पुलंच्या लेखनातील पूर्ववाङ्मयीन (गाळीव/न कळीव) संदर्भ

Submitted by हरचंद पालव on 18 June, 2022 - 10:28

विल्यम हेझ्लट नावाचा एक जुना इंग्रजी साहित्यिक म्हणून गेला आहे, की हास्य आणि रुदन हे 'काय आहे' आणि 'काय असायला हवं' ह्यातल्या फरकावर अवलंबून असतात. जेव्हा वस्तुस्थिती ही आपल्याला ह्या फरकामुळे दु:ख देते तेव्हा आपण रडतो आणि जेव्हा अनपेक्षित आनंद देते तेव्हा आपण हसतो. पुढे मराठीत आचार्य अत्र्यांनी त्यांच्या 'विनोदाचे व्याकरण' ह्या विषयावरील व्याख्यानातही 'विनोद हा, काय आहे आणि काय असायला हवं, ह्यातल्या फरकावर अवलंबून असतो' अशीच सोपी व्याख्या केली आहे. काही विनोद हे त्यात 'काय हवं' हे आपल्याला माहीत नसेल तर कदाचित तितके भावतीलच असं नाही.

नमनाला एवढं घडाभार तेल ओतण्याचं कारण म्हणजे पुलंच्या लिखाणातील काही विनोदांबाबतीत माझीही अशीच परिस्थिती झाली. उदाहरणार्थ असा मी असामीत गुरुदेव प्रकरणात 'हे कोण बोलले बोला म्हणून मी मागे पाहिलं तर ...' ह्या वाक्यात ते 'कोण बोलले बोला' ऐकायला मजेशीर वाटलं होतं. पण मुळातली 'हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' ही कविताच त्यावेळी माहीत नसल्यामुळे काय अपेक्षित आहे आणि काय अर्थाने ते शब्द वापरले ह्यातला फरक आणि त्यातली मजा कळाली नव्हती. 'वरदाबाईंनी मीराबाईच्या तुमबिन मोरीत तोंड घातलं' - हे एखाद्याला 'तुमबिन मोरी' किंवा एकूणच मीराबाईची भजनं माहीत नसलेल्यांना कळेलच असं नाही. केवळ विनोदच नाही, तर पुलंच्या लिखाणात कित्येक अन्य भाव व्यक्त होतानादेखिल असे त्यांच्या पूर्वीच्या वाङ्मयातले संदर्भ येऊन जातात. ते मुळातले संदर्भ माहीत असतील तर पुलंचं लिखाण वाचतानाची मजा, त्यातली रसनिष्पत्ती वृद्धिंगत होते असा अनुभव आहे. ते संदर्भ कुठून कुठून घेऊन पुलंनी ज्या सहजतेने वापरले आहेत, त्यावरून त्यांच्या सखोल वाचनाची आपल्याला प्रचिती येते. त्यातले आपल्याला माहीत असलेले काही संदर्भ, माहीत नसलेले काही अशा सर्वांची चर्चा करायला हा धागा उपयोगी पडावा. सुरुवात करायची म्हणून खाली काही मला माहीत असलेले संदर्भ देतो.

कवींच्या गणनाप्रसंगी सुरुवातच कालिदासापासून करतात, त्याला अनुसरून मीही सुरुवातीच्या बिगिनिंगमदी कालिदासाचे पुलंच्या लिखाणातले दोन संदर्भ सांगतो. त्यातला पहिला आहे, अंतु बर्वामधला. त्यात अंतु बर्वा म्हणतो की 'कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा ! हे सगळं चक्रनेमिक्रमेण होतं.' ह्यातला जो चक्रनेमिक्रमेण म्हणून शब्द आहे, त्याचा उगम कालिदासाच्या मेघदूतात आहे. जगण्याला (गटणीय भाषेत - जीवनाला) कालिदास चाक आणि त्याच्या आऱ्यांची उपमा देतो.
कस्यात्यन्तं सुखमुपगतं दु:खमेकान्ततो वा
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण॥

