पुलंच्या लेखनातील पूर्ववाङ्मयीन (गाळीव/न कळीव) संदर्भ

Submitted by हरचंद पालव on 18 June, 2022 - 10:28

विल्यम हेझ्लट नावाचा एक जुना इंग्रजी साहित्यिक म्हणून गेला आहे, की हास्य आणि रुदन हे 'काय आहे' आणि 'काय असायला हवं' ह्यातल्या फरकावर अवलंबून असतात. जेव्हा वस्तुस्थिती ही आपल्याला ह्या फरकामुळे दु:ख देते तेव्हा आपण रडतो आणि जेव्हा अनपेक्षित आनंद देते तेव्हा आपण हसतो. पुढे मराठीत आचार्य अत्र्यांनी त्यांच्या 'विनोदाचे व्याकरण' ह्या विषयावरील व्याख्यानातही 'विनोद हा, काय आहे आणि काय असायला हवं, ह्यातल्या फरकावर अवलंबून असतो' अशीच सोपी व्याख्या केली आहे. काही विनोद हे त्यात 'काय हवं' हे आपल्याला माहीत नसेल तर कदाचित तितके भावतीलच असं नाही.

नमनाला एवढं घडाभार तेल ओतण्याचं कारण म्हणजे पुलंच्या लिखाणातील काही विनोदांबाबतीत माझीही अशीच परिस्थिती झाली. उदाहरणार्थ असा मी असामीत गुरुदेव प्रकरणात 'हे कोण बोलले बोला म्हणून मी मागे पाहिलं तर ...' ह्या वाक्यात ते 'कोण बोलले बोला' ऐकायला मजेशीर वाटलं होतं. पण मुळातली 'हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' ही कविताच त्यावेळी माहीत नसल्यामुळे काय अपेक्षित आहे आणि काय अर्थाने ते शब्द वापरले ह्यातला फरक आणि त्यातली मजा कळाली नव्हती. 'वरदाबाईंनी मीराबाईच्या तुमबिन मोरीत तोंड घातलं' - हे एखाद्याला 'तुमबिन मोरी' किंवा एकूणच मीराबाईची भजनं माहीत नसलेल्यांना कळेलच असं नाही. केवळ विनोदच नाही, तर पुलंच्या लिखाणात कित्येक अन्य भाव व्यक्त होतानादेखिल असे त्यांच्या पूर्वीच्या वाङ्मयातले संदर्भ येऊन जातात. ते मुळातले संदर्भ माहीत असतील तर पुलंचं लिखाण वाचतानाची मजा, त्यातली रसनिष्पत्ती वृद्धिंगत होते असा अनुभव आहे. ते संदर्भ कुठून कुठून घेऊन पुलंनी ज्या सहजतेने वापरले आहेत, त्यावरून त्यांच्या सखोल वाचनाची आपल्याला प्रचिती येते. त्यातले आपल्याला माहीत असलेले काही संदर्भ, माहीत नसलेले काही अशा सर्वांची चर्चा करायला हा धागा उपयोगी पडावा. सुरुवात करायची म्हणून खाली काही मला माहीत असलेले संदर्भ देतो.

कवींच्या गणनाप्रसंगी सुरुवातच कालिदासापासून करतात, त्याला अनुसरून मीही सुरुवातीच्या बिगिनिंगमदी कालिदासाचे पुलंच्या लिखाणातले दोन संदर्भ सांगतो. त्यातला पहिला आहे, अंतु बर्वामधला. त्यात अंतु बर्वा म्हणतो की 'कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा ! हे सगळं चक्रनेमिक्रमेण होतं.' ह्यातला जो चक्रनेमिक्रमेण म्हणून शब्द आहे, त्याचा उगम कालिदासाच्या मेघदूतात आहे. जगण्याला (गटणीय भाषेत - जीवनाला) कालिदास चाक आणि त्याच्या आऱ्यांची उपमा देतो.
कस्यात्यन्तं सुखमुपगतं दु:खमेकान्ततो वा
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण॥

