पुलंच्या लेखनातील पूर्ववाङ्मयीन (गाळीव/न कळीव) संदर्भ

Submitted by हरचंद पालव on 18 June, 2022 - 10:28

विल्यम हेझ्लट नावाचा एक जुना इंग्रजी साहित्यिक म्हणून गेला आहे, की हास्य आणि रुदन हे 'काय आहे' आणि 'काय असायला हवं' ह्यातल्या फरकावर अवलंबून असतात. जेव्हा वस्तुस्थिती ही आपल्याला ह्या फरकामुळे दु:ख देते तेव्हा आपण रडतो आणि जेव्हा अनपेक्षित आनंद देते तेव्हा आपण हसतो. पुढे मराठीत आचार्य अत्र्यांनी त्यांच्या 'विनोदाचे व्याकरण' ह्या विषयावरील व्याख्यानातही 'विनोद हा, काय आहे आणि काय असायला हवं, ह्यातल्या फरकावर अवलंबून असतो' अशीच सोपी व्याख्या केली आहे. काही विनोद हे त्यात 'काय हवं' हे आपल्याला माहीत नसेल तर कदाचित तितके भावतीलच असं नाही.

नमनाला एवढं घडाभार तेल ओतण्याचं कारण म्हणजे पुलंच्या लिखाणातील काही विनोदांबाबतीत माझीही अशीच परिस्थिती झाली. उदाहरणार्थ असा मी असामीत गुरुदेव प्रकरणात 'हे कोण बोलले बोला म्हणून मी मागे पाहिलं तर ...' ह्या वाक्यात ते 'कोण बोलले बोला' ऐकायला मजेशीर वाटलं होतं. पण मुळातली 'हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' ही कविताच त्यावेळी माहीत नसल्यामुळे काय अपेक्षित आहे आणि काय अर्थाने ते शब्द वापरले ह्यातला फरक आणि त्यातली मजा कळाली नव्हती. 'वरदाबाईंनी मीराबाईच्या तुमबिन मोरीत तोंड घातलं' - हे एखाद्याला 'तुमबिन मोरी' किंवा एकूणच मीराबाईची भजनं माहीत नसलेल्यांना कळेलच असं नाही. केवळ विनोदच नाही, तर पुलंच्या लिखाणात कित्येक अन्य भाव व्यक्त होतानादेखिल असे त्यांच्या पूर्वीच्या वाङ्मयातले संदर्भ येऊन जातात. ते मुळातले संदर्भ माहीत असतील तर पुलंचं लिखाण वाचतानाची मजा, त्यातली रसनिष्पत्ती वृद्धिंगत होते असा अनुभव आहे. ते संदर्भ कुठून कुठून घेऊन पुलंनी ज्या सहजतेने वापरले आहेत, त्यावरून त्यांच्या सखोल वाचनाची आपल्याला प्रचिती येते. त्यातले आपल्याला माहीत असलेले काही संदर्भ, माहीत नसलेले काही अशा सर्वांची चर्चा करायला हा धागा उपयोगी पडावा. सुरुवात करायची म्हणून खाली काही मला माहीत असलेले संदर्भ देतो.

कवींच्या गणनाप्रसंगी सुरुवातच कालिदासापासून करतात, त्याला अनुसरून मीही सुरुवातीच्या बिगिनिंगमदी कालिदासाचे पुलंच्या लिखाणातले दोन संदर्भ सांगतो. त्यातला पहिला आहे, अंतु बर्वामधला. त्यात अंतु बर्वा म्हणतो की 'कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा ! हे सगळं चक्रनेमिक्रमेण होतं.' ह्यातला जो चक्रनेमिक्रमेण म्हणून शब्द आहे, त्याचा उगम कालिदासाच्या मेघदूतात आहे. जगण्याला (गटणीय भाषेत - जीवनाला) कालिदास चाक आणि त्याच्या आऱ्यांची उपमा देतो.
कस्यात्यन्तं सुखमुपगतं दु:खमेकान्ततो वा
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण॥