कायमच सुख किंवा कायमच दु:ख असं कुणाच्या वाटेला येतं? जीवनाची दशा ही नेमाने खाली जाऊन वर येणाऱ्या चक्राप्रमाणे असते. मेघदूतात काही मोजके, ज्याला आपण आजकाल मराठीत आयकॉनिक म्हणतो, अशा पद्धतीचे श्लोक आहेत. त्यातला एक हा म्हणता येईल. एकूणच उपमा ह्या अलंकाराच्या बाबतीत कालिदास हा 'दादा आदमी' मानला जातो. त्याच्या सर्वात लोकप्रिय उपमांपैकी 'चक्रनेमिक्रमेण' ही एक आहे (इंदुमती स्वयंवरातली दीपशिखेची उपमा तर सगळ्यात जास्त हिट आहे. त्यावरून त्याला 'दीपशिखा-कालिदास' अशा नावाने संबोधतात. पण तो आत्ताचा विषय नाही.). मराठी विश्वकोशावर अर्थनीतीवरच्या नोंदीत देवदत्त दाभोलकरांनी तेजीमंदीच्या बाबतीत चक्रनेमिक्रमेण हा शब्द वापरलेला दिसला, हे जाता जाता गंमत म्हणून नमूद करतो.

दुसरा संदर्भ येतो तो बटाट्याच्या चाळीच्या संगीतिकेत.
'गृहिणी सचिव सखी एकांती ललित कलातील प्रियशिष्या ती'
ही पुलंनी लिहिलेली ओळ कालिदासाच्या 'गृहिणी सचिव: सखी मिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ' ह्या ओळीचा थेट अनुवाद आहे. खरं म्हणजे रघुवंश ह्या महाकाव्यात इंदुमती ह्या आपल्या प्रिय पत्‍नीच्या मृत्यूनंतर विलाप करणाऱ्या अज राजाच्या तोंडी हे वाक्य येतं. म्हणजे मुळातलं वाक्य करुण रसात (ती कशी होती वगैरे आठवणीत) येतं. त्याच्या पुढच्याच ओळीत पुल कालिदासाला क्रेडिट देऊन काय म्हणतात ते पहा -
कविकुलगुरुच्या विसरा पंक्ती,
कालप्रवाही वाहुनि गेला त्या युवतींचा ग्राम,
(रसिका,) तुझे न येथे काम!

चला, आता जिथून ह्या विषयाची सुरुवात झाली, त्या संदर्भाकडे वळू. 'हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' - गोविंदाग्रजांनी लिहिलेलं अत्यंत कारुण्यपूर्ण असं हे गीत आहे. ते गीत ऐकल्यानंतर मी पुन्हा जेव्हा ... 'अहो गुरुदेवांना बरं का साहेब, सगळे सारखे' - हे कोण बोलले बोला म्हणून मी मागे पाहिलं... हे ऐकलं तेव्हा अक्षरश: फुटलो. त्यातली 'राजहंस माझा निजला' ही ओळ बिगरी ते मॅट्रिकमध्येही आलेली आहे. बहुधा कुठल्याही कवितेला 'कळवण्यास अत्यंत दु:ख होते की' प्रकारची चाल लावणाऱ्या मास्तरांच्या संदर्भात ती येते.

असा मी असामीमध्ये आणि पुलंच्या अन्यही काही लिखाणात उल्लेख असलेले 'भो पंचम जॉर्ज भूप' म्हणजे कोण ते आपल्याला माहीत असेलच, पण ती ओळ पंचम जॉर्जच्या अधिपत्याखाली असताना मराठी शाळांमध्ये सर्वांना म्हणाव्या लागणाऱ्या प्रार्थनेतली आहे. त्यावेळी बालपण घालवलेल्या सर्वांनाच हा विनोद जास्त भावला असेल यात शंका नाही.
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य | विबुधमान्य सार्वभौम भूवरा ||
नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा | शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा ||

असे आणखी कित्येक संदर्भ आहेत. तुम्हाला लक्षात आलेले किंवा आणखी माहिती हवी असलेले असे त्यांच्या लिखाणातले संदर्भ असतील तर त्यावर चर्चा होऊन जाऊ द्या.