कायमच सुख किंवा कायमच दु:ख असं कुणाच्या वाटेला येतं? जीवनाची दशा ही नेमाने खाली जाऊन वर येणाऱ्या चक्राप्रमाणे असते. मेघदूतात काही मोजके, ज्याला आपण आजकाल मराठीत आयकॉनिक म्हणतो, अशा पद्धतीचे श्लोक आहेत. त्यातला एक हा म्हणता येईल. एकूणच उपमा ह्या अलंकाराच्या बाबतीत कालिदास हा 'दादा आदमी' मानला जातो. त्याच्या सर्वात लोकप्रिय उपमांपैकी 'चक्रनेमिक्रमेण' ही एक आहे (इंदुमती स्वयंवरातली दीपशिखेची उपमा तर सगळ्यात जास्त हिट आहे. त्यावरून त्याला 'दीपशिखा-कालिदास' अशा नावाने संबोधतात. पण तो आत्ताचा विषय नाही.). मराठी विश्वकोशावर अर्थनीतीवरच्या नोंदीत देवदत्त दाभोलकरांनी तेजीमंदीच्या बाबतीत चक्रनेमिक्रमेण हा शब्द वापरलेला दिसला, हे जाता जाता गंमत म्हणून नमूद करतो.

दुसरा संदर्भ येतो तो बटाट्याच्या चाळीच्या संगीतिकेत.
'गृहिणी सचिव सखी एकांती ललित कलातील प्रियशिष्या ती'
ही पुलंनी लिहिलेली ओळ कालिदासाच्या 'गृहिणी सचिव: सखी मिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ' ह्या ओळीचा थेट अनुवाद आहे. खरं म्हणजे रघुवंश ह्या महाकाव्यात इंदुमती ह्या आपल्या प्रिय पत्‍नीच्या मृत्यूनंतर विलाप करणाऱ्या अज राजाच्या तोंडी हे वाक्य येतं. म्हणजे मुळातलं वाक्य करुण रसात (ती कशी होती वगैरे आठवणीत) येतं. त्याच्या पुढच्याच ओळीत पुल कालिदासाला क्रेडिट देऊन काय म्हणतात ते पहा -
कविकुलगुरुच्या विसरा पंक्ती,
कालप्रवाही वाहुनि गेला त्या युवतींचा ग्राम,
(रसिका,) तुझे न येथे काम!

चला, आता जिथून ह्या विषयाची सुरुवात झाली, त्या संदर्भाकडे वळू. 'हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' - गोविंदाग्रजांनी लिहिलेलं अत्यंत कारुण्यपूर्ण असं हे गीत आहे. ते गीत ऐकल्यानंतर मी पुन्हा जेव्हा ... 'अहो गुरुदेवांना बरं का साहेब, सगळे सारखे' - हे कोण बोलले बोला म्हणून मी मागे पाहिलं... हे ऐकलं तेव्हा अक्षरश: फुटलो. त्यातली 'राजहंस माझा निजला' ही ओळ बिगरी ते मॅट्रिकमध्येही आलेली आहे. बहुधा कुठल्याही कवितेला 'कळवण्यास अत्यंत दु:ख होते की' प्रकारची चाल लावणाऱ्या मास्तरांच्या संदर्भात ती येते.

असा मी असामीमध्ये आणि पुलंच्या अन्यही काही लिखाणात उल्लेख असलेले 'भो पंचम जॉर्ज भूप' म्हणजे कोण ते आपल्याला माहीत असेलच, पण ती ओळ पंचम जॉर्जच्या अधिपत्याखाली असताना मराठी शाळांमध्ये सर्वांना म्हणाव्या लागणाऱ्या प्रार्थनेतली आहे. त्यावेळी बालपण घालवलेल्या सर्वांनाच हा विनोद जास्त भावला असेल यात शंका नाही.
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य | विबुधमान्य सार्वभौम भूवरा ||
नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा | शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा ||

असे आणखी कित्येक संदर्भ आहेत. तुम्हाला लक्षात आलेले किंवा आणखी माहिती हवी असलेले असे त्यांच्या लिखाणातले संदर्भ असतील तर त्यावर चर्चा होऊन जाऊ द्या.