कायमच सुख किंवा कायमच दु:ख असं कुणाच्या वाटेला येतं? जीवनाची दशा ही नेमाने खाली जाऊन वर येणाऱ्या चक्राप्रमाणे असते. मेघदूतात काही मोजके, ज्याला आपण आजकाल मराठीत आयकॉनिक म्हणतो, अशा पद्धतीचे श्लोक आहेत. त्यातला एक हा म्हणता येईल. एकूणच उपमा ह्या अलंकाराच्या बाबतीत कालिदास हा 'दादा आदमी' मानला जातो. त्याच्या सर्वात लोकप्रिय उपमांपैकी 'चक्रनेमिक्रमेण' ही एक आहे (इंदुमती स्वयंवरातली दीपशिखेची उपमा तर सगळ्यात जास्त हिट आहे. त्यावरून त्याला 'दीपशिखा-कालिदास' अशा नावाने संबोधतात. पण तो आत्ताचा विषय नाही.). मराठी विश्वकोशावर अर्थनीतीवरच्या नोंदीत देवदत्त दाभोलकरांनी तेजीमंदीच्या बाबतीत चक्रनेमिक्रमेण हा शब्द वापरलेला दिसला, हे जाता जाता गंमत म्हणून नमूद करतो.

दुसरा संदर्भ येतो तो बटाट्याच्या चाळीच्या संगीतिकेत.
'गृहिणी सचिव सखी एकांती ललित कलातील प्रियशिष्या ती'
ही पुलंनी लिहिलेली ओळ कालिदासाच्या 'गृहिणी सचिव: सखी मिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ' ह्या ओळीचा थेट अनुवाद आहे. खरं म्हणजे रघुवंश ह्या महाकाव्यात इंदुमती ह्या आपल्या प्रिय पत्‍नीच्या मृत्यूनंतर विलाप करणाऱ्या अज राजाच्या तोंडी हे वाक्य येतं. म्हणजे मुळातलं वाक्य करुण रसात (ती कशी होती वगैरे आठवणीत) येतं. त्याच्या पुढच्याच ओळीत पुल कालिदासाला क्रेडिट देऊन काय म्हणतात ते पहा -
कविकुलगुरुच्या विसरा पंक्ती,
कालप्रवाही वाहुनि गेला त्या युवतींचा ग्राम,
(रसिका,) तुझे न येथे काम!

चला, आता जिथून ह्या विषयाची सुरुवात झाली, त्या संदर्भाकडे वळू. 'हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' - गोविंदाग्रजांनी लिहिलेलं अत्यंत कारुण्यपूर्ण असं हे गीत आहे. ते गीत ऐकल्यानंतर मी पुन्हा जेव्हा ... 'अहो गुरुदेवांना बरं का साहेब, सगळे सारखे' - हे कोण बोलले बोला म्हणून मी मागे पाहिलं... हे ऐकलं तेव्हा अक्षरश: फुटलो. त्यातली 'राजहंस माझा निजला' ही ओळ बिगरी ते मॅट्रिकमध्येही आलेली आहे. बहुधा कुठल्याही कवितेला 'कळवण्यास अत्यंत दु:ख होते की' प्रकारची चाल लावणाऱ्या मास्तरांच्या संदर्भात ती येते.

असा मी असामीमध्ये आणि पुलंच्या अन्यही काही लिखाणात उल्लेख असलेले 'भो पंचम जॉर्ज भूप' म्हणजे कोण ते आपल्याला माहीत असेलच, पण ती ओळ पंचम जॉर्जच्या अधिपत्याखाली असताना मराठी शाळांमध्ये सर्वांना म्हणाव्या लागणाऱ्या प्रार्थनेतली आहे. त्यावेळी बालपण घालवलेल्या सर्वांनाच हा विनोद जास्त भावला असेल यात शंका नाही.
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य | विबुधमान्य सार्वभौम भूवरा ||
नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा | शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा ||

असे आणखी कित्येक संदर्भ आहेत. तुम्हाला लक्षात आलेले किंवा आणखी माहिती हवी असलेले असे त्यांच्या लिखाणातले संदर्भ असतील तर त्यावर चर्चा होऊन जाऊ द्या.

(मागे वावे यांच्या दुसऱ्या एका धाग्यावर ह्या धाग्याची कल्पना निघाली. बरेच दिवस हा विषय चर्चेला घ्यावा हे मनात होतं पण नंतर विसरून गेलो. काही दिवसांनी फेरफटका आणि वावे ह्यांनी आठवण करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार.)

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

फेफने पाळीव प्राण्यांची आठवण काढली आहे. त्यात फडकुलीणबाईंना त्यांचा पोपट ‘सत्य वदे वचनाला नाथा’ गातो असा ठाम विश्वास असतो. त्यावर निवेदक ‘नाही, तो नुसतं क्यीर्र करतोय!’ हे सत्य वदतो! Proud

हंस हा राजस पक्षी काही सुट्टी मागणाऱ्या कारकुनासारखा ‘म्हातारी उडता नयेचि तिजला, माता मदीया अशी’ अशी अजिजी करणार नाही असाही उल्लेख त्यात आहे.