(मागे वावे यांच्या दुसऱ्या एका धाग्यावर ह्या धाग्याची कल्पना निघाली. बरेच दिवस हा विषय चर्चेला घ्यावा हे मनात होतं पण नंतर विसरून गेलो. काही दिवसांनी फेरफटका आणि वावे ह्यांनी आठवण करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार.)

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आतां आमोद सुनांस जालें । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठिले । लोचनेसी ।।
आपुलेनि समीरपणें । वेल्हावती विंजणें ।
कीं माथेचि चाफेपणें । बहकताती ।।
जिव्हा लोधली रसें । कमळ सूर्यपणें विकाशे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा झाले ।।
फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची झाली नर ।
जालें आपुलें शेजार । निद्राळुचि ।।
दिठीवियाचा रवा | नागरू इया ठेवा |
घडिला कां कोरिवां | परी जैसा ||
चूतांकुर झाले कोकिळ । आंगच झाले मलयानीळ ।
रस झाले सकळ । रसनावंत ।।
तैसें भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ।
हें सरले अद्वैता । अफुटामाजीं ।।

आमोद म्हणजे सुगंध तेच घ्राणेंद्रिय झाले, शब्दच कानात प्रविष्ट झाले, आरसेच डोळे झाले.
वायूच आपल्या गतीने विंझण म्हणजे पंखा होऊन वारा घेतो किंवा मस्तकच चाफा होऊन शोभत आहे.
जिव्हाच रसरूप झाली, कमळच सूर्य झाले, चकोरच चंद्र झाले.
फुलेच भ्रमर झाली, तरुणीच पुरुष झाली, बिछानेच झोपाळू झाले.
दृष्टीच्या स्वरूपातच सुंदर सोन्याचा रवा घडला गेला तर सोने व दृष्टी यांत भेद कुठे आहे?
आंब्याचे पल्लवच कोकीळ झाले, अंगच मलयानिल (चंदन) झाले, रसनाच रस झाली.
त्याप्रमाणे भोग्य व भोक्ता, पाहणे आणि पाहता हे अद्वैत स्थितीत सरले.

(अमृतानुभव विवरण : श्रीरंगनाथमहाराज परभणीकर)

धन्यवाद, गजाभाऊ. Happy

'दिठिवियाचा रवा'वरून शोधताना दात्यांच्या शब्दकोषात हे सापडलं:
रवाळणें, रवाळें (p. 2594) रवाळणें, रवाळें—न सोनाराचें एक हत्यार; गड्डीच्या दरामध्यें सोन्याच्या मण्याचीं दोन छकलें तयार करतांना सोन्याच्यां तुकड्यावर उभी करून वर ठोकले असतां, वरचा ठोका सोसणारी (रवीसारखी) काडी; नक्षी उठविण्याचा खिळा. [रवा]

तसंच 'नागरू'चा अर्थ सुघड असाही घेतला जात असावा असं दिसलं:
2) नागर (p. 1815) नागर—पु. गुजराथेमधील ब्राह्मणांची एक जात व तींतील व्यक्ति. -वि. १ नगरा-शहरासंबंधीं. २ (ल.) हुषार; चतुर; जाणता; चाणाक्ष; धूर्त. 'ना तरी नगरांतरीं वसिजे । तरी नागराचि होईजे ।' -ज्ञा १.४१. ३ नागरिक; नगरवासी. 'नागरां देवां खोंबकरू ।' -शिशु १५२. ४ सुरेख; सुंदर; सुसंस्कृत. 'भूमंड- ळींच्या कन्या नागर ।' -ह २६.१४५. ५ लबाड; अनीतिमान्. [सं. नगर] ॰चुडा-बांगड्या. 'सुढाळ मुक्तें कांठोकांठ । नागर- चुडा नागरे ।' -वेसीस्व ९.१४०. ॰पण-न. १ सुंदरता; सौंदर्य; कांति; तेज. 'देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणे ।' -ज्ञा १०.४२. २ ऐश्वर्य; मोठेपणा. 'जो आपुलेनि नागरपणें ।' -ज्ञा २.३६३.