(मागे वावे यांच्या दुसऱ्या एका धाग्यावर ह्या धाग्याची कल्पना निघाली. बरेच दिवस हा विषय चर्चेला घ्यावा हे मनात होतं पण नंतर विसरून गेलो. काही दिवसांनी फेरफटका आणि वावे ह्यांनी आठवण करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार.)

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

लोकसत्ता म्हणताना नेट आवृत्ती की छापील आवृत्ती तेही लिहीत चला. दोहोंत अजूनतरी फरक आहे. फीडमध्ये दिसणार्‍या बहुतेक बातम्या छापील आवृत्तीत नसतात. आपण त्या बातम्यांवर एकदा क्लिक केलं की तशाच दिसत राहतात. महत्त्वाच्या बातम्या मला फीडमध्ये कधीच दिसत नाहीत.

तसा हा काही पूर्ववाङ्मयीन संदर्भ नाही, पण म्हैस पूर्वेकडून ईशान्येकडे चालली होती तो हा आजचा दिवस.

Lol
हर्पा, तुम्हाला पुलंच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून 'हरचंद पालव' हीच आयडी म्हणून का घ्यावी वाटली? Happy
म्हशीच्या दिशा संक्रमणाच्या आणि सूर्याच्या अयन संक्रमणाच्या शुभेच्छा. Happy

उत्तम उपक्रम ह पा . तुमच्या उद्देशाशी १००% सहमत. पु ल आवडते लेखक असल्याने तुमच्या लेखातील आणि प्रतिक्रियेतील संदर्भ एकदम क्लिक झालेत.

मध्यंतरी असंच अचानक मला पण एक संदर्भ उलगडला. नक्की आठवत नाही आणि पुस्तक हाताशी नाही, पण माझ्या अंदाजाप्रमाणे 'खिल्ली' पुस्तकात 'ननी आणि ननु ह्यांच ननाट्य, ह्यावर जो लेख आहे त्यात ह्या ननाट्य प्रकाराची अक्षरशः खिल्ली उडविली आहे. कुठल्याशा पाश्चात्य भाषेतिल साधारण नाटकाचा सुमार स्वैर अनुवाद (म्हणजे मुंबईत पडणारा बर्फ असे संदर्भ असलेला) पडद्यावर नायक नायिका आणि खुर्च्या असे धमाल पंचेस त्यात आहेत. तर त्यातिल ननाट्य हा प्रकार अमोल पालेकरांनी मराठीत‌ आणला. हे नावही त्यांनीच दिलंय. नेपथ्याची गरज नसलेले आहे आणि संवादाइतकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त कलाकारांच्या देहबोली किंवा हालचालींना महत्व देणारे नाटक असं स्वतः अमोल पालेकरांनी त्याच वर्णन केले. रंगपंढरी ह्या उपक्रमात मधुराणी गोखले हिने घेतलेल्या अमोल पालेकरांच्या मुलाखतीत ह्याबद्दल ऐकता येईल.

जाता जाता, ह पा तुम्ही कालिदासाबद्दल पण फार छान लिहिलंय सुरवातीला. ह्या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहा ही विनंती. संस्कृत येत नसल्याने कालिदासाबद्दल जुजबी माहिती आहे. त्यांच्या लिखाणाबद्दल वाचायला आवडेल.

धन्यवाद अस्मिता आणि पर्णीका.