असा मी असामी मध्ये पु. लं.नी खूप nuanced विनोद पेरून ठेवले आहेत!
- बेंबटेरावांचं लग्न मारूतीच्या देवळात होतं! Of all, ब्रह्मचारी मारूती काय!
- शिंप्याचं नाव प्रोफेसर ठिगळे!
- सुट्टीशी संबंध असल्याशिवाय तिथीची भांडणे सुरू होत नाहीत! (शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीच्या वादाचा संदर्भ असावा)
- चाळींतून येणाऱ्या सार्वजनिक साथी मध्ये "हा ल हा ग" आहे असं काहीतरी अभिवाचनात आहे पण पुस्तकात नाहीये - मला वाटतं त्याला काही तरी तत्कालीन संदर्भ असावा म्हणून पु. लं. नी ती ॲडिशन घेतली असेल.

त्यात फडकुलीणबाईंना त्यांचा पोपट ‘सत्य वदे वचनाला नाथा’ गातो असा ठाम विश्वास असतो. त्यावर निवेदक ‘नाही, तो नुसतं क्यीर्र करतोय!’ हे सत्य वदतो! >>> Happy Happy

शिंप्याचं नाव प्रोफेसर ठिगळे! >>> Lol इतके दिवस वाचून/ऐकून सुद्धा ही ट्यूब पेटली नव्हती.

मलाही ते "हा ल हा ग" कळाले नाही. तसेच अजून एक न समजलेले वाक्य म्हणणे पुळ्याचा गणपती मोदक चांगले होते म्हणतो व नंतर पुढच्या वेळेस त्यावर घरचे साजूक तूप असू द्या म्हणतो. ते म्हणजे काय लग्न होउ द्या अशा अर्थाने का?

अंतू बर्व्याच्या बाबतीत "दारी कल्पवृक्ष दिलेला. पण त्याच्या खोबर्‍याहूनही करवंटीशी सलगी अधिक" हे फार चपखल वाक्य आहे. कल्पवृक्ष चा अर्थ म्हणजे मागेल ते देणारा. नारळाला कल्पवृक्ष म्हणतात हे पूर्वी शालेय पुस्तकात शिकलो आहे. कारण त्या झाडाचा जवळजवळ प्रत्येक भाग कोणत्या ना कोणत्या तरी उपयोगात येतो. पण इथे त्याच्या करवंटीशीच सलगी अधिक - हे गरिबीबद्दल वर्णन. कारण हातात करवंटी असणे हे भीक मागणे या अर्थाने समजले जाते.

nuanced विनोद >>> याचे उदाहरण मला "आम्ही त्याकाळात मॅट्रिकला बसत होतो" हे आठवते. एका ठराविक वर्षी नव्हे. "त्या काळात" - ३-४ वर्षाचा काळ Happy

“ चाळींतून येणाऱ्या सार्वजनिक साथी मध्ये "हा ल हा ग" आहे ” - ते बहुदा ‘हा व हा घ आ हे‘ (हा वाघ आहे) असं आहे असं मला वाटतं.

बाकी विरोधाभास (असा मी असामी) मधे दोनशे पाऊंडाचा ‘सुकुमार बॅनर्जी‘, वरच्या मजल्यावरचा ‘गरीब स्वभावाचा बळवंतराव‘ राहिले.

बिगरी ते मॅट्रीक मधे दोन वाक्य म्हणींच्या / वाक्प्रचाराच्या अनुशंगानं येतात. ‘आई जेवू घालीत होती, वडिलांनी देखील कधी भीक मागायचा प्रसंग येऊ दिला नाही‘ (आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना).

आणि ‘वास्तविक ही चांगली सोन्या-मोत्यानं मढलेली बाळी, तिला ‘भिक’बाळी करायचे डोहाळे कुणा सोनाराला लागले कुणास ठाऊक‘ (भिकेचे डोहाळे)

जे का रंजले गांजले’चा उल्लेख ‘असा मी असामी’त आहे ना? शंकऱ्याच्या मराठीच्या पुस्तकात?
त्याखाली ‘दास = गडी, दासी = मोलकरीण’ वगैरे शब्दार्थ दिलेले असतात. आणि ‘हत्ती मेला आहे. व्याकरणाच्या मदतीने चालवून दाखवा’ असले प्रश्न असतात.