म्हणजे दृष्टी पडेल तिथे सौंदर्य अवतीर्ण होईल (सौंदर्य पाहणार्‍याच्या दृष्टीत असतं असं म्हणतोच आपण) असं असेल का?
सौंदर्य आणि सौंदर्यदृष्टी यांतलंही द्वंद्व नाहीसं झालं, असं?

फार सुंदर चर्चा चालू आहे. इथेच चालू राहिली तरी हरकत नाही. गजानन, मोठे काम केलेत!

आपले अ‍ॅडमिन वेताच्या पंख्याने वारा घालतात >> ह्या गडबडीत आचार्यांचा हा धमाल प्रतिसादही येऊन गेला Lol Lol

दामले मास्तर या महाभागाचे वर्णन करायला हाताशी भरपूर हिरवा रंग हवा. त्यांचे डोळे हिरवे होते. त्यामुळे "नानांचे हिरवे डोळे " ही ओळ ऐकली की माझ्या डोळ्यासमोर दामले मास्तर उभे रहात. >>> "नानांचे हिरवे डोळे" कुठल्या कविते मधील ओळ आहे का

सौंदर्य आणि सौंदर्यदृष्टी यांतलंही द्वंद्व नाहीसं झालं, असं? >>> मला हे नेमकं वाटतंय

आपले अ‍ॅडमिन वेताच्या पंख्याने वारा घालतात >>> Lol

बाईंची पोस्ट वाचल्यानंतर शोधताना हे सापडले.
रवा—पु. १ कण (बंदुकीची दारू, साखर वाळू इ॰ चा). 'दिठी वियाचा रवा । नागरु इया ठेवा ।' -अमृ ९.५.२ मध किंवा कढविलेलें तूप इ॰ न डिवचतां ठेवून दिलें असतां त्यांत जे कण उत्पन्न होतात ते. ३ भरडलेलें गव्हाचें पीठ, सांजा, कणीक, तांदळाचें पीठ, इ॰ कांतील जाडा कणांश राहतो तो. ४ खडा; ढेप, (गुळाचा, साखरेचा). 'जे गोडी नाबदरासी । तेचि वेगळी रवेयासी ।' -एभा ४.२६१. ५ सोन्याचांदीचा रज; सोनें आटवून बारीक असा गोल आकाराचा केलेला लहान गोळा. ६ दिव्यामध्यें तापलेल्या तेलांतून बाहेर काढावयाचा सोन्याचा किंवा धातूचा तुकडा. 'त्या सतीनें रवा काढिला.' -वाडबाबा २.६३. ७ जो उगाळतात, ज्याचें गंध कुंकू, वगैरे करतात तो तांबडा हळकुंडाचा तुकडा; विशिष्ट क्षाराचीं पुटें देऊन तांबडें केलेलें हळकुंड. ८ रहाटाच्या कणेकडास बसविलेलें आढीस जोडणारें उभें लांकूड. ९ दागिन्यावरील कंकर; पेरांच्या आवटीची मुद्रा, ठसा; सोनाराच्या पेरांची आवटी नांवाच्या ठशांतील खांच (ज्यांत सोनें, चांदी, इ॰ चा पातळ पत्रा टोकला असतां त्यांत फुगा उत्पन्न होतो). ॰काढणें-सोनें चांदी इ॰ चा रज किंवा तुकडा तापलेल्या तेलांतून हातानें बाहेर काढणें; एक दिव्याचा प्रकार. रवा अर्थ ६ पहा. रवाळ-वि. १ जाड्या कणांच्या रूपांत असलेलें; दाणेदार; कणदार (तूप, मध, साखर इ॰). २ खरी- पेक्षां मोठा व पत्रीपेक्षां लहान (कोळसा)-स्त्रीन. सोनाराचें एक हत्यार. रबाळणें पहा.