अस्मिता, फारच मोठा विषय आहे तो. थोडक्यात सांगायचं तर संपूर्ण कथेत केवळ २-४ वाक्यांत उल्लेख असलेलं हे पात्र तरीही आपल्या लक्षात राहतं ह्याची भुरळ लहानपणापासून मला पडली होती. लहानपणी कधी माझ्या लहान भावंडांना झोपताना गोष्टी सांगायचो तेव्हा अगदी चिऊकाऊची गोष्ट जरी असली तरी त्यात अनाहूतपणे हरचंद पालव उगवत असे आणि म्हैस आधीपासूनच पाठ असलेल्या भावंडांची करमणूक होत असे (तेव्हा काही भावंडे ही चिऊकाऊ ऐकण्याच्या वयात नव्हती, थोडी मोठी झाली होती). त्याच नावाचा वारसा आपण जालदुनियेत चालवावा असं वाटलं.

पर्णीका, पुलंचं ननाट्य भन्नाट आहेच. पण ह्या प्रकाराला ननाट्य हे नाव पालेकरांनी दिलं आहे हे माहीत नव्हतं. माहितीबद्दल आभार. बाकी कालिदासाबद्दल लिहावं इतका माझा अभ्यास नाही. कधीमधी संदर्भ येतात तेवढ्यापुरतं काहीबाही आठवतं इतकंच. मध्यंतरी माबोच्या मुख्य पानावर आषाढस्य प्रथमदिवसे (की तत्सम?) नावाचा एक लेख असल्याचं आठवतं आहे. मस्त होता तो लेख, कुणाचा ते आठवत नाही. असे काही कालिदास-जाणकारांनी लिहिलेले लेख वाचायला मलाही आवडतात.

ते नाटक यूजिन योनेस्को (इयोनेस्को) ह्या सुप्रसिद्ध नाटककाराचे ' द चेअर्स ' हे आहे. मला वाटते रंगायनने ॲब्सर्ड नाटकाचा म्हणून कौतुकाने केलेला हौशी प्रयोग असावा तो. पुलंनी य्योनेस्को चे उसनेस्को केलेले ( असे आठवते. चू भू. दे. घे.)

द चेअर्सच्या वृंदावन दंडवते कृत मराठी रूपांतराचे प्रयोग सध्या मुंबईत होताहेत. स्वेच्छामूल्य किंवा नाममात्र मूल्याचे तिकीट.

थॅंक्यु अस्मिता, आता 'आषाढस्य प्रथम दिवसे' वाचते.

थॅंक्यु हीरा तुम्ही लिहलय ती शक्यता जास्त वाटते. एकंदर नाटकाच्या बाबतीत पु ल आपल्या सारखे (माझ्या सारखे) 'स्ट्रक्चर्ड फाॅर्म' पसंत करणारे असावेत. मला खुप ऍबस्ट्रॅक्ट साहित्य झेपत नाही. माझी मर्यादा आहे मान्य आहे पण त्यामुळे मला ते ननाट्य विडंबन एकदम अपील झाले होते वाचले तेव्हा.

>>> तर त्यातिल ननाट्य हा प्रकार अमोल पालेकरांनी मराठीत‌ आणला. हे नावही त्यांनीच दिलंय … रंगपंढरी ह्या उपक्रमात मधुराणी गोखले हिने घेतलेल्या अमोल पालेकरांच्या मुलाखतीत ह्याबद्दल ऐकता येईल.

ऐकते, पण विजया मेहतांनी 'झिम्मा' पुस्तकात त्यांनी हा प्रयोग केल्याचं लिहिलं होतं. पुलंबद्दल एरवी खूप प्रेमाने लिहिलं आहे त्यांनी, पण या प्रयोगाची पुलंनी चिरफाड केल्याबद्दल त्या नाराज झाल्या होत्या असा उल्लेख आहे. आत्ता हाताशी पुस्तक नाही, पण घरी गेले की त्यात पाहून कन्फर्म करते.

ओह एकंदर हा ननाट्य प्रकार एकाच वेळी अनेकांना अपील झालेला दिसतोय. बाकी विजया मेहतांनी आत्मचरित्रात लिहलय म्हणजे पु लंचला रोख त्यांच्या कडे च असणार हे नक्की.

