुवा तुम्ही कसं भ्रमता हेच पाहतो आणि फजिती पाहून हसतो. अरेरे किती वेडपट तू, जे पाहिजे ते घेत नाही आणि भलतंच जमा करत बसलास.
Pages