स्वाती_आंबोळे, ते प्रकरण वाचताना ही खूप हसत होते. माझ्या मुलाला 'क्रीयापद चालवणे' ही भानगड माहिती नव्हती. त्यामुळे त्याला तो विनोद कळला नाही.
इथे सगळी पु.ल. प्रेमी मंडळी जमली आहेत. सगळे संदर्भ वाचताना 'इतक्या वेळा वाचलेल्या पुस्तकांमधलं बरंच काही माहिती नव्हतं ' असं वाटतंय. धाग्याची कल्पना उत्तम.

“ जे का रंजले गांजले’चा उल्लेख ‘असा मी असामी’त आहे ना? शंकऱ्याच्या मराठीच्या पुस्तकात?” - येस्स! बरोबर! पुस्तकातलं न्हाव्याचं प्रकरण पण जबरदस्त आहे. त्यातच संगीत शारदातल्या ‘तू चिरून टाक हि मान‘ चा संदर्भ आहे ना?

सगळे संदर्भ वाचताना 'इतक्या वेळा वाचलेल्या पुस्तकांमधलं बरंच काही माहिती नव्हतं ' असं वाटतंय. धाग्याची कल्पना उत्तम. >>> अगदी

स्वाती, हो! त्यात खाली शब्दार्थात
रंजले = गांजले, गांजले = रंजले
असं दिलेलं असतं! धड्याखालचे प्रश्न हहपुवा आहेत!

अपूर्वाई मध्ये बहुतेक फ्रेंच भाषा अवगत करणे कसे कठीण आहे हे लिहिताना "यां चिंतयामि सततं मयि सा विरक्ता" या भर्तृहरीच्या वैराग्य शतकम् मधल्या श्लोकाची पहिली ओळ वापरली आहे.
जिच्यावर प्रेम आहे ती स्त्री प्रसन्न होत नाही त्याचप्रमाणे एखादी भाषा देखील आपल्यापासून दूर राहते. फार चपखल उपमा आहे!

खिडकीसाठी वातायन हा शब्द संस्कृत वाङ्मयात आढळतो. पुलंनी एक-दोन ठिकाणी तो वापरला आहे. नव्या ग्रहयोगांमध्ये एक विरुद्ध-वातायन योग आहे आणि दुसरा पानवाला प्रकरणात कुठेतरी आहे बहुतेक.

संदर्भ माहिती असला की रसनिष्पत्ती दुणावते
+१

धाग्यामुळे ह्या ग्रुपचे सदस्यत्व घेतले.
लेख आणि प्रतिसादांतून अनेक संदर्भ नव्याने कळत आहेत.

हा धागा आणि प्रतिसाद पुन:पुन: वाचत आहे आणि पुन: पुन:
पुन:प्रत्ययाचा प्रत्यय येतो आहे!
धागाकर्ते आणि प्रतिसादक यांचे आभार.

'गणगोत'मधला हिराबाईंवरचा लेख.
या लेखात केसरबाई केरकरांबद्दल पुलं लिहितात, ह्या सत्तरी ओलांडलेल्या बाईंचा स्वर आजही असा लागतो की त्या स्वरांचे 'निटिलीं कोटिचंद्रप्रकाशू' दिसल्याचा भास होतो.
ही ज्ञानेश्वरांची रचना आहे.
https://youtu.be/Wv41x-PK9rg
कोटिचंद्रप्रकाश आणि याच रचनेतल्या पुढच्या ओळी 'कृष्णा हाल का रे डोल का रे गुज बोल का रे' या त्यांनी 'जावे त्यांच्या देशा'मधल्या 'निळाई'मध्येही वापरल्या आहेत. 'निळाई' मध्येच, " 'एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति' म्हणजे काय, ते एकाच शेवयीची नाना स्वरूपे बघितल्यावर कळते " असं लिहिलं आहे Lol 'एकं सत् विप्रा....' ही ऋग्वेदातली ओळ आहे.

हिराबाई गायला लागल्यावर, 'तोपर्यंत भारतीय संगीतकलेची या 'विराटाघरी दासी' म्हणून राहिलेल्या सैरंध्रीसारखी अपमानास्पद अवस्था होती ती संपली' असं लिहिलं आहे Happy

त्याच लेखात पुढे हिराबाईंच्या प्रतिभेसाठी 'सुखविलासी सोडी ना विनया' अशी उपमा आहे. हीच उपमा त्यांनी बालगंधर्वांच्या गाण्यासाठीही इतरत्र दिली आहे. या लेखातही बालगंधर्व आणि हिराबाईंमधली साम्यं दाखवली आहेतच. 'सुखविलासी...' चं मूळ मला माहिती नाही.