विजया मेहता यांनीच हा प्रयोग केला होता. पण तो रंगायन फुटण्यापूर्वी की नंतर हे आठवत नाही. तेंडुलकर, वृंदावन दंडवते, देशपांडे दंपती आणि अरुण काकडे हे बाहेर पडले आणि पुढे ' आविष्कार ' ची स्थापना त्यांनी केली. पण खुर्च्याss सादर करताना रंगायन एकत्र होते किंवा काय ते आठवत नाही. विजयाबाई ह्या लंडनहून परत आल्यानंतर ही फूट पडली.

एकंदर नाटकाच्या बाबतीत पु ल आपल्या सारखे (माझ्या सारखे) 'स्ट्रक्चर्ड फाॅर्म' पसंत करणारे असावेत >>> तसे असेलही. पण माझे इंटरप्रिटेशन असे आहे की मूळ परदेशी संदर्भांचे उथळ भाषांतर केल्यासारखे संवाद ("निमकराकडची डुकराच्या मासाची भजी", किंवा "चिराबाजारात पडणारे बर्फ"), आणि अशा नाटकांना जाणार्‍या प्रेक्षकांचा अहंगंड ("इथे सौभद्र आहे समजून आलात काय, ती गल्लाभरू नाटके निराळी"), किंवा आपले नाट्यशास्त्राचे ज्ञान मिरवणे ("कशी पोकळी भेदून आला!") या गोष्टींची खिल्ली यात प्रामुख्याने उडवली आहे.

पण या प्रयोगाची पुलंनी चिरफाड केल्याबद्दल त्या नाराज झाल्या होत्या असा उल्लेख आहे. >> मीपण हे ऐकले आहे.

फारेंड एकदम चपखल. पु लंच पारंपरिक नाटकावरच प्रेम (मराठी आणि शेक्सपिअर ची प्रदेशात बघितलेली नाटके) त्यांच्या लिखाणात ठिकठिकाणी जाणवतं . पण तु‌ नक्की खिल्ली कशाची उडवली ह्याबद्दल जे लिहिलंस ते पटलं मला. पण विजयाबाई ह्या गटात मोडत नाहीत. मी झिम्मा वाचले नाही नाटकक्षेत्रातिल मंडळि त्यांच्या बद्दल जे बोलतात त्यावरून त्या अतिशय अभ्यासू पण कमालिच्या नम्र आणि पाय जमिनीवर असलेल्या दिग्दर्शक आहेत अस वाटत. त्यांनी पुलंच्या 'तुझे आहे तुजपाशी ' मध्ये कामही केलंय म्हणजे किमान प्रोफेशनल इंटरॅक्शन असणार दोघांमध्ये. असं असताना टार्गेट म्हणून त्यांच नाटक का निवडल असेल हा प्रश्न पडला.

विजया मेहता आणि पुलं-सुनीताबाईंचे अगदी जवळचे संबंध होते.
पुलंनी फारएण्डनी म्हटलंय तसं त्या उथळ भाषांतराला आणि प्रेक्षकांच्या अहंगंडाला टार्गेट केलंय. विजयाबाईंचं नाटक म्हणून नाही.

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ >>> पाळीव प्राणी मधील उल्लेख ज्ञानेश्वरांच्या "पैल तो काऊ कोकताहे " मधून घेतलाय.

बरोबर प्रेरणा.

वाचकांचे, प्रतिसाद देणार्‍यांचे आणि चर्चेत महत्त्वाची भर घालणार्‍या सगळ्यांचेच आभार.