ती ओवी पहिल्यांदा वाचली तेंव्हा स्पष्टीकरण न बघता फारशी समजली नव्हती. स्पष्टीकरण, इथली चर्चा, नेटवरचे सापडलेले संदर्भ वाचल्यावर मतितार्थ बाईंनी लिहिल्याप्रमाणे हाच आहे हे समजले. पण तरीही त्या ओवीतला प्रत्येक शब्द फोडून (दिठी, विया, रवा, नागरू, इया, ठेवा, घडिला, का, कोरिवा, परी, जैसा) अर्थ जोडता आला नाही.

या धाग्यावरच्या चर्चेत भाग घेण्याची पात्रता नसल्याने घेतलेला नव्हता. हल्लीच पुलंच्या साहित्याला कोणते नाव देता येईल अशी एक उपचर्चा काही ठिकाणी (माबोवर) पाहण्यात आली. पुलं स्वतः त्याबद्दल काय म्हणतात याची शहानिशा करताना कधी काळी गुगल डॉक मधे सेव्हलेला हा पुलंचा लोकसत्तेतला लेख सापडला. यात उपमांचा खुलासा आहे आणि त्यांच्या लिखाणाला काय म्हणावे याचे त्यांनी केलेले विश्लेषण सुद्धा आहे असे वाटते. गुगल डॉक ची लिंक देणे शक्य नसल्याने त्यातल्या काही ओळी सर्च दिल्यावर गुगलने ही लिंक दिली.

https://cooldeepak.blogspot.com/2022/03/blog-post_29.html

हा ब्लॉग बहुतेक कुलदीप-१२-१३ या माबोकराचाच आहे. (हा त्याचा जुना माबो आयडी आहे, त्यानंतर त्याने बदलला होता, पण तो आठवत नाही.)

तो लेख छानच आहे. (आधीही वाचला होता.)

रघु आचार्य लिंक शेअर केल्याबददल धन्यवाद.

आज शनिवारी सकाळी चहाबरोबर इतका सुंदर पुलंचा लेख वाचायला मिळाला, आणि त्या ब्लॉग वर अजून बरच खजिना आहेस वाटते..

सवाई गंधर्व महोत्सव १९९३ साली पुलंच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांचा सत्कार झाला होता, त्यावेळी त्यांनी केलेलं भाषण इथे आहे. त्यांच्या नेहमीच्या शैलीत चौकार षट्कार मारले आहेत. विशेषतः या धाग्यावर द्यायचं कारण त्यांच्या भाषणात त्यांनी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा उल्लेख 'आनंदयज्ञ' असा केला आहे. याचा संदर्भ पुलंनी बोरकरांच्या कवितांवर केलेल्या 'एक आनंदयात्रा कवितेची' या कार्यक्रमात सापडतो. रविंद्रनाथ टागोरांच्या ओळी आहेत (मला पहिली नीट आठवत नाही, पण दुसरी - धन्य होलो धन्य होलो मानब जिबोन - अशी काहीतरी आहे), त्यांचं पुलंनी केलेलं भाषांतर - 'आनंदयज्ञासी आले निमंत्रण, मानव जीवन धन्य झाले' असं आहे. तो आनंदयज्ञ शब्द हा टागोरांचा.

जगते (ज्यगते असा उच्चार) आनोंदजग्ये आमार निमंत्रण
धन्य होलो धन्य होलो मानब जीबोन

(बंगाली उच्चारांच्या बाबतीत चू.भू. द्या.घ्या. )

Pages