या लेखातही महायुद्धपूर्व मुंबईचं सुंदर वर्णन आहेच, पण इतरही कुठे तरी आहे आणि त्यात लिहिलं आहे की तेव्हा जे मुंबईत रहात होते, तेचि पुरुष दैवाचे

नृपकन्या तव जाया , सुखविलासी सोडी ना विनया , आर्या
वस्त्राच्छादना विरल कराया , भिजविता का मम काया?

संगीत स्वयंवर.

मग सांवळा सकंकणु ।बाहु पसरोनि दक्षिणु ।
आलिंगिला स्वशरणु । भक्तराजु तो।।. ज्ञा. १८/१४१७
हृदया हृदय एक जालें । ये हृदयींचें ते हृदयीं घातलें ।।
द्वैत न मोडितां केलें । आपणाऐसें अर्जुना।। ज्ञा.१८/ १४२१

हृदया हृदय एक जालें ही ओळ नाथांच्या चतु: श्लोकी भागवतात ही आहे.

बटाट्याच्या चाळीतल्य उपासात भेटायल्या येणार्‍या लोकांनी पिवळे हत्ती संपवले, सुपार्‍या लांबवल्या आणि 'तबकात राहिल्या देठ लवंगा साली' एवढंच शिल्लक ठेवलं - असं एक वर्णन आहे. कुठे तो गदिमांनी वर्णन केलेला जोगिया आणि कुठे हा उपास! मूळ ओळ माहित नसल्यास पहा - https://www.aathavanitli-gani.com/Song/Jogiya

सखाराम गटणे मधे 'जीवनोन्नतीचे सहा सोपान' या चौखुरेगुरुजींच्या लेखाचा उल्लेख आहे. याचा संदर्भही त्याकाळी मासिकांमधे सतत येणार्‍या 'ध्येयाचे सहा मार्ग / सुखी जीवनाचे सहा उपाय' अशा प्रकारच्या लेखांवर आहे असे पु. लं. वरील एका लेखात वाचले आहे.

'केतकी पिवळी पडली' चा संदर्भही त्याकाळच्या कुठल्यातरी कादंबरीच्या नावाचे विडंबन आहे असे वाचल्याचे आठवते. पिवळा रंग आवडीचा दिसतो पु.लं. चा Happy 'भिंत पिवळी आहे' कोण विसरेल?

भिंत पिवळी आहे - एक सौंदर्यवाचक विधान Lol

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. अनेकांनी मोलाची भर टाकली आहे.

'माझे खाद्यजीवन' मध्ये शेवटी शेवटी गौतम बुद्धाच्या वडिलांचं नाव 'शुद्धोदन' असूनही त्याला निर्वाण हे शिजत आलेल्या भाताच्या सुवासात असतं हे कळलं नाही कारण त्याने सेकंड लँग्वेज पाली घेतली होती आणि 'ओदन' म्हणजे भात हे संस्कृतात आहे, पालीत नसावे, असं लिहिलं आहे.

गौतम बुद्धाची सेकंड लँग्वेज पाली हे भयंकर आहे Rofl

मयि सा विरक्त हे त्यांनी इंग्रजी भाषे baddal ch म्हटलेय,जेव्हा ते भारतीय संगीता baddal इंग्रजीतून प्रेझेंटेशन करत असतात. (पूर्वरंग)

स्कॉटलंड मध्ये salmon मासे केवढे उच्च (king salmon) मानले जातात हे सांगताना ते गीतेचे श्लोक उद्धृत करतात - जर भगवंतानी स्कॉटलंड मध्ये गीता सांगितली असती तर masanam मार्गशीर्ष ahm, च्या जोडीला matsyanamasmi सामनः असे म्हटले असते Happy (अपूर्वाई)

म्हैस मधली सुबक ठेंगणी Happy

हा उल्लेख संगीत शारदामधील एका पदाशी संबंधित आहे.
'सुंदर खाशी सुबक ठेंगणी, स्थूल न, कृशही न, वय चवदाची.'

छान आहे हा लेख.अभ्यासपूर्ण असल्याने मला काही लिहिता येईल असं वाटत नाही. वाचते चांगलं चांगलं लिहिलेलं. Happy
मी झोपतो करून हिमालयाची उशी

Pages