पुलंच्या माझे खाद्यजीवन या लेखात 'जो भात खदखदू लागला म्हणजे प्रियकराचे प्रेयसीवरचे लक्ष उडून आमोद सुनांस होते, त्याला काय पोषक अन्न या वैद्यकीय कोषात कोंबायचे?' हे वाक्य आधी नीट कळलं नव्हतं. "आमोद सुनांस होते" हे मी असंच दुर्लक्षून टाकलं होतं. आता ऑडिबलवर दि बा मोकाशींची 'आता आमोद सुनासि आले' ही कथा ऐकत होतो तेव्हा पुन्हा प्रश्न पडला की हा काय प्रकार आहे? कथेत उल्लेख आहे, त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवातलं हे वाक्य आहे, हे लक्षात आलं. मग आणखी शोध घेतला असता हा ब्लॉग सापडला. त्यानुसार आमोद म्हणजे सुवास आणि सुनांस म्हणजे नाक. मूळ ओवी 'आतां आमोद सुनांस जाले' अशी आहे. त्या रचनेतली आणखी उदाहरणं पाहिली तर इथे 'सुवास आणि नाक - हे द्वैत न राहता, दोन्ही एकच झाले' असा अर्थ लागतो. पुलंनाही तोच अभिप्रेत आहे, हे आता ते भाताचं वाक्य वाचल्यावर लक्षात येईल.

काही जण आमोद्=आनंद आणि सुनांस = श्रोत्यांस असे अर्थ लावून श्रोत्यांस आनंद झाला असा अर्थ लावतात. पण तो कसा बरोबर नाही, हे आनंद मोरे यांच्या लिखाणावरून लक्षात येईल. किंवा खालच्या मूळ ओव्या वाचल्यासही सहज लक्षात येईल (त्यातलेही अनेक इतर शब्द मला नीट कळलेले नाहीत अजून).

आतां आमोद सुनांस जाले । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठिले । लोचनेंसी ।।
आपलेंनि समीरपणे । वेल्हावती विंजणे ।
कीं माथेंचि चांफेपणें । बहकताती ।।
जिव्हा लोधली रासे । कमळ सूर्यपणे विकासे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा जालें ।।
फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची जाली नर ।
जाले आपुलें शेजार । निद्राळुची ।।
चूतांकुर जाले कोकीळ । आंगचि जाले मलयनिळ ।
रस जाले सकळ । रसनावंत ।।
तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ।
हे सारले अद्वैता । अफुटामाजी ।।

किती सुंदर रचना आहे ही!
अनेकानेक धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल! Happy

मला 'दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये | तंव भीतरी पालटू जाला'चीसुद्धा आठवण झाली.

अमांना सांगा कोणीतरी सुवास आणि आनंद यांना एकच शब्द आहे हे - त्यांना आमोद होईल ऐकून. Happy

काही शब्दांचे अर्थ शोधावे लागतील.
'चूतांकुर' म्हणजे आंब्याचा मोहोर - आंब्याला 'अच्युतफल'देखील म्हणतात असं मोल्सवर्थ सांगतोय.

>>> आपलेंनि समीरपणे । वेल्हावती विंजणे ।
हे नीट कळलेलं नाही मला - वार्‍र्‍याशी संबंधित काहीतरी आहे इतकं वगळता.

>>> माथेंचि चांफेपणें । बहकताती
वा वा! वेडावायला झालं वाचूनच!
दिन बन गया! Happy

आपले अ‍ॅडमिन वेताच्या पंख्याने वारा घालतात

>>> जाले आपुलें शेजार । निद्राळुची
हेही कळलं नाही. पण निद्राळू हा झोपाळूचा जुळा भाऊ असेल तर मजेशीर आहे. Happy

काय सुंदर रचना आहे! पुन्हा पुन्हा वाचते आहे!!
आरिसे उठिले । लोचनेंसी >> हे नीट कळले नाही. आरिसे म्हणजे आरसे का?

दि बा मोकाशींची 'आता आमोद सुनासि आले' ही कथा ऐकत होतो >>> दिठी हा चित्रपटही त्यावरच आहे ना? तो रिलीज झाला तेव्हा हा संदर्भ वाचल्यावर मला पहिले ते "माझे खाद्यजीवन"च आठवले होते.

Pages